Thursday, September 29, 2011

बालकथा : वेडा काका!

ना नन न न न न ना ना ना
 
ता तत त त त त ता ता ता
 
शाळेत बाईंनी आजच शिकवलेल्या गाण्याची चाल गुणगुणत, ठेक्यात पावलं टाकत, नाचत नाचत मनू त्या वळणापाशी आली आणि एकदम गप्पच झाली. पावलं मंदावली. हा तिचा शाळेचा नेहमीचा रस्ता. आईचं बोट याच वर्षात सुटलं होतं. ‘‘आमची मनू आता मोठी झाली, शाळेत एकटी जाते,’’ असं आई कौतुकानं जो भेटेल त्याला सांगायची. गाव छोटं. रस्तेही पायवाटांसारखेच. शाळा जेमतेम दहा मिनिटांवर. सगळा रस्ता ओळखीचा. फक्त या एका वळणावर अनोळखी व्हायचा. इथल्या झाडाखाली वेडा काका राहायचा. काळीपांढरी दाढी वाढलेला, ऊग्र चेह-याचा, मोठय़ा डोळ्यांचा तो माणूस कधी स्वत:शीच बोलायचा, हसायचा, कधी स्वत:वरच संतापायचा. मूळचा गाववाला. छान संसार होता. छोटी चुणचुणीत मुलगी-बायको आणि तो. काहीतरी बिनसलं आणि त्याचा तोल ढळत गेला. बायको-मुलीला घेऊन माहेरी निघून गेली. हा घरातून रस्त्यावर आला. आता हे बोरासारख्या तुरट-गोड फळांनी भरलेलं झाड हेच त्याचं घर झालं. त्यानं गावातल्या कुणालाही आजवर काहीही त्रास दिला नव्हता. त्यामुळं लोक त्याच्या वेडय़ा चाळ्यांकडे दुर्लक्ष करायचे. त्याची अवस्था पाहून हळहळायचे. घरातलं उरलंसुरलं, उष्टंपाष्टं आणून झाडाशेजारच्या कोप-यात ठेवून जायचे. त्यातूनच त्याचं पोट भरायचं.
 
शाळेतून घरी जाताना मुक्त बागडणा-या पोरांचे हात आया या वळणावर मात्र घट्ट पकडून त्यांना घाईघाईनं चालवायच्या. ‘‘कितीही चांगला वागत असला तरी शेवटी वेडा तो वेडाच,’’ असं म्हणून झरझर वळण पार करायच्या. ‘‘मने, एकटी जा तू शाळेला, पण त्या वेडय़ा काकाच्या इथे रेंगाळायचं नाही हां. त्याच्याकडे बघायचंही नाही. चटकन पुढे यायचं.’’ ही आईची तंबी.
 
मनूची पावलं तिथं आपसूक थबकली. तिनं झाडाच्या दिशेनं पाहिलं. वेडा काका झाडाखाली बसून जमिनीवरच्या पानांच्या कच-यातून काहीतरी वेचून खात होता. ‘भूक लागलेली दिसतेय बिचा-याला,’ मनू मनोमन हळहळली. अचानक तिला आठवलं. आज डब्यात आईनं कोबीची भाजी दिल्यामुळं तिनं सुमीचा डबा खाल्ला होता. एक पोळी आणि भाजी शिल्लकच होती. ती ह्याला दिली तर? बापरे, पण, हा रागावून अंगावर धावून आला तर? छय़ा, भूक लागलीये त्याला कित्ती! ती बोरासारखी फळं वेचून खातोय अधाशासारखा. पोळीभाजी दिली तर त्याचंही पोट भरेल आणि आपल्यालाही आईचा ओरडा खावा लागणार नाही. ‘‘रोज रोज काय पंचपक्वान्नं द्यायची गं तुला डब्यातून? एक दिवस कोबीची भाजी खाऊ शकत नाहीस का? लहान मुलांनी पानात पडेल त्याचा फडशा पाडायला शिकलं पाहिजे. हे असे खाण्याचे नखरे आहेत ना म्हणून हाडाची काडं निघालीयेत तुझी.’’ आईचा ओरडा मनूच्या कानात घुमला.
 
तिनं ताबडतोब दप्तर उघडलं, डबा काढला, पोळीभाजीची गुंडाळी केली आणि वेडय़ा काकाच्या मळक्या चादरीच्या कोप-यावर ती ठेवून धूम ठोकली.
 
नंतर हे नेहमीचंच झालं. आधी डब्यात काही आवडीचं नसलं, तर मनू वेडय़ा काकासाठी ते अन्न ठेवून जायची. एक दिवस ती तशीच पुढे जात होती, तेव्हा वेडय़ा काकानं त्याच्या जागेवरूनच तिला ‘शुक शुक’ करून खुणेनं विचारलं. ‘‘आज नाही आणला डबा,’’ असं सांगून मनूनं पळ काढला, पण तिला वाईट वाटलं. मग डबा पुरत नाही, असं सांगून तिनं एक पोळी जास्त न्यायला सुरुवात केली. ती पोळी आणि भाजीची गुंडाळी रोज वेडय़ा काकाच्या मुखी लागू लागली. काकाचा चेहरा हळूहळू मवाळ होऊ लागला. एकदोनदा तर तिच्याकडे पाहून तो ओळखीचं हसलासुद्धा. मनूला आता त्याची भीती वाटेनाशी झाली.
एके दिवशी मात्र वेगळाच प्रकार झाला. मनू डब्यातून पोळीभाजी काढत होती, तेवढय़ात तिला कुबट वास आला. पाहते तो काका थेट तिच्यासमोर. ‘देते हां खाऊ,’ म्हणून मनूनं पोळीभाजीची गुंडाळी केली, तेवढ्यात काकानं डबाच काढून घेतला तिच्या हातातून. ‘अरे, देते मी तुला पोळीभाजी, डबा काय करायचाय तुला?’ म्हणत मनूनं डबा काढून घ्यायचा प्रयत्न केला; पण काका ऐकेना. काहीतरी अगम्य बोलत, विक्षिप्त हातवारे करत तो तिला हुसकावत होता. शेवटी शेवटी तर तो चिडलाच. त्याचं ते ऊग्र रूप पाहून मनू घाबरली. तिनं घरची वाट धरली.
 
बाप रे! आता आई डबा धुवायला मागेल, तेव्हा काय करायचं? तिला काय सांगायचं? मनूला मोठा प्रश्न पडला. ‘‘अगं, माझा डबा शिल्लक होता. सोनल म्हणाली, मी खाते. तिच्याकडेच राहिला,’’ असं सांगून तिनं वेळ मारून नेली.
 
पण संध्याकाळी सोनलच घरी आली खेळायला. आईनं विचारलं, ‘‘डबा का नाही आणलास?’’ झालं, मनूचं बिंग फुटलं. आईला वाटलं मनूनं डबा हरवलाय, म्हणून ती खोटं बोलतेय. शेवटी मनूनं सांगितलंच, ‘‘अगं, त्या वेडय़ा काकानं काढून घेतला माझ्या हातातून.’’ पुढचं काही ऐकायला आई होतीच कुठे घरात. ती शेजारच्या नाथाकाकाच्या दुकानात जाऊन पोहोचली. नाथाकाकानं सोबतीला आणखी दोन गडी घेतले आणि सगळे निघाले वेडय़ा काकाच्या झाडाकडे. पाठोपाठ आई आणि तिच्यापाठी धावत मनू.
 
‘‘आजवर कुणाला काही त्रास दिला नाही म्हणून गावानं सांभाळलं या येडय़ाला.’’
 
‘‘आता लहान पोरींच्या हातातले डबे हिसकतो म्हणजे काय?’’
 
‘‘नंतर काय करील?’’
 
‘‘अरे, पण जाऊन तर बघूयात आधी डबा आहे का त्याच्याकडे?’’
 
तावातावानं चर्चा करत मंडळी झाडापाशी पोहोचली.
 
वेडा काका मनूचा डबा घट्ट छातीशी धरून बसला होता. एवढी सगळी माणसं बघून तो गांगरला. मनूला पाहून त्याचा चेहरा उजळला. तो तिला त्याच्या अगम्य भाषेत काही सांगू पाहणार तेवढय़ात नाथाकाकानं काडकन त्याच्या मुस्कटात लगावली. ‘‘ल्हान पोरींचे डबे पळवतोस व्हय रं सुक्काळीच्या.’’
 
‘अँ अँ अँ अँ ऊँ ऊँ ऊँ ऊँ’ असं काहीतरी बोलत काका मार चुकवत होता आणि संतापलेले लोक त्याच्या कानाखाली मारत होते, कुणी गुद्दे घालून डबा काढून घेऊ पाहात होते. त्याचं तोंड सुजलं होतं, एक जखमही झाली होती. रक्त ठिबकत होतं. पण, डबा सोडत नव्हता. त्याचं सगळं लक्ष मनूवर होतं. तो सगळ्यांना चुकवत चुकवत धावत मनूपाशी आला आणि त्यानं डबा मनूच्या हातात ठेवला आणि तो काहीतरी खूण करू लागला. आजवर काकाची भाषा न कळलेल्या मनूला आता मात्र त्याच्या पाणावल्या डोळ्यांतून त्याची भाषा समजली. सुजल्या चेह-यानं हसण्याचा कसनुसा प्रयत्न करत तो तिला डबा उघडायला सांगत होता. हा प्रकार पाहून थबकलेल्या लोकांसमोरच तिनं तो डबा उघडला. त्यात काका रोज वेचायचा ती बोरांसारखी तुरट-गोड फळं होती, वेडय़ा काकानं काळजीपूर्वक मनूसाठी वेचलेली. टपोरी. रसाळ.
 ..फाटल्या ओठांतून रक्त ठिबकत होतं तरी काका हसत होता आणि मनू मात्र रडत होती.. वेडय़ासारखी रडत होती!

(चित्र : प्रदीप म्हापसेकर) 

(प्रहार, २३ सप्टेंबर, २०११)

Sunday, September 25, 2011

प्राणीसेना जिंदाबाद!

परलोकातल्या परदादा-परदादी पार्कात नेहमी तुरूतुरू चालणारे खुटखुटीत पणजोबा आज कोप-यात शांत बसून होते. आबा टिपरेंनी एका फेरीनंतर चाल मंद केली आणि त्यांच्याजवळ जाऊन काळजीच्या सुरात विचारलं, ‘‘बरं नाही का वाटत तुम्हाला? पृथ्वीतलावरच्या नातेवाइकांची आठवण येतेय का?’’
 
‘‘नाव घेऊ नका त्यांचं.. त्यांची आठवण न येण्याची काही व्यवस्था असती, तर बरं झालं असतं..’’ पणजोबा भडकलेच.
 
‘‘का हो? एकदम असं काय झालं?’’
 
‘‘काय सांगू तुम्हाला कर्मकहाणी; सगळ्या जगाचं प्रबोधन करत फिरलो आणि दिव्याखालीच अंधार राहिला.’’
 
‘‘म्हणजे?’’
 
‘‘आपल्या मातीचा एक खास गुणधर्म आहे. अनुयायीच पुढा-याचा पराभव करतात. माझे अनुयायी वगैरे फारसे झाले नाहीत, हे बरं झालं म्हणून खूष व्हावं, तर माझ्या मुलाबाळांनीच ती कसर भरून काढली.’’
 
‘‘कशी काय?’’
 
‘‘अहो, मी आयुष्यभर अंधश्रद्धेवर, बुवाबाजीवर कठोर प्रहार केले. भोंदू बाबांची रेवडी उडवली आणि माझाच मुलगा भगवी कफनी घालून बुवा होऊन बसला रुद्राक्षाच्या माळा खेळवत. आता याला काय बोलणार सांगा.’’
 
‘‘नशिबाचे भोग म्हणायचे आपल्या!’’
 
‘‘अहो, पण नॅशनल जिऑग्राफिकसुद्धा उलटावा..’’
 
आबा टिपरे चक्रावले. एकदम नॅशनल जिऑग्राफिक कुठून आला, त्यांना कळेना. पणजोबा बोलतच राहिले, ‘‘आपल्या मुलाबाळांची बुद्धी व्यापक व्हावी, दृष्टी विशाल व्हावी, पृथ्वीतलावर किती विपुल वैविध्य आहे, याची त्यांना माहिती व्हावी, यासाठी मी नॅशनल जिऑग्राफिकची आजीव वर्गणी भरली.’’
 
‘‘चांगलंच केलंत की मग. आंतरराष्ट्रीय ख्यातीचं मॅगझिन ते. किती सुंदर फोटो. किती नेटकी माहिती. मुलं चांगलीच तयार झाली असतील?’’
 
‘‘गप रे माकडय़ा!’’
 
‘‘आँ..’’
 
‘‘बघतोस काय सापडय़ा?’’
 
‘‘अरे बापरे..’’
 
‘‘तुला ठेचून काढेन झुरळासारखा.’’
 
‘‘अहो, काय बोलताय काय?’’
 
‘‘रंग बदलणा-या सरडय़ा!’’
 
आता आपल्यालाच फेफरं येणार की काय, असं आबांना वाटू लागलं. ते काढता पाय घेणार, एवढय़ात पणजोबांनी त्यांना हाताला धरून बसवलं आणि ते म्हणाले, ‘‘हे असं बोलत असतो माझा मुलगा सतत. वयानुसार काही पोक्तपणा, परिपक्वता, सभ्यता यायला पाहिजे माणसात. पण, यानं लहानपणापासून ते सगळे प्राणी पाहिलेले असल्यानं बोलण्यात सतत गाढव, डुक्कर, बैल, नंदीबैल, बगळे, कावळे, वटवाघळं अशी सगळी प्राणीसृष्टी नांदत असते. इथे परलोकात तर अनोळखी लोक मला विचारतात, पृथ्वीवर तुम्ही सर्कस चालवायचात का, म्हणून. परवा एकानं विचारलं, बापाचं पाहून माझ्या मुलाचा मुलगाही तेच शिकलाय. तोंडावरची माशी हाकलायची मारामार आणि भाषा मात्र ही अशी, विखारी, साप-सरडय़ांची. तो कोण तो सिनेमातला ठोकळा- भारतभूषण किंवा त्याच्यासारखाच दुसरा प्रदीपकुमार यांच्यातला कुणी छत्रपती शिवरायांची किंवा संभाजीराजांची भूमिका करायला उतरला, तर काय होईल, तसं वाटतं त्याचं बोलणं ऐकून पाहून. शिवाय फोटोग्राफीचा नाद.’’
 
‘‘अहो, चांगला नाद आहे. आजकाल फोटोग्राफरांना चांगली नोकरी मिळते, जाहिरातींची वगैरे कामं केली, तर फारच चांगले पैसे मिळतात.’’
 
‘‘कामं केली तर ना! यांना आयत्या पिठावर रेघोटय़ा ओढायची सवय झालीये. पुरता हवेत गेलाय तो. अक्षरश: हवेत. कोणाचं तरी हेलिकॉप्टर मागून आणतो आणि हवेतून खाली कॅमेरा रोखून फोटो काढतो. आपलं घर पेटलंय, आपले लोक दु:खात होरपळतायत, हे काही याला खालूनही दिसत नाही आणि वरूनही दिसत नाही.
पाहावे कप्पाळ!’’ पणजोबांनी कपाळावर हात मारून घेतला.
 
‘‘पण मग नॅशनल जिऑग्राफिकच्या बरोबर इतर काही सकस वाचायला द्यायचं होतं मुलाला. थोरांची चरित्रं वगैरे.’’
 
‘‘नाव काढू नका थोरांच्या चरित्रांचं. त्यातून आणखी मोठा गोंधळ झाला. त्याला मोठय़ा कौतुकानं कुणब्यांच्या, मावळ्यांच्या, रयतेच्या राजाचं चरित्र सांगितलं आणि यानं त्याचा गोब्राह्मणप्रतिपालक हिंदुहृदयसम्राट करून टाकला. आयुष्यभर एकच खेळ शिवाजी म्हणतो, उठा, शिवाजी म्हणतो, बसा. शिवाजी म्हणतो, मद्राशांना चोपा. शिवाजी म्हणतो, पेटी आली, थांबा. तोच खेळ आता नातूही खेळू पाहतोय.’’
 
‘‘चांगलंच आहे की मग. पेटी येत असेल, तर कोणताही खेळ चांगलाच.’’
 
‘‘ते बरोबर आहे तुमचं. पण, इथे उठा म्हटलं तर उठायला कोणी उरणार नाही, अशी अवस्था येत चाललीये आणि यांच्या डरकाळ्या सुरूच. शिवाजी म्हणतो, लढा, मी फोटो काढून येतो. दोघेही तसलेच.’’
 
‘‘आता हा दुसरा कोण?’’
 
‘‘दुसरा नातू. दुस-या मुलाचा मुलगा. याला सिनेमाचा शौक. घरात थिएटर बांधलंय म्हणे. पॉपकॉर्नचा स्टॉलही असेल शेजारी. त्यामुळे तोंडातून शब्द नुसते लाह्यांसारखे तडतडत असतात. याला कोण तो उंच नट- अमिताभ की कोण तो- त्याचे सिनेमे पाहण्याचा जबरदस्त नाद होता. त्यामुळे सतत डायलॉग फेकत असतो आणि फेकत असतो.’’
 
‘‘चांगलं आहे की मग. अहो, हल्ली चांगल्या स्क्रिप्टरायटरांना आणि डायलॉग रायटरांना मागणी आहे फिल्म इंडस्ट्रीत. कोटींमध्ये खेळेल तुमचा नातू.’’
 
‘‘कधी? स्क्रिप्ट पूर्ण होईल तेव्हा ना! यानी ‘ब्लूप्रिंट’ नावाचं एक स्क्रिप्ट लिहायला घेतलंय ते किती वर्ष झाली लिहितोच आहे. तिकडे गुजरातेत सिनेमाही काढून मोकळा झाला म्हणे कुणी नरेंद्रकुमार. आता याच्यावर त्या सिनेमाचा रिमेक बनवायची पाळी येणार. लिहितो त्या सगळ्या पटकथांची थीम एकच- भाई-भाई.
 भावाभावांमधली दुष्मनी. थोरला धाकटय़ाला वाईट वागवतो आणि धाकटा त्याचा सूड घेतो. शिवाय डायलॉग लिहितो, तो मराठीत. इतर भाषांचा गंध नाही. कारण त्यांचा दुस्वास. आता सांगा मराठीतल्या डायलॉग रायटरच्या मेहनतान्यात चणे-फुटाणे तरी परवडतील का?’’
 
‘‘बरोबर आहे. एकंदर अवघड परिस्थिती दिसते. तुम्हाला काळजी वाटणं साहजिक आहे.’’
 
‘‘अहो मला काळजी वाटतेय ती यांची नाही, यांच्या भजनी लागणा-यांची. आपल्या राज्यात बोलबच्चनगिरीलाच कर्तृत्व मानणारे लोक फार आहेत.’’
 
‘‘खरंय तुम्ही म्हणता ते, पण काळजी वाटण्यासारखी परिस्थिती नाहीये,’’ आबांनी पणजोबांना आश्वस्त केलं, ‘‘लोक तुमच्या प्रबोधनातून काही शिकले नसतील, पण स्वत:च्या अनुभवातून तर शिकतातच ना. यांच्या सगळ्या बेताल बडबडीतून चार घटकांची करमणूक करून घेतात फुकटची आणि आपापल्या वाटेला लागतात.’’
 ‘‘असं असेल, तर बरं आहे,’’ जरा सैलावून पणजोबा उठले आणि हळूहळू चालू लागले. त्यांच्याबरोबर चालताना चेह-यावरची रेषही न हलवता आबा अगदी साळसूदपणे सहज सुरात म्हणाले, ‘‘एक विचारू का राग येणार नसेल तर.. ती राणीची बाग, राणीची बाग म्हणतात तेच तुमचं घर होतं का पूर्वी?’’

(चित्र : प्रदीप म्हापसेकर) 


(प्रहार, २५ सप्टेंबर, २०११)

Monday, September 19, 2011

महा रोबोट्रीक्स

आमचा ऊर अभिमानानं भरून आला आहे.. एक नव्हे तर दोन दोन महापालिकांबद्दलचा हा अभिमान असल्यानं आता छाती फुटून मरण ओढवते की काय अशी अवस्था झाली आहे, तरी आम्ही प्राण पणाला लावून खूष आहोत. मुंबई महापालिका आणि कल्याण डोंबिवली महापालिका या त्या आमच्या अत्यादरास पात्र आणि अत्यानंदास कारण ठरलेल्या दोन महापालिका आहेत.. यापूर्वी कल्याणच्या रस्त्यांसाठी महापालिकेला राष्ट्रीय सन्मान मिळाला होता, तेव्हाही आम्हाला असाच अत्यानंद झाला होता.. परंतु, दूधनाक्यावरच्या एका- महापालिकेच्या गुळगुळीत गालावरची तीटच जणू अशा- छोटुकल्या खड्डय़ात स-सायकल कोसळून हाडं मोडल्याने रुग्णालयात जीवनमरणाच्या सीमेवर अत्यवस्थ स्थितीत निपचीत पडलो असल्याने त्या आनंदाचं साग्रसंगीत प्रकटीकरण करायचं राहूनच गेलं.. ती कसर भरून काढण्याची संधी आता मिळाली आहे. महापालिकांचा नागरिकांतर्फे नागरी सत्कार करण्याची पद्धत असती, तर या दोन महापालिकांचा आम्ही शिवाजी पार्कात किंवा दिल्लीच्या रामलीला मैदानातच सत्कार केला असता.
 
असा या पालिकांनी काय पराक्रम गाजवला आहे?
 
या पालिकांनी काही कामांसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरण्याचा इरादा जाहीर केला आहे. मुंबई महापालिका मोबाइलचा वापर करून खड्डे बुजवणार आहे.. अं अं अं.. गैरसमज नको- भंगारात निघालेले मोबाइल खड्डय़ांत ओतून ते बुजवण्याचं तंत्रज्ञान नाहीये हे.. कोणाही पादचा-यानं, वाहनचालकानं मोबाइलवरून रस्त्यातल्या खड्डय़ाचा फोटो काढून पाठवला की महापालिकेचे लोक डांबर-खडी वगैरे घेऊन निघणार आणि लगेच खड्डा बुजवून मोकळे होणार, इतकं सोपं तंत्रज्ञान आहे. विचार करा, मोबाइलचा शोध जरा लवकर लागला असता, तर कदाचित मुंबईतल्या रस्त्यांवर खड्डे पडलेच नसते. पण कालगतीला काय इलाज!
 
आता महापालिकेतले लोक मोबाइलच्या कॅमे-यानं काढलेल्या फोटोवरून हा खड्डा कोणता, हे कसं ओळखतील, असा प्रश्न आहे. पण, फोटोवरून खड्डा ओळखण्याचं प्रशिक्षण घेण्यासाठी काही उच्चाधिका-यांना महापालिकेच्या खर्चानं मंगळावर किंवा गेलाबाजार चंद्रावर तरी जाऊन यायला हरकत नाही. शिवाय, कोणत्याही रस्त्यावर एकमेकांसारखे दिसणारे दोन खड्डे पडले, तर कंत्राटदाराला जबर दंड आकारण्याची व्यवस्थाही करता येईल. एकाच रस्त्यावर एकमेकांसारखे दोन खड्डे पडू नयेत, सगळे खड्डे वेगवेगळे दिसावेत, यासाठी खास तंत्रज्ञानाचा वापर करता येईल. एवढं करूनही चुकून एका खड्डय़ाचा फोटो आला असताना दुसरा खड्डा बुजवला गेलाच, तर पालिकेचे कर्मचारी जाऊन बुजवलेला खड्डा उकरून येतीलच.
 
खड्डे बुजवण्यासाठी कोटय़वधी रुपये खर्चून ही अत्याधुनिक साधनं विकत घेतल्यानंतर वापराविना ती भंगारात काढायला लागली आणि महागडं प्रशिक्षण दिलेले कर्मचारी बसून पगार घेऊ लागले, तर तो पालिकेवरचा केवढा मोठा कलंक ठरेल. असं होऊ नये, यासाठी मुंबईच्या रस्त्यांवर बारा महिने तेरा काळ खड्डे असतीलच, याची विशेष व्यवस्था केली जाईल. एकदा बुजवलेला खड्डा ७२ तासांच्या आत आपोआप पुन्हा उकरला गेला नाही, तर ते काम करणा-या कंत्राटदाराला काळय़ा यादीत टाकण्याची व्यवस्था करता येईल.
 
असंच दुसरं यंत्र अत्योपयोगी यंत्र नालेसफाई करणारा रोबो.
 लवकरच जेसीबी, पोर्कलेन आणि ड्रेजर या तिन्ही यंत्रांचं काम करणारा रोबो नालेसफाईच्या कामासाठी वापरण्यात येणार आहे. म्हणजे इतके दिवस या तीन यंत्रांवर काम सोपवून ती चालवण्याची जबाबदारी असलेली माणसं शिटय़ा मारत फिरायला मोकळी होत होती. आता रोबोवर काम सोपवून जेसीबी, पोर्कलेन आणि ड्रेजरही (आपापल्या मगदुरानुसार) शिटय़ा मारत फिरायला मोकळे होतील.
नालेसफाईचं एक बरं असतं. तिचं फक्त कंत्राट काढायचं असतं. कंत्राट घ्यायचं असतं. त्यानिमित्तानं जे काही द्यायचं-घ्यायचं असतं ते घ्यायचं-द्यायचं असतं. बास! प्रत्यक्ष नालेसफाई करण्याचं बंधन कोणावरही नाही. कारण समजा कोणी खरोखरीच गाळ काढलाच, तर महान मुंबईकर प्लॅस्टिक, निर्माल्य, कचरा वगैरे टाकून नवा गाळ निर्माण करतातच. त्यापेक्षा सगळा साचून मुंबई पुरती गाळात गेली, राजाबाई टॉवरचं टोकही गाळात दिसेनासं होतं की काय अशी परिस्थिती आलीच, तर उपसूयात की एकदमच गाळ. म्हणून तर दर वर्षी कोटय़वधी रुपये गाळात घातले जातात, गाळ आणखी वाढतो, मग पुढच्या वर्षी वाढीव रक्कम गाळात.
 
आता रोबो आल्यामुळं हे काम फारच सोपं होईल.
 
म्हणजे नालेसफाई होणार नाहीच; पण, यंदा नालेसफाई का झाली नाही, पावसाळय़ात पाणी साचून उपनगरी रेल्वेमार्गावर होडय़ा आणि लाँचेस चालवण्याची पाळी का आली, या दर वर्षी विचारल्या जाणा-या प्रश्नाचं उत्तर देणं एकदम सोपं होऊन जाईल.. नालेसफाईसाठी नेमलेल्या रोबोंनी रजनीकांतचा रोबो सिनेमा पाहून बंड केल्यामुळे हे काम वेळेत पूर्ण होऊ शकलं नाही. सगळे रोबो पालिका कार्यालयांसमोरच्या टप-यांवर चहापाणी करण्यात आणि विडय़ा-सिगारेटी फुंकण्यात मग्न असल्याने मानवी कर्मचारी कोणते आणि रोबो कोणते, हे कळेनासे झाले आहे..
 
अर्थात रोबोंनी पालिका कर्मचा-यांच्या संगतीत राहून आणि शरद रावांची भाषणं ऐकून ऐन कामाच्या वेळीच काम बंद आंदोलनपुकारलं, असंही कारण देता येऊ शकेलच.
 
तिकडे कडोंमपाने कचराकुंडय़ांवर सीसीटीव्ही लावण्याचा निर्णय घेतलाय. म्हणजे कचरा कुंडीवरून ओसंडून वाहू लागला रे लागला की नियंत्रणकक्षातून कंत्राटदाराला फर्मान जाणार. लगेच गाडी जाणार, कचराकुंडी रिकामी करणार. शिवाय, कुत्र्यांची अनसेन्सॉर्ड प्रणयदृश्यं, हाडकांच्या वाटणीवरून दबंगटाइप मारामा-या, निर्माल्याच्या पिशवीतून अंडय़ाची टरफलं टाकणा-या एंएं कांकू वगैरे मनोरंजक दृष्यंही टिपली जातील. परदेशांतले डोंबिवलीकर होमसीक झाले की यू टय़ूबवर आपल्या प्रिय शहरातल्या कचराकुंडय़ांचे व्हिडिओ पाहतील आणि डोळय़ांबरोबरच त्यांची नाकंही धन्य होतील.
 या दोन्ही पालिकांनी यांत्रिकीकरणाचं एवढं मनावरच घेतलं असेल, तर, टेबलाखाली नोटा मोजून त्या बरोबर असल्यास टेबलावरची फाइल पुढे सरकवणारे यंत्र, चहावाला-पानवाला यांच्याकडे नेऊन आणणारी चाकांची स्वयंचलित खुर्ची, घरच्या घरी बोट लावताच कार्यालयात हजेरी लावणारे यंत्र, अशी आणखी काही उपयुक्त यंत्रं ताबडतोब बसवावीत, अशी आमची शिफारस आहे.

(चित्र : प्रदीप म्हापसेकर)

(प्रहार, १८ सप्टेंबर, २०११)

(ब)कालाय तस्मै नम:

स्थळ : न्यू यॉर्क
 
काळ : जुलै, 2009
बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशनानंतर अमेरिकेच्या ईस्ट कोस्ट टूरवर आलेली काही मराठी मंडळी. टाइम्स स्क्वेअरच्या परिसरात अहोरात्र सुरू असलेल्या जत्रेत हरवून जाऊन मोठ्ठे डोळे करून तिथलं अप्रूप डोळ्यांत साठवून घेण्यात मग्न. या मराठीजनांत बरेच गवशे, नवशे आणि काही लोक खूप हौशे.
 
‘‘अरे यार, क्या ये इधर आती जाती पब्लिक और बडे बडे अ‍ॅड देखने के.. कुछ ऐसा दिखाओ जिससे तबियत खूष हो जाये..’’ विदर्भाकडील महाराष्ट्रीय असल्यानं हिंदीतच बोलण्याचा मराठी बाणा दाखवत एकानं विषयाला तोंड फोडलं.. टूरमधल्या मंडळींना भेटायला आलेल्या स्थानिक मराठी यजमानांना उद्देशून ही पृच्छा होती. तबियत खूष करून टाकणारं काही म्हणजे न्यू यॉर्कचं नाइट लाइफ.. नाइट क्लब्ज वगैरे.
 
‘‘आसपास आहेत काही.. पण, साधे. त्यात तशी मजा नाही.’’ यजमानानं कोरडेपणानं सांगितलं.
 
तशीमजा म्हणजे कॅबरे किंवा टॉपलेस नाच किंवा पोल डान्स वगैरेची. तिथे होते ते आपल्याकडे असतात तसेच नाइट क्लब किंवा डिस्कोथेक.
 
‘‘क्या यार, इतनी दूर आये है, कुछ मेहमाननवाजी तो करो,’’ विचारणाऱ्याचा अंगुलीनिर्देश आपल्याकडल्याप्रमाणे बाहेरून बंदडान्स बारच्या अमेरिकन आवृत्तीकडे होता.
 
‘‘सॉरी. ते सगळं इथं नाही. त्यासाठी आपल्याला फार नाही, फक्त अडीचशे मैल दूर जावं लागेल, येताय?’’
 
सगळ्यांनी चुपचाप हॉटेलचा रस्ता पकडला..
 
हे सगळं घडत होतं न्यू यॉर्कमध्ये, टाइम्स स्क्वेअरमध्ये.
 
नाइन इलेव्हन या नावानं कुविख्यात झालेल्या 11 सप्टेंबर 2001 या तारखेच्या एक दिवस आधीपर्यंत टाइम्स स्क्वेअर हा रात्रीच्या वेळी रस्त्यावरून पिक अपकेल्या जाणा-या अल्पवस्त्रांकित वेश्यांचा अड्डा झाला होता. तिथल्या गल्लीगल्लीत अंगप्रदर्शनाचे आणि लैंगिक चाळ्यांचे सगळे चोचले पुरवणाऱ्या क्लबांचा सुळसुळाट होता. कोणताही गैरधंदा एकटय़ानं तगत नाही. त्याला इतर गैरधंद्यांची कवचकुंडलं लागतात. इथल्या शरीरविक्रयाच्या व्यवसायाबरोबर ड्रग्ज, लूटमार, तस्करी अशा अनेक काळ्या धंद्यांनी हा परिसर बुजबुजून गेला होता.. नाइन इलेव्हनपर्यंत.
 
11 सप्टेंबर 2001 रोजी अल् कइदानं अमेरिकेच्या गंडस्थळावर हल्ला चढवला आणि त्यात न्यू यॉर्कच्या ओळखीची खूण बनलेले वर्ल्ड ट्रेड सेंटरचे दोन्ही टॉवर जमीनदोस्त झाले.. त्या दिवसानंतर या भागाचं भाग्य पालटलं.. खरं तर या हल्ल्यांचा आणि न्यूयॉर्कमध्ये फोफावलेल्या गुन्हेगारी जगताचा कोणत्याही अर्थानं काहीही संबंध नव्हता. अल् कइदाचे दहशतवादी आणि या बदनाम वस्त्यांमधले गुन्हेगार यांच्यात जवळिकीचा धागाही नव्हता. पण, गैरधंद्यांच्या आडोशानंच दहशतवाद फोफावतो, एवढं एकच तत्त्व न्यू यॉर्कच्या सगळ्या सरकारी यंत्रणांनी मान्य केलं आणि आपल्या प्रिय शहरावर यापुढे दहशतवादी हल्ला व्हायचा नसेल, तर शहराची साफसफाईकेली पाहिजे, एवढाच निर्णय त्यांनी केला. आमच्या मनोरंजनाचं काय, त्या बिचाऱ्या स्ट्रिपटीझ नर्तिकांच्या रोजीरोटीचं काय होणार, गुन्हेगारांच्या मानवी हक्कांची कोणाला कदर आहे की नाही, वगैरे चकार शब्द निघाला नाही. कुठूनही वरून दबाव आला नाही.
 
रुडी गुलियानी या नंतर जागतिक ख्यातीला पोहोचलेल्या महापौरांच्या नेतृत्वाखाली गुन्हेगारी जगताच्या मुसक्या इतक्या वेगानं आणि काटेकोरपणे आवळण्यात आल्या की संध्याकाळी सहानंतर गोऱ्या-निमगोऱ्या माणसानं ज्या भागांमध्ये साधी फेरी मारणंही थेट प्राणघातकच मानलं जायचं, जिथे गँग्ज ऑफ न्यू यॉर्कचं साम्राज्य होतं, ते सगळे परिसरही र्निजतुकआणि निधरेक झाले..
 
..त्यानंतर आठ वर्षे उलटून गेल्यानंतरही टाइम्स स्क्वेअरच्या परिसरात तबियत खूषकरून घेऊ इच्छिणा-याला अडीचशे मैलांचा फेरा पडावा, इतक्या कठोरपणे न्यू यॉर्कच्या कायदा सुव्यवस्थेवर सरकारी आणि पोलिसी यंत्रणांनी बसवलेली पकड घट्ट आहे..
स्थळ : मुंबई
 
काळ : कोणताही
 
ट्रेनवर, हॉटेलांवर, इमारतींवर, चौकांमध्ये, बसमध्ये, स्कूटरमध्ये, कारमध्ये, कुकरमध्ये अशा विविध प्रकारांनी बाँबस्फोट कसे करावेत, याची बारमाही कार्यशाळाच चालू असावी, अशी या शहराची स्थिती. आधीच्या स्फोटांनंतर, हल्ल्यांनंतर किमान पेपरात नावं-फोटो छापण्यासाठी काही संशयित तरी सापडायचे. आता तर तीही पद्धत बंद झाल्यात जमा आहे. कोणीही यावं स्फोट करूनी जावं, अशी आपली स्थिती.
 
अमेरिकेतल्याप्रमाणे दहशतवादी आणि गुन्हेगारी जगत यांच्यात थेट संबंध नाही, असं तर इथं अजिबातच नाही. उलट इथल्या गुन्हेगारी जगताचे सम्राटच शेजारच्या देशांच्या आश्रयानं दहशतवादाचे आका बनलेले आहेत, हे जगजाहीर आहे. त्यांचे इथे स्लीपर सेल आहेत, त्यांना पैसाअडका, खोटी कागदपत्रं, इतर सामग्री, आत शिरण्याच्या, पळून जाण्याच्या वाटांची माहिती, सुसज्ज यंत्रणा आणि एस्कॉर्टइथल्या गुन्हेगारी जगताकडूनच पुरवले जातात, याबद्दलही शंका नाही. पण कितीही स्फोट झाले, हल्ले झाले तरी इथल्या गुन्हेगारी जगताचा बाल भी बांका होणार नाही, हे पक्कं.
 
गुन्हेगारी जगत वगैरे फार लांबच्या गोष्टी.
 
जव्हेरी बाजार हा गुजरातीबहुल इलाका असल्यानं दहशतवाद्यांचा आवडता परिसर आहे. चिंचोळे रस्ते, त्यांवरचं बेशिस्त पार्किंग आणि अनधिकृत फेरीवाल्यांनी व्यापलेली खाऊ गल्ली यामुळे हा सगळा परिसर सतत गर्दीनं गजबजलेला असतो. इथं यापुढे दिवाळीचा अ‍ॅटमबाँब जरी वाजला तरी पळापळीत चार लोक जिवाला मुकतील, अशी स्थिती आहे. दहशतवाद्यांना जास्तीत जास्त माणसं मारण्यासाठी हीच गर्दी आणि बेशिस्त हवी आहे.. तीच या हल्ल्यांमध्ये मरण्याची पाळी ज्यांच्यावर येणार आहे, त्यांनाही हवी आहे. परवाचा बॉम्बस्फोट झाल्यावर सध्या इथे गाडय़ा पार्किंग करू दिल्या जात नाहीत, खाद्यपदार्थाचे ठेले हटवण्यात आलेत. पण हे चित्र किती दिवस राहिल?
नाइन इलेव्हननंतर 10 वर्षात अल् कइदानं अनेकदा डरकाळ्या फोडूनसुद्धा अमेरिकेच्या भूमीवर एकही दहशतवादी हल्ला झालेला नाही..
 
आणि..
 
आपल्या भारतवर्षात, मुंबई शहरात मनाला येईल तिथं, वाटेल त्या आकारा-प्रकाराचा बाँब फोडण्याची स्पर्धा ठेवता येईल आणि नंतर हवं तर मान्यवर मौलाना मसूद अझर यांच्या शुभहस्ते पारितोषिक वितरणही करता येईल, अशी स्थिती आहे..
 दोन्हीकडची स्थिती 11 सप्टेंबर 3001 रोजीही यापेक्षा वेगळी असण्याची शक्यता फार कमी आहे..
..हा योगायोग नाही.

(चित्र : प्रदीप म्हापसेकर)

(प्रहार, ११ सप्टेंबर, २०११)

Sunday, September 4, 2011

राणी... फक्त नामधारी!

चला , आता हेच व्हायचं बाकी होतं... तेही झालं... आता किमान यापेक्षा अधिक विटंबना , अवहेलना तरी होऊ शकणार नाही...उल्हासनगराजवळच्या रुळांवर आगडोंबात धडधडलेल्या नऊ डब्यांसह उभ्या दख्खनराणीला जर मन असतं , तर ते हेच म्हणालं असतं....

...'
राणी राणी ' म्हणून डोक्यावर घेणारे गरज सरल्यावर कशी पोतेऱ्याच्याच लायकीची दासी करून टाकतात , ते ' डेक्कन क्वीन ' ने पाहिलंच होतं... ती विटंबना तिच्या राणीपणाच्या दिमाखाचा मन:पूत लाभ घेणाऱ्या तिच्या रेल्वेवाल्या सग्यासोयऱ्यांनीच केली होती... गुरुवारी निर्दयपणे सीट्स फाडून , बोळे भरून , डबे पेटवणारे मद्यधुंद रासवटांचे हात परक्यांचे होते , हा दिलासाच मानायला हवा.

मुंबई आणि पुणे या दोन शहरांना जोडणारी ही ऐतिहासिक गाडी. पण , तिच्याविषयीच्या मानाचा , अभिमानाचा किंवा ममत्वाचा मक्ता फक्त पुण्याचा... कारण ती येताना मुंबईत काम करणाऱ्या पुणेकरांना घेऊन येते आणि जाताना काम उरकलेल्या पुणेकरांना घेऊन जाते... मुंबईकरांशी तिचं आतड्याचं नातं काहीच नाही... उलट कल्याण , डोंबिवली , उल्हासनगरच्या पट्ट्यात पलीकडून गदीर्नं ओसंडून वाहणाऱ्या घामट लोकल्समधून , शेजारून तुफान वेगानं जाणाऱ्या या राणीवर पडतात ते सूक्ष्म असूयेचेच कटाक्ष...

सेंट्रल रेल्वेवर काही राडा पडलाच (तसा तो पावसाळ्यात अनेकदा पडतो आणि एरवीही फुटकळ निमित्त पुरतं) तर तो आटोक्यात आल्यानंतर लक्षावधी चाकरमान्यांना पोटात घेऊन उभ्या असलेल्या लोकल्स दीनवाणेपणे उभ्या असतात आणि सीएसटीकडे आधी कूच करण्याचा मान मिरवत ही राणी त्यांच्यामधून टेचात पुढे निघते , तेव्हा तिच्यातले प्रवासीही लोकलकरांकडे तुच्छतेनं पाहात असतात...

...
या राणीला तसं मुंबईचं प्रेम नाहीच. ही मुंबईला आपलं मानणाऱ्यांची गाडीच नव्हे. ऑफिस टायमिंगमध्ये इथे येऊन ते संपताच ' आपल्या गावी ' निघणाऱ्या पुणेरी पुणेकरांची ही गाडी. त्यांच्या दृष्टीनं मुंबई म्हणजे फक्त कामाची जागा... निव्वळ ऑफिस... ऑफिसबद्दल ममत्व वाटावं इतका वेळ या गाडीचे प्रवासी आपापल्या ऑफिसांत घालवतच नाहीत... लेट मस्टर येण्याच्या दोन मिनिटं आधी एन्ट्री आणि पावणेपाचला एक्झिट.

शिवाय , ' दख्खनराणी ' च्या कुशीतून खुशीत निघणारी ही लेकरे. ' डेक्कन क्वीन ' ही सेलिब्रिटी स्टेटसवाली ट्रेन. तिचा (एकेकाळी अचाट असलेला) वेग , तिचा वक्तशीरपणा आणि पुणे-मुंबई विमानप्रवासातली गैरसोय यामुळे पुणे-मुंबई पट्ट्यातले तमाम ' हूज हू ' दख्खनराणीच्या कुशीत शिरायचे. तिने तिचा दिमाख दुपटीने वाढायचा. वर्तमानपत्रांनी , लेखकांनी , कलावंतांनी तिचा ठायीठायी उल्लेख केल्यानं तिचं ग्लॅमर दिसामासी वाढतच गेलं. मग , डेक्कनच्या वेगापासून ऑम्लेटापर्यंत प्रत्येक गोष्टीचं फक्त भरभरून कौतुकच कौतुक. त्यात कौतुक करणारे पुणेकर हे , पुण्याची हवा- ही आपण तिच्यात श्वासोच्छ्वास करतो म्हणूनच शुद्ध , थंड आरोग्यदायी आहे , असं मानणारे. साहजिकच डेक्कन क्वीन हा अभिमानबिंदू झाला.

पण , एक्स्प्रेस-वे झाला आणि डेक्कनच्या वेगाच्या दिमाखाची रया गेली. धनिकांचा एक वर्ग तिच्यापासून दुरावला. सेकंड क्लासात तीन-दोन प्रवासी बसण्याच्या जागेत तीन-तीनच्या सिटा आल्या , आणि डेक्कन क्वीनवाले प्रथमच वेगळ्याच अर्थानं ' आखडले. ' आणि संपूर्ण रिर्झव्ड राणीला ' जनरल ' डबे चिकटले तेव्हाच तिच्या विटलेल्या पैठणीला ठिगळे लागली...

...
आता ती मानमोड्या चाकरमान्यांच्या सोयीची आणि जुन्या प्रेमिकांच्या अवीट जिव्हाळ्याची गाडी राहिली आहे फक्त...

...
इंग्लंडच्या राणीसारखी... फक्त नामधारी राणी.

असली क्या है नकली क्या है?

काही म्हणजे काही म्हणजे काही टोटलच लागत नाही हो आपल्या नेत्यांची निवडणुकीच्या काळात! (म्हणजे एरवी लागते , असंही नाहीये.) पण , एकदा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या की चमत्कारच घडायला लागतात.

म्हणजे असं बघा की निवडणुका जाहीर झाल्यावर जनता नावाचा काही प्रकार अस्तित्त्वात आहे , हे नेत्यांना पुसटसं आठवू लागतं. या जनतेतच ' मतदार ' नावाचा एक पोटप्रकार असतो आणि तो त्या कुठल्याशा त्या केंदांवर रांगा वगैरे लावून आपल्या नावावर शिक्कामोर्तब करतो , तेव्हा आपण निवडून येतो हेही त्यांना अंधुक अंधुक आठवायला लागतं , हा काय कमी मोठा चमत्कार आहे का ?

पण , या निवडणुकीत याहूनही मोठे चमत्कार घडताहेत.

म्हणजे उदाहरणार्थ समजा कुणी चटकन् तुम्हाला विचारलं की भारतीय जनता पक्षात मवाळ कोण आहे , जहाल कोण आहे ? विकासपुरुष कोण आणि लोहपुरुष कोण ? तर उत्तर सोपं आहे की नाही ? भारतीय जनता ' पाटीर् ' शांततेचे दूत , नोबेल पुरस्काराचे (मुशर्रफांबरोबर विभागून) संभाव्य मानकरी , कोमल कविहृदयाचे मवाळ विकासपुरुष या सगळ्या भूमिका आहेत अटलबिहारी वाजपेयींच्या. आणि कट्टर हिंदुत्ववादी , संभाव्य राममंदिराचे शिल्पकार , रुक्ष बाह्यरूपाचे वज्राहून कठोर लोहपुरुष हा हातखंडा रोल लालकृष्ण अडवाणींचा.

राइट! एकदम बरोबर!

मग आता सांगा पुढच्या विधानांपैकी कोणतं कुणाच्या तोंडी शोभतं ?

1. '
गोध्राकांडानंतरच्या दंगली हा रालोआ सरकारवरचा सर्वात मोठा कलंक आहे. '

2. '
कोणाही विदेशी लेखक-अभ्यासकाला आमच्या राष्ट्रपुरुषांशी खेळ करण्याचा अधिकार नाही. ' ( तो करायला आम्ही समर्थ आहोत ना! आणि हेही ' विदेशी ' करायला लागले , तर आम्ही पाच पाच वर्षं काढायची कशी ? करायचं काय ?)

पहिलं विधान नरेंद मोदींना राजधर्माची शिकवण देणाऱ्या वाजपेयींच्या तोंडी शोभतं आणि शंभर टक्के आपल्या आवाक्याबाहेरच असलेल्या कुणालाही दरडावण्याची भाषा... ( ' वांदे पूर्व ' मध्ये घुटमळू नका , इथे आपल्या राज्याचा नाही हो , देशाचा विचार चाललाय , त्यामुळे) अडवाणींच्या तोंडी शोभते.

पण , प्रत्यक्षात वाजपेयींना शोभणारं विधान अडवाणींनी आणि अडवाणींना शोभणारं विधान वाजपेयींनी करून फार म्हणजे फारच गोंधळ उडवून दिलाय. हिंदी सिनेमात जुळ्या भावांच्या गोष्टीत एक भाऊ बदमाष असतो , दुसरा सज्जन. ते जेव्हा क्लायमॅक्सला आमनेसामने येतात , तेव्हा दोघेही एकमेकांची नक्कल करून कोणता कोण आहे , याचा थांगपत्ता लागू देत नाहीत आणि व्हिलन मंडळींच्या तोंडाला फेस येतो , शिवाय त्यांनी खांबाला बांधून ठेवलेल्या जुळ्यांच्या ' माँ ' चंही भयंकर कन्फ्यूजन होतं... तसं काहीतरी या पाटीर्च्या ' मुखवटे आणि चेहरे ' कार्यक्रमात घडतंय बुवा!

...
आणि हे कमी होतं म्हणून की काय अडवाणींनी परवा आणखी एक बाँब टाकला... राजकारणात मूल्य , विवेक , साधनशुचिता वगैरेंतून काही साधत नाही. तेव्हा आमचा पक्ष यापुढे मूल्यांचं , साधनशुचितेचं राजकारण करण्याचा फंदात पडणार नाही...

...
हे फारच गंभीर आहे हो! कोणाची हिंमत झाली असेल अशी ?...

...
अडवाणी अजूनही देशाचे गृहमंत्री आहेत. या देशातल्या गुप्तचर यंत्रणा आजही त्यांच्या अखत्यारीत आहेत... या सर्व यंत्रणांना अडवाणींनी कामाला लावलं पाहिजे...

...
आणि आतापर्यंत भारतीय जनता पक्षानं मूल्यांचं , साधनशुचितेचं राजकारण केलं आहे , अशी वावडी कुणी उडवली , याचा कसून तपास केला पाहिजे!