Saturday, January 21, 2012

करकोचा जातो जिवानिशी

आज मी अप्रतिम चविष्ट करकोचा खाल्ला,’ असं कोणी अट्टल मांसाहारी माणूसही दुस-याला चवीचवीनं सांगताना दिसणार नाही..
 
..जगाच्या पाठीवर करकोचा कदाचित चीनमध्ये खाल्ला जात असेल. चिनी मंडळी शब्दश: सर्वाहारी असल्यामुळे दोन पायांवर माणूस, पाण्यात होडय़ा आणि आकाशात विमानं सोडल्यास जमिनीवर चालणारं, पाण्यात बुडणारं आणि आकाशात उडणारं सगळं काही त्यांना उदरभरणासाठी चालतं. तिथल्या जंगलांमध्येही प्राणी-पक्षी फारसे दिसत नाहीत आणि जे दिसतात ते माणूस दिसताच धूम पळतात म्हणे. वाघ जीव खाऊन पळतोय आणि माणूस त्याचा पाठलाग करतोय, असं दृष्यही तिकडच्या जंगलात दिसत असेल- खासकरून वाघाच्या वर्षात.
 
भारतात मात्र फार फार तर ईशान्य भारताचा अपवाद वगळता इतरत्र कुठे करकोचा खाल्ला जात असेल, असं वाटत नाही. त्यात गुजरातसारख्या विशुद्ध शाकाहारी प्रांतात तर कोंबडी-इमू यांच्यासारख्या, इतरत्र खाण्यासाठीच पाळल्या जाणा-या पक्ष्यांचा जीव घेणारे नोनवेजनराधमही संख्येने कमी असतील; तिथे करकोच्याची शिकार करण्याच्या फंदात कोण पडणार? तरीही गुजरातच्या भावनगरमध्ये गेल्या आठवडय़ात एक-दोन नव्हे, तब्बल वीस करकोचे मारले गेले; तेही साधेसुधे करकोचे नव्हेत, तर पेंटेड स्टॉर्क किंवा मराठीत चित्रबलाक या नावानं ओळखले जाणारे दुर्मीळ करकोचे. संरक्षित पक्ष्यांमध्ये स्थान असलेल्या या पक्ष्यांचा अपमृत्यू भावनगरमधल्या पक्षीमित्रांच्या असा काही जिव्हारी लागला की त्यांनी शहरातून या पक्ष्यांची अंत्ययात्राच काढली..
 
..त्या दोन दिवसांत त्या परिसरात अशाच प्रकारे अपमृत्यूची नोंद झालेल्या इतर प्रजातींच्या 14 पक्ष्यांच्या नशिबात अशा अंत्ययात्रेचा योग नव्हता. ते चित्रबलाकांइतके दुर्मीळ आणि संरक्षित नसणार. रोजच्या उठण्या-बसण्यातल्या चिमण्या-कावळे-कबुतरांची तर कुणी गणतीही केली नसेल. शेकडो पक्ष्यांसाठी काळदिवस ठरलेले ते दोन दिवस म्हणजे 14 आणि 15 जानेवारी. म्हणजेच गुजरातेत पतंगबाजीसाठी प्रसिद्ध असलेला उत्तरायणाचा सण.
 
देशभर मकर संक्रांतीचा सण वेगवेगळय़ा नावांनी, वेगवेगळय़ा प्रकारांनी साजरा होतो. गुजरातमध्ये तो उत्तरायण या नावाने साजरा होतो. वेगवेगळय़ा आकार-प्रकारांचे, रंगांचे, मांजांचे पतंग उडवणे ही हा सण साजरा करण्याची पद्धत. गुजरातचं अधिकृत पर्यटन आकर्षण असलेल्या या सणाला संपूर्ण गुजरातभर मैदानांत, मोकळय़ा जागांत आणि घरांच्या सज्जांवर गर्दी करून पतंग उडवण्याचा कार्यक्रम दिवसभर सुरू असतो. अहमदाबाद ही गुजरातमधल्या पतंगबाजीची राजधानी मानली जाते. या उत्सवात स्त्री-पुरुष आबालवृद्ध उत्साहाने सामील होतात.
 
शुद्ध शाकाहारी आणि अहिंसेचा पुजारी असलेल्या गुजरातमध्ये जागोजाग पक्ष्यांच्या रक्ताचा सडा पडतो, तो याच दोन दिवसांत. पतंगांच्या दो-यांमध्ये अडकून, भेलकांडून, हेलपाटून, हेलकावे खाऊन, खाली पडून किंवा धारदार मांजाने अवयव कापले जाऊन पक्षी जखमी होतात, जबर जखमी होतात, काही मरण पावतात. गेली काही वर्षे तर या खेळात माणसाचा गळा कापण्याचीही ताकद असलेल्या चिनी मांजाचं आगमन झालं आहे. भावनगरच्या चित्रबलाकांची कत्तल या चिनी मांजानेच घडवली होती. हे फक्त गुजरातमध्येच घडत नाही. देशात अनेक ठिकाणी घडतं. कारण, पतंगबाजीचं लोण देशभर पसरलं आहे. गुजराती समाज काही फक्त गुजरातपुरता मर्यादित नाही. व्यापारी बाण्यामुळे हा समाज देशविदेशांत पसरला आहे. त्याच्या उत्सवप्रियतेची लागण गुजराती वस्त्या असलेल्या अन्य राज्यांमध्येही होते. मुंबईत स्थानिक अस्मितेचे भोंडले किती होतात आणि हिंदुबंधुत्वाचा गरबा किती खेळला जातो, हे पाहिलं तर या सार्वत्रिक गुजरातीकरणाची कल्पना येईल. त्यामुळे संक्रांतीच्या सुमुहूर्तावर पतंगांची लढाई देशात ठिकठिकाणी होते आणि या सर्व ठिकाणी कमी अधिक संख्येने पक्षीही जखमी होतात-मरतात.
 
पतंगबाजीचा हा खेळही गमतीचा. ज्याने त्याने आपापला पतंग उडवायचा ठरवला, तर यासारखा आनंदाचा खेळ नाही. स्वच्छ निरभ्र आकाशात, शांत-शीतल वातावरणात पतंग आकाशात मुक्त विहरण्यासाठी सोडायचा. दुरून पाहणा-याला वाटावं की किती स्वच्छंदपणे बागडतोय आकाशात पतंग; पण, प्रत्यक्षात त्याची अदृश्य दोरी कुणाच्या तरी हातात असतेच, असे तत्वचिंतनात्मक विचार करावेत. एवढय़ा मोठय़ा आकाशात जगातल्या सगळय़ा माणसांना सुखनैव पतंग उडवता येतील, एवढी जागा आहे. पण, माणसं कोणताही खेळ स्पर्धेविना खेळू शकत नाहीत. त्यामुळे, पतंग उडवण्याच्या खेळाची पतंगबाजीहोते. आपला पतंग हवेत छान उडावा, एवढंच पुरेसं नाही; दुस-या कुणाचा पतंग आकाशात असताच कामा नये. आला तर त्याची कन्नी कापून त्याला जमिनीवर लोळवायचा. आकाशात एकच पतंग असला पाहिजे आणि तो आपलाच असला पाहिजे, अशी तीव्र स्पर्धा. त्यातून मांजे धारदार होत जातात आणि ते आकाशावर ज्यांचा पहिला अधिकार, त्या पक्ष्यांच्या जिवावर बेततात.
 
उत्तरायणात आकाशात ही घमासान लढाई सुरू असते, तेव्हा जमिनीवर वेगळीच इंटरेस्टिंग लढाई सुरू असते. आकाशातल्या पतंगांच्या लढाईप्रमाणेच ही लढाईही अहिंसेच्या पुजा-यांमधली असल्यामुळे त्यात प्रत्यक्ष हिंसा घडत नाही. उलट हिंस्त्र मांजाने जखमी केलेल्या पक्ष्यांची सेवाशुश्रुषाच केली जाते. ठिकठिकाणची जैन मंडळं- हीसुद्धा गुजरातीबहुल भागातच जास्त असतात- उत्तरायणाच्या आधीपासूनच पतंगबाजीच्या विरोधात लोकजागृती सुरू करतात. ठिकठिकाणी फलक लागतात, शाळकरी मुलांच्या प्रभातफे-या निघतात- यातील किती मुलं स्वत: पतंग उडवत नाहीत, हे तपासलं पाहिजे- हॅंडबिलं वाटली जातात आणि प्रत्यक्ष संक्रांतीला जखमी पशुपक्ष्यांवर वैद्यकीय उपचार करण्यासाठी स्टॉलही लावले जातात.
 
एरवी एकमेकांच्या सोबतीने राहणारे हे दोन समाज. उभयतांचा शाकाहाराग्रह म्हणजेच पर्यायाने अहिंसाग्रह इतका पराकोटीचा की आपल्या इमारतीत आपल्या नव्हे, शेजारच्या घरात अंडंही शिजलेलं त्यांना चालत नाही. आपल्या नव्या इमारतीबाहेरचा परंपरागत कोळीवाडाही असह्य दुर्गंधीमुळे नकोसा होतो. सजीवाची हत्या करण्याचं घोर पातक करणा-या आणि त्याचं मांस चवीचवीनं भक्षण करणा-या नराधमांना आपल्या सोसायटीत थाराही द्यायचा नाही, असा यांचा संयुक्त बाणा असतो. असे वर्षभर एकमेकांच्या सोबतीनेच राहणारे हे दोन समाज एकमेकांच्या समोर उभे ठाकतात ते फक्त हे दोनच दिवस. एकमेकांमध्ये कुठेही हिंसा घडणार नाही, थेट संघर्ष होणार नाही, अशा बेतानं. पाण्यावर काठी मारल्यानंतर क्षणभर विभागणीची रेषा दिसावी, तितक्याच सौम्य अहिंसक पद्धतीनं.
साहजिक आहे. काही दुर्मीळ आणि संरक्षित करकोचांपेक्षा अधिक महत्वाचा असतो, तो दोन समाजांमधला निरंतर बंधुभाव, निखळ स्नेहभाव..
 ..खेळाच्या गंमतीत काही करकोचे मरतही असतील, पण, ते काही खाण्यासाठी मारलेजात नाहीत, म्हणजे ती काही हिंसा नाही.

No comments:

Post a Comment