Tuesday, February 15, 2011

खरवस

आजकाल छान लुसलुशीत चविष्ट खरवस काही मनासारखा खायला मिळत नाही...
...तसा खरवस बारा महिने तेरा काळ मिळतो म्हणा हल्ली. चिकाच्या कांडया आणि साधं दूध वापरून तयार केलेला. अगदी रस्त्यावरसुध्दा मिळतो... हातगाडीवर रचलेला. पण, तो खरवस म्हणजे आपल्या स्मरणातल्या खरवसाची घोर विटंबनाच. पांढराफट्ट, बेचव पचपचीत साखरी गोळा. यक्! जणू, गोड केलेलं पनीर... तेही हलक्या दर्जाचं.
काही अस्सल मराठी हॉटेलांमध्ये (म्हणजे गिरगाव, दादर आणि पार्ल्यातच) छान चवीचा केशरी खरवस मिळतो. तोही असतो या रस्त्यावरच्याच खरवसाचा भाऊ... पण, जरा सुस्थितीतला. म्हणजे रस्त्यावरचा खरवस हा गिरगावातल्या चाळीत दहा बाय बाराच्या खोलीत 17 माणसांचा संसार मेटाकुटीनं चालवणारा मानला, तर हा हॉटेलवाला खरवस म्हणजे दादर किंवा पार्ल्यात स्वत:चा, वन बीएचके का होईना, फ्लॅट असलेला 'हम दो हमारा एक'वाला. म्हणूनच तर त्याला केशरचारोळयांची पखरण परवडते. गोडवा साखरेचाच पण कसा बेतशीर विदाऊट शुगर चहा घेणाऱ्यांना मानवेल इतकाच. प्लेटीतल्या चौकोनी तुकडयाची चमच्यानं एकेक कवड पाडावी आणि जिभेवर सोडावी... नामी गवय्याच्या जमलेल्या चीजेसारखी घोळवत घोळवत कधी घशाखाली उतरते, कळतच नाही...
...पण नाही भौ! 'ती' मजा नाही. 
 आसपासच्या गोठयातली एखादी गायम्हैस विणार आहे म्हटल्यावर आधीपासूनच आयाबायांची फील्डिंग लागायची. भाव ठरायचा आणि चिकाचं बुकिंग व्हायचं. मग सगळयांचे डोळे तिच्या 'बाळंतपणा'कडे. 'व्याली रे व्याली'ची हाकाटी आली की सगळे चरव्याभांडी घेऊन गोठयाकडे. मग आधी ठरल्याप्रमाणे मोजून मापून चिकाचं दूध घेऊन यायचं. घरातली जुनीजाणती बाईच खरवसाची पाककृती करणार. हो ना! बिघडला, तर पुढच्या 'खेपे'ची वाट पाहायला लागणार.
तो खरवस फार देखणा नाही दिसायचा. केशरचारोळयांची मिजास त्याला नाही परवडायची.
कधी कधी करपायचाही. पण, तो असा 75 ग्रॅमच्या तुकडयांमध्ये नाही खावा लागायचा. त्यात अस्सल चिकाचा दाटपणा आणि सुगंध असायचा.
अरे हो! ज्यांना खरवसच माहिती नसलेल्यांना चीक माहिती असणं कठीण. चीक म्हणजे बाळंतपणानंतर गाईम्हशींना येणारं दाटसर दूध. जन्मलेलं वासरू पुष्ट व्हावं, त्याची रोगप्रतिकारक शक्ती वाढावी, यासाठी निसर्गत:च हे दूध फार उपयोगाचं असतं म्हणे. पण, माणूस वासराच्या तोंडून ते हिरावून घेतो आणि खवय्यांच्या रसनातृप्तीचं एक खास व्यंजन खास डेलिकसी बनवण्यासाठी वापरतो.
जगात कोणताच सस्तन प्राणी जन्मल्यानंतरचा विशिष्ट काळच आईचं दूध पितो. त्यानंतरच्या संपूर्ण आयुष्यात त्याला दुधाची गरज भासत नाही. माणूस मात्र स्वत:च्या आईचं दूध तर पितोच पण पुढे मरेस्तोवर गाईम्हशीशेळयामेंढयाऊंटांचं दूध पितो. वासराला कासेला लुचवतो. त्याची आई दुधाची धार सोडते. हा वासराला आचळापासून तोडून आपली चरवी भरतो. तरतऱ्हेचे चारे भरवून गाईगुरांची 'दूध उत्पादक यंत्रं' बनवून टाकतो...
...मनात हे असं होतं पाहा बऱ्याच दिवसांत चांगला, अस्सल खरवस खायला मिळाला नाही की!

(थर्ड आय, महाराष्ट्र टाइम्स)

2 comments:

  1. I like your style of writing, so far, Mukesh.Its admirable how you see "things" in everyday little things and can describe it in a way which appeals to everyone i everyday life.You convey information as well as clarify it and dwell on it in... for just the right time, without finding the need to really stress on any particular piece of information. Well done.
    (Of course I am no writer or expert myself.. just an observation)

    ReplyDelete
  2. बाकी काहीही असो बालपणी कोकणात खाल्लेला लुसलुशीत चविष्ट खरवस आजकाल खायला मिळत नाही.

    ReplyDelete