Thursday, December 1, 2016

टिल्लू गँग व्हर्सेस खडूस अंकल (बालकथा)


टुंक टुंक...
हाइकचा मेसेज वाजला आणि नीलने पुस्तकातून डोकं बाजूला न करता नुसती नजर फिरवली... 
`प्रॉब्लेम, लवकर ये...' मोबाइलवर ओजसचा मेसेज आवाज न करता किंचाळत होता. 
``बाबा, अर्धा तास झाला आता. पाय मोकळे करून येतो थोडे. ममाने सांगितलंय, दर अर्ध्या तासाने आय शुड टेक अ स्ट्रोल...'' त्याने अभ्यासाचं पुस्तक बाजूला करत अगदी सहज आवाजात बोलून फ्लिपफ्लॉप्समध्ये पाय सरकवले.
``निळय़ा, परत काहीतरी लफडा झाला का खाली?''
``निळय़ा म्हणू नको ना यार बाबा,'' नीलने नेहमीची तक्रार केली. बाबाने ती नेहमीप्रमाणे हातानेच झटकून, उडवून लावली आणि डोळे मिचकावत म्हणाला, ``तुझ्या हाइकची टुंक टुंक मी पण ऐकली बरं का! खडूस अंकल नडला वाटतं परत तुम्हाला?''
बाबाचं विकट हास्य ऐकायला नील जागेवर होता कुठे? लिफ्टची वाट न बघता तो दणादण पायर्या उतरत निघाला होता. काहीतरी मोठा ड्रामा झाला असणार, हे त्याच्या लक्षात आलेलं होतं. नाहीतर टेन्थच्या फायनल अभ्यासात त्याला डिस्टर्ब करण्याची हिंमत कॉलनीतल्या एकाही मुलाने केली नसती. 
``व्हॉट्सप डूड्स?'' असं विचारायला त्याने वासलेला `आ' तसाच राहिला. कारण काय घडलं होतं, ते समोर दिसतच होतं. लॉबीमध्ये सगळय़ा चपला विखुरलेल्या होत्या आणि टिल्लू गँगची सगळी मुलं विस्कटलेल्या स्थितीत संतापाने धुमसत उभी होती. टिल्लू गँग म्हणजे कॉलनीतली सगळी छोटी मुलं- सेकंड-थर्ड-फोर्थ-फिफ्थमधली. कॉलनीत नीलच्या वयाचे बहुते सगळे दादा आणि दीदीज हे आपापल्या पालकांचे सिंगल चाइल्ड होते. कोणालाही भावंड नव्हतं. हीच मुलं त्यांना धाकटय़ा भावंडांसारखी होती. सगळे खेळायचे वेगवेगळे. पण, सगळय़ांमध्ये सॉलिड एकी होती. दादा कंपनीचं टिल्लू गँगवर लक्ष असायचं. कुठेही काही प्रॉब्लेम झाला तर नील, ओजस, मनस्वी, अन्वी, विभास हे सगळे सॉल्व्ह करायचे. खडूस अंकलमुळे हल्ली त्यांचं हे काम वाढत चाललं होतं...
नीलला पाहताच ओजस पुढे आला. 
नीलने विचारलं, ``किस ने किया ये? खडूस अंकल?''
``और कौन करेगा बॉस?'' टिल्लू गँगचा कॅप्टन सोहम बोलला.
टीव्हीवर कबड्डी प्रो लीग सुरू झाली आणि क्रिकेट-फुटबॉलच्या पलीकडे काहीही न खेळणार्या या मुलांना कबड्डीचा चस्का लागला होता. पण, कबड्डी खेळणार कुठे? कॉलनीच्या मध्यभागी एक गार्डन होतं. त्याच्या कडेला बिल्डरने कधीकाळी बसवलेली आणि वर्षातच गंजलेली, तुटलेली खेळणी होती. मधल्या हिरवळीवर आधी मुलं खेळायची. पण, खडूस अंकलने ते बंद पाडलं होतं. हे गार्डन आहे, मैदान नाही, इथे कॉलनीतल्या म्हातार्या माणसांना फिरायला मिळालं पाहिजे, हिरवळीवर व्यायाम वगैरे करता आले पाहिजेत, असा रूलच त्यांनी काढला होता. मुलांना खेळायला आता पॅसेजेस आणि पार्किंग स्पेसेसच्या पलीकडे काहीच शिल्लक राहिलं नव्हतं. त्यामुळे टिल्लू गँगने बिल्डिंगांच्या एन्ट्रन्स लॉबीमध्येच कबड्डी खेळण्याची आयडिया काढली होती. तेव्हाच पुढे काय राडा होणार आहे, याचा अंदाज नीलला आला होता. त्याने तो बोलूनही दाखवला होता. पण, या पब्लिकने तेव्हा ते सिरियसली घेतलं नाही. अब भुगतो! चपला रांगेने मांडून त्याच्या दोन बाजूंना दोन टीम करून मुलं झपाटून कबड्डी खेळत होते. खेळताना त्यांना भान राहिलं नाही. वॉचमन अंकल गप्प बसायला सांगत असताना त्यांच्या दंग्याचा आवाज वाढला. पाच मिन्टात खडूस अंकल तिथे हजर झाले आणि त्यांनी सगळय़ा चपला उडवून विस्कटून हा खेळ बंद पाडला होता आणि मुलांना तंबी देऊन ते वर गेले होते. 
``क्या यार तेरा बाप! कितना खडूस है, हमेशा हम को नडता है? समझा ना उसको?'' आत्ताच बाहेरून आलेल्या ऍशला सगळय़ा गँगनी घेरलं. तो बिचारा टय़ूशनवरून आलेला. त्याला इथे काय बवाल झालाय याची कल्पनाही नव्हती. लोकांच्या वडिलांना मुलांच्या तक्रारी ऐकाव्या लागतात. इथे उलटा प्रकार होता. ऍश ऊर्फ अश्विन दुनिया का ऐसा इकलौता बच्चा होगा, ज्याला रोज त्याच्या वयाच्या मुलांकडून त्याच्या वडिलांच्या तक्रारी ऐकायला लागायच्या. तो काहीतरी उत्तरणार, तेवढय़ात कठोर आवाजात वरून हाक आली, ``अश्विन, वर ये. किती वेळा सांगितलं तुला, फालतू पोरांमध्ये टाइमपास करू नकोस. वाया जायचंय का तुला पण त्यांच्यासारखं.'' खडूस अंकलने वरून पोरांच्या जखमांवर किलोभर मीठच ओतलं. ऍश धूम पळाला.
खडूस अंकलचा दराराच तसा होता. खडूस अंकलचं खरं नाव होतं खडस अंकल, पण, सगळी पोरं त्यांना खडूस अंकल म्हणूनच ओळखायची- अश्विन सोडून- त्याला त्यांना पप्पा म्हणावं लागायचं ना! ते सोसायटीचे सेक्रेटरी होते. त्यांनी सोसायटीत एकदम कडक डिसिप्लिन आणल्यामुळे सोसायटी स्वच्छ झाली होती, लिफ्ट, जनरेटर, फायर फायटिंग सिस्टम, गार्बेज, वॉचमन, सिक्युरिटी सगळय़ा सिस्टम मार्गी लागल्या होत्या. त्यामुळे सगळी मोठी माणसं त्यांच्यावर खूष होती. पण, बच्चे कंपनी नाराज होती. सगळय़ा सोसायटीत वाट्टेल तिथे, वाट्टेल तितका वेळ, वाट्टेल तसा धुमाकूळ घालणार्या पोरांना ते हटकून हुसकावायला लागले होते. `अंकल, हम फिर कहाँ खेलेंगे?' या प्रश्नावर त्यांनी `मुझे पता नही. ये ग्राऊंड नही है, यहाँ खेलने का नहीं बस' असं उत्तर दिलं होतं. काही मुलांचे आईवडीलही त्यांच्याकडे गेले होते भांडायला. पण, खडूस अंकलच्या कायदेशीर पॉइंट्सपुढे त्यांचीही डाळ शिजली नाही. वर त्यांनी सांगितलं, पटत नसेल, तर मी राजीनामा देतो सेक्रेटरीपदाचा.

``यार, ये खडूस अंकल का कुछ करना पडेगा,'' नीलच्या पॉकेटमनीतून जिगल जिगल कँडी खात विभास म्हणाला. बच्चा कंपनीला शांत करण्यासाठी नील त्यांना कॉलनीतल्या आइस्क्रीम पार्लरला घेऊन गेला होता आणि त्याला टू हंड्रेडची चाट पडली होती. वीकली पॉकेटमनी एकरकमी खर्च झाल्यामुळे आता संपूर्ण आठवडाभर कडकी सहन करायला लागणार होती. त्यामुळेच की काय कावून तो सगळय़ा पोरांवर धावून जात म्हणाला, ``खडूस अंकलचं काय करायचंय? ते तर असेही खडूसच आहेत. तुम्ही त्यांना चान्स देता कशाला? हूज आयडिया वॉज इट टू प्ले कबड्डी इन द लॉबी? (अन्वीने उत्साहाने हात वर केला आणि नंतर जीभ चावली.) कितना बेकार आयडिया था. खडूस अंकलनी अडवलं नसतं ना तर थर्ड फ्लोअरवरच्या अँग्री आंटींनी तुमचा बँड वाजवलाच असता. (या तक्रारखोर आंटींचं आडनाव आंग्रे होतं, ते मुलांनी अँग्री आंटी केलं होतं) लोक ये-जा करत असतात लॉबीमधून. ग्राऊंड फ्लोअरला लोक राहतात. तुम्ही कबड्डी खेळणार, रस्ता अडवणार, वर ख्यॅ ख्यॅ ख्यॅ ख्यॅ खिदळणार. कोणी ना कोणी कम्प्लेंट केलीच असती ना?''
``अरे यार तो हम खेलेंगे कहाँ?'' टिल्लू गँगची जस्सी ओरडली, ``सोसायटीत ग्राऊंड नाही. इधर खेलने का नही, उधर खेलने का नही. बच्चों का कोई राइट है के नहीं?''
``दॅट इज नॉट हिज प्रॉब्लेम यार, दॅट इज युअर प्रॉब्लेम,'' नील समजावून सांगायला लागला, ``सी, खडूस अंकल सोसायटीचे सेक्रेटरी आहेत. त्यांना सगळी मोठी माणसं आपल्या कम्प्लेन्ट सांगतात. कारण आपण तसं वागतो. आपल्याकडून तशा चुका होतात. आपल्याला खेळायला जागा नाही म्हणून आपण पार्किंगमध्ये खेळतो, पॅसेजमध्ये खेळतो. नोबडी स्टॉप्स यू. पण, तुम्ही जपून खेळता का? हजारवेळा सांगितलं तुम्हाला सायकली स्लो चालवा, रेसिंग करू नका. मोठय़ामोठय़ाने कोकलू नका. क्रिकेट, फुटबॉल खेळून गाडय़ा, काचा तोडू नका. बिहेव युअरसेल्फ. बट यू तो डोंट लिसन ओन्ली!''
``ही इज राइट गाइज,'' ओजस म्हणाला, ``तुम्ही मूर्खासारखे त्या शर्मा अंकलच्या गाडीमागे खेळत बसला होतात, तेव्हा गाडी काढताना चाकाखाली कोण सापडणार होता, तूच ना रे स्वीकार? आणि वॉचमन आजोबांना ज्यादा आवाज करने का नै, तुम कौन होते हो डाँटनेवाले, असं बोलण्याची हुशारी कुणी केली होती? तूच ना रे उमंग? सायकल जोरात चालवून या पिंटय़ाने त्या गावसकर काकूंचा गुडघा फ्रक्चर केला. तो सी विंगमधला पंकज मागच्या पार्किंगमध्ये विनीलच्या छातीवर बसून त्याचा गळा आवळत होता, ते सीसीटीव्हीवर वॉचमनने बघितल्यावर केवढा राडा झाला होता, आठवतंय ना? आता तर घरी कम्प्लेन्ट केली तरी मम्मी-डॅडी पण खडूस अंकलचीच साइड घेतात.''

``तो? अब क्या?'' टिल्लू गँगचा प्रश्न.
``तो क्या? आज से लॉबी मे कबड्डी बंद. बाहेरसुद्धा खेळायची नाही मी सांगेपर्यंत. आता प्लीज मला अभ्यास करू दय़ा यार दोन दिवस!'' फाट्टकन् हात जोडून नील निघून गेला आणि टिल्लू गँग माना खाली घालून चपला गोळा करायच्या मागे लागली.
***
त्या रात्रीपासून जणू कॉलनीत शांतता प्रस्थापित झाली आणि दोन दिवस मनोमन आनंदलेल्या मोठय़ा माणसांनाही नंतर चुकल्या चुकल्यासारखं व्हायला लागलं. रोज मुलांच्या दंग्याचा आवाज नाही. पार्किंग शांत, लॉबी शांत, पॅसेज शांत. सगळंच शांत. परीक्षाबिरीक्षा आल्यात की काय सगळय़ांच्या? हवंतर खडूस काकाला नडून खेळा प्रिमायसेसमध्ये, आम्ही भांडायला समर्थ आहोत, असं सांगणार्या आईबापांची मुलंही सरळ खेळायला नकार देत होती. त्यांना खडूस अंकलच्या आरडाओरडय़ाने काही त्रास झाला नव्हता. पण, नीलदादा आपल्यावर रागावला, याने फार वाईट वाटलं होतं. आज याच्या बाल्कनीत, उदय़ा त्याच्या टेरेसवर, परवा कुणाच्या घरी असे गट करून ती शांतपणे खेळत होती. नील आता दर अर्ध्या तासानी पाय मोकळे करायला जाण्याचा डॉक्टरममाचा सल्ला सारखा का विसरतो, म्हणून त्याचा बाबा (हे हाऊस हजबंड म्हणजे डोक्याला ताप असतात- नीलचे मोस्ट प्रायव्हेट थॉट्स) त्याला सारखा टोचत होता. नीललाही मनोमन प्रश्न पडत होता, ``टिल्लू गँग को डोस थोडा ज्यादा हो गया क्या?''
एक दिवस सोहम्बरोबर श्री, परवेझ, जस्टीन, बेला वगैरे गँग त्याच्या घरी खेळायला जात असताना सी विंगच्या वॉचमननी त्यांना थांबवलं. 
``आता काय? अभी घर पे खेलने का भी मनाई किया क्या खडूस अंकलने?'' सोहमने तुसडेपणाने विचारलं.
वॉचमनने खुणेने गप्प करून त्यांना मागच्या बाजूला नेलं. बिल्डिंगच्या जिन्याच्या शेजारी एक छोटा तुकडा होता जमिनीचा. सोसायटीच्या मागची बाजू होती ही. शांत. इथे खूप गवत आणि झुडपं वाढलेली असायची. आज ती जागा साफ झाली होती. ही खेळायला बरी जागा होती. समथिंग इज बेटर दॅन अजिबात नथिंग, असं म्हणून टिल्लू गँगने या जागेचा ताबा घेतला आणि तिथे लगेच चपला मधोमध लागल्या. शिटय़ा मारणे, हाकारे घालणे वगैरे नेहमीचे फंडे न वापरता मुलांनी इंटरकॉमचा वापर करून इतर मेंबर्सना बोलावलं. वॉचमन अंकलला थँक यू बोलून खेळायला सुरुवात करण्याच्या आधी बेलाने विचारलं, आता इथेपण खडूस अंकल आले तर?
``मी बघतो काय ते. तुम्ही खेळा बिनधास्त.'' वॉचमननी दिलासा दिला आणि मुलं खेळायला लागली.
ही डेव्हलपमेंट नीलला माहितीच नव्हती. ती माहिती पडली अँग्री आंटीच्या कोकलण्याचा आवाज आला तेव्हा. ती मुलांवर डाफरण्याचा आवाज खरंतर नीलच्या बाबाच्या कानावर आला होता. नीलच्या हाइकवर मेसेज येण्याची वाट पाहून अखेर बाबानेच त्याला ढोसलं. ``अरे वेडपटा, अभ्यास कसला करतोयस. तिकडे तुझ्या राज्यावर केवढं मोठं संकट आलंय बघ. त्या पोरांचा सुपरहीरो ना रे तू?'' 
आता आजच्या बवालला खरंच काही अर्थ नव्हता. अँग्री आंटी सी विंगपासून दूर राहात होती. तिचा सी विंगशी काही संबंधही नव्हता. बरं, नीलदादाने दम भरल्यापासून मुलांनी खेळताना इतरांना डिस्टर्ब होणार नाही, याची काळजी घ्यायला सुरुवातही केली होती. कोणी केकाटला की क्रिकेटमध्ये आउट, फुटबॉलमध्ये यलो कार्ड आणि कबड्डीत फाऊल धरायचं, असंच ठरवून टाकलं होतं सगळय़ांनी. हय़ा आंटी संध्याकाळच्या वेळी गार्डनमध्ये फेरी मारताना मुलांना शोधत होत्या. हल्ली मुलांचा आवाज नसतो, त्यांच्यावर ओरडायला मिळत नाही, म्हणून त्या नाराज होत्या. शिवाय जेव्हा जेव्हा मुलं दिसायची, तेव्हा तेव्हा ती आनंदी असायची, खेळणं बंद झालं म्हणून दुर्मुखलेली नसायची. त्यानेही त्यांना फारच वाईट वाटायला लागलं होतं. ही पोटदुखी असहय़ झाल्यानंतर त्यांनी एका मुलाच्या मागोमाग जाऊन मुलांची खेळण्याची जागा शोधून काढली होती आणि काय हा दंगा सुरू आहे, मुलांना मनाई केल्यानंतरही ती कशी खेळतायत, असा आरडाओरडा सुरू केला होता.
नीलला पाहिल्यावर मुलांच्या चेहर्यावर जरा हुरूप आला. पण, दादा आताही आपल्यावरच कावेल की काय, या विचाराने ती पुन्हा हिरमुसली. नील म्हणाला, ``आँटी, इतर कुणाची काही तक्रार नाही. मुलं काही त्रास देत नाहीयेत. वॉचमन अंकलचंही लक्ष आहे. खेळू दय़ा ना त्यांना. प्लीज.''
``नो नो, नो वे. मी आत्ताच्या आत्ता सेक्रेटरीकडे तक्रार करणार आहे. उच्छाद चाललाय नुसता.''

``कुणाचा उच्छाद? कसला उच्छाद?'' करडय़ा आवाजात प्रश्न आला. खडूस अंकल अपेक्षेप्रमाणे हजर झालेच होते. आता अँग्री आंटीला चेवच आला. ``थँक गॉड तुम्ही आलात? ही मुलं आता माझ्यावर हल्ला करतील की काय, असंच वाटत होतं मला,'' तिने सरळ सरळ थाप मारली, ``अहो, तुम्ही मुलांना सगळीकडे खेळायला बंदी केली होती ना. ही मुलं आता इथे येऊन खेळतायत. केवढा आवाज. केवढा आरडाओरडा. मी त्यांना सांगितलं की हे काही तुमचं खेळण्याचं मैदान नाही. पण, ती माझ्याच अंगावर धावून येतायत.''
``पण, मुलं इथे खेळणारच. हे प्लेग्राऊंडच आहे त्यांचं,'' खडूस अंकलनी हातातली पाटी सुलटी केली. क्रीडांगण असं लिहिलेली ती पाटी त्यांनी भिंतीवर लावायला घेतली आणि आश्चर्याने मुलं बेशुद्धच पडायची बाकी राहिली. खडूस अंकल शांतपणे पाटी लावता लावता म्हणाले, ``मुलांनी पॅसेजमध्ये, समोरच्या गार्डनमध्ये, लॉबीमध्ये, पार्किंगमध्ये धुडगूस घालू नये, यासाठी मी बंदी घातली होती. खेळताना ती स्वतःला आणि इतरांना हर्ट करत होती, त्रास देत होती, हे त्यांना समजणं महत्त्वाचं होतं. त्यांचा खेळच बंद केला तर खेळायचं कोणी? तुम्ही की मी? प्रत्येक बिल्डिंगच्या मागे अशा मोकळय़ा जागा आहेत. त्या साफ करून मुलांसाठी खेळायला दय़ायच्या, असं मॅनेजिंग कमिटीच्या मीटिंगमध्ये आम्हीच ठरवलं होतं आणि आम्हीच ही जागा साफ करून दिली होती. फक्त मुलं इथेही दंगा करतायत का, हे पाहण्यासाठी थांबलो होतो. त्यांना सांगितलं नव्हतं. आता इथे ऑफिशियली प्लेग्राऊंड आहे.''
लालबुंद चेहर्याने पाय आपटत जाणार्या अँग्री आंटींना खडूस काका म्हणाले, ``तुमच्या बिल्डिंगच्या मागे बैठय़ा खेळांसाठी शेड टाकणार आहोत आम्ही आणि ते खेळही सोसायटीच प्रोव्हाइड करणार आहे. तिथे फारसा आवाजाचा त्रास नाही होणार तुम्हाला. हो ना रे पोरांनो?''
सगळी पोरं एका सुरात `हो' म्हणून ओरडली आणि इतक्या दिवसांनी मुलांचा तो उत्फुल्ल आवाज ऐकून सगळय़ा सोसायटीतल्या मोठय़ा माणसांचा जीवही भांडय़ात पडला.

(पूर्वप्रसिद्धी : पासवर्ड, दिवाळी अंक २०१६; सर्व चित्रे : ऋजुता घाटे)



No comments:

Post a Comment