चांगली गोष्ट अशी की आता चवली-पावलीचे हिशोब ठेवायला लागणार नाहीत..
वाईट गोष्ट अशी की आता कोणीपण आपल्याला म्हणजे आपल्या देशालाच पावली कम म्हणू शकतो..
आपण स्वखुशीनेच आपल्या पावलीचा त्याग केला आहे. पंचवीस पैसे ऊर्फ चवली ऊर्फ चार आणे हे आता नाणेरूपाने चलनातून अधिकृतपणे बाद झाले आहेत. ते पैसारूपाने व्यवहारातून आणि त्यामुळे लोकांच्या स्मरणातून तर केव्हाच बाद झाले होते. आता निधनाची अधिकृत घोषणा झाली, इतकंच.
एखादे पंच्याण्णव वर्षाचे महामहोपाध्याय, 92 वर्षाची थोर लेखिका किंवा 98 वर्षआंचे तत्त्वज्ञ मरण पावल्याची बातमी वाचल्यानंतर जशी, ते हयात होते हीच बातमी आधी समजते आणि ‘अरेच्या, ते होते का, इतके दिवस मला वाटलं होतं की कधीच गेले असतील’ अशीच भावना मनात येते, तसंच पावलीचंही झालं.
सहाजिकच आहे म्हणा! लाकडं योग्य जागी पोहोचून पार सुकून गेली असतानाही राजकारणात काडय़ा घालण्यात सक्रिय वयोवृद्ध नेते आणि भगवं कातडं पांघरून अध्यात्माच्या गुहेत भक्तजनांची कळपांनी शिकार करणारे बुवा-बापू-महाराज-माँ आणि स्वघोषित चौथी नापास जगद्गुरू यांच्यासारखे गणंग कोणत्याही वयात मरण पावले तरी पब्लिक मेमरीला त्यांचं विस्मरण होत नाही. हे म्हटलं तर वरदान आणि म्हटलं तर शाप. वरदान अशासाठी की प्रसिद्धीचा भस्म्या रोग जडलेल्या या मंडळींना ती अखेपर्यंत लाभते. शाप अशासाठी की त्यांचे मरणोत्तर वाभाडेही बातमीमूल्यामुळे लोकांपर्यंत पोहोचत राहतात आणि भाबडे अंधभक्त वगळता बाकीच्यांना त्यांच्या भंपकपणाची मरणोत्तर का होईना खूण पटत जाते.
सरळ मार्गाने जगून सरळपणे मरण पावलेल्या कोणाच्याही नशिबात अशी प्रसिद्धी नसते. पावलीही बिचारी इमानाने जगली आणि इमानाने संपली. पावलोपावली तिची आठवण यावी अशी पावलीची स्थिती हल्लीच्या काळात राहिली नव्हती. विचार करा, पावली चलनात होती, याला अलीकडच्या काळात काय अर्थ होता? काय मिळत होतं पावलीला? काहीही नाही. डिझेल-पेट्रोल-गॅसच्या भावात रूपयांमध्ये वाढ होते, तेव्हा सरकार एखाद्या चवली-पावलीची भरघोस सवलत देतं, तेवढय़ापुरता आणि तसल्याच आर्थिक चालूगिरीपुरता तिचा उपयोग होता. बाकी ही चवली अनेक र्वष कोणाच्याही गिनतीत नव्हती.
एकेकाळी याच पावलीचा काय रूबाब होता! तिला खास किंमत होती ती देवाधर्मामुळे. कुठेही मध्यस्थाला ‘दक्षिणा’ दिल्याखेरीज काम पुढे सरकत नाही, या सनातन सिद्धांताची सुरुवातच मुळात आपल्याकडे देवळापासून होते. कुठूनही भक्तिभावाने हात जोडून डोळे मिटून प्रार्थना केली तर ती देवापर्यंत पोहोचतेच, हे नुसतं सांगायला. देवाकडून आडमार्गानं काही पदरात पाडून घ्यायचं, तर ‘वजन’ ठेवावंच लागतं. मग देवाला अभिषेक, वस्त्र, अलंकार, श्रीफळ, धूप-दीपाचं आमिष आणि देवाच्या एजंटापुढे रोकड दक्षिणा हा व्यवहार कोणत्याही व्यवहारी भक्ताने कधी चुकवलेला नाही. या दक्षिणेत ‘सव्वा’कीला फार महत्त्व. नुसता एक रुपया म्हणजे झाली साधी रक्कम. सव्वा रुपया- दक्षिणा. अकरा रुपये ही नुसतीच रक्कम. सव्वा अकरा रुपये दक्षिणा. डोळ्यांपुढे चित्र आणून पहा. तबक, तबकात अक्षता, हळद, कुंकू, दिवा आणि नुसतीच एक नोट किंवा अनेक नोटा.. चित्र अपूर्ण वाटतं. त्या सगळय़ा नोटांवर एक रुपयाचं एक आणि चार आण्याचं एक अशी दोन नाणी आली की चित्र कसं सुफळ संपूर्ण होतं. ही सव्वाकीची दोन नाणी म्हणजे जणू देवाच्या दरबारातलं वजन.
हे वजन देवाच्या दरबाराबाहेरही चांगलंच वजनदार होतं. चार चवल्या फेकल्या की फडावर नटरंगी नारही नाचू लागायची. घरोघरची पोरं मिसरूड, आवाज आणि शिंगं एकसमयावच्छेदेकरून फुटण्याच्या वयाची होऊन वाडवडिलांच्या वरचढ आवाज चढवून बोलत्साती झाली की मोठय़ा माणसांकडून हुकमी बार निघायचा, ‘‘चार चव्वल कमावण्याची अक्कल नाही आणि निघाले मोठय़ा माणसांना शहाणपणा शिकवायला.’’
चार चव्वल म्हणजे सोळा आणे म्हणजे एक रुपया. त्या एका रुपयात किमान एका माणसाचं दोन वेळचं पोट भरण्याची सोय होती. असा तो काळ.. ..कोणत्याही लेखात ‘तो काळ’ असा शब्दप्रयोग आला की वाचक एकदम स्तब्धप्रयोगात जातो. आता पुढे फुसकट आणि फुळकट स्मरणरंजनाच्या गढूळ डबक्यात नाकातोंडात पाणी जाईपर्यंत गटांगळ्या खाव्या लागणार, अशी भीती वाचकाच्या मनात दाटून येते आणि ती बव्हंशी खरी ठरते. एकदा ‘चार आणे’ हा दळणविषय ठरला की चार आण्यात पाच किलो गहू दळून मिळत होते, चार आण्यात २५ साखरगोळ्या मिळत, दोन पेरू किंवा चार चिंचा मिळत, इथपासून ते ‘चार आण्याचे तीन आणले, काय गं तुम्ही केले?’ (संदर्भ : दादा कोंडके यांचे ‘काशी गं काशी’ हे प्रौढशिक्षणपर लोकगीत) इथपर्यंतचे सगळे संदर्भ लेखात कांडून काढता येतात. (दादा कोंडके यांच्या गीताच्या उल्लेखाने शैक्षणिक उत्सुकता चाळवली गेली असणारच- ‘चार आण्याचे तीन’ ही तेव्हा सरकारने ‘लोकप्रिय’ करायला घेतलेल्या गर्भनिरोधकांची किंमत होती आणि दादांच्या काशीने ‘ते फुगे समजून पोरांना वाटले’ अशा आशयाचे उत्तर देऊन रसिकांच्या तोंडाला फेस आणला होता.) मोले घातले रडाया, अशा आविर्भावातला ‘पावली आमची गेली हो, कित्ती चांगली होती, किती आनंदाचे दिवस दाखवले होते तिनं,’ अशा आकं्रदनाचा पावलीला पसाभर मजकूर हुकमी रडवय्ये लेखक बुंदी पाडाव्या तसा पाडतात. अशा मजकुराची चार आण्याचीही पत नसते आणि चार आण्याला पत असण्याचा काळही कधीच इतिहासजमा झाला.
पावलीला पत आणि किंमत होती, तो काळ गेला तर काय बिघडलं? पावलीला शेरभर दूध आणि दोन शेर साखर कशी मिळायची वगैरे स्वस्ताईच्या कहाण्या किती ऐकवायच्या? दोन पावल्यांमध्ये वडा पाव मिळत होता, त्या काळात पाचशे रुपये पगारात पाच माणसांच्या निम्नवर्गीय कुटुंबाचा महिन्याचा खर्च भागत होता. आता वडापाव पाच-सात रुपयांवर आला असला, तरी कमीत कमी पगारही पाच-दहा हजार रुपयांच्या घरात आले आहेतच की! उगा कशाला हळहळून रडून गागून दाखवायचं?
बरोबर आहे. माणसांचे पगार हजारांमध्ये गेले आहेत, हे खरंच आहे. पण, एक लाख रुपये दरमहा कमावणाऱ्या माणसालाही मुंबईत तीन खोल्यांचं घर घेता येत नाही, त्याचं काय? माणसांच्या हातात किंवा बँकेच्या खात्यात एकावर अनेक वाढत्या शून्यांचे पगार-मेहनताने जमा होतात पण त्यांच्या विनियोगातून जीवनमान काही उंचावत नाही. मग त्या चलनाचा आणि ते भरपूर मिळण्याचा उपयोग काय? झिंबाब्वे नामक देशात एका अमेरिकन डॉलरच्या बदल्यात त्या देशातले 16 लाख डॉलर मिळतात, तशीच गत व्हायची. आपल्या देशाच्या ‘प्रगती’ची अशीच गती राहिली, तर आजच लक्षाधीश झालेले पगारदार हळूहळू कोटय़धीशही होतील. मात्र, तेव्हा मुंबईतलं घर मात्र 100 कोटी रुपयांचं झालं असेल.. आपल्या आटोक्याच्या बाहेरच.
तेव्हा 25 रुपयांना पावलीची किंमत असेल आणि 10 रुपयांची नोट चलनातून बाद होत असल्याच्या बातम्या छापून येत असतील..
..बिचारे रुपये आणि त्याहून बिचा-या त्यांच्या कागदी नोटा.. स्मरणरंजनाच्या बाजारात त्यांना चवली-पावलीची सोडा; एक-दोन नया पैशांचीही किंमत नाही.(प्रहार, ३ जुलै, २०११)
मी बऱ्याच मरणाला गेलो. प्रेतावर खऱ्या फुलांच्या हारासोबत उधळलेली खोटी स्तुतिसुमने ऐकायला मिळाली . पण तू पावलीला वाहिलेली श्रद्धांजली हृदयात कालवाकालव करून गेली.पावली खरी होती पावसाला दिलेल्या पैश्या सारखी खोटी नव्हती . शेवटी तीझेही हाल झाले म्हणे.धातूंच्या वाढलेल्या किमतीमुळे कित्येक पावल्यानं मारून murakatun वितळवून संपवल्या म्हणे.असो ..तू अर्पिलेल्या श्राद्धांजलीमुळे पावली अनंत काळासाठी स्मर्नाथ राहील.
ReplyDelete