Tuesday, March 8, 2011

काकूबाई आणि काकाबुवा!दोन वेण्या, तोंडावर पावडरचे चट्टे, मान सदैव खाली, अंगात ओल्ड फॅशन्ड धुवट कपडे आणि चेहऱ्यावर सीएसटीच्या सिग्नलवरच्या ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या कोंबडीसारखे कावरेबावरे भाव... डोळ्यात सदा उदासी... अशा पोरींना कॉलेजांमध्ये 'काकूबाई' म्हणून हिणवायची पद्धत होती एकेकाळी... आताही अशा पोरी असणार, त्यांना हिणवलंही जात असणार... शब्द बदलला असेल कदाचित! पण, तरुण पोरांच्या 'माल'दार भावविश्वात असल्या पोरींना शून्य स्थान असतं... बहुतेक जण पुढे बाप्ये झाले, की अशाच पोरींशी सुखनैव संसार करतात तो भाग अलाहिदा. पण, त्या वयात एखादी 'काकूबाई' चुकून समोर आली तरी झुरळ अंगावर पडल्यासारखी पोरं दचकून दूर होतात...

... चटकन आपल्या कधी लक्षात येत नाही. पण, असेच काही 'काकाबुवा'ही आपल्या आसपास असतात. डोक्यावर तेल थापून चप्प बसवलेले केस, त्यातलं तेल ओघळून चेहऱ्यावर आलेलं किंवा एकंदर चेहऱ्याला तेलकट अवकळा, अंगात शाळकरी छापाचे कपडे, चेहऱ्यावर तेच कावरेबावरे भाव, संपूर्ण व्यक्तिमत्त्वात आत्मविश्वासाचा कम्प्लिट अभाव... अशा पोरांना पोरीही जवळ करत नाहीत, अशा पोरापोरांचेच नंतर गट तयार होतात... संपूर्णपणे बहिष्कृत असल्यासारखे कॉलेजात कोपऱ्याकोपऱ्यातून सावल्यांसारखे वावरतात...

छोडो यार! काकूबाई आणि काकाबुवांची काय करायचीये चर्चा?

ही चर्चा का करायची याचं एक सॉलिड कारण आहे...

कधीकधी कॉलेज सुरू होऊन सहा महिने-वर्ष उलटल्यानंतर यातली एखादी काकूबाई कात टाकते किंवा काकाबुवा कोशातून बाहेर येतात... 'आयला, ही पोरगी तर सॉलिड आहे,' अशा आश्चर्याची हळहळ कॅम्पसभर व्यक्त होते किंवा किती गुणी पोराकडे आपण ढुंकूनही पाहत नव्हतो इतके दिवस, म्हणून पोरींच्या कॉमन रूममध्ये चुकचुकाट होतो... कधी कधी तर कॉलेज संपून अनेक वर्षं उलटल्यानंतर पेपरात, टीव्हीवर एखादं पराक्रमी नाव ओळखीचं वाटतं आणि आश्चर्यचकित होऊन आपण म्हणतो, 'आयला ही काकूबाई/ हा काकाबुवा इतका सुपरहिट कसा काय झाला?'

का बनतं कुणी काकूबाई? का बनतं कुणी काकाबुवा?

मोठ्या शहरांतल्या मोठ्या कॉलेजांमध्ये कितीतरी मुलं बाहेरच्या छोट्या गावांतून येतात. त्या त्या शहरांमध्येही गरीब वस्त्यांमधली, पालिका शाळांमध्ये शिकलेली, साध्या मराठी माध्यमाची, घरात शिक्षणाची परंपराच नसलेल्या समाजातून आलेली कितीतरी मुलं कॉलेजच्या निमित्ताने पहिल्यांदाच इतकं मोठं, इतकं चकाचक जग पाहतात. मरमरमरून, विपरीत परिस्थितीत अभ्यास करून या मुलामुलींनी मोठ्या कॉलेजात अॅडमिशन मिळवलेली असते. बऱ्याचदा जेमतेम फी भरण्याचीच ऐपत असलेल्या घरांतून आलेली ही मुलं. सधन-सुखवस्तू मुलांप्रमाणे नव्या फॅशनचे कपडे, शूज, अॅक्सेसरीज यांचा विचारही करण्याची त्यांची परिस्थिती नसते.

त्यात कॉलेजच्या मोठ्या जगात येणं हा त्यांच्यासाठी मोठा शॉकही असतो. त्यांच्या त्यांच्या शाळेत ते स्टार असतात. त्यांच्या हुशारीचं, अभ्यासूपणाचं त्यांच्या परिसरात कौतुक असतं. पण, आपल्या छोट्या तळ्यातला हा स्टारफिश एकदम कॉलेज नावाच्या समुदात येऊन पडतो आणि ६० मुलांच्या वर्गातला स्टार काही हजार मुलांच्या कॉलेजात, १२० मुलांच्या एफ डिव्हिजनमधला फुटकळ रोल नंबर ७३ बनून जातो, तेव्हा तो मनातल्या मनात आक्रसतोच. या शॉकचाही परिणाम या मुलांच्या बोलण्या-वागण्यात दिसतो, अनेकदा अभ्यासातही रिफ्लेक्ट होतो.

न्यूनगंडाने पछाडलेली ही मुलं मग त्या गंडाच्या आत शिरतात, ढालीआडच्या कासवासारखी त्या काकूबाई/ काकाबुवाच्या कवचात दडून बसतात. काही वेळा हे कवच जन्मजात त्वचेसारखं चिकटून जातं. पण बहुतेक वेळा काही काळानंतर काकूबाई/ काकाबुवा कॉलेजला सरावतात. आपल्याला काय जमणार नाही, याचा अंदाज त्यांना उपजतच असतो. पण, आपण काय करू शकतो, याची जाणीवही असते. जेव्हा ते करण्याची संधी मिळते, तेव्हा इतके दिवस कोंडून ठेवलेली वाफ सर्रर्रर्र शिटी मारत प्रचंड फोर्सने बाहेर पडते आणि मग हे ट्रान्स्फॉमेर्शन बघून सगळेच अवाक् होतात.

साधनसंपत्तीच्या विपुलतेमुळे कायमच चमकेश राहण्याची सोय असलेल्या कॉलेजातल्या फाकडू पोरापोरींना बाकी सगळं करता येतं, ट्रेण्डी कपडे घालता येतात, गाड्या उडवता येतात, पोरं-पोरी फिरवता येतात, भारीतले क्लास वगैरे जॉइन करता येतात, अनेक संधी मिळवता येतात, पण, अंगात गुण नसतील तर, अशा संधींचा खरा लाभ काही करून घेता येत नाही...

... आणि दमछाक झालेल्या गळपटलेल्या स्थितीत हे दैवाचे लाडके ससुले जेव्हा अंतिम रेषेपाशी पोहोचतात, तेव्हा कासवगतीने शर्यतीत उतरलेली काकूबाई किंवा काकूबाईच तिथे गोल्ड मेडल घालून स्वागताला उभे राहिलेले दिसतात...

... तेव्हा काकूबाई आणि काकाबुवांना हिणवताना यापुढे दहादा विचार करा!
 
(महाराष्ट्र टाइम्स)

3 comments:

  1. Khup ch chhan aahe lekh. Kakubai/kakabuwa bananyachi karane pan patali katan mi swata yatun gele hote.

    ReplyDelete
  2. My roll no in big posh college was 73. Koli.

    ReplyDelete