Tuesday, February 15, 2011

सीमा

 
दोन देशांमधली सीमा हा दोन्ही देशांमध्ये जाम कुतूहलाचा भाग असतो. मध्ये तारेचं कुंपण, दोन्ही बाजूला उभय देशांचे जवान खडे, पहारेचौक्या असं एक (रोमँटिक?) चित्रही असतं मनात. सीमा म्हटलं की काहींच्या मनात सुप्रसिध्द वाघा बॉर्डरवरच्यासारखा शक्तिप्रदर्शन, विद्वेषप्रदर्शन सोहळा उमटतो.
सीमा सगळीकडे अशी नसते.
पश्चिम बंगालमध्ये दार्जिलिंग पार करून संदक फू फालोत या हिमालयाच्या पर्वतरांगांच्या परिसरात सीमा भेटते ती पायवाटेच्या स्वरूपात. वाटेच्या उजवीकडे भारत, डावीकडे नेपाळ अशी सरळ सोप्पी विभागणी. कुंपणं, चौक्या, जवान यांचं नामोनिशाण नाही कुठेही. तिथे रस्त्यात भेटलेल्या शिडशिडीत पोरांना विचारलं तर ती म्हणाली, ''मावशीकडे निघालोय.''
''कुठे?''
''नेपाळमध्ये.''
''आलात कुठून?''
''भूतानहून.''
''कसे?''
''पायीपायी. डोंगर ओलांडत. तीन दिवस लागतात.''
..........
तवांगजवळ 'बुमला'ला भारतचीन सीमा पाहायला मिळणार म्हणून सगळे कोण हरखले होते... पण, सीमेच्या 12 किलोमीटर अलीकडच्या चौकीवर गाडया अडल्या. 14 हजार फुटांवर, हाडं गोठवणाऱ्या थंडीत 'राजा शिवछत्रपती' रस्त्यावर दिवसरात्र तैनात असलेले जवान म्हणाले, ''पुढे बर्फ खूप आहे. गाडया अडकल्या तर परतणं कठीण होईल. हा परिसर खूप सेन्सिटिव्ह आहे.''
इतक्या दूर येऊन भारतचीन बॉर्डर पाहायला मिळणार नाही, म्हणून खट्टू झालेल्यांना तो म्हणाला, ''वैसे भी उधर से कुछ दिखता नही. लांब चिन्यांचे टॉवर दिसतात. दुर्बिणीतनं बघावं लागतं. काय बघायचं. इकडे बर्फ, तिकडे बर्फ. इकडे रस्ते, तिकडे रस्ते.''
............
कळविण्यास अत्यंत आनंद होतो की तिसरी सीमा मात्र 'सीमेसारखी' होती.
बांगलादेश बॉर्डर.
जिथून सारखी माणसं भारताच्या हद्दीत येत असतात आणि येताक्षणी मुंबईची गाडी पकडतात, अशी आपली समजूत आहे, तोच बांगलादेश.
मेघालयातल्या पुढच्या प्रवासात एक टेकडी उतरता उतरता गाडी थांबली. वाटाडयाने सांगितलं, ''हा डोंगर म्हणजे भारत, पलीकडचा डोंगर म्हणजे भारत. मध्ये अफाट नदीपात्रात वाळू पसरलीये तो बांगलादेश.'' त्या वाळूत अक्षरश: मुंग्यांसारखी दिसणारी शेकडो माणसं वाळू उपसण्याचं काम करत होती. कुणी होडीतून पात्रात मासेमारी करत होतं.
''चला चला पुढे चला. पुढे प्रत्यक्ष बॉर्डर पोस्टवर जायचंय.''
प्रवासात अनेक ठिकाणी गंमतीचीच दृश्य दिसायची. म्हणजे शेतंच शेतं पसरलीयेत. त्यातली काही भारतात. काही बांगलादेशात. एक मैदान, पोराटोरांनी फुटबॉल खेळावा एवढं. मागे टेकडी. मैदान भारतात, टेकडी बांगलादेशात. इकडून तिकडे बॉल गेला तर?
अखेर सीमा आली.
अलीकडे भारताची चौकी. पलीकडे बांगलादेशाची चौकी. दोन्हीकडे रेल्वेगेटांवर असतात तशी कुंपणं. मध्ये 'नो मॅन्स लँड'. तिथे अमुक एका दगडापर्यंत जायला परवानगी. तो दगड ओलांडला की तिकडचे जवान पकडून नेतात आणि किमान दोन वर्षांची कैद होते, असं सांगणारे सांगतात. इकडे माणसं आली की तिकडचे जवान लगेच गन सावरत चौकीबाहेर सज्ज होतात.
'अहो काका, बांगलादेशातून भारतात घुसखोरी करण्याची पध्दत आहे. इकडून तिकडे नाही!'
ही चौकी आणि इथली एकदम सज्जता वगैरे सोडली तर बाकीचा सगळा प्रदेश सारखाच. अलीकडे पलीकडे एकच गाव पसरलंय, असं वाटायला लावणारा. माणसंही सारखीच. भाषाही सारखीच. तरीही एक अदृश्य रेघ मारलीये... धर्माने.
''इकडून तिकडे तिकडून इकडे माणसं जात येत नाहीत?''
सीमेवरच्या आपल्या जवानाला विचारलं, तर तो सांगतो, ''कैसे आयेंगे? हम यहाँ चौकन्ने रहते है!''
''हे चौकीवरचं झालं. बाकी पलीकडे कुठेच काही कुंपण नाही नि काही नाही.''
''तरीपण आपले जवान असतात ना!'' आपल्या उत्तरात फारसा दम नाही, हे त्यालाही बिचाऱ्याला उमगलेलं आहे.
........
बांगलादेशाच्या बाजूला आलेल्या एका तिथल्या पत्रकाराशी ओरडून गप्पा मारण्याच्या ओघात भारतीय हद्दीतले काहीजण त्या दगडाच्या बरेच जवळ जातात. तिकडचा जवान एकदमच दक्ष पोझमध्ये येतो. इतक्यात 'खाट्ट' असा दचकवणारा आवाज होतो. एका उधळलेल्या गायीने बांगलादेशाच्या सीमेची आडवी दांडी तोडून भारताच्या हद्दीत नाटयमय प्रवेश केला होता...
गायींना सीमा नाही.
जमिनीवरच्या जनावरांना, हवेला, हवेतल्या पक्ष्यांना, पाण्याला, पाण्यातल्या माशांना सीमा नाही...
आणि माणसाच्या कोतेपणालाही!

(थर्ड आय, महाराष्ट्र टाइम्स)

No comments:

Post a Comment