स्थळ : पुण्यातल्या फर्गसन महाविद्यालयाचं अँफीथिएटर
प्रसंग : आशय फिल्म क्लब आयोजित इंडियन पॅनोरमामधील चित्रपटांचा महोत्सव, साल 1990.
खास आकर्षण : नजर, दिग्दर्शक- मणी कौल
एक तर हा सिनेमा दस्तोयवस्कीच्या गोष्टीवर आधारलेला. दुसरं म्हणजे या सिनेमाचं पोस्टर एकदम आकर्षक. त्या काळातले बुद्धिवादी- विशेषत: बुद्धिवादी बायका ज्याच्यावर फिदा होत्या तो शेखर कपूर नायकाच्या भूमिकेत. तो आडवा पडलाय आणि त्याच्या डोक्याजवळ कोणीतरी पिस्तूल लावलंय, असं पोस्टरवरचं चित्र. हा काहीतरी थ्रिलर वगैरे असावा अशी मणी कौल या नावाशी आणि त्याच्या सिनेमाशी फारशी ओळख नसलेल्या नव्या दमाच्या उत्साही रसिकांची समजूत झाल्यानं फिल्म सोसायटीचा शो असूनही तो हाऊसफुल्ल आहे. आत जाणा-यांची लगबग पाहून फिल्म क्लबचे बुजुर्ग मेंबर गालातल्या गालात मिष्कीलपणे हसतायत.. विचारलं तर हसू आवरत सांगतात, मणी कौलचा सिनेमा म्हणजे काय चीज असते, ते आम्हाला ठाऊक आहे मित्रा!
सिनेमा सुरू होतो. पाण्याच्या छोटय़ा पाइपलाइनच्या एका जॉइंटचं दृश्य. पार्श्वसंगीत म्हणून विचित्रवीणा किंवा तत्सम एक वाद्य वाजतंय. ते एकसलग वाजत नाही. ‘टय़ँवढँव’.. शांतता.. ‘टय़ँवढय़ँवढय़ँवढय़ँवढय़ँव’.. शांतता
वाद्याचा झाला वेगवेगळा, असंगत. मधली शांतताही किती वेळाची असेल, ते पक्कं नाही. मागे कोणीतरी एकसुरी आवाजात काहीतरी बोलतंय.. हे स्वगत अतिशय बोजड, दुबरेधतेकडे झुकणा-या भाषेतलं आहे आणि ते बोलणा-याच्या आवाजात काहीही आरोह-अवरोह नाहीत, त्यामुळे काहीही कळत नाहीये. कॅमेरा आता हलून त्या पाइपलाइनवरून ती पाइपलाइन धरून पुढेपुढे जातोय, ही एखाद्या टेरेसवरची पाण्याची पाइपलाइन असावी.. आता कॅमेरा एका माणसाच्या पायावर, तिथून वर.. हा शेखर कपूर कपूर आहे आणि तोच बोलतोय.. मागे मधूनच वाजणारं पार्श्वसंगीत आहेच..
यापुढे सिनेमात काय घडतं?
ठाऊक नाही.
कारण, पुढचा सिनेमा पाहिलाच नाही.
सुरू झाल्यानंतर तिस-या मिनिटाला सोडलेला हा एकमेव सिनेमा. तिस-या मिनिटापासून दहाव्या मिनिटापर्यंतच्या काळात संपूर्ण थिएटर रिकामं होऊन जातं. काही कट्टर चित्रपटकंडून (हा चित्रपट चळवळीतला खास शब्द) वगळता बाकी सगळे बाहेर. सगळ्यांच्या चेह-यावर एकाच वेळी सुटकेचा भाव आणि आपण आपल्या मठ्ठपणामुळे फार भारी सिनेमाला मुकतोय की काय याबद्दलचा संभ्रम. फिल्म सोसायटीचे सदस्य असताना ‘वेगळा’ सिनेमा सहन करण्याची आपली शक्ती इतकी कमी कशी, याबद्दलची शरमही काहीजणांच्या चेह-यांवर दिसते.. काही बेशरम लोक ‘मणी कौलच्या आबाचा ढोल’ म्हणून सिग्रेटी फुंकत कटिंग मारायला नाक्यावर निघून जातात..
फिल्म सोसायटीचा ऑडियन्स तसा अगदीच नवख्या मंडळींचा नसतो. सिनेमातून मनोरंजन झालं पाहिजे, ही बालबुद्धीची अपेक्षा मागे सोडून आलेले लोकच त्या फंदात पडतात. सिनेमा कळलाच पाहिजे, अशीही त्यांची अपेक्षा नसते. मात्र, समोरच्या दृश्य-ध्वनीच्या मेळातून आत काहीतरी पोहोचलं पाहिजे, ही एक माफक अपेक्षा असते. उदाहरणार्थ, तारकोवस्कीच्या ‘स्टॉकर’ नावाच्या सिनेमात एका रेल्वे लाइनच्या कडेनं दोन माणसं एकमेकांशी बोलत चालत राहतात.. संपूर्ण सिनेमाभर फक्त हेच घडतं. त्यांचं बोलणं तत्त्वप्रचुर असल्यानं फारसं कळत नाही- सामाजिक संदर्भ परके- तरीही सिनेमा सोडवत नाही. गोदारच्या ‘वीकेण्ड’मधला सुप्रसिद्ध ट्रॅफिक जॅमचा सीन सलग आठ मिनिटांचा आहे.. एका रस्त्यावर ट्रॅफिक जॅम झाला आहे आणि कॅमेरा कडेकडेने त्या जॅमची क्षणचित्रं टिपत एका संथ लयीनं चाललाय.. चाललाय.. चाललाय.. तो सीनही सोडून उठावंसं वाटलं नव्हतं..
मग ‘नजर’ का पाहवला नाही? शेखर कपूर आणि ते पोस्टर फारच मनावर घेतलं? त्यातून चुकीच्या अपेक्षा निर्माण झाल्या?
नंतर या सिनेमाबद्दल वाचल्यानंतर त्यातला प्रयोग समजला. तो असा होता की कोणत्याही व्यक्तिरेखेने संवादांमध्ये आवाजातून, चेहऱ्यावरच्या भावछटांमधून नाटय़मयता आणायचीच नाही. बातम्या वाचल्याप्रमाणे एका लयीत, को-या चेह-याने, निर्जीवपणे संवाद ‘वाचायचे’. म्हणजे प्रेक्षकाचा वाचक करायचा. पुस्तक वाचत असल्याप्रमाणे अनुभव द्यायचा. भावपरिपोषाची जबाबदारी ज्याची त्याची!
एखाद्या माणसानं समोरच्याशी बोलताना फक्त एवढंच म्हणावं की ‘आधी असं झालं (मोठ्ठा पॉझ) आणि मग तसं झालं.. कळलं ना?’ तर समोरच्याला काय कळणार? त्यात बोलणा-याला आपण काय म्हणणार होतो, हे त्याच्या पॉझमधल्या मौनात त्याच्या मनात उमटून गेल्यामुळे माहिती असते.. त्याच्या दृष्टीनं संवादाची प्रक्रिया पूर्ण झाली.. समोरच्याला ते मौनातूनच कळलं नाही तर तो त्याचा प्रॉब्लेम. अशी काहीशी सिनेमाची ढब.
आता विचार करा. एकदम वेगळं, मेंदू झिणझिणवणारं असंच काहीतरी पाहायची तयारी करून गेलो असतो, तर तो सिनेमा संपूर्ण पाहता आला असता का? कारण, तुमचा मेंदू झिणझिणवणं हेही माझं काम नाही, असं मणी कौलचं म्हणणं असू शकतं. तसं असेल तर काय करायचं?
मी प्रेक्षकांसाठी सिनेमा बनवतच नाही, असं- एकेकाळी अतिशय गाजलेलं विधान त्यानं केलंच होतं..
कोणत्याही कलाकाराची कलात्मक निर्मिती ही तो सोडून कोणाच्या ना कोणाच्या आस्वादनासाठी नसेल, तर ती स्वत:त परिपूर्ण असू शकते का? एखाद्या लेखकानं एखादी गोष्ट लिहून संपवली, तर तो पेन उचलेल तिथे लेखनाची प्रक्रिया संपली असेल; पण, सर्जनाची प्रक्रिया आस्वादनाशिवाय कशी पूर्ण होऊ शकेल?
सर्जकानं ‘माझिया जातीचे..’ असं म्हटलं तर ठीक आहे..माझी कला माझ्यापुरतीच, असं कसं होऊ शकतं?
त्यात सिनेमा ही कला म्हणजे तर अनेक कला आणि तंत्रं यांचा समुच्चय, एका संघाची एकत्रित कामगिरी. दिग्दर्शक हा कॅप्टन ऑफ द शिप. सिनेमा त्याच्या मनाच्या पडद्यावर आधी उमटतो, नंतर त्याबरहुकूम आकार घेतो हे खरं असलं तरी तो आकार देणारे हात अनेक. त्यातला प्रमुख माणूसही सिनेमा प्रेक्षकांसाठी नाही, असं कसं म्हणू शकेल?
बरं सिनेमा ही निव्वळ कला नाही. तो कलाआधारित व्यवसाय आहे. कारण, हे स्वस्त माध्यम नाही. सगळे ओव्हरहेड्स म्हणजे अवाजवी खर्च टाळले तरी सिनेमा बनवायला त्या काळातही काही लाख रुपये लागत होते. किमान खर्चाची वसुली होण्याइतपत व्यवसाय होणार नसेल, तर सिनेमा काढणाऱ्याला सिनेमा काढायला पैसे कोण देणार?
त्यात तो तो सिंगल स्क्रीन थिएटरांचा काळ. एका वेळी पाच-सातशे माणसांनी एकत्र सिनेमा पाहण्याचीच व्यवस्था. त्यामुळे सगळ्यांच्या बुद्धीचा मसावि काढून (तो साधारण पाचवी ते सातवीपर्यंतचा येतो) त्यांना रुचेल असा सिनेमा काढला नाही, तर काढणारा आणि त्याच्या सर्जनासाठी पैसे देणारा हे दोघेही बुडालेच. अशा काळात, मी प्रेक्षकांसाठी सिनेमा काढत नाही, असं म्हणणं हे अनेकार्थानी धाडसच होतं.. पण, ते मणी कौलच्या सिनेमानिर्मितीसाठी फायनान्स करण्याच्या धाडसापेक्षा मोठं धाडस नसणार.. मणी कौलचा सिनेमा पाहण्याचं धाडस हा आणखी एक वेगळा प्रकार होताच..
भारतासारख्या लांगूलचालनाच्या पातळीवर जाणा-या प्रेक्षकानुनयी चित्रपटक्षेत्राच्या देशात अशा पद्धतीचा ‘स्वान्तसुखाय सिनेमा’ करणा-या दिग्दर्शकाला तब्बल 11 चित्रकृती तयार करता आल्या, ही मोठी गोष्ट म्हणायला हवी. कमी संख्येच्या अतिविशिष्ट प्रेक्षकवर्गालाही सिनेमा पाहण्याची सोय पुरवणा-या मल्टिप्लेक्सेसच्या काळात मणी कौल यांचे सिनेमे रिलीज झाले असते, तर कदाचित मणी कौलना त्यांच्या प्रेक्षकापर्यंत नेमकेपणानं पोहोचता आलं असतं आणि आपला सिनेमा प्रेक्षकांनी पाहिला तरी हरकत नाही, इतपत तरी त्यांचं मत सौम्य झालं असतं.(चित्र : प्रदीप म्हापसेकर)
No comments:
Post a Comment