Monday, December 26, 2011

कौन बनेगा उच्छादपुरुष!

मित्रहो, महाराष्ट्रातील जनतेच्या कानामनांचा ‘निकाल’ लावणा-या आमच्या महास्पर्धेचा निकाल जाहीर करण्यापूर्वी आम्हाला- कोणत्याही स्पर्धेच्या संयोजकांप्रमाणे- हे सांगितलंच पाहिजे की ही स्पर्धा फार म्हणजे फारच टफ होती. काँपिटिशन टेरिफिक होती. कंटेस्टन्ट्स तगडे होते.. नेलबायटिंग फिनिश.. सॉरी सॉरी सॉरी.. टीव्ही चॅनेलवरच्या टॅलेंट हंट काँटेस्ट होस्ट करून करून असं बोलण्याची हॅबिटच होऊन गेलीये.. म्हणजे शुद्ध मराठीत, दूरचित्रवाणी मालिकांच्या गुणवत्ता शोध स्पर्धाच्या सूत्रसंचालनाच्या सवयीमुळे आमचं मराठी हे असं आंग्लप्रदूषित होऊन गेलंय (बाय द वे, प्रोडय़ुसरसाहेब, हे शुद्ध मराठी वाक्य एका दमात बोलून दाखवण्याचीही स्पर्धा घेता येईल. प्लीज नोट.)
 
तर सांगायची गोष्ट म्हणजे ‘महाराष्ट्राचा उच्छादपुरुष कोण’, या आमच्या देशविदेशात अतीव लोकप्रिय झालेल्या स्पर्धेसाठी अपेक्षेनुसार स्पर्धकांमध्ये फार मोठी स्पर्धा होती. यात अर्थातच आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही. महाराष्ट्राची एकंदर उच्छादाची परंपराच तेवढी मोठी आहे. वर्षभर न थकता एकापाठोपाठ एक उच्छादी उत्सव करणारा प्रांत ही आपली देशातच नव्हे, तर विदेशातही तयार झालेली गौरवपूर्ण ओळख आहे. महाराष्ट्र हा संगीतरसिकांचा प्रांत काही उगाच झालेला नाही. त्यामागे गल्लोगल्लीच्या उच्छादमहर्षीचे अपरंपार कष्ट आणि सामान्यजनांचा वर्गणीरूपी (कोण रे कोण तो खंडणी म्हणतोय, घ्या त्याला कोपच्यात) आशिर्वाद आहे. बेंजोवादकांची अथक मेहनत, मुक्तशैलीतील नृत्याविष्काराचे दर्शन घडविणारे हौशी पण समर्पित नर्तक, त्यांना ‘ऊर्जा’ पुरवणारे देशी-विदेशी बार या सर्वाचे योगदान विसरता येणारे नाही. स्पीकरच्या भिंतींमधून छातीच नव्हे, तर इमारतींच्या भिंतीही हादरवणा-या ध्वनीलहरींचं प्रक्षेपण करणा-या तंत्रज्ञांचे आभार तर किती आणि कसे मानावेत, हे शब्दात व्यक्त करता येत नाही. करता आलं असतं तरी त्यांनीच निर्माण केलेल्या या गोंगाटात ते किती श्रोत्यांपर्यंत पोहोचलं असतं, याबद्दल शंकाच आहे.
 
आपली परंपरा टिकवण्यासाठी किती झटतात हे लोक. दिवस बघत नाहीत की रात्र बघत नाहीत; किती वाजलेत, लोकांची झोपायची वेळ आहे की जागं राहायची, याची फिकीर करत नाहीत; वाटेत हॉस्पिटल आलंय की शाळा आलीये, याची पत्रास ठेवत नाहीत; शांततेनं जगण्याचा लोकांचा अधिकार धार्मिक ‘जागृती’पुढे य:कश्चित क:पदार्थ मानतात, सायलेन्स झोन वगैरे थेरं थेट फाटय़ावर मारून सरकारच्या जुलमी अमलाला क्रांतिकारकांसारखं ओजस्वी आव्हान देतात; हे सगळं कशासाठी- तर नि:स्वार्थ भावनेनं आवाज निर्माण करण्यासाठी, आपल्या (अ)संस्कृतीचा आवाज सर्वदूर पसरवण्यासाठी.
 जरा विचार करा. या उच्छादाचा या धर्मप्रसारकांवर काहीच परिणाम होत नाही का? या शूरवीरांचे कान फाटत नाहीत का? आवाजाच्या हादऱ्यांनी छाती कंप पावून त्यांचं ब्लडप्रेशर वाढत नाही का? त्यांच्या घरातली तान्ही बाळं झोपेतून दचकून उठून किंचाळू लागत नाहीत का? त्यांच्या घरातल्या मुलांच्या झोपेचं, अभ्यासाचं आणि करीअरचं खोबरं होत नाही का? ज्या हॉस्पिटलच्या बाहेर ते उच्छाद मांडतात, त्यात त्यांच्या रक्तानात्याचं कोणीच कधी अ‍ॅडमिट नसतं का?.. तरीही ते घेतलेलं व्रत सोडत नाहीत. व्यक्तिगत लाभहानीचा विचारसुद्धा त्यांच्या मनाला शिवत नाही. त्यांच्या कानामनात फक्त ‘धतडततडततडततड’चा ठेकाच गुंजत असतो.
इतक्या थोर परंपरेचे पाईक जिथे गल्लोगल्ली आवाजमश्गुल अवस्थेत झिंगून नाचताहेत, त्या राज्यातून कोणीतरी एकच एक उच्छादपुरुष निवडणं, हेच अतिशय अवघड काम होतं. पण, हा काही कोणा व्यक्तीचा सन्मान नाही. तो या परंपरेचा सन्मान आहे. प्रातिनिधिक स्वरूपाचा बहुमान आहे. तो कोणाला लाभतोय याची उत्सुकता आपणा सर्वाबरोबर आम्हालाही आहेच. त्या महाविजेत्याचं नाव घोषित करण्याआधी पाहूयात अंतिम फेरीतील नामांकनं.
 
‘महाराष्ट्राचा उच्छादपुरुष कोण’ या स्पर्धेतलं पहिलं नामांकन आहे ‘खळ्ळ खट्य़ॅक’ या आवाजाचीच ओळख मिरवणारे मनसेराज कृष्णकुंजकर यांचं.. महाराष्ट्रात ‘आवाज कुणाचा’ या प्रश्नावर एकेकाळी एकसुरातून उत्तर यायचं, ते दोन सुरांत विभागण्याचं श्रेय कृष्णकुंजकरांना जातं. आता तर या प्रश्नावर गिल्लाच ऐकू येतो ते सोडा. कृष्णकुंजकरांची मूळ परंपराच आवाजी. त्यांच्या काकांनी महाराष्ट्राला आवाजी पुढाऱ्यांची पहिल्यांदा ओळख करून दिली. बोलके नेते हे कर्त्यां नेत्यांना भारी पडू शकतात, हे पहिल्यांदा दाखवून दिलं. तीच परंपरा कृष्णकुंजकर चालवत आहेत.
 
दुसरं नामांकन आहे, क्लिकेशकुमार फोटुबहाद्दर यांचं. हे कृष्णकुंजकरांचे चुलतभाऊ आहेत, हा योगायोग नाही. काकांची परंपरा यांना वडिलोपार्जित लाभली आहे. पण, दुर्दैवाने हे जेव्हा जेव्हा आवाज कुणाचा म्हणून हाळी देतात तेव्हा कॅमे-याची क्लिकच ऐकू येते, त्याला ते तरी काय करणार? वाघाची डरकाळी ऐकायला हल्ली यांना जंगलात जावं लागतं.
 
आजच्या स्पर्धेतलं तिसरं नामांकन आहे मीखिल आगळेवेगळे यांचं. यांनी ‘टीव्हीवरील उच्छाद’ असा एक वेगळाच उच्छादप्रकार मराठीत आणला आहे. दिवसा-रात्री-पहाटे कोणत्याही वेळी त्यांचं चॅनेल लावा, ते टीव्हीवर असतातच. हे घरी कधी जातात आणि टीव्ही कधी पाहतात, हे अखिल महाराष्ट्राला पडलेलं कोडं आहे. त्यांनी स्वत: टीव्ही पाहिला, तर कदाचित आपला उच्छाद कमी करतील, अशी काही प्रेक्षकांना आशा आहे. एक एकटा माणूस निव्वळ बडबड आणि हातवारे यांच्या बळावर किती उच्छाद निर्माण करू शकतो, याचं ते (शब्दश:) चालतंबोलतं उदाहरण आहेत.
 
या सर्व तगडय़ा स्पर्धकांना मागे सारून आजच्या स्पर्धेचे विजेते ठरलेले महाराष्ट्राचे उच्छादपुरुष आहेत.. गृहकलहमंत्री आराराबा सांगलीकर ऊर्फ आबा तोंडपाटील. स्पर्धेत शेवटच्या क्षणी येऊन त्यांनी बाजी मारली. काही वर्षापूर्वी आबांनी बोबोबोलून या स्पर्धेत तगडं आव्हान निर्माण केलं होतं. पण, बेभान बोलण्याच्या नादात ‘बडे बडे शहरों मे ऐसे छोटे छोटे हादसे हो जाते है’ असं बोलून गेले आणि तोंडाला कुलूप बसलं ते कायमचंच. विधिमंडळातल्या एका क्रांतिकारक निवेदनानं त्यांना स्पर्धेत आणलं आणि विजयाची माळ त्यांच्या गळय़ात घातली. महाराष्ट्रभूमीचा उच्छादभूमी हा लौकिक कायम राखण्यासाठी आबांनी काय नाही केलं? पुण्यातल्या अनंत चतुर्दशीनंतर 10 दिवस चालणा-या विसर्जन मिरवणुकीवर कारवाई करणा-या धर्मद्रोही पोलिसांचे कान उपटून त्यांनी ती कारवाई मागे घेतली. शिवाय, आवाजबंदीविरोधात आवाज उठवून थेट सर्वोच्च न्यायालयरूपी दिल्लीच्या तख्तालाच आव्हान दिलं. पारंपरिक उत्सवांच्या उच्छादासाठी वर्षातले 12 दिवस कमी पडताहेत, ते आणखी वाढवावेत, अशी शिफारसच त्यांनी केंद्र सरकारकडे केलीये. आबा, तुमच्यासारखे द्रष्टे नेते लाभले तर लवकरच आपल्या राज्यात वर्षातले 365 दिवस रात्रंदिवस बेबंद धांगडधिंगा घालण्यासाठी खुले ठेवता येतील. हवं तर अभ्यास करणारी मुलं, आजारी माणसं, लहान बाळं आणि अल्पवयात (कानामनाने) बधीर होऊ न इच्छिणारे शांतताप्रेमी नागरिक यांच्यासाठी गडचिरोलीच्या जंगलात गृहनिर्माण योजना सुरू करता येईल.
 
धतडततडततडततड
 
उच्छादपुरुष आबा, आगे बढो
 
धतडततडततडततड
 
हम तुम्हारे साथ है
 धतडततडततडततड

(चित्र : प्रदीप म्हापसेकर) 


(प्रहार, २५ डिसेंबर, २०११)

No comments:

Post a Comment