सार्वजनिक माघी गणेशोत्सवाला अटकाव करणारा आदेश ठाणे
महापालिकेचे आयुक्त ए. आर. राजीव यांनी काढला आहे (हे ए. आर. राजीव आहेत
की ए. आर. ‘रहमान’?). त्यांच्या या फतव्याच्या विरोधात काही धर्मप्रेमी
नागरिक आणि उत्सवप्रेमी संस्थांनी न्यायालयात दाद मागितली आहे. यात ‘थर्ड
पार्टी’ म्हणून समस्त ठाणेकरांच्या वतीने न्यायालयाला हे निवेदन...
-अनंत फंदी
(प्रहार, २९ जानेवारी, २०१२)
न्यायमूर्ती महोदय,
ठाण्यातील माघी गणेशोत्सवाच्या वाटेतील सर्व अडथळे दूर करून आपण हा सण साजरा करण्याची सत्वर परवानगी द्यावी, अशी
विनम्र मागणी करण्यासाठी आम्ही हे निवेदन देत आहोत. (न्यायालय आहे म्हणून
विनम्र व्हावं लागतंय. उगाच न्यायालयाचा अवमान झाला तर तुरुंगवासाची नस्ती
आफत ओढवायची.)
न्यायमूर्ती महोदय, आमच्या रूढी, परंपरा, रीती-रिवाज, श्रेष्ठ
संस्कृतीचा अभिमान आमच्या नसानसांत भरून वाहतो आहे. त्या नतद्रष्ट
इंग्रजांनी कायदा करून रद्द केली म्हणून नाहीतर आम्ही सतीप्रथासुद्धा
अभिमानानं पाळली असती. पण, प्रश्न तो नाही. निवडणुकारूपी
लोकशाहीच्या परमकर्तव्यासाठी (जे बजावण्याच्या दिवशी आम्ही मित्राच्या
कर्जतच्या फार्महाऊसवर सहकुटुंब पिकनिक करतो) आम्ही आमच्या रूढी-परंपरा
बाजूला ठेवायलाही तयार झालो असतो, पण, आमच्या काही प्रॅक्टिकल अडचणी आहेत. त्यांचा विचार सन्माननीय न्यायालयाने करावा, अशी आमची विनंती आहे.
आम्हाला
आमच्या शहरात शांततेची बिल्कुल सवय राहिलेली नाही. धर्मवीरांच्या
काळापासून बंटी और बबलूच्या सध्याच्या काळापर्यंत आमच्या शहराचे इतके
प्रचंड प्रमाणात उत्सवीकरण झाले आहे की शहरात कसलाही उत्सव नसला, तर आम्हाला कसेसेच वाटते. आपण कमलहासन यांचा ‘पुष्पक’ हा मूकचित्रपट पाहिला आहे का? त्यातील आमच्यासारख्याच वस्तीत राहणारा नायकाला (ठाणेकरच असणार तो, शंकाच नाही) जेव्हा एका पंचतारांकित हॉटेलच्या शांत रूममध्ये झोप लागत नाही, तेव्हा
तो आपल्या वस्तीतली रात्रीची गजबज रेकॉर्ड करून आणतो आणि ती कॅसेट लावून
सुखाने झोपी जातो. आम्हीही उत्सवविहीन दिवसांमध्ये असेच रात्र रात्र तळमळतो
आणि शेवटी ढोल-ताशे-नगारे-नाशिक ढोलीबाजा-बँजो-डीजे रिमिक्स यांचं
रेकॉर्डिग करून ते कानाशी लावून ठेवून गाढ झोपतो.
उत्सवांची सवय आमच्या कानांनाच लागलेली नाही, तर आमच्या सगळय़ा व्यक्तिमत्वामध्ये ते भिनलेले आहेत. शहरात रस्ते मोकळे आहेत, चौकांमध्ये मंडपांचे अडथळे नाहीत, गल्लीबोळांमध्ये वाहनं किंवा माणसं विनाअडथळा शिरू शकत आहेत, नजर फेकू तिकडे थेट आरपार पोहोचते आहे, कानेकोपरे होर्डिग-बॅनरनी बरबटलेले नाहीत, हे दृश्य पाहून आमच्या जिवाला किती यातना होत असतील, याचा
सहृदयतेने विचार करा न्यायमूर्ती महोदय. नाझी फौजांच्या बाँबवर्षावानंतर
बेचिराख झालेल्या लंडन शहराकडे पाहून अस्सल लंडनवासीयाला जे वाटलं असेल, ते
असं ओकंबोकं ठाणे शहर पाहून वाटतं आम्हा ठाणेकरांना. उत्सवरूपी सौभाग्य
हिरावून घेतलेल्या पांढ-या फटफटीत कपाळासारखं उद्ध्वस्त आणि अमंगळ वाटतं या
सुनसान शहराकडे पाहून.
आमच्या या भावनांचं सोडा. तुम्ही हल्ली कुणाच्या भावनांची काही कदरच ठेवत नाही. उलट भावना घरी ठेवून बाहेर पडत जा, असं दटावता. आमच्यासारख्या भावनाप्रधानांसाठी हे म्हणजे कातडे घरी ठेवून निव्वळ हाडांनिशी बाहेर पडण्यासारखं आहे. पण, भावना सोडल्या तरी सवयींचं काय करायचं? अहो, न्यायमूर्ती महोदय, आमच्या पावलांना आणि वाहनांनाही आपसूक वेडीवाकडी वळणं घेत थबकत थबकत, दबकत
दबकत प्रवास करण्याची इतकी सवय झाली आहे की मरीन ड्राइव्हवरही पावलं आणि
एक्स्प्रेस वेवरही वाहनं तशीच नागमोडी चालतात आमची. बारा महिने तेरा काळ
आम्ही उत्सवभारल्या वातावरणात राहतो. गणपतीचा मंडप उठला की लगेच देवीचा
लागतो, मग दत्तगुरू, साईबाबा, जगद्गुरू, श्रीकृष्णावतार वगैरेंच्या उत्सवांनी शहराचाच नव्हे, तर
मनाचाही आसमंत एकदम भरून गेलेला असतो. आपल्याच न्यायालयात एक याचिका करून
आम्ही शहरात कायमस्वरूपी मंडपांची मागणी करणार आहोत. दर उत्सवाला नसती झगझग
नको. एकदम मोकळे रस्ते आणि मंडपमुक्त चौक पाहिले की चुकून आपण परदेशातच
आलो आहोत की काय, अशी शंका येते आम्हाला. या मंडपाला वळसा घालून, त्या कमानीच्या खालून, अमक्या होर्डिगाजवळच्या गल्लीतली लाइटच्या माळांनी सजवलेली डावीकडून तिसरी इमारत, असा पत्ता सांगतो आम्ही. मंडप, कमानी, होर्डिगं
तुम्ही काढून टाकलीत तर आमचं घर आम्हालाही सापडायचं नाही. हसण्यावारी घेऊ
नका. धिस इज व्हेरी सिरियस मॅटर! आमचे घंटाळीचे बापूकाका नेने- एक दिवस
घरातून खाली उतरले आणि गल्लीबाहेर आले तेव्हा एकदम मोकळा चौक पाहून
ब्लडप्रेशर वाढलं त्यांचं आणि एकदम भक्कन सूर्यप्रकाश शिरला त्यांच्या
डोळय़ात तर चक्कर येऊन जागीच कोसळले ते. अशा वयोवृद्ध ठाणेकरांच्या
प्रकृतीचा तरी विचार तुम्ही यासंदर्भात निर्णय देताना केला पाहिजे.
आणखी एकच गोष्ट सांगून तुमची रजा घेतो.
आमच्या ठाण्याचे सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी.. त्यांच्या आठवणीनं डोळय़ांत सतत पाणी येतं. स्वत:च्या लग्नाच्या जोडीदाराची, पोटच्या पोराची किंवा आईबापाची छबीसुद्धा आम्ही कधी इतक्या वेळा आणि इतक्या ठिकाणी- जळीस्थळीकाष्ठीपाषाणी पाहात नसू आम्ही, इतकी
त्यांची हसरी छबी सतत नजरेसमोर असते आमच्या. आमच्या हृदयांतच वसलेले असतात
म्हणा ना ते! तुमच्या आचारसंहितेने त्यांचे चेहरेच आमच्या नजरेसमोरून
हटवून टाकले. विरहानं प्रेम वाढतं म्हणतात. या लोकनेत्यांच्या विरहानं
आम्ही व्याकूळ झालो आहोत. कधी एकदा ते हात उंचावलेले, तडफदारपणे चाललेले, मांजरीसारख्या फिस्कारल्या हास्याचे, मस्तवाल रेडय़ासारखे टणक आणि निगरगट्ट रूप डोळाभरून पाहतो, असे झाले आहे आम्हाला.
इतकी भक्ती तर आमची (आणि त्यांचीही) साक्षात श्रीगणेशावरसुद्धा नाही. ती पाहून तो माघी गणेश पावो ना पावो, तुमचे हृदय मात्र द्रवावे, हीच अपेक्षा.
आपला,
ठों. बा. ठाणेकर-अनंत फंदी
(प्रहार, २९ जानेवारी, २०१२)
No comments:
Post a Comment