‘या या पोटावळे पत्रकार, या’’ साहेबांनी कार्यकारी संपादकांचं दिलखुलास स्वागत केलं, ‘‘काय पेड न्यूजसाठी आलात वाटतं?
-अनंत फंदी
(चित्र : प्रदीप म्हापसेकर)
(प्रहार, १५ जानेवारी, २०१२)
साहेब चष्मा न लावताच बसलेत की काय, का. सं. च्या मनात शंका आली.
‘‘साहेब, मी आलोय.. मॅरेथॉन मुलाखत घ्यायला..’’ का.सं.ना आवाजातली एरवीची गुर्मी लपवून मवाळ स्वर लावताना त्रास होत होता.
‘‘पाहिलं हो मी तुम्हाला. डोळे फुटलेले नाहीत माझे.. आई जगदंबेच्या कृपेने अजून सगळं लख्ख दिसतं!’’ हे एक बरं आहे इथे. जे काही घडतं ते आई जगदंबेच्या कृपेनं, का.सं.च्या मनात विचार आला, म्हणूनच
गाव तिथं क्लास काढलेल्या सरांनी रोजनिशी प्रकाशित केली. तेव्हा तिच्यात
आई जगदंबेच्या कृपेनं सकाळी जाग आली आणि शि.से.प्रं.च्या कृपेनं दात घासले, असं स्तवन होतं. (त्यात चुकीचं काही नव्हतं म्हणा, शिसेप्रंची अवकृपा झाली असती तर घासायला दात शिल्लक राहिले असते का?)
का.सं.च्या मनात हे विचारचक्र सुरू असताना तिकडे साहेब आणखी फॉर्मात येत होते, ‘‘आई भवानीच्या कृपेनं उद्या नजर कमी झाली, तर माझ्या एकेका सैनिकाचे दोन डोळे (‘चष्मेवाला असेल, तर चार,’ का.सं.ची जोड) असे लाखो डोळे मला दृष्टी देतील. मी त्यांच्या डोळ्यांनी जग बघेन.’’ (‘त्यांच्या हातांनी शत्रूला कानफटवेन, त्यांच्या पायांनी तुडवेन. सगळं काही त्यांच्यानं करवून घेईन. आम्ही आपले नामानिराळे.’ ही का.सं.ची मनातल्या मनात जोड.)
आता न राहवून का.सं. पुढे झाले आणि म्हणाले, ‘‘साहेब, आपण तीर्थावर नाहीत, घरातल्या सोफ्यावर आहात. समोर विशाल जनसागर नाही. तेव्हा भाषण आवरा.’’
‘‘अरे गधडय़ा, मी मुलाखत देण्यासाठी माझे विचार तापवतोय. गायक कसं गाणं सुरू करण्याआधी आवाज तापवतात तसं.’’
त्या मानानं बरीच मवाळ उपमा सुचली साहेबांना, का.सं.च्या मनात विचार आला आणि ते म्हणाले, ‘‘छान छान. ते मघाचं पोटावळे पत्रकार, पेड न्यूज वगैरेही विचार तापवण्यातलंच होतं का?’’
‘‘छे छे, ते सगळं खरं होतं,’’ साहेब गर्जले, ‘‘आम्ही सगळ्याच पत्रकारांना पोटावळे मानतो. तुम्ही तर पगारी कार्यकारी संपादकाबरोबर पगारी नेतेसुद्धा होऊन बसलायत आमच्या पक्षाचे.’’
‘आई जगदंबेच्या कृपेनं,’ का.सं. मनातल्या मनात पुटपुटले आणि प्रत्यक्षात मात्र ‘आपले आशीर्वाद आहेत, साहेब’, असं साहेबांच्या कानात गुणगुणले.
‘‘कसले बोडक्याचे आशीर्वाद? मजबुरी आहे मजबुरी. सगळे कार्यकारी कामाचे असते, तर तुमच्यासारख्यांना नेते बनवण्याची वेळ आली असती का आमच्यावर?’’ आता मनातल्या मनात पुटपुटण्याची पाळी साहेबांची होती. प्रत्यक्षात ते म्हणाले, ‘‘एवढं
करूनही तुम्ही पेपर चालवण्यासाठीही मलाच कामाला लावता. घ्या चार हप्त्यांत
मॅरेथॉन मुलाखत. तुम्ही खूष नि ती चॅनेलची डबडी खूष. आजचा सवाल आजचा सवाल
म्हणून हात हलवत, घसा खरवडून नाचायला, रेकायला मिळणार म्हणून सगळी वटवागळं खूष.’’
‘‘पण, साहेब, तुमची मुलाखत असतेच तशी दमदार.’’
‘‘हो, अरे पण असा दम तुमच्यात कधी येणार? अजून टणक असलो तरी वय झालंय माझं! रिटायर होऊद्यात की मला सुखानं. गलितगात्र झालो, हॉस्पिटलात गेलो, व्हीलचेअरवर बसलो, तरी मलाच नाचवताय जिथंतिथं. तो कार्यकारी अध्यक्ष नेमलायत ना, तो काय करतो?’’
‘‘फोटो काढतो.. छान काढतो.. आय मीन काढतात.. आणि साहेब, तुम्हीच नेमलंयत त्यांना.’’
इथं
साहेब कपाळाला हात लावून काहीतरी अगम्य असं तोंडातल्या तोंडात पुटपुटतात.
ते गम्य असतं तरी आपल्या पेपरातसुद्धा छापण्यायोग्य भाषेतलं नसणार याची
का.सं.ला खात्री असल्यानं ते टिपून घेण्याच्या फंदात पडत नाहीत. ‘‘करूयात ना मुलाखतीला सुरुवात? हवा कशी आहे?’’
‘‘थंडगार आहे. येत्या निवडणुकांची ही शिरशिरी आहे. हवा आहे आणि तिच्यात श्वासोच्छ्वास करता येतोय, हेच पुष्कळ असं म्हणायची पाळी येणार आहे.’’
का.सं. ‘आ’ वासतात.
‘‘तुमची तब्येत कशी आहे?’’
‘‘मस्त. ठणठणीत. तुमच्यासारखे आणि तुमच्या त्या कार्याध्यक्षासारखे ऐदी सोदे पोसायचे म्हणजे मला झक मारत ठणठणीत राहावंच लागणार.’’
‘‘आगामी निवडणुकांबद्दल काय वाटतं?’’
‘‘वाट लागणार. पुरती वाट लागणार. लोकांना किती काळ उल्लू बनवणार? किती दिवस बोलबच्चन देणार? काहीतरी कामं नकोत का करून दाखवायला? इथं जो तो नुसता खा खा खातोय? आता पुढची पाच र्वष हवाबाण हरडे खाऊन हवाबाण सोडत फिरा म्हणावं.’’
‘‘अहो साहेब, हे काय बोलताय तुम्ही?’’
‘‘मुलाखत घेतोयस ना माझी?’’
‘‘ही मुलाखत छापायची?’’
‘‘काय डोस्कं आउट झालंय का काय तुझं?’’ साहेब पुन्हा अगम्य-पण गम्य असतं तरी ‘अनछापणेबल’ असं काहीतरी पुटपुटतात, ‘‘अरे, आतापर्यंत हज्जार वेळा मुलाखती दिल्यात तुला. त्यांच्या फायली उघड आणि चार भाग तयार कर. याची हजामत, त्याची भलामण, आई भवानी, आई जगदंबा, मराठी माणूस, सुंता, दंगलीत आम्हीच वाचवलं, आता सत्ता गेली तर मुंबई महाराष्ट्रातून तुटली म्हणून समजा, बाकी याला टपल्या, त्याला टिचक्या, थोडे डबल मीनिंग विनोद असा सगळा मालमसाला टाकून करून टाक हवे तेवढे भाग. आणि आता भाग भाग भाग डी. के. बोस, भाग!-अनंत फंदी
(चित्र : प्रदीप म्हापसेकर)
(प्रहार, १५ जानेवारी, २०१२)
No comments:
Post a Comment