Sunday, January 29, 2012

अखेर रश्दीच जिंकले...

स्थळ : भारत
 
कुणीएक लेखक- ज्याने कधीकाळी लिहिलेल्या एका पुस्तकाने एका विशिष्ट धर्माच्या भावना दुखावल्या होत्या आणि त्या धर्माचे सौभाग्य मिरवणा-या देशांआधी या सेक्युलर देशाने त्या पुस्तकावर बंदी घालण्याचे पाक काम केले होते- तो लेखक एका साहित्यिक महोत्सवात येत आहे म्हटल्यावर त्या धर्माच्या कडव्या अनुयायांना अचानक जाग आली आणि त्यांनी त्याच्या येण्याला विरोध दर्शवला, त्याच्या पुस्तकातले उतारे वाचण्याला विरोध दर्शवला, त्याच्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे व्हर्च्युअल उपस्थितीलाही विरोध दर्शवला.
 
भारतीय प्रजासत्ताकातील सरकारी यंत्रणेने आणि सरकारचे गुलाम असलेल्या पोलिस आदी यंत्रणांनी या धर्माध टोळक्याच्या सुरात सूर मिसळून कायदा आणि सुव्यवस्थेचा नेहमीचा बागुलबुवा उभा केला. त्या लेखकाच्या उपस्थितीला प्रतिबंध करून आपल्या देशाने वैचारिक उदारतेच्या आणि प्रगल्भ सुसंस्कृततेच्या कितीही बाता मारल्या तरी आपली मूळ सामुदायिक प्रकृती ही तालिबानांच्या आणि दडपशाहीवादी चिन्यांच्या अधिक जवळची आहे, हे सप्रमाण दाखवून दिले.
 
स्थळ : अमेरिका
 
एका ‘टॉक शो’च्या विश्वविख्यात यजमानाने त्याच्या विनोदी सादरीकरणामध्ये पार्श्वभूमीला सुवर्णमंदिर दाखवले. सुवर्णजडित सुवर्णमंदिर हे अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या एका उमेदवाराचे सुटीतील निवासस्थान आहे, असा त्याच्या विनोदाचा मथितार्थ होता. त्यावर अमेरिकेतील शीख समुदायाने आवाज उठवण्याच्या आधी भारतातील संघटनांना कंठ फुटला. त्यांनी इथल्या इथे निषेध नोंदवला आणि केंद्र सरकारने त्या ‘टॉक शो होस्ट’च्या विरोधात अधिकृतपणे तक्रार नोंदवण्याच्या हालचाली सुरू केल्या. विदेशस्थ भारतीय व्यवहार खाते सांभाळणारे केंद्रीय मंत्री वायलर रवी यांनी केवळ भारतातील मंत्रीच करू धजेल, असे बेजबाबदार विधान केले. ते म्हणाले की आपण हा कार्यक्रम पाहिलेला नाही, पण त्यात शीख समुदायाच्या भावना दुखावणारे काही आहे, असे मला शीख समुदायाकडूनच कळले. मी या वांशिक वर्चस्ववादी खोडसाळ कृत्याचा निषेध करतो.
 
आपण ज्याचा निषेध करतो आहोत, ज्याला प्राणपणाने विरोध करतो आहोत, ते आपण किमान वाचले-पाहिलेले असले पाहिजे, असे- अन्य कोणाही भारतीयाप्रमाणे- रवी यांनाही आवश्यक आणि महत्त्वाचे वाटले नाही.
 
या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या गृहखात्याच्या प्रवक्त्या व्हिक्टोरिया न्यूलँड यांची प्रतिक्रिया पाहण्याजोगी आहे. त्यांनी आधी हे स्पष्ट केले की अमेरिकेची राज्यघटना ही उच्चारस्वातंत्र्याचा पराकोटीचा पुरस्कार करत असल्यामुळे जे लेनो यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई होणार नाही. जे लेनो यांची टिप्पणी ही सुवर्णमंदिराची नव्हे, तर अध्यक्षीय उमेदवार रॉम्नी यांची थट्टा करणारे होते. अमेरिकेतील शीख समुदायाचे त्या देशाच्या भरभराटीत मोठे योगदान आहे. शीख धर्माबद्दल अमेरिकेला आदर आहे. विद्यमान अध्यक्ष बराक ओबामा यांनीच गुरू नानक यांची जयंती व्हाइट हाऊसमध्ये सर्वप्रथम साजरी केली आहे.
 
ज्यांना जे लेनो यांचे व्यक्तिस्वातंत्र्य मान्य नाही, उच्चारस्वातंत्र्य मान्य नाही, त्यांना कोर्टात त्यांच्याविरुद्ध दावा करण्याचा अधिकारही आहे. तो रणदीप ढिल्लाँ या भारतीय वंशाच्या अमेरिकन नागरिकाने बजावला आहे. त्याने कॅलिफोर्नियाच्या कोर्टात जे लेनोविरुद्ध खटला दाखल केला आहे. या खटल्याचा निकाल लागेल आणि त्यातून जे लेनोवर कारवाई होईल किंवा होणारही नाही. त्याविरुद्धची दाद त्यावरच्या कोर्टात मागितली जाईल आणि कायद्याच्या चौकटीत या प्रकरणाचा जो काही व्हायचा तो अंत होईल.
 
आश्चर्याची गोष्ट म्हणजे जे लेनोच्या टिपणीवर भारतात जेवढा आणि जसा गदारोळ झाला, तसा आणि तेवढा अमेरिकेत झालेला नाही. तिथल्या शीख समुदायाने कृपाण नाचवत रस्ते अडवले नाहीत किंवा कोणत्याही प्रकारचा कायदेभंग केला नाही. त्यांचा निषेध कायद्याच्या चौकटीतच सुरू आहे.
कल्पना करा, अमेरिकेत घडलेला प्रकार- कोणत्याही धर्माच्या पवित्र प्रतीकाबाबत किंवा धर्मस्थळाबाबत भारतात घडला असता तर?
 
तर काय घडले असते याची आता कल्पना करायला नको- ते सलमान रश्दी यांच्यासंदर्भात घडलेल्या प्रकाराने सुस्पष्ट झाले आहे. केंद्रातील याआधीचे भारतीय जनता पक्षप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार अधिक धर्मसंवेदनशील होते, असे वरपांगी वाटू शकते. काँग्रेसला मोठी सेक्युलर परंपरा आहे. तो पक्ष देशात सत्तेवर असताना आणि पक्षांतर्गत भागधेयाचा भाग म्हणून तसेच धोरण म्हणून अल्पसंख्याकांना विशेष स्थान देतो, त्यांच्या मनात विश्वास निर्माण करतो. त्यामुळेच त्याच्यावर अल्पसंख्याकांच्या अनुनयाचा ठपका ठेवून भाजपप्रणीत आघाडी ठिकठिकाणी सत्तेची मधुर फळे चाखू शकली. महात्मा गांधीजींना अभिप्रेत असलेली लोकशाहीच आपण राबवत आहोत, असा या पक्षाचा टेंभा असतो. बहुमताची लोकशाही गांधीजींना अभिप्रेत नव्हती. बहुमताने अल्पमताचा आदर करावा आणि अल्पमतातील व्यक्तींनाही सोबत घेऊन, त्यांच्या आकांक्षांचा योग्य सन्मान राखत राज्य करावे, अशी त्यांच्या कल्पनेतील लोकशाही राज्यव्यवस्था होती. काँग्रेसने ही लोकशाही फक्त धार्मिक अल्पसंख्याकांच्या संदर्भातच राबवली आहे. हे निव्वळ मतपेटीचे राजकारण आहे. ते शिवसेना-भारतीय जनता पक्षाच्या बहुसंख्याकवादी ऊग्र धर्माधतेपेक्षा फारसे वेगळे नाही.
  
खरेतर धार्मिक कर्मकांडांनी पछाडलेल्या कोणत्याही देशात खऱ्या अर्थाने अल्पसंख्य असतात ते धर्मप्रामाण्य नाकारणारे विवेकवादी. माणसाचा सगळा विकास चिकित्सेतून झाला आहे त्यामुळे चिकित्साच नाकारणाऱ्या श्रद्धेचे प्रामाण्य स्वीकारणार नाही, अशी त्यांची भूमिका असते. तिचा भावनिक अवगाहन आणि शाब्दिक मायाजालापलीकडे कोणत्याही मार्गाने बौद्धिक प्रतिवाद करता येत नाही म्हटल्यावर धर्मवादी बहुसंख्याक- धर्म भ्रष्ट किंवा नष्ट होण्याच्या चिरस्थायी भीतीतून- विवेकवाद्यांवर शक्य त्या सर्व वैध-अवैध, प्रसंगी हिंसक मार्गानी हल्ले चढवत असतात. अशावेळी अल्पसंख्याकांचे कैवारी म्हणवून घेणारे काँग्रेसचे सरकारही प्रत्यक्षात धार्मिक अल्पसंख्याकांचीच कड घेते. त्यांची मतपेटीच्या दृष्टीने आवश्यक बहुसंख्या आहे की नाही, याची खात्री करून घेण्याचीही गरज सरकारला भासत नाही. कारण, श्रद्धा सांभाळण्याच्या बाबतीत बहुसंख्याक आणि अल्पसंख्याक हे जवळपास एकत्रच असतात. म्हणूनच रश्दी यांच्या विचारस्वातंत्र्याची जोरकस पाठराखण, बहुसंख्य हिंदूंना प्रभावित करण्याची व्यूहात्मक रचना म्हणूनही कोणताही हिंदुत्ववादी पक्ष करत नाही. त्याने भूतकाळात अशाच प्रकारे कोणाच्या ना कोणाच्या विचारस्वातंत्र्याची गळचेपी केलेली असते आणि भविष्यातही ती करण्याचा परवाना कोण गमावणार? 
रश्दींच्या ‘उपस्थिती’ला विरोध दर्शवणारे आणि त्यांना गैरहजर राहायला भाग पाडणारे सगळेच जण एक विसरतात की अशा प्रत्येक रश्दीचे नेमके काय करायचे, हा प्रश्न सर्व धर्माधांना विचाराच्याच पातळीवर उतरून सोडवावा लागणार आहे. कारण, अविचाराने फक्त असले बीभत्स आणि तात्कालिक विजय मिळतात. रश्दींच्या शारीरिक उपस्थितीच्या पलीकडे त्यांचे अस्तित्व आहे, त्यांच्या पुस्तकांच्या रूपाने ते कायम उरणार आहे आणि श्रद्धावंतांना कायम आव्हान देत उभे ठाकणार आहे. हे अस्तित्व किती ताकदवान असते, याची कल्पना धर्मवेडय़ांना आता तरी आली आहे का?
 
जयपूरच्या साहित्य महोत्सवात रश्दी केवळ शरीराने उपस्थित नव्हते, त्या महोत्सवावर सर्वात मोठी छाप आणि प्रभाव तेथे उपस्थित असलेल्या साहित्यिकांचा नव्हता, रश्दींचा होता.
 हा रश्दींच्या विरोधकांचा सर्वात मोठा पराभव होता.


(व्यंगचित्र : मंजुल, डीएनए यांच्या सौजन्याने)
(प्रहार, २८ जानेवारी, २०१२) 

No comments:

Post a Comment