Showing posts with label फटका. Show all posts
Showing posts with label फटका. Show all posts

Monday, February 6, 2012

त्यांचं तिकीट, आपली लॉटरी!

मोरूला सगळंच धूसर दिसत होतं..
 
ते स्वाभाविकच होतं.. कारण, त्याच्या डोळय़ांतून घळघळा अश्रुधारा वाहात होत्या.. हृदय उचंबळून येत होतं.. राहून राहून कढ येत होते..
 
तो एका गोलाच्या मध्यभागी उभा होता. गोलाच्या परीघावर तंबू उभारलेले होते. सर्वावर झेंडे. कुठे भगवा फडकतोय, कुठे इंजिन फुरफुरतंय, कुठे हाताचा आशीर्वाद तर कुठे घडय़ाळाची टिकटिक..
 
सर्व तंबूंसमोर एकेक टेबल. टेबलावर कागदांचे गठ्ठे. याद्यांच्या लांबच लांब पत्रावळय़ा आणि टेबलांसमोर भल्यामोठय़ा रांगा.. काही ठिकाणी त्या रांगा मोडून टेबलाभोवती उडालेली झुंबड.. सगळीकडे एकच आवाज.. मला, मला, मला, मला..
 
हे दृश्य मोरूला पहिल्यांदा दिसलं तेव्हा त्याला आधी वाटलं की चुकून आपण शिर्डीच्या साईबाबांच्या मंदिराबाहेरच्या रांगेसमोर आहोत की काय? तिथे सगळे मला नोकरी, मला छोकरी, मला टोकरी, मला पैसा, मला यश, मला प्रेम, मला सुख, मला गाडी, मला बंगलाम्हणून मनोमन आक्रंदत असतात.
 
नंतर त्याला वाटलं की आपण ट्रॅफिक सिग्नलजवळच उभे आहोत आणि थांबलेल्या गाडय़ांभोवती भिका-यांची झुंबड उडाली आहे, ‘मला, मला, मला, मला.. माई मला वाढ, बाबा मला दे..
 
मग त्याला प्रश्न पडला आज भलत्याच वेळी पाणी आलं की काय चाळीच्या नळाला. सगळेच्या सगळे लोटलेत हंडय़ा, कळश्या, तपेली, बादल्या, लोटे, ग्लासं घेऊन, ‘आधी मला, मला, मला, मला, मला.’’
 की ही रेशन दुकानासमोरची रांग.
की केजीपासून पीजीपर्यंत कोणत्याही अ‍ॅडमिशनची.
 
की एखाद्या गल्लीदैवताच्या भंडा-याची.
 
ही सात बावन्न किंवा नऊ सत्तावीसच्या लोकलवर उडालेली झुंबड तर नव्हे? ‘‘आधी मी, आधी मी, आधी मी..’’
 
कुणीतरी काहीतरी फुकट वाटतं असणार, त्याशिवाय धावत्या मुंबईत इतके लोक एका जागी थांबून गर्दी करायचे नाहीत,’ मोरूच्या डोक्यात टय़ूब पेटली आणि तो धीर करून पुढे सरकला. एका ठिकाणच्या झुंबडीच्या शेवटच्या टोकावरून समोरच्याला दाबजोर रेटत असलेल्या माणसाच्या खांद्यावर टकटककरून विचारलं, ‘‘काय वाटतायत हो इथं?’’
 तिकीट, तिकीट’, एवढं पुटपुटून त्या माणसाने पुन्हा समोरच्याला रेटले आणि मला मला मला मलाचा जप सुरू झाला.
मोरू बुचकळय़ात पडला. ही काय भानगड? हे कसलं तिकीट? बस स्टॉप दिसत नाही, रेल्वे स्टेशन दिसत नाही, कोणी पैसे देतानाही दिसत नाही (तिकीट दिल्यानंतर घेत असतील म्हणा कदाचित) आणि तिकीट कसलं घेतायत?
 
त्यानं पुन्हा नॉक नॉककेलं आणि अदबीनं विचारलं, ‘‘कुठे जायचं तिकीट देतायत हो इथे?’’
 
‘‘लॉटरीचं,’’ दोन क्षण वळून पुन्हा त्या इसमाचं मला, मला, मला, मलासुरू झालं..
 
‘‘कसली लॉटरी?’’ मोरूनं पुन्हा विचारलं.
 
आपला नंबर लागणं कठीण आहे, याचं भान आल्यामुळे की काय कोण जाणे, पण, आता तो तिकीटेच्छुक माणूस झुंबड सोडून मोरूकडे वळला आणि त्याला आपादमस्तक न्याहाळू लागला. माणूस साधा दिसतोय, गरीब दिसतोय, म्हणजे नक्कीच आपल्यापैकी नसणार, आपला प्रतिस्पर्धी नसणार, हे लक्षात येताच त्याच्या कपाळावरचं आठय़ांचं जाळं उलगडलं आणि नजरेतली खुन्नस मावळली. काही क्षणांनंतर तर त्याला साक्षात्कारच झाला की हाच तो सामान्य मुंबईकर, जो आता पुढचे काही दिवस आपल्याला लक्षात ठेवायला लागणार आहे. हाच तो माणूस जो आपल्यासाठी आता देव, मायबाप, त्राता, तारणहार, सर्वस्व वगैरे असणार आहे. या जागृतीसरशी त्याच्या चेहऱ्यावरचे तुसडे भाव पालटून त्यांची जागा अदबीनं आणि जिव्हाळय़ानं घेतली, ‘‘साहेब,’’ स्वर तर डोळे झाकल्यावरच लतादीदीच बोलताहेत असं वाटण्याइतके मंजुळ झाले, ‘‘तुमची लॉटरी!’’
 
आता मोरू पुरता भांजाळला, ‘‘माझी लॉटरी. अहो, पण तिकीट तर तुम्ही घेताय ना?’’
 
‘‘तीच तर गंमत आहे साहेब,’’ तोंडभरून हसत तिकीटेच्छुक म्हणाला, ‘‘तिकीट मी काढणार असलो तरी लॉटरी तुमचीच लागणार आहे, फायदा तुमचाच होणार आहे..’’
 
‘‘ही फारच वेगळी लॉटरी आहे हो, जरा मला सांगा ना समजावून’’ मोरूनं गळ घातली.
 
‘‘असं आहे साहेब, मला तुमची सेवा करण्यासाठी तिकीट हवंय. सेवकच आहे मी तुमचा, या नगराचा.’’
 
‘‘अरे वा, भेटून आनंद झाला,’’ मोरूनं प्रेमभरानं सेवकाचे हात हातात घेतले, पाचही बोटांतल्या जाडजूड अंगठय़ा त्याच्या ओक्याबोक्या बोटांना बोचल्या आणि त्याची हडकुळी बोटं सेवकाच्या गुबगुबीत पंजाला टोचली. सेवकाच्या गळय़ातल्या रत्नजडित सुवर्णहारावरून परावर्तित होत असलेल्या झगझगीत प्रकाशामुळे मालकाचे डोळे दिपण्याचाही हा पहिलाच प्रसंग असावा.
 
‘‘फार छान, फार छान. तुम्ही फार सेवाभावी वृत्तीचे दिसता. घ्या ना मग तुम्ही तिकीट आणि करा सेवा.’’
 
‘‘तोच जरा प्रॉब्लेम आहे. ही झुंबड पाहताय ना तुम्ही? हे लोक तिकीट मिळून देतील तर ना?’’
 
‘‘पण, हे लोक का नाही मिळू देणार तिकीट तुम्हाला?’’
 
‘‘कारण ते त्यांना हवंय म्हणून.’’
 ‘‘कशाला?’’
‘‘तुमची सेवा करायला?’’
‘‘काय सांगताय, इतक्या लोकांना माझी सेवा करायचीये?’’
‘‘हो तर, त्यासाठीच सगळे मला मला मला मलाकरून नाचतायत, एकमेकांची डोकी फोडतायत, कागद पळवताहेत, गळे आवळताहेत, हाणामा-या करताहेत.’’‘‘काय सांगताय काय? केवढी ही जनसेवेची आंच,’’ आता मोरूचे डोळे डबडबले. ही इतकी माणसं, छान छान कपडय़ांमधली, उंची मोटारगाडय़ांमधून आलेली, अत्तरगंधित सुगठित पुष्ट देह आपल्या सेवेसाठी झिजवताहेत, हे पाहून त्याला आभाळाहून मोठं झाल्यासारखं वाटू लागलं आणि डोळय़ांतून घळघळा धारा सुरू झाल्या.. सगळं धूसर दिसत असतानाच डोक्यात मात्र काहीतरी लखकन स्पष्ट झालं आणि त्यानं निरागसपणे विचारलं, ‘‘बाकीचे दिवस कुठे असता तुम्ही?’’
..
 खाडकन पेकाटात लाथ बसली आणि धूसर चित्र स्पष्ट झालं तेव्हा कमरेवर हात ठेवून उभा असलेला बाप दिसला आणि उत्तर आलं, ‘‘रोज सकाळी या वेळी इथेच असतो मी, हे विसरलास का गधड्या?’’
-अनंत फंदी

Sunday, January 29, 2012

डोळ्यांनी पाहीन रूप तुझे...

सार्वजनिक माघी गणेशोत्सवाला अटकाव करणारा आदेश ठाणे महापालिकेचे आयुक्त ए. आर. राजीव यांनी काढला आहे (हे ए. आर. राजीव आहेत की ए. आर. ‘रहमान’?). त्यांच्या या फतव्याच्या विरोधात काही धर्मप्रेमी नागरिक आणि उत्सवप्रेमी संस्थांनी न्यायालयात दाद मागितली आहे. यात ‘थर्ड पार्टी’ म्हणून समस्त ठाणेकरांच्या वतीने न्यायालयाला हे निवेदन...

न्यायमूर्ती महोदय,
 
ठाण्यातील माघी गणेशोत्सवाच्या वाटेतील सर्व अडथळे दूर करून आपण हा सण साजरा करण्याची सत्वर परवानगी द्यावी, अशी विनम्र मागणी करण्यासाठी आम्ही हे निवेदन देत आहोत. (न्यायालय आहे म्हणून विनम्र व्हावं लागतंय. उगाच न्यायालयाचा अवमान झाला तर तुरुंगवासाची नस्ती आफत ओढवायची.)
 
न्यायमूर्ती महोदय, आमच्या रूढी, परंपरा, रीती-रिवाज, श्रेष्ठ संस्कृतीचा अभिमान आमच्या नसानसांत भरून वाहतो आहे. त्या नतद्रष्ट इंग्रजांनी कायदा करून रद्द केली म्हणून नाहीतर आम्ही सतीप्रथासुद्धा अभिमानानं पाळली असती. पण, प्रश्न तो नाही. निवडणुकारूपी लोकशाहीच्या परमकर्तव्यासाठी (जे बजावण्याच्या दिवशी आम्ही मित्राच्या कर्जतच्या फार्महाऊसवर सहकुटुंब पिकनिक करतो) आम्ही आमच्या रूढी-परंपरा बाजूला ठेवायलाही तयार झालो असतो, पण, आमच्या काही प्रॅक्टिकल अडचणी आहेत. त्यांचा विचार सन्माननीय न्यायालयाने करावा, अशी आमची विनंती आहे.
 
आम्हाला आमच्या शहरात शांततेची बिल्कुल सवय राहिलेली नाही. धर्मवीरांच्या काळापासून बंटी और बबलूच्या सध्याच्या काळापर्यंत आमच्या शहराचे इतके प्रचंड प्रमाणात उत्सवीकरण झाले आहे की शहरात कसलाही उत्सव नसला, तर आम्हाला कसेसेच वाटते. आपण कमलहासन यांचा पुष्पकहा मूकचित्रपट पाहिला आहे का? त्यातील आमच्यासारख्याच वस्तीत राहणारा नायकाला (ठाणेकरच असणार तो, शंकाच नाही) जेव्हा एका पंचतारांकित हॉटेलच्या शांत रूममध्ये झोप लागत नाही, तेव्हा तो आपल्या वस्तीतली रात्रीची गजबज रेकॉर्ड करून आणतो आणि ती कॅसेट लावून सुखाने झोपी जातो. आम्हीही उत्सवविहीन दिवसांमध्ये असेच रात्र रात्र तळमळतो आणि शेवटी ढोल-ताशे-नगारे-नाशिक ढोलीबाजा-बँजो-डीजे रिमिक्स यांचं रेकॉर्डिग करून ते कानाशी लावून ठेवून गाढ झोपतो.
 
उत्सवांची सवय आमच्या कानांनाच लागलेली नाही, तर आमच्या सगळय़ा व्यक्तिमत्वामध्ये ते भिनलेले आहेत. शहरात रस्ते मोकळे आहेत, चौकांमध्ये मंडपांचे अडथळे नाहीत, गल्लीबोळांमध्ये वाहनं किंवा माणसं विनाअडथळा शिरू शकत आहेत, नजर फेकू तिकडे थेट आरपार पोहोचते आहे, कानेकोपरे होर्डिग-बॅनरनी बरबटलेले नाहीत, हे दृश्य पाहून आमच्या जिवाला किती यातना होत असतील, याचा सहृदयतेने विचार करा न्यायमूर्ती महोदय. नाझी फौजांच्या बाँबवर्षावानंतर बेचिराख झालेल्या लंडन शहराकडे पाहून अस्सल लंडनवासीयाला जे वाटलं असेल, ते असं ओकंबोकं ठाणे शहर पाहून वाटतं आम्हा ठाणेकरांना. उत्सवरूपी सौभाग्य हिरावून घेतलेल्या पांढ-या फटफटीत कपाळासारखं उद्ध्वस्त आणि अमंगळ वाटतं या सुनसान शहराकडे पाहून.
 आमच्या या भावनांचं सोडा. तुम्ही हल्ली कुणाच्या भावनांची काही कदरच ठेवत नाही. उलट भावना घरी ठेवून बाहेर पडत जा, असं दटावता. आमच्यासारख्या भावनाप्रधानांसाठी हे म्हणजे कातडे घरी ठेवून निव्वळ हाडांनिशी बाहेर पडण्यासारखं आहे. पण, भावना सोडल्या तरी सवयींचं काय करायचं? अहो, न्यायमूर्ती महोदय, आमच्या पावलांना आणि वाहनांनाही आपसूक वेडीवाकडी वळणं घेत थबकत थबकत, दबकत दबकत प्रवास करण्याची इतकी सवय झाली आहे की मरीन ड्राइव्हवरही पावलं आणि एक्स्प्रेस वेवरही वाहनं तशीच नागमोडी चालतात आमची. बारा महिने तेरा काळ आम्ही उत्सवभारल्या वातावरणात राहतो. गणपतीचा मंडप उठला की लगेच देवीचा लागतो, मग दत्तगुरू, साईबाबा, जगद्गुरू, श्रीकृष्णावतार वगैरेंच्या उत्सवांनी शहराचाच नव्हे, तर मनाचाही आसमंत एकदम भरून गेलेला असतो. आपल्याच न्यायालयात एक याचिका करून आम्ही शहरात कायमस्वरूपी मंडपांची मागणी करणार आहोत. दर उत्सवाला नसती झगझग नको. एकदम मोकळे रस्ते आणि मंडपमुक्त चौक पाहिले की चुकून आपण परदेशातच आलो आहोत की काय, अशी शंका येते आम्हाला. या मंडपाला वळसा घालून, त्या कमानीच्या खालून, अमक्या होर्डिगाजवळच्या गल्लीतली लाइटच्या माळांनी सजवलेली डावीकडून तिसरी इमारत, असा पत्ता सांगतो आम्ही. मंडप, कमानी, होर्डिगं तुम्ही काढून टाकलीत तर आमचं घर आम्हालाही सापडायचं नाही. हसण्यावारी घेऊ नका. धिस इज व्हेरी सिरियस मॅटर! आमचे घंटाळीचे बापूकाका नेने- एक दिवस घरातून खाली उतरले आणि गल्लीबाहेर आले तेव्हा एकदम मोकळा चौक पाहून ब्लडप्रेशर वाढलं त्यांचं आणि एकदम भक्कन सूर्यप्रकाश शिरला त्यांच्या डोळय़ात तर चक्कर येऊन जागीच कोसळले ते. अशा वयोवृद्ध ठाणेकरांच्या प्रकृतीचा तरी विचार तुम्ही यासंदर्भात निर्णय देताना केला पाहिजे.
आणखी एकच गोष्ट सांगून तुमची रजा घेतो.
 
आमच्या ठाण्याचे सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी.. त्यांच्या आठवणीनं डोळय़ांत सतत पाणी येतं. स्वत:च्या लग्नाच्या जोडीदाराची, पोटच्या पोराची किंवा आईबापाची छबीसुद्धा आम्ही कधी इतक्या वेळा आणि इतक्या ठिकाणी- जळीस्थळीकाष्ठीपाषाणी पाहात नसू आम्ही, इतकी त्यांची हसरी छबी सतत नजरेसमोर असते आमच्या. आमच्या हृदयांतच वसलेले असतात म्हणा ना ते! तुमच्या आचारसंहितेने त्यांचे चेहरेच आमच्या नजरेसमोरून हटवून टाकले. विरहानं प्रेम वाढतं म्हणतात. या लोकनेत्यांच्या विरहानं आम्ही व्याकूळ झालो आहोत. कधी एकदा ते हात उंचावलेले, तडफदारपणे चाललेले, मांजरीसारख्या फिस्कारल्या हास्याचे, मस्तवाल रेडय़ासारखे टणक आणि निगरगट्ट रूप डोळाभरून पाहतो, असे झाले आहे आम्हाला.
 इतकी भक्ती तर आमची (आणि त्यांचीही) साक्षात श्रीगणेशावरसुद्धा नाही. ती पाहून तो माघी गणेश पावो ना पावो, तुमचे हृदय मात्र द्रवावे, हीच अपेक्षा.
आपला,
 ठों. बा. ठाणेकर

-अनंत फंदी  


(प्रहार, २९ जानेवारी, २०१२)

Monday, January 23, 2012

नॉट ओके.. नेक्स्ट!

गजराचं घडय़ाळ पाचव्यांदा केकाटलं तेव्हा राजसाहेबांनी पांघरुणातून डोकंही बाहेर न काढता हातानं चाचपून त्याचा कर्कश्श आवाज बंद केला आणि अंदाजानंच ते खिडकीच्या बाहेर भिरकावून दिलं.. ‘खळ्ळ खटय़ॅक’ असा घडय़ाळ फुटल्याचा आवाज आला नाही, तेव्हाच त्यांच्या लक्षात आलं की खिडकीबाहेर उभ्या असलेल्या स्वीय सहायकानं ते झेललं आहे, याचा अर्थ, आता जागं व्हावंच लागेल. ‘च्यामारी या घडय़ाळाच्या, तिकडे प्रचारात पण नडतंय आणि इकडे झोपेचंही खोबरं करतंय..’ तोंडातल्या तोंडात पुटपुटत नाईलाजानं अंथरुणाबाहेर पडून आळसटून हात ताणत त्यांनी खिडकीबाहेर नजर टाकली आणि त्यांची झोपच उडाली. बंगल्याबाहेरच्या रस्त्यावर या टोकापासून त्या टोकापर्यंत हातात फायली घेतलेल्या माणसांची ही गर्दी जमली होती.
 
‘‘अरे हा काय प्रकार काय आहे?’’ साहेबांनी पीएला विचारलं.
 
‘‘हे सगळे प्रोडय़ुसर आहेत हिंदी मालिकांचे. मराठी मालिकांचे उद्या येतील. हिंदी सिनेमाच्या निर्मात्यांना परवाची वेळ दिलीये आणि त्याच संध्याकाळी मराठी सिनेमाच्या निर्मात्यांना.’’
 
‘‘सगळय़ांना एकत्र बोलावलं असतंस तर शिवाजी पार्कावर सभाच लावली असती. कशाला आलेत हे सगळे परप्रांतीय, उपरे डोमकावळे?’’
 
‘‘तुम्हाला स्क्रिप्ट वाचून दाखवायला.’’
 
‘‘इकडे या’’, साहेबांनी पीएला जवळ बोलावलं, ‘‘चालून दाखवा. पुढे या.’’ त्याचे डोळे निरखले, थोडंसं पुढे झुकून वासाचा अदमास घेतला, ‘‘सकाळी चहाऐवजी नवटाक, पावशेर मारून आलात की काय आज? मी काय टीव्ही चॅनेल काढतोय की काय एखादं नवीन की ‘मातोश्री पिक्चर्स’ असं बॅनर काढतोय? एवढय़ा सगळय़ांची स्क्रिप्ट्स ऐकत बसलो, तर पक्ष कोण माझा काका चालवणार?’’ चटकन जीभ चावल्यामुळे राजसाहेबांची सरबत्ती थांबली, तसा पीए मवाळ स्वरात म्हणाला, ‘‘पण साहेब, तुमच्या परमिशनशिवाय त्यांचं कामच पुढे चालणार नाही.’’
 
‘‘कशाची परमिशन?’’
 
‘‘यांच्या पटकथेत मराठी माणसांच्या व्यक्तिरेखा आहेत, त्या योग्य प्रकारे चितारल्या आहेत की नाहीत, हे तुम्ही पाहून ओके केल्याशिवाय कोणता शहाणा निर्माता मालिकेचं किंवा सिनेमाचं शूटिंग करेल. मुंबईत राहायचंय त्याला, काम करायचंय..’’ पीए अभिमानानं म्हणाला.
 
‘‘शिंची कटकट’’, कपाळावर हात मारून घेत राजसाहेब म्हणाले, ‘‘आम्हालाही ना एकेक सॉलिडच आयडिया सुचतात. एक काम करा. सगळय़ांना बसवा. एकेकाला पुढे आणा. मराठी माणसाचं कॅरेक्टर काय आहे, ते एका ओळीत सांगायचं म्हणावं. ओके-नॉट ओके टिपून घ्या नीट.’’
 ...............
‘‘साहेब, माझ्या स्क्रिप्टमध्ये मोलकरीण आहे गंगू नावाची.’’
 
‘‘चालणार नाही.’’
 
‘‘आम्ही तिला कांजीवरम सिल्कच्या साडय़ा देणार आहोत नेसायला. प्रत्येक सीनमध्ये नवी.’’
 
‘‘जमणार नाही. शेवटी मोलकरीणच दाखवणार ना तुम्ही तिला?’’
 
‘‘पण, साहेब, ती स्कोडा गाडीतून कामावर येते, असं दाखवणार आहोत.’’
 
‘‘साहेब, हा फारच रिअ‍ॅलिस्टिक टच आहे..’’ पीएनं मध्ये तोंड घातलं, ‘‘हल्ली मोलकरणींचे कामाचे रेट इतके वाढलेत की ती कारमधून येते याचं प्रेक्षकांना आश्चर्यही वाटणार नाही.’’
 
‘‘तुला बोलायला सांगितलं होतं?’’ साहेबांनी फिस्कारून विचारलं आणि स्क्रिप्ट भिरकावून दिलं, ‘‘नेक्स्ट!’’
 
‘‘साहेब, माझ्या स्क्रिप्टमध्ये रामा गडी आहे..’’
 
‘‘का? कृपा गडी असला तर स्वच्छ भांडी घासणार नाही का?’’
 
‘‘पण, साहेब मी त्याला फुल पँट घालणार आहे. मालकाच्या बंगल्याशेजारी त्याचा पण छोटा बंगला असतो, अशी आयडिया आहे आमची.’’
 
हेही स्क्रिप्ट भिरकावलं गेलं.. कुठे माळी, कुठे प्लंबर, इथपासून कुठे हवालदार, कुठे भ्रष्ट इन्स्पेक्टर, कुठे लाचखोर पुढारी, माफिया डॉन, लबाड बिल्डर (‘ही तर द्विरुक्ती झाली’- स्वत: बिल्डर असलेल्या साहेबांची मार्मिक टिपणी).. वेगवेगळय़ा स्क्रिप्ट्समध्ये वेगवेगळय़ा लेखकांनी मराठी माणसाला असे सगळे रोल दिले होते.. राजसाहेब एकेकावर काट मारत चालले होते. ‘नॉट ओके’ची यादी 1772वर पोहोचली, तेव्हा वडापावची गाडीवाला, डबेवाला, भोरचा कुल्फीवाला आणि मासळी बाजारातल्या कोळणी एवढेच काय ते मराठी माणसांचे रोल ओके झाले होते. हा आकडा 1123 होता तेव्हापासून पीए काहीतरी बोलू पाहात होता, त्याला ती संधी 1772नंतर मिळाली, ‘‘उचकटा, उचकटा, तुमचं तोंड उचकटा.’’
 
‘‘नाही म्हणजे सहज आपली एक शंका आली म्हणून बोलतो.’’
 
‘‘फुटेज खाऊ नका. लीड रोल माझा आहे. फटाफट बोला.’’
 
‘‘साहेब आतापर्यंत आपण इतक्या मालिका-सिनेमांमधले मराठी माणसांचे रोल कट केलेत. या सगळय़ा भूमिका आता इतर प्रांतीयांच्या नावांनी झळकतील.’’
 
‘‘मग, बरोबरच आहे. सगळी हलकी कामं करायची का मराठी माणसांनी?’’
 ‘‘त्यामुळेच साहेब थोडी पंचाईत होणार आहे. म्हणजे असं की ही सगळी कथानकं घडतात मुंबईत. त्यात मुख्य व्यक्तिरेखा आधीपासूनच परप्रांतीय आहेत. आता फुटकळ रोलमधली मराठी माणसंही तुम्ही कटाप केलीत. त्यामुळे मुंबईत सगळी कामं परप्रांतीयच करतात, असा प्रेक्षकांचा समज नाही का होणार?’’
‘‘मारी टोपी,’’ विचारात पडलेल्या साहेबांनी पीएच्या पाठीवर थोपटलं, ‘‘भेजा आहे बरं का तुला? आता आणखी एक फतवा जारी करा. मुंबईत मालिका-सिनेमा बनवायचा असेल, तर सगळय़ा प्रमुख व्यक्तिरेखा मराठीच असल्या पाहिजेत.’’
 
ट्रिंग ट्रिंग.. ट्रिंग ट्रिंग..
 फोन वाजला. आत जाऊन पीएने घेतला. दोन मिनिटांनी बाहेर येऊन म्हणाला, ‘‘साहेब, हॉलिवुडवरून फोन होता एका प्रोडय़ुसरचा. त्यांनी विचारलंय, ग्वाटेमालामध्ये शूटिंग सुरू असलेल्या आमच्या पुढच्या सिनेमात एकही मराठी व्यक्तिरेखा नाही. तुम्हाला काही प्रॉब्लेम तर नाही ना?’’

-अनंत फंदी 

(प्रहार, २२ जानेवारी, २०११) 

Monday, January 16, 2012

मॅरेथॉन अनछापणेबल!

या या पोटावळे पत्रकार, या’’ साहेबांनी कार्यकारी संपादकांचं दिलखुलास स्वागत केलं, ‘‘काय पेड न्यूजसाठी आलात वाटतं? 
साहेब चष्मा न लावताच बसलेत की काय, का. सं. च्या मनात शंका आली.
 
‘‘साहेब, मी आलोय.. मॅरेथॉन मुलाखत घ्यायला..’’ का.सं.ना आवाजातली एरवीची गुर्मी लपवून मवाळ स्वर लावताना त्रास होत होता.
 
‘‘पाहिलं हो मी तुम्हाला. डोळे फुटलेले नाहीत माझे.. आई जगदंबेच्या कृपेने अजून सगळं लख्ख दिसतं!’’ हे एक बरं आहे इथे. जे काही घडतं ते आई जगदंबेच्या कृपेनं, का.सं.च्या मनात विचार आला, म्हणूनच गाव तिथं क्लास काढलेल्या सरांनी रोजनिशी प्रकाशित केली. तेव्हा तिच्यात आई जगदंबेच्या कृपेनं सकाळी जाग आली आणि शि.से.प्रं.च्या कृपेनं दात घासले, असं स्तवन होतं. (त्यात चुकीचं काही नव्हतं म्हणा, शिसेप्रंची अवकृपा झाली असती तर घासायला दात शिल्लक राहिले असते का?)
 
का.सं.च्या मनात हे विचारचक्र सुरू असताना तिकडे साहेब आणखी फॉर्मात येत होते, ‘‘आई भवानीच्या कृपेनं उद्या नजर कमी झाली, तर माझ्या एकेका सैनिकाचे दोन डोळे (चष्मेवाला असेल, तर चार,’ का.सं.ची जोड) असे लाखो डोळे मला दृष्टी देतील. मी त्यांच्या डोळ्यांनी जग बघेन.’’ (‘त्यांच्या हातांनी शत्रूला कानफटवेन, त्यांच्या पायांनी तुडवेन. सगळं काही त्यांच्यानं करवून घेईन. आम्ही आपले नामानिराळे.ही का.सं.ची मनातल्या मनात जोड.)
 आता न राहवून का.सं. पुढे झाले आणि म्हणाले, ‘‘साहेब, आपण तीर्थावर नाहीत, घरातल्या सोफ्यावर आहात. समोर विशाल जनसागर नाही. तेव्हा भाषण आवरा.’’
‘‘अरे गधडय़ा, मी मुलाखत देण्यासाठी माझे विचार तापवतोय. गायक कसं गाणं सुरू करण्याआधी आवाज तापवतात तसं.’’
 
त्या मानानं बरीच मवाळ उपमा सुचली साहेबांना, का.सं.च्या मनात विचार आला आणि ते म्हणाले, ‘‘छान छान. ते मघाचं पोटावळे पत्रकार, पेड न्यूज वगैरेही विचार तापवण्यातलंच होतं का?’’
 
‘‘छे छे, ते सगळं खरं होतं,’’ साहेब गर्जले, ‘‘आम्ही सगळ्याच पत्रकारांना पोटावळे मानतो. तुम्ही तर पगारी कार्यकारी संपादकाबरोबर पगारी नेतेसुद्धा होऊन बसलायत आमच्या पक्षाचे.’’
 आई जगदंबेच्या कृपेनं,’ का.सं. मनातल्या मनात पुटपुटले आणि प्रत्यक्षात मात्र आपले आशीर्वाद आहेत, साहेब’, असं साहेबांच्या कानात गुणगुणले.
‘‘कसले बोडक्याचे आशीर्वाद? मजबुरी आहे मजबुरी. सगळे कार्यकारी कामाचे असते, तर तुमच्यासारख्यांना नेते बनवण्याची वेळ आली असती का आमच्यावर?’’ आता मनातल्या मनात पुटपुटण्याची पाळी साहेबांची होती. प्रत्यक्षात ते म्हणाले, ‘‘एवढं करूनही तुम्ही पेपर चालवण्यासाठीही मलाच कामाला लावता. घ्या चार हप्त्यांत मॅरेथॉन मुलाखत. तुम्ही खूष नि ती चॅनेलची डबडी खूष. आजचा सवाल आजचा सवाल म्हणून हात हलवत, घसा खरवडून नाचायला, रेकायला मिळणार म्हणून सगळी वटवागळं खूष.’’
 
‘‘पण, साहेब, तुमची मुलाखत असतेच तशी दमदार.’’
 
‘‘हो, अरे पण असा दम तुमच्यात कधी येणार? अजून टणक असलो तरी वय झालंय माझं! रिटायर होऊद्यात की मला सुखानं. गलितगात्र झालो, हॉस्पिटलात गेलो, व्हीलचेअरवर बसलो, तरी मलाच नाचवताय जिथंतिथं. तो कार्यकारी अध्यक्ष नेमलायत ना, तो काय करतो?’’
 
‘‘फोटो काढतो.. छान काढतो.. आय मीन काढतात.. आणि साहेब, तुम्हीच नेमलंयत त्यांना.’’
 
इथं साहेब कपाळाला हात लावून काहीतरी अगम्य असं तोंडातल्या तोंडात पुटपुटतात. ते गम्य असतं तरी आपल्या पेपरातसुद्धा छापण्यायोग्य भाषेतलं नसणार याची का.सं.ला खात्री असल्यानं ते टिपून घेण्याच्या फंदात पडत नाहीत. ‘‘करूयात ना मुलाखतीला सुरुवात? हवा कशी आहे?’’
 
‘‘थंडगार आहे. येत्या निवडणुकांची ही शिरशिरी आहे. हवा आहे आणि तिच्यात श्वासोच्छ्वास करता येतोय, हेच पुष्कळ असं म्हणायची पाळी येणार आहे.’’
 
का.सं. वासतात.
 
‘‘तुमची तब्येत कशी आहे?’’
 
‘‘मस्त. ठणठणीत. तुमच्यासारखे आणि तुमच्या त्या कार्याध्यक्षासारखे ऐदी सोदे पोसायचे म्हणजे मला झक मारत ठणठणीत राहावंच लागणार.’’
 
‘‘आगामी निवडणुकांबद्दल काय वाटतं?’’
 
‘‘वाट लागणार. पुरती वाट लागणार. लोकांना किती काळ उल्लू बनवणार? किती दिवस बोलबच्चन देणार? काहीतरी कामं नकोत का करून दाखवायला? इथं जो तो नुसता खा खा खातोय? आता पुढची पाच र्वष हवाबाण हरडे खाऊन हवाबाण सोडत फिरा म्हणावं.’’
 
‘‘अहो साहेब, हे काय बोलताय तुम्ही?’’
 
‘‘मुलाखत घेतोयस ना माझी?’’
 
‘‘ही मुलाखत छापायची?’’
 ‘‘काय डोस्कं आउट झालंय का काय तुझं?’’ साहेब  पुन्हा अगम्य-पण गम्य असतं तरी अनछापणेबलअसं काहीतरी पुटपुटतात, ‘‘अरे, आतापर्यंत हज्जार वेळा मुलाखती दिल्यात तुला. त्यांच्या फायली उघड आणि चार भाग तयार कर. याची हजामत, त्याची भलामण, आई भवानी, आई जगदंबा, मराठी माणूस, सुंता, दंगलीत आम्हीच वाचवलं, आता सत्ता गेली तर मुंबई महाराष्ट्रातून तुटली म्हणून समजा, बाकी याला टपल्या, त्याला टिचक्या, थोडे डबल मीनिंग विनोद असा सगळा मालमसाला टाकून करून टाक हवे तेवढे भाग. आणि आता भाग भाग भाग डी. के. बोस, भाग!

-अनंत फंदी 

(चित्र : प्रदीप म्हापसेकर)

(प्रहार, १५ जानेवारी, २०१२)

Sunday, January 8, 2012

हातात हात, जिवात जीव

या या या,’’ बाळकाकांनी तोंडभरून स्वागत केलं. 
‘‘कशी काय तब्येत?’’ शरदकाकांनी चपला काढता काढता विचारलं.
 
‘‘तब्येतीला काय धाड भरलीये? तुमच्याशी भेट व्हावी म्हणून..’’ बाळकाकांनी डोळे मिचकावले.
 
‘‘घ्या. म्हणजे भेटायचंय तुम्हाला, काम तुमचं आणि यायचं आम्हीच.’’
 
‘‘काय करणार? आमची बाणेदार इमेज आडवी येते. आम्ही उठून कुणाच्या दारात जात नाही.’’
 
‘‘हं.. खरं आहे,’’ सुस्कारा सोडून लोडाला टेकत शरदकाका म्हणाले, ‘‘आमच्या घरी कांदे चिरायलाही खंजीर वापरतात अशी आमचीही इमेज आहेच ना?’’
 
‘‘म्हणजे काय? तुम्ही तर दाढी करायलाही वस्तरा वापरत नाही, खंजीरच वापरता अशी माझीसुद्धा समजूत होती!’’ बाळकाकांनी टाळीसाठी हात पुढे केला.
 
टाळी देऊन शरदकाका म्हणाले, ‘‘बोला, काय काम काढलंत?’’
 
‘‘काम म्हणजे.. नेहमीचंच.. जरा लेकराला सांभाळून घ्या,’’ बाळकाकांच्या धारदार वाणीलाही जरा मृदुता आली होती.
 
‘‘सांभाळून घेतोच आहोत की.. तुमच्यासारखेच नकलांचे आणि शाब्दिक कोटय़ांचे झकास फड रंगवतोय गडी.’’
 
‘‘त्याचं नाव काढू नका हो.. आम्ही त्याच्याबद्दल बोलत नाही आहोत,’’ बाळकाका कडाडले, दोन क्षणांत पुन्हा मृदू झाले आणि म्हणाले, ‘‘मी आमच्या वेडय़ाबागडय़ा लेकराबद्दल बोलत होतो.’’
 
‘‘त्याचं काय? त्याला तुम्हीच दिलीय की मुंबईची जहागिरी? आम्ही कुठे त्याच्या आड येतो?’’ शरदकाका साळसूदपणे म्हणाले.
 
‘‘ते बरोबर आहे. पण आता तुम्ही हातात हात मिळवायला निघालायत अशी चर्चा आहे.’’
 
‘‘अहो, हातात हात तर केव्हापासून अडकलाय आमचा. आता गुंफलायअसं म्हणावं लागतं लोकलाजेखातर. आणि खरं सांगायचा तर आमच्या घडय़ाळाला चावी द्यायलाही हातच हवा. घडय़ाळाशिवाय हाताला शोभा नाही तसा हाताशिवाय घडय़ाळालाही वाली नाही. तुम्ही एवढे हातमिळवणीबद्दल का भावुक होताय? कधीकाळी याच हाताने तुमच्या धनुष्याला बाण लावलाय, प्रत्यंचा खेचलीये..’’
 
‘‘नका नका त्या दिवसांच्या आठवणी काढू..’’ बाळकाकांनी चष्म्याची काच पुसली आणि त्या मिषाने डोळेही टिपले, ‘‘तेव्हा त्यात तुमचाही हात होता म्हणून आम्ही आमची आयुधं विश्वासानं सोपवली. आता आम्हाला चांगलाच हात दाखवून निघालेले तिकडच्या छावणीत आहेत. आमचं लेकरू तर अजूनही त्या आठवणीनं ओय ओयम्हणून ओरडत गाल चोळत दचकून उठतं रात्रीबेरात्री.’’
 
‘‘मग आता काय म्हणणं आहे तुमचं?’’
 
‘‘काय असणार? लेकराला सांभाळून घ्या. फोटो काढून आणि पुस्तकं फुकट वाटून का पोटं भरणार आहेत? हल्ली तर मोबाइलवर पोरंटोरंही फोटो काढतात खटाखट.
हेलिकॉप्टरची फेरीही इतकी स्वस्त झालीये की लोक एका दिवसात शिर्डीला जाऊन येतात फुरफुरत. जरा नातू हाताशी येईपर्यंत सांभाळून घ्या.’’
 
‘‘काय म्हणालात, नातू हाताशीयेईपर्यंत?..’’
 
‘‘काय शरदबाबू, इथे चाललंय काय आणि तुम्हाला विनोद सुचतायत. तिकडे त्या झेरॉक्स कॉपीनं झोप उडवलीये पार लेकराची, त्यात टग्या दादाची भर.
 
‘‘अहो, पण मग लाडक्या लेकरालाही सांगा की जरा समजावून. उगाच ह्याला त्याला डिवचत असतो. आमचं ठीक आहे. पण, टग्या दादाचं काम वेगळं आहे. एक घाव दोन तुकडे.’’
 
‘‘ते बरोबर आहे तुमचं. आता आमच्या घराण्यातल्या कोणाच्याहीसमोर माइकचं बोंडूक आलं की आम्हाला किती चेव चढतो, हे तुम्हाला ठाऊक आहेच. तशी थोडी जीभ घसरली असेल म्हणून डोक्यात राख घालून घेऊन थेट हातात हात घालायला निघणं काही बरोबर नाही.’’
 
शरदकाका गालातल्या गालात हसून म्हणाले, ‘‘इतकी वर्ष राजकारण खेळलात पण अभ्यासू वृत्ती नसल्यामुळे खोलात उतरला नाहीत. अहो, हातात हात काय फक्त प्रेमानंच घेतला जातो का? हात पिरगाळायचा, मुरगाळायचा असला तरी तो आधी हातात घ्यावा लागतो. कधी फटका वर्मी बसू नये, म्हणून हात हातात घ्यावा लागतो.’’
 
आता बाळकाकांच्या चेह-यावर सुटका झाल्याची भावना उमटली. ‘‘आता जरा माझ्या जिवात जीव आला. तुम्हाला इतकी वर्ष मी ओळखतोय पण तरीही काहीतरी नवं कळतंच प्रत्येक भेटीत.’’
 ‘‘तुमचं सोडा, आमची हीपण हेच म्हणते,’’ असं म्हणताना शरदकाकांनी खो खो हसता हसता आपलेही हात सहजगता हातात घेतले आहेत, हे बाळकाकांच्या लक्षातही आलं नाही.

-अनंत फंदी

(प्रहार, ८ जानेवारी, २०१२)