Saturday, February 20, 2016

मॉर्निंग वॉक : चाल तिरकी

...तर आता उघडपणे सांगायला काही हरकत नाही की आम्ही नियमित मॉर्निंग वॉकला जात होतो..
काही वर्षांपूर्वी बुद्धीजीवींच्या वर्तुळात आपण शरीरसाधनेलाही किती महत्त्व देतो हे दाखवण्यासाठी मॉर्निंग वॉकला जाण्याची आणि वॉकच्या वेळेपेक्षा अधिक काळ वॉकचे फायदे, वॉकचे अनुभव यांचं चर्वितचर्वण करण्याची फॅशन आली होती. विचारवंत शरीरानेही सशक्त झाले तर आपली काही खैर नाही, याची कल्पना असलेल्या काही नतद्रष्टांनी दोन ज्येष्ठ विचारवंतांच्या मॉर्निंग वॉकमध्ये कायमचा खंड पाडला... त्यानंतर आपण मॉर्निंग वॉकला जात होतो, पण, आता बंद केलंय, असं सांगण्याची फॅशन बुद्धीजीवींमध्ये आली होती. 
मला काही भीती नाही हो, पण ही घाबरते, 
पुलिस कमिशनर मला म्हणाले, साहेब, कशाला आमचं काम वाढवताय, 
एसपी म्हणाले, बिनधास्त जा, पण आमचे दोन साध्या वेशातले पोलिस कायम तुमच्यामागे असतील, हे लक्षात घ्या. 
आम्हाला काळजी घ्यायलाच हवी तुमची, 
अशी वाक्यं, जणू हे संभाषण आपल्याबद्दल नाही, इतरच कोणाबद्दल आहे, अशा तटस्थपणे फेकली जायची. 
मध्यंतरी आमच्याही वॉकमध्ये खंड पडला होता खरा... पण, त्याचा आमच्या वैचारिक वकुबाशी काहीएक संबंध नाही. आम्हाला आम्ही सोडून कोणीही विचारवंत मानत नाही. आम्ही मोठे ढुढ्ढाचार्य असल्याच्या थाटात, अतिशय गंभीरपणे कशाकशावर लिहितो (म्हणजे इंग्रजीतून इकडे नकलतो), खाकेला जाडीजुडी ताजी इंग्रजी पुस्तकं (परीक्षणार्थ पाठवलेली) मारून सकाळ-संध्याकाळ चहाच्या ऐवजी काढेचिराइताचा काढाच ढोसत असल्यासारखा चेहरा करून आम्ही सगळीकडे फिरतो खरे; पण, ज्यांच्या इन्क्रीमेन्टा आमच्या हातात आहेत, अशी हाताखालची मंडळी सोडली तर आम्हाला कोणी विचारवंतांत गणत नाही. त्यामुळे, आम्ही मॉर्निंग वॉकला बिनधास्त जातो... त्यात खंड पडला तो तो नववर्षस्वागतानिमित्ताने रात्रीचा दिवस केल्यामुळे...
यावर काही सन्मित्रांचे अंगठे ओठांकडे गेले असतील आणि नजर नशिली झाली असेल... पण, मित्रहो, नववर्षस्वागताच्या पुरवण्यांसाठी मान मोडून काम करण्यात रात्रीचा दिवस केल्याचे हे वर्णन आहे... गैरसमज नसावा... रात्री जरा जास्त झाल्यामुळे जरा कमी होणे, या अनुभवासाठी सामान्यजनांप्रमाणे आम्हा पत्रकारांना नववर्षस्वागताची वाट पाहावी लागत नाही... (सुयोग्य गोट लाभल्यास) आमचा प्रत्येक दिवस साजरा होतच असतो.
असो, तर थोड्याशा खंडानंतर पुन्हा मॉर्निंग वॉकला गेल्यावर आमच्या नजरेला एक विचित्र दृश्य दिसले... आम्ही हाडाचे पत्रकार, त्यात शोधपत्रकार... त्यामुळे आम्हाला सरळ गोष्टीही वाकड्या दिसतात, चित्रंही विचित्र भासतात... मग, संपादकांना आमच्या बातमीचा जाहीर खुलासा द्यावा लागतो आणि... जाऊद्या... नको त्या आठवणी. यावेळी दिसलेलं दृश्य मात्र खरोखरच विचित्र होतं. त्यात आमच्या नजरेच्या जन्मजात आणि व्यवसायसिद्ध दोषाचा किंचितही वाटा नव्हता.
आता सांगा. भल्या सकाळी हनुमान टेकडीवर एक गृहस्थ पोलिसांच्या गराड्यात टेकडी चढतायत आणि आणखी एक गृहस्थ पोलिसांच्या दुसऱ्या गराड्यातून त्यांच्याशी गप्पा मारतायत, हे दृश्य विचित्र नाही काय? साक्षात कळीकाळ समोर ठाकला तरी लक्षणीय वस्तूं वरील नजरही न वळवणारे स्वेटर-मफलरधारी ज्येष्ठ नागरिकही वस्तूं ना वाऱ्यावर सोडून या दृश्याकडे माना वळवून पाहात होते, म्हणजे पाहा. त्यात गंमत अशी होती की एका गृहस्थाभोवतीचा गराडा हा त्याला इतरांपासून संरक्षण देण्यासाठी होता आणि दुसऱ्या गृहस्थाभोवतीचे पोलिस त्याच्या हातून काही बरेवाईट घडू नये, यासाठी नेमला असावा, अशा त्यांच्या हालचाली होता. बातमीचा वास येताच आम्ही शिताफीने पायांचा वेग वाढवला आणि जणू काही आपल्याला या दोघांमध्ये, त्यांच्याभोवतीच्या पोलिसांमध्ये काही रसच नाही, आपला टेकडी चढण्याचा झपाटाच असा आहे, असा आव आणला. आमच्यात आणि विचारवंतांमध्ये हे एक साम्य आहे. असो. या दोघांच्या थोडे पुढे गेल्यानंतर आम्ही खास लक्ष नसल्यासारखं काकदृष्टीने, डोळ्यांच्या कोपऱ्यातूनच त्यांना पाहून घेतलं. दोन्ही चेहरे बातम्यांमधून परिचयाचे झालेले होते. एक चेहरा होता बद्धकोष्ठ झाल्यासारखा, दुसरा होता आम्लपित्तप्रकोपग्रस्त.
हे दोघेही मॉर्निंग वॉकसाठी नवे आहेत, याची आम्हाला एका झटक्यात कल्पना आली. आमची नजरच आहे तशी घारीसारखी. आम्हा नियमित मॉर्निंग वॉक करणाऱ्यांच्या चेहऱ्यावर जे एक तेज विलसत असतं, त्याचा या दोघांच्याही चेहऱ्यांवर साफ अभाव होता. शिवाय चालही आमच्यासारखी तेज नव्हती, दमसासाची तर बातच सोडा. गंमत म्हणजे दोघेही मॉर्निंग वॉकच्या व्यायामात नवखे असतानाही आम्लपित्तग्रस्त इसम (यापुढे यांचा उल्लेख आपिग्रइ असा होईल) हा बद्धकोष्ठग्रस्त इसमाला (यांचा उल्लेख बकोग्रइ असा होणार, हे बा चतुर वाचका, तुला कळले असेलच.) चक्क मॉर्निंग वॉकचे फायदे सांगत होता. 
आपिग्रइ : तुमचा फारच गैरसमज झालाय हो माझ्याबद्दल. आमच्या संस्थेबद्दल तर खूपच गैरसमज पसरले आहेत. मी तुम्हाला मॉर्निंग वॉकला बोलावत होतो, ते सकाळी सकाळी व्यायाम केल्यावर होणारे फायदे तुम्हाला समजावेत म्हणून.
बकोग्रइ : अहो, मी २९ पुस्तकं लिहिली आहेत, ती मला काही कळत नाही म्हणून का?
आपिग्रइ : मी कुठे तसं काही म्हटलं? पण, एवढी पुस्तकं लिहूनही- की पुस्तकं लिहिल्यामुळेच- तुमचा चेहरा बघा कसा बद्धकोष्ठ झाल्यासारखा दिसतोय. मुळात तुम्हा लोकांना लिहिण्याचा इतका सोस का असतो, हेच कळत नाही. अहो जगात जे काही लिहिण्यासारखं होतं ते आपल्या पूर्वजांनी केव्हाच लिहून ठेवलेलं आहे. आपण फक्त वाचन करायचं आणि त्यानुसार आचरण ठेवायचं. मन शुद्ध ठेवून परमेश्वरचरणी चित्त लीन ठेवून पुरातनधर्माचं पालन केलं तर कशाला उगाच लिहायला लागतंय काही? उगाच झाडांची कत्तल नुसती? आता विचार करा, तुमच्या २९ पुस्तकांच्या कागदासाठी किती झाडं कापली गेली असतील? तरी बरं तुम्ही लोकप्रिय लेखक नाहीत. लोकप्रिय असता तर एक अख्खं जंगल फस्त केलं असतं तुम्ही.
बकोग्रइ : तुम्ही वाचता?
आपिग्रइ : म्हणजे काय? 
बकोग्रइ : तुमच्याकडे पाहून तुम्हाला अक्षरओळख असेल असं वाटत नाही. ती असती तर साहित्यशारदेच्या प्रांगणातल्या सर्वात मोठ्या उत्सवाच्या अध्यक्षाशी असं बोलण्याची प्राज्ञा तुम्ही केली नसती. 
आपिग्रइ : अहाहा, बघा बघा, केवढा परिणाम झाला पाहा १५ मिनिटांच्या चालण्याचा. आधी काय बोलत होतात? खरंतर भकत होतात, असंच म्हणायला हवं होतं. आणि आता पाहा किती सुरेख भाषा खेळवताहात. मी सांगितलं ना तुम्हाला. सकाळच्या वेळी सूर्यदेवांच्या किरणांमधून बलवर्धक आणि बुद्धीवर्धक कणांचा मारा होतो, हे आपल्या पूर्वजांनी वल्कलं नेसण्याची माहिती नसल्याच्या काळातच ओळखलेलं होतं. घेतलीत ना प्रचिती आपल्या पूर्वजांच्या ज्ञानसामर्थ्याची.
बकोग्रइ : हे पाहा, तुम्ही काहीही वकिली युक्तिवाद केलेत तरी तुम्ही मला मॉर्निंग वॉकला येण्याचा सल्ला का दिला, हे सगळ्या जगाला कळलेलं आहे. मला काही अडचण नाही हो. जो जन्माला आला, तो मरणारच आहे. पण, म्हणून तुम्ही असं थेट धमकी देणं शोभतं का? 
आपिग्रइ : अहो, पण, मी तुम्हाला पुन:पुन्हा सांगतो आहे की मॉर्निंग वॉकला बोलावण्याचं एकच कारण आहे... बद्धकोष्ठातून तुमची मुक्तता व्हावी. आसपास काय काय बदललंय, हे तुमच्या अधू डोळ्यांना थोडं नीट दिसावं. शिवाय श्वासोच्छ्वासाची लय साधून वाचानियंत्रण प्रस्थापित व्हावं. हे सगळं तुमच्या बाबतीत होईल, याची खात्री आहे म्हणून मॉर्निंग वॉकचा सल्ला दिला. ज्यांच्या बाबतीत कसलीही सुधारणा शक्य नाही, हे आम्हाला ठाऊक असतं, त्यांना आम्ही मॉर्निंग वॉकचा सल्ला देत नाही. त्यांच्या कर्माची फळं तो परमेश्वरच त्यांना पंचपंचउष:काली देणारच असतो. त्यात आम्ही कशाला लुडबुड करायची.
लुडबुड हा शब्द ऐकून की काय आम्ही एकदम पुढे झालो आणि आपिग्रइ काकांना म्हणालो, एक्स्क्यूज मी सर. पण, माझाही थोडा अभ्यास आहे या विषयातला. तुम्ही मॉर्निंग वॉकची महती सांगताहात, ती बरोबरच आहे. पण, तुम्ही तो करत नाही, हे स्पष्टच आहे.
आपिग्रइ शक्य तेवढे गोरेमोरे होत म्हणाले, हे कशावरून म्हणताय तुम्ही? हा आरोप आहे.
आम्ही म्हणालो, छे छे, तुमचा चेहराच सांगतोय. तुम्ही मॉर्निंग वॉक करत असता, तर तुमचं आम्लपित्त बरं नसतं का झालं एव्हाना? घटकेघटकेला तुम्हाला करपट ढेकरा येतात, दर तासादोन तासांनी तुम्हाला कोणावर ना कोणावर ओकण्याची उबळ येते, त्यातून बुद्धिमांद्याचा त्रास जडला आहे, ही सगळी लक्षणं काही नियमित मॉर्निंग वॉक करणाऱ्या साधकाची नाहीत मिस्टर. दुसऱ्या सांगे ब्रह्मज्ञान, आपण कोरडे पाषाण?...
यानंतर काय झालं ते ठाऊक नाही, मधलं काही आठवत नाही......आता पुन्हा मॉर्निंग वॉकमध्ये खंड पडलेला आहे......पाय प्लॅस्टरमध्ये लटकलेला असताना कसा वॉक घेणार...
...यापुढे लवकर मॉर्निंग वॉक सुरू होण्याची शक्यता नाही...
...पुलिस कमिशनरच म्हणाले परवा, साहेब, कशाला आमचं काम वाढवताय?...
...त्यांच्यावर लोड कमी आहे काय?

No comments:

Post a Comment