Monday, August 15, 2011

४० साल बाद..

..वा-यावर लहरणा-या सरसोंच्या शेतामधून जाणा-या गुळगुळीत रस्त्यावर ट्रॅक्टरचा आवाज आला, तसे शेतघरातून आदित्यआजोबा बाहेर आले. ‘यशराज फार्म्स, चोप्रा अँड सन्स’चा डिजिटल बोर्ड लावलेल्या ट्रॅक्टरमधून उडी मारून त्यांचा नातू राज उतरला आणि थेट त्यांच्यासमोर येऊन म्हणाला, ‘‘ग्रँपा, मै आप से बहोत नाराज हूँ..’’
 
आजोबांनी त्याला जवळ घेतलं, राणीआजीनं लस्सीचा ग्लास त्याच्या हातात देत विचारलं, ‘‘का रे बाळा? का रूसलास आजोबांवर?’’
 
‘‘तुम्ही दोघांनी मला कधी सांगितलंच नाहीत की एकेकाळी, म्हणजे अवघ्या 40 वर्षापूर्वीपर्यंत भारतात सिनेमे निघत होते आणि ग्रँपा मोठे फिल्म डायरेक्टर होते, तू मोठी हिरोइन होतीस, हेही माझ्यापासून लपवून ठेवलंत. दॅट मस्ट हॅव बीन सो एक्सायटिंग! तो ग्लॅमरस प्रोफेशन सोडून, मुंबई सोडून तुम्ही इथे या शेतावर येऊन राहताय. देअर इज नो फिल्म बिइंग मेड इन इंडिया फॉर लास्ट थर्टी-थर्टी फाइव्ह इयर्स.. व्हाय, व्हाय ग्रँपा, व्हाय?’’
 
‘‘वो एक बहुत लंबी कहानी है बेटा..’’ आदित्यआजोबा कॅमे-यासमोर नटानं वळावं तसं वळले आणि सूर्यप्रकाशाचा लाइट घेत पुढे आले, ‘‘..चालीस साल पुरानी.’’
त्यांनी नजरेनंच राणीआजीला खूण केली. तिनं आत जाऊन कुठल्याशा संदुकीतून एक जळमटं लागलेली, पिवळय़ा पडलेल्या कागदांची फाइल आणली. ती हातात घेऊन आदित्यआजोबा पुढे सांगू लागले, ‘‘उस जमाने मे हम लोग फिल्में बनाया करते थे.. लेकिन एक दिन एक प्रोडय़ुसर को एक खत आया.. उसके बाद एक डायरेक्टर को एक चिठ्ठी आयी.. फिर एक हीरो के नाम कुरियर आया.. पत्रांचा हा ओघ वाढतच गेला..’’
 ‘‘कोणी पाठवली होती ही पत्रं? काय होतं त्या पत्रांमध्ये?’’ राजनं उत्सुकतेनं विचारलं. आदित्यआजोबा फाइल त्याच्या हातात सोपवत म्हणाले, ‘‘तूच वाचून पाहा.’’ राजनं थरथरत्या हातांनी एकेक पत्र काढून वाचायला सुरुवात केली.. त्यातल्या निवडक पत्रांचा हा मराठी तर्जुमा. 
पत्र क्र. १
 
माण्णीय डायरेक्टर सायेब,
 
आपल्या चीत्रपटात आपन राजकीय णेत्याच्या फुल्या फुल्यांवर लोक लाथा घालत आहेत, अशे दाखवले आहे, अशे समजते. आपन काय पिच्चरबिच्चर फाहात नाही. आपल्याला तस्ले शोक नाहीत. जे हाहेत ते हिथे सांगन्यासारखे नाहीत. तर सांगन्याचा पॉइंट असा की राजकीय नेत्याच्या फुल्याफुल्यांवर लाथा घालन्याच्या द्रुष्याला आमचा काही आक्षेप नाही. मात्र, त्या लाथा घालणा-या पायांमध्ये आपन आमच्या शेरात बननारी पायतानं दाखवली आहेत, अशे समजते. आमच्या गावची पायतानं म्हण्जे आमची आस्मिता, माणबिंदू, आमच्या गावाची आभिमाणास्पद ओळख. तिचा असा गैरवापर केल्याचे दाखविल्याणे आमच्या भावणा आत्यंत दुखावल्या आहेत. आपण ही पायताणं काढून त्या पायांमध्ये दुसरी कोन्तीही पायताणं घालावीत किंवा अनवाणी पायांनी लाथा घालण्याचे द्रुश्य चीत्रीत करावे अण्यथा आपल्या चीत्रपटावर बंदी घालण्याची मागणी आम्ही करू आणि आमच्या गावच्या पायताणांचा तुमच्या फुल्याफुल्यांवर योग्य वापर करू.
 
आपला णम्र,
 संभा नामा भुस्नळे 
पत्र क्र. २
 
माननीय चुंबनसम्राट नटवर्यास,
 
भारतीय संस्कृतीरक्षक संघटनेच्या वतीने आपणास अशी कायदेशीर नोटिस देण्यात येते की आपल्या चित्रपटांमध्ये फारच असभ्य, अश्लील दृश्ये असतात. खासकरून चुंबनदृश्यांचा तर भडिमार असतो. शिवाय वेगवेगळय़ा चित्रपटांमध्ये आपण वेगवेगळय़ा हिंदू तरुणींची वेळोवेळी, वेगवेगळय़ा मिषाने आणि वेगवेगळय़ा पद्धतींनी प्रदीर्घ चुंबने घेता असे आम्ही स्वत: प्रत्येक चित्रपटाची किमान तीन-चारदा उजळणी करून खात्री करून घेतली आहे. हे आपल्या धर्मात चालत असेल पण आमच्या देशाच्या उदात्त, उन्नत (अं अं.. हे तुमच्या चित्रपटातल्या कशाचंही वर्णन नाही) अशा संस्कृतीला शोभणारे नाही. आपल्याला आपले ओठ प्यारे असतील आणि त्यांचा भविष्यात (कोणत्याही कामाकरिता) वापर होत राहावा, असे वाटत असेल, तर आपल्या ‘गर्डर-2’ या चित्रपटातील सर्व चुंबनदृश्ये काढून टाकावीत आणि नायिकांचे अंगप्रदर्शनही वजा करून टाकावे. असे केल्यानंतर चित्रपटाची लांबी फक्त सव्वाअकरा मिनिटांचीच उरेल, याची आम्हाला कल्पना आहे. त्यात चित्रपटाच्या सुरुवातीला हनुमानस्तोत्र आणि रामरक्षा, भोजनाच्या दृश्यांमध्ये ‘वदनि कवळ घेता’, संध्याकाळच्या दृश्यांच्या पुढे ‘शुभंकरोती’ आणि शेवटी ‘जयोस्तुते’ यांची भर घालून आपला चित्रपट पवित्र, मंगल आणि उदात्त करावा, अशी विनंती आहे. अन्यथा आपल्यावर देशभरातल्या 789 न्यायालयांमध्ये खटले गुदरले जातील, जेथे केवळ हजेरी लावता लावता आपण चुंबन घेणे तर सोडाच ओठांनी पाणी पिणेही विसरून जाल.
 
आमच्या विनंतीला आपण योग्य प्रतिसाद द्याल, याची खात्री आहे.
 
जय हिंदुस्तान
 
आपला नव्हे, अखंड हिंदुराष्ट्राचा,
 बजरंग लंगोटे 
पत्र ३
 
महोदय,
 आपला सिनेमा आम्ही पाहिलेला नाही. त्याचं नावही आम्हाला ठाऊक नाही. त्याची कथा काय आहे ते ठाऊक नाही. मात्र, त्यात काही ना काही वादग्रस्त असणारच यात आम्हाला शंका नाही. आपल्या मते काही वादग्रस्त नसेल, तर आम्ही ते आपल्याला शोधून देऊ. आपल्या चित्रपटात एकही दृश्य नसेल, तीन तास पडद्यावर फक्त मुंग्याच दिसणार असतील किंवा पडदा पांढराधोप दिसणार असेल, तरीही या चित्रपटामुळे सामाजिक स्वास्थ्य बिघडणारच, याची आम्हाला खात्री आहे; कारण आम्हीच ते बिघडवणार आहोत. सेन्सॉर बोर्डाने सिनेमा विनाकट पास केला आहे, या आपल्या युक्तिवादात काहीही तथ्य नाही. सेन्सॉर बोर्डाला काय कळतं? आम्ही सोडून या देशात कुणालाही कसलंही काहीही कळत नाही, हे तुम्हाला कसं कळलं नाही, हेच आम्हाला कळत नाही. थिएटरच्या काचांवर दगड आणि तुमच्या घरांवर आगीचे बोळे पडल्यानंतरच हे कळणार असेल, तर आम्ही तुमची ही ‘शिकवणी’ घ्यायलाही तयार आहोत, कारण आम्हाला तेवढीच एक शिकवण आहे.
त्यापेक्षा आपण आमच्या नेत्यांना, अनुयायांना प्रदर्शनाआधी हा सिनेमा दाखवा. त्यात आम्ही सुचवू ते कट मान्य करा, म्हणजे कटकट मिटेल.
 
आपला,
 भंपकराव भुस्कुटे 
..पत्रं वाचण्यात गुंगून गेलेल्या राजच्या खांद्यावर हात ठेवून आदित्य आजोबा म्हणाले, ‘‘अशी पत्रं येतच गेली. आमचे सिनेमे प्रदर्शनाआधी फुकट खेळांतच सुपरहिट होऊ लागले. कोणत्याही सिनेमावर कोणाचाही आक्षेप नको म्हणून आम्ही सर्व खेळांना काही खुर्च्या राजकीय पुढारी, सामाजिक कार्यकर्ते, अनुयायी, पाळीव विचारवंत, संस्कृतीरक्षक यांच्यासाठी राखून ठेवायला लागलो. पुढे पुढे तर प्रेक्षक तिकीट खिडकीवर येऊन ‘माझा या सिनेमाला विरोध आहे,’ असं सांगून 20-25 तिकीटं फुकट घेऊन जाऊ लागले. दोन तीन वर्षातच सिनेमा हा तिकीट काढून पाहायचा असतो, हेच इथले प्रेक्षक विसरून गेले. सामोसे आणि पॉपकॉर्नसुद्धा निर्मात्याच्या खर्चाने फुकटच मिळालं पाहिजे, या मागणीसाठी जेव्हा देशभरात तीव्र आंदोलन झालं, तेव्हा मी डायरेक्टरच्या खुर्चीतून उठलो आणि ट्रॅक्टरवर येऊन बसलो..’’
 
ही सुन्न करणारी कहाणी ऐकल्यानंतर डोळे पुसत राज बाहेर पडला, तेव्हा मागून राणीआजीची हाक आली, ‘‘बेटा, गावात चाललाच आहेस, तर अभिषेकआजोबांच्या मिठाईच्या दुकानातून रेवडय़ा घेऊन ये पावशेर आणि शाहरुखआजोबांच्या डेअरीतून दोन लिटर दूध.’’
 ‘‘बेटा, त्या झा काकांच्या पानठेल्यावरून दोन कलकत्ता एकसोबीस तीनसोही घेऊन ये माझ्यासाठी आणि आजीसाठी मसाला पान,’’ आदित्यआजोबांनीही ऑर्डर सोडली, ‘‘आणि शेतावरून जाताना उदयआजोबांना म्हणावं, तुटलेलं बुजगावणं दुरुस्त होऊन आलंय, आता दोन्ही हात खाली करून घरी परत या!!!’’

(चित्र : प्रदीप म्हापसेकर)


(प्रहार, १४ ऑगस्ट, २०११)

No comments:

Post a Comment