Monday, February 22, 2016

जय फुल्या फुल्या! जय फुल्या फुल्या फुल्या!

‘नॉनसेन्स, सेक्युलर, पुरोगामी कुठले! आताच्या आता हे गलिच्छ भेंडोळं घेऊन दूर व्हा आमच्या नजरेसमोरून... नाहीतर, नाहीतर मी विचारवंत अशी शिवीही देईन तुम्हाला!’ 
संपादकांचा सात्विक संताप शिगेला पोहोचला होता. सकाळी सकाळीच शेठजींनी काही कारणाने तासलं असावं. 
‘पण, सर, तुम्ही इतके का भडकला आहात? माझ्या बातमीत एवढं आक्षेपार्ह काय वाटलं तुम्हाला?’ आम्ही चाचरत विचारलं. 
‘सिनीयर सहकारी तुम्ही आणि हे विचारताय? तुमच्यापेक्षा ती विनास्टायपेंडची राबणारी ट्रेनी मुलं परवडली, बातम्यांपेक्षा जाहिरातीच जास्त आणणारे आपले गावोगावचे रिपोर्टरही अधिक रिपोर्टिंग स्किल बाळगतात.’
‘असं कसं म्हणता सर, मी तर तुमचा बहिर्जी नाईक?’ इतर कसलाही उपाय राहिला नाही की भावनिक अस्मिता फुलवायची, हा आमचा नेहमीचा हुकमी फंडा. तो आताही लागू पडला. संपादकांचा पारा थोडा खाली उतरला आणि आपण महाराजच असल्याच्या थाटात ते सांगू लागले, ‘होय ना? मग तुम्हीच आमच्या अपेक्षांचा भंग कसे करता? जी बातमी सगळ्या वृत्तसंस्थांनी दिली आहे, तीच नुसती मराठीत अनुवादून आमच्याकडे कशी आणता? तुमची गुप्त कामगिरीची सुरसुरी... आय मीन ऊर्मी कुठे गेली? अपशब्दांमुळे नाटकावर बंदी या बातमीच्या मुळाशी तुम्ही का नाही गेलात? सेन्सॉर बोर्डाचं मत का नाही जाणून घेतलंत? आपल्याकडे खास बातमीचा फटाका का नाही फोडलात?’
आता भावनिक आवाहनाचा फंडा आम्हालाही लागू होतोच की... आमचेही बाहू लगेच फुरफुरू लागले, मनगटं शिवशिवू लागली. मागच्या खास बातमीसाठी खर्च केलेल्या रकमेची व्हाऊचरं अजून मंजूर झालेली नाहीत, याचा विसर पडला आणि खिशात किती चिल्लर उरली आहे, याचंही भान हरपून आम्ही तडक बातमीच्या शोधात रवाना झालो...
सेन्सॉर बोर्डाच्या कचेरीत आम्ही पोहोचलो आहोत, हे खिडकीतून अंगावर कचरा येऊन पडला, तेव्हा लक्षात आलं. अंगावर पडले ते सगळे शब्द होते. त्यातला एकही अंगाला चिकटू नये, अंगात मुरू नये आणि मुरून जिभेपर्यंत किंवा लिहित्या हातापर्यंत पोहोचू नये म्हणून आम्ही प्राणांतिक धडपड करून ते सगळे झटकले. आम्ही आत शिरतो न शिरतो तोच मागच्या पावली बाहेर पडत असलेल्या एका खादी झब्बाधारी, दाढीवाल्याशी टक्कर होता होता राहिली. त्याच्या अंगावर एक कागदांची चळत येऊन पडली... त्यातल्या पहिल्या पानावरच्या ‘श्री’नंतर फक्त व्यक्तिरेखांची नावं आणि कंस व कंसातली रंगसूचनांची वाक्यं शिल्लक उरली होती. बाकीचे सगळे शब्द तेच होते, जे मघा आमच्या अंगावर येऊन पडले होते. काही व्यक्तिरेखांची नावंही लोकांच्या भावना दुखावतील म्हणून बदलण्याची सूचना करण्यात आली आहे, असं काहीसं कानावर पडलं. तो नाटककार आपलं न-नाटक (आता त्यात उरलं तरी काय होतं) घेऊन बाहेर पडला. 
आम्ही थबकतच आत शिरलो.
‘काढा काढा, तुमचं बाड काढा. दिवसभर फक्त घाण उपसायचंच काम आहे आम्हाला,’ समोरचे नाट्यपरिनिरीक्षक (यापुढे आपण त्यांना सोयीसाठी नापनि म्हणूयात) जिवाजी कलमदान्याच्या आवेशात म्हणाले. 
‘नाही, आमच्याकडे कसलंही बाड नाही.’
‘धन्य, मग आता काय नाटक आमच्यापुढे एकपात्री करून दाखवणार आहात की अभिवाचन करणार आहात. कठीण आहे. अहो स्क्रिप्ट नसेल, तर सेन्सॉर काय करणार आम्ही. फुल्या फुल्या?’
हा फुल्याफुल्या चक्क उच्चारी होता. म्हणजे ते चक्क फुल्या फुल्या, असं जोशात म्हणाले होते. आम्ही ही संधी सोडली नाही. चेहऱ्यावर आमचं सराईत ओशाळवाणं, तेलकट हसू आणत म्हणालो, ‘साहेब, आपण चक्क फुल्या फुल्या असं म्हणालात?’
साहेब तुपकट हसत म्हणाले, ‘म्हणजे काय? नियम म्हणजे नियम. एकदा या खुर्चीत बसलं की आम्ही आमचं बोलणंही सेन्सॉर करतो जागच्या जागी. उगाच्या फुल्याफुल्यांमध्ये फुल्याफुल्या व्हायला नको.’ साहेबाने टाळीसाठी हात पुढे केला.
‘बरोबर आहे फुल्या फुल्या फुल्या फुल्या’ असं म्हणत आम्ही टाळी दिली तेव्हा साहेबाने आमच्या फुल्याफुल्यांचा अर्थ लावण्याची कोशीस सुरू केली. ती कामयाब होण्याच्या आतच साहेबांचं लक्ष वळवण्यासाठी आम्ही म्हणालो, ‘पण साहेब, बाहेर फार गोंधळ सुरू आहे. या सरकारप्रमाणे तुम्हीही असहिष्णु आहात, काहीही कापाकापी करू लागला आहात, असं म्हटलं जातंय.’
‘कोण बोलतो तो फुल्या फुल्या फुल्या फुल्या. आमच्या समोर येऊन बोला म्हणावं फुल्या फुल्या फुल्या फुल्या.’ साहेबाला रोखण्यासाठी आम्ही थेट मुद्द्याला हात घालायचं ठरवलं.
‘साहेब, आताच आपण एका नाटकात फार विचित्र बदल सुचवलेत. फार सामान्य शब्दांना आक्षेप घेतलात. म्हणजे तुम्ही गांडू..’
पुढचं काहीही ऐकून न घेता साहेबाने पेपरवेट, पेन, पेन्सिल, कान कोरायची काडी, दात कोरायची काडी, स्वत:चा चष्मा, तपासण्यासाठी आलेली तीन नाटकांची बाडं, कोरे कागद आणि नंतर नुसतेच हवेचे झोतही आमच्या दिशेने फेकून मारले. आमच्या व्यवसायदत्त कौशल्यामुळे आम्ही हा सगळा मारा चुकवला आणि थरथरत उभ्या असलेल्या साहेबाला म्हणालो, ‘अहो गांडू बगीचा हा शब्दही तुम्ही कापलाय, त्याबद्दल मी बोलत होतो.’
साहेब म्हणाले, ‘त्यात बोलण्यासारखं आहेच काय?’
‘साहेब, या नावाचा एक गाजलेला काव्यसंग्रह आहे दिवंगत ढसाळसाहेबांचा. त्याला राज्य सरकारने पुरस्कार दिला होता. फार नावाजला गेला होता तो.’ 
‘असेल ना, असेल. आम्ही कुठे नाही म्हणतोय. पण, म्हणून हे नाव असं चारचौघात उच्चारायचं का? आता तुम्ही माझ्यासमोर म्हणजे माझ्या एकट्यासमोर उच्चारलंत तर केवढा भयंकर प्रसंग ओढवला तुमच्यावर.’ 
बरोबर आहे, आम्ही मनात म्हणालो. साहेबांचा नेम भिकार आहे म्हणून. नाहीतर पेपरवेटाने आम्हाला पेपरांच्या श्रद्धांजलीच्या कॉलमात नेऊन बसवलंच असतं.
‘पण, साहेब. तुम्ही हिंस्त्र झालात, हा तुमचा दोष नाही का?’ त्यांच्यासमोर फेकण्यायोग्य काही उरलेलं नाही, हे लक्षात येताच आम्ही धीर केला.
‘अहो पण हा माझा मूळ स्वभाव आहे का? मी या देशाचा नागरिक आहे. मी जगातल्या सगळ्यात शांतताप्रिय, सहिष्णु धर्माचं पालन करतो. आताचं सोडा पण, माझी संस्कृती आणि परंपरा थोर आहे. आमचा इतिहास उज्वल आहे. आम्ही नैतिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या उन्नत आहोत. अशा माझ्यासारख्या माणसातलं जनावर जागं केलंत तुम्ही ते भयंकर शब्द उच्चारून आणि वर माझा दोष आहे म्हणून सांगताय फुल्या फुल्या फुल्या फुल्या. माझ्यासारख्या सत्शील माणसावर ही वेळ आणलीत. आता विचार करा. तुमच्या नाटकाला येणाऱ्या सगळ्या प्रेक्षकांची ही भावना झाली, तर तुम्ही शिल्लक राहाल का? तुमच्या भल्याचेच निर्णय घेतोय ना मी फुल्याफुल्या?’
‘ठीकाय गां... अं... तो शब्द नको. पण, खैरलांजी, रमाबाई नगर या शब्दांमध्ये नेमकी काय अडचण आहे, ते तरी सांगा.’
‘अहो काय दगड आहात की काय तुम्ही फुल्या फुल्या? हे सगळे शब्द वाईट स्मृती जाग्या करतात. तिथे जे घडलं ते लोकांना आठवतं. त्यांच्या मेंदूला आम्ही केलेली इस्त्री विस्कटते, त्यांना पुन्हा चुण्या पडू लागतात. त्यातून लोक सरकारद्रोही म्हणजे देशद्रोही, देवद्रोही, धर्मद्रोही बनू लागतात. हे असले घाणेरडे शब्द उच्चारायचे कशाला? आता ते जनरल अगदी जनरली कुत्रा म्हणाले कुणालातरी. आता जनरलच ते. त्यांना तसा अधिकार आहे. शेपूट हलवणारे खूप लोक पाहिले असणार त्यांनी. तर मग आपणही तीच आठवण काढायची आणि त्या ‘प्रेस्टिट्यूड’सारखा नितांतसुंदर शब्द निर्माण करणाऱ्या सत्पुरुषाच्या आत्म्याला नाहक यातना द्यायच्या, हे शोभतं का तुम्हा फुल्याफुल्याफुल्यांना?’
‘बरोबर आहे. बरोबर आहे. साहेब, सर्वसामान्य नागरिकांच्या मनावर दुष्परिणाम करणाऱ्या ज्या अपशब्दांची यादी तुम्ही काढली आहे, तिच्याबद्दल तुमचं अभिनंदन करण्यासाठीच आम्ही आज इथे आलो होतो. तुमच्या यादीतला एक शब्द आम्हाला फार पटला, पण तो तुम्ही यादीत कसा घातला, याबद्दल शंका होती. तिचं फक्त समाधान करा.’
‘कोणता शब्द?’
‘हिंदुत्व.’
यानंतर साहेबांच्या तोंडून इतक्या ‘फुल्याफुल्याफुल्याफुल्याफुल्याफुल्या’ बाहेर पडल्या की काही काळाने आमचा मेंदू भानामती केलेल्या कपड्यासारखा फुल्याफुल्यांनी भरेल, अशी धास्ती वाटून आम्ही हापिसाकडे धूम ठोकली...

No comments:

Post a Comment