Friday, January 13, 2012

कर्नाटकातले ‘तमस’नाटय़

भीष्म साहनींच्या ‘तमस’वर आधारित मालिका दूरदर्शनवर प्रसारित झाली त्या काळात फार मोठा गदारोळ झाला होता. विविध राजकीय, धार्मिक संघटनांनी तिला तीव्र विरोध दर्शवला होता. खटलेबाजी झाली होती. भारत-पाकिस्तान फाळणीवर आधारित ‘तमस’मध्ये धार्मिक भावना भडकावण्याचे भयंकर राजकारण कसे चालते, याचे विदारक दर्शन होते. त्यामुळे हाच मुख्य धंदा असलेल्या राजकीय-धार्मिक संघटनांचे पित्त खवळले होते. ‘तमस’मध्ये दाखविलेले चित्र अतिरंजित आणि कपोलकल्पित आहे, असा त्यांचा दावा होता. आपल्या धर्माचे लोक असा खोटेपणा करूच शकणार नाहीत, हे विपर्यस्त चित्रण आहे, असे धर्ममरतड उच्चरवाने सांगत होते.
 
‘तमस’ किती खरी होती आणि धर्मभावना चेतवण्याचे राजकारण किती किळसवाण्या स्तराला जाऊ शकते, याचे दर्शन सध्या कर्नाटकामध्ये घडते आहे. तेथे भारतीय जनता पक्षाची राजवट आहे. या पक्षाची राजवट म्हणजे ‘मिनी हिंदुराष्ट्र’ आणि ‘डुप्लिकेट रामराज्य’ मानण्याची तथाकथित विचारवंतांमध्येही फॅशन आली आहे. काँग्रेसचलित राज्यांपेक्षा भाजपशासित राज्यांनी विकासाच्या बाबतीत आघाडी घेतली आहे, हे मान्यच करायला हवे, असा त्यांचा सूर असतो. या राज्यांमध्ये जगण्याच्या अन्य संदर्भात काय घडते आहे, हे जणू पाहण्याची गरजच नाही. तिकडे मध्य प्रदेशात सगळय़ा राज्यातल्या विद्यार्थ्यांना एकसमयावच्छेदेकरून सूर्यनमस्कार घालायला लावून गिनीज बुकात जाण्याचे उपद्व्याप सुरू आहेत. इकडे कर्नाटकात भीष्म साहनींनाही सुचला नसता असा चित्तथरारक प्लॉट रचून पाकिस्तानी ध्वज फडकावण्याची कारस्थानं सुरू आहेत.
 
ही घटना शिंदगीची. एक जानेवारी रोजीची नववर्षाची पहिली पहाट तिथे उजाडली तीच तहसीलदार कार्यालयासमोर पाकिस्तानचा चाँदतारा फडकावत. आदल्या दिवशी सगळे नववर्षस्वागताच्या नशेत तर्र असताना समाजकंटकांनी हे ध्वजारोहण उरकून घेतले होते. झाले, नववर्षाचा पहिला दिवस तणाव घेऊन आला. कर्नाटकात भोचक ‘सनातन’गिरी करणा-या ‘पिंक पँटीज’फेम श्रीराम सेने नामक प्रखर हिंदुत्ववादी संघटनेच्या हातात आयते कोलितच मिळाले. या सेनेचा स्थानिक पदाधिकारी राकेश मठ याने लगेच तहसीलदार कार्यालयासमोर निषेध सभा घेतली. ‘देशद्रोही, गद्दार, पाकधार्जिण्या, मस्तवाल मुस्लिमां’नीच हे नीच कृत्य केले आहे, असा निकाल त्याने दिला आणि मग रीतसर रस्ते रोखून, राज्य परिवहन मंडळाच्या बसगाडय़ांवर दगडफेक करून पुढील दंगलकार्याचा शुभारंभ करण्यात आला.
 
त्यांच्या दुर्दैवाने भाजपचे सरकार असतानाही स्थानिक पोलिसांनी मात्र या विध्वंसनाटय़ाचे मूक प्रेक्षक होणं टाळलं आणि तातडीने कायदा-सुव्यवस्था स्थिती सुरळीत केली. मोर्चे, सभा, निषेधपर कार्यक्रम आणि धरणे आंदोलने वगैरे नाटकांवर बंदी घातली आणि खास पथक नेमून या घटनेचा सखोल तपास सुरू केला. या तपासात उघड झालेली माहिती धक्कादायक होती. ज्या राकेश मठ याने पाकिस्तानी ध्वजारोहणाच्या निषेधाचे आकांडतांडव सुरू केले होते, तो आणि त्याचे धर्माध साथीदार यांनीच पाकिस्तानी ध्वज फडकावण्याचे थोर कार्य केले होते. आपणच पाकिस्तानी ध्वज फडकवायचा, त्याचा आळ मुस्लिमांवर ढकलायचा आणि दंगल भडकवायची, असा या मर्कटसेनेचा डाव होता. तो त्यातून दंगल घडून आली की तिचा राजकीय वापर करून घ्यायचा, अशी ही योजना होती.
 
ती पोलिसांनी उधळली आणि दंगलीचे थंड डोक्याने पूर्वनियोजन करणाऱ्या सातजणांना ताब्यात घेतलं. यानंतर घडलेलं नाटय़ आणखी रोमहर्षक आहे. प्रखर हिंदवी बाण्याच्या या सैनिकांनी आपण केलेल्या दुष्कृत्याची जबाबदारी खरंतर ताठ मानेनं आणि अभिमानानं घ्यायला हवी होती. त्यांच्यासाठी ते महान धर्मकार्य होतं. पण, प्रत्यक्षात त्यांचं कट्टर हिंदुत्वाचं अवसान पोलिसी खाक्या अनुभवताच गळून पडलं आणि ‘ते आम्ही नव्हेतच’ असा टाहो त्यांनी फोडला. श्रीराम सेनेच्या विजापूर जिल्हा शाखेनं पत्रकार परिषद घेऊन हा कट राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं रचल्याचा आरोप केला. राज्यात सरकार भाजपचं. रा. स्व. संघ ही भाजपची मातृसंघटना. त्या संघटनेवर कारवाई करणं पोलिसांना शक्य नव्हतं म्हणून त्यांनी आपल्या निरपराध कार्यकर्त्यांना त्यात गोवलं, असा दावा या पत्रकार परिषदेत करण्यात आला. पुराव्यादाखल काही फोटोही वाटण्यात आले. संघाचा ‘स’सुद्धा तपासात उघड होता कामा नये, असा दबाव पोलिसांवर होता, असं श्रीराम सेनेचं म्हणणं आहे.
 
पोलिस मात्र वेगळीच कथा सांगतायत. जिल्ह्यातलं धार्मिक वातावरण ढवळून निघावं, कलुषित व्हावं आणि त्यातून धर्माच्या आधारावर मतदारांचं धृवीकरण करता यावं यासाठी स्थानिक आमदारानंच हा कट रचला होता, असा पोलिसांचा दावा आहे. हा आमदार भाजपचा आहे, हे सांगायला नकोच. भाजप-संघ-श्रीराम सेने या सगळय़ांमधलं जैविक नातं पाहता, हे सगळं कारस्थान एकदिलानं, संगनमतानं पार पाडलं गेलं असणार, याबद्दलही शंका नाही.
 
आपल्याच धर्माची विटंबना करून चिथावणी देणारे पुढारी, शहरात दंगल पेटवून तिचा राजकीय उपयोग करून घेणारे लोकप्रतिनिधी, धर्म आणि श्रद्धांचे बाजार मांडणा-या संघटना घेट्टो मानसिकता रुजवतात, मुरवतात. त्यातून आपल्या परिसराचं आणि पर्यावरणाचं एकरेषीय आणि एकमितीय सोपं आकलन करून घेण्याची घातक सवय लागते आणि हळुहळू आपल्या भावना-श्रद्धा फिल्मी आणि सदादुख-या हुळहुळय़ा होत जातात. मग कोणाही फुटकळ पुढा-यानं अवमान, अवमान म्हणून कांगावा करून अन्य समाजाकडे बोट दाखवलं की मागचापुढचा विचार न करता सामान्य माणूस वेडापिसा होऊन आपल्यासारख्याच दुस-या सामान्य माणसावर तुटून पडतो. ओळखदेख नसताना, त्याचा अपराध ठाऊक नसताना थेट त्याचा कोथळा काढण्याइतका किंवा उभा जाळण्याइतका नृशंस बनून जातो. हा सगळा बनावच होता, हे समजल्यानंतर पश्चात्तापदग्ध होऊन उपयोग काय? हा खेळ कधीतरी थांबायला हवा.
 
या सगळय़ा कथा-कादंब-या-चित्रपटांमधल्या अतिशयोक्त व्यक्तिरेखा वाटतात. पण, त्या प्रत्यक्षात कशा अवतरतात आणि आपल्या आसपास कशा साळसूदपणे वावरतात, याचं शहारा आणणारं दर्शन शिंदगीवासीयांना झालं असेल. धर्म आणि कर्म यांची किती गल्लत करायची आणि साप साप म्हणून भुई धोपटणा-या पुढा-यांच्या किती मागे जायचं, याचा धडा विजापूरचे मतदार आता शिकले असतील, अशी आशा करायला हरकत नाही.
 श्रीराम सेनेच्या गणंगांना विजापूर जिल्हा कारागृहातल्या कैद्यांनीच हा धडा शिकवला. राकेश मठ आणि त्याच्या सहा साथीदारांनी देशद्रोही कारवाया केल्या म्हणून या तुरुंगातल्या काही कैद्यांनीच या सातजणांना बेदम चोपून काढलं. शेवटची बातमी हाती आली तेव्हा या सातजणांची रवानगी बळ्ळारीच्या कारागृहात करण्यात आली होती.

(चित्र : प्रदीप म्हापसेकर)
(ताजा कलम, प्रहार, १३ जानेवारी, २०१२)

1 comment: