Monday, December 26, 2011

कौन बनेगा उच्छादपुरुष!

मित्रहो, महाराष्ट्रातील जनतेच्या कानामनांचा ‘निकाल’ लावणा-या आमच्या महास्पर्धेचा निकाल जाहीर करण्यापूर्वी आम्हाला- कोणत्याही स्पर्धेच्या संयोजकांप्रमाणे- हे सांगितलंच पाहिजे की ही स्पर्धा फार म्हणजे फारच टफ होती. काँपिटिशन टेरिफिक होती. कंटेस्टन्ट्स तगडे होते.. नेलबायटिंग फिनिश.. सॉरी सॉरी सॉरी.. टीव्ही चॅनेलवरच्या टॅलेंट हंट काँटेस्ट होस्ट करून करून असं बोलण्याची हॅबिटच होऊन गेलीये.. म्हणजे शुद्ध मराठीत, दूरचित्रवाणी मालिकांच्या गुणवत्ता शोध स्पर्धाच्या सूत्रसंचालनाच्या सवयीमुळे आमचं मराठी हे असं आंग्लप्रदूषित होऊन गेलंय (बाय द वे, प्रोडय़ुसरसाहेब, हे शुद्ध मराठी वाक्य एका दमात बोलून दाखवण्याचीही स्पर्धा घेता येईल. प्लीज नोट.)
 
तर सांगायची गोष्ट म्हणजे ‘महाराष्ट्राचा उच्छादपुरुष कोण’, या आमच्या देशविदेशात अतीव लोकप्रिय झालेल्या स्पर्धेसाठी अपेक्षेनुसार स्पर्धकांमध्ये फार मोठी स्पर्धा होती. यात अर्थातच आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही. महाराष्ट्राची एकंदर उच्छादाची परंपराच तेवढी मोठी आहे. वर्षभर न थकता एकापाठोपाठ एक उच्छादी उत्सव करणारा प्रांत ही आपली देशातच नव्हे, तर विदेशातही तयार झालेली गौरवपूर्ण ओळख आहे. महाराष्ट्र हा संगीतरसिकांचा प्रांत काही उगाच झालेला नाही. त्यामागे गल्लोगल्लीच्या उच्छादमहर्षीचे अपरंपार कष्ट आणि सामान्यजनांचा वर्गणीरूपी (कोण रे कोण तो खंडणी म्हणतोय, घ्या त्याला कोपच्यात) आशिर्वाद आहे. बेंजोवादकांची अथक मेहनत, मुक्तशैलीतील नृत्याविष्काराचे दर्शन घडविणारे हौशी पण समर्पित नर्तक, त्यांना ‘ऊर्जा’ पुरवणारे देशी-विदेशी बार या सर्वाचे योगदान विसरता येणारे नाही. स्पीकरच्या भिंतींमधून छातीच नव्हे, तर इमारतींच्या भिंतीही हादरवणा-या ध्वनीलहरींचं प्रक्षेपण करणा-या तंत्रज्ञांचे आभार तर किती आणि कसे मानावेत, हे शब्दात व्यक्त करता येत नाही. करता आलं असतं तरी त्यांनीच निर्माण केलेल्या या गोंगाटात ते किती श्रोत्यांपर्यंत पोहोचलं असतं, याबद्दल शंकाच आहे.
 
आपली परंपरा टिकवण्यासाठी किती झटतात हे लोक. दिवस बघत नाहीत की रात्र बघत नाहीत; किती वाजलेत, लोकांची झोपायची वेळ आहे की जागं राहायची, याची फिकीर करत नाहीत; वाटेत हॉस्पिटल आलंय की शाळा आलीये, याची पत्रास ठेवत नाहीत; शांततेनं जगण्याचा लोकांचा अधिकार धार्मिक ‘जागृती’पुढे य:कश्चित क:पदार्थ मानतात, सायलेन्स झोन वगैरे थेरं थेट फाटय़ावर मारून सरकारच्या जुलमी अमलाला क्रांतिकारकांसारखं ओजस्वी आव्हान देतात; हे सगळं कशासाठी- तर नि:स्वार्थ भावनेनं आवाज निर्माण करण्यासाठी, आपल्या (अ)संस्कृतीचा आवाज सर्वदूर पसरवण्यासाठी.
 जरा विचार करा. या उच्छादाचा या धर्मप्रसारकांवर काहीच परिणाम होत नाही का? या शूरवीरांचे कान फाटत नाहीत का? आवाजाच्या हादऱ्यांनी छाती कंप पावून त्यांचं ब्लडप्रेशर वाढत नाही का? त्यांच्या घरातली तान्ही बाळं झोपेतून दचकून उठून किंचाळू लागत नाहीत का? त्यांच्या घरातल्या मुलांच्या झोपेचं, अभ्यासाचं आणि करीअरचं खोबरं होत नाही का? ज्या हॉस्पिटलच्या बाहेर ते उच्छाद मांडतात, त्यात त्यांच्या रक्तानात्याचं कोणीच कधी अ‍ॅडमिट नसतं का?.. तरीही ते घेतलेलं व्रत सोडत नाहीत. व्यक्तिगत लाभहानीचा विचारसुद्धा त्यांच्या मनाला शिवत नाही. त्यांच्या कानामनात फक्त ‘धतडततडततडततड’चा ठेकाच गुंजत असतो.
इतक्या थोर परंपरेचे पाईक जिथे गल्लोगल्ली आवाजमश्गुल अवस्थेत झिंगून नाचताहेत, त्या राज्यातून कोणीतरी एकच एक उच्छादपुरुष निवडणं, हेच अतिशय अवघड काम होतं. पण, हा काही कोणा व्यक्तीचा सन्मान नाही. तो या परंपरेचा सन्मान आहे. प्रातिनिधिक स्वरूपाचा बहुमान आहे. तो कोणाला लाभतोय याची उत्सुकता आपणा सर्वाबरोबर आम्हालाही आहेच. त्या महाविजेत्याचं नाव घोषित करण्याआधी पाहूयात अंतिम फेरीतील नामांकनं.
 
‘महाराष्ट्राचा उच्छादपुरुष कोण’ या स्पर्धेतलं पहिलं नामांकन आहे ‘खळ्ळ खट्य़ॅक’ या आवाजाचीच ओळख मिरवणारे मनसेराज कृष्णकुंजकर यांचं.. महाराष्ट्रात ‘आवाज कुणाचा’ या प्रश्नावर एकेकाळी एकसुरातून उत्तर यायचं, ते दोन सुरांत विभागण्याचं श्रेय कृष्णकुंजकरांना जातं. आता तर या प्रश्नावर गिल्लाच ऐकू येतो ते सोडा. कृष्णकुंजकरांची मूळ परंपराच आवाजी. त्यांच्या काकांनी महाराष्ट्राला आवाजी पुढाऱ्यांची पहिल्यांदा ओळख करून दिली. बोलके नेते हे कर्त्यां नेत्यांना भारी पडू शकतात, हे पहिल्यांदा दाखवून दिलं. तीच परंपरा कृष्णकुंजकर चालवत आहेत.
 
दुसरं नामांकन आहे, क्लिकेशकुमार फोटुबहाद्दर यांचं. हे कृष्णकुंजकरांचे चुलतभाऊ आहेत, हा योगायोग नाही. काकांची परंपरा यांना वडिलोपार्जित लाभली आहे. पण, दुर्दैवाने हे जेव्हा जेव्हा आवाज कुणाचा म्हणून हाळी देतात तेव्हा कॅमे-याची क्लिकच ऐकू येते, त्याला ते तरी काय करणार? वाघाची डरकाळी ऐकायला हल्ली यांना जंगलात जावं लागतं.
 
आजच्या स्पर्धेतलं तिसरं नामांकन आहे मीखिल आगळेवेगळे यांचं. यांनी ‘टीव्हीवरील उच्छाद’ असा एक वेगळाच उच्छादप्रकार मराठीत आणला आहे. दिवसा-रात्री-पहाटे कोणत्याही वेळी त्यांचं चॅनेल लावा, ते टीव्हीवर असतातच. हे घरी कधी जातात आणि टीव्ही कधी पाहतात, हे अखिल महाराष्ट्राला पडलेलं कोडं आहे. त्यांनी स्वत: टीव्ही पाहिला, तर कदाचित आपला उच्छाद कमी करतील, अशी काही प्रेक्षकांना आशा आहे. एक एकटा माणूस निव्वळ बडबड आणि हातवारे यांच्या बळावर किती उच्छाद निर्माण करू शकतो, याचं ते (शब्दश:) चालतंबोलतं उदाहरण आहेत.
 
या सर्व तगडय़ा स्पर्धकांना मागे सारून आजच्या स्पर्धेचे विजेते ठरलेले महाराष्ट्राचे उच्छादपुरुष आहेत.. गृहकलहमंत्री आराराबा सांगलीकर ऊर्फ आबा तोंडपाटील. स्पर्धेत शेवटच्या क्षणी येऊन त्यांनी बाजी मारली. काही वर्षापूर्वी आबांनी बोबोबोलून या स्पर्धेत तगडं आव्हान निर्माण केलं होतं. पण, बेभान बोलण्याच्या नादात ‘बडे बडे शहरों मे ऐसे छोटे छोटे हादसे हो जाते है’ असं बोलून गेले आणि तोंडाला कुलूप बसलं ते कायमचंच. विधिमंडळातल्या एका क्रांतिकारक निवेदनानं त्यांना स्पर्धेत आणलं आणि विजयाची माळ त्यांच्या गळय़ात घातली. महाराष्ट्रभूमीचा उच्छादभूमी हा लौकिक कायम राखण्यासाठी आबांनी काय नाही केलं? पुण्यातल्या अनंत चतुर्दशीनंतर 10 दिवस चालणा-या विसर्जन मिरवणुकीवर कारवाई करणा-या धर्मद्रोही पोलिसांचे कान उपटून त्यांनी ती कारवाई मागे घेतली. शिवाय, आवाजबंदीविरोधात आवाज उठवून थेट सर्वोच्च न्यायालयरूपी दिल्लीच्या तख्तालाच आव्हान दिलं. पारंपरिक उत्सवांच्या उच्छादासाठी वर्षातले 12 दिवस कमी पडताहेत, ते आणखी वाढवावेत, अशी शिफारसच त्यांनी केंद्र सरकारकडे केलीये. आबा, तुमच्यासारखे द्रष्टे नेते लाभले तर लवकरच आपल्या राज्यात वर्षातले 365 दिवस रात्रंदिवस बेबंद धांगडधिंगा घालण्यासाठी खुले ठेवता येतील. हवं तर अभ्यास करणारी मुलं, आजारी माणसं, लहान बाळं आणि अल्पवयात (कानामनाने) बधीर होऊ न इच्छिणारे शांतताप्रेमी नागरिक यांच्यासाठी गडचिरोलीच्या जंगलात गृहनिर्माण योजना सुरू करता येईल.
 
धतडततडततडततड
 
उच्छादपुरुष आबा, आगे बढो
 
धतडततडततडततड
 
हम तुम्हारे साथ है
 धतडततडततडततड

(चित्र : प्रदीप म्हापसेकर) 


(प्रहार, २५ डिसेंबर, २०११)

Monday, December 19, 2011

सामर्थ्य आहे वंगणाचे!

शहाणा माणूस कोर्टाची पायरी चढत नाही म्हणतात.. अधिक शहाणा माणूस सरकारी ऑफिसचीही पायरी सहसा चढत नाही..
 
..रया गेलेली कळकट्ट इमारत, पोपडे उडालेल्या भिंती, करकरत गरगरणारे पंखे, बाबा आदमच्या काळातल्या टेबल-खुर्च्या, फायलींच्या चळती, भकास, उदास, दुर्मुखलेलं कुंद वातावरण, काम करण्याची शिक्षा शक्य तेवढी टाळण्याच्या प्रयत्नात असलेले तुसडे कर्मचारी, कामानिमित्त केल्या जाणा-या विचारणांवर त्यांचं करवादून वसकन अंगावर येणं किंवा मख्ख चेह-यानं नकारघंटा वाजवणं.. इकडून तिकडे तिकडून इकडे हेलपाटे मारायला लावणं, लहानातल्या लहान कामासाठी तासन्तास बसवून ठेवणं, कामं बाजूला ठेवून दात कोरत चकाटय़ा पिटणं, कधी थेट तर कधी आडून लोचटपणे किंवा निगरगट्टपणे लाच मागणं.. हे ओकारी आणणारं, शिसारी आणणारं दृश्य पाहून कोणत्याही शहाण्या माणसाचं रक्त उकळतं..
 
रक्त उकळून उकळून आता त्याची लाल बासुंदीच होते की काय, अशी असह्य परिस्थिती होते, तेव्हा शहाणा माणूस बाहेर पडतो, ‘मै भी अण्णा, तू भी अण्णा’ची टोपी घालून रामलीला मैदानावरच्या गर्दीत मिसळून जातो, भ्रष्टाचारविरोधाच्या घोषणा देतो, अण्णांची प्रवचनं ऐकतो, बेदीबाईंचा नाच पाहतो, मेणबत्तीवाल्यांची भाषणं ऐकतो आणि त्याची खात्रीच पटते की आता देशातून भ्रष्टाचार कायमचा हद्दपार होणार. सगळे खाबूबाज बाबू आता सुतासारखे सरळ येणार..
 
..अशा गोड स्वप्नरंजनात रमलेल्या बा शहाण्या माणसा, आज आपण तुला एका वेगळ्याच सरकारी ऑफिसात घेऊन जाऊ या. या ऑफिसचा फेरा सहसा कुणाला चुकलेला नसतो. पण, तरीही, थोडय़ा वेगळ्या नजरेने ते पाहण्यासाठी आज पुन्हा वाट वाकडी कर..
 
ये ये ये. हे सरकारी ऑफिस आहे, असा विश्वासच बसत नाहीये ना?
 
कसा बसेल? स्वच्छ चकचकीत इमारत. पायतळी सुरेख टाइल्स. नव्याने रंग काढलेल्या सतेज भिंती. नवंकोरं सुबक फर्निचर. टेबलाटेबलावर कम्प्यूटर. न कुरकुरता थंड हवेचे लोट सोडणारे पंखे, क्वचित कुठे चक्क एसी. अभ्यागत कक्षात गादीच्या बैठका. फ्लॅट स्क्रीन टीव्ही. पाण्याचं पिंप. या सगळ्यापेक्षाही अविश्वसनीय गोष्ट म्हणजे सरकारी ऑफिस असूनही कामाच्या वेळी सुरू असलेली कामाची लगबग..
 
..पत्ता चुकला बहुतेक म्हणून चपापून मागे सरकू नकोस, बा शहाण्या माणसा. हे सरकारी ऑफिसच आहे. मात्र, इथे कामाची लगबग करणारे, काम घेऊन आलेल्याचं हसतमुखानं स्वागत करणारे, त्याच्या मदतीसाठी सदैव तत्पर असे जे लोक दिसताहेत, ते सरकारी कर्मचारी नाहीत (अंदाज बरोबर आल्याचा आनंद तुझ्या चेह-यावरून ओसंडून वाहतोय रे बाबा!).. दलाल आहेत दलाल.. कामाच्या फायली घेऊन कागद नाचवत ते टेबलोटेबली ज्यांच्यापाशी जाताहेत, ती मख्ख चेहऱ्याची माणसं म्हणजेच आपले परमप्रिय बाबूलोक आहेत.. पण, जरा त्यांच्याही चर्येकडे नीट पाहा.. सुबत्तेनं आलेली तुकतुकी त्वचेला कशी फेअर अँड लव्हली शाइन देतेय पाहा.. अंगातले कपडे पाहा.. डोळ्यांवरचे गॉगल पाहा.. खाली उभ्या गाडय़ा पाहा.. बंगले पाहा, फार्म हाऊस पाहा.. बाथरूमच्या टाइल्स फोडून पाहा.. गाद्यांचा कापूस उपसून पाहा.. जिकडे तिकडे श्रीमंती थाट कसा झळकतोय.. आपल्या दृष्टीनं सगळय़ात महत्वाची गोष्ट म्हणजे त्याच तुसडय़ा चेह-याने का होईना, हे सगळे मान मोडून काम करतायत.. ओव्हरटाइम मिळेल की नाही, याची फिकीर न करता वेळेच्या आधी उघडणारं आणि वेळेच्या नंतर बंद होणारं सरकारचं कदाचित एकमेव कार्यालय असेल हे..
 डबडबले ना डोळे तुझे पाण्याने?
भरून आला ना ऊर, अभिमानाने?
एकतरी सरकारी कार्यालय असं कृतीशील आहे, या विचारानं सद्गतित होण्याचा तुझा मानस असेल मित्रा, तर तो अंमळ रहित कर आणि शोध घे की हा सगळा चमत्कार कसा घडून येतो?
ये बाहेर आणि पाहा पाटी.
हे आहे सहकारी निबंधकांचे कार्यालय. म्हणजे आपल्यातुपल्या भाषेत रजिस्ट्रार ऑफिस.
इथे मुख्यत: व्यवहार होतात जमिनीचे, प्रॉपर्टीचे, रियाल्टीचे. जो जो फ्लॅट घेण्याचा व्यवहार करतो तो एकदा तरी या ऑफिसाची पायरी चढतोच. ती चढण्याआधीच ‘बिल्डरचा माणूस’ आपल्याकडून ‘फी’ म्हणून काहीएक रक्कम घेऊन ठेवतो.. आपल्या व्यवहाराच्या कायदेशीर स्टँप डय़ूटी आणि फीच्या पलीकडची. तीच आपल्या कैकपटीत बिल्डरकडूनही दिली जातेच. हेच इथल्या कार्यकुशलतेचं रहस्य आहे, हेच इथलं वंगण आहे. नियमित तेलपाणी झाल्यावर इथली सगळी यंत्रणा कशी न कुरकुरता झपाटय़ानं अहोरात्र काम करते, ते पाहण्यासारखं आहे.
 
अद्भुत आश्चर्याची गोष्ट म्हणजे जो कोणी वंगणाची बुधली बरोबर आणत नाही, त्या नतद्रष्ट इसमाच्यासाठी हे सगळं ऑफिस- वरकरणी किती चकाचक असलं तरी- नेहमीच्या रटाळ सरकारी ऑफिसचं रूप घेतं. लाजाळूचं रोप कसं स्पर्शानं मिटतं, तसं हे ऑफिस लक्ष्मीदर्शनाविना मिटून जातं.. अशा लुख्ख्या माणसाच्या मदतीला कोणी येत नाही, सहर्ष स्वागत करत नाही, आपलं काम कुठे आणि कसं होईल, हे कळेकळेपर्यंतच त्याचा अर्धा दिवस गेलेला असतो, कळतं तेव्हाही त्याला कळतं काय, तर आता हे काम आज होणारच नाही.
 
त्याच्या कागदपत्रांमध्ये शेकडो चुका, त्रुटी निघणारच.
 त्या गलिच्छ खरखरीत आवाजात आणि थोतरीत मारावी अशा स्वरात ऐकवल्या जाणारच.
त्याला खेटे घालावे लागणारच.
त्याचं रक्त आटणारच.
तेच काम तो दलालाकडे गेला की अर्ध्या दिवसात पूर्ण होतं. सामर्थ्य आहे वंगणाचे!
 या यंत्रणेला वंगणाची सवय कुणी लावली?
आपणच.
घाई कुणाला असते?
आपल्यालाच.
इतरांच्याआधी आपला नंबर लागावा, अशी इच्छा कुणाची असते?
आपलीच.
कागदपत्रांमध्ये जरा कमी-अधिक असेल, ते सावरून घेतलं जावं, अशी अपेक्षा कुणाची असते?
आपलीच.
थोडक्यात, इथल्या यंत्रणेने नियमानुसार आणि तिच्या गतीनुसार काम करू नये, यासाठी आपणच तिला भ्रष्ट करतो.
म्हणूनच कोणीही अण्णा किंवा ‘मै भी अण्णा, तू भी अण्णा’ इथे कधी आंदोलन करत नाही, कोणताही चॅनेल इथलं स्टिंग ऑपरेशन करत नाही, कोणताही सचोटीचा मंत्री-अधिकारी इथली व्यवस्था बदलून पारदर्शक वगैरे बनवण्याच्या फंदात पडत नाही.. ही आपल्या सर्वाच्या गरजेतून, सहकारातून, समन्वयातून, बंधुभावातून उभी राहिलेली यंत्रणा आहे, त्यामुळे आपल्या भंपक भोंदूपणाप्रमाणेच तीही अजरामर आहे.
तेव्हा, बा शहाण्या माणसा, जेव्हा जेव्हा भ्रष्टाचारविरोधाचा अतीव ज्वर चढेल, तेव्हा तेव्हा या ऑफिसात जरूर येऊन जा.. उघडय़ा डोळ्यांनी इथला कारभार पाहून जा.. तुझ्या प्रकृतीला उतार नक्कीच पडेल.

(प्रहार, १८ डिसेंबर, २०११)

Monday, December 12, 2011

खळ्ळ खटय़ॅक पेपर फटय़ॅक

आगामी निवडणुकीसाठी आमचे येकमात्र (एकावेळी आमचे एकच साहेब असतात, या अर्थी) साहेब, आ. रा. रा. रा. (हे त्यांच्या कृत्यांनी आणि वक्तव्यांनी उद्वेगाने मुखातून अनाहूतपणे निघणारे उद्गार नसून ‘आदरणीय राजमान्य राजेश्री राजसाहेब’चे लघुरूप आहे.) यांनी लेखी परीक्षा घेण्याचे प्रयोजन जाहीर केले आणि आमची तीक्ष्ण शोधपत्रकारक नजर भिरभिरू लागली (‘ती सारखी भिरभिरतच असते, लोचट मेले’ हे सैपाकघराच्या दिशेने आलेले शब्द कानावेगळे करून अवधान एथ्थे रख़्ख- सुपर मामा!). काहीही करून या परीक्षेचा पेपर आपल्या पेपरात फोडायचाच, असा चंग आम्ही बांधला. ज्येष्ठ शोधपत्रकार आणि आमचे रिटायर्ड हर्ट ज्येष्ठ परंमित्र जे की   साहेब यांच्या पावलावर पाऊल ठेवून (ते खासगीत सांगतात की ‘पायावर पाय देऊन’) आम्ही पत्रकारिता करीत असल्याने लगोलग आम्ही चाणाक्षपणे शिवाजी पार्काची वाट धरली (‘हुंगायला जातात सकाळ-संध्याकाळ’ या ‘त्या’ दिशेने आलेल्या कुत्सितोद्गारांकडे बा वाचका दुर्लक्ष कर). ‘कृष्णकुंजा’च्या परिसरात- ज्याअर्थी की ते मराठी हृदयसम्राटांचे निवासस्थान आहे, त्याअर्थी- एकतरी भेळवाला भय्या असणारच, अशी आमची खात्रीच होती. तसा तो सापडलाच. मग आम्ही भेळ खाण्याच्या मिषाने तिथे उभे राहिलो (‘जीभच चटोर यांची’- दुर्लक्ष दुर्लक्ष). थोडय़ाच वेळात आमच्या तीक्ष्ण नजरेला भेळवाल्याच्या गठ्ठय़ातली हस्तलिखित पाने दिसली आणि आम्ही हात पुढे करून भेळवाल्याच्या पुढय़ात उभे राहिलो. ‘‘तीख्खा बनाना हौर उपर से लिंबू पिळना, जरा जास्ती पिळना’’ अशा सूचना देऊन आम्ही जो भेळयज्ञ सुरू केला, तो 17 हस्तलिखित कागद जमवूनच थांबला.
 प्रत्यक्ष परीक्षेत कोणता पेपर आला होता, याचा आम्हाला पत्ता नाही. प्रंतु पेपर सेटरनी पेपर काढताना काय काय विचार केला होता आणि मूळ पेपर काय होता, यावर आमच्या हातातील दस्तावेजातून निश्चितच प्रकाश पडेल. तर अशी आहे मूळ प्रश्नपत्रिका....

 
प्र. १. आपल्या पक्षाचे नेमके ब्रीदवाक्य काय आहे?
 
  • अ. खळ्ळ खटय़ॅक
  • ब.  खळ्ळ पटय़ॅक
  • क.  खळ्ळ सटय़ॅक
  • ड.  खळ्ळ फटय़ॅक
 (‘खट्य़ॅक’ या आवाजाचा कॅमेराच्या क्लिकशी असलेला संबंध लक्षात घेता ‘खळ्ळ खटय़ॅक’ हे ब्रीदवाक्य उद्धोजी वांद्रेकरांनी त्यांच्या पक्षासाठी घेण्यास हरकत नाही.) 
 
प्र. २. आपल्या ब्रीदवाक्यातील फटय़ॅक्’ हा आवाज कशाचा आहे?
 
  • अ. भय्याला चोपटवल्याचा
  • ब. भय्यांनी चोपटवल्याचा
  • क. पोलिसांनी कानफटवल्याचा
  • ड. पब्लिकनी लगावल्याचा
 
प्र. ३. संदर्भासह स्पष्टीकरण द्या.
 
  • अ. विठ्ठल आणि बडवे
  • ब. कावळे आणि मावळे
  • क. वसंतसेना आणि अशोकसेना
  • ड. ट्रॅक्टर आणि जीन्स
 
प्र. ४. पुढील विषयावरील प्रांजळ मनोगत लिहा.
 
‘आणि मी चुकीच्या माणसाला काळे फासले..’
 (उपप्रश्न : कोणते काळे अधिक काळ टिकते? शाई, रंगपंचमीचा रंग, केमिकल कलर की कोळशाची उगाळी?)  

प्र. ५. एखाद्या व्यक्तीच्या सहाव्या मजल्यावर असलेल्या घरावर हल्ला कसा चढवाल? नकाशा आणि डावपेचांसह प्लॅन ऑफ अ‍ॅक्शन तयार करून द्या. 

 किंवा  

दहा बाय बाराच्या रूममध्ये एका टेबलासमोरच्या खुर्चीत बसलेल्या टार्गेटवर दहा जणांच्या साथीने हल्ला कसा कराल? त्याला काळे कसे फासाल? ‘टीव्ही माझा’च्या टीमला उत्कृष्ट चित्रीकरण मिळण्याच्या दृष्टीने (त्यांनाही दिवस भरायचा असतो) कोणता अँगल द्याल? याचा नकाशा आणि डावपेचांसह प्लॅन ऑफ अ‍ॅक्शन तयार करून द्या. 

प्र. ६. ज्यांच्या नावाने आपण अहोरात्र घसाफोड करतो, बोटे मोडतो, खडे फोडतो, त्यांच्याचसोबत पालिकेत जाहीर किंवा गुप्त युती करतो.. हेच महाराष्ट्राच्या व्यापक हिताचे कसे आहे, हे पटवून देणारे प्रभावी भाषण तयार करा.  


 किंवा  

 
आपल्याला दिवसरात्र नाडणारे, व्यापाराच्या नावाखाली लुटणारे, आपल्याच राज्यात आपल्याला घरही नाकारण्याची हिंमत करणारे सर्व धनदांडगे परप्रांतीय हे आपले मित्र आणि बांधव आहेत; फक्त कानफटवायला सोपा असा कष्टकरी गरीब भय्याच तेवढा मुजोर परप्रांतीय आहे, हे प्रभावीपणे पटवून द्या.

(इथे ‘द्या’ खोडून ‘घ्या’, ते खोडून ‘द्या’ अशी बरीच खाडाखोड केलेली दिसते.)  

यानंतरची पाने बा वाचका, तुझ्या सेवेत हजर करता येत नाहीत, असे सखेद जाहीर करावे लागत आहे. पत्रकारितेच्या परमकर्तव्यापोटी एवढय़ा आणि अशा जहाल भेळी हादडल्यानंतर पुढे कोठून कळा सुरू झाल्या आणि शोधपत्रकारितेचा अंत कशाच्या शोधात झाला, हे बा वाचका तुला फोडून सांगण्यात हशील नाही. उपरोल्लेखित मजकूर एका हाताने पोटावर ओव्याची गरम पुरचुंडी दाबत लिहिलेला आहे, हे समजून घे...
... 
खळ्ळ खळ्ळ...
...
अरे देवा, हा आवाज कुठून आला?
 
पेपर यशस्वीपणे सोडवलेल्या ‘विद्यार्थ्यां’ना ज्येष्ठ शोधपत्रकाराच्या घराचा शोध लागला की काय?
 बा वाचका, आता यापुढील सुप्रसिद्ध ‘फटय़ॅक’ आमच्याच कर्णसंपुटाखाली ऐकू येण्याच्या आतच फडताळात दडणे क्रमप्राप्त आहे. इत्यलम!

(चित्र : प्रदीप म्हापसेकर)

(प्रहार, ११ डिसेंबर, २०११)

Monday, December 5, 2011

'ऊह'लोकीची अप्सरा...

ऊ ला ला ऊ ला ला (हे काय आहे, असा प्रश्न पडला असेल, तर सावधान.. तुमचं मानसिक वय 18 वर्षापेक्षा अधिक असण्याची दाट शक्यता आहे.. ताबडतोब हा मजकूर वाचणं थांबवा..)
 
आ ऊ ललिता.. (हे काय आहे, असा प्रश्न तुम्हाला पडलाय, म्हणजे तुम्ही आधीचा इशारा ऐकला नाहीत.. आता भोगा आपल्या कर्माची फळं! हे विलक्षण प्रमुदित झालेल्या स्थितीतील शक्ती कपूर नामक रावडय़ा नरपुंगवाचे चित्कार आहेत..)
 
प्रस्तुत लेखकाला हा शक्ती कपूरी (म्हणजे साध्या भाषेत आसुरी) आनंद का बरे झाला असावा, असा प्रश्न पडला असेल, तर त्याचं उत्तर पहिल्या प्रश्नातच दडलेलं आहे..
 ‘ऊ ला ला ऊ ला ला’ या तडकभडक, दिलखेचक, चाबूक आणि अशाच अन्य दर्जानिदर्शक विशेषणांना सुपात्र गाण्यामुळे, त्यातल्या विद्या बालनच्या (जुग जुग जियो) उन्मत्त अदाकारीमुळे आणि त्याला मिळालेल्या उदंड प्रतिसादामुळे एका गोष्टीवर शिक्कामोर्तब झालंय.. भारत देश बदलला, माणसं बदलली, 80 च्या दशकात जी पिढी तरुण होती ती मध्यमवयीन झाली, 80 च्या दशकात जन्मली ती उत्तरतारुण्यात पोहोचली, 80 च्या दशकानंतर जन्मली ती तरुण झाली; पण, एक गोष्ट कायम राहिली.. जवाँदिल भारतीयांची फँटसी.. ती मात्र 80 च्या दशकात होती तशीच घसघशीत, गरगरीत, टमटमीत वगैरे पुष्टतानिदर्शक विशेषणांना सुपात्रच राहिली आहे.. हीच ती चित्कारपात्र खूषखबर!
मध्यंतरीच्या काळात भारतीय पुरुषांची मानसिकता बदलते आहे वगैरे वावडय़ा उठवल्या जात होत्या.. त्यानुसार परदेशांत (तरी कसं काय कोण जाणे!) विशेष पसंतीपात्र होत चाललेलं झीरो फिगरचं फॅडही भारतीयांवर लादण्याचा प्रयत्न झाला. तोही नव्या ‘डॉन’मध्ये ‘ये मेरा दिल’च्या जुन्याच चालीवर हेलनच्या लहानपणीचे कपडे घालून सर्वागझटकक् आणि दिलखेचक (या शब्दाला आणि त्यामागच्या भावनेला पर्याय नाही, हे जाणून पुनरुक्तीदोष पदरात घ्यावा) मनमुक्त नृत्य करणा-या, भरलेल्या कणसासारख्या दिसणा-या करीना कपूरच्या माध्यमातून करण्यात आला. त्या कुठल्याशा सिनेमात तिनं बिकिनी नेसलेली असूनसुद्धा पब्लिक जाम फिरकलं नाही. बिकिनी नेसलेली असली तरी शेवग्याची सुकली शेंग बघायला कोण जाईल? त्या सिनेमाबरोबरच ते फॅडही आपटलं आणि आटोपलं हे बरं झालं!
 
भारतीय प्रेक्षकांच्या (मानसिक वय वर्षे 14 ते 15 वर्षे अर्थात ‘अक्षय-कुमार’!) आवडींचा प्रच्छन्न मसावि 80 च्या दशकात दक्षिणेत निघाला होता.. सावळी, भरदार यष्टी, अपरं नाक, धनुष्याकृती ओठ आणि आवाहक, आमंत्रक, संमोहक, मादक टप्पोरे डोळे, अंगावर कपडय़ांचा तिटकारा, आत्यंतिक काटकसरी स्वभाव.. या सगळ्या सरंजामाला जोड होती संभावित आणि दुटप्पी मूल्यांनी बुजबुजलेल्या रूपेरी पडद्यावरच्या नटय़ांमध्ये फार अभावानंच दिसलेल्या उन्मुक्त लैंगिक अभिव्यक्तीची. हे समजून घेणं फार कठीण वाटत असेल (तसं ते आहेच) तर कमलहासन आणि श्रीदेवीच्या अभिनयासाठी गाजलेला ‘सदमा’ पाहा. किती लोकांनी तो कमल आणि श्री यांच्यासाठी पाहिला असेल, याची रास्त शंका मनात निर्माण होईल ती कमलवर (लकी गाय) शब्दश: झडप घालण्यासाठी टपलेली बुभुक्षित सिल्क स्मिता पाहिल्यावर. तिचं ते भावमुद्रेपासून सर्वागाने-अंगांगाने अद्भुत प्रकारे ‘व्यक्त होणं’ पाहून कानातून धूर नाही निघाला, तर तिकिटाचे पैसे परत.
 
सिल्क स्मिता (हे तिच्या एका भूमिकेमुळे मिळालेलं नाव- वरना मऊ मुलायम तलम ‘सिल्क’चा या दणकट गोणत्याशी नावाचाही संबंध असायचं कारण नव्हतं!) हा विशेषत: हिंदी सिनेमाच्या प्रेक्षकांना बसलेला 440 व्होल्टचा शॉक होता. हिंदीतल्या नायिका (माला सिन्हा, मुमताज, झीनत यांच्यासारखे अप-या नाकाचे सन्माननीय अपवाद वगळता) उघडपणे देहबोलीतून शारीर श्रृंगारभावना व्यक्त करण्यातल्या नव्हत्या. जिकडेतिकडे राज कपूरी चालूगिरी. म्हणजे, नायिकेच्या चेह-यावर निरागस, पवित्र, सोज्वळ भाव.. आता ती पांढरी पारदर्शक साडी घालून धबधब्याखाली नाहात असल्यामुळे तुमचं लक्ष चेहरा सोडून वेगळ्याच ठिकाणी जातंय, हा तुमचा दोष! हा खास भारतीय पुरुषी संभावित दुटप्पीपणा झुगारून थेट लैंगिक एक्स्प्रेशन देणारी एकमात्र नटी म्हणजे हेलन. त्यामुळेच ती कायम व्हँप आणि नर्तिकाच राहिली- नायिका बनली नाही. सिल्क स्मिताही ‘बी ग्रेड’ किंवा ‘सी ग्रेड’चे ‘खुली खिडकी’, ‘मचलती जवानी’छाप ‘सॉफ्ट पॉर्न’ सिनेमे सोडले- तर नायिका बनू नाही शकली. इतकी अट्टल ‘मांसाहारी’ नायिका कोणत्याही नायकाला परवडली नसती. तिनं हिरोला सर्वार्थाने कच्चा खाऊन टाकला असता आणि ते पाहताना प्रेक्षागृहातल्या समस्त पुरुषवर्गाचं मनोमन पाणीपाणी झालं असतं.
 
हे सगळं फक्त लैंगिक नाही. त्यापलीकडे जाणारं आहे. भारतीय समाजाची रचना (मातृसत्ताक केरळ आणि ईशान्य भारताचा अपवाद वगळता) स्त्रीच्या भुकांची दखल घेत नाही. जिथे ‘बचाखुचा खानाही गृहिणी का धर्म है’ अशी शिकवण असते; पुरोगामी घरांतही मुलाला इंग्रजी माध्यमाची शाळा आणि मुलींना मातृभाषेची शाळा असा न्याय असतो; मुलाचा पुरुष बनतो, तेव्हा त्याला ताठ मानेनं, छाती काढून चालायला शिकवलं जातं आणि मुलीची युवती बनते तेव्हा तिला खांदे पाडून पोक काढून चालावं लागतं; ऑफिसमध्ये काम करून आल्यावर सोफ्यावर पसरून (ऑफिसमध्ये काम करूनच आलेल्या) बायकोच्या हातचे चहापोहे चापणे हा जिथे ‘अधिकार’ असतो, तिथे बायकांना श्रृंगाराची काही भावना असते, वासना असते, इच्छा असते, अपेक्षा, भूक असते, याची दखल कोण घेणार? गंमत म्हणजे अशी इच्छा, अपेक्षा, वासना, भूक असणारी आणि ती थेटपणे अभिव्यक्त करणारी स्त्री ही समस्त भारतीय पुरुषवर्गाची ‘फँटसी’ असतेच असते- रिअ‍ॅलिटी (पक्षी : पत्नी) असू शकत नाही. जिथे लग्नानंतर स्लीवलेस सोडा- अंगभर जीन्स- टी शर्ट पेहरणंही ‘फारच बाई फॉरवर्ड’ वाटतं तिथे सिल्क स्मिता टाइप ‘फास्ट फॉरवर्ड’ कोणाला झेपायची?
 ‘ऊ ला ला ऊ ला ला’मधल्या विद्या बालनने ही फास्ट फॉरवर्ड सिल्क तिच्या स्वत:च्या पद्धतीनं उभी केलीये.. तिची भुकेली नजर परफेक्ट पकडलीये.. त्यावेळी सिल्क स्मिताच्या गळाला लागलेले सगळे म्हावरे हिच्याही गळाला लागणारच होते.. पागल होणारच होते.. ‘तू है मेरी फँटसी’ म्हणून चीत्कारणारच होते.. तिचे- विशेषत: कमरेवरचे झटके पाहून ‘आ ऊ ललिता’ असे शक्ती कपूरी चेकाळणारच होते..
त्यात नवं काहीच नव्हतं.. मग नवं काय आहे?
 
‘ऊ ला ला ऊ ला ला’ हे गाणं टीव्हीवर फक्त बाप्ये एंजॉय करत नाहीत, तरुण मुली आणि मध्यमवयापर्यंतच्या बायकाही त्यातली विद्या बालन मनसोक्त न्याहाळतायत.. तिच्या एक्स्प्रेशनमध्ये स्वत:चं एक्स्प्रेशन शोधतायत.. कुठे कुठे ते व्यक्तही होत असेल.. आजवर पुरुषांनाच ‘डर्टी’ बनण्याचा, बोलण्याचा, वागण्याचा जन्मसिद्ध अधिकार होता.. आता तोच अधिकार बुंबाट बायकाही बजावतायत..
 .. काळ खरोखरच बदललाय, बदलतोय..

(चित्र : प्रदीप म्हापसेकर)

(प्रहार, ४ डिसेंबर, २०११)

Monday, November 28, 2011

बकबकपूरचे बडबडराव!

भारत देशाचे कधी नामांतर करण्याची वेळ आलीच, तर नवे नाव ‘बडबडिस्तान’ ठेवावे लागेल..
 
महाराष्ट्राला तर आतापासूनच बकबकराष्ट्र म्हणायला हरकत नाही..
 इथली सगळीच माणसं अहोरात्र (झोपेचा वेळ सोडून- काही लोक झोपेतही बडबडतात, ते सोडा!) इतकी अखंड बोलत असतात की ही एवढी बडबड ऐकतो तरी कोण, असा प्रश्न पडावा? ‘कोणीही नाही’ हे त्या प्रश्नाचं उत्तर आहे. ते स्वाभाविकच आहे. कारण, जो तो बोलण्यातच मग्न असेल, तर ऐकण्याची फुर्सत आहे कुणाला?
शिवाय, ‘ऐकणे’ आणि ‘ऐकून घेणे’ यातल्या अर्थभेदाची सुप्त सीमारेषा इथल्या ढोबळमनस्क समूहमनातून लुप्त झालेली आहे. त्यात मराठी माणूस कुणाचं ऐकून घेत नाही, हा त्याचा ज्वलंत बाणाबिणा असल्यामुळे इथे कुणी कुणाचं ऐकून तर घेत नाहीच, पण नीट ऐकतही नाही.
 
आता जिथे कुणीच नीट ऐकतही नाही, तिथे सगळे सतत भयाभया कुणासाठी बोलत असतात, असा प्रश्न पडतो. त्याचं उत्तर ‘स्वत:साठी’ असं आहे. मात्र, बोलण्याच्या नादात माणसं स्वत:च बोललेलं स्वत: तरी नीट ऐकत असतील का, असा प्रश्न पडतो. त्याचं उत्तर नकारार्थी येतं. कारण, स्वत: बोललेलं माणसं ऐकत असती, तर आपण अत्यंत निर्थक, अनावश्यक बडबड करतो, हे त्यांना कळलं असतं आणि ती गप्प बसली असती. पण, ज्याअर्थी माणसं अजूनही बोलतायत, त्याअर्थी ती स्वत:चंही ऐकत नाहीत, असा कयास बांधायला हरकत नाही.
 
महाराष्ट्र देशी लोकांना बोलण्याची सवय इतकी की जगभरात ज्यांना ‘चित्रपट’ म्हणतात, ते महाराष्ट्रात ‘बोलपट’ म्हणून ओळखले जातात. त्या धर्तीवर, पात्रांच्या तोंडचे संवाद कमी पडतात म्हणून की काय, ती गप्प बसतील तेव्हा त्यांच्या मनातलेही संवाद ऐकवणा-या मालिकांनाही खरं तर ‘बोलिका’ म्हणायला हरकत नाही. (त्यातल्या नटांवर कॅमेरे इतक्यांदा झूम करत असतात, की ते भूमिका साकारत नसून ‘झूमिका’ साकारत असतात! असो.) तीन तास अखंड बडबडीच्या धबधब्यात न्हायला मिळावं म्हणून इथले लोक नाटक पाहायला जातात. स्टेजवर पात्रं एकामागोमाग एक बोलत असतात. ती बोलणं थांबवून विनोदी कवायती करू लागली की प्रेक्षक हसत हसत एकमेकांशी बोलून घेतात. ज्यांच्यापाशी बोलण्यासारखं कुणी नसतं, ते मोबाइलवरून बाहेर कुणाशीतरी बोलू लागतात.
 
बरं बोलणं एकमेकांशी विचारांची आदानप्रदान केल्यासारखं नाही, तर एकमेकांवर सदोदित खेकसल्यासारखं. आपल्या शेजारच्या एका प्रांताच्या भाषेबद्दल आपण विनोदानं म्हणतो की, एका डब्यात खडे ठेवून खडखडवले की जो आवाज होतो, तो आवाज म्हणजे ती भाषा. असे खडे भरलेले पत्र्याचे दोन डबे एकमेकांवर आपटल्यासारखं आपल्या भाषेतलं संभाषण चालतं, त्याचं काय? आपला प्रांत सगळ्या देशात भांडकुदळ म्हणून प्रसिद्ध आहे, तो केवळ आपल्या या अनोख्या संभाषणकौशल्यामुळेच.
 
अखंड बडबडीच्या या सार्वत्रिक लागणीमुळे या प्रांतात वक्तृत्व नामक कलेला अतीव आणि अनावश्यक महत्त्व प्राप्त झालेलं आहे.
 
शिवाय, प्रभावी वक्तृत्व म्हणजे काय, याचीही आपल्याकडची कल्पना ढोबळ आणि बटबटीत. भाषण हे अधिक व्यक्तींशी एकाच वेळी केलेलं संभाषण असायला हवं, तो एकमेकांशी समान पातळीवरचा संवाद असायला हवा. इथे त्या प्रकारचं अनाग्रही, समानशील वक्तृत्व अनाकर्षक ठरतं. अनावश्यक हातवारे न करता, आगखाऊ भाषा न वापरता, उगाच आवाज चढवून, डोळे गरगरा फिरवून न बोलता आपले विचार शांत संथ संयत शैलीत मांडणारे गांधीजी इथल्या वक्तृत्वप्रेमींच्या लेखी फ्लॅट बोलायचे. इतकं सरळ, नीरस बोलून त्यांनी सामान्य जनतेच्या मनात एवढं मोठं कसं स्थान मिळवलं, याचा विचार केला जात नाही. अत्यंत स्फोटक, जळजळीत, ओघवते, ज्वालाग्राही, मर्मभेदक, प्रखर युक्तिवाद करून विरोधी विचारांच्या चिंधडय़ा उडवणाऱ्या अमोघ वक्त्यांना श्रोते हजारोंच्या नव्हे, लाखोंच्या संख्येने मिळाले; अनुयायी मात्र दोन-चारही गोळा करता करता नाकी नऊ आले, त्याचं काय?
 
वक्तृत्वाची आणखी एक लोकप्रिय त-हा म्हणजे आख्यानी वक्तृत्व. बोलणारा थोर विचारवंत महान ज्ञान देतो आहे आणि ऐकणारे भाग्यवंत श्रोते आपल्या कर्णसंपुटात ते विचारतीर्थ भक्तिभावाने साठवून ठेवत आहेत, अशी सत्संगी वृत्ती असल्याखेरीज या भाषणांसमोर टिकाव लागायचा नाही. कारण, मूलभूत विचारापेक्षा पाठांतर, घोटवलेली शब्दकळा, जमवलेली शब्दसंपदा, कमावलेला आवाज, कृत्रिम शब्दफेक आणि त्यातून निर्माण होणारा आघाती नाद, यांच्या गारुडाने मोहित होऊन माना डोलावणा-यांचीच इथे बहुसंख्या. अशा मोहित करणा-या विचारवंतांची भाषणं ऐकताना खरोखरीच विचार करू शकणा-या माणसाच्या डोळ्यांसमोर एकच चित्र उभं राहतं. ते म्हणजे, तो वक्ता साबणाचं पाणी आणि नळी घेऊन उभा आहे. त्या नळीतून हवा फुंकून तो सुंदर सुंदर शब्दांचे आकर्षक बुडबुडे काढतो आहे आणि ते पाहून लहान मुलांसारखे श्रोते टाळ्या पिटत आहेत.
 
ज्याच्यापाशी एवढीही पाठांतरसंपदा आणि शब्दसंपदा नाही, त्यालाही प्रभावी वक्ता बनण्यात काहीही अडचण नाही. त्यानं फक्त लोकांना सतत ‘हशिवलं’ पाहिजे. त्यासाठी कितीही निर्बुद्ध आणि आचरट कोटय़ा केल्या तरी चालतील. अश्लील किंवा द्वयर्थी बोलून महिलावर्गाच्या माना लाजेने खाली जातील, असं काही बोलता आलं तर फारच उत्तम. त्याने पुरुष तर खूष होतातच, पण, चक्क महिलाही ख्यॅ ख्यॅ ख्यॅ ख्यॅ करून हसतात.
 
आता कुणी म्हणेल की, बोलणारे बोलतात, ऐकणारे ऐकतात, आपल्याला त्याचं काय?
 
त्यात आपल्याला प्रॉब्लेम एकच आहे.. तोंडाला येईल ते वाट्टेल त्या भाषेत बकणे, हा इथे नेतृत्वगुण मानला जातो. निव्वळ बोलबच्चनगिरीवर मराठी हृदयांवर कसे राज्य करता येते, याची असंख्य उदाहरणे आधुनिक महाराष्ट्रात सापडतात.
 वक्तृत्व हा नेतृत्वगुणांमधला एक महत्वाचा गुण आहेच, त्यात वाद नाही. जगातले अनेक मोठे नेते हे मोठे वक्ते होते, असं इतिहास सांगतो. ते स्वाभाविकच आहे. चार लोकांना नेत्याचे विचार समजल्याखेरीज ते अनुयायी कसे बनणार आणि आपले विचार प्रभावीपणे व्यक्त करण्यासाठी प्रभावी वाणी असलीच पाहिजे.
अगदी बरोबर आहे हे!
 भानगड फक्त एकच आहे.. वक्त्याकडे विचार असेल, समाजाला दिशा देण्याची, यंत्रणा चालवण्याची, कारभार हाकण्याची कुवत असेल, तरच तो नेता होऊ शकतो ना! हे सगळे गुण असलेल्या माणसाकडे प्रभावी वक्तृत्व नसलं, तरी काय बिघडतं? आपल्याकडे प्रभावी वक्तृत्वाच्या भांडवलावर विचाराच्या नावाखाली नुसता विखार पेरणारे नेते होऊन बसले आहेत, त्यांचं काय?

(चित्र : प्रदीप म्हापसेकर) 


(२७ डिसेंबर, २०११)

Sunday, November 20, 2011

इये आश्वासनांचिये नगरी!

‘आश्वासन नगरीत आपलं हार्दिक स्वागत’
 
समोरचा भव्य फलक पाहूनही भिकाजीराव मतदातेंचा स्वत:च्या डोळ्यांवर विश्वास बसेना.
 
गेल्या काही दिवसांचे पेपर पाहिल्यानंतर ‘निवडणुका जवळ आल्या’ हे त्यांना आपोआपच कळलं होतं. माणसांना राहायला जागा नसताना कुणी कुत्र्यांसाठी उद्यान बांधून देण्याचं आश्वासन देत होतं, कुणी प्रत्येक झोपडीला नळ कनेक्शनचं, कुणी देवळांसमोरच्या मोकाट गोमातांना संरक्षण देण्याचं. निवडून आल्यापासून ज्यांचं दर्शन दुर्लभ झालं होतं, ते लोकप्रतिनिधी आता नाक्यानाक्यावर हात जोडून उभे होते. ज्या रस्त्यांचे खड्डे चुकवण्यात पाच वर्ष उलटली, ते रस्ते एकेका रात्रीत गुळगुळीत, चकचकीत होत होते. रस्त्यांवरचे दिवे प्रखर झाले होते. एकदा तर रात्री उशिरा आल्यावर आपण गल्ली चुकलो की काय असं वाटून भिकाजीराव पुढच्या गल्लीकडे निघाले होते.
 
अशात आज रविवारच्या सकाळी पेपर वाचता वाचता खुर्चीतच लागलेली डुलकी ‘‘भिकाजीराव, चला, लवकर तयार व्हा. जायचंय ना आपल्याला,’’ या अण्णा बोबडेंच्या उद्गारांनी मोडली. आधी भिकाजीरावांना दर रविवारप्रमाणे आजही फुकटचा पेपर वाचण्यासाठीच ते झोपमोड करतायत असं वाटलं होतं. पण, अण्णांनी ‘कुठे, कशाला’ या त्यांच्या प्रश्नांना उत्तरं देण्यात वेळ वाया न दवडता झटपट कपडे घालून तयार व्हायला लावलं. चाळीच्या बाहेर एसी मोटारींची रांगच उभी होती. एक दार उघडून नगरसेवक उभा होता, दुसरं दार उघडून दुस-या पक्षाचा इच्छुक उमेदवार उभा होता आणि शोफरच्या वेषात तिसऱ्या पक्षाचा इच्छुक उमेदवार.
 
‘‘अरे बापरे, या सगळ्यांची एकी झाली म्हणजे मेलोच आपण,’’ भिकाजीरावांनी माफक विनोद केला, एरवी एखाद्या कार्यकर्त्यांनं कानफटलंच असतं त्यांना. पण, आज तिघेही उमेदवार समोर   पु. ल. देशपांडेच ज्योक मारतायत, अशा थाटात खो खो हसले. भिकाजीराव आणि अण्णा मोटारीत बसले. सुळ्ळकन मोटार निघाली. दहाव्या मिनिटाला ती या फलकासमोर उभी होती.
 
‘आश्वासन नगरीत आपलं हार्दिक स्वागत’
 
खाली उरलेल्या चार पक्षांचे इच्छुक उमेदवार पाणी, सरबत, स्नॅक्स घेऊन उभे होते. एकजण गाइड म्हणून सोबत निघाला. भव्य प्रवेशद्वारातून आत शिरताना त्यानं माहिती सांगायला सुरुवात केली, ‘‘भिकाजीरावसाहेब, नमस्कार. आश्वासन नगरीत तुमचं स्वागत. ही नगरी म्हणजे निवडणूक प्रचारातलं पुढचं पाऊल आहे. आतापर्यंत आम्ही- म्हणजे सगळ्या पक्षांचे किंवा अपक्ष उमेदवार काय करायचो, तर तुमच्याकडे जाहीरनामे पाठवायचो. दुपारी रिक्षांमधून कोकलून तुमची झोपमोड करायचो. टीव्हीवरून चर्चा करताना दिसायचो. पेपरांमध्ये जागा किंवा रिपोर्टर विकत घेऊन बातम्या पेरायचो. उद्देश काय, तर आम्हाला निवडून दिल्यास आम्ही तुमच्यासाठी काय करू, याची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवायची. तुम्हाला भविष्याची आश्वासनं द्यायची. ही सगळी डोकेफोड टाळून तुम्हाला भविष्याचं थ्री डायमेन्शनल चित्र दाखवणारी ही नगरी आहे.. सगळ्या पक्षांनी मिळून तयार केलेली. इथं प्रत्येक पक्षाचा स्टॉल आहे. बिल्डर कसा बिल्डिंग पूर्ण व्हायच्या आधी बुकिंग घेताना सँपल फ्लॅट दाखवतो. तशी ही सँपल आश्वासनं. तुम्ही प्रत्येक स्टॉलवर जायचं, सगळे स्टॉल बघायचे. सगळी आश्वासनं समजून घ्यायची. ज्याची आश्वासनं सर्वात आकर्षक वाटतील, त्याला निवडणुकीच्या वेळी मतदान करायचं.’’
 
बोलता बोलता पहिला स्टॉल आलाच. संपूर्ण भगव्या रंगानं नटवलेल्या स्टॉलचं प्रवेशद्वार एखाद्या किल्ल्याच्या प्रवेशद्वारासारखं बनवण्यात आलं होतं. दारातच दाराच्या उंचीची धनुष्यबाणाची प्रतिकृती होती. ‘‘याऐवजी इथं मोठा कॅमेरा बनवून ठेवला असता तर बरं झालं असतं’’ प्रतिस्पर्धी उमेदवार फिस्सकरून हसत म्हणाला, तेव्हा बिचारा या पक्षाचा उमेदवारही कसनुसं हसला. करतो काय? सोबत साक्षात मतदारराजा. सुवासिनींनी ओवाळून भगवा टिळा लावल्यानंतर भिकाजीराव स्टॉलमध्ये प्रवेश करते झाले. दिवाळीतला शिवाजीचा किल्ला भव्य मैदानात मांडलेला असावा, तशी सगळ्या वॉर्डाची प्रतिकृती. हा आपलाच परिसर असं भिकाजीरावांना वाटूच नये, इतकी चकाचक. मोठमोठाल्या हवेशीर इमारती. ऐसपैस प्रकाशमान घरं. अतिक्रमणमुक्त फुटपाथ. फेरीवालेमुक्त रस्ते. होर्डिगमुक्त चौक. चरसीमुक्त उद्यानं.
झोपडय़ामुक्त मोकळी मैदानं.
 
प्रतिकृतीतला खेळण्यातला वाहतूक पोलिस गल्लीत लपून पावती फाडण्याऐवजी चौकात उभा राहून वाहतुकीचं नियंत्रण करताना दिसत होता. सरकारी कार्यालय म्हणून उभारलेल्या इमारतीतल्या सर्व टेबलांवर मान मोडून काम करणारी माणसं होती. बाहेर माहितीफलक होता आणि कर्मचारी अदबीनं बोलत होते. रस्त्यावरून पक्ष कार्यालयं, साई मंदिरं आणि उत्सवाचे मंडप गायब झालेले होते.
 
हे सगळं कल्पनाचित्र पाहून डोळ्यांतून पाणीच आलं भिकाजीरावांच्या. आतापर्यंत पालिकेत याच पक्षाची सत्ता होती आणि तरीही आश्वासन नगरीतलं एकही चित्र वॉर्डात प्रत्यक्षात कसं दिसलं नाही, हा साधा कॉमन सेन्सही विसरून त्यांनी भावनेच्या भरात ‘मतदान करायचं तर याच पक्षाला’ असा निर्धार करून टाकला. तेवढय़ात दुसरा स्टॉल आला. इथं सगळं हाय-फाय वातावरण. जिकडे तिकडे ब्लू-प्रिंटची नेत्रसुखद सजावट. भव्य कलात्मक प्रवेशद्वारातून आत शिरल्यावर रेल्वेचं अख्खं इंजीनच ठेवलेलं होतं. ‘‘इथं खरं तर इंजिनाऐवजी डबा ठेवायला पाहिजे होता रेल्वेचा,’’ मघाचा कसनुसं हसावं लागलेला इच्छुक उमेदवार फिस्कारला, ‘‘इंधन मिळालं की कधीही कोणत्याही इंजिनाला जोडला जातो हा पक्ष.’’ आता कसनुसं हसणा-याची पाळी मघाशी फिस्कारणा-याची होती.
 
आत ‘किल्ला’ नव्हता, तर एक थिएटर होतं. तिथं भिकाजीराव बसले आणि त्यांच्या डोळ्यांवर एक चष्मा चढवला गेला. थ्रीडीमध्ये विकासाचा ब्लू प्रिंट सादर होऊ लागला. तेच ते मघाचंच सगळं. स्वच्छ, हवेशीर, प्रकाशमान, हे मुक्त ते आणि ते मुक्त हे, असं सुखसोयींनी सुसज्ज आयुष्य. इकडं आणखी एक अ‍ॅडेड बेनिफिट होता. आम्हाला मत दिलं तर तुमच्या सुखात उत्तरेकडून आलेले भिकारडे वाटेकरी नसतील, असं थेट सांगितलं जात होतं.. भिकाजीरावांना पुन्हा गदगदून आलं आणि आपलं मत यांनाच असा त्यांनी निर्धार केला..
 
..त्या दिवशी असा निर्धार त्यांनी 13 वेळा केला.. तेवढे स्टॉल पाहिले होते ना त्यांनी.. पक्ष वेगळा, चिन्ह वेगळं, स्टॉलची रचना वेगळी, माध्यम वेगळं, भाषा वेगवेगळी, पण, सर्व ठिकाणी थोडय़ाफार फरकानं हेच सुखचित्र उभं केलेलं होतं.. तीच भूल घातलेली होती..
 
..आश्वासन नगरीतल्या सुगंधी, थंडगार हवेतून बाहेर पडून कष्टकरी लेन, कामगार आळीतला कुंद, गरम हवेचा झोत अंगावर आला, तसे शहारून भिकाजीराव भानावर आले.
 
‘‘काय मग? कुणाला मत द्यायचं पक्कं केलंत?’’ अण्णांनी उत्सुकतेनं विचारलं..
 ‘‘जो मला निवडणुकीनंतर नव्हे, निवडणुकीच्या आधी, आज आत्ता ताबडतोब या आश्वासन नगरीमध्येच कायमस्वरूपी घर देईल त्याला!!!’’

(चित्र : प्रदीप म्हापसेकर) 


(प्रहार, २० नोव्हेंबर, २०११)

Friday, November 18, 2011

हम करे सो फॅशन...


`डाकूराणी'...
`फूलनदेवी'...
हेच पुण्याचं अस्सल `फॅशन स्टेटमेंट' नाही का?
म्हणजे कसं की नऊवारी साडय़ा नेसून, नथी वगैरे घालून मोटरसायकलीवर बसलेल्या बायका, असा फोटो पाहिला की `स्थळ डोंबिवली' हे सांगावं लागत नाही. ज्याला नववर्षस्वागतयात्रा वगैरे ठाऊक नसेल, त्याला डोंबिवलीतल्या सगळय़ा बायका रोज पारंपरिक पोषाखात मोटरसायकलीवरून ऑफिसला किंवा भाजी आणायला जातात असं वाटावं, इतकं हे चित्र डोंबिवलीशी जोडलं गेलंय. त्याचप्रकारे अंगात पेहराव कोणताही असला तरी जेमतेम डोळेच उघडे राहतील अशा प्रकारे तोंडाला ओढणी किंवा रूमाल गुंडाळलेल्या कोणत्याही वयोगटांमधल्या दुचाकीस्वार महिला दिसल्या की `स्थळ पुणे' हे वेगळं सांगावं लागत नाही.
 आता धूर, धूळ काय इतर गावांमध्ये नसते. मातीरस्त्याच्या आडगावांमध्ये तर उन्हाच्या ठोंबात धुळीचा खकाणा उडतो. पण, तरीही तोंड झाकून दुचाकीला टाच देऊन `खबरदार जर याल पुढे'च्या थाटात वाहन दौडविणाऱया बायका म्हणजे पुणे, असं समीकरणच झालंय.
 कोणत्याही फॅशन स्टेटमेंटमध्ये ते करणाऱयाच्या स्वभावाचं प्रतिबिंब पडावं लागतं. उदाहरणार्थ लेडी गागाची गाणी ऐकणाऱयाला ती लता मंगेशकरांसारखी शालीन साडीमध्ये दिसली, तर तो काहीही खातपीत नसताना त्याला जीवघेणा ठसका लागेल. तिच्या विचित्र वेशभूषेत तिच्या व्यक्तिमत्त्वाचं प्रतिबिंब पडतं. तसाच पुण्याच्या फूलनदेवी फॅशन स्टेटमेंटमध्ये खास पुण्याचा नागमोडी चालीचा, फुरशाच्या डंखाचा, रोखठोक तिरकस स्वभाव अर्करूपाने उतरला आहे. म्हणजे जगभरात फॅशन म्हणून वेषभूषा, रंगभूषा, आभूषणं, ऍक्सेसरीज यांच्यात सुसंगती दर्शवली जाते
 पुण्यातल्या ललनाही तशी सगळी संगती करून मग तोंडाला फडकं गुंडाळून त्या रंगसंगतीवर बोळा फिरवतात. कारण, उपयुक्तता हा पुण्याच्या प्राधान्यक्रमातला सगळय़ात पहिला मुद्दा. गाडीवरून (दुचाकीला `गाडी' म्हणणारा हा एकमेव प्रांत) फिरताना धूळ तोंडात-नाकात जाऊ नये, ही सर्वात महत्वाची गरज. फॅशनबिशन गाडीवरून पायउतार झाल्यावर.  
फॅशनच्या रूढ कल्पनांच्या विरोधात हे चिरगुटभर बंडच आहे म्हणा ना! कारण, बंड हा या शहराचा स्थायीभाव आहे. हे बंड कशाहीविरोधात असू शकतं. म्हणजे काल आपण जे बंड केलं होतं, त्या बंडाच्या विरोधातही असू शकत. असा हा बंडखोर गोषा योग्य वयातील तरुणींना काही नाजूक प्रसंगांमध्ये ओळखीच्या परिसरांत ओळख लपवायलाही उपयोगी पडतो, म्हणतात... 
 खासकरून त्या स्वत:च्या ऐवजी दुस`ऱया'च्या बाइकच्या पिछाडीवर, त्याच्या गळय़ात हात घालून अंमळ नजदिकीने स्वार झाल्या असतील तेव्हा. त्यामुळेच कधीकधी अशा फडकंनशीन सुंदरीला पाहून (म्हणजे खरंतर पाहताच) एखादा तरुण शीळ घालतो आणि ती फडकं उतरवत `अरे ही मी आहे रे दादा' असं भाऊरायाला सांगते.
या `फॅशनी'चं खास पुणेरी तिरकस पद्धतीनं `डाकूराणी', `फूलनदेवी' असं नामकरण झाल्यामुळे पुण्यातल्या बायका भाले-बरच्या घेऊन घोडय़ांवरून दौडत अंगावर येतात, असं काहीसं कल्पनाचित्र पुण्याबाहेरच्या मंडळींचा मन:पटलावर उमटत असणार. यातला `अंगावर येतात' हा भाग तुम्ही पादचारी किंवा त्यांच्या वाटेत येण्याची जुर्रत करणारा वाहनचालक असाल तर खराच ठरतो; पण, भाले-बरच्या ही अतिशयोक्ती झाली. कारण, फर्गसन कॉलेज रोड, एमजी रोड यांसारख्या `प्रेक्षणीय' म्हणून सुप्रसिद्ध ठिकाणी जेव्हा हे हिजाब उतरतात, तेव्हा या बालांना कलिजे खलास करायला भाले-बरच्यांची गरज काय, असाच नि:शंक करणारा प्रश्न पडतो.
 ही प्रेक्षणीय स्थळं आणि फर्गसन, एसपीसारख्या कॉलेजांचे परिसर, भांडारकर रोड, प्रभात रोडवरचे काही नाके इथपासून सारसबाग, मोदी गणपतीपर्यंत वेगवेगळय़ा स्थळांना भेट दिली की पुणं फॅशनच्या बाबतीत किती अद्ययावत आहे, याची कल्पना येते. या प्रत्येक ठिकाणची तऱहा वेगळी, वयोगट वेगळा आणि फॅशन वेगळी. फर्गसन रस्ता ते कमला नेहरू उद्यान अशी एक काल्पनिक रेघ मारून तिचा मध्यबिंदू काढला आणि त्याच्या पाच किलोमीटर त्रिज्येचा परिसर न्याहाळला, तर मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय आणि उच्चभ्रू तरुणाईची फॅशन दिसते
 सनग्लासेसपासून फुटवेअरपर्यंत सगळय़ा डिझायनर ब्रँड्सची दुकानं (सॉरी सॉरी, शोरूम्स किंवा स्टुडिओज), बुटीक्स याच परिसरात आहेत, हा योगायोग नाही. कोणत्याही काकाबुवा-काकुबाईचा नखशिखान्त मेकओव्हर करून त्याचं तिचं रूपांतर टेण्डी `कॅक्स'मध्ये करू शकणाऱया सलून्स, ब्युटी पार्लर्सचीही या भागात गजबज आहे.  
जगातल्या तरुणांच्या अंगोपांगांवर लेटेस्ट काय आहे, हे इथली प्रचंड आकाराची होर्डिंग्ज दाखवत असतात आणि ते ताबडतोब इथल्या उच्चभ्रू, सुशिक्षित आणि वेल टु डू तरुणाईच्या अंगोपांगांवर झळकू लागतं. या भागांमध्ये फिरलात तर आंतरराष्ट्रीय नकाशावरच्या कोणत्याही महानगरात फिरत असल्याचा भास झाल्याखेरीज राहणार नाही. डेनिम्स-टीज हा इथला राष्ट्रीय पोषाख. वर्षातला बहुतेक काळ संध्याकाळची हवा थंड असल्यामुळे ऊबदार स्वेटर किंवा कोणत्या ना कोणत्या प्रकारचा पुलोव्हर मस्ट... त्यामुळे रणबीर कपूरचा काळ आला तरी इथला राष्ट्रीय हिरो ऋषी कपूरच... त्याच्याकडे असलेल्या स्वेटरांइतक्या साडय़ा जयललिताच्या कपाटातही असणार नाहीत.
या परिसरातल्या फॅशनचं सगळय़ात महत्त्वाचं वैशिष्टय़ म्हणजे इथे बहुतेक वेळा `सांगोपांग' वस्त्रप्रावरणंच पाहायला मिळतात. म्हणजे इथले पोषाख शारीर सौंदर्याची सगळी बलस्थानं अधोरेखित  करतात, पण थेट शरीराचं अपघातप्रवण दर्शन घडवत नाहीत. बुडत्याचा पाय खोलात नेणारे खोल गळे किंवा पाय झाकण्यापेक्षा उघडे टाकण्याकडेच कल असलेले स्कर्ट किंवा अंतर्वस्त्रदर्शक बहिर्वस्त्रं अशा चित्तविचलक फॅशनी पाहायच्याच असतील तर कॅम्पात वाट वाकडी करायला हवी. हा परिसर पहिल्यापासून कॉस्मो, हायब्रो आणि ब्रिटिश. पारशांचं आणि अँग्लो इंडियनांचं इथे प्राबल्य. सगळी लष्करी छावणी. शेजारीच पुण्याची मलबार हिल असलेला कोरेगाव पार्कचा परिसर. त्यामुळे, सगळा परिसर लंडनच्या एखाद्या उपनगरासारखा शांत-निवांत आणि झगेबहुल. चिरूट, पाइप वगैरे इंग्रजी सिनेमांमध्येच दिसणाऱया चिजांबरोबरच इंग्रजी सिनेमांतच दिसणाऱया अन्य `चिजा'ही याच भागात पाहायला मिळायच्या.
त्यात ओशोंच्या कम्यूनमुळे पुणेकरांच्या डोळय़ांबरोबरच भावविश्वही विस्फारलं. वेशीअल्याडच्या पुण्यात जेव्हा घेरेदार गोटय़ावर चप्प बसवलेल्या काळय़ा टोपीतून डोकावणारी शेंडी, कोट, दुटांगी धोतर ही पुरुषांची एकमेव `फ्याशन' होती, त्या काळापासून सायकलीवर टांग मारून अधूनमधून या भागात चोरून येण्याची फॅशन आहे. ऑम्लेट किंवा खिमा भरलेला सामोसा ही चोरून खाण्याची आणि चहा ही चोरून पिण्याची वस्तू असल्याच्या काळापासून अशा चोरटय़ा गोष्टी करणाऱया पुणेकरांचा या भागात राबता... कारण इथे गौरांग ही एरवी चोरून पाहण्याची गोष्टही आकर्षक आणि जेवढय़ास तेवढय़ा वेष्टनात मन:पूत पाहता यायची, ती याच भागात.  
आता गौरांगाचं सावळांग, काळांग झालं असलं तरी दर्शनमात्रे मन:कामनापूर्ती करून घेण्यासाठी कॅम्पाला पर्याय नाही.
हाय एन्ड फॅशनची हौस आणि सदैव लो एन्डच्या धोकारेषेच्या नजीकच असलेलं पैशाचं पाकीट अशी परिस्थिती असलेल्या (म्हणजे 99 टक्के) तरुणांना आणखी एका गोष्टीसाठी कॅम्पात जाण्यावाचून पर्याय नाही... ती म्हणजे फॅशन स्ट्रीट. सगळय़ा डिझायनर ब्रँड्सच्या वस्त्रप्रावरणांच्या उत्तम दर्जाच्या नकला परवडेबल किंमतीत मिळण्याचं हे ठिकाण म्हणजे मुंबईच्या मूळ फॅशन स्ट्रीटप्रमाणेच एक रस्ता आणि त्याकडेचे स्टॉल.  
अर्थात इथले कपडे आणि इतर वस्तू मूळ फॅशन स्ट्रीटच्या पुरवठादारांकडूनच येत असल्यामुळे ते किंमतीत मुंबई-पुणे प्रवासखर्च आणि वाटेतला चिरीमिरीखर्चही त्यांच्या किंमतीत ऍड करतात. इथे कोणत्याही वस्तूची दुकानदार सुरुवातीला जी किंमत सांगतो ती ऐकल्यावर प्रत्येक शर्ट एसी बसचं स्वतंत्र तिकीट काढून पुण्याला आलाय, असं वाटतं. तब्येतीत बार्गेनिंग केल्यानंतर मात्र हा प्रवासखर्च मालमोटारीच्या संयुक्त भाडय़ाइतका कमी होऊन जातो.  
इथला प्रत्येक दुकानदार हा फॅशनतज्ञ असल्याच्या थाटात असल्यामुळे जगातलं बेस्टात बेस्ट आणि मोस्ट ट्रेण्डी काय ते इथेच मिळतंय, अशी गिऱहाईकाची भावना होत जाते. अर्थात, गंजीफ्रॉक आणि पट्टेरी हाफ चड्डी या वेषात देखील गुचीचे कपडे परिधान करून रॅम्पवॉक करत असल्याच्या थाटात चालणाऱयांचं हे गाव असल्यामुळे ही भावना झाली नाही तरी फारसा फरक पडत नाही.
गंजीफ्रॉक आणि पट्टेरी चड्डीच्या जागी पांढरं शर्ट, पांढरी पँट, पांढरे बूट, पांढरा पट्टा, पांढऱया काडय़ांचा गॉगल अशा वेषात रॅम्पवॉक करणारी `इथून तिथून अजून मिथुन' मंडळी `खडकी दापोडी' परिसरात अजून दिसतात म्हणे.  
मिथुन चक्रवर्ती हा इथला राष्ट्रीय हिरो. त्याची जागा त्याच्यासारख्याच दिसणाऱया भोजपुरी नटांनी घेतली असेल कदाचित; पण, इथली फॅशन अरुण टॉकिजला लागणाऱया सिनेमाच्या पोस्टरवरून स्फुरते, अशी वदंता आहे. हे कपडे कुठे मिळतात, ते मात्र गुपित आहे. पिंपरीच्या सिंधी दुकानदारांकडून कापड घेऊन ते परिसरातल्या खास टेलरांकडून शिवून घेतलं जात असावं, अशी दाट शंका येते. `बॉम्बे' या नावाचं या परिसराला फार आकर्षण. त्यामुळे केस कापून घ्यायचे ते बॉम्बे हेअर कटिंग सलूनमध्ये, कपडे शिवायचे ते `बॉम्बे टेलर'कडे. फॅशनला म्हणायचं बॉम्बे फॅशन.
पुण्यात जेवढे चिरतरुण दिसतात, त्याहून अधिक चिरप्रौढ दिसतात... इयत्ता चौथीपासूनच यांच्या चेहऱयावर चिंता करितो विश्वाची असा रामदासी आविर्भाव आणि फडताळात नाक चेमटलं गेल्यासारखे त्रासिक भाव. ते सातवीत असताना गल्लीच्या नाक्यावर उभे राहून देशातील भ्रष्टाचार हटवण्यासाठी काय करायला हवं, याबद्दल पंतप्रधानांना सल्ला देऊ शकतात आणि दहावीत गेल्यावर `डिअर मिस्टर प्रेसिडेन्ट ऑफ युनायटेड स्टेट्स'ला सबप्राइम घोटाळा कसा टाळता आला असता, याबद्दल (स्थळ तेच) मार्गदर्शन करू शकतात
 यांचं सगळंच वयावेगळं, जगावेगळं असल्यामुळे त्यांची फॅशनही वेगळी... म्हणजे फॅशनेबल नसलेली. सध्या चलनात काय नाही, ते यांच्या अंगावर दिसणार. टाइट्सचा जमाना आला की हे ढगळ कपडे घालणार. प्लीट्सच्या ट्राऊझर बाद झाल्या की हे चार प्लीट्स आणि क्रॉस पॉकेट्सची फॅशन करणार. कोपरापर्यंत बाह्या दुमडलेला आणि दीड माणसाच्या आकाराचा शर्ट, हा यांचा राष्ट्रीय पोषाख.
(पुण्यात प्रत्येक माणूस हे स्वतंत्र, सार्वभौम राष्ट्र आहे, याची कृपया नोंद घ्यावी.) ही मंडळी लक्ष्मी रोडवर भारत वुलन किंवा तत्सम दुकानात मळखाऊ कापड घेणार आणि शगुनच्या चौकातून चार पिढय़ांच्या टेलरच्या चौथ्या पिढीकडून ते शिवून घेणार.
या चिरप्रौढ पुणेकरांच्या वैचारिक गूढगहन विश्वात कोणत्याही सर्जनशील कलेच्या आविष्काराची किंवा आस्वादाची किंचितशी शंका मिसळली की डायरेक्ट कलावंत किंवा विचारवंतच तयार होतात. त्यांच्यासाठी झब्बे मस्ट. ते फॅब इंडियाचे असणार की खादी ग्रामोद्योग भांडाराचे हे कलावंताच्या कलाबाह्य आणि रूक्ष अशा उदरनिर्वाह साधनाच्या बळकटीवर अवलंबून असतं. सवाई गंधर्व महोत्सव हा मंचावर शास्त्राe संगीताचा आणि समोर अशा स्वघोषित अभिजात कलारसिकांच्या अभिजात, चिरंजीव फॅशनींचा एकसमयावच्छेदेकरून सुरू असणारा महोत्सव. इथे तरतऱहेच्या शालींचंही उपप्रदर्शन मांडलेलं असतं.
पुण्यातल्या तरुणीची- धुळीव्यतिरिक्त अन्य कोणत्याही कारणानं तोंडाला फडकं बांधायची गरज उरलेली- प्रौढा किंवा पुरंध्री झाली की तिची पावलं फॅशन स्ट्रीटऐवजी तुळशीबाग आणि हाँगकाँग लेनकडे वळतात. अजून आपलं हे वय झालेलं नाही ही त्या वयातल्या स्त्राeची स्वत:ची भावना करून देणारी सगळी प्रावरणं आणि प्रसाधनं इथे मिळतात. अघळपघळ पंजाबी ड्रेस आणि मॅक्सी नावाचा, हॉस्पिटलातल्या पेशंटवरही भयाण दिसणारा गाऊन एवढीच फॅशन ज्यांच्या आयुष्यात उरलेली आहे अशा काकवांनाही `ताई, तुमचं ताई म्हणण्याएवढं वय झालेलं नाही,' असं पटवून देणारे चतुर दुकानदार इथे काकांच्या क्रॉस पॉकेट खिशांना चांगलीच चाट लावतात.
तुळशीबागेची आणखी वेगळीच तऱहा. ज्या मुंबईतून इथल्या बहुतेक चिजा येतात, तिथल्या मराठी बायका त्याच चिजा इथून जास्त भावाला घेऊन जातात आणि `तुळशीबागेतून आणली' म्हणून अभिमानानं मिरवतात. ही त्यांची पुणेप्रेरित फॅशन.
पुण्यात आता पुणे फॅशन वीकसुद्धा होऊ लागलाय. भारताच्या फॅशन-नकाशावरचं एक महत्वाचं ठिकाण म्हणून ओळखलं जातंय. पण, गुची-अरमानीखाली काहीही तोंडी लावायला तयार नसणारांपासून `आमचे प्रेरणास्थान भंपकराव भुस्कुटे' हे तोंडाने सांगताच बेंगरूळ पोस्टरांवरून कडक कांजीच्या पांढऱयाशुभ्र खादी पोषाखांतून जाहीर करणाऱया गल्लोगल्लीच्या बजरंग बगळय़ांपर्यंत कोणालाही विचारा, `तुही फ्याशन कंची?'
तो किंवा ती ताडकन उत्तरेल, ``ही फॅशनबिशनची छचोर थेरं आम्ही करत नाही. आय डोन्ट लुक फॉर इन्स्पिरेशन एनीव्हेअर. आय ओन्ली वेअर व्हॉट सुट्स माय पर्सोना. जे हाताला लागेल ते मी घालून बाहेर पडतो/ते.'' या सगळय़ा वाक्यांच्यामध्ये `मला काय काहीही छानच दिसतं,' असं एक वाक्य दडलेलं तरी असतं किंवा निर्ढावलेला पुणेकर ते उच्चारतोसुद्धा.
असला नार्सिससला इन्फिरिऑरिटी कॉम्प्लेक्स देणारा बेडर आत्मस्तुतीपर स्पष्टवक्तेपणा हीच तर या शहराची ओळख बनलेली सगळय़ात मोठी चिरकालिक फॅशन आहे.

(पुण्यभूषण दिवाळी अंक, २०११)