Thursday, February 10, 2011

तो मी नव्हेच!

न्यायमूर्ती महाराज,
 
गेले दोन दिवस मी माझ्यावरचे सगळे लेखन वाचतो आहे, लोकांचं बोलणं ऐकतो आहे. काय म्हणताहेत हे लोक माझ्याबद्दल? कोणी मला ‘लखोबा लोखंडे’ म्हणतो, तर कोणी माझा ‘बहुरूपी’ असा उल्लेख करतो. अनेक गैरकृत्ये करून नामानिराळा राहणारा आणि ‘तो मी नव्हेच’ असा कानावर हात ठेवणारा नराधम तो मीच, अशी सगळीकडे बोलवा झालेली आहे. ही भयंकर दूषणे ऐकून माझ्या हृदयाला किती यातना होत आहेत, काय सांगू? अहो, फुलासारखं कोमल हृदय लाभलेला मी एक साधा, निर्मळ माणूस होतो. एक अभिनेता, ज्याने आपलं सारं कौशल्य पणाला लावून स्वत:शीच पैज घेतली, एकाच व्यक्तिरेखेचे पाच वेगवेगळे चेहरे साकारण्याची. बस्स! पण, आज अभिनयकौशल्य हाच माझा गुन्हा झाला आहे. हा कलंक पुसून काढण्यासाठी मी आज एक वेगळाच ‘पंचरंगी’ प्रयोग करणार आहे. आपल्या अवतीभवती वावरणा-या आणि ‘तो मी नव्हेच’चे जिवंत प्रयोग करणा-या  या पाच महानुभावांचं दर्शन आपण घ्या आणि मग माझा अपराध यांच्यापेक्षा मोठा आहे काय, याचा निवाडा करा.
 
(अंधार होत जातो. समोरचा अंधारा अवकाश प्रकाशमान होतो. एक सूटबूट घातलेला, रोज जॉगिंग केल्यामुळे तरुण आणि फिट दिसणारा, केस मागे वळवलेला इसम एका बाजूने येतो. दुस-या बाजूने त्याहून भारी सूटबूट घातलेला, रोज सकाळी जॉगिंग न केल्यामुळे फिट न दिसणारा पण त्याची फारशी फिकीर नसलेला जाडगेलासा इसम येतो.)
 
पहिला सूट : माय रिस्पेक्टेड एल्डर ब्रदर..
 
(दुसरा दुर्लक्ष करतो. पहिला दुस-याच्या खांद्याला स्पर्श करून पुन्हा बोलतो.) माय रिस्पेक्टेड एल्डर ब्रदर..
 
दुसरा सूट (छद्मीपणाने हसून) : एक्स्क्यूज मी! डु वी नो ईच अदर?
 
पहिला सूट : असं बोलू नकोस बडे भय्या! मी तुझा धाकटा भाऊ आहे. तू माझा आदरणीय मोठा भाऊ आहेस.
 
दुसरा सूट : हे जैविक सत्य आहे. पण मी ‘रिस्पेक्टेड’ झालो, याची जरा गंमत वाटतेय. अवघ्या काही वर्षापूर्वी..
 
पहिला सूट : दादा, ते विसर ना.
 
दुसरा सूट : नन्हे, कसं विसरू? मी विसरेन, पण ती माऊली, जिनं आपल्याला जन्म दिला, तिच्या पोटचा गोळा तू आणि तूच तिला डागण्या दिल्यास, ती ते कसं विसरेल?
 
पहिला सूट : सॉरी फॉर इंटरप्शन, सध्या कितव्या मजल्यावर राहते ती, दादा तुमच्या पाच माणसांच्या 27 मजली महालात?
 
दुसरा सूट : एक्झॅक्ट लोकेशन ठाऊक नाही. तीन दिवसांपूर्वी दोन नोकरांनी 17व्या मजल्यावर पाहिलं होतं म्हणे तिला. पण, ते सोड. तू विषयांतर करू नकोस. मेरे बाप का सपना..
 
पहिला सूट : दादा, ते माझेही पूज्य पिताश्री होते..
 
दुसरा सूट : ठीकाय.. हमारे बाप का सपना तूने तोड डाला. चक्काचूर केलास त्या सगळ्याचा. जगभर आपली छी थू झाली. एका कंपनीच्या दोन कंपन्या झाल्या.
 
पहिला सूट : त्याने काय बिघडलं दादा? उलट दोघांचाही फायदाच नाही का झाला?
 
दुसरा सूट : म्हणजे?
 
पहिला सूट : आपण वडिलांचीच कंपनी एकदिलानं चालवली असती, तर लोकांनी आपल्याकडे राजश्री प्रॉडक्शनच्या मचूळ गुळगुळीत कौंटुंबिकपटाप्रमाणे पाठ फिरवली असती. आता आपण ‘गंगा जमना’ आणि ‘दीवार’सारखे सुपरहिट भाऊ झालो आहोत, हे तू लक्षात का घेत नाहीस? तुझी कंपनी आणि माझी कंपनी मिळून आपली जेवढी मालमत्ता झाली आहे, तेवढी एकाच कंपनीची असली असती का?
 
दुसरा सूट : माय गॉड! हे माझ्या लक्षातच आलं नव्हतं. पण, तू वाईट वागलास, ते नाटक नव्हतं, खोटं नव्हतं.
 
पहिला सूट : मान्य. मला तुझ्याबद्दल रत्तीभरही प्रेम तेव्हाही नव्हतं आणि आजही नाही. पण, त्यातून दोघांचंही भलंच झालंय
.
दुसरा सूट : प्रेमच नाही तर हे ‘रिस्पेक्टेबल’चं नाटक का?
 
पहिला सूट : आपण कटथ्रोट काँपिटिटर आहोत, ही भावना आपल्या शेअरहोल्डरांसाठी चांगली नाही. सतत टीव्ही बघून त्यांच्या भाबडय़ा अपेक्षा तयार होतात की, भाऊ भाऊ पुन्हा एकत्र यावेत. टीआरपी सांभाळायचा तर हेही करावं लागणार.
 
दुसरा सूट : अरे, पण लोक आपल्याला विचारतील की तू भावाशी कचाकचा भांडला होतास, त्याचं काय?
 
पहिला सूट : त्याचं उत्तर एकदम सिंपल.. (कानावर हात ठेवून) तो मी नव्हेच!
 
(अंधार होतो. पुन्हा प्रकाश येतो, तेव्हा शर्टावर हाफ बाह्यांचा स्वेटर घातलेला, करारी नजरेचा, धारदार नाक, त्यावर चष्मा आणि नजरेत गुर्मी असा एक येतो. दुस-या बाजूने सुरवारीवर कुर्ता घातलेला, मवाळ नजरेचा, धार नसलेलं नाक आणि त्यावर चष्मा, नजरेत हरवल्याचे भाव असा दुसरा येतो.)
 स्वेटर : माय रिस्पेक्टेड एल्डर ब्रदर..
(कुर्ता दुसरीकडेच पाहतो. स्वेटर कुर्त्यांच्या खांद्याला स्पर्श करून पुन्हा बोलतो.) माय रिस्पेक्टेड एल्डर ब्रदर..
 
कुर्ता (छद्मीपणाने हसून) : कोण तुम्ही?
 
स्वेटर : दादू, असं टाकून बोलू नकोस! तू माझा आदरणीय मोठा भाऊ आहेस.
 
कुर्ता : चुलतभाऊ असणं मी नाकारू शकत नाही. पण, तुझ्या विठ्ठलाचा ‘हेड बडवा’ असलेला मी एकदम आदरणीय झालो? अवघ्या काही वर्षापूर्वी..
 
स्वेटर : दादू, ते विसर ना.
 
कुर्ता : विसरू? कसं विसरू? अरे, एकवेळ मी विसरू शकेन, पण, ती विठुमाऊली, अवघ्या महाराष्ट्राची साऊली, तुला मांडीवर घेऊन खेळवलं आणि तू त्याच मांडीवर मु.. अं अं.. घाण केलीस, ती कसं विसरेल?
 
स्वेटर : दादू, तब मैं छोटा था.
 
कुर्ता : और मैं क्या बडा था? बाबा माझा आणि मांडीवर तू!
 
स्वेटर : आता काही मुलांचं रंगरूपच असं असतं की कोणालाही त्यांना बघून उचलून घ्यावंसं वाटतं.. त्यांचे लाड करावेसे वाटतात. काही मुलांना पाहिलं की त्यांच्या ढुं.. अं अं.. पार्श्वभागावर रट्टेच द्यायची इच्छा होते.
 
कुर्ता : हे बघ, तू मला बालपणीच्या गोष्टी सांगून इमोशनल करू नकोस. तू केलेल्या ज्या घाणीबद्दल बोलतोय ती लहानपणीची नाही. हल्ली, काही वर्षापूर्वी जी केलीस ती घाण. विठुमाऊलीच्या स्वप्नांचा चक्काचूर करून टाकलास. एका पक्षाचे दोन तुकडे करून टाकलेस.
 
स्वेटर : च्यामारी दाद्या, विठोबाच्या मांडीवर बसून सगळी विद्या मी शिकलो, खस्ता मी खाल्ल्या, आम्ही घासली आणि तू लेटकरंट कधीच्या काळात उगवलास आणि मला ढकलून डायरेक्ट मांडीवर जाऊन बसलास?
 
कुर्ता : तुझ्याच शब्दात सांगायचं तर ‘मौका सभी को मिलता है..’ मला मिळाला, मी साधला. नाहीतरी माझ्या बाबांची मांडी होती, माझा अधिकार होता.
 
स्वेटर : बस बाबा बस, आयुष्यभर बस. माझ्यासाठी भरपूर आहेत..
 
कुर्ता : काय?
 
स्वेटर : आसनं.. आणि दादू, जरा विचार कर. आपण एकच पक्ष एकदिलानं चालवला असता, तर लोकांनी आपल्याला पिळपिळीत गांधीवादी मानलं नसतं का? आता आपण एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेले दोन डॅशिंग भाऊ वाटतो.. म्हणजे मी डॅशिंग आहेच, तू वाटतोस. आपण दोघेही हिट आहोत
.
कुर्ता : पण, तू सुपरहिट आहेस. लाखालाखांची गर्दी जमवतोस.
 
स्वेटर : आता मी हँडसम आहे, फर्डा वक्ता आहे, टायमिंगचा मला सेन्स आहे.. थोडक्यात मी तुझ्यापेक्षा हुशार आहे, हे सारखं सारखं सांगून तू मला एम्बॅरॅस करू नकोस. आय हेट स्तुती दादू, आय हेट स्तुती.
 
कुर्ता : छोटय़ा, फार जीभ सैल सोडू नकोस. हे रिस्पेक्टेबलचं नाटक काय आहे ते सांग.
 
स्वेटर : ह्यूमन टच दादू ह्यूमन टच. अरे, आपल्या दोघांच्याही पक्षांत फार भावनाशील लोक आहेत. जरा भावुक झाले की काचा तोडतात, डोकी फोडतात.. अशा माणसांना हाडवैऱ्यांमध्येही असा माणुसकीचा, नातेसंबंधांचा ओलावा दिसला की बरं वाटतं. म्हणूनच मी मधूनमधून तुझ्या पक्षाला मदत होईल, असं वागत असतो. तूही अलीकडेच केलीस तशी माझी पाठराखण करत राहा.
 
कुर्ता : अरे, पण लोक आपल्याला विचारतील, की तू भावाशी कचाकचा भांडला होतास, त्याचं काय?
 
स्वेटर : त्याचं उत्तर एकदम सिंपल.. (कानावर हात ठेवून) तो मी नव्हेच!
 
(पुन्हा अंधार. उजेडात एक क्रिकेटचा पोषाख आणि वर मुंडासं घातलेला धिप्पाड, उतारवयीन माणूस येतो. अंधारातून आवाज येतात : कांदा कडाडला, साहेब, कांदा कडाडला.)
 
साहेब : धीर धरा. ही टी ट्वेंटी मॅच नाही. कसोटीची वेळ आहे. थोडी कळ काढा. 15 तारखेला कांदा स्वस्त होईल.
 
(पुन्हा अंधार. पुन्हा उजेडात साहेब. अंधारातून आवाज येतात : ‘‘तुमची तारीख उलटून गेली साहेब, कांदा उतरला नाही, आणखी कडाडला.’’)
 
साहेब : असली भाकितं करायला मी काही ज्योतिषी नाही.
 (अंधारातून आवाज : अहो, पण तुम्हीच तर सांगितलं होतं ना, 15  दिवसांत कमी होतील भाव म्हणून?) यावर साहेब काय करतात, हे काय सांगायला हवं?

(चित्र : प्रदीप म्हापसेकर)

(16/1/11)

No comments:

Post a Comment