Monday, February 22, 2016

देशभक्तीचे विकान

'देशभक्तीचे विकान' अशी पाटी पाहिल्यानंतर आमच्यामधील बहिर्जी लगेच जागा झाला. कान टवकारले, डोळे विस्फारले, चांगल्या बातमीचा गंध आमच्या नाकात शिरला आणि दुकानात मालक म्हणून आमचे परममित्र बाबुराव बोंबले यांना पाहिल्यावर तर आम्ही उडालोच. 
त्यांनी दुकान उघडल्याचं आम्हाला माहितीही नव्हतं. 
बाबुराव कपाळावर टिळा रेखून गंभीर मुद्रेने दुकानात बसले होते. 
एरवी रमी खेळणारे, आठवड्यातून एक दिवस अंमळ चांगभलं करणारे, संध्याकाळी नाक्यावर रमणीय स्थळांचं दर्शन घेणारे रसिक बाबुराव ते हेच, यावर कुणाचा विश्वास बसला नसता. एका टिळ्यामुळे इतका फरक पडतो?
अत्यंत अनोळखी दिसणाऱ्या या मित्राकडे पाहून हसण्याचा आमचा प्रयत्न फोल गेला. 
“काय बाबुराव, हे काय नवीन,” असं सलगीच्या सुरात म्हणालो, तेव्हा त्यांनी दुकानातल्या एका पाटीकडे बोट दाखवलं. 
हे भारतमातेचं पवित्र मंदिर असून येथील पावित्र्य राखावे, हास्यविनोदांसाठी उद्याने आहेत, येथे कामाचे बोलावे, आपले म्हणणे थोडक्यात सांगावे, अशी एक पुणेरी शैलीतली पाटी लिहिली होती. 
संपूर्ण तिऱ्हाईताप्रमाणेच आमच्याशी बोलणाऱ्या, वागणाऱ्या बाबुरावांना आता या पाटीतल्या सूचनांनुसारच बोलतं करावं लागणार, हे लक्षात आल्यावर आम्ही अत्यंत विनम्रतापूर्वक आणि गंभीरपणे विचारलं, “महोदय, हे विकान म्हणजे काय आहे?”
कडक इस्त्री केलेल्या चेहऱ्यावर कमालीचे तुसडे भाव आणून बाबुराव म्हणाले, “असा प्रश्न तुम्हा तमाम देशद्रोही लोकांना पडतो. विकान याचा अर्थ आहे दुकान.”
आमच्या देशभक्तीलाच हात घातल्यावर आम्ही एकदम संतापलोच. पण, आपल्या मित्राला काहीतरी दुर्धर आजाराने ग्रासलेलं असणार, असा विचार करून आम्ही स्वरांवर नियंत्रण ठेवून विचारलं, “दुकानाला विकान म्हणायचं काय प्रयोजन आहे महोदय. तद्वत हा शब्दच न वापरणं म्हणजे देशद्रोह हे कोणी ठरवलं?” 
बाबुराव उत्तरले, “आम्ही.”
“तुम्ही कोण?”
“आम्ही देशभक्त आहोत.”
“कशावरून?”
“खरंतर आम्ही सांगतो म्हणून, एवढंच उत्तर तुमच्यासारख्या देशद्रोह्यांसाठी पुरेसं आहे; पण, तुम्ही प्राचीन स्नेही आहात, पुरातन परिचित आहात, तुमच्यात काही सकारात्मक बदल व्हावा म्हणून सांगतो की, आमचं आमच्या देशावर फार प्रेम आहे आणि आमच्या देशासाठी रक्त वाहायला आणि जीवही ओवाळून टाकायला आम्ही तयार आहोत. त्यामुळे आम्ही देशभक्त आहोत.”
बाबुरावांच्या किडकिडीत देहातून रक्ताचे थेंब तासातासाने दोन पडले तरी खूप आणि एखाद्या सिगारेटफुंक्याने त्यांच्या तोंडावर जोरात धूर सोडला तरी श्वास गुदमरून त्यांचा जीव ओवाळून पडायचा, त्यांची ही भाषा ऐकून जाम हसू येऊ लागलं. पण गांभीर्य कायम ठेवून आम्ही म्हणालो, “बाबुराव, म्हणजे आपले विकानचालक महोदय, देशासाठी दरवेळेला प्राण द्यायला हवा किंवा आपलं रक्त सांडायला हवं, तर आपण देशभक्त ही व्याख्या कुणी केली? आणि तीच व्याख्या असेल, तर तुम्ही सैन्यात का नाही गेलात? इथे दुकानदारी, आय मीन विकानदारी का करत बसला आहात?”
बाबुराव इस्त्रीयुक्त चेहऱ्याने उत्तरले, “आधी आपला अपसमज दूर करा. देशासाठी रक्त सांडायचं ते शत्रूचं, जीव ओवाळून टाकायचा तो शत्रूचा.”
“इथे विकानात बसून? ही भारी आयडिया आहे. तुमच्या वतीने जीव देणार सीमेवरचा सैनिक, शत्रूच्या नरडीचा घोट घेणार तोही सीमेवरचा सैनिक आणि तुम्ही इथे टिळे लावून बसून देशभक्तीची प्रमाणपत्रं विकणार, कमाल आहे.”
बाबुरावांची मुद्रा चक्क प्रसन्न झाली. ते म्हणाले, “आता तुम्हाला आमच्या उदीमाचं सत्य स्वरूप समजलं आहे. तुम्हालाही देशभक्तीचं प्रमाणपत्र हवं असेल तर ते आम्ही बनवून देऊ शकतो. आजकालच्या जगात ते फार उपयोगी पडेल.”
“भगवन्, काय बरे उपयोग आहेत या प्रमाणपत्राचे,” आता आम्हीही पेटलोच होतो.
बाबुराव डबल पेटले होते, ते म्हणाले, “बाळ बित्तमा, सगळ्यात महत्त्वाचा उपयोग म्हणजे इथून बाहेर पडल्यानंतर आपल्याला अचानक देशभक्तांनी गाठून चोपू नये, काळं फासू नये, फेसबुकवर, व्हॉट्सअॅपवर आपले लचके तोडू नयेत, असं वाटत असेल, तर त्यासाठी हे प्रमाणपत्र अत्यावश्यक आहे. आमच्या प्रमाणित विकानातून घेतलेलं हे अखिल हिंदुराष्ट्रीय प्रमाणपत्र पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ, ब्रम्हदेश, अफगाणिस्तानातही चालतं... पण, शहाणी माणसं विद्यमान हिंदुस्तानाच्या हद्दीबाहेर ही प्रमाणपत्रं काढून खिशात ठेवतात... तिकडे फटके पडण्याची शक्यता असते.”
“हे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी अर्हता काय असते?”
“खरंतर डोक्यावर टिळा एवढीच अर्हता पुरेशी होती कालपरवापर्यंत. पण, आताच्या काळात हे इतकं सोपं राहिलेलं नाहीये. तरीपण तुमच्यासाठी प्रयत्न करू. मुळात मला सांगा, तुमचा एखादा भरभक्कम गट आहे का? तुमच्या हाकेसरशी बारापंधरा लोक गोळा होऊन एखाद्या माणसावर हिंस्त्र हल्ला चढवू शकतात का?”
“अहो, माझी काय गुंडांची टोळी आहे का? काहीतरीच काय विचारताय बाबुराव?”
“अहो, तशी असती तर तुम्हाला प्रखर देशभक्त म्हणालो असतो. पण, तुम्ही दिल्लीचे वकीलही नाही आहात, हे मला माहिती आहे. सध्या तुम्ही साधे देशभक्त असल्याचंच प्रमाणपत्र जेमतेम मिळवू शकाल. तुम्हाला किमान सोशल मीडियावर एखाद्याच्या चिंध्या करता येतात का?”
“पण, हे सगळं का करायचं?”
“कमाल आहे तुमची? दुसऱ्या कोणाला तरी देशद्रोही ठरवल्याशिवाय तुम्ही देशभक्त कसे ठरणार? अंधार आहे, असं सिद्ध केलं तर प्रकाश आहे, असं सिद्ध होतं ना?”
आमच्या डोक्यातला अंधार या उदाहरणाने आणखी वाढला.
बाबुराव समजावणीच्या सुरात म्हणाले, “हे पाहा. मानवतावाद, धर्मनिरपेक्षता, परधर्मसहिष्णुता, विवेकशीलता, बुद्धीप्रामाण्य, नास्तिक्य, धर्मचिकित्सा, विज्ञाननिष्ठा या दुर्गुणांनी सध्या भारतवर्षाला ग्रासलेलं आहे. आपल्या तेजोमय इतिहासाचं लोकांना विस्मरण झालेलं आहे. अशा सद्गुणविकृतीच्या बळींची संख्या कमी नाही. त्यांच्यातला एखादा पकडायचा. तू बुद्धी वापरतोस, तुला चिकित्सा करता येते, कसल्याही बावळटपणावर तू आंधळी श्रद्धा ठेवत नाहीस, भारतीय उपखंडाचा इतिहास, त्यातली गुंतागुंत, कुप्रथा, पुराणांमधील अवैज्ञानिक कल्पनाविलास, महाकाव्यांच्या मर्यादा, विषमतापूरक समाजरचना यांच्यावर प्रहार करतोस, म्हणजे तू देशद्रोही आहेस, असं बजावत त्याच्यावर हिंस्त्र हल्ला चढवायचा. म्हणजे तुम्ही आपोआप देशभक्त बनता. त्याचं प्रमाणपत्र लगेच हजर. प्रखर देशभक्त बनण्यासाठी मात्र प्रत्यक्ष मारामारी करता आली पाहिजे. एकास एक अशा प्रमाणात नाही, बरं का! लोकलमध्ये पाकिटमार सापडला तर त्याला कसे शंभर लोक मारतात, तसं. झुंड करायची आणि चोपायचा. शिवाय फोटोशॉपचाही डिप्लोमा लागतो. इकडचा फोटो आणि तिकडचं बॅकग्राऊंड यांचा समन्वय करून दाखवायला लागतो. एखाद्या नि:शस्त्र वृद्धाचा खून वगैरे पाडू शकलात, तर देशभक्त वीर हुतात्मा ही पदवीही मिळू शकते.” 
“एक छोटीशी शंका आहे चालकमहोदय?” आम्ही धाडस करून बोललो, “तुम्ही देशभक्तीचं प्रतीक म्हणून सगळ्या विद्यापीठांवर राष्ट्रध्वज लावायला निघाला आहात. मग, हे देशभक्तीचं विकान असेल, तर इथे भारतदेशाचा झेंडा न लावता हा वेगळ्याच रंगाचा, डिझाइनचा ध्वज इथे का लावला आहे?”
आता बाबुराव एकदम क्रुद्ध झाले. त्यांनी इकडेतिकडे हाका मारल्या आणि दहाबारा टिळेधारी गोळा केले. म्हणाले, “मुसक्या आवळा याच्या. हा देशद्रोही आहे.”
त्या दहाबाराजणांना आमची गठडी वळणं काही अवघड नव्हतं. त्यांनी आम्हाला काउंटरवर नेऊन आदळलं आणि बाबुरावांनी एक भलामोठा शिक्का आमच्या कपाळावर आपटला.
पलीकडच्या आरशात पाहण्याची गरज नव्हती. कपाळावरचा शिक्का कसला असणार, हे स्पष्टच होतं. 

जय फुल्या फुल्या! जय फुल्या फुल्या फुल्या!

‘नॉनसेन्स, सेक्युलर, पुरोगामी कुठले! आताच्या आता हे गलिच्छ भेंडोळं घेऊन दूर व्हा आमच्या नजरेसमोरून... नाहीतर, नाहीतर मी विचारवंत अशी शिवीही देईन तुम्हाला!’ 
संपादकांचा सात्विक संताप शिगेला पोहोचला होता. सकाळी सकाळीच शेठजींनी काही कारणाने तासलं असावं. 
‘पण, सर, तुम्ही इतके का भडकला आहात? माझ्या बातमीत एवढं आक्षेपार्ह काय वाटलं तुम्हाला?’ आम्ही चाचरत विचारलं. 
‘सिनीयर सहकारी तुम्ही आणि हे विचारताय? तुमच्यापेक्षा ती विनास्टायपेंडची राबणारी ट्रेनी मुलं परवडली, बातम्यांपेक्षा जाहिरातीच जास्त आणणारे आपले गावोगावचे रिपोर्टरही अधिक रिपोर्टिंग स्किल बाळगतात.’
‘असं कसं म्हणता सर, मी तर तुमचा बहिर्जी नाईक?’ इतर कसलाही उपाय राहिला नाही की भावनिक अस्मिता फुलवायची, हा आमचा नेहमीचा हुकमी फंडा. तो आताही लागू पडला. संपादकांचा पारा थोडा खाली उतरला आणि आपण महाराजच असल्याच्या थाटात ते सांगू लागले, ‘होय ना? मग तुम्हीच आमच्या अपेक्षांचा भंग कसे करता? जी बातमी सगळ्या वृत्तसंस्थांनी दिली आहे, तीच नुसती मराठीत अनुवादून आमच्याकडे कशी आणता? तुमची गुप्त कामगिरीची सुरसुरी... आय मीन ऊर्मी कुठे गेली? अपशब्दांमुळे नाटकावर बंदी या बातमीच्या मुळाशी तुम्ही का नाही गेलात? सेन्सॉर बोर्डाचं मत का नाही जाणून घेतलंत? आपल्याकडे खास बातमीचा फटाका का नाही फोडलात?’
आता भावनिक आवाहनाचा फंडा आम्हालाही लागू होतोच की... आमचेही बाहू लगेच फुरफुरू लागले, मनगटं शिवशिवू लागली. मागच्या खास बातमीसाठी खर्च केलेल्या रकमेची व्हाऊचरं अजून मंजूर झालेली नाहीत, याचा विसर पडला आणि खिशात किती चिल्लर उरली आहे, याचंही भान हरपून आम्ही तडक बातमीच्या शोधात रवाना झालो...
सेन्सॉर बोर्डाच्या कचेरीत आम्ही पोहोचलो आहोत, हे खिडकीतून अंगावर कचरा येऊन पडला, तेव्हा लक्षात आलं. अंगावर पडले ते सगळे शब्द होते. त्यातला एकही अंगाला चिकटू नये, अंगात मुरू नये आणि मुरून जिभेपर्यंत किंवा लिहित्या हातापर्यंत पोहोचू नये म्हणून आम्ही प्राणांतिक धडपड करून ते सगळे झटकले. आम्ही आत शिरतो न शिरतो तोच मागच्या पावली बाहेर पडत असलेल्या एका खादी झब्बाधारी, दाढीवाल्याशी टक्कर होता होता राहिली. त्याच्या अंगावर एक कागदांची चळत येऊन पडली... त्यातल्या पहिल्या पानावरच्या ‘श्री’नंतर फक्त व्यक्तिरेखांची नावं आणि कंस व कंसातली रंगसूचनांची वाक्यं शिल्लक उरली होती. बाकीचे सगळे शब्द तेच होते, जे मघा आमच्या अंगावर येऊन पडले होते. काही व्यक्तिरेखांची नावंही लोकांच्या भावना दुखावतील म्हणून बदलण्याची सूचना करण्यात आली आहे, असं काहीसं कानावर पडलं. तो नाटककार आपलं न-नाटक (आता त्यात उरलं तरी काय होतं) घेऊन बाहेर पडला. 
आम्ही थबकतच आत शिरलो.
‘काढा काढा, तुमचं बाड काढा. दिवसभर फक्त घाण उपसायचंच काम आहे आम्हाला,’ समोरचे नाट्यपरिनिरीक्षक (यापुढे आपण त्यांना सोयीसाठी नापनि म्हणूयात) जिवाजी कलमदान्याच्या आवेशात म्हणाले. 
‘नाही, आमच्याकडे कसलंही बाड नाही.’
‘धन्य, मग आता काय नाटक आमच्यापुढे एकपात्री करून दाखवणार आहात की अभिवाचन करणार आहात. कठीण आहे. अहो स्क्रिप्ट नसेल, तर सेन्सॉर काय करणार आम्ही. फुल्या फुल्या?’
हा फुल्याफुल्या चक्क उच्चारी होता. म्हणजे ते चक्क फुल्या फुल्या, असं जोशात म्हणाले होते. आम्ही ही संधी सोडली नाही. चेहऱ्यावर आमचं सराईत ओशाळवाणं, तेलकट हसू आणत म्हणालो, ‘साहेब, आपण चक्क फुल्या फुल्या असं म्हणालात?’
साहेब तुपकट हसत म्हणाले, ‘म्हणजे काय? नियम म्हणजे नियम. एकदा या खुर्चीत बसलं की आम्ही आमचं बोलणंही सेन्सॉर करतो जागच्या जागी. उगाच्या फुल्याफुल्यांमध्ये फुल्याफुल्या व्हायला नको.’ साहेबाने टाळीसाठी हात पुढे केला.
‘बरोबर आहे फुल्या फुल्या फुल्या फुल्या’ असं म्हणत आम्ही टाळी दिली तेव्हा साहेबाने आमच्या फुल्याफुल्यांचा अर्थ लावण्याची कोशीस सुरू केली. ती कामयाब होण्याच्या आतच साहेबांचं लक्ष वळवण्यासाठी आम्ही म्हणालो, ‘पण साहेब, बाहेर फार गोंधळ सुरू आहे. या सरकारप्रमाणे तुम्हीही असहिष्णु आहात, काहीही कापाकापी करू लागला आहात, असं म्हटलं जातंय.’
‘कोण बोलतो तो फुल्या फुल्या फुल्या फुल्या. आमच्या समोर येऊन बोला म्हणावं फुल्या फुल्या फुल्या फुल्या.’ साहेबाला रोखण्यासाठी आम्ही थेट मुद्द्याला हात घालायचं ठरवलं.
‘साहेब, आताच आपण एका नाटकात फार विचित्र बदल सुचवलेत. फार सामान्य शब्दांना आक्षेप घेतलात. म्हणजे तुम्ही गांडू..’
पुढचं काहीही ऐकून न घेता साहेबाने पेपरवेट, पेन, पेन्सिल, कान कोरायची काडी, दात कोरायची काडी, स्वत:चा चष्मा, तपासण्यासाठी आलेली तीन नाटकांची बाडं, कोरे कागद आणि नंतर नुसतेच हवेचे झोतही आमच्या दिशेने फेकून मारले. आमच्या व्यवसायदत्त कौशल्यामुळे आम्ही हा सगळा मारा चुकवला आणि थरथरत उभ्या असलेल्या साहेबाला म्हणालो, ‘अहो गांडू बगीचा हा शब्दही तुम्ही कापलाय, त्याबद्दल मी बोलत होतो.’
साहेब म्हणाले, ‘त्यात बोलण्यासारखं आहेच काय?’
‘साहेब, या नावाचा एक गाजलेला काव्यसंग्रह आहे दिवंगत ढसाळसाहेबांचा. त्याला राज्य सरकारने पुरस्कार दिला होता. फार नावाजला गेला होता तो.’ 
‘असेल ना, असेल. आम्ही कुठे नाही म्हणतोय. पण, म्हणून हे नाव असं चारचौघात उच्चारायचं का? आता तुम्ही माझ्यासमोर म्हणजे माझ्या एकट्यासमोर उच्चारलंत तर केवढा भयंकर प्रसंग ओढवला तुमच्यावर.’ 
बरोबर आहे, आम्ही मनात म्हणालो. साहेबांचा नेम भिकार आहे म्हणून. नाहीतर पेपरवेटाने आम्हाला पेपरांच्या श्रद्धांजलीच्या कॉलमात नेऊन बसवलंच असतं.
‘पण, साहेब. तुम्ही हिंस्त्र झालात, हा तुमचा दोष नाही का?’ त्यांच्यासमोर फेकण्यायोग्य काही उरलेलं नाही, हे लक्षात येताच आम्ही धीर केला.
‘अहो पण हा माझा मूळ स्वभाव आहे का? मी या देशाचा नागरिक आहे. मी जगातल्या सगळ्यात शांतताप्रिय, सहिष्णु धर्माचं पालन करतो. आताचं सोडा पण, माझी संस्कृती आणि परंपरा थोर आहे. आमचा इतिहास उज्वल आहे. आम्ही नैतिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या उन्नत आहोत. अशा माझ्यासारख्या माणसातलं जनावर जागं केलंत तुम्ही ते भयंकर शब्द उच्चारून आणि वर माझा दोष आहे म्हणून सांगताय फुल्या फुल्या फुल्या फुल्या. माझ्यासारख्या सत्शील माणसावर ही वेळ आणलीत. आता विचार करा. तुमच्या नाटकाला येणाऱ्या सगळ्या प्रेक्षकांची ही भावना झाली, तर तुम्ही शिल्लक राहाल का? तुमच्या भल्याचेच निर्णय घेतोय ना मी फुल्याफुल्या?’
‘ठीकाय गां... अं... तो शब्द नको. पण, खैरलांजी, रमाबाई नगर या शब्दांमध्ये नेमकी काय अडचण आहे, ते तरी सांगा.’
‘अहो काय दगड आहात की काय तुम्ही फुल्या फुल्या? हे सगळे शब्द वाईट स्मृती जाग्या करतात. तिथे जे घडलं ते लोकांना आठवतं. त्यांच्या मेंदूला आम्ही केलेली इस्त्री विस्कटते, त्यांना पुन्हा चुण्या पडू लागतात. त्यातून लोक सरकारद्रोही म्हणजे देशद्रोही, देवद्रोही, धर्मद्रोही बनू लागतात. हे असले घाणेरडे शब्द उच्चारायचे कशाला? आता ते जनरल अगदी जनरली कुत्रा म्हणाले कुणालातरी. आता जनरलच ते. त्यांना तसा अधिकार आहे. शेपूट हलवणारे खूप लोक पाहिले असणार त्यांनी. तर मग आपणही तीच आठवण काढायची आणि त्या ‘प्रेस्टिट्यूड’सारखा नितांतसुंदर शब्द निर्माण करणाऱ्या सत्पुरुषाच्या आत्म्याला नाहक यातना द्यायच्या, हे शोभतं का तुम्हा फुल्याफुल्याफुल्यांना?’
‘बरोबर आहे. बरोबर आहे. साहेब, सर्वसामान्य नागरिकांच्या मनावर दुष्परिणाम करणाऱ्या ज्या अपशब्दांची यादी तुम्ही काढली आहे, तिच्याबद्दल तुमचं अभिनंदन करण्यासाठीच आम्ही आज इथे आलो होतो. तुमच्या यादीतला एक शब्द आम्हाला फार पटला, पण तो तुम्ही यादीत कसा घातला, याबद्दल शंका होती. तिचं फक्त समाधान करा.’
‘कोणता शब्द?’
‘हिंदुत्व.’
यानंतर साहेबांच्या तोंडून इतक्या ‘फुल्याफुल्याफुल्याफुल्याफुल्याफुल्या’ बाहेर पडल्या की काही काळाने आमचा मेंदू भानामती केलेल्या कपड्यासारखा फुल्याफुल्यांनी भरेल, अशी धास्ती वाटून आम्ही हापिसाकडे धूम ठोकली...

व्यर्थच हो बलिदान

हॅलो, तुम्हाला ताबडतोब निघायचंय, लष्कराचे आपले जवान अडकले आहेत बर्फात. त्यांच्यासंदर्भात काही मिळतंय का पाहा. 
संपादकांचा फोन आला की एरवी आम्हाला स्फुरण चढतं. आज मात्र मन हिरमुसलेलं होतं, हृदय कोमेजलेलं होतं. सियाचिनच्या बर्फात अडकणं म्हणजे काय, याची कल्पना होती. आम्ही सियाचिनला पोहोचणं तर शक्यच नव्हतं... स्वत:ला कितीही बहिर्जी म्हणवून घेत असलो तरी जिथे जीवनाची निशाणीच नाही, अशा पांढऱ्या भव्य थडग्यामध्ये जाऊन राहण्याचं धाडस फक्त वीर जवानच करू शकतात, याची आम्हाला कल्पना आहे. 
लष्कराच्या काही अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी आम्ही दिल्ली गाठली. सगळीकडे गांभीर्याचं आणि शोकाचं वातावरण. अधिकारी बोलण्याच्या स्थितीत नव्हते. आपल्या जवानांचं काय झालं असणार, याची स्पष्ट कल्पना त्यांना होती आणि ते झालेलं नसावं, अशी वेडी आशा मनात धरून ते प्रार्थना करत होते. त्याचबरोबर शोधकार्यही सुरू होतं. यथावकाश आपले जवान बचावणार नसल्याचं स्पष्ट होत गेलं आणि दिल्लीची अशीही मरतुकडी, धुरकट झालेली हवा आता मरणरंगी भासू लागली. 
तेवढ्यात चमत्कार झाला. 
हणमंतप्पा कोप्पड नावाचा जवान जिवंत सापडल्याची बातमी आली आणि दु:खाला सुखाची किनार लाभली. 
हणमंतप्पाची परिस्थिती अजिबात चांगली नव्हती. ईश्वरी चमत्कारच त्याला वाचवू शकेल, असं वाटून लोकांनी प्रार्थना सुरू केल्या. लष्करी अधिकाऱ्यांनी त्याच्यावर सर्वोत्तम वैद्यकीय उपचार होतील, याची काळजी घेतली. पंतप्रधानही या जवानासाठी भावविवश झाले. 
वातावरण बदललंय. आता लोक नऊ जवानांचा मृत्यू विसरलेत. एका जवानाची झुंज ही पॉझिटिव्ह स्टोरी आहे. जरा बोला लोकांशी. मूड पकडा. संपादकांचा आदेश आला. आम्हीही उत्साहाने लष्करी अधिकाऱ्यांना भेटलो. ते नाव न सांगण्याच्या अटीवर मोकळेपणाने बोलले. एवढ्या दिवसांत आज त्यांच्या चेहऱ्यावर थोडा आनंद दिसत होता. ते म्हणाले, बघा बघा आमचा जवान कसा असतो. हाडं सोडा, आत्माही गोठवण्याची ताकद असलेल्या थंडीत हा पठ्ठ्या जिवंत राहिला. त्याने साक्षात मृत्यूला ठेंगा दाखवला. वुई आर सो प्राउड ऑफ हिम. 
सगळ्या देशाला त्याचा अभिमान आहे सर. पण, झालं काय की तिकडे वृत्तवाहिन्या न पोहोचल्यामुळे, लोकांपर्यंत प्रत्यक्ष दृश्य पोहोचायला उशीर झाला. तुम्ही रेस्क्यू टीमबरोबर एक टीम नेली असती पत्रकारांची, तर... 
व्हॉट नॉन्सेन्स, अधिकारी महोदय कडाडले, तिथे टीव्हीवाले गेले असते, तर त्यांनी रेस्क्यू ऑपरेशनचा सत्यानाश करून टाकला असता. आमच्या हणमंतप्पासाठी जीवनमरणाची लढाई होती, ती यांनी टीआरपीची लढाई करून टाकली असती. अब आप को कैसा लग रहा है, असा प्रश्न तिथेही विचारल्याशिवाय राहिले असते का हे दंडुकेधारी? हणमंतप्पाचं सोडा, मला जरी विचारलं असतं तर गोळी घालून तुमचा भेजा उडवावासा वाटतोय, असं मी सांगितलं असतं आणि त्याचं प्रात्यक्षिकही करून दाखवलं असतं. अधिकारी महोदयांचा हात कमरेकडे जातो आहे, हे पाहताच आम्ही उठलो आणि घाईघाईने त्यांचा निरोप घेऊन बाहेर पडलो. 
सर्वसामान्य माणसांची नस ओळखण्यासाठी त्यांच्याबरोबर प्रवास करणं महत्वाचं असतं. सार्वजनिक वाहनातून प्रवास करा, हे आमच्या संपादकांचं वचन लक्षात घेऊन आम्ही दिल्लीची सुप्रसिद्ध मेट्रो गाठली. शेजारच्या प्रवाशाशी विषय काढला. साहेब, त्या हणमंतप्पाची पण कमाल आहे नाही? 
कमाल म्हणजे काय? अरे आपल्या भारताचा वीर जवान आहे तो? शेर का बच्चा है... 
हा विषय ऐकून बसलेले आणि उभे असलेले अन्य सहप्रवासीही संभाषणात सहभागी झाले. सगळ्यांनी हणमंतप्पाच्या जिगरबाजपणाचं कौतुक केलं. 
आम्ही पुन्हा शेजारच्याला विचारलं, ही बातमी आली तेव्हा तुम्ही काय करत होतात? 
बसलो होतो, तो चटकन बोलून गेला, मग सारवासारव करत म्हणाला, आपले नऊ जवान बर्फात जिवंत गाडले गेले, हे समजल्यामुळे इतकं प्रचंड दु:ख झालं होतं की ते बुडवण्यासाठी बसावंच लागलं. 
बरोबर आहे, बरोबर आहे, असं एकाने झुलत झुलतच सांगितलं... त्याचं दु:ख अजून शमलेलं दिसत नव्हतं. 
ही बातमी तुम्हाला टीव्हीवर समजली, तेव्हा तुमची काय भावना झाली? 
मन भरून आलं, आनंद पोटात मावेना, खुशीत आणखी एक पेग मारला आणि देशभक्तीपर गाण्यांचं चॅनेल शोधू लागलं. कोणत्याही जवानाचं सीमेवर काहीही बरंवाईट झालं की मी लगेच देशभक्तीची गाणी लावतो. 
कोणती गाणी पाहिलीत मग? अहो हे आपले छचोर मीडियावाले. त्यांच्याकडे कुठून येणार देशभक्तीची भावना. सगळेच्या सगळे प्रेस्टिट्यूड बनून बसले आहेत. एकाही चॅनेलला हे सुचलं नाही हो. सगळीकडे उच्छृंखल गाण्यांचा हैदोस चालला होता. शेवटी बायको-मुलं झोपायला गेल्यानंतर मस्तीजादे आणि क्या कूल है हमची गाणी पाहूनच आनंद साजरा करावा लागला. जवान बर्फात अडकल्यापासून त्या रात्रीच तेवढी शांत झोप लागली मला. 
तुम्ही काय केलंत? आता आम्ही शेजारच्या दुसऱ्या प्रवाशाकडे मोर्चा वळवला. 
अपनी भी कहानी लगभग यही है. फक्त मी काही घेत नाही. नुसता जेवतो. हणमंतप्पाची बातमी ऐकल्यावर पोराला पिटाळून मिठाई मागवली. बिल्डिंगच्या सेक्रेटरीला फोन लावला? 
कशाला? 
डीजे मागवायला. 
रात्रीचा डीजे? कशाला? 
कशाला म्हणजे? देशभक्तीची गाणी वाजवायला. मूर्ख पोलिसांच्या बंदीमुळे रात्री येणार नाही म्हणाला. मग सकाळी सहा वाजता मागवला. सकाळी सगळीकडे झेंडे लावले. सोसायटीच्या खर्चाने नाश्ता करवला सगळ्यांना आणि भारत माता की जय म्हणून आपल्या कामाला लागलो. 
मै क्या कहता हूँ भाईसाब, एकही धमाके मे पाकिस्तान को खत्म करेंगे तो ये सब झगडाही खतम हो जाएगा ना? एकाने तोंड घातले. 
अरे ऐसे कैसे खत्म होगा दुसरा आसपास कुठे दाढी-गोल टोपी दिसते का, हे पाहात म्हणाला, यहाँ भी तो है ना कटेलों की औलादें. त्यांनाही संपवून टाकायचं, तिसऱ्याने निकाल दिला.
आम्ही म्हणालो, असं आहे भावांनो, हणमंतप्पाच्या आधी जे नऊ जवान शहीद झाले ना आपले, त्यात एक मुश्ताक पण होता. 
यावर गप्प झालेल्या जमावाला तुमचं कोण कोण आहे लष्करात, देशप्रेमाला जागून तुम्ही पाठवता का आपल्या मुलांना सैनिकी शिक्षणासाठी हे प्रश्न विचारल्यावर तर पांगापांगच झाली. 
मग आम्ही आमचा मोर्चा युद्धतज्ज्ञांकडे वळवला. नावाच्या पाटीवर बंदूक टांगलेली होती आणि तोफेची नळी हीच घराची बेल बनवण्यात आली होती.
हणमंतप्पाची बातमी आणि त्यावरच्या आनंदाची प्रतिक्रिया याबद्दल सगळं नेहमीसारखंच बोलून झाल्यानंतर त्यांना विचारलं, सर, नऊ जवान कामी आले आपले. नऊ घरांमधले नऊ कर्ते पुरुष गेले. नऊ कुटुंबांमधला एक माणूस संपला, ती उद्ध्वस्त झाली. हे टाळता नाही का येणार? 
तज्ज्ञ म्हणाले, धिस इज वॉरफेअर माय बॉय. इथे भावुक होऊन चालत नाही. हे गृहीत धरावं लागतं सैन्यात. ही नोकरीच मुळी जिवावर उदार होऊन करण्याची.
 सर, युद्ध सुरू असताना असं काही झालं असतं तर समजण्यासारखं होतं. पण, एका बंजर, मृत्युलोकासारख्या भयाण प्रदेशावर कब्जा राखण्यासाठी जवानांना तैनात करण्यापेक्षा वेगळे, राजनैतिक स्वरूपाचे मार्ग नाहीत का काही? 
यू फूल, तुमचं मत आहे की आपण शत्रूबरोबर वाटाघाटी करून माघार घ्यावी आणि त्यांच्यावर भरवसा ठेवावा. त्यांनी आपल्यावर भरवसा ठेवावा. असा भरवसा तयार झाला, तर सियाचिनमध्येच कशाला, देशाच्या कोणत्याही सीमेवर एकही जवान तैनात करण्याची गरज पडणार नाही. पण, वास्तव हे अशा आदर्शवादी कल्पनांपेक्षा नेहमीच वेगळं असतं. 
बरोबर आहे सर. पण, हे वास्तव नेहमी जवानांनाच भोगावं लागतं. त्यांचं ते कामच आहे असं म्हणून आपण मोकळे होतो. आपलं काम काय आहे मग? आमचं सोडा, तुम्ही तर सरकारला सल्ला देणारे तज्ज्ञ. तुम्ही का नाही दोन्हीकडची प्राणहानी टाळणारा काही उपाय सुचवत? 
असा एकच उपाय आहे माय बॉय. तो काय? आसिंधुसिंधु हिंदुराष्ट्र! 
अरे बापरे, आपण पत्ता चुकलो आहोत, हे लक्षात येऊन आम्ही तज्ज्ञ महोदयांच्या घरातून पळ काढला...
...बाहेर पडल्यानंतर हणमंतप्पाच्या कुडीतून प्राण निघून गेल्याची भयंकर बातमी आमच्या कानावर आली... 
पाठोपाठ ठिकठिकाणच्या स्पीकरांमधून देशभक्तीचे नळ गळू लागले... 
दोन दिवसांतल्या घडामोडींच्या नोट्स लिहिलेल्या वहीकडे पाहताना आमच्या तोंडून अचानक शब्द निघून गेले, 
सुटला बिचारा.

...तरी हे शनिदेवाचे छळण

आमच्या कानावर सूर आले... झोपेतही आमच्या चेहऱ्यावर हसू फुललं असणार... आमचं जाम आवडतं गाणंय हे... 
निसर्गराजा, ऐक सांगतो.... 
एकतर राम कदमांचं म्युझिक टॉप, जगदीश खेबूडकरांचे शब्द टॉप, त्यात दिसणारा तरणाबांड रवींद्र महाजनी टॉप आणि रंजनासाठी तर आमच्याकडे शब्दच नाहीत... 
झोपेतही आम्ही खूश झालो, त्यामुळे थोडी झोप उडाली असणार आणि मग गाण्याचे खरे शब्द कानावर आले... 
शनिदेवाची कथा सांगतो... 
आमच्या डोस्क्यावर कोणीतरी वाण्याकडच्या पूजा स्पेशल कळकट तेलाचा अभिषेक केल्यासारखा चेहरा झाला आमचा आणि खाडकन् जागेच झालो. 
कानांनी मनाला मात्र पुढच्या गाण्यात गुंतवून टाकलं होतं. त्यामुळे झक मारत पुढचे शब्द ऐकत होतो. 
ते पाहा, तुमचं मनही भिजलेलं, 
कशानं, प्रेमानं प्रेमानं प्रेमानं प्रेमानं 
ही खास जागा आमच्या विशेष पसंतीची, कलिजा खल्लास करून जाणारी. 
या प्रेमगीताचं तुपकट भक्तिगीत करून टाकल्यानंतर या खास जागेचं या गीत-चकलीकाराने नेमकं काय केलं असेल, याची उत्सुकता होती. त्या ओळींच्या जागी 'ते शनिदेवांचं रूपही भिजलेलं' असं रूपांतर, पुढे 'कशानं' हा सवाल आणि त्यावर उत्तर 'तेलानं, तेलानं, तेलानं, तेलानं' असं आलं आणि आम्ही कोसळलोच...
प्रत्यक्षातही आम्ही शनि शिंगणापुरात थांबलेल्या भक्तवाहनातील आयाबायांच्या लोंढ्याबरोबर बाहेर फेकलो गेलो होतो आणि तोल न सावरून खरोखरचे कोसळलो होतो... 
आमच्याकडून आमच्याही नकळत घडलेलं हे साष्टांग दंडवत आसपासच्या भाविकांनी फारच सिरीयसली घेतलं हो. सगळे आमच्याकडे बोट दाखवून सांगू लागले, बघा बघा, भक्ती असावी तर अशी. देवाच्या दारात पोहोचताक्षणी बाबा आडवा झाला. लोकलाजेची तमा नाही बाळगली. त्या नास्तिक बायांना काय कळणार या श्रद्धेचं मोल. आम्ही उठून उभे राहिलो, तेव्हा दोनपाच जण आमच्याही पाया पडून गेले. आमच्या रूपाने कोणता देव, कोणता साधू किंवा कदाचित साक्षात् शनिदेवच अवतरले असतील, तर काय घ्या. एक नमस्कार हाणून ठेवलेला बरा, ही भावना. 
आता तुम्ही विचाराल, आमच्यासारखा नास्तिकशिरोमणी, देवधर्मनालस्तीअग्रणी बोरूबहाद्दर साक्षात शनिदेवाला साष्टांग प्रणिपात करायला कसा काय पोहोचला?
तर मंडळी, आम्ही नेहमीप्रमाणे आमच्या गुप्त कामगिरीवर होतो. आमचे असंख्य येरू पत्रकारू बांधव ओबी व्हॅना लावून, कॅमेऱ्यासमोर माइकचे बोंडूक घेऊन कंठशोष करीत शनि शिंगणापुरात होऊ घातलेल्या रणकंदनाचे लाइव्ह रिपोर्टिंग करत होते. छापील माध्यमांचे पत्रवीर विविध संघटनांच्या, देवस्थानच्या प्रतिनिधींना पकडून पकडून त्यांच्याकडून खबर काढत होते. काही मंडळी सावलीचे कोपरे पकडून आपल्याला भेटलेल्या काल्पनिक भक्त-भक्तिणींच्या, आंदोलनकर्त्या महिलांच्या प्रतिक्रिया मनानेच लिहीत होते. आम्ही मात्र इथे संपादकांनी खास सोपवलेल्या कामगिरीवर होतो. या सगळ्या गदारोळामागचे राज काय आहे, शनिदेवाच्या चौथऱ्यावर महिलांना प्रवेश दिल्या-न दिल्याने राज्याच्या, देशाच्या राजकारणावर काय परिणाम होणार आहे, शनिमहाराजांची कोणावर कृपा होणार आहे आणि कोणावर ते कोपणार आहेत, कोणाची साडेसाती सुरू होणार आहे, याचा अंदाज घेण्यासाठी आम्ही येथे गुप्त वेषात पोहोचलो होतो. 
कपडे झटकून आम्ही कामाला लागलो. अशा मोहिमांमध्ये गरमागरम मिसळ, वडापाव, उसळपाव, शँपलपाव देणाऱ्या हाटेलांमधले पोऱ्ये, मालक आणि गिऱ्हाइकं यांच्या माहितीचा फार उपयोग होतो, असा आमचा अनुभव असल्याने आम्ही तडक अशा एका उपाहारगृहाचा रस्ता धरला. आता सकाळच्या वेळी आम्हाला कडाडून भूक लागला होता आणि चुर्रर्रर्र आवाज करत तापल्या तेलात पडलेल्या कांदाभज्यांच्या घाण्याने आमच्या घ्राणेंद्रियात अदृश्य लगाम ओवून आम्हाला तिकडे खेचले होते, हेही खरेच. पण, आमच्या दृष्टीने काम अधिक महत्त्वाचे.
म्हणूनच तीन प्लेट मिसळी, दोन प्लेट भज्या, दोन पाव चापल्यानंतर वडा-शँपलच्या जळजळीत रसायनात पावाची स्लैस बुडवत आम्ही सवाल केला, थ्या शोणैवाशं क्वा प्रोकर्न आ. 
आमची गरगरीत चेहरेपट्टी, भज्यासारखं नाक, रात्रभराच्या प्रवासाने झालेला अवतार आणि ही भाषा ऐकल्यानंतर मालक म्हणाला, चायनीजची गाडी दोन चौक फुडं लागते. तिकडं हायेत तुमचे चिंकी लोक. त्यांना इचारा. 
घोटाळा लक्षात घेऊन आम्ही घास नीट गिळला, वर पाणी प्यायलो आणि डोळ्यांना लागलेल्या धारा पुसत विचारलं, अहो, मी मराठीच आहे. ते शनिदेवाच्या चौथऱ्याचं काय प्रकरण चाललंय, ते विचारत होतो. 
त्यावर गल्ल्यावरच्या मालकाने सावध होऊन विचारलं, तुम्ही काय प्रेसवाले का काय? 
आम्ही म्हणालो, छया ब्वॉ, आम्ही शनिदेवाचे भक्त आहोत. 
आसं आसं, मालक बोलला खरा, पण, त्याचा विश्वास बसला नव्हता. तो म्हणाला, अहो, हितं चार दिवस उपास करून आल्यासारखे बका बका येवड्या मिसळी चापणारे फकस्त पेपरवालेच असतात, म्हून इचारलं. आणखी एक शँपलपाव मागवण्याचा विचार मनातच रद्द करून आम्ही त्याला पुन्हा चौथऱ्यावर आणलं. तेव्हा तो म्हणाला, ह्यो चावनटपना का चाल्लाय काय समजत नाय. अवो, इक्ती वर्षं शनिदेवाच्या चौथऱ्यावर बायामान्सांना येन्ट्री न्हवती, तर कुनाचं काय अल्डं नव्हतं. आताच येकदम उठाव सुरू झालाय, तर त्यामागं शंबर टक्के डाव असनार. 
कुणाचा? 
त्या इशिसवाल्यांचा. 
अहो काय बोलताय काय, डायरेक्ट इसिस? त्यांना काय करायचंय आपल्या धर्माचं. त्यांचं त्यांना झालंय थोडं. 
आसं कसं? आपला धर्म खराब हय, असं शिद्द केल्याशिवाय त्यांच्या धर्माची पापुलारिटी कशी वाढंन? हाये का नाय पॉइंट. 
पण, मला सांगा, आपल्या धर्माची पापुलॅरिटी कायम ठेवायची असेल, तर बायांना द्यावी की एन्ट्री. इशिसवाल्यांचा डावच उलटून जाईल. 
आमची चर्चा पलीकडच्या टेबलावरनं ऐकणाऱ्या आणखी एका गिऱ्हाईकाने व्हॉट्सअॅपमधून डोकं बाहेर काढलं आणि ते म्हणाले, इसिस वगैरे काही नाही हो, हे सगळं लबाड फुरोगाम्यांचं कारस्थान आहे. मला सांगा मुळात त्यांना काय करायच्यात या धर्माच्या भानगडी? तुमचा विश्वास नाहीच्चै ना देवाधर्मावर. मग तुम्हाला कशाला हवाय चौथऱ्यावर प्रवेश? 
अहो, पण काका, नास्तिक पुरुष आणि बाया कशाला पडतील या लाखो मैल दूरवरच्या जळत्या वायुगोळ्याच्या भानगडीत? इथे नास्तिक पुरुषांनाही चौथऱ्यावर प्रवेश आहे आणि आस्तिक बायकांना नाही, असा प्रॉब्लेम आहे. काकांनी उत्तर न सुचल्याने आउचओई असे काहीतरी उद्गार काढले आणि आता काहीतरी बोलतील, आता काहीतरी बोलतील, असं वाटत असताना एकदम व्हॉट्सअॅपात डोकं खुपसलं. 
तेवढ्यात पलीकडच्या टेबलावरच्या दोन ताया सरसावल्या. आम्ही मुळीच माजू देणार नाही असला अनाचार देवाच्या दारात. देवावर श्रद्धा ठेवायची, तर देवाचे नियम पाळायलाच लागतात. शनिमहाराज हे पॉवरफुल देव आहेत याच्यावर श्रद्धा आहे ना त्यांची. मग त्या शनिमहाराजांनी घालून दिलेला नियम का नाही पाळायचा? 
अहो, पण शनिदेवाचा असा काही नियम नाहीये. सगळ्या शनिमंदिरांमध्ये नाहीये अशी प्रवेशबंदी. आम्हीही फेसबुकज्ञान पाजळलं. 
अहो, पण, स्थानमाहात्म्य नावाची काही गोष्ट असते की नाही? गणपती सगळ्या मंदिरांमध्ये सारखाच असतो की नाही? पण, एकीकडचा राजा नवसाला पावतो, दुसरीकडचा प्रसिद्धीविनायक सेलिब्रिटींना फळ देतो, असा कृपेमध्ये फरक असतोच की नाही? अहो, आमच्या धर्मात ढवळाढवळ करायला निघालेल्या त्या बायांनी आणि त्यांची पाठराखण करणाऱ्या बाप्यांनी आधी मशिदीत जाऊन दाखवावं, मग मंदिरप्रवेशाला यावं, तिथे कशी दीड हात फाटते, ते पाहा. एक उग्र रूपाचे टिळेधारी हातातल्या काठीच्या अर्थपूर्ण हालचाली करत म्हणाले. 
हिंदू महिला मशिदीत कशाला जातील? त्यांना आपल्या देवाच्या चौथऱ्यावर प्रवेश नाही, तर मशिदीत कोण घेईल? त्यांना काय मुसलमान धर्म स्वीकारायला सांगताय का काय? त्यांचा धर्मावर विश्वास आहे, देवावर विश्वास आहे, शनिदेवाच्या देवत्वावर पण विश्वास आहे. पण, शनिदेवाच्या दरबारातला हा भेदभाव काही देवाने केलेला नाही, त्याच्या नावाने पोळी भाजून घेणाऱ्या लबाड माणसांनी केला आहे, अशी त्यांची भावना आहे. तो भेदभाव दूर करा, ही त्यांची मागणी आहे. 
अगं बाबौ, अवो काय बोलताय काय पावणे. भक्त म्हणायचे तुम्ही का शेकुलर फुरोगामी? द्येवाच्या दारात बायांना प्रवेश न्हाई कारन द्येवाची किरनं लय पावरफुल असतात, ती बायामान्सांना सहन व्हायची न्हाईत. भुसनळ्यासारख्या पार पेटून जातील राव बाया जागच्या जागी चौथऱ्यावर. लय पावरफुल हायेत शनिम्हाराज. त्यांच्या ज्ञानाचे किरण हे व्हॉट्सअॅपवरच्या भंगड फॉरवर्ड पोष्टींमधून उमटले होते आणि त्यांचीच दिव्य प्रभा त्यांच्या मुखावर फाकली होती, हे स्पष्टच होतं. 
आसंय होय. मग तर या द्वाड बायांची खोड मोडण्याची पण ही नामीच संधी आहे की. ज्यांना एवढी हौस आलेली आहे आपलं भस्म करून घेण्याची. त्यांना सरळ चढू द्यावं चौथऱ्यावर. लाइव्ह कॅमेऱ्यासमोर भस्म झालं की आपल्या देवाची, आपल्या धर्माची, आपल्या परंपरांची, आपल्या किरणांची पावर सगळ्या जगाला एकदमच कळून जाईल. बरोबर का नाय? 
यावर मंडळी जरा बुचकळ्यात पडली. 
पण, समजा, या बायांनी दर्शन घेतलं आणि त्यांच्यावर कसलाही वाईट परिणाम झाला नाही, तर? 
असं कसं होईल, देवाची ताकद दिसणारच, आज नाही तर उद्या फळं भोगायला लागणार, त्यांना कुठली भोगायला लागतायत, आपल्याला स्थानिक ग्रामस्थांना भोगायला लागतील, अशा आरोळ्या उठायला लागल्या. 
आम्ही पाताळविजयम सिनेमातल्या रावणासारखे खदखदा हसू लागल्यामुळे सगळा गलका शांत झाला. 
मालकाने रागीट मुद्रेने विचारलं, आमी काय येडे हाओत काय पावणे, हासताय कशापायी? 
अहो, वेडे नाही तर काय? इतकी वर्षं इथे कुलूपच नसतं, सगळं सेफ राहतं, या श्रद्धेने सामान ठेवणाऱ्यांच्या वस्तू तेवढीच वर्षं व्यवस्थित चोरीला जातायत, त्या चोरणाऱ्यांवर आजवर कुठे कसला कोप झालाय, सांगा सांगा...
...शनिमहाराजांचं माहिती नाही, पण, भक्तांचा कोप काय असतो, हे आम्हाला चांगलंच कळून चुकलंय. असो. 
आता शरीराचे यच्च्यावत सगळे अवयव रगडण्याशिवाय गत्यंतर नाही...
कशानं?
तेलानं, तेलानं, तेलानं...

एक शून्य बाजीराव!

आम्ही संतापाने थरथरतच थिएटरात शिरलो...
दारावरच्या गुरखाछाप दिसणाऱ्या इसमाने आमच्या गबाळ्या वेषाकडे पाहून हा तंबू थिएटरवाला १५० रुपये तिकिटाच्या थेटरात कसा घुसतोय म्हणून पुणेकरांना लाजवेल इतक्या तुच्छतेने तिकिटाची पृच्छा केली आणि आम्ही (हपीसाच्या खर्चाने काढलेले) २०० रुपड्यांचे सोफाखुर्चीचे तिकीट दाखवले, तेव्हा ते खरे आहे की डुप्लिकेट हे सगळ्या दरवानांनी आणि नंतर म्यानेजरानेही दस्तुरखुद्द येऊन चेक केले, ही गोष्ट आमच्या काळजाला लागली, यात काही शंका नाही. पण, ही गोष्ट संतापाने थरथर व्हावी एवढी दिलावर घेण्याइतके आम्ही क्षुद्र मनोवृत्तीचे नाही. आमच्या कामामुळे आम्हाला ठिकठिकाणी वेषांतरे करावी लागतात, त्या आमच्या कौशल्याला मिळालेली ही पावतीच मानतो आम्ही. सिनेमातले तमाम खलनायक नाही का रस्त्यात एखाद्या माताभगिनीने पापी, चांडाळ, नीच, बलात्कारी असा उद्धार करत श्रीमुखात भडकावून दिली, तरी ती पावतीच मानून घेतात... त्यातलाच हा प्रकार. 
पाहा, पुन्हा सिनेमातलंच उदाहरण सुचलं आणि आमचा संताप पुन्हा अनावर झाला... मग त्या दिवशी तो किती झाला असेल याची तुम्हाला कल्पना नाही...
आमच्या संतापाला तो नतद्रष्ट सिनेमाच कारणीभूत होता, हे आता सांगायला हरकत नाही... आम्ही हपीसातून खास खर्च मंजूर करवून घेऊन (तिकीट प्लस ट्याक्सी मिळून २७२ रु. मात्र) या खास मोहिमेवर आलो होतो... सिनेमागृहाच्या दारात पोहोचताच आमची जी निराशा झाली ती आत प्रविष्ट होईपर्यंत घनघोर निराशेत रूपांतरित झाली...
सिनेमागृहाच्या दारात कोणत्या दृश्याची कल्पना केली होती आम्ही! 
थिएटराबाहेर कट्टर देशभक्त, इतिहासप्रेमी मरहट्ट्यांची गर्दी असेल... जोरजोराने घोषणा सुरू असतील... आत जाणाऱ्या प्रत्येकाला प्रेमाने (आठदहाजण मिळून एकाला प्रेमाने विचारतात तेव्हा त्याचा प्रेमातिरेकाने जो थरथराट होतो, तो पाहण्यायोग्य असतो) विचारतायत, तुम्ही कोणता सिनेमा पाहायला जाताय? त्यात आपल्या वीरपुरुषाची काय विटंबना केली आहे, आपल्या पूर्वजांचे काय चारित्र्यहनन केलं आहे, याची तुम्हाला जराही कल्पना नाही काय? असा घाणेरडा सिनेमा पाहून आपण कोणत्या अघोरी अभिव्यक्तीस्वातंत्र्याला उत्तेजन देत आहोत, याचा विचारही तुमच्या मनाला शिवला नाही काय? कुठे फेडाल हे पाप? साडेआठ फूट उंचीच्या, ७५ किलोची तलवार लिलया पेलणाऱ्या आणि ४१ लढाया जिंकलेल्या राऊंच्या ओजस्वी इतिहासावरचे हे छटेल शिंतोडे तुम्ही कसे काय सहन करत आहात? 
कुठाय तुमचा पुरुषार्थ? 
कुठाय तुमचा धर्माभिमान? 
कुठाय तुमचं ते हे? कुठाय तुमचं ते ते? 
बाजीरावभक्तांच्या या प्रश्नसरबत्तीपुढे हतबल होऊन प्रेक्षक स्वहस्ते तिकीट फाडत असेल आणि भोवतालच्या गर्दीत सहभागी होऊन राऊंच्या इतिहासाचे डोस येणाऱ्या नव्या गिऱ्हाइकाला पाजत असेल (एवढे पैसे मोजल्यानंतर तीन तास काहीतरी टाइमपास नको का), असं आम्हाला वाटलं होतं... पण, इथे अजबच दृश्य होतं...
थिएटरबाहेर तुफान गर्दी होतीच, पण ती हा सिनेमा चवीचवीने पाहणाऱ्यांची... 
जोरजोराने हाकारे सुरू होते... पण, ते गर्दीत आपल्या मित्रपरिवाराचं लक्ष वेधून घेण्यासाठी (त्यातून काही अपरिचितांचं लक्षही वेधलं जात होतं... अंगठ्यावर समोरच्याच्या बुटाचा जाड सोल पडला आणि अंगठा चिरडला की त्याला भलतीकडे लक्ष दिल्याचा पश्चात्ताप व्हायचा ते सोडा... अजून बँडेजातच आहे आमचा अंगठा...). लोक एकमेकांशी बोलत होते, ते सिनेमाबद्दलचे कौतुकोद्गार होते. ते ऐकून आमच्या कानात शिसं ओतलं जात असल्यासारखी भावना होत होती. 
आम्ही काही मंडळींशी संवाद साधून हा अनाचार थांबवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा दोनतीनजणांनी काढता पाय घेतला, काहींनी छुट्टा नही है, असं सांगितलं आणि एकाने (पैसा नहीं मिलेगा, असं सांगत) शेजारच्या स्टॉलवरून प्रेमाने वडापाव आणून दिला. असेल हा वडापाववाल्याच्या प्रमोशनचा भाग म्हणून आम्हीही तो तोंड पोळत असताना बकाणे भरभरून खाल्ला... नंतर त्याच्या त्या कृतीचा अर्थ उलगडल्यानंतर आम्ही शरमेने काळवंडणार तेवढ्यात लक्षात आले की ही तर आमच्या वेषांतर-कौशल्यालाच मिळालेली पावती. आम्ही संतापाने खदखदत आत शिरलो आणि विचार केला की आपल्या या वेषांतरात आपण दरवानालाही या सिनेमाच्या घातक परिणामांची माहिती सांगायला जाऊ, तर तो कदाचित तिकीट असूनही धक्के देत बाहेर काढेल. त्यापेक्षा थिएटरच्या अंधारात प्रबोधन केलेले बरे.
आम्ही आत शिरलो तेव्हा जाहिराती सुरू झाल्या होत्या. दिवे मालवले गेले होते. अंदाजाने ठेचकाळत, धडपडत आम्ही सीटवर जाऊन पोहोचलो आणि दोन्ही बाजूंनी दोन सुगंध आमच्या नाकात शिरले. आम्ही जातिवंत खबरी. आमचं नाकही तीक्ष्ण. क्षणार्धात आम्हाला कळलं की डावीकडून येणारा सुगंध हा मस्क प्रकारातला म्हणजे रांगडा मस्क्युलाइन आहे आणि उजवीकडून येणारा सुगंध हा फ्लोरल म्हणजे फुलांच्या सुगंधाजवळ जाणारा नाजुक गंध आहे. याचा अर्थ डावीकडे कोणीतरी पुरुष बसलाय आणि उजवीकडे महिला. आमचा कल लगेचच उजवीकडे झाला. तशी आमची विचारसरणीही तीच. त्यामुळे झुकाव तिकडेच. पण, झुकता झुकता एकदम खरखरीत दाढीच लागली गालाला, तेव्हा एकदम झटका बसल्यागत आम्ही सरळ झालो. मग सवय नसताना, आशा अमर असते म्हणून डावीकडे झुकू लागलो... तिथे गालाला गालाचा झुळझुळीत स्पर्श होतो ना होतो तोच एक जबरदस्त पंच गालावर बसला आणि तीन दातांनी स्थान सोडलं हे जीभ घोळवल्यावर लक्षात आलं. सीधे बैठो हा दोन्हीकडून आलेला आदेश आता शिरसावंद्य मानण्यावाचून गत्यंतर नव्हतं. 
ठणका थोडा कमी झाल्यानंतर आम्ही कसेबसे उद्गारलो, का असला घाणेरडा सिनेमा बघताय तुम्ही? 
घाणेरडा? ... डावीकडच्या मेरी कोमचा प्रश्न. 
तुमको कैसे मालूम? तुमने पयले देखा है क्या? ... उजवीकडच्या गुंड्याची पृच्छा. 
देखनेको कायकू पडता है... हम मराठी है... हमकू सब मालूम है ये गुज्जूभायने कैसा वाट लगायेला है हमारे वीर बाजीराव का? 
तुमको कैसे मालूम? तुम बाजीराव के साथ स्कूल जाते थे क्या? ... पुन्हा उजवीकडून प्रश्न. 
आम्हीही मर्द मराठ्याचे बच्चे. महाराज म्हणजे आमचा पंचप्राण. महाराष्ट्राचा त्यांच्यानंतरचाच इतिहास आम्हाला तोंडपाठ. यत्ता चौथी ते दहावीपर्यंत शिकलेला. आधीचं काही माहिती नसलं म्हणून काय झालं? आम्हीही बाणेदारपणे, त्वेषाने उत्तरलो, अरे म्हणजे काय, हमने भी इतिहास पढ्या है? 
कुठे वाचलात तुम्ही काका? ... डावीकडची मस्कसुगंधित कन्या... 
(काका? का का?) म्हणजे काय, शाळेत होता आम्हाला? झालंच तर ते आपलं ते हे, ते काय ते कोण ते इनामदार का काय होते, त्यांचं पुस्तकही वाचलंय आम्ही ... दिलं ठोकून आम्ही अंदाजपंचे. 
ना. सं. इनामदारांची राऊ वाचलीयेत का तुम्ही? त्यावरच आधारलाय हा सिनेमा ... डावी बाजू कुजबुजली. 
अहो, पण त्यात काय बाजीराव नाचताना दाखवलाय का? काशीबाई आणि मस्तानी एकत्र पिंगा खेळताना दाखवल्यात का? ... आमचा सात्विक संताप अनावर झाला की तोंडातले दात पडल्याच्या दु:खाचाही विसर पडतो आम्हाला. 
लेकिन वो नाचे नहीं, ऐसाभी तो लिखा नहीये ना इनामदार साबने? एक इतना बडा योद्धा इतनी लडाइया करने के बाद अपने जाँबाज सिपाहियों के साथ थोडा मस्ती करता है, तो आपको क्या परेशानी है?... उजवा शेजारी फार प्रश्न विचारतो बोवा. 
राव लढाईला गेल्यानंतर विरंगुळा म्हणून काशीबाई आणि मस्तानी आल्या एकत्र खेळायला तर तुमचं काय बिघडलं हो? ... डावा प्रश्न. 
अहो, पण इतिहासाला धरून नाहीये ते? ... आम्ही कळवळलो. 
ज्या राऊमधून तुम्ही इतिहास शिकलात, तीसुद्धा एक कादंबरी आहे, काल्पनिक, इतिहासाचा आधार घेऊन लिहिलेली, पण खराखुरा इतिहास नसलेली, आता मागच्या रांगेतून कोणीतरी कानाशी येऊन खसफसला, दाढी टोचली हो, उद्या कोणीतरी हा सिनेमा पाहील आणि त्यातून इतिहास शिकेल, तेव्हा कदाचित खऱ्या इतिहासाचं पुस्तक जाळतील लोक संतापून... सिनेमाबरहुकूम नाहीये म्हणून. 
या तिहेरी माऱ्याने आम्ही जेरीला आलो असताना अचानक सगळीकडून आवाज येऊ लागले, अरे गप्पा मारायच्यात तर बाहेर निघून जा, आम्हाला शांतपणे सिनेमा बघू द्या. 
काय करणार? आम्हीही तो अनैतिहासिक सिनेमा चवीने पाहात बसलो आणि पाहता पाहता गुंगलो. नाचरा बाजीराव आणि पिंगा घालणाऱ्या काशी-मस्तानी यांना पाहून उठून ओरडावेसे वाटेना, लोकांचा रसभंग करावासा वाटेना... इतकी सहिष्णुता दाटून आली की तब्येत बिघडली हे आम्ही समजून जातो... दातदुखीचा परिणाम असावा... सिनेमा संपल्यानंतर दिवे पेटले...
आमच्या डोस्क्यात दिवे पेटवणारे महानुभाव कोण, म्हणून डावीउजवीकडे पाहिले आणि मागेही नजर टाकली... आणि तीन ताड उडालोच...
डावीकडे साक्षात काशीबाई, उजवीकडे साक्षात बाजीराव आणि मागे होते साक्षात भन्साळी. 
आमचा वासलेला आ शून्यवत दिसत होता, असं नंतर डोअरकीपरने हाताला धरून बाहेर काढताना सांगितलं.

Saturday, February 20, 2016

अ-मन की बात

वन, टू, थ्री... माइक टेस्टिंग... 
आम्ही न राहवून बोललो आणि जीभ चावली. 
समोर कोणतंही रेकॉर्डिंगचं यंत्र आलं आणि कानावर हेडफोन आले की आमच्याकडून नकळत हे शब्द बाहेर पडतात आणि काहीवेळा गोची होते... 
एकदा सार्वजनिक स्वच्छतागृहात गाणी ऐकत देहधर्म करण्याचा तांबेगुर्जींचा सल्ला अमलात आणत असताना हाच घोळ झाला आणि बाहेरचा हास्यस्फोट ऐकल्यानंतर आम्हाला तसंच बाहेर यावं लागलं होतं... म्हणजे काही न करता हो, तसंच नाही. 
आता मात्र आम्ही न राहवून बोललेलं समोर कोणालाही ऐकू जाणार नसल्याने बचावलो. आमच्या कानावर होती ती गुप्त रेकॉर्डिंग ऐकवणारी यंत्रणा... सीबीआय आणि रॉ यांनी मोसादकडून मागवलेली ही यंत्रणा अजून त्यांच्यापर्यंत पोहोचलेली नाही, पण, आम्ही मात्र एफबीआयमधल्या ओळखींचा वापर करून ती खास मोहिमांकरता मागवून घेतली आहे. ही यंत्रणा आज सुरू करण्यासाठी कारणही तसंच घडलं.
संपादकांनी अर्जंट बोलावून घेतलं... म्हणाले, काय हे बहिर्जी? आप से हमे ये उम्मीद नहीं थी. 
संपादक हिंदीत बोलायला लागले की आमच्या लक्षात येतं, हे एक तर अमन की आशा कार्यक्रमाला तरी जाऊन आलेत, नाहीतरी जिंदगी चॅनेलवर पाकिस्तानी मालिका तरी पाहून आलेत. 
नूर पाहून प्रतिप्रश्न केला, नाचीज से कोई गुस्ताखी हुअी क्या? 
ते सुस्कारा सोडत म्हणाले, भारत-पाकिस्तान संबंधांचं काय चाललंय ते तुम्हाला दिसत नाहीये का? 
दिसतंय की. 
मी बोललो नरूला... हे ऐकताच लालपिवळे होत्साते संपादक गर्जले, खामोश, असली सबनिशी मिजास माझ्याकडे चालणार नाही. जीभ हासडून ठेवेन. एकेरीतला उल्लेख खपवून घेतला जाणार नाही. 
साहेब, अहो पण माझ्या बालमित्राला मी अहोजाहो केलं तर तो मला चपलेने सडकेल. 
आता तर संपादकांनी पेपरवेटच हातात घेतला, बालमित्र?... देशाचा सर्वोच्च नेता तुमचा बालमित्र? तुम्ही त्या एफबीआय आणि मोसादच्या नावाने फेका मारता, त्या ऐकून घेतो म्हणून काहीही बरळाल. 
स्वसंरक्षणार्थ एक जाडजूड पुस्तक उचलून चेहऱ्यासमोर धरून आम्ही कळवळून ओरडलो, अहो, पण मी कुठे म्हणालो की देशाचा सर्वोच्च नेता माझा बालमित्र आहे. मी तुम्हाला माँटेसरीपासून माझ्यासोबत असलेल्या नरवणेबद्दल सांगत होतो. 
प्रचंड फुगलेल्या फुग्याला टाचणी लागावी, तसे संपादक चुरमडून खुर्चीत कोसळले. ग्लासभर पाणी आणि कपभर चहा पाजून त्यांना माणसांत आणल्यानंतर आम्ही भीत भीत त्यांना म्हणालो, त्या संभाव्य चर्चांचे वृत्तांत सगळ्याच वर्तमानपत्रांमध्ये येतायत. आपणही एजन्सीच्या बातम्या वापरतोय. दिल्लीतले प्रतिनिधी काम करतायत? 
अहो, पण तुम्ही काय करताय? या सगळ्या कोरड्या बातम्या झाल्या. या बातम्यांच्या मागे काय घडामोडी घडतायत, तेच जर आपल्या वर्तमानपत्रात येणार नसेल, तर या वर्तमानपत्रात साक्षात बहिर्जी असून उपयोग काय? 
स्वत:ला थोरले महाराज कल्पून संपादक आम्हाला चावी मारतायत हे आमच्या लक्षात आलं आणि आम्हीही पावशेर स्फुरण चढवून घेतलं आणि लगोलग घरी आलो. 
आलात वाटतं हाफ डे टाकून? आता पोटमाळ्यावर काम करतोय असं सांगून घोरत पडाल रात्रीपर्यंत, हे पत्नीचं स्वागतपर भाषण कानावेगळं करत आम्ही तडक पोटमाळा गाठला आणि दार लावून घेतलं. घोरण्याच्या आवाजाची टेप चालू केली आणि जुनाट कात्रणांच्या ट्रंकेतून आमचा गुप्त रिसीव्हर बाहेर काढला. त्याचे हेडफोन कानाला लावल्यानंतर काय झालं, ते आम्ही तुम्हाला सांगितलंच. त्यानंतर जीभ चावून आम्ही फ्रिक्वेन्सी ट्यून करायला घेतल्या. काही पाकिस्तानातल्या आणि काही भारतातल्या फ्रिक्वेन्सी होत्या. जुन्या काळातला रेडिओ आठवतो का तुम्हाला व्हाल्व्हचा? त्यात जसं नॉब अगदी अल्लाद फिरवून दोन परदेशी स्टेशनांच्या मधलं रेडिओ सिलोन जसं हळुवारपणे ट्यून करायला लागायचं, तशाच प्रकारे वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सींच्या जंजाळामधून आम्ही वाट काढत होतो... दोन्ही देशातल्या अतिमहत्त्वाच्या ठिकाणांवर डासाच्या पायाएवढ्या आकाराच्या मशकाच्या रूपात भिरभिरणारे आमचे मायक्रोफोन एचडी क्वालिटीचा साऊंड आमच्या कानावर आणून आदळवत होते... ट्यूनिंग करता करता कानावर काय पडलं, ते बा वाचका, खास तुझ्यासाठीच पेश करतो आहोत.
स्थळ पहिले 
हे पाकिस्तानातले स्थळ असावे. संवादाची सुरुवात सलाम वालेकुम, वालेकुम अस्सलामने झाली, त्यावरून आम्ही चाणाक्षपणे हा अंदाज काढला.
आवाज एक : एक बुरी खबर है जनाब.
आवाज दोन : क्या दुश्मन ने हमारे जिहादी सिपाहियों को फिर से मार गिराया है?
आवाज एक : नहीं जनाब, उस से भी बुरी खबर है?
आवाज दोन : क्या खबर है, बोलो तो.
आवाज एक : जनाब, वो हम से अच्छा रिश्ता बनाने की पहल कर रहे है.
आवाज दोन (इथून पुढे मराठी भाषांतर, तुमच्या आणि आमच्या हिंदीची किती परीक्षा घ्यायची?) : काय बोलताय काय? डोकं ठिकाणावर आहे ना त्यांचं? ते काँग्रेसवाले असले येडचाप उद्योग करत बसायचे. आता हे आलेत तर परिस्थिती जरा बदलेल असं वाटलं होतं. पण, हे तर त्यांच्यापेक्षा भोळसट दिसतायत.
आवाज एक : जनाब, अटलजींना विसरलात वाटतं. तेही यांचेच होते.
आवाज दोन : हं... तेही खरंच म्हणा. केवढा उद्योग झाला होता तो प्रेमप्रसंग निस्तरताना. असो. आपले गुड्डे मियाँ आताही लगेच गुलाबी गुलाबी झाले असतील माशुका भेटायला आल्यासारखे. 
आवाज एक : क्यूं नहीं होंगे जनाब? त्यांना जोडीने नोबेल पीस प्राइझ स्वीकारण्याची स्वप्नं पडत असतात.
आवाज दोन (कठोर स्वरात) : नींद गहरी होने से पहले ही सपना टूट जाए यही अच्छा होगा.
आवाज एक : जो हुकूम जनाब.
***
अचानक स्टेशन खरखरायला लागल्यामुळे आम्ही नॉब आणखी थोडा फिरवला. हुईंचकिर्रक्रुत्रिकिश्श्शसससूंसूंसूंच्युईं असा काहीतरी अर्वाच्य आवाज काढत काढत सुई पुढच्या स्टेशनावर पोहोचली.
स्थळ दुसरे 
आवाज एक : बधाई हो सर.
आवाज दोन : किस चीज की भाई?
आवाज एक : आप ने तो दुश्मन के छक्के छुडा दिये. वो ये सोच रहे थे कि आप अब उनकी करारी खबर लेंगे, आप ने प्यार की झप्पी दे दी. उन्होने सोचा था की आप उन की ईंट की ईंट बजा देंगे, आप ने तो ये दोस्ती हम नहीं तोडेंगे की सीडी बजा दी. सिक्सर लगा सर सिक्सर.
यानंतर बराच काळ क्लिकक्लिकाट ऐकायला येतो. हा फोटोग्राफरांच्या कॅमेऱ्यांचा आवाज असावा. कदाचित सेल्फ टायमर लावलेल्या सेल्फी काढणाऱ्या मोबाइलचा.
आवाज दोन : अरे भाई मै तो बचपन से ये चाहता था कि दोनों देश भाईचारे से एक दुसरे के साथ रहे...
आवाज एक : तुम्ही समझौता एक्स्प्रेसमध्येही चहा विकायचात का सर?
आवाज दोन : अरे नहीं भाई, ट्रेन टु पाकिस्तानवाली ट्रेन होती ना स्वातंत्र्यपूर्व काळातली, तिच्यात. 
आवाज एक : आप तो तक्षशीला मे भी चाय बेच चुके है, तो आप के जनम के पहले चलनेवाली ट्रेन कौन सी बडी बात है आप के लिए? लेकिन सर, तुमचे चाहते थोडेसे नाराज आहेत. त्यांना वाटतंय की काँग्रेसींप्रमाणे तुम्हीही सापाला दूध पाजताय. आप को अटलजी बनने का चस्का लगा हुआ है, ऐसा भी कहते हैं अपनेही परिवार के लोग. तुम्ही दीड वर्षाआधी शत्रूशी चुम्माचाटी करणाऱ्या काँग्रेसवर कसे तुटून पडला होतात, ती भाषणंही ट्विटरवर ट्रेंडिंग आहेत...
आवाज दोन (अगदी रिलॅक्स स्वरात) : कहने दो उन्हे जो कहना है... जोवर भक्तगण आहेत, तोवर मला पर्वा नाही, चिंता नाही... मुझे कल अगर निशान-ए-इम्तियाझ भी मिल जाए तोभी भक्त यही कहेंगे की यह नमोका पाकिस्तान को सबक सिखानेकाही तरीका है... हे पाहा, आतापर्यंत मी अर्धं जग फिरून आलोय, पण नॉर्वे अजून बाकी आहे... का?... कारण मी ठरवलंय की नॉर्वेला जाईन, तर नोबेल घेऊनच येईन... एक बार जो मैने कमिटमेंट कर ली, तो मै अपने आप की भी नहीं सुनता.
आवाज एक : लेकिन सर... आपल्याच परिवारातले लोक तुमच्या या अमनपसंदीच्या विरोधात आहेत... नागपुरात काही गडबड झाली तर?
यावर आवाज दोन अशा काही गर्भित स्वरात हसला की आम्ही ताबडतोब मॅन्युअल हुडकून, ट्यूनिंग तंत्र पणाला लावून नागपूर स्टेशन गाठायचा प्रयत्न सुरू केला.पुन्हा हुईंचकिर्रक्रुत्रिकिश्श्शसससूंसूंसूंच्युईं. मग स्टेशन लागलं.
***
स्थळ तिसरे
इथे पिनड्रॉप शांतता.
आवाज एक : प्रणाम गुरुजी.
आवाज दोन : प्रणाम.
पुन्हा जीवघेणी शांतता.
आवाज एक (चुळबुळत) : काही चुकलं का गुरुदेव?
खाकरण्याचे, चुकचुकण्याचे आवाज. 
बऱ्याच वेळानंतर.
आवाज दोन : तुमच्या अंगात खूप शौर्य संचारतंय सध्या. असा धडा शिकवायला हवा, तशी वेदना द्यायला हवी. हिंदी सिनेमे कमी पाहात जा जरा.
आवाज एक : गुरुदेव, गोव्यात राहून मला भलती व्यसनं नाहीत. सिनेमा पाहण्याची तर आमची संस्कृतीच नाही. मी देशवासीयांची भावना व्यक्त करत होतो. माफ करा गुरुदेव, पण मला वाटलं होतं की परिवाराचीही भावना हीच असेल. कोणालाही उठसूट मिठ्या मारणं ही आपली संस्कृती नाही. त्यांना मिठ्या मारणं, ही तर नाहीच नाही.
आवाज दोन : पण म्हणून तुम्ही शांततेची प्रक्रिया डहुळवणारी प्रतिक्रिया देणार? हिंस्त्र शब्द वापरणार? 
बुब्बुळे खोबणीत गरगरल्याचाही आवाज येतो बरं का... आईशप्पथ!
आवाज एक (भावनांवर नियंत्रण ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न करीत) : सोटे आणि लाठ्याकाठ्या घेऊन फिरणारे आपण शस्त्रपूजक. शस्त्रे अजूनही शमीच्या झाडावरच ठेवून द्यायची होती तर देशरक्षणाचा जिम्मा माझ्यावर सोपवला नसता, तर बरं झालं असतं. गोव्यात मी काही उंडा, मिरचीभजी आणि फज्याँवच्या उसळीला महाग झालेलो नाही अजून.
आवाज दोन : आता बरोबर बोललात. देशाचं रक्षण ही तुमची जबाबदारी आहे... भावंडांवर हल्ला ही नाही.
आवाज एक : मी राष्ट्र सेवादलाच्या कचेरीत तर आलो नाही ना चुकून? भावंडं? तुम्हीही जादू की झप्पीवाल्या मुन्नाभाईच्या नादी लागाल, असं वाटलं नव्हतं गुरुदेव.
आवाज दोन : मुन्नाभाई जे करतायत ते आमच्या आदेशानुसारच करतायत... तुम्ही आपलं अंतिम ध्येय विसरला आहात आणि अंतरिम ध्येयात अडकून पडला आहात... हे पाहा आपलं अंतिम ध्येय.
यानंतर कागदाची फडफड ऐकू आली, त्यामुळे कसलातरी कागद उलगडून दाखवला गेला असावा, असा कयास आहे. पाठोपाठ धाडकन काहीतरी पडल्याचा आवाज ऐकू आला. तो आवाज क्र. एकच पडल्याचा आवाज असावा... त्या आवाजातून शेवटचे शब्द घरंगळले... अखंड हिंदुस्तानचा नकाशा... अरे बापरे, नंतर आर्यावर्त आणि मग सगळी वसुंधरा... 
यापुढे फक्त खरखर खरखर खरखर ऐकू येत होती...
...
...ती आमच्याच घोरण्याच्या आवाजाची होती, असं- तांब्याभर पाणी आमच्या डोसक्यावर उपडं केल्यानंतर- सौभाग्यवतींनी सांगितलं!

मॉर्निंग वॉक : चाल तिरकी

...तर आता उघडपणे सांगायला काही हरकत नाही की आम्ही नियमित मॉर्निंग वॉकला जात होतो..
काही वर्षांपूर्वी बुद्धीजीवींच्या वर्तुळात आपण शरीरसाधनेलाही किती महत्त्व देतो हे दाखवण्यासाठी मॉर्निंग वॉकला जाण्याची आणि वॉकच्या वेळेपेक्षा अधिक काळ वॉकचे फायदे, वॉकचे अनुभव यांचं चर्वितचर्वण करण्याची फॅशन आली होती. विचारवंत शरीरानेही सशक्त झाले तर आपली काही खैर नाही, याची कल्पना असलेल्या काही नतद्रष्टांनी दोन ज्येष्ठ विचारवंतांच्या मॉर्निंग वॉकमध्ये कायमचा खंड पाडला... त्यानंतर आपण मॉर्निंग वॉकला जात होतो, पण, आता बंद केलंय, असं सांगण्याची फॅशन बुद्धीजीवींमध्ये आली होती. 
मला काही भीती नाही हो, पण ही घाबरते, 
पुलिस कमिशनर मला म्हणाले, साहेब, कशाला आमचं काम वाढवताय, 
एसपी म्हणाले, बिनधास्त जा, पण आमचे दोन साध्या वेशातले पोलिस कायम तुमच्यामागे असतील, हे लक्षात घ्या. 
आम्हाला काळजी घ्यायलाच हवी तुमची, 
अशी वाक्यं, जणू हे संभाषण आपल्याबद्दल नाही, इतरच कोणाबद्दल आहे, अशा तटस्थपणे फेकली जायची. 
मध्यंतरी आमच्याही वॉकमध्ये खंड पडला होता खरा... पण, त्याचा आमच्या वैचारिक वकुबाशी काहीएक संबंध नाही. आम्हाला आम्ही सोडून कोणीही विचारवंत मानत नाही. आम्ही मोठे ढुढ्ढाचार्य असल्याच्या थाटात, अतिशय गंभीरपणे कशाकशावर लिहितो (म्हणजे इंग्रजीतून इकडे नकलतो), खाकेला जाडीजुडी ताजी इंग्रजी पुस्तकं (परीक्षणार्थ पाठवलेली) मारून सकाळ-संध्याकाळ चहाच्या ऐवजी काढेचिराइताचा काढाच ढोसत असल्यासारखा चेहरा करून आम्ही सगळीकडे फिरतो खरे; पण, ज्यांच्या इन्क्रीमेन्टा आमच्या हातात आहेत, अशी हाताखालची मंडळी सोडली तर आम्हाला कोणी विचारवंतांत गणत नाही. त्यामुळे, आम्ही मॉर्निंग वॉकला बिनधास्त जातो... त्यात खंड पडला तो तो नववर्षस्वागतानिमित्ताने रात्रीचा दिवस केल्यामुळे...
यावर काही सन्मित्रांचे अंगठे ओठांकडे गेले असतील आणि नजर नशिली झाली असेल... पण, मित्रहो, नववर्षस्वागताच्या पुरवण्यांसाठी मान मोडून काम करण्यात रात्रीचा दिवस केल्याचे हे वर्णन आहे... गैरसमज नसावा... रात्री जरा जास्त झाल्यामुळे जरा कमी होणे, या अनुभवासाठी सामान्यजनांप्रमाणे आम्हा पत्रकारांना नववर्षस्वागताची वाट पाहावी लागत नाही... (सुयोग्य गोट लाभल्यास) आमचा प्रत्येक दिवस साजरा होतच असतो.
असो, तर थोड्याशा खंडानंतर पुन्हा मॉर्निंग वॉकला गेल्यावर आमच्या नजरेला एक विचित्र दृश्य दिसले... आम्ही हाडाचे पत्रकार, त्यात शोधपत्रकार... त्यामुळे आम्हाला सरळ गोष्टीही वाकड्या दिसतात, चित्रंही विचित्र भासतात... मग, संपादकांना आमच्या बातमीचा जाहीर खुलासा द्यावा लागतो आणि... जाऊद्या... नको त्या आठवणी. यावेळी दिसलेलं दृश्य मात्र खरोखरच विचित्र होतं. त्यात आमच्या नजरेच्या जन्मजात आणि व्यवसायसिद्ध दोषाचा किंचितही वाटा नव्हता.
आता सांगा. भल्या सकाळी हनुमान टेकडीवर एक गृहस्थ पोलिसांच्या गराड्यात टेकडी चढतायत आणि आणखी एक गृहस्थ पोलिसांच्या दुसऱ्या गराड्यातून त्यांच्याशी गप्पा मारतायत, हे दृश्य विचित्र नाही काय? साक्षात कळीकाळ समोर ठाकला तरी लक्षणीय वस्तूं वरील नजरही न वळवणारे स्वेटर-मफलरधारी ज्येष्ठ नागरिकही वस्तूं ना वाऱ्यावर सोडून या दृश्याकडे माना वळवून पाहात होते, म्हणजे पाहा. त्यात गंमत अशी होती की एका गृहस्थाभोवतीचा गराडा हा त्याला इतरांपासून संरक्षण देण्यासाठी होता आणि दुसऱ्या गृहस्थाभोवतीचे पोलिस त्याच्या हातून काही बरेवाईट घडू नये, यासाठी नेमला असावा, अशा त्यांच्या हालचाली होता. बातमीचा वास येताच आम्ही शिताफीने पायांचा वेग वाढवला आणि जणू काही आपल्याला या दोघांमध्ये, त्यांच्याभोवतीच्या पोलिसांमध्ये काही रसच नाही, आपला टेकडी चढण्याचा झपाटाच असा आहे, असा आव आणला. आमच्यात आणि विचारवंतांमध्ये हे एक साम्य आहे. असो. या दोघांच्या थोडे पुढे गेल्यानंतर आम्ही खास लक्ष नसल्यासारखं काकदृष्टीने, डोळ्यांच्या कोपऱ्यातूनच त्यांना पाहून घेतलं. दोन्ही चेहरे बातम्यांमधून परिचयाचे झालेले होते. एक चेहरा होता बद्धकोष्ठ झाल्यासारखा, दुसरा होता आम्लपित्तप्रकोपग्रस्त.
हे दोघेही मॉर्निंग वॉकसाठी नवे आहेत, याची आम्हाला एका झटक्यात कल्पना आली. आमची नजरच आहे तशी घारीसारखी. आम्हा नियमित मॉर्निंग वॉक करणाऱ्यांच्या चेहऱ्यावर जे एक तेज विलसत असतं, त्याचा या दोघांच्याही चेहऱ्यांवर साफ अभाव होता. शिवाय चालही आमच्यासारखी तेज नव्हती, दमसासाची तर बातच सोडा. गंमत म्हणजे दोघेही मॉर्निंग वॉकच्या व्यायामात नवखे असतानाही आम्लपित्तग्रस्त इसम (यापुढे यांचा उल्लेख आपिग्रइ असा होईल) हा बद्धकोष्ठग्रस्त इसमाला (यांचा उल्लेख बकोग्रइ असा होणार, हे बा चतुर वाचका, तुला कळले असेलच.) चक्क मॉर्निंग वॉकचे फायदे सांगत होता. 
आपिग्रइ : तुमचा फारच गैरसमज झालाय हो माझ्याबद्दल. आमच्या संस्थेबद्दल तर खूपच गैरसमज पसरले आहेत. मी तुम्हाला मॉर्निंग वॉकला बोलावत होतो, ते सकाळी सकाळी व्यायाम केल्यावर होणारे फायदे तुम्हाला समजावेत म्हणून.
बकोग्रइ : अहो, मी २९ पुस्तकं लिहिली आहेत, ती मला काही कळत नाही म्हणून का?
आपिग्रइ : मी कुठे तसं काही म्हटलं? पण, एवढी पुस्तकं लिहूनही- की पुस्तकं लिहिल्यामुळेच- तुमचा चेहरा बघा कसा बद्धकोष्ठ झाल्यासारखा दिसतोय. मुळात तुम्हा लोकांना लिहिण्याचा इतका सोस का असतो, हेच कळत नाही. अहो जगात जे काही लिहिण्यासारखं होतं ते आपल्या पूर्वजांनी केव्हाच लिहून ठेवलेलं आहे. आपण फक्त वाचन करायचं आणि त्यानुसार आचरण ठेवायचं. मन शुद्ध ठेवून परमेश्वरचरणी चित्त लीन ठेवून पुरातनधर्माचं पालन केलं तर कशाला उगाच लिहायला लागतंय काही? उगाच झाडांची कत्तल नुसती? आता विचार करा, तुमच्या २९ पुस्तकांच्या कागदासाठी किती झाडं कापली गेली असतील? तरी बरं तुम्ही लोकप्रिय लेखक नाहीत. लोकप्रिय असता तर एक अख्खं जंगल फस्त केलं असतं तुम्ही.
बकोग्रइ : तुम्ही वाचता?
आपिग्रइ : म्हणजे काय? 
बकोग्रइ : तुमच्याकडे पाहून तुम्हाला अक्षरओळख असेल असं वाटत नाही. ती असती तर साहित्यशारदेच्या प्रांगणातल्या सर्वात मोठ्या उत्सवाच्या अध्यक्षाशी असं बोलण्याची प्राज्ञा तुम्ही केली नसती. 
आपिग्रइ : अहाहा, बघा बघा, केवढा परिणाम झाला पाहा १५ मिनिटांच्या चालण्याचा. आधी काय बोलत होतात? खरंतर भकत होतात, असंच म्हणायला हवं होतं. आणि आता पाहा किती सुरेख भाषा खेळवताहात. मी सांगितलं ना तुम्हाला. सकाळच्या वेळी सूर्यदेवांच्या किरणांमधून बलवर्धक आणि बुद्धीवर्धक कणांचा मारा होतो, हे आपल्या पूर्वजांनी वल्कलं नेसण्याची माहिती नसल्याच्या काळातच ओळखलेलं होतं. घेतलीत ना प्रचिती आपल्या पूर्वजांच्या ज्ञानसामर्थ्याची.
बकोग्रइ : हे पाहा, तुम्ही काहीही वकिली युक्तिवाद केलेत तरी तुम्ही मला मॉर्निंग वॉकला येण्याचा सल्ला का दिला, हे सगळ्या जगाला कळलेलं आहे. मला काही अडचण नाही हो. जो जन्माला आला, तो मरणारच आहे. पण, म्हणून तुम्ही असं थेट धमकी देणं शोभतं का? 
आपिग्रइ : अहो, पण, मी तुम्हाला पुन:पुन्हा सांगतो आहे की मॉर्निंग वॉकला बोलावण्याचं एकच कारण आहे... बद्धकोष्ठातून तुमची मुक्तता व्हावी. आसपास काय काय बदललंय, हे तुमच्या अधू डोळ्यांना थोडं नीट दिसावं. शिवाय श्वासोच्छ्वासाची लय साधून वाचानियंत्रण प्रस्थापित व्हावं. हे सगळं तुमच्या बाबतीत होईल, याची खात्री आहे म्हणून मॉर्निंग वॉकचा सल्ला दिला. ज्यांच्या बाबतीत कसलीही सुधारणा शक्य नाही, हे आम्हाला ठाऊक असतं, त्यांना आम्ही मॉर्निंग वॉकचा सल्ला देत नाही. त्यांच्या कर्माची फळं तो परमेश्वरच त्यांना पंचपंचउष:काली देणारच असतो. त्यात आम्ही कशाला लुडबुड करायची.
लुडबुड हा शब्द ऐकून की काय आम्ही एकदम पुढे झालो आणि आपिग्रइ काकांना म्हणालो, एक्स्क्यूज मी सर. पण, माझाही थोडा अभ्यास आहे या विषयातला. तुम्ही मॉर्निंग वॉकची महती सांगताहात, ती बरोबरच आहे. पण, तुम्ही तो करत नाही, हे स्पष्टच आहे.
आपिग्रइ शक्य तेवढे गोरेमोरे होत म्हणाले, हे कशावरून म्हणताय तुम्ही? हा आरोप आहे.
आम्ही म्हणालो, छे छे, तुमचा चेहराच सांगतोय. तुम्ही मॉर्निंग वॉक करत असता, तर तुमचं आम्लपित्त बरं नसतं का झालं एव्हाना? घटकेघटकेला तुम्हाला करपट ढेकरा येतात, दर तासादोन तासांनी तुम्हाला कोणावर ना कोणावर ओकण्याची उबळ येते, त्यातून बुद्धिमांद्याचा त्रास जडला आहे, ही सगळी लक्षणं काही नियमित मॉर्निंग वॉक करणाऱ्या साधकाची नाहीत मिस्टर. दुसऱ्या सांगे ब्रह्मज्ञान, आपण कोरडे पाषाण?...
यानंतर काय झालं ते ठाऊक नाही, मधलं काही आठवत नाही......आता पुन्हा मॉर्निंग वॉकमध्ये खंड पडलेला आहे......पाय प्लॅस्टरमध्ये लटकलेला असताना कसा वॉक घेणार...
...यापुढे लवकर मॉर्निंग वॉक सुरू होण्याची शक्यता नाही...
...पुलिस कमिशनरच म्हणाले परवा, साहेब, कशाला आमचं काम वाढवताय?...
...त्यांच्यावर लोड कमी आहे काय?

काही अप्रकाशित संकल्प

नवं वर्ष म्हटल्यावर भिंतीवर चढणारं (शक्यतो, फुकटात पदरात पाडून घेण्याचं) कॅलेंडर जसं आठवतं, तसेच आठवतात ते संकल्प. 
बहुतेक संकल्प हे पुढील वर्षात (तरी) दोंद कमी करण्याचे असतात आणि त्यासाठी भल्या पहाटे उठून चालायला जाण्याचा निर्धार केला जातो. ३१ तारखेच्या रात्री दारू पिताना, चखणा खाताना, बकाबका चमचमीत पदार्थ ओरपताना आणि रात्री १२ वाजता इष्टमित्रांना शुभेच्छा देताना या संकल्पाची साभिमान उजळणी होते खरी- पण ती रात्रच पहाटेपर्यंत जागली जात असल्यामुळे आणि पहाटे दोन पावलं सुसूत्रपणे पडण्याचीही सुतराम शक्यता उरलेली नसल्याने त्या संकल्पाचे पहिल्याच दिवशी तीनतेरा वाजून जातात; पण म्हणून माणसं संकल्प करण्याचं सोडत नाहीत आणि सगळे लोक असे फुसकट संकल्प करतही नाहीत. 
आमच्या वाचकांना अभ्यासपूर्ण लेखन वाचायला मिळावं म्हणून आम्ही संकल्पांचं संकलन करण्याचा विचार केला होता; पण संकल्पांचं भवितव्य फारसं उज्ज्वल नसतं, हे लक्षात घेऊन संकल्पकर्त्यांनी आमच्याकडे आपले संकल्प सोपवण्यास नम्र नकार दिला... पण आम्हीही कच्च्या गुरूचे चेले नसल्याने शोधपत्रकारितेचं तंत्र वापरून आम्ही काही संकल्प हुडकून आणलेच... फक्त हे संकल्पांचे कच्चे खर्डे असल्याने आणि ते कचरापेटीपासून ऑफिसातल्या श्रेडरपर्यंत वेगवेगळ्या ठिकाणांहून मोठ्या हिकमतीने गोळा करून आणावे लागलेले असल्याने संकल्पकर्त्यांची नावं काही आमच्या हाती लागली नाहीत... आजकाल संकल्पकर्ते कायद्याच्या किंवा सद्सदविवेकाच्या कचाट्यात न अडकण्यासाठी संकल्प करून नामानिराळे राहत असतात, त्याचाही हा परिपाक असू शकेल. असो. या स्तंभाचे वाचक हे लेखकाइतकेच चाणाक्ष असल्यामुळे ते या संकल्पांवरून त्यांच्या कर्त्यांना नक्कीच ओळखतील, अशी खात्री वाटते.
संकल्प पहिला
एका गुबगुबीत डायरीमध्ये या संकल्पांची काही पानं सापडली आहेत. या डायरीवर अ...नी असं कंपनीचं नाव आहे. त्यामुळे हे अडानी असेल की, अंबानी हे कोडं काही उकलत नाही... पण या दोहोंपैकी कोणीही असलं, तरी काही फरक पडत नाही. देश आणि सरकार त्यांच्याच मुठीत असतं, हे लक्षात घेऊन आम्ही थेट संकल्पाकडे वळलो... हा त्या संकल्पाचा वानोळा.
“काम... काम... काम. दिवसरात्र कामच काम. विमानात काम, ऑफिसात काम, परदेशात काम, पुन्हा विमानात काम, पुन्हा ऑफिसात काम. त्यात संसदेच्या कामकाजात सहभागी होण्याची संधीही मिळत नाही. काय करणार पण. आधीच्या ६० वर्षांमधल्या राजवटींनी (यात आमचीही पाच वर्षांची आलीच, तेव्हा मी शीर्षस्थानी नव्हतो ना) देश पूर्ण रसातळाला न्यायचा होता, तो माझ्या मॅजिकने सुपरपॉवर बनून दाखवणं हे काही सोपं काम आहे का? त्यासाठी दिवसाला ३६ तास आणि सेल्फीच्या कॅमेऱ्याला शंभर जीबी मेमरी असली तरी पुरायची नाही. अरे बापरे, हे एकदम बिहार निवडणुकीतल्या आणि निवडणुकीतच करत असल्यासारख्या परदेशांतल्या एनआरआय मंडळींच्या मेळाव्यांमधल्या भाषणांसारखं झालं... बिहारची आठवण फारशी सुखकारक नाही आणि एनआरआय मेळाव्यांमधल्या लोकप्रियतेच्या आधारावर मला अनिवासी पंतप्रधान बनण्यात काडीचाही रस नाही... सध्या मी खऱ्या अर्थाने तेच पद भूषवत असलो तरी. असो, सेल्फीवरून आठवलं... (साधारण दर तीन मिनिटांनी मला फोटोची आठवण होतेच आणि काही कार्यक्रम नसेल खास, तर मी सेल्फी तरी घेतोच- आताही नवीन वर्षाचे संकल्प लिहीत असताना चा सेल्फी घेतलाच)... यंदा एक चांगली सेल्फी स्टिक घ्यायला हवी. सतत हात लांब करून दुखतात आणि सगळी वेशभूषा फोटोत येतही नाही. माझं ६७२ जाकिटं, १७५३ कुर्ते, १२७२ सूट आणि इतर १४ हजार कपड्यांचं कलेक्शन जर देशातील जनतेला दिसणार नसेल, तर देशाला अच्छे दिन येणार तरी कसे?...”
संकल्प दुसरा
हा संकल्प दुरेघी वहीत लिहिलेला असल्यामुळे हस्ताक्षर आणि भाषेच्या वळणावरून एखाद्या शाळकरी मुलाचा वाटतो; पण पंजाचं चित्र असलेली ही वही नेमकी कोणाची असेल, याचा उलगडा काही मजकुरावरून होत नाही... या मुलावर शाळकरी वयातच फार मोठ्या जबाबदाऱ्या येऊन पडल्या असाव्यात, असा एक तर्क मात्र मजकुरावरून बांधता येतो... कोण असेल या मजकुराचा लेखक, हे शोधण्याची जबाबदारी आम्ही चाणाक्ष वाचकावर सोपवतो आहोत.
“छ्या, न्यू इयरला सुटी घ्यायला मिळणार नसेल, कुठे जायला मिळणार नसेल, तर ते न्यू इयर हॅपी कसं होणार? पण हे आमच्या ममाला कोण सांगणार? (आणि ते कोणत्या भाषेत सांगणार? ते हिंदीत सांगावं तर तिची पंचाईत आणि इटालियनमध्ये सांगावं तर माझं इटालियन जेमतेम.) यंदा मस्तपैकी एखाद्या बेटावर जाऊन दोन-तीन महिने अज्ञातवासात आराम करण्याचा संकल्प सोडला होता मी; पण आमच्या ममानेच तो हाणून पाडावा! ती म्हणते, यावर्षी घेतलीस सुटी तेवढीच पुरेशी आहे. तुझ्या या अशा कामचुकारपणामुळे आपल्या कंपनीतल्या लोकांचा तुझ्यावर विश्वास बसत नाही, तर देशातल्या जनतेचा कसा बसेल? मी संतापून हातपाय आपटले, तर म्हणते, आता तरी सुधार. लोकांनी आपल्याला पाच वर्षांची सुटी दिली आहे ती मजा लुटायला नाही, काम करायला. आता मला सांगा, अशी उफराटी सुटी जगात कुठे असते का हो? सुटी म्हटलं की, एन्जॉयमेंट आलीच ना? होमवर्क करायला लागतो थोडाफार प्रत्येकाला; पण आमच्याकडे काही वेगळाच प्रकार आहे. ममा म्हणते की, या सुटीत फक्त आणि फक्त होमवर्क करायचा. नो एन्जॉयमेंट. नाहीतर म्हणे तुला लोक सीरियसली घेणार नाहीत. घ्या आता. हा काही प्रॉब्लेम आहे का? हल्ली लोक नमो काकांनाही सीरियसली घेत नाहीत, तर मला कसे घेतील? आणि एक सांगा की, एखाद्या मुलाला घरातल्या फडताळात बसून येणाऱ्या-जाणाऱ्यांना भ्भॉ करण्याचा छंद असेल, तर त्यात गैर काय आहे? ममा म्हणते, लहानपणी ठीक होतं, आता तू चाळिशी पार केलीस. सो व्हॉट ममा, सो व्हॉट! आपले दिग्गी अंकल, मणी अंकल, लालू अंकल आणि नमो अंकल तर किती मोठ्ठे आहेत; पण कधीकधी त्यांच्या बोलण्यावरून तरी येतो का त्यांच्या वयाचा अंदाज? काहीतरीच काय? तुम्हाला म्हणून गंमत सांगतो, आता ही डायरीही मी फडताळात बसूनच लिहितो आहे. मागच्या वर्षी संकल्प करून मी ममा सर्जरीसाठी परदेशी गेलेली असताना हे फडताळच आतून मोठ्ठं बनवून घेतलंय. एसी, टीव्ही, बाथरूम वगैरे सगळं काही आतच. आमच्या ममाला काही कल्पनाही नसते की, मी मधूनमधून अज्ञातवासात जातो, तेव्हा इथेच, या फडताळातच असतो. कसं फसवलं, टुक टुक टुक...”
संकल्प तिसरा
या संकल्पाची गंमत म्हणजे ज्या फडताळात संकल्प क्र. २ सापडला, त्या फडताळाच्या बाहेरच हे कागदाचे चुरगाळून फेकून दिलेले आढळले. त्यांच्या चुरगाळण्यावरूनच फेकणारी व्यक्ती किती उदि्वग्न झाली असेल, त्याची कल्पना येते. हा संकल्प सोडणारी व्यक्ती तो हातात घेऊन फडताळाला डोळे लावून उभी असणार आणि आतील व्यक्तीने लिहिलेला संकल्प तिने वाचला असणार. त्यानंतर बोळा करून आपला संकल्प फेकून दिला असणार, असा तर्क आम्ही लढवला आहे. तो सहसा चुकणार नाही, हे संकल्प वाचून लक्षात येईल.
“खरं तर माझं वय हे आता हरी हरी - सॉरी, येशू येशू करत स्वस्थ बसण्याचं. तब्येतही म्हणावी तशी साथ देत नाही. त्यामुळे यंदा हाच संकल्प सोडून शांतपणे माहेरी जाऊन मॅकरोनी, पास्ता, सलाड्स, पिझ्झा यांचा आस्वाद घेत वृद्धापकाळ सुखाने कंठेन, असा विचार केला होता; पण तेवढं सुख माझ्या नशिबात कुठून असायला? त्यासाठी आमच्या प्रिन्सने कंपनीचा ताबा घ्यायला हवा होता; पण तो अजून मनाने केजीच्या बाहेर पडायला तयारच नाही. वेळेत लग्न केलं असतं, तर आता त्याची मुलं कॉलेजात गेली असती; पण हा काही बालिशपणा सोडायला तयार नाही. एवढी मोठी कंपनी आहे, बनाबनाया करियर आहे, देशात चलनी नाण्यासारखं स्वीकारलं जाणारं आडनाव आहे, वडिलांकडून आलेलं राजबिंडं रूप आहे; पण बुद्धीच्या बाबतीत काय घोटाळा झालाय काही कळत नाही. माझा मुलगा आहे म्हणून सांगत नाही; पण तसा सालस स्वभावाचा आहे, निष्कपट आहे बापासारखाच; पण आमच्या व्यवसायात हे काही गुण नाही समजले जात, दुर्गुणच मानले जातात. शिवाय, कंपनी सांभाळण्यासाठी, देश चालवण्यासाठी नुसता चांगुलपणा असून चालत नाही, त्याला कर्तबगारीची जोड असायला लागते. फडताळात दडून भ्भॉ करण्याची आवड, हा काही चारचौघांत सांगण्यासारखा गुण तरी आहे का? असो. तेव्हाच प्रिन्सेसच्या ताब्यात कंपनी सोपवली असती, तर बरं झालं असतं; पण तिला स्वत:लाच त्या व्यायामपटूच्या ताब्यात सोपवण्याची घाई झाली होती. जावई माझा भला असं म्हणतात म्हणे, आमच्याकडे जावई माझा भला दांडगा असं म्हणण्याची पाळी आली आहे... शिवाय, दांडग्याशी यमक जुळणारे इतरही शब्द सुचतात मला... बारामतीकर मित्रांचं हिंदी ऐकून मराठी सुधारलंय माझं हिंदीपेक्षा... तर यंदाही आतला आवाज ऐकून मुलगा हाताशी येईपर्यंत कंपनीचं काम करण्याचाच संकल्प सोडावा लागणार मला... त्याच्याआधी एखादं नातवंडंच हाताशी येईल, अशी अंधुक आशा आहे मला म्हणा. असो. हे या वयात असले संकल्प लिहावे लागत असतील, तर ते जपून तरी काय करू? बोळा करून फेकलेले बरे फडताळ उघडून भ्भॉ केलं जाण्याच्या आत...”
तर वाचकहो, हे होते आमच्या हाती लागलेले मुख्य संकल्प. आमच्या वाचकांना बातमीमागची बातमी कळत राहावी म्हणून आम्ही आमचं शोधकार्य असंच चालू ठेवू आणि दर आठवड्याला अशीच बित्तम बातमी तुमच्यापुढे पेश करू, असा संकल्प आम्हीही सोडतो आहोत.