Friday, February 11, 2011

बालमजूर कायद्याचे स्वागत!

नुकत्याच संमत झालेल्या बालमजूर कायद्याचे सर्वानी मन:पूर्वक स्वागत केले पाहिजे.. ..हाच कायदा मूलभूत शिक्षणाचा अधिकार या गोंडस नावानेही ओळखला जातो..
..कोणत्याही आर्थिक स्तरातील ६ ते १४ वयोगटातील सर्व मुला-मुलींना शिक्षणाचा मूलभूत अधिकार देणारा हा कायदा आहे. म्हणजे थोडक्यात गरीबातल्या गरीब मुलांचीही मोफत आणि अनिवार्य शिक्षणाची सोय राज्य सरकारांना करावी लागणार आहे. देशातील सर्व बालमजुरांमध्ये समानता प्रस्थापित करणारा हा क्रांतिकारक कायदा आहे.
आतापर्यंत असं दिसून आलंय की, वेगवेगळय़ा प्रकारच्या बालमजुरांच्या कामांमध्ये खूप तफावत असते. ग्रामीण भागांतले आणि शहरांतले गरीब किंवा अतिगरीब बालमजूर शेतावर मजुरी करतात, दुकानांमध्ये नोकरी करतात, हॉटेलांमध्ये फडका मारणारा पो-या किंवा तंबी बनतात, वाहनांवर असिस्टंट क्लीनर म्हणून जातात, पेपर टाकतात, ट्रेनमध्ये-ट्रॅफिक सिग्नलला, रस्त्यांवर नाना प्रकारच्या वस्तू विकतात, चोरटय़ा, अंधा-या कारखान्यांमध्ये पाठीचा कणा वाकवणारी, डोळे फोडणारी, हात सोलवटणारी कष्टाची कामं करतात.. थोडक्यात म्हणजे दर बालदिनाला चाचा नेहरूंच्या कोटाला गुलाबाच्या फोटोच्या बरोबरीने उद्याची आशा वगैरे हेडिंगांखाली कळकट्ट-मळकट्ट तरीही डोळय़ांत तेज आणि चेह-यावर हसू दर्शविणारे फोटो छापण्यास योग्य असे ते अधिकृत बालमजूर असतात.. यांची संख्या मोठी आहे. ती देशाला लाजिरवाणी आहे. पण त्याची देशाला अधिकृतपणे लाज वाटावी, अशीही व्यवस्था आहे. त्यांच्यासाठी देश-विदेशांतून फंडिंग मिळतं. त्यातून स्वयंसेवी संस्था-संघटना चालवून पाचपन्नास जणांना पोटापाण्याला लावण्याची सोय आहे. या बालमजुरांची सुटका झाली पाहिजे, असं कायदा म्हणतो, सरकार म्हणतं, प्रशासन म्हणतं, लोक म्हणतात- करत कोणीच नाही काही, पण निदान तसं म्हणतात.
ज्यांची आर्थिकस्थिती बरी किंवा चांगली किंवा अतिउत्तम आहे, अशा बालमजुरांची मात्र स्थिती अधिकृत बालमजुरांपेक्षा फारच वाईट आहे. कारण मुळात त्यांना बालमजुराचा दर्जाच नाही. बालदिनाला चाचा नेहरूंशेजारी फोटो छापून येण्याची त्यांची पात्रताच नाही. आता जे अधिकृतपणे बालमजूरच नाहीत, त्यांची सुटका कोण आणि कशी करणार?
दुसरा वांधा असा की ते समाजमान्य बालमजुरी करतात. कोणत्याही गोष्टीमध्ये- अगदी नैतिक गोष्टीमध्येही समाजमान्यतेला फार महत्त्व असतं. म्हणजे एखाद्याने एखाद्याचा खून केला, तर तो फाशीच्या सजेला पात्र गुन्हेगार असतो. तोच खून त्याने सीमेवर शत्रूसैनिकाचा केला, तर शौर्यपदकाचा मानकरी. कारण हा खून समाजमान्य आहे. तद्वत, ही दुस-या प्रकारची बालमजुरी समाजमान्य आहे. कारण ते शैक्षणिक बालमजूर आहेत. म्हणजे सोप्या शब्दांमध्ये शालेय विद्यार्थी आहेत..
..ते त्यांच्या पालकांच्या अपेक्षांची, समाजाच्या संकेतांची, भविष्याच्या योजनांची ओझी वाहतात.. खांदे उतरवणाऱ्या दफ्तरांच्या ओझ्यांपेक्षा त्यांच्या मानगुटीला असलेली ही ओझी किती तरी जड असतात.. पण ती कुणाला दिसत नाहीत.. किंवा ती दिसूनही त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्याची कला मोठय़ा माणसांच्या जगाने आत्मसात केलेली असल्याने या ओझ्यांची दखल कोणी घेत नाही.. प्रत्येक बालमजूर नंतर मोठा मजूर बनतो आणि बालमजुरीचे ओझे आपल्या पुढच्या पिढीच्या डोस्क्यावर देतो..
..पहिल्या प्रकारच्या बालमजुरांमध्ये कामाचे काही तास ठरलेले असतात. ते भले अन्याय्य असतील, पण तेवढे भरले, की नंतर मजूर मोकळा. दुस-या प्रकारात मात्र ती मुभा नाही. दिवसाचे चोवीस तास, वर्षाचे बारा महिने, तेरा काळ विद्यार्थी तो विद्यार्थीच. त्याची मेहनत फक्त शाळेच्या सहा-आठ तासांपुरतीच असते, असं आपण गृहीत धरतो आणि फसतो. शाळेत छान गणवेशात जावं लागतं, सोबत डबा मिळतो किंवा शाळेत जेवण मिळतं, म्हणून आपल्याला त्याच्या हसऱ्या चेहऱ्यामागच्या यातना समजत नाहीत. हा बालमजूर रोज शिकायचं म्हणजे घोकायचं असं ब्रीदवाक्य असलेल्या शाळेतली पाटी टाकून झाली की टय़ूशनला पळतो. इकडे सहा तास तर तिकडे आणखी तीन तास. त्याच्या आईबापांना त्याच्या अभ्यासाची उजळणी करून घ्यायला वेळ नसतो किंवा शैक्षणिक वकूब नसतो. त्यासाठी ही व्यवस्था. शिवाय मुलाला (घरबशेपणाचं?!) वळण लाागतं, ते वेगळंच.
आधी आपणच असा पोराला सारखा अभ्यास करायला लावायचा. मग, सारखा अभ्यास अभ्यास करून तो घरकोंबडा होईल, त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होणार नाही, या भयाने त्याला कुठल्या तरी एक्स्ट्रा करिक्युलर क्लासला पाठवायचं. हा क्लास घोडेस्वारीसह लष्करी कवायतींपासून तुणतुणे वाजवण्यापर्यंत (नटरंग हिट झाल्यापासून तुणतुण्याला कित्ती डिमांड आलीये नै!) कसलाही असू शकतो. असा त्याच्या दिवसाच्या बारा तासांचा मुडदा पाडला की उरलेल्या वेळेत तो मुडद्यासारखा झोपण्यापलीकडे काहीही करू शकत नाही.
गंमत म्हणजे, बाकीच्या मजुरांना आठवडय़ातून एक दिवस का होईना, हक्काची सुट्टी मिळतेच मिळते. इथे तेही नाही. साप्ताहिक सट्टीला उजळणी आणि एक्स्ट्रा करिक्युलर वर्गाची मोठी आवर्तनं ठरलेली असतात. वर्षाला महिना-दीड महिन्याची सुट्टी मिळते, त्यात एक्स्ट्रा करिक्युलर वर्ग अक्राळविक्राळ रूप धारण करतात. दीड वितीची दोन कापडं घातलेली आपली अबोध, अजाण, चिमुरडी बालिका भर टीव्हीवर मला जाऊ द्या ना घरी, आता वाजले की बारा म्हणून पब्लिकला चाळवणारे हावभाव करीत आहे, ही तिच्या कलागुणांची खूण मानण्याचा काळ आहे हा! आपल्या पाल्याच्या अंगात एक तरी कलागुण असलाच पाहिजे, नसला तर तो ठासलाच पाहिजे, अशा हट्टाला पेटलेले आईबाप त्यांच्या सुट्टीचीही राखरांगोळी करून टाकतात.
कोणालाही कशाचाही निकोप आनंद म्हणून मिळू द्यायचा नाही, अशी सॅडिस्ट विकृती तर आपला राष्ट्रीय ठेवा आहे. त्यात मुलांनी शिक्षण वाचू आनंदे, नाचू आनंदे करीत घेतलं, तर तो राष्ट्रद्रोहच ठरायचा. आता सीबीएसई, आयसीएसई वगैरे शाळांमध्ये तसली फॅडं असतात हल्ली.. पण, त्यांना लगेच अबॅकसचे क्लास वगैरेंची जोड देऊन पालक मंडळी बरोबर लेव्हल करतातच. शाळेत जाणारा मुलगा रिलॅक्स दिसण्याची हिंमत कशी काय करू शकतो?
असो.
आता पहिल्या प्रकारचे बालमजूर आणि दुस-या प्रकारचे बालमजूर यांच्यातली तफावत दूर होणार आहे. सर्वानाच शिक्षणरूपी मजुरीचं ओझं वाहायला लागणार आहे.
..आता क्रांती दूर नाही..
..कारण, यापुढे बालमजुरांच्या मोठेपणी कुशल आणि अकुशल मजूर असा भेद राहणार नाही..
..मोठेपणी सगळे कुशल मजूर होणार..
..आपला देश नाहीतरी लवकरच कुशल मजूरसत्ता म्हणून उदयाला येऊ घाततेला आहेच..

(4/4/10)

No comments:

Post a Comment