आगामी निवडणुकीसाठी आमचे येकमात्र (एकावेळी आमचे एकच साहेब असतात, या अर्थी) साहेब, आ. रा. रा. रा. (हे त्यांच्या कृत्यांनी आणि वक्तव्यांनी उद्वेगाने मुखातून अनाहूतपणे निघणारे उद्गार नसून ‘आदरणीय राजमान्य राजेश्री राजसाहेब’चे लघुरूप आहे.) यांनी लेखी परीक्षा घेण्याचे प्रयोजन जाहीर केले आणि आमची तीक्ष्ण शोधपत्रकारक नजर भिरभिरू लागली (‘ती सारखी भिरभिरतच असते, लोचट मेले’ हे
सैपाकघराच्या दिशेने आलेले शब्द कानावेगळे करून अवधान एथ्थे रख़्ख- सुपर
मामा!). काहीही करून या परीक्षेचा पेपर आपल्या पेपरात फोडायचाच, असा चंग आम्ही बांधला. ज्येष्ठ शोधपत्रकार आणि आमचे रिटायर्ड हर्ट ज्येष्ठ परंमित्र जे की साहेब यांच्या पावलावर पाऊल ठेवून (ते खासगीत सांगतात की ‘पायावर पाय देऊन’) आम्ही पत्रकारिता करीत असल्याने लगोलग आम्ही चाणाक्षपणे शिवाजी पार्काची वाट धरली (‘हुंगायला जातात सकाळ-संध्याकाळ’ या ‘त्या’ दिशेने आलेल्या कुत्सितोद्गारांकडे बा वाचका दुर्लक्ष कर). ‘कृष्णकुंजा’च्या परिसरात- ज्याअर्थी की ते मराठी हृदयसम्राटांचे निवासस्थान आहे, त्याअर्थी- एकतरी भेळवाला भय्या असणारच, अशी आमची खात्रीच होती. तसा तो सापडलाच. मग आम्ही भेळ खाण्याच्या मिषाने तिथे उभे राहिलो (‘जीभच चटोर यांची’- दुर्लक्ष
दुर्लक्ष). थोडय़ाच वेळात आमच्या तीक्ष्ण नजरेला भेळवाल्याच्या गठ्ठय़ातली
हस्तलिखित पाने दिसली आणि आम्ही हात पुढे करून भेळवाल्याच्या पुढय़ात उभे
राहिलो. ‘‘तीख्खा बनाना हौर उपर से लिंबू पिळना, जरा जास्ती पिळना’’ अशा सूचना देऊन आम्ही जो भेळयज्ञ सुरू केला, तो 17 हस्तलिखित कागद जमवूनच थांबला.
प्रत्यक्ष परीक्षेत कोणता पेपर आला होता, याचा आम्हाला पत्ता नाही. प्रंतु पेपर सेटरनी पेपर काढताना काय काय विचार केला होता आणि मूळ पेपर काय होता, यावर आमच्या हातातील दस्तावेजातून निश्चितच प्रकाश पडेल. तर अशी आहे मूळ प्रश्नपत्रिका....
प्र. १. आपल्या पक्षाचे नेमके ब्रीदवाक्य काय आहे?
- अ. खळ्ळ खटय़ॅक
- ब. खळ्ळ पटय़ॅक
- क. खळ्ळ सटय़ॅक
- ड. खळ्ळ फटय़ॅक
प्र. २. आपल्या ब्रीदवाक्यातील फटय़ॅक्’ हा आवाज कशाचा आहे?
- अ. भय्याला चोपटवल्याचा
- ब. भय्यांनी चोपटवल्याचा
- क. पोलिसांनी कानफटवल्याचा
- ड. पब्लिकनी लगावल्याचा
प्र. ३. संदर्भासह स्पष्टीकरण द्या.
- अ. विठ्ठल आणि बडवे
- ब. कावळे आणि मावळे
- क. वसंतसेना आणि अशोकसेना
- ड. ट्रॅक्टर आणि जीन्स
प्र. ४. पुढील विषयावरील प्रांजळ मनोगत लिहा.
‘आणि मी चुकीच्या माणसाला काळे फासले..’
(उपप्रश्न : कोणते काळे अधिक काळ टिकते? शाई, रंगपंचमीचा रंग, केमिकल कलर की कोळशाची उगाळी?) प्र. ५. एखाद्या व्यक्तीच्या सहाव्या मजल्यावर असलेल्या घरावर हल्ला कसा चढवाल? नकाशा आणि डावपेचांसह प्लॅन ऑफ अॅक्शन तयार करून द्या.
किंवा
दहा बाय बाराच्या रूममध्ये एका टेबलासमोरच्या खुर्चीत बसलेल्या टार्गेटवर दहा जणांच्या साथीने हल्ला कसा कराल? त्याला काळे कसे फासाल? ‘टीव्ही माझा’च्या टीमला उत्कृष्ट चित्रीकरण मिळण्याच्या दृष्टीने (त्यांनाही दिवस भरायचा असतो) कोणता अँगल द्याल? याचा नकाशा आणि डावपेचांसह प्लॅन ऑफ अॅक्शन तयार करून द्या.
प्र. ६. ज्यांच्या नावाने आपण अहोरात्र घसाफोड करतो, बोटे मोडतो, खडे फोडतो, त्यांच्याचसोबत पालिकेत जाहीर किंवा गुप्त युती करतो.. हेच महाराष्ट्राच्या व्यापक हिताचे कसे आहे, हे पटवून देणारे प्रभावी भाषण तयार करा.
किंवा
आपल्याला दिवसरात्र नाडणारे, व्यापाराच्या नावाखाली लुटणारे, आपल्याच राज्यात आपल्याला घरही नाकारण्याची हिंमत करणारे सर्व धनदांडगे परप्रांतीय हे आपले मित्र आणि बांधव आहेत; फक्त कानफटवायला सोपा असा कष्टकरी गरीब भय्याच तेवढा मुजोर परप्रांतीय आहे, हे प्रभावीपणे पटवून द्या.
(इथे ‘द्या’ खोडून ‘घ्या’, ते खोडून ‘द्या’ अशी बरीच खाडाखोड केलेली दिसते.)
यानंतरची पाने बा वाचका, तुझ्या सेवेत हजर करता येत नाहीत, असे सखेद जाहीर करावे लागत आहे. पत्रकारितेच्या परमकर्तव्यापोटी एवढय़ा आणि अशा जहाल भेळी हादडल्यानंतर पुढे कोठून कळा सुरू झाल्या आणि शोधपत्रकारितेचा अंत कशाच्या शोधात झाला, हे बा वाचका तुला फोडून सांगण्यात हशील नाही. उपरोल्लेखित मजकूर एका हाताने पोटावर ओव्याची गरम पुरचुंडी दाबत लिहिलेला आहे, हे समजून घे...
...
खळ्ळ खळ्ळ...
...
अरे देवा, हा आवाज कुठून आला?
पेपर यशस्वीपणे सोडवलेल्या ‘विद्यार्थ्यां’ना ज्येष्ठ शोधपत्रकाराच्या घराचा शोध लागला की काय?
बा वाचका, आता यापुढील सुप्रसिद्ध ‘फटय़ॅक’ आमच्याच कर्णसंपुटाखाली ऐकू येण्याच्या आतच फडताळात दडणे क्रमप्राप्त आहे. इत्यलम!(चित्र : प्रदीप म्हापसेकर)
(प्रहार, ११ डिसेंबर, २०११)
No comments:
Post a Comment