मोरूला सगळंच धूसर दिसत होतं..
ते स्वाभाविकच होतं.. कारण, त्याच्या डोळय़ांतून घळघळा अश्रुधारा वाहात होत्या.. हृदय उचंबळून येत होतं.. राहून राहून कढ येत होते..
तो एका गोलाच्या मध्यभागी उभा होता. गोलाच्या परीघावर तंबू उभारलेले होते. सर्वावर झेंडे. कुठे भगवा फडकतोय, कुठे इंजिन फुरफुरतंय, कुठे हाताचा आशीर्वाद तर कुठे घडय़ाळाची टिकटिक..
सर्व
तंबूंसमोर एकेक टेबल. टेबलावर कागदांचे गठ्ठे. याद्यांच्या लांबच लांब
पत्रावळय़ा आणि टेबलांसमोर भल्यामोठय़ा रांगा.. काही ठिकाणी त्या रांगा मोडून
टेबलाभोवती उडालेली झुंबड.. सगळीकडे एकच आवाज.. ‘मला, मला, मला, मला..’
हे
दृश्य मोरूला पहिल्यांदा दिसलं तेव्हा त्याला आधी वाटलं की चुकून आपण
शिर्डीच्या साईबाबांच्या मंदिराबाहेरच्या रांगेसमोर आहोत की काय? तिथे सगळे ‘मला नोकरी, मला छोकरी, मला टोकरी, मला पैसा, मला यश, मला प्रेम, मला सुख, मला गाडी, मला बंगला’ म्हणून मनोमन आक्रंदत असतात.
नंतर त्याला वाटलं की आपण ट्रॅफिक सिग्नलजवळच उभे आहोत आणि थांबलेल्या गाडय़ांभोवती भिका-यांची झुंबड उडाली आहे, ‘मला, मला, मला, मला.. माई मला वाढ, बाबा मला दे..’
मग त्याला प्रश्न पडला आज भलत्याच वेळी पाणी आलं की काय चाळीच्या नळाला. सगळेच्या सगळे लोटलेत हंडय़ा, कळश्या, तपेली, बादल्या, लोटे, ग्लासं घेऊन, ‘आधी मला, मला, मला, मला, मला.’’
की ही रेशन दुकानासमोरची रांग.
की केजीपासून पीजीपर्यंत कोणत्याही अॅडमिशनची.
की एखाद्या गल्लीदैवताच्या भंडा-याची.
ही सात बावन्न किंवा नऊ सत्तावीसच्या लोकलवर उडालेली झुंबड तर नव्हे? ‘‘आधी मी, आधी मी, आधी मी..’’
‘कुणीतरी काहीतरी फुकट वाटतं असणार, त्याशिवाय धावत्या मुंबईत इतके लोक एका जागी थांबून गर्दी करायचे नाहीत,’ मोरूच्या
डोक्यात टय़ूब पेटली आणि तो धीर करून पुढे सरकला. एका ठिकाणच्या झुंबडीच्या
शेवटच्या टोकावरून समोरच्याला दाबजोर रेटत असलेल्या माणसाच्या खांद्यावर ‘टकटक’ करून विचारलं, ‘‘काय वाटतायत हो इथं?’’
‘तिकीट, तिकीट’, एवढं पुटपुटून त्या माणसाने पुन्हा समोरच्याला रेटले आणि ‘मला मला मला मला’चा जप सुरू झाला.
मोरू बुचकळय़ात पडला. ही काय भानगड? हे कसलं तिकीट? बस स्टॉप दिसत नाही, रेल्वे स्टेशन दिसत नाही, कोणी पैसे देतानाही दिसत नाही (तिकीट दिल्यानंतर घेत असतील म्हणा कदाचित) आणि तिकीट कसलं घेतायत?
त्यानं पुन्हा ‘नॉक नॉक’ केलं आणि अदबीनं विचारलं, ‘‘कुठे जायचं तिकीट देतायत हो इथे?’’
‘‘लॉटरीचं,’’ दोन क्षण वळून पुन्हा त्या इसमाचं ‘मला, मला, मला, मला’ सुरू झालं..
‘‘कसली लॉटरी?’’ मोरूनं पुन्हा विचारलं.
आपला नंबर लागणं कठीण आहे, याचं भान आल्यामुळे की काय कोण जाणे, पण, आता तो तिकीटेच्छुक माणूस झुंबड सोडून मोरूकडे वळला आणि त्याला आपादमस्तक न्याहाळू लागला. माणूस साधा दिसतोय, गरीब दिसतोय, म्हणजे नक्कीच आपल्यापैकी नसणार, आपला प्रतिस्पर्धी नसणार, हे
लक्षात येताच त्याच्या कपाळावरचं आठय़ांचं जाळं उलगडलं आणि नजरेतली खुन्नस
मावळली. काही क्षणांनंतर तर त्याला साक्षात्कारच झाला की हाच तो सामान्य
मुंबईकर, जो आता पुढचे काही दिवस आपल्याला लक्षात ठेवायला लागणार आहे. हाच तो माणूस जो आपल्यासाठी आता देव, मायबाप, त्राता, तारणहार, सर्वस्व वगैरे असणार आहे. या जागृतीसरशी त्याच्या चेहऱ्यावरचे तुसडे भाव पालटून त्यांची जागा अदबीनं आणि जिव्हाळय़ानं घेतली, ‘‘साहेब,’’ स्वर तर डोळे झाकल्यावरच लतादीदीच बोलताहेत असं वाटण्याइतके मंजुळ झाले, ‘‘तुमची लॉटरी!’’
आता मोरू पुरता भांजाळला, ‘‘माझी लॉटरी. अहो, पण तिकीट तर तुम्ही घेताय ना?’’
‘‘तीच तर गंमत आहे साहेब,’’ तोंडभरून हसत तिकीटेच्छुक म्हणाला, ‘‘तिकीट मी काढणार असलो तरी लॉटरी तुमचीच लागणार आहे, फायदा तुमचाच होणार आहे..’’
‘‘ही फारच वेगळी लॉटरी आहे हो, जरा मला सांगा ना समजावून’’ मोरूनं गळ घातली.
‘‘असं आहे साहेब, मला तुमची सेवा करण्यासाठी तिकीट हवंय. सेवकच आहे मी तुमचा, या नगराचा.’’
‘‘अरे वा, भेटून आनंद झाला,’’ मोरूनं प्रेमभरानं सेवकाचे हात हातात घेतले, पाचही
बोटांतल्या जाडजूड अंगठय़ा त्याच्या ओक्याबोक्या बोटांना बोचल्या आणि
त्याची हडकुळी बोटं सेवकाच्या गुबगुबीत पंजाला टोचली. सेवकाच्या गळय़ातल्या
रत्नजडित सुवर्णहारावरून परावर्तित होत असलेल्या झगझगीत प्रकाशामुळे ‘मालका’चे डोळे दिपण्याचाही हा पहिलाच प्रसंग असावा.
‘‘फार छान, फार छान. तुम्ही फार सेवाभावी वृत्तीचे दिसता. घ्या ना मग तुम्ही तिकीट आणि करा सेवा.’’
‘‘तोच जरा प्रॉब्लेम आहे. ही झुंबड पाहताय ना तुम्ही? हे लोक तिकीट मिळून देतील तर ना?’’
‘‘पण, हे लोक का नाही मिळू देणार तिकीट तुम्हाला?’’
‘‘कारण ते त्यांना हवंय म्हणून.’’
‘‘कशाला?’’
‘‘तुमची सेवा करायला?’’
‘‘काय सांगताय, इतक्या लोकांना माझी सेवा करायचीये?’’
‘‘हो तर, त्यासाठीच सगळे ‘मला मला मला मला’ करून नाचतायत, एकमेकांची डोकी फोडतायत, कागद पळवताहेत, गळे आवळताहेत, हाणामा-या करताहेत.’’‘‘काय सांगताय काय? केवढी ही जनसेवेची आंच,’’ आता मोरूचे डोळे डबडबले. ही इतकी माणसं, छान छान कपडय़ांमधली, उंची मोटारगाडय़ांमधून आलेली, अत्तरगंधित सुगठित पुष्ट देह आपल्या सेवेसाठी झिजवताहेत, हे पाहून त्याला आभाळाहून मोठं झाल्यासारखं वाटू लागलं आणि डोळय़ांतून घळघळा धारा सुरू झाल्या.. सगळं धूसर दिसत असतानाच डोक्यात मात्र काहीतरी लखकन स्पष्ट झालं आणि त्यानं निरागसपणे विचारलं, ‘‘बाकीचे दिवस कुठे असता तुम्ही?’’
..
खाडकन पेकाटात लाथ बसली आणि धूसर चित्र स्पष्ट झालं तेव्हा कमरेवर हात ठेवून उभा असलेला बाप दिसला आणि उत्तर आलं, ‘‘रोज सकाळी या वेळी इथेच असतो मी, हे विसरलास का गधड्या?’’
-अनंत फंदी