Monday, February 22, 2016

व्यर्थच हो बलिदान

हॅलो, तुम्हाला ताबडतोब निघायचंय, लष्कराचे आपले जवान अडकले आहेत बर्फात. त्यांच्यासंदर्भात काही मिळतंय का पाहा. 
संपादकांचा फोन आला की एरवी आम्हाला स्फुरण चढतं. आज मात्र मन हिरमुसलेलं होतं, हृदय कोमेजलेलं होतं. सियाचिनच्या बर्फात अडकणं म्हणजे काय, याची कल्पना होती. आम्ही सियाचिनला पोहोचणं तर शक्यच नव्हतं... स्वत:ला कितीही बहिर्जी म्हणवून घेत असलो तरी जिथे जीवनाची निशाणीच नाही, अशा पांढऱ्या भव्य थडग्यामध्ये जाऊन राहण्याचं धाडस फक्त वीर जवानच करू शकतात, याची आम्हाला कल्पना आहे. 
लष्कराच्या काही अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी आम्ही दिल्ली गाठली. सगळीकडे गांभीर्याचं आणि शोकाचं वातावरण. अधिकारी बोलण्याच्या स्थितीत नव्हते. आपल्या जवानांचं काय झालं असणार, याची स्पष्ट कल्पना त्यांना होती आणि ते झालेलं नसावं, अशी वेडी आशा मनात धरून ते प्रार्थना करत होते. त्याचबरोबर शोधकार्यही सुरू होतं. यथावकाश आपले जवान बचावणार नसल्याचं स्पष्ट होत गेलं आणि दिल्लीची अशीही मरतुकडी, धुरकट झालेली हवा आता मरणरंगी भासू लागली. 
तेवढ्यात चमत्कार झाला. 
हणमंतप्पा कोप्पड नावाचा जवान जिवंत सापडल्याची बातमी आली आणि दु:खाला सुखाची किनार लाभली. 
हणमंतप्पाची परिस्थिती अजिबात चांगली नव्हती. ईश्वरी चमत्कारच त्याला वाचवू शकेल, असं वाटून लोकांनी प्रार्थना सुरू केल्या. लष्करी अधिकाऱ्यांनी त्याच्यावर सर्वोत्तम वैद्यकीय उपचार होतील, याची काळजी घेतली. पंतप्रधानही या जवानासाठी भावविवश झाले. 
वातावरण बदललंय. आता लोक नऊ जवानांचा मृत्यू विसरलेत. एका जवानाची झुंज ही पॉझिटिव्ह स्टोरी आहे. जरा बोला लोकांशी. मूड पकडा. संपादकांचा आदेश आला. आम्हीही उत्साहाने लष्करी अधिकाऱ्यांना भेटलो. ते नाव न सांगण्याच्या अटीवर मोकळेपणाने बोलले. एवढ्या दिवसांत आज त्यांच्या चेहऱ्यावर थोडा आनंद दिसत होता. ते म्हणाले, बघा बघा आमचा जवान कसा असतो. हाडं सोडा, आत्माही गोठवण्याची ताकद असलेल्या थंडीत हा पठ्ठ्या जिवंत राहिला. त्याने साक्षात मृत्यूला ठेंगा दाखवला. वुई आर सो प्राउड ऑफ हिम. 
सगळ्या देशाला त्याचा अभिमान आहे सर. पण, झालं काय की तिकडे वृत्तवाहिन्या न पोहोचल्यामुळे, लोकांपर्यंत प्रत्यक्ष दृश्य पोहोचायला उशीर झाला. तुम्ही रेस्क्यू टीमबरोबर एक टीम नेली असती पत्रकारांची, तर... 
व्हॉट नॉन्सेन्स, अधिकारी महोदय कडाडले, तिथे टीव्हीवाले गेले असते, तर त्यांनी रेस्क्यू ऑपरेशनचा सत्यानाश करून टाकला असता. आमच्या हणमंतप्पासाठी जीवनमरणाची लढाई होती, ती यांनी टीआरपीची लढाई करून टाकली असती. अब आप को कैसा लग रहा है, असा प्रश्न तिथेही विचारल्याशिवाय राहिले असते का हे दंडुकेधारी? हणमंतप्पाचं सोडा, मला जरी विचारलं असतं तर गोळी घालून तुमचा भेजा उडवावासा वाटतोय, असं मी सांगितलं असतं आणि त्याचं प्रात्यक्षिकही करून दाखवलं असतं. अधिकारी महोदयांचा हात कमरेकडे जातो आहे, हे पाहताच आम्ही उठलो आणि घाईघाईने त्यांचा निरोप घेऊन बाहेर पडलो. 
सर्वसामान्य माणसांची नस ओळखण्यासाठी त्यांच्याबरोबर प्रवास करणं महत्वाचं असतं. सार्वजनिक वाहनातून प्रवास करा, हे आमच्या संपादकांचं वचन लक्षात घेऊन आम्ही दिल्लीची सुप्रसिद्ध मेट्रो गाठली. शेजारच्या प्रवाशाशी विषय काढला. साहेब, त्या हणमंतप्पाची पण कमाल आहे नाही? 
कमाल म्हणजे काय? अरे आपल्या भारताचा वीर जवान आहे तो? शेर का बच्चा है... 
हा विषय ऐकून बसलेले आणि उभे असलेले अन्य सहप्रवासीही संभाषणात सहभागी झाले. सगळ्यांनी हणमंतप्पाच्या जिगरबाजपणाचं कौतुक केलं. 
आम्ही पुन्हा शेजारच्याला विचारलं, ही बातमी आली तेव्हा तुम्ही काय करत होतात? 
बसलो होतो, तो चटकन बोलून गेला, मग सारवासारव करत म्हणाला, आपले नऊ जवान बर्फात जिवंत गाडले गेले, हे समजल्यामुळे इतकं प्रचंड दु:ख झालं होतं की ते बुडवण्यासाठी बसावंच लागलं. 
बरोबर आहे, बरोबर आहे, असं एकाने झुलत झुलतच सांगितलं... त्याचं दु:ख अजून शमलेलं दिसत नव्हतं. 
ही बातमी तुम्हाला टीव्हीवर समजली, तेव्हा तुमची काय भावना झाली? 
मन भरून आलं, आनंद पोटात मावेना, खुशीत आणखी एक पेग मारला आणि देशभक्तीपर गाण्यांचं चॅनेल शोधू लागलं. कोणत्याही जवानाचं सीमेवर काहीही बरंवाईट झालं की मी लगेच देशभक्तीची गाणी लावतो. 
कोणती गाणी पाहिलीत मग? अहो हे आपले छचोर मीडियावाले. त्यांच्याकडे कुठून येणार देशभक्तीची भावना. सगळेच्या सगळे प्रेस्टिट्यूड बनून बसले आहेत. एकाही चॅनेलला हे सुचलं नाही हो. सगळीकडे उच्छृंखल गाण्यांचा हैदोस चालला होता. शेवटी बायको-मुलं झोपायला गेल्यानंतर मस्तीजादे आणि क्या कूल है हमची गाणी पाहूनच आनंद साजरा करावा लागला. जवान बर्फात अडकल्यापासून त्या रात्रीच तेवढी शांत झोप लागली मला. 
तुम्ही काय केलंत? आता आम्ही शेजारच्या दुसऱ्या प्रवाशाकडे मोर्चा वळवला. 
अपनी भी कहानी लगभग यही है. फक्त मी काही घेत नाही. नुसता जेवतो. हणमंतप्पाची बातमी ऐकल्यावर पोराला पिटाळून मिठाई मागवली. बिल्डिंगच्या सेक्रेटरीला फोन लावला? 
कशाला? 
डीजे मागवायला. 
रात्रीचा डीजे? कशाला? 
कशाला म्हणजे? देशभक्तीची गाणी वाजवायला. मूर्ख पोलिसांच्या बंदीमुळे रात्री येणार नाही म्हणाला. मग सकाळी सहा वाजता मागवला. सकाळी सगळीकडे झेंडे लावले. सोसायटीच्या खर्चाने नाश्ता करवला सगळ्यांना आणि भारत माता की जय म्हणून आपल्या कामाला लागलो. 
मै क्या कहता हूँ भाईसाब, एकही धमाके मे पाकिस्तान को खत्म करेंगे तो ये सब झगडाही खतम हो जाएगा ना? एकाने तोंड घातले. 
अरे ऐसे कैसे खत्म होगा दुसरा आसपास कुठे दाढी-गोल टोपी दिसते का, हे पाहात म्हणाला, यहाँ भी तो है ना कटेलों की औलादें. त्यांनाही संपवून टाकायचं, तिसऱ्याने निकाल दिला.
आम्ही म्हणालो, असं आहे भावांनो, हणमंतप्पाच्या आधी जे नऊ जवान शहीद झाले ना आपले, त्यात एक मुश्ताक पण होता. 
यावर गप्प झालेल्या जमावाला तुमचं कोण कोण आहे लष्करात, देशप्रेमाला जागून तुम्ही पाठवता का आपल्या मुलांना सैनिकी शिक्षणासाठी हे प्रश्न विचारल्यावर तर पांगापांगच झाली. 
मग आम्ही आमचा मोर्चा युद्धतज्ज्ञांकडे वळवला. नावाच्या पाटीवर बंदूक टांगलेली होती आणि तोफेची नळी हीच घराची बेल बनवण्यात आली होती.
हणमंतप्पाची बातमी आणि त्यावरच्या आनंदाची प्रतिक्रिया याबद्दल सगळं नेहमीसारखंच बोलून झाल्यानंतर त्यांना विचारलं, सर, नऊ जवान कामी आले आपले. नऊ घरांमधले नऊ कर्ते पुरुष गेले. नऊ कुटुंबांमधला एक माणूस संपला, ती उद्ध्वस्त झाली. हे टाळता नाही का येणार? 
तज्ज्ञ म्हणाले, धिस इज वॉरफेअर माय बॉय. इथे भावुक होऊन चालत नाही. हे गृहीत धरावं लागतं सैन्यात. ही नोकरीच मुळी जिवावर उदार होऊन करण्याची.
 सर, युद्ध सुरू असताना असं काही झालं असतं तर समजण्यासारखं होतं. पण, एका बंजर, मृत्युलोकासारख्या भयाण प्रदेशावर कब्जा राखण्यासाठी जवानांना तैनात करण्यापेक्षा वेगळे, राजनैतिक स्वरूपाचे मार्ग नाहीत का काही? 
यू फूल, तुमचं मत आहे की आपण शत्रूबरोबर वाटाघाटी करून माघार घ्यावी आणि त्यांच्यावर भरवसा ठेवावा. त्यांनी आपल्यावर भरवसा ठेवावा. असा भरवसा तयार झाला, तर सियाचिनमध्येच कशाला, देशाच्या कोणत्याही सीमेवर एकही जवान तैनात करण्याची गरज पडणार नाही. पण, वास्तव हे अशा आदर्शवादी कल्पनांपेक्षा नेहमीच वेगळं असतं. 
बरोबर आहे सर. पण, हे वास्तव नेहमी जवानांनाच भोगावं लागतं. त्यांचं ते कामच आहे असं म्हणून आपण मोकळे होतो. आपलं काम काय आहे मग? आमचं सोडा, तुम्ही तर सरकारला सल्ला देणारे तज्ज्ञ. तुम्ही का नाही दोन्हीकडची प्राणहानी टाळणारा काही उपाय सुचवत? 
असा एकच उपाय आहे माय बॉय. तो काय? आसिंधुसिंधु हिंदुराष्ट्र! 
अरे बापरे, आपण पत्ता चुकलो आहोत, हे लक्षात येऊन आम्ही तज्ज्ञ महोदयांच्या घरातून पळ काढला...
...बाहेर पडल्यानंतर हणमंतप्पाच्या कुडीतून प्राण निघून गेल्याची भयंकर बातमी आमच्या कानावर आली... 
पाठोपाठ ठिकठिकाणच्या स्पीकरांमधून देशभक्तीचे नळ गळू लागले... 
दोन दिवसांतल्या घडामोडींच्या नोट्स लिहिलेल्या वहीकडे पाहताना आमच्या तोंडून अचानक शब्द निघून गेले, 
सुटला बिचारा.

No comments:

Post a Comment