Sunday, September 4, 2011

तुज मागतो मी सदासर्वदा

साडेतीन किलोमीटर लांबीच्या नवसाच्या रांगेच्या शेवटच्या टोकाला ती जोडगोळी येऊन उभी राहिली, तेव्हा उत्तररात्र झाली होती. रांगेतले लोक खाली बसून, कठडय़ांना टेकून किंवा उभ्याउभ्याच डुलक्या घेत, झोप उडवत जड पावलांनी पुढे सरकण्यात मग्न होते. आसपास तुडुंब गर्दी आणि प्रचंड कोलाहल. त्यामुळे, या दोघांकडे फारसं कुणाचं लक्ष गेलं नाही.
 
‘‘मामा, कुणी ओळखलं नाही ना रे आपल्याला,’’ बाप्पांनी कुजबुजत्या स्वरात उंदीरमामांना विचारलं.
 
‘‘छय़ा! या मुंबईत एरवीही कुणाला कुणाकडे बघण्याची फुर्सत नसते. आता तर ज्याला त्याला दर्शनाची घाई झालीये. कोण बघणार आपल्याकडे?’’ मामा उत्तरले.
 
गणपतीबाप्पांनी हुश्शकरून सुस्कारा सोडला आणि म्हणाले, ‘‘हाडं पार चेचून निघाली रे इकडे येताना.’’
 
‘‘तरी आपण कूल कॅब केली होती. भंगारात निघायचं वय उलटल्यानंतरही रस्त्यांवर धावत असलेली एखादी काळीपिवळी मिळाली असती, तर काही खैर नव्हती आपली. तुम्हालाही हौस फार असल्या खड्डय़ांनी भरलेल्या रस्त्यातून प्रवास करण्याची! माझ्या पाठीवरून मर्सिडीझ नाहीतर बीएमडब्ल्यूसारखी मस्त सुळसुळीत सवारी करायची सोडून टॅक्सी पकडलीत!’’ मूषकराज कृतककोपाने म्हणाले.
 
‘‘अरे, आज टाळला असता हा खडखडीत प्रवास तरी अनंत चतुर्दशीला याच खड्डय़ांमधून सिंगल पीस जायचंय मला. आतापासून प्रॅक्टिस करायला नको? शिवाय आपल्या भक्तांचा रोजचा प्रवास कसा होतो, याचा देवालाही अनुभव असला पाहिजे. या रस्त्यांमधून रोज येणा-या-जाणा-यांना खरं तर देवानंच नमस्कार केला पाहिजे. आणखी एक कारण आहे. माझं वाहन म्हणून ज्या कुणी तुझी नियुक्ती केलीये, तो सरकारी नियुक्त्या करणाराच इसम असणार, याची खात्री आहे मला. अरे, ज्याच्या अंगाखाली धिप्पाड बुलेटसुद्धा लुनासारखी चिपाड वाटेल, अशा आडमाप माणसाला सायकलवर बसवण्यासारखं नाही का रे हे? मी विचार केला.. महागाईचे दिवस आहेत. एखाद्या शेतक-याच्या किंवा चाळक-याच्या घरात राहणारा असशील तर तुझी काय हालत झाली असेल. अशात मी तुझ्यावर स्वार झालो, तर तुझी चटणीच होऊन जायची.’’
 
‘‘ती काळजीच करू नका बाप्पा,’’ उंदीरमामा मिशा फेंदारून अभिमानानं सांगू लागले, ‘‘असल्या फक-या लोकांकडे राहतो कोण? त्यांच्या घरात त्यांना खायला अन्न नाही, आमच्या वाटय़ाला काय येणार? आमचा मुक्काम नेहमी व्यापारी, पुढारी, अधिकारी यांच्या घरी असतो. इथे सगळे खा खा खात असतात आणि कधीच कुणाची उपासमार होत नाही.’’
 
‘‘मग काळजी मिटली. आता यापुढचा प्रवास तुझ्या पाठीवरून. प्रॉमिस..’’ बाप्पांनी उंदीरमामांना आश्वस्त केलं.
 
‘‘तो सुरू होईल तेव्हा ना? रांग केवढी आहे पाहा. आणखी 10 तासांची निश्चिंती. तुम्हालाही काय काय आयडिया सुचतात. म्हणे, वेषांतर करून नवसाच्या रांगेत जाऊया. मला फक्त एकच प्रश्न पडलाय.. आपले हे खादीचे पांढरेधोप कपडे आणि तुमचं हे लंबोदर रूप पाहून कुणी कार्यकर्ता तुम्हाला मंत्री, पुढारी किमान नगरसेवक कसा समजला नाही आणि आपल्याला व्हीआयपी रांगेत का नेलं गेलं नाही?’’
 
‘‘ती कमाल या जादूई टोपीची.’’ बाप्पांनी डोक्यावरच्या गांधी टोपीकडे अंगुलीनिर्देश केला, ‘‘वेष तोच, टोपीही तीच, फक्त तिच्यावर ही अक्षरं लिहिलेली असली की लोकांची आपल्याकडे पाहण्याची दृष्टी बदलते. टोपीवर अक्षरं नसली की टोपीखालचा माणूस मवाली गावगुंड, भ्रष्ट पुढारी. आणि टोपीवर ही जादूची अक्षरं उमटली की टोपीखालचा माणूस प्रामाणिक करदाता आणि जागरूक नागरिक बनतो, भ्रष्टाचारविरोधी लढय़ाचा सैनिक ठरतो..’’
 
‘‘वा बाप्पा वा,’’ मामा कौतुकानं उद्गारले, ‘‘वरून बरंच बारीक लक्ष ठेवता तुम्ही तुमच्या भक्तांवर.’’
 
‘‘ते कामच आहे आम्हा देवांचं,’’ बाप्पा रांगेत पुढे सरकत म्हणाले, ‘‘पण तरीही बहुतेक वेळा भक्त आम्हाला धक्का देतातच..’’
 
‘‘म्हणजे?’’
 
‘‘म्हणजे आता या रांगेचंच बघ. त्या तिकडे रामलीला मैदानावरच्या लीला आणि टीव्हीवरून 24 तास सुरू असलेलं जनप्रबोधन पाहून माझी अशी खात्रीच झाली होती की भारतवर्षातला भ्रष्टाचार निदान 50 टक्के तरी कमी झालेला असणार आणि ही रांग निदान निम्म्याने तरी कमी झालेली असणार. पण नाही. रांग वाढतेच आहे. सगळय़ात वाईट गोष्ट म्हणजे जिकडे तिकडे भ्रष्टाचाराविरुद्ध बडबडबडबड करणारेच सगळे या रांगेत आहेतच.’’ बाप्पांचा पारा चढला होता.
 
‘‘बाप्पा, जरा कळेल असं बोला.. नवसाच्या रांगेचा काय संबंध?’’
 
‘‘काय संबंध? अरे ही तर परंपरागत भ्रष्टाचा-यांची रांग. जरा विचार कर. मला हे लोक काय म्हणतात? सुखकर्ता, दु:खहर्ता.. देव आहे मी यांचा.. सगळय़ा भक्तांवर माझी कृपादृष्टी असलीच तर ती सगळय़ांसाठी समान असणार नाही का? की तू आणि मी मंडपात सरकारी कचेरीतल्या कारकुनासारखे बसून बोलत असतो, ‘मामा, काय हवंय बघ या ताईला? मुलगा हवाय का? काय देणार मुलगा झाला तर? सोन्याच्या दुर्वा? व्हेरी गुड. हिचं काम करून टाक फटाफट. आणि हा कोण? याला परीक्षेत अभ्यास न करता पास व्हायचंय.. फस्क्लास पाहिजे.. फस्क्लास मिळाला तर याचा बाप चांदीचा मुकुट देणार आहे? याला डिस्टिन्क्शनची व्यवस्था करा. ही माऊली कोण? हिच्या पोराबाळांच्या घरात खायला अन्न नाही, तिच्या नव-याला नोकरी लागू दे म्हणतेय? पण, नवस नाही. नुसतं फूल वाहतेय? असं कसं चालेल? नोक-या काय झाडाला लागतात का? जमणार नाही. पुढच्या देवळात जायला सांग. कुठून कुठून येतात भिकारडे..बाप्पांना संतापाने पुढे शब्द फुटेना. उंदीरमामा तर थरथरत होता, बाप्पा कडाडले, ‘‘सांग ना आपण अशी नवसाची लाच घेऊन भक्तांवर कृपा करतो का?’’
 
‘‘न.न.न.नाही..’’ उंदीरमामा कसाबसा पुटपुटला.
 
‘‘अरे, तीनशे वर्षापूर्वी इथल्या संतांनी सांगितलं होतं, ‘नवससायासे पोरे होती, तरी का करावा लागे पती’? पण, यांच्या डोक्यात अकलेचा प्रकाश पडला नाही. यंदा मला वाटलं, यांच्यामध्ये इतकी भ्रष्टाचारविरोधी वीरश्री संचारलीये तर निदान आता तरी देवाला लाच देण्याचा पाखंडीपणा तरी हे थांबवतील.. पण..’’
 
‘‘एक्स्क्यूज मी बाप्पा, पण, हे सगळं तुम्ही स्वत: नवसाच्या रांगेत उभं राहूनच बोलताय..’’ उंदीरमामांनी भीत भीत विचारलं.
 
‘‘अरे, तू या वर्षीच नवाच आलायस माझा ड्रायव्हर म्हणून. त्यामुळे तुला ठाऊक नाही. पण, ज्या वर्षी या मंडळाला एक मोठा पेपर पावला आणि गल्लीचा गणपती राजाझाला, त्या वर्षापासून दरवर्षी इथल्या नवसाच्या रांगेत येऊन नवस बोलून जातो मी.. माझ्या भक्तांना नवससायासाच्या भ्रष्ट अंधश्रद्धेतून बाहेर पडण्याची सद्बुद्धी दे, असा.’’
 
‘‘मग?’’
 
‘‘मग काय? ही मारुतीच्या शेपटासारखी वाढत जाणारी रांग पाहतोयस ना. माझ्या नवसाला मीच पावत नाही रे मामा.’’
(चित्र : प्रदीप म्हापसेकर)

(प्रहार, ४ सप्टेंबर, २०११)

No comments:

Post a Comment