Friday, December 2, 2016

...देश पोरका झाला



असं खरंतर लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, पंडित नेहरू, इंदिरा गांधी यांच्या जाण्याने त्या त्या वेळी अनेकांना वाटलं होतं… पण, त्या त्या वेळी संपूर्ण देशात तशी भावना दाटली असेल, असं वाटत नाही. कारण, या थोर नेत्यांचे अनुयायी प्रचंड संख्येने असले, तरी त्या त्या वेळचे विरोधकही काही कमी नव्हते. त्यामुळे त्यांच्या जाण्याने संपूर्ण देश पोरका झाल्याची भावना निर्माण झाली असण्याची शक्यता कमी आहे.
अर्णब गोस्वामीचं तसं नाही. 

तो 'टाइम्स नाऊ'च्या अध्यक्षपदावरून आणि मुख्य संपादकपदावरून पायउतार झाल्यावर देश पोरका झाल्याची भावना सगळ्या देशात एकसमयावच्छेदेकरून दाटली असणार यात शंकाच नाही. तो नसेल तर आता हातातली पेन्सिल हिंस्त्रपणे नाचवत 'नेशन वाँट्स टु नो' असं आपल्यावतीने कोण किंचाळणार, असा या देशातल्या काहींना पडलेला प्रश्न असेल. (अर्णब हजारो किलोमीटर दूरवरच्या स्टुडिओत असला तरी त्याची ती पेन्सिल आपल्या डोळ्यांत घुसेल, अशा भीतीनेच अनेक पॅनेलसदस्य तो मागेल ती कबुली देत असावेत. आता पोलिस आणि अन्य सुरक्षा यंत्रणाही गुन्हेगारांपुढे पेन्सिल नाचवण्याचं तंत्र शिकून घेणार आहेत म्हणे त्याच्याकडून. मग, लाय डिटेक्टर, थर्ड डिग्री वगैरे सगळं इतिहासजमा झालंच म्हणून समजा.) अर्णब प्राइमटाइमवरून लुप्त झाला तर आपण कमालीच्या शिसारीची ट्वीट्स आणि पोस्ट्स कोणाबद्दल टाकायच्या, अशी काहींची पंचाईत असेल. अरे देवा, आता काय रवीश, राजदीप, दिबांग आणि बरखा बघायचे की काय, या भीतीने काहींची झोप उडाली असेल. ज्यांना अर्णबविना बातम्याच बघता येत नाहीत त्यांना दैनंदिन मालिकांमधून इतकं वीरश्रीयुक्त मनोरंजन कुठून आणि कसं मिळणार, असा प्रश्न पडला असेल. 


अर्णबच्या बाबतीत इंग्रजी बातम्या ऐकणाऱ्या आणि त्या बातम्यांविषयीच्या चर्चा आपापल्या भाषेत करणाऱ्या-ऐकणाऱ्या-वाचणाऱ्यांना काही ना काही भूमिका असतेच. यू कॅन हेट हिम, यू कॅन (मे गॉड गिव्ह यू द करेज) लव्ह हिम, बट यू कॅनॉट इग्नोअर हिम. त्यामुळेच आता अर्णब काय करणार, असा सगळ्या देशाला पडलेला प्रश्न आहे.
एकीकडे तो नवा न्यूज चॅनेल काढणार असल्याची चर्चा आहे, त्याचवेळी अर्णबने टाइम्समधूनच पायउतार होऊ नये यासाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या खास मर्जीतले उद्योगपती गौतम अडाणी हे प्रयत्नशील असल्याची चर्चा आहे. अर्णबला भारतातली दुसऱ्या श्रेणीची वाय दर्जाची सुरक्षा दिली जाणार आहे, असंही म्हणतात. यावरून एकंदर वारं कोणत्या दिशेने वाहतंय, याचा अंदाज यायला हरकत नाही. अर्णब मात्र आपल्या न्यूजरूमच्या कर्मचाऱ्यांना दिलेल्या अंतिम संदेशात 'यापुढचा काळ स्वतंत्र माध्यमांचा असेल' असं काहीतरी सांगत होता म्हणे. 

अर्णबने स्वतंत्र माध्यमांची चर्चा करावी, याइतका मोठा विनोद दुसरा नाही. आपणच चर्चेसाठी बोलावलेल्या मान्यवर तज्ज्ञांना त्यांच्या अभ्यासाच्या विषयांवर जो दोन वाक्यं धड बोलू देत नाही, कोणाच्याही अंगावर अनभ्यस्त आक्रमकतेने धावून जाणं हे ज्याचं वैशिष्ट्य होतं, समोरच्याची सालटीच काढायची, असं ठरवून दोन्ही बाजूंनी आपणच बोल बोल बोलत राहायचं आणि आपण काढलेला निष्कर्ष कसा योग्य आहे, हे ठासून सांगायचं, हे ज्याचं संपादकीय धोरण आहे, तो 'स्वतंत्र' माध्यमांचं महत्त्व सांगतोय?
उद्या अमित शहा निष्कलंक चारित्र्याची महती सांगतील, तर आश्चर्य वाटायचं कारण नाही.
नुकताच घडलेला एक प्रसंग पाहा.

मिता वशिष्ठ ही गुणी आणि विचारी अभिनेत्री अर्णबच्या सदैव पेटलेल्या आगीचं बालिश चलच्चित्र आणि आक्रमक पार्श्वसंगीत यांनी सजलेल्या तथाकथित चर्चात्मक कार्यक्रमात सहभागी झाली होती. विषय होता पाकिस्तानी कलावंतांचा भारतीय चित्रपटसृष्टीतला सहभाग. अर्णबच्या पाचकळ बडबडीच्या अखंड प्रपातात मिता सांगत होती, पाकिस्तानी कलाकारांना आम्ही बोलावतो का? निर्माते बोलावतात, सरकार त्यात अडथळा आणत नाही. त्यात आम्ही काय करणार? भारत आणि पाकिस्तान हे कधीच मित्र देश नव्हते. मग आताच्या त्यांच्यातल्या शत्रुत्वाचा एवढा बोलबाला कसा काय होतोय? इतके ढोल का वाजतायत? फवाद खान हा अभिनेता हिंदी सिनेमात नाव कमावण्यासाठी इथे आला होता. तो त्याच्या देशात त्याच्या देशाविरुद्ध कसं काही बोलू शकेल? आपल्या लोकशाही देशात तरी आपण असं काही खपवून घेतो का? या देशात सफदर हाश्मी सत्ताधाऱ्यांकडूनच मारला गेला, विनायक सेनसारखा माणूस तुरुंगात सडला. हे इथे होत असेल, तर पाकिस्तानात फवादची काय अवस्था होईल?
आपण एवढा आरडाओरडा करत असूनही मिता हे सगळं बोलते आहे आणि ते प्रेक्षकांना ऐकूही जात असावं, म्हणून की काय, पण, अर्णब पिसाळला (रोजच्याप्रमाणेच) आणि अद्वातद्वा बोलू लागला. मिताने इयरफोन आणि लॅपेल माइक काढला आणि ती त्याला 'शट अप' म्हणून भर कार्यक्रमातून निघून गेली. अर्णबच्या कार्यक्रमात त्याने 'शट अप' केलेल्या अनेकांनी मिताचं अभिनंदन करणारे संदेश पाठवले. अर्ध्या तासाने अर्णबने मेसेज पाठवला, तू कारगिलच्या शहीदांचा अपमान केला आहे.

या सोंड्याच्या शोमध्ये त्याच्या आचरटपणाला आक्षेप घेऊन शट अप म्हटलं की डायरेक्ट शहीदांचाच अपमान होतो? इथे तर 'भक्त'ही लाजले असतील, अशा घाऊक अपमाननिश्चितीचा ठेका त्यांच्याकडे आहे ना!
बरं हे अर्णब कुणाला ऐकवत होता, तर भारताच्या वतीने दोन युद्ध लढलेल्या एका शूर लष्करी अधिकाऱ्याच्या मुलीला. तिला त्या तथाकथित पॅनेल चर्चेत कोण सहभागी झालंय हे माहितीही नव्हतं. एकट्या अर्णबची मचमच आणि इयरफोनमधली खरखर (या दोहोंतला फरक तिने ओळखला, याबद्दल तिला किमान पद्मश्री मिळायला हरकत नाही) यापलीकडे तिला काही ऐकायलाही येत नव्हतं. त्या कार्यक्रमात जवानांचे नातेवाईक सहभागी होते, हे तिला कळायचा काही मार्गच नव्हता. अर्थात ते माहिती असतं तरीही ती बाहेर पडण्याने इतर सहभागींचा अपमान होण्याचा काही संबंधच नव्हता. 
हे एक जेनेरिक उदाहरण आहे. 
अर्णबचा कार्यक्रम रोज पाहण्याचं धारिष्ट्य ज्यांनी केलं असेल, त्यांना अशी असंख्य उदाहरणं आठवतील. लोकांना आपल्या कार्यक्रमात बोलावून अपमानित करणं हा त्याचा छंदच आहे. 
तरीही अर्णब हा आपल्या देशातल्या इंग्रजी वृत्तवाहिन्यांच्या जगातल्या सर्वात यशस्वी न्यूज अँकर्सपैकी एक, कदाचित सर्वात यशस्वी अँकर होता आणि आहे, त्याचं काय करायचं?
आता चेतन भगत हा आपल्या सर्वात यशस्वी देसी इंग्रजी कादंबरीकारांपैकी एक आहे, त्याचं आपण काय करतो, तेच.
दुर्लक्ष.

अर्णबची सक्सेस स्टोरी ही पौगंडावस्थेतल्या माध्यमांची निव्वळ व्यावसायिक यशाची सक्सेस स्टोरी आहे. भारतीय वृत्तवाहिन्यांच्या गौरवगाथेत समावेश होण्याजोगं त्यात काहीही नाही. पत्रकारितेत अर्णबने काही भरीव कामगिरी केल्याचं ऐकिवात नाही. अनेक विषय त्याने त्याच्या पद्धतीने लावून धरले होते. पण, तसं प्रत्येक वाहिनी आपल्या एक्स्क्लुझिव बातम्यांच्या बाबतीत करतं. अर्णबच्या चॅनेलने हाती घेतलेल्या एका मोहिमेचं उदाहरण पाहा. या देशात कोणीही व्हीआयपी, व्हीव्हीआयपी असता कामा नये, कोणत्याही व्हीव्हीआयपीमुळे सर्वसामान्य नागरिकांच्या रोजच्या जगण्यात अडथळा येता कामा नये, असा एक विषय टाइम्स नाऊने लावून धरला होता. नेत्यांसाठी विमानं, ट्रेन कशा रोखल्या जातात, रस्ते कसे अडवले जातात, त्यांच्या संरक्षणासाठी नेमलेल्या सुरक्षा यंत्रणेवर किती पैसे अनाठायी खर्च होतात, वगैरे अनेक गोष्टींचा ऊहापोह त्यात होता, स्टिंग ऑपरेशन्स होती. देशातल्या जनतेची भावना थेट व्यक्त करणारी ती मोहीम होती. ती अचानक गुंडाळली गेली. त्याबद्दल अर्णबने चकार शब्द काढला नाही. आता तोच अर्णब तशाच व्हीव्हीआयपींमध्ये समाविष्ट होणार आहे आणि १५००० सामान्य नागरिकांच्या सुरक्षेसाठी लागणारी यंत्रणा त्याच्या एकट्याच्या दिमतीला दिली जाणार आहे.
तो राष्ट्राची अनमोल संपत्ती आहे ना!

अर्णबचा उथळ आक्रमकपणा (ही प्रतिमानिर्मिती असू शकते) हा त्याचा सेलिंग पॉइंट आहे. १९९१मध्ये देशात आलेल्या उदारीकरणाच्या लाटेत हात धुवून घेऊन तुस्त झालेल्या ढोंगी, मतलबी आणि दुटप्पी मध्यमवर्गाचा आतला आवाज ही त्याची खरी ओळख आहे. त्यांच्यावतीने आणि त्यांच्याच पद्धतीने आक्रस्ताळ्या शैलीत राष्ट्रवादाच्या, देशभक्तीच्या लोकप्रिय कल्पना किंचाळत राहणं, हे त्याच्या यशाचं गमक आहे. ते व्हॉट्सअॅप, फेसबुकवर 'किंचाळत' फिरतात, हा टीव्हीवर किंचाळत असतो. लोकांना असं किंचाळणं फार आवडतं. आपल्याला एकंदर ध्वनिप्रदूषणाची आवड आहेच. त्यांना वाटतं, बघा हा कसा सेक्युलर पुरोगामी, उदारमतवादी, विचारवंतांची (या सगळ्या शब्दांची या नवमध्यमवर्गाला असलेली अॅलर्जी भयंकर बोलकी आहे) सालटी काढतोय! समोरच्याला बोलूच द्यायचं नाही, आपणच प्रश्न विचारायचे, उत्तरं द्यायची आणि समोरचा साफ हरला आहे, असंही जाहीर करून मोकळं व्हायचं, हा त्याचा खाक्या. तोच याही मंडळींचा असतो. 
याला धारेवर धरणं म्हणत नाहीत. चर्चा म्हणत नाहीत. 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एकेकाळचे प्रवक्ते आणि भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस राम माधव यांना ऑक्स्फर्डमध्ये 'हेड टु हेड' या कार्यक्रमात मेहदी हसन या सूत्रसंचालकाने ज्याप्रकारे टप्प्याटप्प्याने एक्स्पोझ केलं होतं (https://www.youtube.com/watch?v=m1W-oXZ_31U) ते पाहिल्यानंतर अर्णबचा सगळा आरडाओरडा किती शाळकरी असतो, ते लक्षात यायला हरकत नाही. रोजच्या रोज मुठी आवळून, पेन्सिलीने कोथळे काढत कशावर तरी भयंकर आरडाओरडा करून देशाच्या वतीने कोणालाही, कसलेही प्रश्न विचारायचे असतील, तर शाळकरीपणा तिथूनच सुरू होतो. कसल्याही सखोल अभ्यासाची शक्यताच उरत नाही. शिवाय, कितीही अभ्यासू असला तरी कोणताही संपादक काही ब्रम्हदेव नसतो आणि त्याच्याकडे कितीही मोठी रिसर्च टीम असली तरी रोजच्या रोज घडणाऱ्या घटनांचे सगळेच्या सगळे पैलू त्या टीमलाही आकळत नसतात. म्हणूनच तर तज्ज्ञांना बोलावून लोकांना त्या त्या विषयाच्या अनेक बाजू समजावून देण्यासाठी पॅनेल डिस्कशन केली जातात. चर्चेच्या मूळ तत्त्वालाच हरताळ फासणारा आक्रमक आवेग हीच अर्णबची ओळख राहिली आहे. समोरच्याला बोलू दिलं आणि तो आपल्या आकलनाच्या टेम्प्लेटबाहेरचं काही बोलला तर उत्तर काय द्यायचं, अशी पंचाईत. अशी लाइव्ह पंचाईत झाली आणि आपण खोटे ठरलो, तर जो सगळ्यात मोठ्या आवाजात ओरडतोय तो ब्रम्हदेव असं मानणाऱ्या चाहत्यांसमोर आपली काय इज्जत राहील, अशी त्याला भीती वाटत असावी. त्यामुळे मुदलात समोरच्याला बोलूच द्यायचं नाही, हेच धोरण. विषय संपला.

अर्णब खरोखरच निष्पक्षपातीपणे आणि कोणत्याही दबावाविना निर्भयपणे कोणालाही, भले अर्धवटपणाने का होईना, भिडणारा असता, तर पंतप्रधान नरेंद्र मोदींची मुलाखत घेताना त्याचा मवाळ, मचूळ आणि तोडबाज रजत शर्मा झाला नसता. त्याने त्यांनाही निर्भयपणे ग्रिल केलं असतं. तिथे त्याची कल्हई उडाली आणि पितळ उघडं पडलं.
अर्णबची ही अहंमन्य आढ्यता आणि आक्रमक उद्धटपणा हा अपघात नाही; ते टाइम्स समूहाच्या स्वविषयक समजुतीचं आधुनिक रूप आहे. पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ, तो इतर तीन स्तंभांवर अंकुश ठेवतो, असं मानलं जातं. त्यामुळे वर्तमानपत्र हे साबणवडीसारखंच उत्पादन मानणारा टाइम्स समूहही सोयीनुसार स्वत:ला पत्रकारितेचा दीपस्तंभ मानतो. जाहिरातींच्या मध्ये मोकळ्या जागा राहू नयेत, त्या भराव्यात, यासाठी संपादकीय विभाग असतो, असं आपल्याकडच्या नव्या रिक्रूटांना शिकवणाऱ्या या समूहाचा व्यावसायिक आवाका खूप मोठा आहे. पण, पत्रकारितेत द हिंदू, स्टेट्समन आणि इंडियन एक्स्प्रेस या समूहांना जो मान आहे, तो या समूहाला नाही. त्यांचा व्यावसायिक आवाकाही छोटा होता त्या काळात टाइम्सचे राष्ट्रीय संपादक दिलीप पाडगावकर यांनी देशातल्या दुसऱ्या क्रमांकाच्या पदावर आपण विराजमान आहोत, असं सांगून खळबळ उडवून दिली होती. पहिल्या क्रमांकाचं पद होतं पंतप्रधानाचं. दुसऱ्या क्रमांकाचं पद म्हणे टाइम्सच्या संपादकाचं. त्यांच्या काळात अशी गैरसमजूत का होईना, करून घेण्याइतकं नैतिक अधिष्ठान या समूहापाशी होतं. नंतरच्या काळात ते अधिष्ठान संपत गेलं आणि पोकळ तोरा कायम राहिला.
अर्णब गोस्वामी हा त्या तोऱ्याचं मूर्तरूप होता.

आता त्याने ही इमेज टाइम्स नाऊपुरतीच धारण केली होती की हा मुखवटा त्याच्या चेहऱ्याला घट्ट बसला आहे की त्याचा हाच मूळ चेहरा आहे, हे त्याच्या पुढच्या वाटचालीतून समजून येईल.
या इमेजपलीकडे अर्णब शिल्लक असेल, तर त्याच्या नवीन इनिंग्जकडून काही अपेक्षा बाळगता येतील.
तोपर्यंत, त्याच्या राजीनाम्यानंतर व्हायरल झालेल्या एका ट्वीटच्या आधाराने बोलायचं तर, काही काळ देशात निर्माण झालेल्या शांततेचा आनंद लुटावा. त्याच्या चाहत्यांनी दोन मिनिटांचा कल्लोळ पाळायला हरकत नाही.

पूर्वप्रसिद्धी : अक्षरनामा न्यूज पोर्टल
छायाचित्रे इंटरनेटवरून साभार.



6 comments:

  1. good one... i have not watched him much so can't comment abt him but heard abt him...

    ReplyDelete
  2. शांतता. टाळ्या. कृतज्ञता.

    ReplyDelete
  3. No one wants to know anything now. To know or not to know that's the question

    ReplyDelete