Monday, December 19, 2011

सामर्थ्य आहे वंगणाचे!

शहाणा माणूस कोर्टाची पायरी चढत नाही म्हणतात.. अधिक शहाणा माणूस सरकारी ऑफिसचीही पायरी सहसा चढत नाही..
 
..रया गेलेली कळकट्ट इमारत, पोपडे उडालेल्या भिंती, करकरत गरगरणारे पंखे, बाबा आदमच्या काळातल्या टेबल-खुर्च्या, फायलींच्या चळती, भकास, उदास, दुर्मुखलेलं कुंद वातावरण, काम करण्याची शिक्षा शक्य तेवढी टाळण्याच्या प्रयत्नात असलेले तुसडे कर्मचारी, कामानिमित्त केल्या जाणा-या विचारणांवर त्यांचं करवादून वसकन अंगावर येणं किंवा मख्ख चेह-यानं नकारघंटा वाजवणं.. इकडून तिकडे तिकडून इकडे हेलपाटे मारायला लावणं, लहानातल्या लहान कामासाठी तासन्तास बसवून ठेवणं, कामं बाजूला ठेवून दात कोरत चकाटय़ा पिटणं, कधी थेट तर कधी आडून लोचटपणे किंवा निगरगट्टपणे लाच मागणं.. हे ओकारी आणणारं, शिसारी आणणारं दृश्य पाहून कोणत्याही शहाण्या माणसाचं रक्त उकळतं..
 
रक्त उकळून उकळून आता त्याची लाल बासुंदीच होते की काय, अशी असह्य परिस्थिती होते, तेव्हा शहाणा माणूस बाहेर पडतो, ‘मै भी अण्णा, तू भी अण्णा’ची टोपी घालून रामलीला मैदानावरच्या गर्दीत मिसळून जातो, भ्रष्टाचारविरोधाच्या घोषणा देतो, अण्णांची प्रवचनं ऐकतो, बेदीबाईंचा नाच पाहतो, मेणबत्तीवाल्यांची भाषणं ऐकतो आणि त्याची खात्रीच पटते की आता देशातून भ्रष्टाचार कायमचा हद्दपार होणार. सगळे खाबूबाज बाबू आता सुतासारखे सरळ येणार..
 
..अशा गोड स्वप्नरंजनात रमलेल्या बा शहाण्या माणसा, आज आपण तुला एका वेगळ्याच सरकारी ऑफिसात घेऊन जाऊ या. या ऑफिसचा फेरा सहसा कुणाला चुकलेला नसतो. पण, तरीही, थोडय़ा वेगळ्या नजरेने ते पाहण्यासाठी आज पुन्हा वाट वाकडी कर..
 
ये ये ये. हे सरकारी ऑफिस आहे, असा विश्वासच बसत नाहीये ना?
 
कसा बसेल? स्वच्छ चकचकीत इमारत. पायतळी सुरेख टाइल्स. नव्याने रंग काढलेल्या सतेज भिंती. नवंकोरं सुबक फर्निचर. टेबलाटेबलावर कम्प्यूटर. न कुरकुरता थंड हवेचे लोट सोडणारे पंखे, क्वचित कुठे चक्क एसी. अभ्यागत कक्षात गादीच्या बैठका. फ्लॅट स्क्रीन टीव्ही. पाण्याचं पिंप. या सगळ्यापेक्षाही अविश्वसनीय गोष्ट म्हणजे सरकारी ऑफिस असूनही कामाच्या वेळी सुरू असलेली कामाची लगबग..
 
..पत्ता चुकला बहुतेक म्हणून चपापून मागे सरकू नकोस, बा शहाण्या माणसा. हे सरकारी ऑफिसच आहे. मात्र, इथे कामाची लगबग करणारे, काम घेऊन आलेल्याचं हसतमुखानं स्वागत करणारे, त्याच्या मदतीसाठी सदैव तत्पर असे जे लोक दिसताहेत, ते सरकारी कर्मचारी नाहीत (अंदाज बरोबर आल्याचा आनंद तुझ्या चेह-यावरून ओसंडून वाहतोय रे बाबा!).. दलाल आहेत दलाल.. कामाच्या फायली घेऊन कागद नाचवत ते टेबलोटेबली ज्यांच्यापाशी जाताहेत, ती मख्ख चेहऱ्याची माणसं म्हणजेच आपले परमप्रिय बाबूलोक आहेत.. पण, जरा त्यांच्याही चर्येकडे नीट पाहा.. सुबत्तेनं आलेली तुकतुकी त्वचेला कशी फेअर अँड लव्हली शाइन देतेय पाहा.. अंगातले कपडे पाहा.. डोळ्यांवरचे गॉगल पाहा.. खाली उभ्या गाडय़ा पाहा.. बंगले पाहा, फार्म हाऊस पाहा.. बाथरूमच्या टाइल्स फोडून पाहा.. गाद्यांचा कापूस उपसून पाहा.. जिकडे तिकडे श्रीमंती थाट कसा झळकतोय.. आपल्या दृष्टीनं सगळय़ात महत्वाची गोष्ट म्हणजे त्याच तुसडय़ा चेह-याने का होईना, हे सगळे मान मोडून काम करतायत.. ओव्हरटाइम मिळेल की नाही, याची फिकीर न करता वेळेच्या आधी उघडणारं आणि वेळेच्या नंतर बंद होणारं सरकारचं कदाचित एकमेव कार्यालय असेल हे..
 डबडबले ना डोळे तुझे पाण्याने?
भरून आला ना ऊर, अभिमानाने?
एकतरी सरकारी कार्यालय असं कृतीशील आहे, या विचारानं सद्गतित होण्याचा तुझा मानस असेल मित्रा, तर तो अंमळ रहित कर आणि शोध घे की हा सगळा चमत्कार कसा घडून येतो?
ये बाहेर आणि पाहा पाटी.
हे आहे सहकारी निबंधकांचे कार्यालय. म्हणजे आपल्यातुपल्या भाषेत रजिस्ट्रार ऑफिस.
इथे मुख्यत: व्यवहार होतात जमिनीचे, प्रॉपर्टीचे, रियाल्टीचे. जो जो फ्लॅट घेण्याचा व्यवहार करतो तो एकदा तरी या ऑफिसाची पायरी चढतोच. ती चढण्याआधीच ‘बिल्डरचा माणूस’ आपल्याकडून ‘फी’ म्हणून काहीएक रक्कम घेऊन ठेवतो.. आपल्या व्यवहाराच्या कायदेशीर स्टँप डय़ूटी आणि फीच्या पलीकडची. तीच आपल्या कैकपटीत बिल्डरकडूनही दिली जातेच. हेच इथल्या कार्यकुशलतेचं रहस्य आहे, हेच इथलं वंगण आहे. नियमित तेलपाणी झाल्यावर इथली सगळी यंत्रणा कशी न कुरकुरता झपाटय़ानं अहोरात्र काम करते, ते पाहण्यासारखं आहे.
 
अद्भुत आश्चर्याची गोष्ट म्हणजे जो कोणी वंगणाची बुधली बरोबर आणत नाही, त्या नतद्रष्ट इसमाच्यासाठी हे सगळं ऑफिस- वरकरणी किती चकाचक असलं तरी- नेहमीच्या रटाळ सरकारी ऑफिसचं रूप घेतं. लाजाळूचं रोप कसं स्पर्शानं मिटतं, तसं हे ऑफिस लक्ष्मीदर्शनाविना मिटून जातं.. अशा लुख्ख्या माणसाच्या मदतीला कोणी येत नाही, सहर्ष स्वागत करत नाही, आपलं काम कुठे आणि कसं होईल, हे कळेकळेपर्यंतच त्याचा अर्धा दिवस गेलेला असतो, कळतं तेव्हाही त्याला कळतं काय, तर आता हे काम आज होणारच नाही.
 
त्याच्या कागदपत्रांमध्ये शेकडो चुका, त्रुटी निघणारच.
 त्या गलिच्छ खरखरीत आवाजात आणि थोतरीत मारावी अशा स्वरात ऐकवल्या जाणारच.
त्याला खेटे घालावे लागणारच.
त्याचं रक्त आटणारच.
तेच काम तो दलालाकडे गेला की अर्ध्या दिवसात पूर्ण होतं. सामर्थ्य आहे वंगणाचे!
 या यंत्रणेला वंगणाची सवय कुणी लावली?
आपणच.
घाई कुणाला असते?
आपल्यालाच.
इतरांच्याआधी आपला नंबर लागावा, अशी इच्छा कुणाची असते?
आपलीच.
कागदपत्रांमध्ये जरा कमी-अधिक असेल, ते सावरून घेतलं जावं, अशी अपेक्षा कुणाची असते?
आपलीच.
थोडक्यात, इथल्या यंत्रणेने नियमानुसार आणि तिच्या गतीनुसार काम करू नये, यासाठी आपणच तिला भ्रष्ट करतो.
म्हणूनच कोणीही अण्णा किंवा ‘मै भी अण्णा, तू भी अण्णा’ इथे कधी आंदोलन करत नाही, कोणताही चॅनेल इथलं स्टिंग ऑपरेशन करत नाही, कोणताही सचोटीचा मंत्री-अधिकारी इथली व्यवस्था बदलून पारदर्शक वगैरे बनवण्याच्या फंदात पडत नाही.. ही आपल्या सर्वाच्या गरजेतून, सहकारातून, समन्वयातून, बंधुभावातून उभी राहिलेली यंत्रणा आहे, त्यामुळे आपल्या भंपक भोंदूपणाप्रमाणेच तीही अजरामर आहे.
तेव्हा, बा शहाण्या माणसा, जेव्हा जेव्हा भ्रष्टाचारविरोधाचा अतीव ज्वर चढेल, तेव्हा तेव्हा या ऑफिसात जरूर येऊन जा.. उघडय़ा डोळ्यांनी इथला कारभार पाहून जा.. तुझ्या प्रकृतीला उतार नक्कीच पडेल.

(प्रहार, १८ डिसेंबर, २०११)

No comments:

Post a Comment