‘‘माय गॉड!’’ समोरच्या वर्तमानपत्राकडे पाहून सुनीतची झोपच उडाली. त्याने ताबडतोब मोबाइलमधला मॅनेजिंग डायरेक्टर अजितचा नंबर स्पीड डायल केला.
‘‘हॅलो सर.. गुडमॉर्निग!’’
‘‘इफ यू थिंक धिस ब्लडी मॉर्निग इज गुड, लेट मी मेक इट व्हेरी बॅड फॉर यू..’’ सुनीत संतापाने धगधगत होता.
‘‘व्हाय सर, व्हॉट हॅपन्ड’’ एअरकंडिशन्ड बेडरूममध्येही अजितला घाम फुटला. मेंदूत विचारचक्र गरगरू लागलं. आपला मालक एवढा का भडकला असेल? त्याच्या लाडक्या बी ग्रेड नटीचा फोटो आपल्या पेपरच्या पुरवणीत चार कॉलमपेक्षा कमी आकारात छापला गेला असेल का? त्याने तोंडी आदेश देऊन ज्यांची प्रसिद्धी बंद करवली आहे, अशा कुणाबद्दल कुठे एखादी ओळ छापून आली असेल का?..
‘‘हॅलो अजित, आर यू स्टिल देअर?’’
‘‘ये.ये. येस्स्सर..’’
‘‘आजचा ‘बीएनए’ पाहिलायस का?’’
‘‘न..न..न.. नाही सर..’’
‘‘देन प्लीज हॅव अ लुक..’’
अजितने ‘बॉम्बे न्यूज अँड अॅड्स’ अर्थात ‘बीएनए’चा अंक समोर ओढला. पहिल्याच पानावरची बातमी पाहून त्याला झटकाच बसला.
‘‘..सर, बट सर, आय डोंट अंडरस्टँड.. हाऊ कुड दे डू धिस?’’
‘‘अजित, त्यांनी ते केलंय आणि तेही आपल्या ‘इंडियन टाइम्स’च्या आधी. आपण कसे ‘अहेड ऑफ टाइम्स’ आहोत, अशी शेखी मिरवत.’’ ‘‘डोन्ट वरी सर, आइल डू समथिंग.’’
‘‘बेटर डू इट फास्ट.’’ खटॅक!
अजित डोकं धरून बसला होता. समोरच्या ‘बीएनए’मधली ती बातमी मोठी होऊन आपल्याला टुक्टुक् करतेय, असा भास त्याला होत होता.
‘बीएनएमध्ये आजपासून संपादकीय पान बंद वर्तमानपत्रांमधले अग्रलेख कोणीही वाचत नाही हे लक्षात आल्यामुळे आजपासून आम्ही संपादकीय पान बंद करण्याचा निर्णय घेतला आहे..’
कोणतीही गोष्ट ‘इंटा’च्या आधी ‘बीएनए’मध्ये सुरू होणं, म्हणजे आपली नोकरीच जाणं हे अजित पुरेपूर ओळखून होता. अशा आणीबाणीच्या वेळी कोणत्याही वरिष्ठानं जे केलं पाहिजे तेच त्यानंही केलं.. कनिष्ठाला फैलावर घेणं!
‘‘..तुम लोगों को इतनी अकल नहीं. इतनी बडी बात हो गयी. किसी ने कुछ खबर ही नहीं दी..’’ अजित आता डेप्युटी डायरेक्टरला झापत होता.
‘‘सर, मी बीएनएमधल्या आपल्या सोर्सला विचारलं, तो म्हणाला, आम्हाला कळलंच नाही. एडिटोरियल का काहीतरी नाव आहे त्या डिपार्टमेंटचं. ते कुणाला माहितीसुद्धा नाही. तिथली खबर कोण ठेवणार?..’’
..हेही खरंच होतं म्हणा. ‘इंडियन टाइम्स’मध्ये तर कोणत्याही खात्यात कर्मचारी नेमताना इंडक्शनच्या वेळीच सांगायचे, ‘‘वुई आर इन द बिझनेस ऑफ सेलिंग अॅड्स. सगळ्या जाहिराती लावून झाल्यावर मध्ये जी मोकळी जागा राहते, ती तशीच वाईट दिसेल म्हणून तिथे बातम्या वगैरे छापतात. त्या कामासाठी एक संपादकीय विभाग असतो.’’ यावर संपादकीय विभागातल्याच एका दीडशहाण्या रिक्रूटाने प्रश्न विचारला होता, ‘‘तसं असेल तर सगळाच जाहिरातींचा पेपर का काढत नाही तुम्ही? आणि वाचक हे त्याला ‘न्यूजपेपर’ म्हणून का ओळखतात, अॅडपेपर का म्हणत नाहीत?..’’
‘‘..कारण वाचक मूर्ख असतात.’’ अजितनं त्याला ‘इंडियन टाइम्स’ची फिलॉसॉफीच सांगून टाकली..
‘‘..जगात शहाण्या माणसांची संख्या फार कमी आहे. सुमार दर्जाचे, मध्यम किंवा कमी बुद्धीचे, विचार करण्याच्या फंदात न पडणारे मंद लोक 90 टक्क्यांपेक्षा अधिक आहेत. तेव्हा, मंद माणसांसाठीच पेपर काढा, खप वाढवा, जाहिराती मिळवा आणि माझं उत्पन्न वाढवा..’’ सुनीतने बोर्ड मीटिंगमध्ये सांगितलेली ही फिलॉसॉफी अजितच्या मनावर कोरली गेली होती.. ‘इंटा’ला नाकं मुरडत प्रत्येक वर्तमानपत्राने हीच फिलॉसॉफी स्वीकारली होती. ‘बीएनए’ने आता आणखी एक पाऊल पुढे टाकलं होतं. ‘इंटा’ला त्यापुढे जाणं भाग होतं. अजितने आता जाहिरात व्यवस्थापकाला फोन लावला.
‘‘विनय, आपल्याकडे एडिट पेज असतं, हे तुला ठाऊक आहे?’’
‘‘नो सर. मला फक्त फ्रंट, बॅक, जॅकेट, स्पेशल सप्लिमेंट्स आणि प्रायव्हेट टाय-अप आणि ट्रीटी एवढीच पानं दिसतात, जिथल्या जाहिराती प्रीमियमच्या असतात.’’
‘‘ग्रेट. मी आणखी एक पान दिलं तर?’’
‘‘डावीकडचं आहे की उजवीकडचं?’’
‘‘लेफ्ट हँड साइड..’’
‘‘मग काय फायदा? क्लासिफाइड जातील थोडय़ाफार आणि टेंडर.’’
‘‘नो वे. जरा हुशार क्लायंट निवड. त्यांना म्हणावं प्रिमियम स्पेस आहे. एडिट पेज मॅन, दि एडिट पेज! अग्रलेखाच्या जागी जाहिरात येणार तुमची. तुम्ही त्या स्टँडर्डचे आहात म्हणून ही एक्स्क्लुजिव संधी आहे तुम्हाला..’’
..फोन फिरले, चक्रं फिरली, ‘बीएनए’ने फक्त संपादकीय पान आणि अग्रलेख रद्द केले होते. ‘इंटा’ने त्याच्यावर कडी करून ती जागा जाहिरातीसाठी- तीही जास्त दराने विकण्याची कमाल करून दाखवली होती..
..हा निर्णय ‘इंटा’च्या संपादक (मुंबई मार्केट) यांना कळाला, तेव्हा ते त्यांच्या वर्तमानपत्रातर्फे लहान मुलांसाठी आयोजित ‘चमचा-लिंबू’ स्पर्धेचे प्रमुख पाहुणे म्हणून गेले होते. दुपारी त्यांना सहेली सप्लीमेंटतर्फे आयोजित ‘हळदी-कुंकू आणि हौजी’ स्पर्धेच्या विजेत्यांना वाणं वाटायला जायचं होतं. संध्याकाळी बिल्डर असोसिएशनच्या अध्यक्षाबरोबर ‘एका जाहिरातीवर 37 बातम्या फ्री’ या योजनेची चर्चा होती आणि रात्री ‘पेज थ्री’ पार्टीला हजेरी लावायची होती.. या सगळ्यात अग्रलेख लिहायची कटकट संपली म्हणून त्यांनीही सुटकेचा नि:श्वास टाकला आणि ते ‘चमचा-लिंबू’ घेऊन धावणा-या मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी टाळ्या पिटू लागले.. (चित्र : प्रदीप म्हापसेकर)
(६/२/11)
No comments:
Post a Comment