Monday, February 22, 2016

एक शून्य बाजीराव!

आम्ही संतापाने थरथरतच थिएटरात शिरलो...
दारावरच्या गुरखाछाप दिसणाऱ्या इसमाने आमच्या गबाळ्या वेषाकडे पाहून हा तंबू थिएटरवाला १५० रुपये तिकिटाच्या थेटरात कसा घुसतोय म्हणून पुणेकरांना लाजवेल इतक्या तुच्छतेने तिकिटाची पृच्छा केली आणि आम्ही (हपीसाच्या खर्चाने काढलेले) २०० रुपड्यांचे सोफाखुर्चीचे तिकीट दाखवले, तेव्हा ते खरे आहे की डुप्लिकेट हे सगळ्या दरवानांनी आणि नंतर म्यानेजरानेही दस्तुरखुद्द येऊन चेक केले, ही गोष्ट आमच्या काळजाला लागली, यात काही शंका नाही. पण, ही गोष्ट संतापाने थरथर व्हावी एवढी दिलावर घेण्याइतके आम्ही क्षुद्र मनोवृत्तीचे नाही. आमच्या कामामुळे आम्हाला ठिकठिकाणी वेषांतरे करावी लागतात, त्या आमच्या कौशल्याला मिळालेली ही पावतीच मानतो आम्ही. सिनेमातले तमाम खलनायक नाही का रस्त्यात एखाद्या माताभगिनीने पापी, चांडाळ, नीच, बलात्कारी असा उद्धार करत श्रीमुखात भडकावून दिली, तरी ती पावतीच मानून घेतात... त्यातलाच हा प्रकार. 
पाहा, पुन्हा सिनेमातलंच उदाहरण सुचलं आणि आमचा संताप पुन्हा अनावर झाला... मग त्या दिवशी तो किती झाला असेल याची तुम्हाला कल्पना नाही...
आमच्या संतापाला तो नतद्रष्ट सिनेमाच कारणीभूत होता, हे आता सांगायला हरकत नाही... आम्ही हपीसातून खास खर्च मंजूर करवून घेऊन (तिकीट प्लस ट्याक्सी मिळून २७२ रु. मात्र) या खास मोहिमेवर आलो होतो... सिनेमागृहाच्या दारात पोहोचताच आमची जी निराशा झाली ती आत प्रविष्ट होईपर्यंत घनघोर निराशेत रूपांतरित झाली...
सिनेमागृहाच्या दारात कोणत्या दृश्याची कल्पना केली होती आम्ही! 
थिएटराबाहेर कट्टर देशभक्त, इतिहासप्रेमी मरहट्ट्यांची गर्दी असेल... जोरजोराने घोषणा सुरू असतील... आत जाणाऱ्या प्रत्येकाला प्रेमाने (आठदहाजण मिळून एकाला प्रेमाने विचारतात तेव्हा त्याचा प्रेमातिरेकाने जो थरथराट होतो, तो पाहण्यायोग्य असतो) विचारतायत, तुम्ही कोणता सिनेमा पाहायला जाताय? त्यात आपल्या वीरपुरुषाची काय विटंबना केली आहे, आपल्या पूर्वजांचे काय चारित्र्यहनन केलं आहे, याची तुम्हाला जराही कल्पना नाही काय? असा घाणेरडा सिनेमा पाहून आपण कोणत्या अघोरी अभिव्यक्तीस्वातंत्र्याला उत्तेजन देत आहोत, याचा विचारही तुमच्या मनाला शिवला नाही काय? कुठे फेडाल हे पाप? साडेआठ फूट उंचीच्या, ७५ किलोची तलवार लिलया पेलणाऱ्या आणि ४१ लढाया जिंकलेल्या राऊंच्या ओजस्वी इतिहासावरचे हे छटेल शिंतोडे तुम्ही कसे काय सहन करत आहात? 
कुठाय तुमचा पुरुषार्थ? 
कुठाय तुमचा धर्माभिमान? 
कुठाय तुमचं ते हे? कुठाय तुमचं ते ते? 
बाजीरावभक्तांच्या या प्रश्नसरबत्तीपुढे हतबल होऊन प्रेक्षक स्वहस्ते तिकीट फाडत असेल आणि भोवतालच्या गर्दीत सहभागी होऊन राऊंच्या इतिहासाचे डोस येणाऱ्या नव्या गिऱ्हाइकाला पाजत असेल (एवढे पैसे मोजल्यानंतर तीन तास काहीतरी टाइमपास नको का), असं आम्हाला वाटलं होतं... पण, इथे अजबच दृश्य होतं...
थिएटरबाहेर तुफान गर्दी होतीच, पण ती हा सिनेमा चवीचवीने पाहणाऱ्यांची... 
जोरजोराने हाकारे सुरू होते... पण, ते गर्दीत आपल्या मित्रपरिवाराचं लक्ष वेधून घेण्यासाठी (त्यातून काही अपरिचितांचं लक्षही वेधलं जात होतं... अंगठ्यावर समोरच्याच्या बुटाचा जाड सोल पडला आणि अंगठा चिरडला की त्याला भलतीकडे लक्ष दिल्याचा पश्चात्ताप व्हायचा ते सोडा... अजून बँडेजातच आहे आमचा अंगठा...). लोक एकमेकांशी बोलत होते, ते सिनेमाबद्दलचे कौतुकोद्गार होते. ते ऐकून आमच्या कानात शिसं ओतलं जात असल्यासारखी भावना होत होती. 
आम्ही काही मंडळींशी संवाद साधून हा अनाचार थांबवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा दोनतीनजणांनी काढता पाय घेतला, काहींनी छुट्टा नही है, असं सांगितलं आणि एकाने (पैसा नहीं मिलेगा, असं सांगत) शेजारच्या स्टॉलवरून प्रेमाने वडापाव आणून दिला. असेल हा वडापाववाल्याच्या प्रमोशनचा भाग म्हणून आम्हीही तो तोंड पोळत असताना बकाणे भरभरून खाल्ला... नंतर त्याच्या त्या कृतीचा अर्थ उलगडल्यानंतर आम्ही शरमेने काळवंडणार तेवढ्यात लक्षात आले की ही तर आमच्या वेषांतर-कौशल्यालाच मिळालेली पावती. आम्ही संतापाने खदखदत आत शिरलो आणि विचार केला की आपल्या या वेषांतरात आपण दरवानालाही या सिनेमाच्या घातक परिणामांची माहिती सांगायला जाऊ, तर तो कदाचित तिकीट असूनही धक्के देत बाहेर काढेल. त्यापेक्षा थिएटरच्या अंधारात प्रबोधन केलेले बरे.
आम्ही आत शिरलो तेव्हा जाहिराती सुरू झाल्या होत्या. दिवे मालवले गेले होते. अंदाजाने ठेचकाळत, धडपडत आम्ही सीटवर जाऊन पोहोचलो आणि दोन्ही बाजूंनी दोन सुगंध आमच्या नाकात शिरले. आम्ही जातिवंत खबरी. आमचं नाकही तीक्ष्ण. क्षणार्धात आम्हाला कळलं की डावीकडून येणारा सुगंध हा मस्क प्रकारातला म्हणजे रांगडा मस्क्युलाइन आहे आणि उजवीकडून येणारा सुगंध हा फ्लोरल म्हणजे फुलांच्या सुगंधाजवळ जाणारा नाजुक गंध आहे. याचा अर्थ डावीकडे कोणीतरी पुरुष बसलाय आणि उजवीकडे महिला. आमचा कल लगेचच उजवीकडे झाला. तशी आमची विचारसरणीही तीच. त्यामुळे झुकाव तिकडेच. पण, झुकता झुकता एकदम खरखरीत दाढीच लागली गालाला, तेव्हा एकदम झटका बसल्यागत आम्ही सरळ झालो. मग सवय नसताना, आशा अमर असते म्हणून डावीकडे झुकू लागलो... तिथे गालाला गालाचा झुळझुळीत स्पर्श होतो ना होतो तोच एक जबरदस्त पंच गालावर बसला आणि तीन दातांनी स्थान सोडलं हे जीभ घोळवल्यावर लक्षात आलं. सीधे बैठो हा दोन्हीकडून आलेला आदेश आता शिरसावंद्य मानण्यावाचून गत्यंतर नव्हतं. 
ठणका थोडा कमी झाल्यानंतर आम्ही कसेबसे उद्गारलो, का असला घाणेरडा सिनेमा बघताय तुम्ही? 
घाणेरडा? ... डावीकडच्या मेरी कोमचा प्रश्न. 
तुमको कैसे मालूम? तुमने पयले देखा है क्या? ... उजवीकडच्या गुंड्याची पृच्छा. 
देखनेको कायकू पडता है... हम मराठी है... हमकू सब मालूम है ये गुज्जूभायने कैसा वाट लगायेला है हमारे वीर बाजीराव का? 
तुमको कैसे मालूम? तुम बाजीराव के साथ स्कूल जाते थे क्या? ... पुन्हा उजवीकडून प्रश्न. 
आम्हीही मर्द मराठ्याचे बच्चे. महाराज म्हणजे आमचा पंचप्राण. महाराष्ट्राचा त्यांच्यानंतरचाच इतिहास आम्हाला तोंडपाठ. यत्ता चौथी ते दहावीपर्यंत शिकलेला. आधीचं काही माहिती नसलं म्हणून काय झालं? आम्हीही बाणेदारपणे, त्वेषाने उत्तरलो, अरे म्हणजे काय, हमने भी इतिहास पढ्या है? 
कुठे वाचलात तुम्ही काका? ... डावीकडची मस्कसुगंधित कन्या... 
(काका? का का?) म्हणजे काय, शाळेत होता आम्हाला? झालंच तर ते आपलं ते हे, ते काय ते कोण ते इनामदार का काय होते, त्यांचं पुस्तकही वाचलंय आम्ही ... दिलं ठोकून आम्ही अंदाजपंचे. 
ना. सं. इनामदारांची राऊ वाचलीयेत का तुम्ही? त्यावरच आधारलाय हा सिनेमा ... डावी बाजू कुजबुजली. 
अहो, पण त्यात काय बाजीराव नाचताना दाखवलाय का? काशीबाई आणि मस्तानी एकत्र पिंगा खेळताना दाखवल्यात का? ... आमचा सात्विक संताप अनावर झाला की तोंडातले दात पडल्याच्या दु:खाचाही विसर पडतो आम्हाला. 
लेकिन वो नाचे नहीं, ऐसाभी तो लिखा नहीये ना इनामदार साबने? एक इतना बडा योद्धा इतनी लडाइया करने के बाद अपने जाँबाज सिपाहियों के साथ थोडा मस्ती करता है, तो आपको क्या परेशानी है?... उजवा शेजारी फार प्रश्न विचारतो बोवा. 
राव लढाईला गेल्यानंतर विरंगुळा म्हणून काशीबाई आणि मस्तानी आल्या एकत्र खेळायला तर तुमचं काय बिघडलं हो? ... डावा प्रश्न. 
अहो, पण इतिहासाला धरून नाहीये ते? ... आम्ही कळवळलो. 
ज्या राऊमधून तुम्ही इतिहास शिकलात, तीसुद्धा एक कादंबरी आहे, काल्पनिक, इतिहासाचा आधार घेऊन लिहिलेली, पण खराखुरा इतिहास नसलेली, आता मागच्या रांगेतून कोणीतरी कानाशी येऊन खसफसला, दाढी टोचली हो, उद्या कोणीतरी हा सिनेमा पाहील आणि त्यातून इतिहास शिकेल, तेव्हा कदाचित खऱ्या इतिहासाचं पुस्तक जाळतील लोक संतापून... सिनेमाबरहुकूम नाहीये म्हणून. 
या तिहेरी माऱ्याने आम्ही जेरीला आलो असताना अचानक सगळीकडून आवाज येऊ लागले, अरे गप्पा मारायच्यात तर बाहेर निघून जा, आम्हाला शांतपणे सिनेमा बघू द्या. 
काय करणार? आम्हीही तो अनैतिहासिक सिनेमा चवीने पाहात बसलो आणि पाहता पाहता गुंगलो. नाचरा बाजीराव आणि पिंगा घालणाऱ्या काशी-मस्तानी यांना पाहून उठून ओरडावेसे वाटेना, लोकांचा रसभंग करावासा वाटेना... इतकी सहिष्णुता दाटून आली की तब्येत बिघडली हे आम्ही समजून जातो... दातदुखीचा परिणाम असावा... सिनेमा संपल्यानंतर दिवे पेटले...
आमच्या डोस्क्यात दिवे पेटवणारे महानुभाव कोण, म्हणून डावीउजवीकडे पाहिले आणि मागेही नजर टाकली... आणि तीन ताड उडालोच...
डावीकडे साक्षात काशीबाई, उजवीकडे साक्षात बाजीराव आणि मागे होते साक्षात भन्साळी. 
आमचा वासलेला आ शून्यवत दिसत होता, असं नंतर डोअरकीपरने हाताला धरून बाहेर काढताना सांगितलं.

1 comment:

  1. दिवे मालवले गेले होते. अंदाजाने ठेचकाळत, धडपडत आम्ही सीटवर जाऊन पोहोचलो आणि दोन्ही बाजूंनी दोन सुगंध आमच्या नाकात शिरले. आम्ही जातिवंत खबरी. आमचं नाकही तीक्ष्ण. क्षणार्धात आम्हाला कळलं की डावीकडून येणारा सुगंध हा मस्क प्रकारातला म्हणजे रांगडा मस्क्युलाइन आहे आणि उजवीकडून येणारा सुगंध हा फ्लोरल म्हणजे फुलांच्या सुगंधाजवळ जाणारा नाजुक गंध आहे. याचा अर्थ डावीकडे कोणीतरी पुरुष बसलाय आणि उजवीकडे महिला. आमचा कल लगेचच उजवीकडे झाला. तशी आमची विचारसरणीही तीच. त्यामुळे झुकाव तिकडेच... लेखातील हे 'मनोगत' म्हणजे 

    ReplyDelete