Monday, January 23, 2012

नॉट ओके.. नेक्स्ट!

गजराचं घडय़ाळ पाचव्यांदा केकाटलं तेव्हा राजसाहेबांनी पांघरुणातून डोकंही बाहेर न काढता हातानं चाचपून त्याचा कर्कश्श आवाज बंद केला आणि अंदाजानंच ते खिडकीच्या बाहेर भिरकावून दिलं.. ‘खळ्ळ खटय़ॅक’ असा घडय़ाळ फुटल्याचा आवाज आला नाही, तेव्हाच त्यांच्या लक्षात आलं की खिडकीबाहेर उभ्या असलेल्या स्वीय सहायकानं ते झेललं आहे, याचा अर्थ, आता जागं व्हावंच लागेल. ‘च्यामारी या घडय़ाळाच्या, तिकडे प्रचारात पण नडतंय आणि इकडे झोपेचंही खोबरं करतंय..’ तोंडातल्या तोंडात पुटपुटत नाईलाजानं अंथरुणाबाहेर पडून आळसटून हात ताणत त्यांनी खिडकीबाहेर नजर टाकली आणि त्यांची झोपच उडाली. बंगल्याबाहेरच्या रस्त्यावर या टोकापासून त्या टोकापर्यंत हातात फायली घेतलेल्या माणसांची ही गर्दी जमली होती.
 
‘‘अरे हा काय प्रकार काय आहे?’’ साहेबांनी पीएला विचारलं.
 
‘‘हे सगळे प्रोडय़ुसर आहेत हिंदी मालिकांचे. मराठी मालिकांचे उद्या येतील. हिंदी सिनेमाच्या निर्मात्यांना परवाची वेळ दिलीये आणि त्याच संध्याकाळी मराठी सिनेमाच्या निर्मात्यांना.’’
 
‘‘सगळय़ांना एकत्र बोलावलं असतंस तर शिवाजी पार्कावर सभाच लावली असती. कशाला आलेत हे सगळे परप्रांतीय, उपरे डोमकावळे?’’
 
‘‘तुम्हाला स्क्रिप्ट वाचून दाखवायला.’’
 
‘‘इकडे या’’, साहेबांनी पीएला जवळ बोलावलं, ‘‘चालून दाखवा. पुढे या.’’ त्याचे डोळे निरखले, थोडंसं पुढे झुकून वासाचा अदमास घेतला, ‘‘सकाळी चहाऐवजी नवटाक, पावशेर मारून आलात की काय आज? मी काय टीव्ही चॅनेल काढतोय की काय एखादं नवीन की ‘मातोश्री पिक्चर्स’ असं बॅनर काढतोय? एवढय़ा सगळय़ांची स्क्रिप्ट्स ऐकत बसलो, तर पक्ष कोण माझा काका चालवणार?’’ चटकन जीभ चावल्यामुळे राजसाहेबांची सरबत्ती थांबली, तसा पीए मवाळ स्वरात म्हणाला, ‘‘पण साहेब, तुमच्या परमिशनशिवाय त्यांचं कामच पुढे चालणार नाही.’’
 
‘‘कशाची परमिशन?’’
 
‘‘यांच्या पटकथेत मराठी माणसांच्या व्यक्तिरेखा आहेत, त्या योग्य प्रकारे चितारल्या आहेत की नाहीत, हे तुम्ही पाहून ओके केल्याशिवाय कोणता शहाणा निर्माता मालिकेचं किंवा सिनेमाचं शूटिंग करेल. मुंबईत राहायचंय त्याला, काम करायचंय..’’ पीए अभिमानानं म्हणाला.
 
‘‘शिंची कटकट’’, कपाळावर हात मारून घेत राजसाहेब म्हणाले, ‘‘आम्हालाही ना एकेक सॉलिडच आयडिया सुचतात. एक काम करा. सगळय़ांना बसवा. एकेकाला पुढे आणा. मराठी माणसाचं कॅरेक्टर काय आहे, ते एका ओळीत सांगायचं म्हणावं. ओके-नॉट ओके टिपून घ्या नीट.’’
 ...............
‘‘साहेब, माझ्या स्क्रिप्टमध्ये मोलकरीण आहे गंगू नावाची.’’
 
‘‘चालणार नाही.’’
 
‘‘आम्ही तिला कांजीवरम सिल्कच्या साडय़ा देणार आहोत नेसायला. प्रत्येक सीनमध्ये नवी.’’
 
‘‘जमणार नाही. शेवटी मोलकरीणच दाखवणार ना तुम्ही तिला?’’
 
‘‘पण, साहेब, ती स्कोडा गाडीतून कामावर येते, असं दाखवणार आहोत.’’
 
‘‘साहेब, हा फारच रिअ‍ॅलिस्टिक टच आहे..’’ पीएनं मध्ये तोंड घातलं, ‘‘हल्ली मोलकरणींचे कामाचे रेट इतके वाढलेत की ती कारमधून येते याचं प्रेक्षकांना आश्चर्यही वाटणार नाही.’’
 
‘‘तुला बोलायला सांगितलं होतं?’’ साहेबांनी फिस्कारून विचारलं आणि स्क्रिप्ट भिरकावून दिलं, ‘‘नेक्स्ट!’’
 
‘‘साहेब, माझ्या स्क्रिप्टमध्ये रामा गडी आहे..’’
 
‘‘का? कृपा गडी असला तर स्वच्छ भांडी घासणार नाही का?’’
 
‘‘पण, साहेब मी त्याला फुल पँट घालणार आहे. मालकाच्या बंगल्याशेजारी त्याचा पण छोटा बंगला असतो, अशी आयडिया आहे आमची.’’
 
हेही स्क्रिप्ट भिरकावलं गेलं.. कुठे माळी, कुठे प्लंबर, इथपासून कुठे हवालदार, कुठे भ्रष्ट इन्स्पेक्टर, कुठे लाचखोर पुढारी, माफिया डॉन, लबाड बिल्डर (‘ही तर द्विरुक्ती झाली’- स्वत: बिल्डर असलेल्या साहेबांची मार्मिक टिपणी).. वेगवेगळय़ा स्क्रिप्ट्समध्ये वेगवेगळय़ा लेखकांनी मराठी माणसाला असे सगळे रोल दिले होते.. राजसाहेब एकेकावर काट मारत चालले होते. ‘नॉट ओके’ची यादी 1772वर पोहोचली, तेव्हा वडापावची गाडीवाला, डबेवाला, भोरचा कुल्फीवाला आणि मासळी बाजारातल्या कोळणी एवढेच काय ते मराठी माणसांचे रोल ओके झाले होते. हा आकडा 1123 होता तेव्हापासून पीए काहीतरी बोलू पाहात होता, त्याला ती संधी 1772नंतर मिळाली, ‘‘उचकटा, उचकटा, तुमचं तोंड उचकटा.’’
 
‘‘नाही म्हणजे सहज आपली एक शंका आली म्हणून बोलतो.’’
 
‘‘फुटेज खाऊ नका. लीड रोल माझा आहे. फटाफट बोला.’’
 
‘‘साहेब आतापर्यंत आपण इतक्या मालिका-सिनेमांमधले मराठी माणसांचे रोल कट केलेत. या सगळय़ा भूमिका आता इतर प्रांतीयांच्या नावांनी झळकतील.’’
 
‘‘मग, बरोबरच आहे. सगळी हलकी कामं करायची का मराठी माणसांनी?’’
 ‘‘त्यामुळेच साहेब थोडी पंचाईत होणार आहे. म्हणजे असं की ही सगळी कथानकं घडतात मुंबईत. त्यात मुख्य व्यक्तिरेखा आधीपासूनच परप्रांतीय आहेत. आता फुटकळ रोलमधली मराठी माणसंही तुम्ही कटाप केलीत. त्यामुळे मुंबईत सगळी कामं परप्रांतीयच करतात, असा प्रेक्षकांचा समज नाही का होणार?’’
‘‘मारी टोपी,’’ विचारात पडलेल्या साहेबांनी पीएच्या पाठीवर थोपटलं, ‘‘भेजा आहे बरं का तुला? आता आणखी एक फतवा जारी करा. मुंबईत मालिका-सिनेमा बनवायचा असेल, तर सगळय़ा प्रमुख व्यक्तिरेखा मराठीच असल्या पाहिजेत.’’
 
ट्रिंग ट्रिंग.. ट्रिंग ट्रिंग..
 फोन वाजला. आत जाऊन पीएने घेतला. दोन मिनिटांनी बाहेर येऊन म्हणाला, ‘‘साहेब, हॉलिवुडवरून फोन होता एका प्रोडय़ुसरचा. त्यांनी विचारलंय, ग्वाटेमालामध्ये शूटिंग सुरू असलेल्या आमच्या पुढच्या सिनेमात एकही मराठी व्यक्तिरेखा नाही. तुम्हाला काही प्रॉब्लेम तर नाही ना?’’

-अनंत फंदी 

(प्रहार, २२ जानेवारी, २०११) 

2 comments:

  1. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  2. यात माधुरीनं स्वखुशीनं स्वीकारलेली जाहिरातीतला मोलकरणीची भूमिकाही यायला हवी होती. तिला राजसाहेब काय शिक्षा करणार? यापुढे राजकुमार,राजा-महाराजा, उद्योगपती, दुकानदार (पण शिववड्याचे चालणार नाहीत), बिल्डर, मंत्री (पण खलनायक म्हणून नव्हे) अशाच भूमिका मराठी नटांनी स्वीकाराव्यात आणि नट्यांनी श्रीमंत पतीची राणी, राजकन्या, स्वतःची कार चालवणारी, 'राज'कारणी बाई (पण दुष्ट नव्हे) अशा भूमिका स्वीकाराव्यात, असा फतवा राज साहेबांनी काढला पाहिजे. मराठी माणसाची इमेज सुधारायची तर त्याला असे कठोर उपायच योजले पाहिजेत.- मुकुंद टाकसाळे
    Reply

    ReplyDelete