Sunday, October 30, 2011

निरर्थक, मंगलमय शुभेच्छा

हार्दिक शुभेच्छा..


मन:पूर्वक शुभेच्छा..
 
मनापासून शुभेच्छा..
 
तेजोमय शुभेच्छा..
 
मंगलमय शुभेच्छा..
  
लक्ष्मीपूजनानंतरची सकाळ फटफटल्यावर धुरकट आसमंतातून सर्वदूर पसरलेला फटाक्यांच्या जळकट अवशेषांचा खच दिसावा, तसा आसपास शुभेच्छांचा खच पडलाय.. मोबाइलवर, एसेमेसमधून, भेटवस्तूंवरच्या मजकुरातून, ग्रीटिंगांतून. कोणा एकासाठी नाही, तर सगळ्यांकडून सगळ्यांसाठी.. कुठे शब्द वेगळे, साधनं वेगळी, व्यक्त होण्याची माध्यमं वेगळी. भले सणाचं रिच्युअल म्हणून नाकं मुरडली तरी माणसं एकमेकांना मन:पूर्वक, हार्दिक वगैरे शुभेच्छा देतायत ही अतीव आनंदाची गोष्ट म्हणायला हवी.
 
काय शुभेच्छा देतात लोक एकमेकांना?
 त्या दिवसापासून सुरू होणारं पुढील वर्ष आनंदाचं, सुख-समाधानाचं, आयुरारोग्यसंपन्न भरभराटीचं जावो, अशी मंगलमय कामना करतात लोक एकमेकांसाठी. किती सुंदर गोष्ट. एकमेकांचे पाय ओढण्याच्या, स्वत:पुरतं पाहण्याच्या आजच्या काळात (असा काळ कोणत्या काळात ‘आज’चा नव्हता, हा संशोधनाचा विषय ठरेल म्हणा, पण तरीही) माणसं एकमेकांच्या भल्याची कामना करतात, ही किती मौलिक गोष्ट आहे. शिवाय या शुभेच्छा देताना माणसं एकमेकांचं वय, व्यवसाय, आर्थिक स्तर, सामाजिक स्तर, जात, उपजात, लिंग इतकंच काय धर्म देखील पाहात नाहीत, हे धर्मजातपंथांनी बुजबुजलेल्या भारतवर्षात एक मोठंच आश्चर्य. समोर येणारा ओळखीचा-निमओळखीचा-बिनओळखीचा असला तरी त्याला पाहताच ओठावर हास्य फुलतं, हात आपोआप हस्तांदोलनासाठी किंवा आपल्या ओंजळीत समोरच्याचे हात घेण्यासाठी पुढे होतात आणि हसूभरल्या विस्फारित तोंडातून साखरपाकात घोळल्यासारखे शब्द उमटतात, ‘हॅपी दिवाली.. शुभ दीपावली.. दीपावलीच्या शुभेच्छा.’ यात बदल फक्त सणाच्या नावाचा. सण बदलला की ‘हॅपी’च्या पुढचं सणाचं नाव बदलतं, पण, मायना आणि भावना त्याच राहतात.. हितचिंतनाच्या, शुभचिंतनाच्या.
मग प्रश्न असा पडतो की आपण सगळे एकमेकांचे ओळखीचे-निमओळखीचे-बिनओळखीचे भरघोस शुभचिंतक आहोत, तर मग एक समाज म्हणून आपला उत्कर्ष का बुवा असा रडत खडत चाललाय? तो एकदिलानं, एकमुखानं का नाही होत झरझर? आता राष्ट्रीय किंवा राज्यीय किंवा भाषक अस्मितेच्या आधारे ‘पाऊल पडते पुढे’चं सरकारी अनुबोधपटातलं प्रगतीचं गाणं गाऊ नका. ते गाणं सुमारे 60 वर्ष गातायत सगळे आणि पाऊल जिथल्या तिथेच घोळतंय. सरकारी आकडेवारीतल्या विकासाच्या दराबिराकडे लक्ष वेधू नका किंवा डिफेन्सिव्हवर जाऊन एकदम जागतिक मंदीचं कारणही सांगू नका. कारण, आपल्या देशाच्या विकासाचा उधळलेला वारू जेव्हा 2000 साली महासत्ता बनण्याच्या दिशेनं बेफाम दौडत होता, तेव्हा तरी परस्परांच्या सगळय़ा शुभचिंतकांचा समान विकास कुठे होत होता? समृद्धीची ओंगळ बेटं वाढली किंवा अब्जाधीशांची संख्या वाढली म्हणजे सगळय़ा समाजाचा उत्कर्ष झाला, असं होत नाही.
 
आता हा अर्थकारणाचा फारच अवघड आणि क्लिष्ट विषय सुरू करून त्या निबीड अरण्यात वाट हरवण्याआधीच आपण परत फिरूयात आणि मूळ प्रश्न थोडय़ा वेगळ्या पद्धतीनं पाहूयात.. तो अधिक थेटपणे विचारूयात.
 आपण वेळोवेळी तोंडभरून एकमेकांना वर्षातून इतक्या वेळा एकमेकांना एवढय़ा शुभेच्छा देतो खऱ्या, पण, आपण खरोखरच एकमेकांचे शुभचिंतक आहोत का?
हा काय प्रश्न झाला? एकमेकांविषयी प्रेम, आस्था, जिव्हाळा, स्नेहभाव असल्याखेरीज का लोक एकमेकांना एक पैसा ते एक रुपया एसेमेस या दरानं पदरमोड करून शुभेच्छा देतात?
 करेक्टाय. तुमचं म्हणणं एकदम करेक्टाय.
पण, मग आपण एकमेकांना शुभेच्छा देतो त्या एकदम जबाबदारीविहीनच नसतात का? म्हणजे, पुढचं वर्ष तुम्हाला भरभराटीचं जावो. ते तुमचं तुमचं तुमच्या मेहनतीनं किंवा इकडेतिकडे हात मारून जावो, त्यात आपला संबंध काय नाय.
तुम्हाला आनंद लाभो, सुख लाभो, समाधान लाभो, शांती लाभो.. ती तुमची तुम्हाला तुमच्या कर्मानं लाभो, आमचा संबंध शुभेच्छा देण्यापलीकडे काय नाय.तुम्ही म्हणाल, कमाल झाली. शुभेच्छा म्हणजे फक्त भावना. ती चांगली असली म्हणजे झालं.
पण, मग आम्ही म्हणू कृतीविना भावना म्हणजे वाळूतलं निसर्गक्रियाकर्म.. ना फेस ना पाणी. मी तुमच्यासाठी काहीच करणार नाही, तुमचं तुमचं भलं होवो, ही शुभेच्छा म्हणजे अंधश्रद्धाच झाली.
मग काय करायचं?
आपण दुस-याला सुखी, समाधानी, आनंदी, शांत, समृद्ध वगैरे करण्यात काही मदत करू शकत असलो, तर ती केली पाहिजे. त्यासाठी आपल्याला आधी
आपल्याबरोबरच इतरांचा विचार करता आला पाहिजे. सगळय़ांचा उत्कर्ष एकमेकांना बरोबर घेऊनच होऊ शकतो, हे आपल्याला मान्य आहे का?
कठीण आहे. इथे प्रत्येकाला स्वत:च्या सुखाची गॅरंटी देता येत नाही, तिथे दुस-याच्या समाधानाचा हवाला कोण देणार?
मग उगाच बडबोल्या ऐसपैस शुभेच्छा कशाला द्यायच्या? आपण प्रॅक्टिकल शुभेच्छा देऊयात एकमेकांना.
म्हणजे असं की सकाळी स्टेशन गाठण्यासाठी रिक्षा पकडल्यावर रिक्षावाल्यानं प्रवाशांना शुभेच्छा द्याव्यात, तुमचा प्रवास सुखाचा होवो. आता यात रिक्षा वायुवेगानं न चालवण्याची, खड्डय़ात न घालण्याची, मीटर फास्ट ठेवून प्रवाशांना न गंडवण्याची जबाबदारी रिक्षावाल्याला पार पाडावी लागणार.
ट्रेनमध्ये प्रवाशांनी एकमेकांना शुभेच्छा द्याव्यात की तुमचा प्रवास सुखाचा, शांत होवो. मग मोबाइलवर कर्कश्श गाणी न लावण्याची, छप्परफाडू आवाजात फोनवर किंवा मित्रांशी गप्पा न छाटण्याची, पत्ते न खेळण्याची, भजनं गाऊन डबा डोक्यावर न घेण्याची जबाबदारी एकमेकांवर येईल.
स्टेशनांवर गाडी थांबेल तेव्हा फलाटावरच्या आणि ट्रेनमधल्या प्रवाशांनी एकमेकांना शुभेच्छा द्याव्यात. म्हणजे चढता-उतरताना धक्के लागून जीव जाण्यापर्यंतचे प्रकार, भांडणं, मारामाऱ्या टळतील.
राजकीय पुढा-यांनी जनतेला शुभेच्छा द्यायच्या की तुमचं शहर सुंदर स्वच्छ राहो. म्हणजे गल्लोगल्ली, रस्त्यारस्त्यावर, हरएक चौकात गलिच्छ, बीभत्स, ओंगळ, किळसवाणी होर्डिग न लावण्याची जबाबदारी त्यांच्यावर येईल.
 
शहरातल्या सगळ्या लोकांनी एकमेकांना शुभेच्छा द्यायच्या की कोणताही रोग न होता तुमचं संपूर्ण आयुष्य तुम्हाला ठणठणीत जगता यावं. म्हणजे मग जागोजाग थुंकून, बेडके टाकून रोगाणूंचा फैलाव न करण्याची जबाबदारी सर्वावर येईल.



जमेल का अशा सार्थ शुभेच्छा द्यायला?
 अवघड आहे ना? त्यापेक्षा आपण नेहमीसारख्या निर्थक, मंगलमय शुभेच्छाच दिलेल्या ब-या.. ..बिलेटेड हॅपी दिवाळी!!!
 

2 comments:

  1. सुश्रुत कुलकर्णीOctober 31, 2011 at 5:57 AM

    वा ! अनेकांच्या मनातल्या विचारांना तुम्ही शब्दरुप दिलेत !

    ReplyDelete
  2. फार फार मनातलं लिहिलंत हो तुम्ही....

    तुम्हाला असं वाटत नाही कां की आपल्याला हे असंच द्व्यर्थी वागायला शिकवताहेत सगळे.. (सगळे म्हणजे आपल्या आसपासचे सगळे त्यांत आले)..

    देवापुढे, मंदिरात, बुवा-बायांपुढे, अगदी पोथ्यापुराणे वाचतानासुद्धा आपण किती लीनदीन होऊन गेलेलो असतो, आतून-बाहेरून पुरेपूर सात्विकतेने गदगद् होऊन गेलेलो असतो आणि त्या सगळ्याकडे पाठ फिरताक्षणी आपण पुन्हा "आपण" झालेलो असतो -- या "आपण'चा मगाच्या (सात्विक, सज्जन वगैरे वगैरे..) आपणांशी काहीही संबंध नसलेला. गंमत म्हणजे ही क्रिया प्रत्येकाबाबत समान आहे.

    जे शब्द ऐकायला आपण गेलेलो असतो, त्यांचे आपल्या आचाराशी काही नातेच जडलेले नसते, तर ते आपल्या वर्तनातून येणार कसे बाहेर?

    मग सुरू होतो मुखवट्यांचा खेळ... शुभेच्छा देण्याचा आणि घेण्याचा....

    असो !

    मनांत असो, नसो, खेळ तर खेळावाच लागतो. सुटका आहे काय त्यातून?

    सुलभा

    ReplyDelete