Tuesday, February 15, 2011

अंतर


माणसामाणसामधलं अंतर हेच त्यांच्यातल्या हेव्यादाव्यांचं, द्वेषाचं, हिंसेचं कारण असतं, असं सगळे धर्ममार्तंडतत्त्ववेत्तेविचारवंत वगैरे सांगत असतात... ते अंतर कमी केलं की माणसांमध्ये आपलेपणाची भावना वाढेल, परस्परांविषयी प्रेम निर्माण होईल, जगात शांतता नांदेल, तिसरं महायुध्दच होणार नाही, असे अक्सीर इलाजही सांगितले जातात.
चला तर मग... माणसामाणसातलं अंतर (शारीरिक पातळीवर) जगात सर्वात कमी असतं, त्या मुंबईच्या लोकलमध्ये जाऊयात...
अरेच्चा! पण, हे काय?
''धक्का काय को दिया?''
''इतना गर्दी है तो धक्का लगेगा ना? जानबूझ के दिया क्या?''
''तेरी तो! ऊँची आवाज मे बात मत कर! मा....''
''ए गाली मत दे, भो.....''
अर्रर्रर्र! इथे काहीतरी भलतंच सुरू आहे. अंतर कमी झालेलं मानवलं नाही बहुतेक यांना.
चला, आता शेजारच्या तीन माणसांच्या बेचक्यात तीन ठिकाणी वाकून वाकडा झालेला हात सरळ करून घेऊयात. समोरच्या काकांना आपल्या पायावरचा पाय उचलायला सांगूयात आणि थोडे पुढे सरकूयात म्हणजे शेजारच्या उंच माणसाच्या खाकेतल्या घामाच्या दुर्गंधीपासून सुटका होईल. या सर्वांविषयी खूप प्रेम दाटून आलंय मनात! पण, त्यांचा विरह सहन करायलाच हवा...
आता आत शिरून उभं राहायला जागा मिळालीये खरी... पण, मागचा सगळा रेटा अंगावर घेत आपण थर्ड सीटवर बसलेल्या माणसाच्या अंगावर न रेलण्याची दक्षता घ्यायला हवी... ही जवळीक तर फार किळसवाणी. आपण थर्ड सीटवर बसतो तेव्हा 'संरक्षणा'साठी बॅग मांडीवर ठेवून तिचं एक टोक बाहेर काढून ठेवतोच ना... रेलू पाहणाऱ्याला रोखायला!
वा वा! आज नशीब जोरावर आहे. चक्क बसायला जागा मिळाली. पण, हे काय? हे काका (परस्परांतलं अंतर कमी व्हावं म्हणून) पाय फाकवून बसलेत आणि दुसऱ्या काकांनी बॅगही सीटवरच ठेवली आहे. त्यांच्या बेचक्यात चेपायचं नसेल तर दोघांनाही 'प्रेमाने' समजावायलाच हवं...
गुड! आता जरा पेपर वाचूयात. अरेच्चा! समोरच्याने संपूर्ण पेपर उलगडून असा धरलाय की तो आपल्या नाकात हुळहुळतोय. आता त्याला लोकलमध्ये घडी घालून पेपर कसा वाचायचा, हे 'समजावायला' हवं...
...आता शेजारच्या काकांची आपल्याविषयीची आपुलकी इतकी प्रबळ झालीये की ते बसल्याजागी डुलक्या घेता घेता आपल्या खांद्यावर रेलून झोपू पाहतायत... आता दर सव्वादोन मिनिटांनी कोपराने ढकलून 'सरळ बसा ना' असं म्हणावं लागणार...
...आणि हा बेन्जो कुठून वाजायला लागला, 'वादा ना तोड, वादा ना तोड'... अच्छा, समोरचा उदार मनाने 'सर्वांसाठी' गाणी वाजवतोय तर! खूप जवळीक निर्माण झाल्यामुळे, आपल्याला ती ऐकायचीयेत का, असा फुटकळ प्रश् विचारायची गरज त्याला भासली नसावी... आता त्याचे हृदयपरिवर्तन करायला हवे...
...ट्रेनमधून उतरता उतरता लक्षात येतं की प्रत्येक माणसाची स्वत:ची एक स्पेस असते. ती ज्याची त्याने जपायची असते आणि इतरांनीही तिचा आदर करायचा असतो. या अंतराचं भान ठेवलं, तरच ते 'अंतर' कमी होतं.

(थर्ड आय, महाराष्ट्र टाइम्स)

1 comment: