Friday, February 15, 2013

अनंतकाळची रद्दी




वर्तमानपत्र हा क्षणाचा पेपर आहे आणि अनंतकाळची रद्दी आहे, असं कुणीतरी कुठेतरी म्हणाल्याची बातमी वार्‍याच्या वेगाने पसरली आणि ती कानी जाताच अनेक मराठी वर्तमानपत्रांचे मालक अतिशय संतापले. कोणत्याही कारणाने (उदा. नातवंडाने अंगावर सुसु केली, घरच्या कुत्र्याने प्रेमाच्या भरात टाय फाडला, नोकराने डाव्या बुटाच्या टाचेकडच्या दीड सेंटीमीटर भागाला पॉलिश केले नाही इ.) संतापल्यावर ते नेहमी जे करतात, तेच त्यांनी आताही केलं. आपापल्या पेपरच्या संपादकांना फोन करून झाप झाप झापलं. मालक आपल्याला का झापतायत, याची संपादकांना कल्पना नव्हती, पण तशी (म्हणजे झापलं जाण्याची नव्हे, तर झापलं का जातंय याचं कारण ठाऊक असण्याची) सवयच नसल्यामुळे त्यांना काही प्रॉब्लेम आला नाही. संभाषण झाल्यावर, म्हणजे यांनी इकडून हात बांधून ‘जी सर, नाही सर, हो सर, बरोबर सर, पाहतो सर, करतो सर, थँक्यू सर’ म्हणून झाल्यानंतर संपादकांनाही संताप आला. संताप आल्यावर ते जे करतात, तेच त्यांनीही केलं. म्हणजे, वरिष्ठ साहायक संपादकांपासून मुख्य उपसंपादक, मुख्य वार्ताहरांपर्यंत साताठदहाजणांना त्यांनी भल्या सकाळी फोन करून झापलं. त्या सर्वांनीही त्यांच्या वाटणीचं ‘जी सर, नाही सर, हो सर, बरोबर सर, पाहतो सर, करतो सर, थँक्यू सर’ म्हणून झाल्यानंतर आपल्या हाताखालच्या बारापंधरासतराजणांना मेमो देऊन टाकले.
 साधारणपणे एवढ्यावर हा प्रश्‍न सुटायला हरकत नव्हती... कारण, वर्तमानपत्राच्या जगातला कोणताही संपादकीय कामकाजाशी संबंधित प्रश्‍न एवढं केल्यानंतर सहसा सुटतोच.
 मागे एका प्रमुख वर्तमानपत्राने पहिल्याच पानावर शंभर पॉइंटांची हेडलाइन ‘पंतप्रधानांची तंबी’ अशी छापण्याऐवजी ‘तंबी’मध्ये पदरचा एक काना वाढवून छापल्याने पंतप्रधानांचे जे काही ‘कुटुंबकल्याण’ झाले, तेव्हाही एवढ्याच कारवाईत ‘मॅटर सॉल्व्ह’ झाले होते... आणखी एका वर्तमानपत्रात ‘पंतप्रधानांच्या विरोधात 24 खासदार’ या बातमीच्या शीर्षकाला आनंदीबाईची बाधा होऊन ‘वि’ चा ‘नि’ झाला आणि पंतप्रधानांची अचाट कार्यशक्ती पाहून विरोधक भूस्खलित आणि वाचक गर्भगळित झाले होते. तेव्हाही कुणाची नोकरी गेली नव्हती. कारण, त्या अतिशय किरकोळ संपादकीय चुका होत्या. वर्तमानपत्रांनी सर्व प्रकारे प्रयत्न करूनही पेपर वाचण्याची खोड न गेलेले काही तुरळक, फुटकळ, नाठाळ वाचक सोडले, तर त्या कुणाच्या लक्षातही आल्या नव्हत्या.
 पण, या वेळची परिस्थिती तितकी साधी नव्हती, भलतीच गंभीर होती.
 म्हणजे मागे एका वर्तमानपत्रात चुकून चार ओळींची क्लासिफाईड जाहिरात मागे ठेवली गेली आणि त्या जागी चक्क एक महत्वाची बातमी लावली गेली, तेव्हा जो काही भयंकर गोंधळ झाला होता, त्यात एक सब एडिटर, एक चीफ सब, एक पेज डिझायनर आणि न्यूज एडिटर एवढ्यांची नोकरी गेली होती. सर्व जाहिरातींचे प्रूफरीडिंग स्वतः करून देईन आणि त्या पानात लावून घेतल्याखेरीज ऑफिस सोडणार नाही, असं लेखी दिल्यानंतरच संपादकाची नोकरी बचावली होती. त्यानंतरही त्या पेपरात एकदा एका उद्दाम सबड्याने (म्हणजे सब एडिटराने) एका जाहिरातदाराची वशिल्याची बातमी 17 ओळी छापायची ठरलेली असताना साडे सोळा ओळीच छापली, तेव्हा मॅनेजमेंटने संपादकांची उचलबांगडी केलीच (सध्या ते एका पेपरात प्रूफरीडिंग विभागाचे प्रमुख आहेत. विभागात एकच माणूस- म्हणजे तेच आहेत आणि टेंडर नोटिसांची भाषांतरं करणं हे त्यांचं मुख्य काम आहे). नंतर आलेल्या संपादकाच्या पदामध्ये बदल करून ‘संपादकीय प्रमुख, भोंगळ गल्ली मार्केट’ असं नामकरण करून आपल्याला नेमक्या काय कामासाठी नेमलंय याची व्यवस्थापनाने त्यांना जाणीव करून दिली.
ही उदाहरणं सांगण्याचं कारण म्हणजे ‘क्षणाचा पेपर, अनंतकाळची रद्दी’चा प्रसंग या प्रसंगांइतकाच किंबहुना त्यांच्याहूनही अधिक गंभीर होता. यानिमित्ताने मालकांपासून शिपायांपर्यंत सर्वांनी आपापले पेपर (अनेकांनी आयुष्यात प्रथमच) संपूर्णपणे वाचून काढले होते, म्हणजे पाहा किती गंभीर प्रश्‍न होता ते. ठिकठिकाणी वरिष्ठांच्या बैठका बोलावल्या गेल्या. सगळ्या वर्तमानपत्रसृष्टीत या एकाच विषयाची चर्चा होती. सर्वांच्या मुखी एकच प्रश्‍न होता, असं झालंच कसं? जागतिक मठ्ठीकरणाचा अश्‍वमेध रोखण्याचं धार्ष्ट्य केलं तरी कुणी? कोण आहेत हे गद्दार? कोण फासताहेत पत्रकारितेच्या पवित्र पेशाला काळिमा? ‘अनंत काळची रद्दी’ छापण्याचा अघोषित, अलिखित पण सर्वमान्य निर्णय झालेला असताना क्षणाचा (का होईना) पेपर काढण्याचा अगोचरपणा केला तरी कुणी?
**********
 ‘‘तुम्ही मला सांगा गोंधळेकर, आपलं धोरण काय आहे?’’ एक मालक- ज्यांना लोक शेठजी म्हणत- कडाडले.
 ‘‘र..र..र..र..रद्दी छापण्याचं, सर.’’ गोंधळेकर चाचरत बोलले.
 ‘‘आपला पेपर लोक का घेतात?’’
 ‘‘रद्दीत चांगला भाव मिळतो म्हणून!’’
 ‘‘करेक्ट, तुम्हाला ठाऊक आहे ना की तेच आपलं खास वैशिष्ट्य आहे,’’ एवढ्या संतप्त स्थितीतही मालकांच्या चेहर्‍यावर कौतुक दाटलं, ‘‘तुम्हाला ठाऊक आहे गोंधळेकर, आपण किती ऍग्रेसिव्ह मार्केटिंग करतो आपल्या पेपरच्या या खास वैशिष्ट्याचं...’’ त्यांच्या डोळ्यासमोर स्वतःच्या पेपराची जाहिरात तरळू लागली... एक रद्दीवाल्याचं दुकान. इतर पेपर घेणारे मरतुकडे, थकले भागलेले, दाढ्या वाढलेले, कळकट कपड्यांतले, डोळे खोल गेलेले, निराश चेहर्‍यांचे लोक रद्दीच्या वजनकाट्यावर छोटा, पिवळट कागदांचा एका महिन्याच्या रद्दीचा एकेक गठ्ठा आणून टाकतायत आणि काटा काही जागचा हलत नाही. पाच सात मरतुकड्या पेपरांचे गठ्ठे पडल्यानंतरही काटा निपचीत पडलेला असताना एक देखणा, बलदंड, आरोग्यसंपन्न, सुस्थितीतला, चांगल्या कपड्यांतला इसम खांद्यावर पेपरांचा पांढराशुभ्र गठ्ठा घेऊन डौलानं चालत येतो आणि त्याने दुसर्‍या पारड्यात तो गठ्ठा टाकल्याबरोब्बर मरतुकड्या पेपरांचं पारडं खाड्कन् वर उचललं जातं. त्याबरोब्बर मरतुकड्या पेपरांचे गठ्ठे आकाशात उंच भिरकावले जातात. मरतुकड्या माणसांवर त्यांच्याच पेपरांच्या पिवळ्या घाणेरड्या पानांचा वर्षाव होत असताना त्यांच्या चेहर्‍यावर ‘भला उस की रद्दी मेरे रद्दी से ज्यादा कैसे’ असा भाव दिसतो. यांच्या पेपरचा ग्राहक मिशीला पीळ देत रद्दीवाल्याकडून नोटांची भली मोठी थप्पी हसत हसत उचलतो... ‘एक किलो रद्दीच्या किंमतीत मिळवा तीस किलो रद्दी!’ ही त्यांच्या सहा महिन्यांच्या स्वागतमूल्याच्या स्कीमची कॅचलाइनच होती. काय तुङ्गान रिस्पॉन्स मिळाला त्यामुळे त्यांच्या पेपरला!
 आता रोज सकाळी हा पेपर घरी आला की सराईत ग्राहक पेपर हातावर तोलून लगेच पेपरवाल्यावर कातावतात, ‘‘काय रे, आजच्या पेपरातली बोकडआळी विशेष सप्लीमेंट टाकली नाहीस की काय?’’
 पेपरवाला साळसूदपणे म्हणतो, ‘‘राहिली असेल चुकून. हवी तर देतो आणून मागाहून. पण, त्या पुरवणीत कुठे काय असतं वाचायला? नुसत्या जाहिरातीच तर असतात.’’
 ‘‘त्याच्याशी तुला काय करायचंय?’’ पेपरचा ग्राहक लगेच डाफरतो, ‘‘तुझ्या चलाखीमुळे माझं रोज सव्वाशे ग्रॅमचं नुकसान होतं ना! रोजचे सव्वाशे ग्रॅम म्हणजे दहा दिवसांचे सव्वा किलो, महिन्याचे पावणेचार किलो, म्हणजे मला दरमहा अडतीस रुपयांचा ङ्गटका आणि तुझा तेवढाच फायदा!’’
 विक्रेता दुसर्‍या दिवशीपासून व्यवस्थित पुरवणी टाकायला लागतो. त्याचंही तसं ङ्गारसं नुकसान होत नसतं म्हणा. कारण, त्याच्या लाइनवरच्या हजार पेपरांपैकी सातशे पेपर तर त्याने स्वतःच बुक केलेले असतात खोट्या नावांनी. इकडे गठ्ठा उतरवून घेतला की तिकडून तो तसाच दुसर्‍या गाडीत चढवायचा आणि होलसेल रद्दीवाल्याकडे पळवायचा. पुढे तर त्याने पेपरच्या गाडीवाल्याशी सेटिंग करून पेपर थेट रद्दीवाल्याकडेच उतरवण्याची व्यवस्था करवून घेतली. या पेपराच्या बळावर नुकत्याच खरेदी केलेल्या मोटारीवर त्याने ‘रद्दीआई प्रसन्न’ असं लिहूनही घेतलंय म्हणे...
*************
 ‘‘मिस्टर भोपळे, यू मस्ट अंडरस्टँड, वुई आर मेकिंग डिफरन्स इन द लाइव्हज ऑफ लॅक्स अँड लॅक्स ऑफ रीडर्स. आपण त्यांना तुमचे ते बोगस विचार बिचार देत नाही आहोत. वुई आर नॉट वेस्टिंग देअर प्रेशस टाइम बाय गिव्हिंग देम व्हॅल्युएबल इनफर्मेशन ऑल्सो; आपण त्यांना थेट पैसे देतोय, रियल मनी, डॅम इट!’’ दुसर्‍या पेपरचे मॅनेजिंग एडिटर तिथल्या संपादकांना पाठ असलेलं धोरण नव्याने समजावून सांगत होते. मॅनेजिंग एडिटर हे एमबीए झालेले असल्यामुळे त्यांना कोणत्याही वाक्यात दहा इंग्रजी शब्द वापरणं मस्ट होतं. तेच त्यांनी पेपरातही राबवलं होतं. पेपरग्राहकांची नवी पिढीही इंग्रजी माध्यमात शिकणारी असल्यामुळे त्यांनाही त्यात काही प्रॉब्लेम वाटत नव्हता. त्यामुळे आता या पेपरचा लौकिक ‘मराठीत छापून येणारा एकमेव इंग्रजी पेपर’ असा लौकिक झाला होता, त्याचाही त्यांना भयंकर अभिमान होता. ‘‘मिस्टर भोपळे, विचार करा, आतापर्यंत मराठी पेपरांची किती कमी रद्दी पडायची? महिन्याला जेमतेम पाच किलो. हार्डली फिफटी रुपीज वर्थ ऑफ द रद्दी. तेही दर महिन्याला 100 रुपये पेपरखरेदीसाठी खर्च करून! हू विल ऍक्सेप्ट सच अ नॉन्सेन्स डील? आता आपण त्यांच्या लाइङ्गमध्ये चेंज आणलाय. आपण त्यांना ऍस्पिरेशन्स देतो आहोत, पावणेदोन रुपये खर्चात मंथली दहा किलो रद्दी देतो आहोत... पावणेदोन रुपयांत शंभर रुपयांची रद्दी! जस्ट इमॅजिन! या पैशातून त्यांची किती स्वप्नं पूर्ण होणार आहेत, त्यांच्या घरात किती वस्तू येणार आहेत. वस्तू म्हणजेच आनंद. म्हणजे आपण लोकांच्या लाइफमध्ये किती आनंद निर्माण करतो आहोत...’’
 लोकांच्या आयुष्याचं माहिती नव्हतं, पण भोपळेंच्या आयुष्यात खरोखरच आनंद फुलला होता. त्यांचं टुमदार बंगल्याचं स्वप्न पूर्ण होण्याच्या बेताला होतं. सर्क्युलेशन विभागप्रमुखांना हाताशी धरून त्यांनी आपल्या पेपरच्या रोज 100 कॉप्या मिळवण्याची व्यवस्था केली होती. त्यातून विकत घेतलेल्या बंगल्याची रचनाही त्यांनी (बहुदा मुकेश अंबानींच्या अँटिलिया इमारतीकडून प्रेरणा घेऊन) रद्दीचे एकावर एक गठ्ठे ठेवल्यासारखी केली होती...
***********
 ...‘‘हे बघा पोरमारे...’’ तिसर्‍या पेपराचे मालक कम व्यवस्थापकीय संपादक बोलू लागले. हे सत्ताधारी पक्षाचे पुढारीही होते.
 अत्यादराने झुकलेली मान वर करून संपादक म्हणाले, ‘‘मोरमारे सर, मोरमारे...’’
 मालकाच्या चेहर्‍यावर प्रश्‍नचिन्ह. संपादकांनी खुलासा केला, ‘‘माझं नाव सर, पोरमारे नाही मोरमारे, मोर... मोर... तो नाचतो ना ढग दाटून आल्यावर.’’ मोरमारेंनी मोराची ऍक्शनही करून दाखवली पिसारा फुलवून...
 ‘‘ते महत्वाचं आहे का हो? इथे विषय काय आणि तुम्ही बोलताय काय? तुम्हाला नोकरीत घेतानाच सांगितलं होतं ना मी की आपण आपला पेपर आपली आणि आपल्या पक्षाची ला... अं... म्हणजे प्रसिद्धी करण्यासाठी काढलेला आहे. एकदम सोपं काम. रोज विरोधकांना ठासायचं. आपले पक्षश्रेष्ठी काय म्हणतात त्याची हेडलाइन करायची. ते एखाद्या दिवशी म्हणालेे की कोंबडा अंडं देतो, तर करायची हेडलाइन. ते म्हणाले, सूर्य दक्षिणेला उगवतो... हेडलाइन. ज्या दिवशी ते बोलणार नाहीत, त्या दिवशी मी बोलेन... हेडलाइन. आपली अक्कल चालवायची नाही. हायकमांडचे चालताना, पळताना, बसताना, उठताना, हसताना, रडताना फोटो काढायचे आणि ते पहिल्या पानावर छापायचे. त्यांचा नसेल, तेव्हा माझा छापायचा. एवढं सिंपल काम दिलंय तुुम्हाला...’’
 ‘‘आय नो सर, मी तेच तर करतोय सर.’’
 ‘‘मग लोक काय बोंबलतायत बाहेर की तुमचा पेपर वाचनीय होतो म्हणून. अरे, आपण काय लोकांना वाचायला पेपर काढतोय का काय? शोधून काढा जरा कोण तो पेपर वाचनीय बनवतोय ते? शहाणा समजतो का स्वतःला? त्याला मेमो द्या नाहीतर काढून टाका. पुन्हा माझ्या कानावर अशी तक्रार येता कामा नये तीरमारे.’’
 अर्धा पेपर आपणच एकटाकी खरडून काढत असताना लोकांना वाचनीय कुठून काय सापडलं, याबद्दलच्या अचंब्याने बुचकळ्यात पडलेल्या संपादकांनी पुन्हा मालकांना सांगितलं, ‘‘साहेब, तीरमारे नाही, मोरमारे... मोर...म...मुंबईतला...’’
 साहेबांनी त्यांच्याकडे अशा काही नजरेने पाहिलं की ते मोराची ऍक्शन विसरून नकळत तीर मारण्याचीच ऍक्शन करू लागले...

**************

...चौथ्या पेपराचे तरुण तडफदार व्यवस्थापकीय संचालक ऊर्फ मालककुमार मागच्या भिंतीवर लावलेल्या त्यांच्या आध्यात्मिक गुरुवर्यांच्या तसबिरीला नमस्कार करून आवाज शांत राखण्याचा आटोकाट प्रयत्न करीत म्हणाले, ‘‘बोंबलेसाहेब, फार दुःख झालं गुरुदेवांच्या मनाला. ते म्हणाले, आपण इतक्या मेहनतीने बसवलेली घडी अशी कशी विस्कटत चालली आहे!’’
 ‘‘काय झालं साहेब! आज गुरुदेवांचा फोटो पान नंबर तीन, सात, तेरा, सतरा आणि सव्वीस या सगळ्या ठिकाणी आहे. त्यांचे सगळे कॉलमही व्यवस्थित छापले आहेत. सकाळी पेपर आल्याबरोब्बर मी खात्री करून घेतली. तेच तर करतो मी... आय मीन, तेच तर पहिल्यांदा करतो मी.’’
 ‘‘तसं नाही बोंबले, ते म्हणतात गेल्या आठवड्यात दोनतीन अग्रलेख वाचनीय होते... ही फारच गंभीर गोष्ट आहे.’’
 ‘‘काय सांगताय काय? आपल्या पेपरात अग्रलेख छापून येतो?’’ संपादकांना हा प्रश्‍न पडणं स्वाभाविकच होतं. ते सतत महाराष्ट्राच्या दौर्‍यावर असायचे. वेगवेगळ्या आवृत्त्यांना शिस्त लावायची, रद्दीनिर्मितीचं धोरण समजावून सांगायचं, हेच तर त्यांचं मुख्य काम होतं. त्याशिवाय ते काव्यकिरण मंडळापासून पोलिस-पाकिटमार मित्र संघटना, अखिल किराणा भुसारी महामंडळ, शालेय शिष्यवृत्ती उत्तेजक सभा, रिक्षाचालक-मालक अन्याय निवारण समिती, सार्वजनिक अधिक मासोत्सव मंडळ, समग्र खोकड आळी उन्नती परिषद, नंदीबैल पालक संघटना, बोंडअळी बचाव आंदोलन, बडगुजर ज्ञाति सभा अशा अनेक सामाजिक संस्थांचे, संघटनांचे वरिष्ठ पदाधिकारीही होते. त्यांच्या सततच्या भ्रमंतीमुळे त्यांना आपलाच पेपर वाचायला वेळ मिळणं शक्यच नव्हतं, तशी त्यांच्याकडून कुणाचीच अपेक्षाही नव्हती. जिथे संपादकाने पेपर काढावा, हीच अपेक्षा नव्हती, तिथे तो वाचण्याची अपेक्षा कशी असेल? मालकाच्या सगळ्या चाव्या हातात असलेल्या गुरुदेवांचं सगळं काही व्यवस्थित छापून आलंय ना, एवढंच ते चेक करायचे. ते संतापून म्हणाले, ‘‘तरी मी सांगितलं होतं सगळ्यांना दहावीच्या मुलांचे निबंध हाच आकृतिबंध ठेवा डोळ्यांसमोर आपला अग्रलेख लिहिताना. आता पुढच्या माझ्या दौर्‍यात सगळ्यांना सांगतो की, इयत्ता सातवीचा कल्पनाविस्तार हाच आपल्या अग्रलेखाचा यापुढचा आकृतिबंध आहे. त्याचं उल्लंघन होता कामा नये. म्हणजे झंझट मिटली.’’
 ‘‘हं हं, काय ते नीट करा,’’ म्हणत तरुण वयात अकाली प्रौढत्व आलेल्या मालककुमाराने डोळे मिटले आणि कूस उचलली, आता खुर्चीतून टर्रर्रर्र असा आवाज येणार, मालककुमार ‘फार कुरकुरतात या खुर्च्या’ असं म्हणणार, आपणही हो ला हो करायचं, हा सगळा नित्यक्रम बोंबलेंना पाठ होता. मालककुमाराच्या पोटाची एक किचकट व्याधी गुरुवर्यांनी दुरुस्त केली होती, त्यामुळेच त्यांची गुरुवर्यांवर प्रगाढ श्रद्धा बसली होती. मात्र, या उपचाराचे साइड इफेक्ट म्हणून उद्भवलेले गॅसेस काही कमी झाले नव्हते.
 ‘‘आरोग्य... आरोग्य... फार महत्वाचं आहे बोंबले,’’ बैठक बदलून मालककुमार म्हणाले, ‘‘फालतू जड विचारांनी फार तर गॅसेस होतात. लोकांना आपण आरोग्यविषयक मार्गदर्शन केलं पाहिजे. त्यांचं आरोग्य सांभाळलं पाहिजे...’’
 ‘‘तेच तर करतोय आपण,’’ बोंबलेंनी समेवर अचूक सूर उचलला आणि मालककुमारापुढ्यात पेपर पटकला, ‘‘हे पाहा, गुरुवर्यांच्या आजच्या कॉलमातून तेच तर केलंय आपण. सकाळपासून अभिनंदनाचे ङ्गोन घेऊन घेऊन थकलोय मी. ऑफिसचा ऑपरेटरही सांगत होता की आज सकाळपासून क्षणभर फोनला विश्रांती नाही. किती अप्रतिम मार्गदर्शन केलंय गुरुवर्यांनी याबद्दल सगळे फोन करून आभार मानतायत. सर्क्युलेशनवाले म्हणाले आज रिटर्न कॉपी नाही येणार एकपण.’’
 गुरुवर्य हा वीक पॉइन्ट असलेल्या मालककुमारांची कळी या सफाईदार थापांनी खुलत गेली. त्यांनी अतीव श्रद्धेने पेपर हाती घेतला. गुरुवर्यांची ती सात्विक तेजाने तळपणारी (म्हणजे फोटो शॉपने उजळवलेली) दिव्य मुद्रा पाहून यांनी मनोमन वंदन केलं आणि ते वाचू लागले...

 आरोग्यम् धनसंपदा!
 प्रश्‍न : गुरुदेव, गेले अनेक दिवस पोटात घट्ट खडा होतो आहे. परसाकडे गेल्यावर फारच त्रास होतो आहे. काही उपाय सुचवा.
 उत्तर : हरिओम तत्सत! फोकनाडीग्रंथाच्या सतराव्या अध्यायात रसशाळेश्‍वर नळस्तापक शास्त्रींनी म्हणूनच ठेवलंय,
 घृतम पित्वा
 कृतम सत्वा
 मृतम कित्वा
 असंबद्धयेत!
 म्हणजे काय ते योगेश्‍वर श्रीकृष्णच जाणे! 62 साली आठ आण्याला पिशवीभर संस्कृत ग्रंथ मिळाले होते अप्पा बळवंत चौकात, ते आयुष्यात पुढे इतके उपयोगी पडतील, याची कल्पना नव्हती. वर दिलेल्या संस्कृत वचनाचा अर्थ फार गहन आणि जटील आहे. तुमच्या पोटाच्या सध्याच्या स्थितीत तो तुम्हाला सांगितला, तर परसाकडे जाण्याचा आहे तो मार्गही बंद होईल कायमचा. अतिम मस्तिम जास्तिम त्रास्ति हे लक्षात ठेवा. तुमचे शरीर हे निव्वळ मौजमजेचे साधन नाही, ते संसारधर्माचं एक साधन आहे, याचं भान ठेवलंत, तर योगेश्‍वरकृपेने पोटाच्या अशा फुटकळ समस्या निर्माण होणार नाहीत. हे आत्म्याला परमात्म्याशी जोडण्याचं शास्त्र आहे, ते जाणून घेण्यासाठी माझं ‘आत्मन्-परमात्मन्’ हे पुस्तक (बोबडबोल प्रकाशन, आवृत्ती 27वी, किंमत 250 रु.) वाचा. हे जडजंबाल पुस्तक वाचायच्या केवळ कल्पनेनेच अनेकांच्या खड्याचे ढेकूळ होऊन जाते, पुढे वाचायची वेळ येतच नाही, असा अनुभव आहे. इतरांचं सोडा, आमचाही हाच अनुभव आहे. हे पुस्तक फार जड जाणार असेल, तर पचायला अतिशय हलके असे माझे ‘सव्वा दोन मिनिटांत आरोग्याची गुरुकिल्ली’ हे पुस्तक विकत घ्या. शंभर रुपयाच्या या पुस्तकात आम्ही आत एकच पान छापलेलं आहे. त्यावर एका किल्लीचं चित्र आहे. हीच ती आरोग्याची गुरुकिल्ली. शंभर रुपये देऊन हे आपण काय घेतलं, या विचारानं माणसाचा जो काही तीळपापड होतो, तो कठीणातला कठीण आजार खाडकन् म्हणजे सव्वादोन मिनिटात बरा करून टाकतो. या पुस्तकाच्या झटक्याने आतापर्यंत 1700 लोकांचा हृदयविकार बरा झाला आहे आणि 2300 जणांची कर्करोगावरची केमोथेरपी कायमची थांबली (त्यांना हृदयविकाराचा झटका आला.) हेही जमणार नसेल, तर तुम्ही सरळ आमच्या आरोग्यकेंद्रात जा आणि योगेश्‍वर ङ्गार्मसीची ‘भुस्कटगुटी’, ‘ङ्गसवेश्‍वर चूर्ण’, ‘बिमारी आसव’ आणि ‘जठरारिष्टशामक वटी’ ही औषधं घेऊन या. वेगळ्या कंपनीची औषधं आणू नका. ती स्वस्त पडतील आणि त्यांनी कदाचित गुण येण्याचाही संभव आहे. आमच्या औषधांमुळे तुम्हाला काहीही ङ्गरक पडणार नाही. त्यामुळे तुम्ही संतापून एरंडेल घ्याल (योगेश्‍वर ङ्गार्मसीचे ओरिजिनल ‘एरंडॉइल’च घ्या, 100 मिलीची बाटली ङ्गक्त 47 रुपयांना) आणि तुमचा प्रश्‍न आपोआपच सुटून जाईल. यापैकी कोणताही उपाय करताना त्याला संगीतोपचाराची जोड देणं ङ्गार महत्वाचं आहे. आम्ही स्वतः ‘घरच्या घरी संगीतोपचार’ हा अभ्यासपूर्ण ग्रंथराज (बोबडबोल प्रकाशन, किंमत 750 रु.)लिहिला आहे. त्यात वेगवेगळ्या आजारांवर उपयुक्त अशी गाण्यांची यादी दिली आहे. तुमच्या सध्याच्या स्थितीवर ‘नाम जलेबीबाई’ हे मल्लिकाबाई शेरावत यांच्यावर चित्रित झालेलं रसमधुर गीत आवर्जून आणि वारंवार ऐका. शक्य झाल्यास ते टीव्हीवर पाहा आणि डोळे मिटून मल्लिकाबाईंची मूर्ती डोळ्यांसमोर आणा. या गाण्याच्या तालावर त्यांच्या कमनीय कंबरेच्या हालचालींची शक्य तेवढी आवर्तनं करा आणि संगीताचं सामर्थ्य अनुभवा. अहो, सांडग्यांच्या जिलेब्या करण्याची ताकद आहे या गाण्यात. मात्र, हे सगळे प्रयोग शौचकुपात करा. घरात कुठेही या हालचाली कराल तर अतिशय जटील कौटुंबिक पेचप्रसंग उद्भवतील. उपायाचा एकदम असर झाला तर पुढे तीन दिवस तुम्हालाच बादली-ब्रश घेऊन फिनाईलने घर घासून पुसून साङ्ग करत बसावे लागेल.
 श्रीहरी, श्रीहरी
*******************
 ‘‘साहेब, साहेब, डावीकडे घ्या गाडी!’’ संपादक भोपळेंनी सूचना केली आणि मॅनेजिंग एडिटर साहेबांनी गाडी त्यानुसार वळवली. या रस्त्यावरची वस्ती अशी होती की आपली गाडी एसी आहे, याचं भान नसतं तर मॅनेजिंग एडिटरांनी नाकावर रूमालच दाबून धरला असता. रस्त्याच्या दोन्ही कडांना बैठ्या घरांची झोपडपट्टी ओसंडली होती. काही झोपड्या दुमजली, तिमजली. समोरून वाहतं गटार. त्यावरच सुरू असलेले सकाळचे व्यवहार. मॅनेजिंग एडिटरांच्या चेहर्‍यावर आठ्यांचं जाळं पसरलं, तशी भोपळेंची कळी खुलली. आता याच चेहर्‍यावर जेव्हा हसू ङ्गुलेल, तेव्हा मॅनेजिंग एडिटरसाहेब खूष होऊन जातील, याची खात्री होती भोपळेंना. ही सर्क्युलेशन प्रमुखांनी दाखवून ठेवलेली खास गल्ली होती. ते तिला ऍस्पिरेशन्स गल्ली म्हणत असत. मॅनेजिंग एडिटरांच्या चेहर्‍यावरचं वैतागमिश्रित प्रश्‍नचिन्ह पाहून भोपळे पुढे सरसावले आणि म्हणाले, ‘‘सर, आपला पेपर आपल्या ब्रीदापासून जराही हटलेला नाही, हेच दाखवण्यासाठी मी तुम्हाला खास इथे घेऊन आलोय. सर्क्युलेशन विभागाच्या माहितीनुसार आपला पेपर इथे सर्वात जास्त खपतो. म्हणजे या गल्लीत जेवढे पेपर येतात त्यांच्यात सगळ्यात मोठा वाटा आपला आहे. आपले सगळे इव्हेेंट इथे सगळ्यात जोरात चालतात. आपल्या पेपरचा ङ्गार मोठा प्रभाव आहे इथे.’’ मॅनेजिंग एडिटर कुतूहलाने पाहू लागले. रस्त्यावरच्या बहुतेक माणसांच्या हातात यांचाच पेपर दिसत होता. काही तरुण मुलं पेपरच्या यूथ स्पेशल पुरवणीभोवती झुंबड उडवून नाचत होती.
 ‘‘यांना कसला आनंद झालाय, कुणी परीक्षेत पहिलं आलं का यांच्यातलं?’’ मॅनेजिंग एडिटरांनी विचारलं.
 ‘‘छे छे, सर. बारा महिने तेरा काळ कसले ना कसले उत्सव चालू असतात, या गल्लीत. रात्रभर लाउडस्पीकर वाजवणं हा आमचा जन्मसिद्ध अधिकार आहे, या विषयावर आपण कँपेन केलं होतं ना, ते याच गल्लीतून सुरू झालं होतं. रोजच्या आवाजात ही मुलं अभ्यास कधी करणार आणि पास कुठून होणार. आपल्या कॉलेजच्या पुरवणीत ‘आमचा टाइमपास कट्टा’ या सदरात फोटो छापून आलाय यांचा, आम्ही छाव्या कशा पटवतो, पोरींच्या वर्णनाची कोड लँग्वेज कोणती, फटाका म्हणजे काय, चाबूक म्हणजे काय, याची एकदम फडू माहिती दिलीये या पोरांनी.’’
 आपल्या संपादकांची भाषा सुधारतेय, आजच्या तरुणाईची भाषा त्यांना आत्मसात होतेय, हे पाहून मॅनेजिंग एडिटर संतोषले. थोड्या अंतरावर काही मुली गटाराच्या अरुंद झाकणांवरून तोल सावरत झोकात चालण्याची प्रॅक्टिस करताना दिसत होत्या.
 ‘‘या सगळ्याजणाी खुडबुडे आळीच्या भाद्रपद ब्युटी स्पर्धेची तयारी करतायत. आता इथे दर महिन्याला सौंदर्यस्पर्धा असते.’’
 पुढे काही शेंबडी लहान मुलं खाली चड्डी नसताना वर शर्टावर टाय लावण्याची प्रॅक्टिस करताना दिसत होती.
 ‘‘हा आपल्या ग्रूमिंग सेशन्सचा परिणाम बरं का! सगळी मुलं आता ऐपत असो वा नसो, एकदम अपटुडेट राहण्याचा प्रयत्न करतात, टाय लावून ङ्गिरतात आणि झोकात येसफ्येस इंग्रजी बोलतात.’’
 मॅनेजिंग एडिटरांच्या लक्षात आलं की वस्तीतल्या सगळ्या मध्यमवयीन बायकांच्या अंगावर साधारणपणे एकाच रंगाची साडी होती. तो त्यांच्याच पेपरात छापलेल्या आजच्या दिवसाच्या रंगाचा परिणाम होता, हे उघडच होतं. त्याचवेळी काही मध्यमवयीन बाप्ये एका पुरवणीत डोकं घालून बसले होते. या पुरवणीत मराठीतल्या एका हॉट हॉट नटीने प्लेबॉय मॅगझिनसाठी न्यूड ङ्गोटोशूट करून मराठीचा झेंडा कसा अटकेपार फडकवला होता, याची रसभरित आणि सचित्र कहाणी होती. ती पाहून मराठी मातीच्या अभिमानाने सगळ्यांचा ऊर त्या नटीप्रमाणेच अभिमानाने भरून येत असल्याचं दिसत होतं. रस्त्याच्या मधोमध यांच्याच पेपराने जागृत म्हणून गाजवलेलं एक मंदिर वाहतुकीचे तीनतेरा वाजवत उभं होतं. त्याच्यासमोर साडेतीन मैलांची रांग लागलेली होती. जवळपास सगळ्यांच्या हातात यांचाच पेपर होता. त्यात यांनी छापलेल्या ‘आजचा प्रसादा’ची पुडकी गुंडाळून घेऊन सगळे भक्त रांगेत उभे होते. सगळीकडे माणसं पेपरचा काही ना काही ‘उपयोग’ करत होती, कोणी काही गंभीरपणे वाचताना दिसत नव्हतं, हे पाहून मॅनेजिंग एडिटर साहेबांचा जीव हळुहळू भांड्यात पडत चालला होता. तेवढ्यात त्यांचं लक्ष एका विलक्षण दृश्याकडे गेलं, रस्त्यात मधोमध एक गाय उभी होती. काही लोक तिला चारा घालत होते आणि काही लोक तिच्या शेपटीचे ङ्गटकारे सहन करत त्या शेपटीला कुरवाळण्याचा प्रयत्न करत होती. गाय अधूनमधून लाथाही झाडत होती, पण त्याही सहन करून लोक शेपटी सोडत नव्हते...
 ‘‘हाही आपल्या पेपरचाच परिणाम आहे का?’’ असं मॅनेजिंग एडिटरांनी गमतीने विचारलं आणि भोपळेंनी ‘अर्थातच’ असं सांगितल्यावर ते आश्‍चर्यचकितच झाले. भोपळेंनी विजयी मुद्रेने त्यांना गाडी बाजूला घ्यायला लावली आणि आपल्या हातातली पुरवणी त्यांच्या हातात खुपसली.
 पुरवणीत एक अतिशय लोकप्रिय सदर होतं. तुपाचे ओघळ येत असलेला लाडूच मिशी लावून बसवला असावा, अशा तुकतुकीत चेहर्‍याचा ज्योतिषीमहाराजांचा ङ्गोटो होता. शेजारी ठळक अक्षरात लिहिलं होतं...

ग्रह फिरले तुमचे, उपाय आमचे!
नोकरी मिळत नाही? प्रेम जुळत नाही? पैसा लाभत नाही? झोप लागत नाही? नुकसान घटत नाही? आजार हटत नाही? समस्या कोणतीही असो. उपाय एकच. हिमालयात एका पायावर सातशे वर्षं तपश्‍चर्या केलेल्या साधुबुवांकडून दीक्षा घेतलेल्या गुरुमहाराजांच्या 15व्या पिढीतील सुप्रसिद्ध ज्योतिषाचार्यांच्या पट्टशिष्याचे चुलतमामेभाऊ प्रख्यात ज्योतिषी फाफडोजी फेकाडे यांचे नातू फोकाजी  फेकाडे यांचे सुप्रसिद्ध सदर...
 आज आपण माहिती घेणार आहोत आयुष्यातील कुतरओढ योगाची. या योगात माणसाची अवस्था मल्लिका शेरावत, बिपाशा बसू किंवा सनी लिओन यांचा थ्री डी सिनेमा पाहात असल्यासारखी असते. म्हणजे, सुख अगदी हातापासून दोन बोटांच्या अंतरावर आहे, असं वाटतं, ते जवळ येतंय असं वाटतं पण, त्याचा आस्वाद घेण्याच्या आत ते दूर जातं, तो भ्रमच होता की काय, असा भास होतो आणि त्याच्यातून विचित्र ओढाताण होऊ लागते. (च्यामारी, हा कसला योग? हा तर जगातल्या प्रत्येक माणसाला लागू होतो. आपण खूप सुखात आणि मजेत आहोत, असं कधीच कुणाला वाटत नाही. रस्त्यावरच्या भिकार्‍यालाही आपण दुःखात आहोत, असंच वाटतं आणि पैशांच्या राशीवर लोळणार्‍या धनिकालाही तेच वाटतं... मॅनेजिंग एडिटरांच्या मनात चमकून गेलं.) या योगात लग्न ठरवताना सगळी पसंती झाल्यानंतर देणंघेणं ठरल्यावर आपण विग लावतो, हे मुलीला कळतं आणि आपलं लग्न मोडतं (मुलीचे सगळे दात खोटे आहेत, म्हणूनही लग्न मोडू शकतं). सर्व संबंधितांना भरपूर पैसे चारून नोकरी पक्की करून मित्रमंडळींना मजबूत पार्टी दिल्यानंतर कळतं की नोकरी आपल्यापेक्षा तगड्या वशिल्याच्या उमेदवाराला लागली. आपण 46 इंचाचा टीव्ही आणला म्हणून शेजार्‍यांना पेढे द्यायला जावं तर ते 55 इंचांचा थ्री डी टीव्ही आणल्याबद्दल पेढे द्यायला आपल्याकडेच यायला निघालेले भेटतात. याची अनेक उदाहरणं देता येतील. (येतील म्हणजे काय, जगातल्या सगळ्या दुःखदायक घटना या योगाच्या नावाखाली खपवता येतील... गुड... मॅनेजिंग एडिटरांच्या मनातले विचार.) यावर उपाय काय? उपाय ङ्गार सोपा आहे. मनःपूर्वक आणि संपूर्ण श्रद्धापूर्वक तो केला, तर या योगाच्या दुष्टचक्रातून बाहेर पडून थ्री डी सिनेमा संपून खुद्द बिपाशा, मल्लिका किंवा सनी- देओल नव्हे, लिऑन- आपल्या मांडीवर विराजमान झाल्याचा आनंद मिळेल.
 उपाय : रोज रात्री पूर्वपश्‍चिम झोपा. दोन घटिका डाव्या कुशीवर, एक घटिका पाठीवर, तीन घटिका पोटावर, एक घटिका उजव्या कुशीवर अशा पद्धतीनेच झोपावे. झोपताना उशाशी कोणत्याही धातूची किसणी घ्यावी. (कशाला? बहुतेक झोपेचं खोबरं किसायला.- मॅनेजिंग एडिटर). सकाळी बरोब्बर सूर्योदयाच्या वेळी जागे होऊन उत्तरेकडे तोंड करून उभे राहा. दक्षिणेकडे लाथा झाडा. त्यानंतर रात्री उशाशी घेतलेल्या किसणीतून गाळलेले दोन तांब्ये पाणी प्या. न्याहारी करण्याच्या आधी जास्वंदीच्या ताज्या ङ्गुलाने घरातल्या सर्व दिशांना रात्री तांब्याच्या भांड्यात ठेवलेलं वाटीभर पाणी शिंपडा. मग कपाळावर काळा ठिपका असलेल्या पांढर्‍या रंगाच्या गरोदर मांजरीचे पुढचे दोन्ही पंजे सात वेळा बुडवलेले तीन चमचे गोमूत्र प्राशन करा. (प्या प्या, शेण खायला निघाल्यावर गोमूत्राची काय लाज?) मग गावठी कुत्र्याची शेपटी पाचवेळा दोन्ही डोळ्यांना लावा आणि नैऋत्येकडे चालत निघा. वाटेत जिथे पाचापेक्षा अधिक कुमारिका एकत्र दिसतील, तिथली दोन मुठी माती गोळा करा. (अरे बापरे, आता कुमारिका कशा ओळखायच्या?) येताना वाटेत जी पहिली गाय दिसेल, तिच्या शेपटाचे तीन केस उपटून घ्या. घरी आल्यावर मातीत अर्धी वाटी पाणी, दोन चमचे दूध, तीन चमचे दही, एक चमचा व्हिनेगर (चुकून पाककृतीतला आयटम पेस्ट झाला की काय?... भोपळेंच्या मनात प्रश्‍न), दोन चिमटी कुंकू, एक चिमूट अबीर, सात मेथ्या, दोन कापूरवड्या मिसळून लाडवाचा आकार द्या. त्याला तीन वळसे गंध लावा. त्याच्या मधोमध गायीचे तीन केस खोवा. चंदन, नागरमोथा या सुगंधाच्या अगरबत्त्या आणि धूप यांची आरती दिवसाच्या पाचव्या प्रहरापर्यंत अखंड चालू ठेवा. त्या रात्री सात कुत्र्यांना सोबत घेऊन स्मशानातल्या पेटत्या चितेच्या ईशान्य दिशेच्या ढिगातले तीन निखारे धगधगते वेचून आणा, येताना घुबडाचे दोन पंख आणि वटवाघळाच्या लीदेचे दोन गोळे घ्या. उत्तररात्रीच्या पहिल्या प्रहराला गंध लावलेल्या लाडवाचे तीन समान तुकडे करा. एकेक तुकडा आणि एक निखारा एकत्र हातात घेऊन ‘ओम प्रीम ट्रीम भंगडाय नच्छे’ या मंत्राची एकशे एक आवर्तने करून दक्षिणेला आणि उत्तरेला ङ्गेका. उरलेले सगळे सामान एकत्र करा आणि ते ताम्हणात ठेवुन रात्रभर त्यावर हिर्‍याच्या अंगठीवरून पाणी सोडत बसा. सकाळपर्यंत ताम्हणात काही शिल्लक राहिलेले असेल, तर ते हातात घेऊन सूर्योदयाला बाहेर पडा आणि सात महिने सात दिवसांच्या गर्भवती महिलेच्या डोक्यावरून सात वेळा ङ्गिरवून काढून आग्नेय दिशेला ङ्गेका आणि डोळे बंद करून उलटे चालत घरी या. कुमारिकांच्या बापांनी कुबलणे, मांजरीने बोचकारणे, गायीने लाथेने प्रहार करणे, कुत्रे चावणे, स्मशानात मृताच्या संतप्त नातेवाईकांनी आयत्या चितेवर चढवणे, उत्तररात्री पोलिसांनी पकडणे, निखार्‍यांनी हात भाजणे यापैकी कोणतेही अरिष्ट न येता हा विधी करू शकलात, तर कुतरओढ योगातून तुमची मुक्तता नक्कीच होईल, यात शंका नाही.
 (आपली काही व्यक्तिगत समस्या असेल, तर अशाच सुलभ उपायांसाठी ज्योतिर्मांतंड ङ्गोकाजी ङ्गेकाडे यांना समक्ष भेटा.)

 ‘‘अहाहाहा,’’ मॅनेजिंग एडिटर हातातला पेपर ङ्गडकावत आनंदाने बेभान होऊन किंचाळले आणि भोपळ्यांचा गालगुच्चा घेत म्हणाले, ‘‘भोपळे, आजपासून तुम्ही संपादक नाही...’’ भोपळेंच्या पोटात गोळा... ‘‘आजपासून तुम्ही मुख्य संपादक झालात.’’
 **************
 भरदुपारी सुनसान असलेल्या पेपरच्या ऑङ्गिसमध्ये मालक शेठजी टॉक टॉक बुट वाजवत शिरले. त्यांची संतप्त नजर रिकाम्या ऑङ्गिसवरून ङ्गिरत होती. आपल्या केबिनीत बसल्याबरोबर त्यांनी शिपायाला ङ्गर्मास सोडलं, ‘‘त्या गोंधळ्याला बोलाव.’’ हाताखालच्या सगळ्या कनिष्ठांपुढे, खासकरून चतुर्थश्रेणी कामगारांसमोर संपादकाचा एकेरीत आणि तुच्छतेने उल्लेख करण्याचं पथ्य मालकांनी आवर्जून पाळलं होतं. त्याने संपादकाला ऑङ्गिसात काळं कुत्रंही विचारत नाही आणि त्याच्यात पत्रकारितेचा बाणा वगैरे जागा होत नाही, हा मालकांचा अनुभव होता.
 ‘‘बसा गोंधळेकर, बसा,’’ मालकांनी हात जोडून समोर उभ्या संपादकांना सांगितलं, ‘‘आज काय सुट्टीबिट्टी आहे का पेपरला?’’
 ‘‘नाही. का हो साहेब?’’ गोंधळेकर गोंधळून म्हणाले.
 ‘‘दुपारच्या वेळी ऑङ्गिसमध्ये एकही माणूस नाहीये संपादकीय विभागाचा. सगळे गेले कुठे?’’
 ‘‘अहो, सगळ्यांना लावलंय कामाला. पुरवणीचे चार उपसंपादक आहेत. त्यात दोन मुली. त्या गेल्यात मंगळागौरीच्या तयारीला. आपल्या स्त्रीशक्ती पुरवणीने आयोजित केलीये ना जाहीर सार्वजनिक मंगळागौर. नेहमीच्या शिफ्टच्या दोन मुली गेल्यात भोंडल्याच्या कार्यक्रमासाठी महिला मंडळांशी बोलणी करायला. उरलेल्या दोघीजणी आपल्या सौंदर्यस्पर्धेसाठी निवडलेल्या मुलींची प्रॅक्टिस घेतायत. तीन उपसंपादकांना ऑङ्गिसला येताना वाटेतच पाच क्लायंट गाठून या सगळ्या स्पर्धांना स्पॉन्सर मिळवायला सांगितलंय. एक तगडा रिपोर्टर आहे आपला. तो एका बिल्डरला धमकी द्यायला गेलाय. बातमी न छापण्याच्या बदल्यात तो एक खोका तरी देईल म्हणतोय. त्याला पंधरा टक्के कमिशनवर पाठवलाय हां साहेब. क्राइम रिपोर्टर सध्या माङ्गिया डॉनला धमकावल्याच्या प्रकरणात तुरुंगात आहे. बिझनेस डेस्कचा माणूस आपल्या वर्धापनदिनाच्या जाहिराती मिळवण्यासाठी उद्योगपतींच्या मागावर आहे. काही किरकोळ भाषांतरं वगैरे करणारे सब एडिटर आहेत, त्यांना आपल्या आजच्या ‘ङ्गॅशन शो’साठी व्हॉलंटीयर म्हणून रवाना केलंय. सगळे मुख्य उपसंपादक हे ‘पेपर वाचून कुणाचं भलं झालंय’ या निबंधस्पर्धेचे परीक्षक म्हणून काम करायला गेले आहेत. सगळे ज्युनियर रिपोर्टर मराठी चित्रपट कलावंतांच्या टीमबरोबर क्रिकेट मॅच खेळायला गेले आहेत. त्यांना हरून यायला सांगितलंय मी! उद्या पत्रकारांचा ङ्गोटो कोण बघणार पहिल्या पानावर? राजकीय विभागाच्या बातमीदारांना एकेक पक्ष नेमून दिलाय. येत्या निवडणुकीत त्यांच्या बातम्या काय रेटने लावायच्या याच्या वाटाघाटी सुरू आहेत. पानाला लाख दोन लाख रुपये सुटतील म्हणतायत.’’
 आपण दिलेल्या मौल्यवान माहितीमुळे शेठजी खूष होतील, असा गोंधळेकरांचा होरा होता. कारण, हे मालक प्रत्येक कॉलम सेंटीमीटरचं मोल जाणणारे होते. उपसंपादक किंवा रिपोर्टरकडून बातमीत काही गङ्गलत झाली, म्हणजे जिथून पेपरला पाच पैशाचा ङ्गायदा नाही, अशा कुणाची बातमी छापून आली, तर त्या बातमीच्या लांबीएवढ्या जाहिरातीचे पैसे त्याच्या पगारातून वळते करून घेणारे मालक अशी शेठजींची ख्याती होती. त्यामुळे या वर्तमानपत्रात मथळ्याची बातमीही चार सेंटीमीटरच्या तीन कॉलमांच्या वर जायची नाही. सगळा पेपर एकेक कॉलमाच्या बातम्यांनीच भरलेला असायचा. सर्व रिपोर्टरांनी आपापल्या बीटवरच्या जाहिराती आणाव्यात, अशी त्यांची अपेक्षा होती. रिपोर्टरांचा पगार इतका कमी होता की त्यांना या पेपरच्या नोकरीतून पोट चालवण्यासाठी जाहिराती आणण्याशिवाय गत्यंतरच नव्हतं. त्यामुळे, जाहिरातकुशल रिपोर्टरांचा पगार शिपायांच्या बरोबरीचा होता, पण उत्पन्न संपादकांपेक्षा जास्त होतं. संपादक मालकाने दिलेल्या जुनाट, मोडक्या कारमधून यायचे, तेव्हा हे रिपोर्टर स्वतःच्या मालकीच्या चकचकीत गाड्यांमधून कामावर आले तर यायचे. त्यामुळे, संपादकीय विभागातली सगळी मंडळी संस्थेसाठी अर्थार्जन करण्याच्या कामाला जुंपलेली आहेत हे ऐकून शेठजींच्या कपाळावरच्या आठ्या आणखी वाढल्या आणि भुवई वक्र झाली, तेव्हा संपादक चपापलेच.
 ‘‘काही चुकलं का साहेब?’’
 ‘‘ते बाहेर कोपर्‍यातल्या टेबलावर पाच लोक बसलेले आहेत, ते कोण आहेत? सगळी माणसं पेपरच्या कामात गुंतलेली असताना ऑङ्गिसात बसून चकाट्या पिटणारे हे लोक कोण आहेत?’’ मालक कडाडलेच.
 ‘‘अहो, ते सिनीयर असिस्टंट एडिटर आहेत. अग्रलेख लिहायला बसलेत.’’
 ‘‘चुलीत घाला तुमचा अग्रलेख. एक लेख लिहायला पाच पाच माणसं!’’
 ‘‘साहेब, रागावू नका, भडकू नका. शांत व्हा. मी काय सांगतो, ते जरा ऐकून घ्या,’’ गोंधळेकर अजीजीने म्हणाले, ‘‘त्यातले दोघेच जण सिनीयर असिस्टंट एडिटर आहेत, उरलेले तिघेजण बाहेरून आलेत, वाचकांच्या पत्रांमध्ये पत्र द्यायला. हे दोघेजण त्यांना पत्राचा रेट सांगतायत. हल्ली रिकामटेकडे लोक वाचकांची पत्रं लिहून गल्लीतल्या गल्लीत विचारवंत होऊ लागलेले असल्याने आम्ही इकडेही रेटकार्ड लावलंय.’’
 आता मालक जरासे संतुष्ट झाल्यासारखे वाटले, समोरची आजच्या पेपरची तयार झालेली पानं उचलून म्हणाले, ‘‘तो अग्रलेख लिहून झाल्यावर या दोघांना ज्येष्ठ नागरिक संघात पाठवा सांधेदुखीवरच्या व्यायाम शिबिरात. तिकडे व्यायामाची प्रात्यक्षिकं दाखवायला माणसं कमी पडतायत. आणि तुम्ही ऑङ्गिसात काय करताय?’’
 ‘‘मी पानं लावून घेत होतो. आपले बरेचसे आर्टिस्ट लहान मुलांच्या ‘जम्माडी जम्मत’ सहलीमध्ये डोंगराआडून उगवणार्‍या सूर्याचं चित्र काढायला शिकवण्यासाठी गेलेत ना! त्यामुळे ही जबाबदारी मला उचलायला लागली. सब एडिटर नसल्यामुळे काही बातम्याही भाषांतरित कराव्या लागतील आणि टीव्हीवरच्या मुख्य बातम्या पाहून शहराच्या पानाला दोन चार मुख्य बातम्या करून देईन. वार्ताहरांपैकी कुणीच नाहीये ना!’’
 ‘‘ते ठीक आहे. पण, संपादक आहात म्हणून कामचुकारपणा करू नका. मधल्या वेळात ज्येष्ठ मंत्र्यांकडे, उद्योगपतींकडे जाऊन बसा, त्यांच्या पुरवण्या करा, वाढदिवस साजरे करा, त्यांना गेस्ट एडिटर बोलवा, त्यांच्या खात्यांच्या, उद्योगांच्या जाहिराती मिळवा. तुमचं काही आहे की नाही आजच्या पेपरात?’’
 ‘‘आहे ना आहे,’’ हर्षोल्लासित होऊन गोंधळेकरांनी समोरच्या एका पानावर अर्धं पानभर पसरलेल्या मुलाखतीवर बोट ठेवलं.
 ‘‘मुलाखत? कुणाची? आणि यात तुमचं काय?’’ मालकांनी अंगठ्याशेजारची दोन बोटं अंगठ्यावर घासून पैशांची खूण करत विचारलं.
 ‘‘साहेब, हा एका मराठी सिनेमात तीन मिनिटांच्या रोलमध्ये झळकलेला तरुण आहे. एका मालिकेतही त्याची 13 एपिसोडमध्ये मिळून साडे सात मिनिटांची भूमिका होती. त्याची उद्याचा सुपरस्टार म्हणून मुलाखत छापलीये आपण...’’
 रागाने लालेलाल झालेले शेठजी आता लाहीसारखे ङ्गुटतात की काय अशी स्थिती झाली तेव्हा गोंधळेकरांनी मिष्कील हसत वाक्य पूर्ण केलं, ‘‘जाहिरातीच्या कार्ड रेटने.’’
 ‘‘वा वा वा! उगाच नाही तुम्हाला संपादक नेमलेलं? उद्या तुम्ही प्रेसलाइनमध्ये मालक, मुद्रक, प्रकाशक आणि मुख्य संपादक म्हणून आमचं नाव छापण्यासाठी आमच्याकडे पैसे मागायला नाही आलात म्हणजे मिळवली,’’ असं म्हणून मालकांनी हास्याचा गडगडाट केला आणि भावी सुपरस्टारची मुलाखत पुढे ओढली.

 माझा चित्रपट खूपच वेगळा!
 भावी सुपरस्टार जयेश जमदाडेच्या तोंडून ऐका आगामी ‘जंगम’ची कहाणी!
 ‘ढवळ्याशेजारी पवळ्या बांधला’ यांसारख्या चित्रपटांतून आपल्या दमदार व्यक्तिमत्वाची दखल घ्यायला लावणारा आणि ‘तू थांब, मी दार उघडते’सारख्या मालिकांमध्ये अभिनयकौशल्याचं दर्शन घडवणारा देखणा, रूबाबदार अभिनेता जयेश जमदाडे आता लवकरच ‘जंगम’ या ऍक्शनपॅक्ड मराठी सिनेमातून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनांचा ठाव घ्यायला हजर होतोय. या चित्रपटाच्या निमित्ताने जयेशशी मारलेल्या खास गप्पा...
 ‘जयेश, ‘जंगम’ या सिनेमाविषयी तू काय सांगशील?’
 ‘‘मी इतकंच सांगू शकेन की माझं भाग्य आहे, मला हा सिनेमा करायला मिळाला. हा मराठीतलाच नव्हे, तर भारतातला अतिशय वेगळा विषयावरचा सिनेमा ठरेल. किंबहुना मला विचाराल, तर जगात असा सिनेमा कुणी कधी बनवला नसेल.’’
 ‘काय आहे या चित्रपटाची मध्यवर्ती कल्पना?’
 ‘‘ही बाजीराव जंगम नावाच्या पोलिस इन्स्पेक्टरची गोष्ट आहे. तो कसा राजकारणात शिरलेल्या एका गुंडाचा निःपात करतो, त्याची ही थरारक गोष्ट आहे...’’
 ‘‘अरेच्चा, पण, ही तर हिंदीत अनेकदा येऊन गेलेली कथा आहे. अलीकडेच आलेल्या ‘सिंघम’ या अजय देवगणच्या सिनेमाची स्टोरी तर अगदी अशीच होती...’’
  ‘‘बरोबर आहे. आम्ही त्या सिनेमाचेच राइट्स घेऊन हा सिनेमा बनवलाय...’’
 ‘अरे, पण बहुतेक मराठी प्रेक्षकांनी हा सिनेमा थिएटरमध्ये नाहीतर टीव्हीवर पाहिलेलाच आहे. मुळात मराठी प्रेक्षक मराठी सिनेमा खरोखरच वेगळा असला तरी पाहायला जात नाहीत. इथे तर तुम्ही ‘सिंघम’ची कॉपी केली आहे. त्याला प्रेक्षक कसा प्रतिसाद देतील?’
 ‘‘एकदम जोरदार प्रतिसाद देतील ‘जंगम’ला याची मला खात्री आहे. कारण अगदी वेगळा सब्जेक्ट आहे. एकदम वेगळी ट्रीटमेंट आहे. आता तुम्हीच सांगा. महाराष्ट्रात ‘सिंघम’ हे आडनाव तरी असतं का? तरी हिंदीत लोकांनी बाजीराव सिंघम हा मराठी नायक म्हणून स्वीकारला. इथे तर त्याचं नाव आम्ही खरोखरचं मराठी बनवलंय, बाजीराव जंगम. बघा ना किती वेगळं आहे ते!’’
 ‘अगदी बरोबर आहे. अशा अतिशय क्रिएटिव्ह माणसांचं मराठीत पेवच ङ्गुटलंय, त्यामुळे वारुळातून मुंग्या बाहेर पडाव्यात, तसे सिनेमे बाहेर पडतायत आणि मुंग्या नंतर कुठे गेल्यात, हे वेगवेगळ्या ठिकाणी हुळहुळायला लागल्याशिवाय कळत नाही, तसं हे सिनेमे कुठे गेलेत, त्याचाही पत्ता लागत नाही. या सिनेमाचं असं काही होणार नाही, अशी आपण आशा करूयात. मला सांग, हा सिनेमा अधिक मराठी वाटावा, यासाठी काही खास प्रयत्न केले आहेत का?’
 ‘‘म्हणजे काय? खूप बदल केलेत आम्ही. सिंघमचा जसा जंगम केलाय, तसाच आम्ही जयकांत शिकरे या व्हिलनचं नाव बदलून जयराम घोकरे केलेलं आहे. लोकांना कन्विन्सिंग वाटलं पाहिजे ना! शिवाय ‘सिंघम’चा नायक सारखा ‘माझी सटकली रे’ असं म्हणत असतो. मला सांगा कोणता मराठी माणूस खूप राग आल्यानंतर असा मराठीत बोलेल? आमचा नायक ‘माझी खिसकली रे’ असं म्हणतो. हा सिनेमा मराठी प्रेक्षकाला आपला वाटावा यासाठी आम्ही एक कडक आयटम सॉंग टाकलंय सिनेमात. ‘ये गं मैने, धरीन मी तुझ्या कोंबडीची टांग, ढिबाडी ढिपांग, ढिचीबाडी ढिपांग, हिरडीबाडी डिचीबाडी डिपांग’ असे बोल आहेत गाण्याचे.’’
 ‘ङ्गार सुंदर, अतिशय कल्पक आणि गदिमांची, जगदीश खेबूडकरांची आठवण येईल, इतक्या सुगम ओळी आहेत या गाण्याच्या. मला बोल ऐकल्यावरच लक्षात आलं की हे गाणं मराठी चित्रपटसंगीताच्या इतिहासात अजरामर होईल.’
 ‘‘काही पर्यायच नाही हो! या एका गाण्यात मराठीतल्या चार चार हॉट नायिका नाचणार आहेत. स्नेहा धोंडे, मीनल दगडे, यामिनी येडगावकर आणि प्रीती ङ्गुळकट.’’
 ‘या कोण आहेत?’
 ‘‘अहो या भयंकर हॉट आहेत. स्नेहा एका हिट मालिकेत सुनेच्या मैत्रिणीचा रोल करतेय. मीनलचं एक नाटक ङ्गार गाजलं होतं राज्य नाट्य महोत्सवात. 45 कलावंतांमध्ये तिला एकटीलाच पाच वाक्यं होती. यामिनी येडगावकर ही भोकरदरीच्या चौङ्गुल्यावरची सुपरस्टार नर्तिका आहे. प्रीती ङ्गुळकट मात्र नवी आहे. तिला आम्ही टेस्ट करून उचलली आहे... म्हणजे तिची स्क्रीन टेस्ट घेऊन तिला पदार्पणाची संधी दिली आहे.’’
 ‘‘या सिनेमातल्या तुझ्या कामाची तारीङ्ग सगळीकडे ऐकू येतेय. गेल्या आठवड्यात एका अवॉर्ड ङ्गंक्शनमध्ये नव्वदीला पोहोचलेले नटसम्राट कृष्णराव कलापूरकर भर समारंभात जाहीरपणे म्हणाले की हा मुलगा उद्याचा सुपरस्टार आहे, त्यावर तुझी प्रतिक्रिया काय?’’
  ‘काय असणार? मी धन्य झालो. मला त्यांचाच वारसा लाभला आहे. मी त्यांच्याच मुलीच्या मुलीच्या जावेचा मुलगा आहे आणि सगळ्यांनी त्यांना वार्‍यावर सोडल्यानंतर ते आमच्याच बंगल्याच्या आउटहाऊसमध्ये राहतायत, हा केवळ योगायोग आहे. त्यांच्यासारख्या थोर माणसाने माझं कौतुक केलं, यातच मला भरून पावलं.’
 ‘वा वा, जयेश, तुझी ही मुलाखत वाचून मराठी रसिक बाजीराव जंगमच्या भूमिकेतली तुझी अदाकारी पाहण्यासाठी आता अतिशय उत्सुकतेने ‘जंंगम’ची वाट पाहात असतील...’
 ‘‘एक्स्क्यूज मी! तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. या सिनेमात मी बाजीराव जंगमची भूमिका करत नाहीये...’’
  ‘‘मग तू दमदार व्हिलन आहेस का? जयराम घोकरे?’’
 ‘‘छे छे, बाजीरावची भूमिका भरत जाधव करतोय आणि जयराम घोकरेच्या भूमिकेत अशोक सराङ्ग आहेत...’’
 ‘भरत जाधव... ऍक्शन भूमिकेत?’
 ‘‘हो ना, प्रोड्युसर म्हणाले, भरतच्या नावावर पब्लिक येतं. अशोकमामांना अजून बॉक्स ऑङ्गिसवर भाव आहे. ऍक्शन सिनेमा म्हणून नाही, निदान विनोदी सिनेमा म्हणून तरी लोक तो एंजॉय करतील.’’
 ‘खूपच वेगळा विचार आहे हा. पण, एक उत्सुकता म्हणून विचारतो. या सिनेमात तू काय करतोयस? तुझी भूमिका काय?’
 ‘‘माझा ङ्गार महत्वाचा रोल आहे. क्लायमॅक्सच्या सीनला बाजीराव जंगम पोलिस जीप घेऊन निघतो, त्या जीपचा मी ड्रायव्हर आहे. जयराम घोकरेला मारायला निघालेल्या नायकाचा मी ड्रायव्हर आहे, जस्ट सी द इम्पॉर्टन्स ऑङ्ग द रोल. नंतर जेव्हा जयरामचे गुंड समोरून गाडी घेऊन आमच्या गाडीला ठोकायला येतात तेव्हा मी जंगमला असा डाव्या हाताने धक्का देऊन जीपच्या बाहेर उडवतो आणि त्याला वाचवून स्वतः मरतो. जस्ट सी द वेटेज ऑङ्ग द रोल. ङ्गक्त तीन मिनिटांमध्ये छाप पाडून जाणारा रोल आहे. बाजीराव सगळ्या मारामार्‍यांमधून वेळात वेळ काढून जीपपाशी येऊन माझं डोकं आपल्या मांडीवर घेतो आणि मी आचके देत प्राण सोडतो, असा सीन आहे. भरत सर तर मला म्हणाले, यार, तू माझ्या तीन तासांच्या मेहनतीवर दोन मिनिटात पाणी ङ्गिरवणार. पिक्चर खाऊन जाणार तू.’’
 ‘‘अगदी नक्कीच. आता अर्धं पान मजकूर झालेला आहे जयेश. उरलेल्या अर्ध्या पानात तुझा ङ्गोटो छापायचा आहे. त्यामुळे तुला शुभेच्छा! अशीच तुझी उत्तरोत्तर भरभराट होत जावो आणि तुला अशाच अतिशय वेगळ्या सिनेमांमध्ये ङ्गार महत्वाच्या भूमिका मिळोत, ही शुभेच्छा!’’

***************

 ‘‘हे बघा पोरमारे...’’ राजकारणी मालक संपादकांना म्हणाले.
 ‘‘मोरमारे, साहेब मोरमारे...’’
 संपादकांची ही विनम्र नामदुरुस्ती मालकांच्या फारशी पचनी पडली नाही. त्यांची विचारशांखला तुटल्याने ते अस्वस्थ होऊन खेकसले, ‘‘तेच हो ते, काय फरक पडतो? तुम्ही कधी कॉकटेल प्यायलायत का, कॉकटेल?’’
 ‘‘नाही साहेब,’’ संपादक शहारून म्हणाले. या संस्थेत आपल्याला मिळत असलेल्या पगारात ऑफिसजवळच्याच एका कुडमुडया अण्णा बारमध्ये तीन वरिष्ठ सहकाऱयांबरोबर टीटीएमएम अर्थात ‘तुझे तू माझे मी’ तत्वावर इंडियन स्कॉच पिण्यापलीकडे काहीच परवडत नाही, त्यासाठी खास संपादकांसाठीच असलेल्या वार्तालापांच्या आमंत्रणांची वाट पाहावी लागते, हे मालकांना कुठल्या तोंडाने सांगणार, ‘‘फार चांगलं लागतं असं ऐकून आहे.’’
 ‘‘पिऊन बघा. फार मजा येते. तुमच्यासारख्या पत्रकारांनी फिरलं पाहिजे, जग पाहिलं पाहिजे, अनुभवलं पाहिजे. अनुभवाशिवाय लिहिलेल्या लिखाणाला वजन येत नाही, तीरमारे.’’
 ‘‘बरोबर आहे, साहेब’’ यापलीकडे संपादक बोलणार तरी काय होते. रोज सकाळी दहाच्या ठोक्याला ऑफिसात हजर झालेल्या संपादकाने रात्रीचं शेवटचं पान लावूनच निघालं पाहिजे, अशी मालकांची ऑर्डर होती. साप्ताहिक सुटीच्या दिवशीही काही ना काही अर्जंट काम किंवा मीटिंगचं निमित्त होऊन संपादकाला वाट्टेल त्या वेळेला कामावर हजर राहावं लागतच असे. ‘आता आणखी दोन तास थांबून छपाई झाल्यावर माझ्या गल्लीतला गठ्ठाच घेऊन जातो सोबत आणि घरोघर पेपर टाकूनच घरी जातो,’ असं संपादक विषादाने म्हणत, त्याला लोक विनोद समजून मोठमोठयाने हसत. संपादक झाल्यापासून संपादकांनी गेल्या अनेक दिवसांत आपल्या बायकोचा चेहरा नव्हता पाहिला नीट आणि मालक जग पाहण्याच्या गोष्टी करत होते.
 ‘‘हे कॉकटेल दिसतं एकदम फळांच्या रसासारखं, चवीलाही गोड- अगदी सरबत किंवा फळांचा रस चाखल्याचाच भास होतो, पण आत असते जहाल दारू’’ मालकांना आता वर्णनच चढू लागले होते, ‘‘पेपरसुद्धा असाच असला पाहिजे, ढोरमारे. आपला पेपर मुळात राजकीय पेपर आहे. तोही मवाळ पक्षाचा. तो कोण घेणार विकत? त्यात लोकांना हमखास आकर्षून घेईल असं काहीतरी खास पाहिजे. तुम्ही कॉकटेलचा विचार करा.’’
 ‘‘साहेब दारूविषयी पेपरात छापायचं म्हणजे...’’
 ‘‘कोणत्या गाढवानं संपादक केलं तुम्हाला फूलमारे?’’ या प्रश्नाचं उत्तर आठवल्यावर मालकांनी जीभ चावली आणि ते म्हणाले, ‘‘कॉकटेल म्हणजे दोन परस्परविरुद्ध वाटणाऱया दोन गोष्टींचं मिश्राण. आपल्या राज कपूरला ते फर्मास जमायचं बघा. त्याच्या सिनेमातल्या सगळया नटया पांढरी साडी नेसून धबधब्यात नहायच्या, तेव्हा काय दिसायचं?’’
 या प्रश्नाचं उत्तर देण्याच्या कल्पनेनेच मोरमारे गोरेमोरे झाले.
 ‘‘तुम्ही काय पाहायचात, हे नाही विचारलं मी, काय दिसायचं, ते सांगा?’’ मालकांनी मोरमारेंची विकेट काढली.
 ‘‘काय पाहणार साहेब, जे दाखवतात तेच पाहणार ना?’’
 ‘‘बरोबर आहे. राज कपूरला ठाऊक होतं की सगळं जग काय पाहणार. पण, तो धबधब्यात नाहणाऱया नायिकेच्या चेहऱयावर अगदी सात्विक भाव ठेवायचा. किती पवित्र स्नन करते आहे मी, किती निर्भर, किती स्वच्छंदी आहे मी, असा आनंद तिच्या चेहऱयावर असायचा. कुणी काही आक्षेप घेतले की तो सांगायचा, मी तिच्या चेहऱयावरची पवित्र उदात्त भावना दाखवतोय आणि तुम्ही भलतीकडेच पाहताय.’’
 ‘‘म्हणजे आपण तसले फोटो छापायचे?’’ मोरमारेंना आता हा कोडं उकलण्याचा खेळ असहय झाला होता.
 ‘‘अर्थातच छापायचे, चांगले पान पान भरून छापायचे, लोकांच्या डोळयांना सुख मिळालं पाहिजे, सगळया बुभुक्षितांचे डोळे निवले पाहिजेत, शेकले पाहिजेत,’’ मालकांनी विजयी हास्य करत ठासून सांगितलं आणि आपल्या डेस्कवरून काही कागद काढून संपादकांच्या हातात देत म्हणाले, ‘‘त्याच्या जोडीला आपण हेही जोरदार छापायचं, उदयापासूनच.’’
 संपादकांनी कागदाच्या चळतीवरून नजर टाकली आणि ते उडालेच. आत्मा-परमात्मा, इहलोक-परलोक, मुक्ती-मोक्ष, अदवैत वगैरे शब्द वाचताच ते न राहवून उद्गारले, ‘‘अरे बापरे, हे काहीतरी आध्यात्मिक फोकनाड दिसतंय.’’
 ‘‘करेक्ट. पण, याला मार्केट आहे. लोकांना असं देवाधर्माचं, आयुष्यात मार्गदर्शन वगैरे करणारं वाचायला भयंकर आवडतं. आपले लोक मुळात आळशी आहेत. त्यांना स्वत: विचार करायलासुद्धा आवडत नाही. त्यासाठी ते पेपर घेतात. शिवाय उठून देवळात जाण्याचेही कष्ट नकोत. त्यांना असं काही वाचलं की घरच्या घरीच मंदिराची घंटा वाजवल्याचं समाधान मिळतं. आपण पेपरात पाप आणि पुण्य अशा दोन्हीची सोय करायची. मस्त कचकचीत नटयांचे फोटो छापायचे. ते पाहून मनात पापविचार आलेच पाहिजेत. ते आले की लगेच संपादकीय पानावर हे आध्यात्मिक सदर वाचून पापक्षालन करायचं. एकाच पेपरात इकडे पाप, तिकडे पुण्य. कुणी आक्षेप घेतलाच की तुम्ही काय हे अश्लील फोटो छापताय, तर त्याला सांगायचं आम्ही हे आत्मा-परमात्मा सदर पण छापतो. तुम्ही ते का नाही बघत!’’
 ‘‘वा वा साहेब, काय आयडिया आहे ही. उदयापासूनच सुरू करतो हे सदर...’’ बोलता बोलता शब्दसंख्येचा अंदाज घेण्यासाठी संपादकांनी पानं उलटली आणि लेखकाचं नाव वाचून ते आणखी चाट पडले. ‘जगात प्रत्येक माणसाची काही तरी किंमत असते, ती मोजली की तो माणूस विकत घेता येतो,’ असं थोर तत्वज्ञान असलेल्या आणि त्या आधारावर माणसंच नाहीत तर मंत्रिमंडळं आणि सरकारं खिशात बाळगणाऱया एका थोर उदयोगपतीने लिहिलेला आध्यात्मिक मजकूर होता हा! एकेकाळी रिक्षा चालवणारा आणि गॅरेजमध्ये फडकी मारणारा हा माणूस राजकीय नेत्यांच्या सान्निध्यात आला आणि त्याने प्रस्थापित उदयोगपतींच्या लॉबीला हादरे देऊन देशातल्या सगळया उदयोगांमध्ये आघाडी घेतली होती. सगळया पक्षांमध्ये त्याची माणसं होती. सगळयांची किंमत चुकवून त्याने सगळं जगच मुठीत घेतलं होतं. पैसा, कीर्ती, यश, सत्ता यांच्या हव्यासाचं मूर्तिमंत उदाहरण असलेले हे गृहस्थ आता जगाला आध्यात्म शिकवणार, हे समजलं असतं तर तिकडे स्वर्गात क्षणभर इंद्राचं आसनही डळमळलं असतं. आपल्या पेपरचा म्हणावा तेवढा खप नसताना अचानक या उदयोगसमूहाच्या जाहिरातींचा रतीब आपल्याकडे कसा काय सुरू झाला, या प्रश्नाचं उत्तरही आता संपादकांना मिळालं. त्यांनी पुढयातले कागद ओढले आणि पैशांच्या राशीत लोळणाऱया माणसांचं आध्यात्म कसं असतं, ते वाचू लागले...

सोने नाणे आम्हा मृत्तिकेसमान!

 जगदगुरू तुकाराम महाराजांनी जे सांगितलंय, ते अतिशय खरं आहे. सोनं नाणं, पैसा, संपत्ती, ऐश्वर्य, हे सगळं कमावून माणसाला अखेरीस काय मिळणार आहे? आयुष्याच्या अखेरीला तो मातीतच जाणार आहे. या सगळयाचं मोल मातीइतकंच राहणार आहे. माझ्या आयुष्यात मी कायम तुकोबांच्या शिकवणीचाच अंगीकार केला आहे.
 माझा स्वभाव लहानपणापासूनच विरक्त आणि आध्यात्मिक. मला लहानपणापासून पैशांचा भयंकर तिरस्कार. कोणाकडेही पैसे दिसले की मला त्या विषाने त्या माणसाच्या आयुष्यावर कसा भयंकर परिणाम होणार आहे, याचीच चित्रं दिसायची. माझं पित्त खवळायचं. रागारागाने मी ते ताब्यात घ्यायचो आणि बेबंदपणे खर्चून टाकायचो. पैसा हा काळसर्पासारखा आहे, तो सोबत बाळगू नका, हा माझा आध्यात्मिक विचार त्या मूढांच्या लक्षात यायचा नाही. जगाच्या कल्याणासाठी विषप्राशन करून भगवान महादेवाचा फक्त कंठच काळानिळा झाला होता, माझं मात्र सगळं अंग काळंनिळं होत असे. आईवडिलांपासून शेजारीपाजारी, शाळेतले शिक्षक, दुकानदार असे सगळेच जण मला चोपून काढायचे. त्यांना मी चोर वाटत होतो. त्यांच्या पैशातून अतिशय जड अंत:करणाने आणि संपूर्ण विरक्त वृत्तीने मी जे काही अफाट खर्च करत होतो, ती त्यांना माझी चंगळ वाटत होती. भगवान श्रीकृष्ण जसे दहयादुधाची चोरी करून गोपगोपिकांना टंचाईचं आणि टंचाईतून निर्माण होणाऱया शाश्वत भाववाढीचं गुपित समजावून देत होते, तसाच मीही या संसारसुखाच्या कर्दमात लोळणाऱया माणसांना मोहमायेपासून मुक्त करण्यासाठी झटत होतो, हे त्यांच्या लक्षात आलं नाही.
 जयाअंगी मोठेपण, तया यातना कठीण, हे वचन आमच्या गल्लीतल्या जया नावाच्या जाडया मुलीला उद्देशून लिहिलेलं आहे, असं मला लहानपणी वाटायचं. ते मलाच लागू पडतं, हे माझी जेव्हा संगनमताने रिमांड होममध्ये रवानगी झाली, तेव्हा माझ्या लक्षात आलं. पण, या अनुभवांनी मी खचलो नाही आणि अध्यात्माच्या वाटेवरून ढळलो नाही. एक दिवस मी सगळया जगाला पैशाच्या मायेतून मुक्त करेन, असा मी विडाच उचलला. रिमांड होममधून बाहेर आल्यानंतर मी रिक्षा चालवणे, गॅरेजमध्ये काम करणे, वाहनांचे व्यवहार, जागांचे व्यवहार, बांधकाम क्षेत्र अशा मार्गांनी तथाकथित व्यावहारिक यशाची एकेक पायरी चढत गेलो. मीटर फास्ट करणे, गॅरेजमध्ये आलेल्या गाडयांचे चांगले पार्ट काढून घेणे, आतून खिळखिळी झालेली वाहने लोकांना विकणे, सिमेंटच्या जागी राख वापरणे, अशा वेगवेगळया मार्गांनी जास्तीत जास्त माणसांना पैशापासून मुक्त करण्याच्या ध्येयापासून मी कधीही ढळलो नाही. ज्याने ज्याने माझ्याबरोबर व्यवहार केला, त्याला त्याला मी पैशाने लाभणारे एकही सुख धडपणे मिळू दिले नाही. नको तो पैसा आणि नको तो व्याप, अशी भावना त्याच्या मनात निर्माण झालीच पाहिजे, असा माझा प्रयत्न असायचा.
 मला अनेकजण आजही विचारतात की तुमची इतकी विरक्त वृत्ती आहे, तर मग तुम्ही इतका पैसा का कमावलात? अशा माणसांना मी माझ्या सद्गुरूंचं, म्हणजे फुकडोजीमहाराज धुरांडे यांचं उदाहरण देतो. माझे सद्गुरू सतत बिडया फुंकत असत. त्यांच्याकडे भक्त दर्शनाला येत, त्यांनी गुरुमहाराजांसमोर पंचपक्वान्नं ठेवली, हिरेमाणकं ठेवली, सोनं नाणं ठेवलं, तरी महाराज लाथेने ती ताटं उडवून लावत. ते फक्त एकच प्रसाद स्वीकारत, विडया आणि सिगारेटींचा. त्यांच्या खोलीची प्रत्येक भिंत जगभरातल्या अनेक सिगारेटींच्या खोक्यांनी भरून गेलेली होती आणि खोली सतत धुराने भरलेली असे. सिगारेटची राख हाच त्यांचा प्रसाद होता, अधिक प्रसन्न झाले तर सिगारेटचा चटका देत. अनुग्रह झाला तर भक्ताच्या नकळत त्याचं शर्टच पेटवून देत. त्यांच्यासमोर एकदा एका भक्तानेही सिगारेट शिलगावली तेव्हा सद्गुरूंनी त्याच्या श्रीमुखात लगावली आणि ती सिगारेट हिसकावून स्वत: ओढू लागले. तो भक्त धाडस करून म्हणाला, ‘‘गुरुजी, हा दृष्टांत काय आहे?तुम्ही सिगारेट ओढता, ते चालतं, आम्ही ओढलेली चालत नाही, असं का?’’ त्यावर सद्गुरू म्हणाले, ‘‘गधडया, तुम्ही सिगारेट ओढता ती सिगारेटवर प्रेम आहे म्हणून. तुम्हाला तिची आवड आहे, ओढ आहे, ते तुमचं व्यसन आहे. पण, मी ओढतो तो माझा सिगारेटवर राग आहे म्हणून. तुम्हाला सिगारेट ओढण्याचं सुख हवंय. मला तिला संपवायचंय. एकीलाच नाही तर सगळयांना, जगातल्या सगळया सगळया सिगारेटी संपेपर्यंत माझा हा यज्ञ थांबणार नाही.’’ गेले बिचारे सदतिसाव्या वर्षीच. त्यांच्या शिल्लक सिगारेटींच्या चितेवरच जाळला त्यांचा देह. आजही त्यांच्या तसबिरीसमोर विडी सिगारेटीच शिलगावल्या जातात उदबत्त्यांच्या ऐवजी.
 या फुकडोजी धुरांडे महाराजांप्रमाणे मीही जो पैसा कमावतो आहे, बळकावतो आहे, खेचून घेतो आहे, हिसकावतो आहे, तो जगातून पैसा संपवण्यासाठी. या पैशाने माणसाचं सगळं जगणं बिघडवलेलं आहे, माणसाच्या सुखाच्या कल्पना बदलल्या आहेत. पूर्वी काही मोजक्या माणसांकडे पैसा असायचा आणि बाकीच्यांना त्यांची सेवा करण्यातच अपरंपार आनंद मिळायचा. आज हा सेवेचा आनंद लोपला आहे. ज्याला त्याला पैसा हवा आहे आणि पैशाची सुखं हवी आहेत. पैशाने कसलंही सुख मिळत नाही, हे माझ्याइतकं चांगलं कुणाला ठाऊक असणार, सांगा बरं.
 आज माझ्या घराचीच किंमत एक अब्ज डॉलर म्हणजे पन्नास अब्ज रुपये आहे. आम्हा चार माणसांसाठी आम्ही अठ्ठावीस मजली घर बांधलंय आणि सहाशे नोकर आहेत आमच्या घरात. म्हणजे एकेकाच्या वाटयाला सात सात मजले आणि दीडशे नोकर. प्रत्येकी पस्तीस गाडया, सात हेलिकॉप्टर आणि तीन प्रायव्हेट विमानं आहेत, ती वेगळीच. रोज नाश्त्याला पस्तीस आणि जेवणाला 75 पदार्थ असतात आमच्याकडे. पण, या पैशातून मिळणाऱया सुखांनी खरं सुख मिळत नाही, हे मी स्वानुभवाने सांगतो. माझ्याकडच्या महिना तीन चार हजार रुपये पगारावर दिवसाचे सोळा अठरा तास राबणाऱया कामगाराचा प्रॉव्हिडंट फंड मी भरतच नाही, त्याच्याकडून झालेल्या क्षुल्लक चुकीबद्दल त्यांचा पूर्ण दिवसाचा पगार कापून घेतो, माझ्या कंपनीमध्ये आपली आयुष्यभराची मिळकत गुंतवणाऱया भाबडया गुंतवणूकदारांचे पैसे मी कंपनीचे आतबट्टयाचे व्यवहार दाखवून बुडवतो, त्यांना देशोधडीला लावतो, तेव्हा मिळणाऱया आत्मिक सुखाची तुलना त्या परांच्या गादयागिरदयांवर लोळण्यातून मिळत नाही.
 जेव्हा जेव्हा मी अशा गोरगरीबांच्या मुंडया मुरगाळतो, तेव्हा तेव्हा मला मी प्रभूच्या आणखी जवळ गेलो आहे, अशी भावना होते. त्याच्या चरणांवर मी मनोमन नतमस्तक होतो आणि त्या कल्पनामूर्तीच्या पायात जर कोणा भक्ताने घातलेला सोन्यारूप्याचा दागिना असेलच, तर तोही मी मनोमन लंपास करतो. अशी आहे माझी अढळ प्रभूभक्ती.

*************** 

 ‘‘थांबा, थांबा, शांत व्हा,’’ वृत्तपत्रमालक संघटनेचे अध्यक्ष असलेल्या शेठजींनी आवाहन केलं आणि आसपास सुरु असलेला गलका थांबला. वर्तमानपत्रं ही क्षणाचा पेपर असल्याची अफवा पसरल्यानंतर सुमारे महिन्याभराने मालकांची ही सभा बोलावण्यात आली होती. मधल्या काळात सर्व मालकांनी आपापल्या वर्तमानपत्रात योग्य त्या सूचना देऊन कोणीही संपूर्ण रद्दीशिवाय काहीही छापणार नाही, याची खबरदारी घेतली होती. त्यामुळे सभेचा नूर अगदी आनंदी आणि समाधानाचा होता. ‘‘बंधूंनो आणि त्यांच्या भगिनींनो,’’ शेठजींनी त्यांचा अतिशय आवडता विनोद केला आणि तो 327व्या वेळेला ऐकत असूनही सगळे मालक हसले- स्वत:चे आणि एकमेकांचे पेपर चाळून तेही पुरेसे मठ्ठ झालेले होतेच- ‘‘ महिन्याभरापूर्वी छातीत धडकी भरवणारी ती नतद्रष्ट अफवा आल्यानंतर आपल्या संघटनेने त्वरित हालचाली करून व्यवसायाचा व्यवस्थित आढावा घेतला आणि मला सांगायला अतिशय आनंद वाटतो की कोणताही पेपर रद्दी छापण्याच्या आपल्या ब्रीदापासून ढळलेला नाही.’’
 अचानक एका बाणेदार पत्रकारितेसाठी प्रसिद्ध वर्तमानपत्रसमूहाचे मालक आधी खुसूखुसू आणि नंतर खदखदा हसू लागले. हसून हसून त्यांच्या डोळयांतून पाणी आलं. शेठजी म्हणाले, ‘‘अहो, दीनानाथशेठ, एकटेच का हसताय? आम्हालाही सांगा की काय झालं हसायला! आम्हीही हसू.’’ कसं बसं हसू आवरत दीनानाथशेठ म्हणाले, ‘‘तुम्हाला तर माहितीच आहे आमचा पेपर बाणेदार, तत्वनिष्ठ, निर्भीड म्हणून प्रसिद्ध आहे. मी आमच्या संपादकाला बोलावलं आणि म्हटलं, बाबा रे, आपण रद्दीच छापतो आहोत ना, याची खात्री करून घे. तसा तो उखडला आणि बाणेदारपणे मला म्हणाला, आम्ही अजिबात रद्दी छापत नाही आणि माझ्या संपादकत्वाखाली कधीही रद्दी छापली जाणार नाही. मी विचक्षण, साक्षेपी आणि विचारवंत संपादक म्हणून महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे.’’
 हे ऐकताच सभेत एकच कल्लोळ झाला. मालकाशी उर्मटपणे बोलू धजणारा आणि विचार बिचार करणारा संपादक तुम्ही नेमलातच कसा, हा आपल्या अलिखित कराराचा भंग आहे, असे संतप्त उद्गार निघू लागले. तसे दीनानाथशेठ म्हणाले, ‘‘शांत व्हा बंधूंनो, शांत व्हा. काळजीचं काहीएक कारण नाही. महाराष्ट्रात जगभरातली वैचारिक नियतकालिकं फार थोडया माणसांकडे येतात. ती वाचून त्यातल्या मजकुराचं प्रभावी भाषांतर करणाऱयाला विचारवंत पत्रकार म्हणतात. मग तो पंतप्रधानांना धोरण शिकवतो, मुख्यमंत्र्याला राजकारण शिकवतो, सचिनला क्रिकेट खेळायला शिकवतो, अमिताभला अभिनय शिकवतो, ऐश्वर्याला मेकअप शिकवतो, ओबामांना जग चालवायला शिकवतो, साहित्यिकांना लेखनकला शिकवतो- कुणालाही कसलाही सल्ला देण्याची पात्रता त्याच्या अंगात येते. शिवाय तो परखड टीका म्हणून कोणत्याही माणसावर दुगाण्या झाडू शकतो. आपला अभ्यास किती, आपल्याला कळतं किती, आपलं आकलन किती, यातल्या कशाचाही विचार न करता तो परखड टीकेच्या नावाखाली कुणावरही दुगाण्या झाडू शकतो.’’
 ‘‘बापरे, डेंजरस आहे हे. अशा माणसाला तुम्ही संपादकपदावर ठेवता. तो एखादया दिवशी काही वाचनीय लिहून बसला की मग कळेल,’’ राजकारणी मालक कातावले.
 ‘‘मलाही तसंच वाटलं होतं. पण मग माझ्या लक्षात आलं की त्याचा निम्मा वेळ प्रवासवर्णनात जातो आणि निम्मा व्यक्तिवर्णनात. म्हणजे पंतप्रधानांबरोबर जावा-सुमात्रा बेटांवर दीड तासाच्या शिखर संमेलनाला दीडशे संपादकांच्या ताफ्यातला एक म्हणून हा जाऊन येतो, तेव्हा तो तीन अग्रलेख लिहितो आणि रविवारच्या अंकात सात प्रवासवर्णनपर लेखांची मालिका. शिवाय मेजवानीच्या वेळी पंतप्रधानांनी आपल्याला खास बोलावून घेऊन आपल्याशी कशी व्यक्तिगत चर्चा केली आणि आपण पंतप्रधानांना कसा मौलिक सल्ला दिला, यावर एक विशेष लेख येतो, तो वेगळाच.’’
 ‘‘दीड तासाच्या भेटीवरून सात प्रवासवर्णनपर लेख! कमाल आहे,’’ मॅनेजिंग एडिटर खदखदा हसत म्हणाले, त्यावर दीनानाथशेठ म्हणाले, ‘‘अहो आमचे याआधीचे संपादक तर विमान ज्या देशांवरून उडत जायचं, त्या देशांचंही प्रवासवर्णन लिहायचे!’’
 ‘‘ते ठीक आहे, पण, तुमच्या संपादकाने रद्दी काढणार नाही, असं सांगितलंय, त्याचं काय?’’ शेठजींनी कातावून विचारलं.
 ‘‘अहो, तो जेवढं वैचारिक आणि विद्वत्ताप्रचुर लिहील, तेवढं चांगलंच नाही का? वाचकांना आता सतत हलकंफुलकं वाचून पातळ पचपचीत मजकूरच पचतो. ते असला आत्मप्रौढीने आणि अभिनिवेशाने भरलेला बोजड मजकूर कशाला वाचतील? ज्यांना त्याची आवड आहे, ते मूळ नियतकालिकं वाचतात इंग्रजीतून. संपादक जेवढा वाचनीय, वैचारिक अंक काढेल, तेवढा तो बाजारात रद्दीच ठरेल, नाही का?’’
‘बरोबर आहे, बरोबर आहे,’ असं म्हणत सगळया मालकांनी दीनानाथशेठजींच्या धोरणीपणाची तारीफ केली. 
तरीही शंकाकुशंकेला वाव नको, म्हणून सगळया वर्तमानपत्रांची एक वाचनपरीक्षा घेण्याचा विचार पुढे आला. वाचनाची खरोखरची आवड असलेला योग्य टार्गेट ऑडियन्समधला माणूस शोधताना फार त्रास झाला. एका डोंगरावर गुरं चारायला जाणाऱया सातवीतल्या एका शाळकरी मुलाची परीक्षेसाठी निवड झाली. त्याला रानात गाठून, त्याच्या हातात सर्व वर्तमानपत्रांचा गठ्ठा देण्यात आला. तो एकेक पेपर काढून, पाहून ‘रद्दी आहे नुसती’ म्हणून भिरकावू लागला, तसे एकेक करून सगळे मालक आनंदत गेले. शेवटचा पेपर त्याने भिरकावून दिला आणि इयत्ता दुसरीच्या त्या तुलनेत अत्यंत वाचनीय अशा पुस्तकात डोकं खुपसलं, तेव्हा सगळयांना हायसं वाटलं आणि सगळयांनी एकमेकांना टाळया दिल्या...
 ...मराठी वृत्तपत्रसृष्टीवरचं एक मोठं अरिष्ट टळलं म्हणून सर्व मालकांनी अवघ्या बारा रुपयांत बारा महिने एकशे वीस किलो पेपर देण्याची घोषणा केली.

चित्रे : निलेश जाधव

पूर्व-प्रसिद्धी : कॉमेडी कट्टा, दिवाळी २०१२

No comments:

Post a Comment