Monday, February 22, 2016

देशभक्तीचे विकान

'देशभक्तीचे विकान' अशी पाटी पाहिल्यानंतर आमच्यामधील बहिर्जी लगेच जागा झाला. कान टवकारले, डोळे विस्फारले, चांगल्या बातमीचा गंध आमच्या नाकात शिरला आणि दुकानात मालक म्हणून आमचे परममित्र बाबुराव बोंबले यांना पाहिल्यावर तर आम्ही उडालोच. 
त्यांनी दुकान उघडल्याचं आम्हाला माहितीही नव्हतं. 
बाबुराव कपाळावर टिळा रेखून गंभीर मुद्रेने दुकानात बसले होते. 
एरवी रमी खेळणारे, आठवड्यातून एक दिवस अंमळ चांगभलं करणारे, संध्याकाळी नाक्यावर रमणीय स्थळांचं दर्शन घेणारे रसिक बाबुराव ते हेच, यावर कुणाचा विश्वास बसला नसता. एका टिळ्यामुळे इतका फरक पडतो?
अत्यंत अनोळखी दिसणाऱ्या या मित्राकडे पाहून हसण्याचा आमचा प्रयत्न फोल गेला. 
“काय बाबुराव, हे काय नवीन,” असं सलगीच्या सुरात म्हणालो, तेव्हा त्यांनी दुकानातल्या एका पाटीकडे बोट दाखवलं. 
हे भारतमातेचं पवित्र मंदिर असून येथील पावित्र्य राखावे, हास्यविनोदांसाठी उद्याने आहेत, येथे कामाचे बोलावे, आपले म्हणणे थोडक्यात सांगावे, अशी एक पुणेरी शैलीतली पाटी लिहिली होती. 
संपूर्ण तिऱ्हाईताप्रमाणेच आमच्याशी बोलणाऱ्या, वागणाऱ्या बाबुरावांना आता या पाटीतल्या सूचनांनुसारच बोलतं करावं लागणार, हे लक्षात आल्यावर आम्ही अत्यंत विनम्रतापूर्वक आणि गंभीरपणे विचारलं, “महोदय, हे विकान म्हणजे काय आहे?”
कडक इस्त्री केलेल्या चेहऱ्यावर कमालीचे तुसडे भाव आणून बाबुराव म्हणाले, “असा प्रश्न तुम्हा तमाम देशद्रोही लोकांना पडतो. विकान याचा अर्थ आहे दुकान.”
आमच्या देशभक्तीलाच हात घातल्यावर आम्ही एकदम संतापलोच. पण, आपल्या मित्राला काहीतरी दुर्धर आजाराने ग्रासलेलं असणार, असा विचार करून आम्ही स्वरांवर नियंत्रण ठेवून विचारलं, “दुकानाला विकान म्हणायचं काय प्रयोजन आहे महोदय. तद्वत हा शब्दच न वापरणं म्हणजे देशद्रोह हे कोणी ठरवलं?” 
बाबुराव उत्तरले, “आम्ही.”
“तुम्ही कोण?”
“आम्ही देशभक्त आहोत.”
“कशावरून?”
“खरंतर आम्ही सांगतो म्हणून, एवढंच उत्तर तुमच्यासारख्या देशद्रोह्यांसाठी पुरेसं आहे; पण, तुम्ही प्राचीन स्नेही आहात, पुरातन परिचित आहात, तुमच्यात काही सकारात्मक बदल व्हावा म्हणून सांगतो की, आमचं आमच्या देशावर फार प्रेम आहे आणि आमच्या देशासाठी रक्त वाहायला आणि जीवही ओवाळून टाकायला आम्ही तयार आहोत. त्यामुळे आम्ही देशभक्त आहोत.”
बाबुरावांच्या किडकिडीत देहातून रक्ताचे थेंब तासातासाने दोन पडले तरी खूप आणि एखाद्या सिगारेटफुंक्याने त्यांच्या तोंडावर जोरात धूर सोडला तरी श्वास गुदमरून त्यांचा जीव ओवाळून पडायचा, त्यांची ही भाषा ऐकून जाम हसू येऊ लागलं. पण गांभीर्य कायम ठेवून आम्ही म्हणालो, “बाबुराव, म्हणजे आपले विकानचालक महोदय, देशासाठी दरवेळेला प्राण द्यायला हवा किंवा आपलं रक्त सांडायला हवं, तर आपण देशभक्त ही व्याख्या कुणी केली? आणि तीच व्याख्या असेल, तर तुम्ही सैन्यात का नाही गेलात? इथे दुकानदारी, आय मीन विकानदारी का करत बसला आहात?”
बाबुराव इस्त्रीयुक्त चेहऱ्याने उत्तरले, “आधी आपला अपसमज दूर करा. देशासाठी रक्त सांडायचं ते शत्रूचं, जीव ओवाळून टाकायचा तो शत्रूचा.”
“इथे विकानात बसून? ही भारी आयडिया आहे. तुमच्या वतीने जीव देणार सीमेवरचा सैनिक, शत्रूच्या नरडीचा घोट घेणार तोही सीमेवरचा सैनिक आणि तुम्ही इथे टिळे लावून बसून देशभक्तीची प्रमाणपत्रं विकणार, कमाल आहे.”
बाबुरावांची मुद्रा चक्क प्रसन्न झाली. ते म्हणाले, “आता तुम्हाला आमच्या उदीमाचं सत्य स्वरूप समजलं आहे. तुम्हालाही देशभक्तीचं प्रमाणपत्र हवं असेल तर ते आम्ही बनवून देऊ शकतो. आजकालच्या जगात ते फार उपयोगी पडेल.”
“भगवन्, काय बरे उपयोग आहेत या प्रमाणपत्राचे,” आता आम्हीही पेटलोच होतो.
बाबुराव डबल पेटले होते, ते म्हणाले, “बाळ बित्तमा, सगळ्यात महत्त्वाचा उपयोग म्हणजे इथून बाहेर पडल्यानंतर आपल्याला अचानक देशभक्तांनी गाठून चोपू नये, काळं फासू नये, फेसबुकवर, व्हॉट्सअॅपवर आपले लचके तोडू नयेत, असं वाटत असेल, तर त्यासाठी हे प्रमाणपत्र अत्यावश्यक आहे. आमच्या प्रमाणित विकानातून घेतलेलं हे अखिल हिंदुराष्ट्रीय प्रमाणपत्र पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ, ब्रम्हदेश, अफगाणिस्तानातही चालतं... पण, शहाणी माणसं विद्यमान हिंदुस्तानाच्या हद्दीबाहेर ही प्रमाणपत्रं काढून खिशात ठेवतात... तिकडे फटके पडण्याची शक्यता असते.”
“हे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी अर्हता काय असते?”
“खरंतर डोक्यावर टिळा एवढीच अर्हता पुरेशी होती कालपरवापर्यंत. पण, आताच्या काळात हे इतकं सोपं राहिलेलं नाहीये. तरीपण तुमच्यासाठी प्रयत्न करू. मुळात मला सांगा, तुमचा एखादा भरभक्कम गट आहे का? तुमच्या हाकेसरशी बारापंधरा लोक गोळा होऊन एखाद्या माणसावर हिंस्त्र हल्ला चढवू शकतात का?”
“अहो, माझी काय गुंडांची टोळी आहे का? काहीतरीच काय विचारताय बाबुराव?”
“अहो, तशी असती तर तुम्हाला प्रखर देशभक्त म्हणालो असतो. पण, तुम्ही दिल्लीचे वकीलही नाही आहात, हे मला माहिती आहे. सध्या तुम्ही साधे देशभक्त असल्याचंच प्रमाणपत्र जेमतेम मिळवू शकाल. तुम्हाला किमान सोशल मीडियावर एखाद्याच्या चिंध्या करता येतात का?”
“पण, हे सगळं का करायचं?”
“कमाल आहे तुमची? दुसऱ्या कोणाला तरी देशद्रोही ठरवल्याशिवाय तुम्ही देशभक्त कसे ठरणार? अंधार आहे, असं सिद्ध केलं तर प्रकाश आहे, असं सिद्ध होतं ना?”
आमच्या डोक्यातला अंधार या उदाहरणाने आणखी वाढला.
बाबुराव समजावणीच्या सुरात म्हणाले, “हे पाहा. मानवतावाद, धर्मनिरपेक्षता, परधर्मसहिष्णुता, विवेकशीलता, बुद्धीप्रामाण्य, नास्तिक्य, धर्मचिकित्सा, विज्ञाननिष्ठा या दुर्गुणांनी सध्या भारतवर्षाला ग्रासलेलं आहे. आपल्या तेजोमय इतिहासाचं लोकांना विस्मरण झालेलं आहे. अशा सद्गुणविकृतीच्या बळींची संख्या कमी नाही. त्यांच्यातला एखादा पकडायचा. तू बुद्धी वापरतोस, तुला चिकित्सा करता येते, कसल्याही बावळटपणावर तू आंधळी श्रद्धा ठेवत नाहीस, भारतीय उपखंडाचा इतिहास, त्यातली गुंतागुंत, कुप्रथा, पुराणांमधील अवैज्ञानिक कल्पनाविलास, महाकाव्यांच्या मर्यादा, विषमतापूरक समाजरचना यांच्यावर प्रहार करतोस, म्हणजे तू देशद्रोही आहेस, असं बजावत त्याच्यावर हिंस्त्र हल्ला चढवायचा. म्हणजे तुम्ही आपोआप देशभक्त बनता. त्याचं प्रमाणपत्र लगेच हजर. प्रखर देशभक्त बनण्यासाठी मात्र प्रत्यक्ष मारामारी करता आली पाहिजे. एकास एक अशा प्रमाणात नाही, बरं का! लोकलमध्ये पाकिटमार सापडला तर त्याला कसे शंभर लोक मारतात, तसं. झुंड करायची आणि चोपायचा. शिवाय फोटोशॉपचाही डिप्लोमा लागतो. इकडचा फोटो आणि तिकडचं बॅकग्राऊंड यांचा समन्वय करून दाखवायला लागतो. एखाद्या नि:शस्त्र वृद्धाचा खून वगैरे पाडू शकलात, तर देशभक्त वीर हुतात्मा ही पदवीही मिळू शकते.” 
“एक छोटीशी शंका आहे चालकमहोदय?” आम्ही धाडस करून बोललो, “तुम्ही देशभक्तीचं प्रतीक म्हणून सगळ्या विद्यापीठांवर राष्ट्रध्वज लावायला निघाला आहात. मग, हे देशभक्तीचं विकान असेल, तर इथे भारतदेशाचा झेंडा न लावता हा वेगळ्याच रंगाचा, डिझाइनचा ध्वज इथे का लावला आहे?”
आता बाबुराव एकदम क्रुद्ध झाले. त्यांनी इकडेतिकडे हाका मारल्या आणि दहाबारा टिळेधारी गोळा केले. म्हणाले, “मुसक्या आवळा याच्या. हा देशद्रोही आहे.”
त्या दहाबाराजणांना आमची गठडी वळणं काही अवघड नव्हतं. त्यांनी आम्हाला काउंटरवर नेऊन आदळलं आणि बाबुरावांनी एक भलामोठा शिक्का आमच्या कपाळावर आपटला.
पलीकडच्या आरशात पाहण्याची गरज नव्हती. कपाळावरचा शिक्का कसला असणार, हे स्पष्टच होतं. 

1 comment:

  1. Namaskar,

    I got your contact from Bloggers network
    I would like to invite you to send any related article for this edition . we give proper credit to all writers , you can also mention about your blog. check out the guidelines and let me know if you are interested. Sending you the link to our last year's Diwali Edition as well for your reference.


    link to guidelines: http://www.marathicultureandfestivals.com/diwali-e-edition-rules

    LInk to Diwali Edition 2015

    Please let me know if interested.

    Thanks

    ReplyDelete