‘सुब्बी, सुब्बी, कटवई तिरक्कवुम, कटवई तिरक्कवुम!’
सकाळी सकाळी दार जोरजोराने ठोठावल्याचा आवाज आणि पाठोपाठ या चिंतित स्वरांत मारल्या गेलेल्या हाका यांनी टेंपल सुबीराजाची तंद्री भंग पावली. त्याचं लक्ष पूजेतून उडालं. दार उघड, दार उघड, म्हणून कोणाचा एवढा जीव चाललाय, या विचाराने कावूनच त्याने अंगवस्त्रम खांद्यावर टाकलं आणि ‘वारूम, वारूम’ म्हणजे आलो आलो, असं जोराने हाळी देऊन सांगत तो दारापाशी पोहोचला. अडसर काढून त्याने दार उघडलं, तेव्हा सकाळी सहाच्या हलक्या थंडीतही नखशिखान्त घामाने डबडबलेला आणि भूत पाहिल्यासारखे डोळे विस्फारलेला पुसारी इसक्कियन त्याच्यासमोर होता. त्याच्या गावच्या म्हणजे पल्लवुरच्या अरुलमुगू नारम्पू नादस्वामी मंदिराचा हा पुसारी म्हणजे पुजारी. सुब्बीला पाहताच त्याच्या डोळ्यांतून पाण्याच्या धारा वाहू लागल्या...
‘एन्ना नटन्तेटू? काय झालं?’ सुब्बीने काळजीने आणि घाबरलेल्या स्वरात विचारलं.
‘तिरुट्टू... चोरी झाली सुबी चोरी... आनंद नटराजा तिरुत्तपट्ट! आपला देव चोरीला गेला. हैवानांनी डाव साधला...’
फतकल मारून पुसारी इसक्कियन धाय मोकलून रडू लागला आणि टेंपल सुबीही मटकन् खाली बसला...
****************
“आज पहाटे पाच वाजून तीन मिनिटांनी नटराजकृपेने आम्हाला पुत्रप्राप्ती झाली. बाळ-बाळंतीण सुखरूप आहेत. डिलिव्हरी नॉर्मल आहे. तब्येत अशीच राहिली तर पुढच्या आठवड्यात मुंबईला जाऊ...”
इंग्लिश आणि तामीळमध्ये हा संदेश व्हॉट्सअॅपवरून जगभरात अनेक ठिकाणी फिरला आणि ज्यांना मिळाला त्यांच्यातल्या बहुतेकांनी “काँग्रॅच्युलेशन्स, टेक केअर,” असे अभिनंदनपर मेसेज पाठवले. न्यूयॉर्कहून आलेला एक मेसेज मात्र अभिनंदनाच्या पुढे ‘अ चाइल्ड इज अ फादर ऑफ अ मॅन अर्थात मुलगा हा बापाचा बाप असतो,’ असं सांगणारा होता. आयएचपी अर्थात इंडियन हेरिटेज प्रोजेक्टचा व्हॉलंटियर हितेश याने लावलेल्या ट्रॅकरला हा मेसेज बरोबर अडकला. भारतातून पुराणवस्तू आणि प्राचीन मूर्तींची जी तस्करी चालते, तिला आळा घालण्यासाठी काही उत्साही कलावस्तूतज्ज्ञांनी एकत्र येऊन सुरू केलेला हा गट होता. त्यात वेगवेगळ्या क्षेत्रांमधले काही व्हॉलंटियरही होते. हितेश सोनवाला हा त्यांच्यातलाच एक हॅकर व्हॉलंटियर. चेन्नई-मुंबई-न्यूयॉर्क ही या तस्करीची एक सुस्पष्ट साखळी होती एकेकाळची. त्यातल्या काही संशयितांच्या नंबरांवर त्याची देखरेख असायची. हा मेसेज सापडल्यावर त्याने विक्रांत श्रीनिवासनला अलर्ट केलं. त्याचं उत्तर आलं, ‘सीम्स फिशी. इफ इट इज मुंबई वुई मस्ट अलर्ट बीके.’
***************
‘तुझी चिमणी उडाली फुर्र, माझा पोपट पिसाटलाSSS’ या शालीन भक्तिगीतावर गणपतीभोवतीच्या रोषणाईचे लायटिंगचे खेळ पाहण्यात बन्या भलताच गुंगून गेला होता. बिकामामा मात्र भयंकर अस्वस्थ होता. कुठून बन्याला गणपती पाहायला घेऊन आलो, असं त्याला झालं होतं. ती गर्दी, ती गाणी... त्यातल्या त्यात भाजलेलं कणीस फर्मास होतं, हा एक दिलासा होता.
‘बन्या, आपल्याला जरा शांत जागी जायला हवं. मला तामीळनाडूतून फोन येतोय एका मित्राचा. अर्जंट दिसतोय. या गर्दीत तुला सोडून जाताही येणार नाही. प्लीज चल. मी तुला हवं तर दुसरं गाणं पाहायला परत घेऊन येतो लायटिंग आवडलं असलं तर,’ बिकामामाची आज्ञा बन्याला शिरसावंद्य होतीच.
दोघे गर्दीतून वाट काढत एका शांत बोळकांडात शिरले. थोडा पुढे गेल्यावर पलीकडच्या मोठ्या रस्त्यावरच्या मंडळाच्या गणपतीसमोर लागलेल्या ‘पोरी जरा जपून दांडा धर’ या भक्तिगीताचे स्वर कानावर पडायला लागले. बिकामामाने दोन इमारतींच्या मधल्या बेचक्यात शिरून कॉल रिव्हर्ट केला.
‘येस विजय, टेल मी. ओह... आर यू शुअर?... बट देन, ही इज बिहाइंड दि बार्स... हाऊ... आयम सॉरी... दॅट इज समथिंग आय अॅम सपोझ्ड टु फाइंड आउट. ओके. शुअर. चाओ,’ फोन संपला.
या एका फोनवरच्या बोलण्यामध्ये मामाची पर्सनॅलिटी कशी बदलत गेली, ते पाहून बन्या थक्कच झाला होता. मघाशी गणपती पाहायला आलेला मामा हा पंचविशीतला टिपिकल चष्मिस गीक होता- ‘हिंजेवाडीत काम करतो का रे हा?’ असं मिनी मस्करेन्हासने त्याला विचारलंही होतं. ‘इट्स नॉट हिंजेवाडी, इट इज हिंजवडी,’ असं त्याने तिला नेहमीप्रमाणे बजावलं होतं, ‘आणि तो मुंबईत असतो, इथे नसतो. शिवाय तो नुसता सॉफ्टवेअर इंजीनियर नाहीये, डिटेक्टिव्हही आहे... बेनेडिक्ट कंबरबॅचचा शेरलॉक सांगतो ना, तसा कन्सल्टिंग डिटेक्टिव्ह. मुंबईचे पोलिस कन्सल्ट करतात त्याला,’ असं सांगून बन्याने कॉलर टाइट करून घेतली होती- हा फोन आला आणि मामाच्या थकलेल्या, निस्तेज डोळ्यांमध्ये चमक आली, त्याच्या हालचालींमध्ये खटका आला, त्याचा मेंदू नव्वदच्या स्पीडवरून डायरेक्ट १८०च्या स्पीडने धावायला लागलाय, हे त्याच्या चेहऱ्यावरून दिसू लागलं आणि बन्याला लक्षात आलं की मामा पुढे काय म्हणणार, तसा तो बन्याला म्हणालाच, ‘बन्या, इथून पुढचे गणपती मुंबईत पाहायचे. चालेल?’
‘बिकामामा, चालेल काय, धावेल!’ असं म्हणून तुडतुड्या बन्या ढेंगा टाकत बाईक ठेवलेल्या गल्लीकडे धावायलाही लागला. ‘ओ फास्टर बेणारे, जरा हळू...’
पण, हे ऐकायला थांबेल तो बन्या कसला. तो बाइकपाशी जाऊन पोहोचलाही. किक मारणाऱ्या मामाला त्याने विचारलं, ‘केस आलीये ना?’
‘हं... सीम्स सो... द मिस्टरी ऑफ आनंद नटराजा...’
‘म्हणजे?’
‘म्हणजे म्हणजे, वाघाचे पंजे, उंटाची मान, कुत्र्याचे कान...’
मामाभाच्याची जोडी बाइकवरून सुसाट फुरसुंगीच्या दिशेने निघाली.
******
बनेश बेणारे आणि बिपीन कारखानीस ही एक अजब जोडगोळी आहे मामा-भाच्यांची. त्यांच्या नावांवरून तुम्हाला काही आठवलं का? करेक्ट. बनेश हे भा. रा. भागवतांच्या फास्टर फेणेचं नाव. तो फुरसुंगीचा, तसा हा बन्याही योगायोगाने फुरसुंगीचाच. न्यू फुरसुंगीमध्ये सॉलिटेअर ड्रीम्समध्ये राहतो आणि जवळच्याच सेंट अँड्र्यूजमध्ये सहावीत शिकतो. तोही फास्टर फेणेसारखाच तुडतुड्या आणि केसांची अस्ताव्यस्त झुलपं बाळगणारा. बिपीन कारखानीस हा त्याचा मामा. बन्याचं बनेश हे नाव त्यानेच ठेवलंय. तेही फास्टर फेणेवरूनच. त्याचं स्वत:चं बिपीन हे नाव त्याच्या वडिलांनी भा. रा. भागवतांच्याच बिपीन बुकलवार या हिरोवरून ठेवलेलं आहे. हा बुकलवार म्हणजे बुकलव्हर... सॉलिड पुस्तकं वाचायचा आणि त्या माहितीच्या आधारावर रहस्यं सोडवायचा. विजू आणि मोना हे त्याचे बालमित्र त्याच्या साहसांमध्ये त्याला साथ करायचे. पंचविशीचा बिपीन कारखानीस ऊर्फ बन्याचा बिकामामाही जबरदस्त हुशार आहे, पट्टीचा वाचक. व्यवसायाने सॉफ्टवेअर इंजीनियर. नोकरीनिमित्ताने मुंबईत, गिरगावात राहतो. टिपिकल सॉफ्टवेअरवाला दिसतो. तसंच झोपेतून उठल्यासारखं गबाळं ध्यान, हरवलेली नजर, पाठीवर सॅक, जीन्सवर टी शर्ट, डोळ्यांवर चष्मा आणि भाच्यासारखेच सतत विस्कटलेले केस. त्याची विश्लेषणशक्ती अफाट आहे, म्हणून मुंबईचे पोलिसही त्याची अधूनमधून मदत घेतात अवघड केसेस सोडवायला. सीनियर इन्स्पेक्टर प्रधान ऊर्फ प्रधानकाकांमुळे त्याला पोलीस दलाचे दरवाजे खुले झालेले आहेत...
...टुंक टुंक... टुंक टुंक... मोबाइलवर इनकमिंग कॉलची रिंग वाजत होती... प्रधानकाकांचं नाव झळकलं. बिकामामा हसला आणि फोन घेऊन म्हणाला, ‘जय आनंद नटराजा...’
बिका नेहमीच आपल्या दोन पावलं पुढे असतो, हे माहिती असूनही प्रधानकाका चाट पडले आणि हसून म्हणाले, ‘जय आनंद नटराजा... मी तुला काहीतरी सांगायला फोन केला होता, आता तू बोल, मी ऐकतो.’
बिका म्हणाला, ‘तुम्हाला तामीळनाडूच्या सीआयडी पोलिसांचा फोन आला असणार. आयडॉल्स विंगचा. मोस्टली डीसीपी पी. मणिकवेल यांचा. राइट?’
‘राइट. पुढे.’
‘पल्लवूरचा आनंद नटराज चोरीला गेला आहे. सगळी मोडस ऑपरंडी पाहता, हे काम शरद कपूरच्या टोळीचं आहे, हे उघड आहे. पण, शरद कपूर तर चेन्नईच्या तुरुंगात आहे... गेल्या पाच वर्षांपासून. मग हे काम कुणाचं, असा त्यांना प्रश्न पडलाय. मूर्ती चेन्नईत पोहोचली असणार आणि तिथून बिनबोभाट मुंबईपर्यंत येणार हे त्यांच्या लक्षात आलेलं आहे. मात्र, इथे ती कुणाकडे येणार आहे आणि पुढे कुठे जाणार आहे, हे कोडं आहे. राइट?’
‘अगदी बरोबर. आणि ते कोडं उलगडायला तू आम्हाला मदत करावीस, अशी माझी विनंती आहे.’
‘पण, मी ऑलरेडी पुण्याहून मुंबईला निघालेलो आहे. इंडियन हेरिटेज प्रोजेक्टने मला ऑलरेडी कळवलंय. मी त्यांच्यासाठी हे काम हातात घेतलेलं आहेच. मुंबईत ही जबाबदारी तुमच्याकडे येणार, याची मला कल्पना होतीच. मी कारमध्येच आहे.’
‘पुण्याहून येतोयस म्हणजे फास्टर बेणारेही तुझ्याबरोबर असणार... त्याची गणपतीची सुटी चालू असेल ना?’
‘तो ही संधी सोडेल का? तुम्ही ऑफिसात असालच ना?’
‘तू येतोयस म्हटल्यावर मला थांबायलाच हवं. फास्टर बेणारेसाठी हॉट चॉकलेट आणि तुझ्यासाठी डार्क कॉफीची व्यवस्था करतो. बेल्जियन कुकीजचा नवा डबाही फोडू या आज.’
फोन कट होताच बन्याने विचारलं, ‘मामा, मोडस ऑपरंडी म्हणजे?’
‘म्हणजे गुन्हा करण्याची पद्धत. शरद कपूर... शरद कपूर...’ त्याचे डोळे लकाकले, त्याने प्रधानांचा फोन फिरवला, ‘काका, मी येईपर्यंत एक काम झालं तर पाहा ना प्लीज. गेल्या सहा महिन्यांत शरद कपूर जिथे आहे, त्या तुरुंगातून बाहेर पडलेल्या कैद्यांची एक यादी मिळाली तर पाहा ना!’
**************
‘ही तुझी कॉफी, हे तुझं हॉट चॉकलेट आणि दीज आर दि डिलिश्यस बेल्जियन कुकीज... अरे हो, ही तू मागवलेली यादी,’ प्रधानकाकांनी यादी बिकाच्या हातात सोपवली. ते बन्याच्या बिकामामाला ‘बिका’ अशीच हाक मारायचे.
यादीवरून झरझर नजर फिरवून बिका म्हणाला, ओह, जगदीशन आणि दीनदयालन... आपल्या टॅबवर वेगवेगळे सर्च केल्यानंतर तो स्वत:शीच म्हणाला, ‘अं अं अं... जगदीशन. ओके.’ एक सुस्कारा सोडून तो प्रधानकाकांना म्हणाला, ‘मणिकवेलना विचारा, जगदीशनचं सध्या काय चाललंय? तो तुरुंगातून दीक्षा घेऊन आलेला असणार...’
पीएसआय हुसेन जमादारला इशारा केला, तो हलक्या आवाजात ‘येस सर’ म्हणून ती माहिती मिळवायला बाहेर पडला.
प्रधान बिकाकडे वळून म्हणाले, ‘मला या सगळ्या प्रकाराची थोडी कुणकुण आहे, पण तुझ्याकडून नीट समजून घ्यायला आवडेल.’
‘अॅज युज्वल माझ्यासाठी फार त्रासदायक आहे हा सगळा प्रकार,’ बिकामामाच्या चेहऱ्यावर संताप आणि उद्वेग यांचं मिश्रण दिसत होतं, ‘ही एक समाज म्हणून, प्रशासन म्हणून, एकंदरच आपल्या कम्प्लीट अनास्थेची कहाणी आहे. आपल्या लोकांना सोयीच्या इतिहासात रमायला आवडतं. दोन-चार शतकांमधल्या गोष्टी घेऊन वेडपटासारखे भांडत बसतात. मागचं काही माहिती नसतं. जे भांडार लोक सोडून गेले आहेत, ते सांभाळायची अक्कल नसते...’ बिका ट्रान्समध्येच गेला होता, पण, पांढऱ्याशुभ्र केसांचे, गोरेपान उंचेपुरे प्रधानकाका लक्षपूर्वक ऐकत होते, ‘१९९२पासून ते २०१८पर्यंत जवळपास १२५० कलावस्तू चोरीला गेल्या आहेत एकट्या तामीळनाडूमधून. बाकीच्या देशभरातला तर आपल्याला काही पत्ताच नाही. भारतीय कलावस्तू म्हणजे नटराजाची मूर्ती, गणपती, नंदी, वेगवेगळ्या प्रकारचे दिवे या सगळ्या दक्षिण भारतीय कलावस्तू असं समीकरण असल्यामुळे त्यांची तस्करी सगळ्यात जास्त होते. हा सगळा अब्जावधी रुपयांचा खजिना देशातल्या मंदिरांमध्ये विखरून पडलेला आहे. त्यांच्याकडे फारसं कुणाचं लक्ष नाही, त्याची कुणाला किंमत नाही. सगळ्यांना फक्त देव दिसतो, त्याची मूर्ती घडवण्यात आपल्या पूर्वजांनी काय मेहनत घेतली, त्यात तो तो काळ कसा प्रतिबिंबित होतो, याचं काही भानच नाही. त्यामुळे या वस्तू इथून आरामात चोरल्या जातात आणि त्या परदेशातल्या गॅलऱ्यांकडे, वस्तुसंग्रहालयांकडे आणि खासगी संग्राहकांकडे रवाना होतात...’
‘मे आय कम इन सर,’ दारातून हुसेनने विचारलं. सोबत पीएसआय धनश्री शिरगावकर आणि दत्ता परब, हणमंत सावंत ही कॉन्स्टेबल जोडगोळीही होती. सगळ्यांना आत बोलावून प्रधानकाकांनी सांगितलं, ‘ही आपली सध्याची टीम आहे. अँड ऑफ कोर्स आपला यंगेस्ट मेंबर छोटा शिपाई बनेश बेणारेही आहेच टीममध्ये. ही सगळी माहिती यांना असणंही आवश्यक आहे.’
बिकाने सगळ्यांना नजरेनेच अभिवादन केलं आणि अधूनमधून हातातल्या टॅबवर नजर टाकत तो बोलू लागला, ‘पुराणवस्तू, मूर्ती यांच्या तस्करीचा फटका बसायला लागल्यानंतर तामीळनाडूमध्ये एचआर अँड सीई हे खातं सुरू करण्यात आलं. म्हणजे हिंदू रिलीजस अँड चॅरिटेबल एंडोवमेंट डिपार्टमेंट. एकट्या तामीळनाडूमध्ये ३६५००हून जास्त मंदिरं आहेत. त्यांच्यातल्या ११५०० मंदिरांच्या व्यवस्थापनावर या संस्थेचं नियंत्रण आहे. या सगळ्या मंदिरांमधल्या पुरातन वस्तू आणि मूर्ती तिजोऱ्यांमध्ये बंद असतात. पूजेसाठी दगडी मूर्ती बनवून बाहेर ठेवली जाते. मूळ मूर्ती वर्षातून एकदाच मुख्य उत्सवासाठी, पालखीसाठी बाहेर पडते. तरीही किती मंदिरं असुरक्षित आहेत, किती मूर्ती असुरक्षित आहेत, ते पाहा. शरद कपूरची मोडस ऑपरंडी पोलिसांनी शोधून काढली होती. चेन्नईतले काही आर्ट डीलर्स त्याने हाताशी धरले होते. त्यांनी घरफोड्यांचं नेटवर्क उभं केलं होतं. शरद कपूरचा अभ्यास दांडगा. तो न्यू यॉर्कमध्ये बसून सांगायचा की या मंदिरातल्या या मूर्ती हव्यात. मग, आर्ट डीलर घरफोड्यांना दरोडा घालायला लावून मूर्ती ताब्यात घ्यायचे. काही वेळा मंदिराशी संबंधित मंडळींना, पुजाऱ्यांना लाच देऊन मूर्तीच्या चोरीचा देखावा उभा करायचे. पोलिसही त्यात सामील होते. एका फुटकळ दगडी किंवा ब्राँझच्या मूर्तीसाठी कोणी एक कोटी रुपये मोजत असेल, तर सगळ्यांना दहा दहा लाख आले तरी पुष्कळ. या मूर्ती मग त्या आर्ट डीलरच्या गॅलरीमधून इतर नव्या बनवलेल्या, किरकोळ किंमतीच्या कलावस्तूंमध्ये मिसळून मुंबईत यायच्या आणि मुंबईतून कंटेनरने न्यू यॉर्कला, ऑस्ट्रेलियाला, जगभरात कुठे कुठे रवाना व्हायच्या.’
‘२००७ला एका कंटेनरमध्ये पुराणवस्तू आहेत, अशी टिप मिळाल्यावर आपल्या अधिकाऱ्यांनी न्यू यॉर्कमध्ये तिकडच्या कस्टम्सच्या अधिकाऱ्यांना सावध केलं होतं. पण, तो कंटेनर क्लेमच केला गेला नाही. तोही शरद कपूरचाच माल होता,’ प्रधानकाकांनी माहिती दिली.
‘सर, एक शंका आहे. या मूर्तींची स्मगलिंग का होते? त्यांना एवढी किंमत का आहे?’ हुसेनने विचारलं.
‘आपण फक्त तामीळनाडूपुरताच विचार करू. इसवी सनाच्या पहिल्या-दुसऱ्या शतकात तिथे बौद्धांची सत्ता होती. त्या काळातल्या बुद्धमूर्ती आणि स्तूपांमधल्या शिल्पांना किती मागणी आणि किंमत असेल, तुम्ही विचार करा. इथे कधी चोलांचं राज्य होतं, कधी होयसाळांचं, कधी पांड्यांचं. तंजावरमध्ये मराठ्यांचं, शिवाजी महाराजांच्या बंधूंचं राज्य होतं. या सर्व काळांमधली भारतीय शिल्पकला त्या त्या काळात बांधलेल्या मंदिरांमध्ये पाहायला मिळते. एका अर्थाने ही मंदिरं म्हणजे चिरस्थायी प्रदर्शनंच आहेत, संग्रहालयंच आहेत त्या त्या काळाचं दर्शन घडवणारी. मात्र, सॉरी टु से, ते समजण्याची आणि सांभाळण्याची अक्कल काही आपल्याकडे नाही. त्यामुळे त्यांचं मोल ज्यांना कळतं ते इथून ते सगळं चोरतात, परदेशात पाठवतात आणि मग आपल्याकडच्या होयसाळांची कला काय होती, हे समजून घ्यायला आपल्याला ऑस्ट्रेलियात कॅनबेरामध्ये त्यांच्या नॅशनल गॅलरीमध्ये जायला लागतं. एकवेळ हे परवडलं. पण, विचार करा. गेल्या २५ वर्षांत ज्या १२५० प्रमुख कलावस्तू चोरीला गेल्या आहेत, त्यांच्यातल्या फक्त १८ मिळाल्या आहेत आपल्याला. ५० कुठे आहेत ते आपल्याला माहिती आहे. आता तुमच्या भाषेत सांगायचं तर, त्यांची ओळख मुद्देमाल ताब्यात घ्यायची प्रोसेसच अनेक वर्षं चालेल. ३५० वस्तूंचा ट्रेसच नाहीये. याचा अर्थ कळतो तुम्हाला?’
‘या वस्तू प्रायव्हेट कलेक्टर्सकडे आहेत... बरोबर?’ प्रधानकाकांनी विचारलं.
‘राइट सर. म्हणजे त्या आपल्याला कधीच दिसणार नाहीत. काळ्या पैशांची करन्सी म्हणून त्यांचा वापर होत राहणार. याव्यतिरिक्तच्या जवळपास ८०० मूर्ती, दिवे, खांब, इतर वस्तू श्रीमंतांच्या दिवाणखान्यात विराजमान आहेत. त्यांच्याकडे त्या वस्तूंची अधिकृत डॉक्युमेंट्स आहेत आणि त्या त्यांनी रीतसर खरेदी केलेल्या आहेत. त्या आपणच काय, त्यांची सरकारंही त्यांच्याकडे मागू शकत नाही.’
‘माय गॉड, म्हणजे या वस्तू विसरायच्या?’ धनश्रीचे डोळे विस्फारले.
‘कायमच्या.’ बिका कडवट शब्दांत म्हणाला, ‘या वस्तूंचं डॉक्युमेंटेशन पक्कं असेल, तर त्या कधीही आपल्याला परत मिळणार नाहीत.’
‘अँड लेडीज जंटलमेन, आपण सगळ्यांनी मिळून वेळेवर हालचाल केली नाही, तर पांड्यांच्या काळातली एक अनमोल कलाकृती असलेला पल्लवुरचा आनंद नटराजाही या देशातून गायब होईल...’
‘नागपट्टीनमचा दोन हजार वर्षांपूर्वीचा अमरावती बुद्ध, अमरावती स्तूपाचे खांब आणि सुतमलीचा उच्छिष्ट गणेश यांनाही घ्या यादीत...’ बिका म्हणाला, ‘ताज्या बातम्यांनुसार आतापर्यंत १२ ठिकाणच्या मूर्ती गायब झालेल्या आहेत सगळ्या तामीळनाडूमधून आणि मला खात्री आहे की त्या मुंबईतच येणार आहेत. त्याची कळ आहे जगदीशन. आणि जगदीशन या सगळ्या काळात देशात असेल, असं मला वाटत नाही.’
‘सर, जगदीशन मलेशियामध्ये आहे... बिझनेस टूरवर,’ हुसेनने मोबाइलवर आलेला मेसेज वाचून सांगितलं.
‘ओह, सो अॅन इंपॉर्टंट थ्रेड गोज डेड,’ सी. इ. प्रधान चुकचुकून पुटपुटले.
‘पण, बिकामामाचा अंदाज बरोबर आला, म्हणजे तो राइट ट्रॅकवर आहे,’ बन्या बोलला, मग त्याने जीभ चावली. सगळे हसले. प्रधानकाका म्हणाले, ‘फास्टर बेणारे, यू आर अॅब्सोल्यूटली राइट. जगदीशनने कायदयाच्या कचाट्याबाहेर राहण्यासाठी परदेशात जाण्याचा मार्ग स्वीकारला खरा. पण, त्यामुळे त्याची इन्व्हॉल्वमेंट पक्की झाली. पण, त्या मेसेजचा अर्थ काय लावायचा बिका? अ चाइल्ड इज अ फादर ऑफ अ मॅन.’
‘ती एक गंमतच आहे. ही विल्यम वर्ड्सवर्थच्या ‘रेनबो’ नावाच्या कवितेतली ओळ आहे. तिचा खरा अर्थ वेगळा आहे. तो असा आहे की माणसाला लहानपणी ज्या काही सवयी असतात, नाद असतात, छंद असतात, त्यातूनच तो मोठेपणी काय बनणार, काय करणार, हे ठरतं. मात्र या ओळी जगभरात मुलगाच बापाचा बाप असतो, अशा काहीतरी चमत्कारिक अर्थाने वापरलं जातं. अनेक लोक उगाच कशाचंही फिलॉसॉफायझेशन करायला अशा ओळी चिकटवतात. पण, इथे ते इतकं सोपं असेल, असं वाटत नाही. इथे फादर कोण, चाइल्ड कोण... काही टोटल लागत नाही. दॅट्स ऑल फॉर नाऊ...’
‘आपल्या टीमसाठी काही इन्स्ट्रक्शन्स? मणिकवेल साहेबांकडून मी सगळे अपडेट्स मागवून ठेवतो.’
‘अंदाजे मेझरमेंट्स कळतील ना मूर्तींचे?’
‘येस ऑफकोर्स.’
‘जगदीशनचं काही मुंबई कनेक्शन असेल तर तेही शोधायला लागेल. शरद कपूरचा बंगला आहे ना नेपियन सी रोडला?’
‘काढतो माहिती.’
बिका सगळं आवरता आवरता स्वत:शीच पुटपुटायला लागला, ‘या मूर्ती मुंबईतच येतील किंवा आलेल्या आहेत, हे नक्की. इथूनच त्या रवाना व्हायच्या आहेत, हेही नक्की. त्या पाठवण्यासाठी शरद कपूरची पद्धत वापरली जाणार नाही. आपलं सगळीकडे बारीक लक्ष असणार, हे त्यांना माहिती आहे. शरद कपूर... शरद कपूर...’
‘तुझा मामा त्या शरद कपूरच्या डोक्यात शिरायचा प्रयत्न करतोय, तू त्याला डिस्टर्ब करू नकोस, बरं का!’ प्रधानकाकांनी बन्याच्या डोक्यात एक टप्पू मारला आणि त्याच्या हातात एक पेन ड्राइव्ह ठेवला, ‘तो विचार करत असेल, तेव्हा यातल्या शॉर्ट फिल्म्स बघ. ऑस्करसाठी नॉमिनेटेड फिल्म्सचं कलेक्शन आहे.’
*********************
‘अॅडम अँड द डॉग मला जामच आवडली, किती सुंदर चित्रकला आहे त्यात आणि स्टोरी पण मस्त आहे,’ दुसऱ्या दिवशी सकाळी प्रधानकाकांच्या घरी सनी साइड अप हाफ फ्रायमध्ये ब्रेडचा तुकडा बुडवून खाता खाता बन्या उत्साहाने ऑस्कर नॉमिनेटेड फिल्म्सविषयी सांगत होता. बिकामामाने दोन टोस्टवर स्क्रँबल्ड एक घेऊन संपवलं होतं आणि तो आता कडक कॉफीचा मग घेऊन विचारमग्न होता. मध्येमध्ये डाव्या हाताची मूठ वळून त्यावर उजव्या हाताच्या बोटाने चुटकी वाजवत होता. त्याची तंद्री भंग होणार नाही, अशा बेताने प्रधानकामा म्हणाले, ‘धनश्री इकडेच येतेय. रात्रभर बरंच काम केलंय हुसेन आणि सावंत-परबांनी. त्यांना म्हटलं, एकेक झोप काढून या.’
तेवढ्यात बेल वाजली. धनश्री आत आली, ‘गुडमॉर्निंग सर, मणिकवेल सरांशी हुसेन सर बोलले काल. बिपीन सरही केसवर आहेत, हे चांगलं आहे म्हणाले. त्यांना कमिशनर राजमणी सरांनी बिपीनसरांबद्दल सांगितलंय ऑलरेडी.’
‘राजमणी... मागे तंजावरला होते ते. आपल्या सर्फोजीराजेंच्या एका ग्रंथाच्या चोरीच्या प्रकरणात मी थोडी मदत केली होती त्यांना. पण, आपल्या आनंद नटराजाबद्दल काय म्हणाले ते सांगा.’
‘जगदीशनचा काही धागादोरा सापडलेला नाही. तो आर्ट डीलर नाही. जे संशयित होते, त्यांच्या गोडाउन्समध्ये काहीही सापडलेलं नाही. नटराजाच्या कृपेने मुलगा झाला, हे सांगणारा पहिला मेसेज पल्लवूरच्या टेंपल सुब्बी नावाच्या माणसाकडून आला होता. तो मंदिरांच्या डागडुजीचं काँट्रॅक्ट घेणारा एक लोकल काँट्रॅक्टर आहे. त्या दिवसापासून तो गायब आहे...’
‘तोही जगदीशनबरोबर मलेशियाला गेला नसेल, तर पल्लवुरजवळच्या एखाद्या विहिरीतून फुगून वर येईल दोन दिवसांत,’ बिका म्हणाला.
‘जगदीशनचं मुंबई कनेक्शन असं काहीच नाही. त्याचा एक मेव्हणा छोटा फिल्म प्रोड्यूसर आहे. सी. अशोकन. तो भोजपुरी सिनेमे बनवतो.’
‘भोजपुरी? इंटरेस्टिंग, पुढे.’
‘तुम्ही सांगितल्याप्रमाणे शरद कपूरच्या बंगल्याची लाइट तोडून ती दुरुस्त करायला माणूस पाठवला गेला होता. त्यातून कळलं की आता बंगल्याची देखभाल करायला आउटहाऊसमध्ये एक नथ्थु यादव म्हणून जुना नोकर आणि त्याची छोटी फॅमिली राहते आहे. कपूरची सगळी फॅमिली यूएसमध्येच आहे. बंगल्यात काही खास घडतंय नाही.’
‘हेही ट्रेल डेड झाले बिका?’ प्रधानकाकांनी काळजीने विचारलं.
‘नोSSS नो नो नो नो नो, मला अशोकन आवडला. त्याची माहिती हवी आहे. एस्पेशली गेल्या आठ दिवसांमधली. शिवाय, आपला एक माणूस शरद कपूरच्या बंगल्यावर नजर ठेवून असायला हवा काका,’ बिकाच्या डोक्यात चक्रं भिरभिरतायत, हे बाहेरही दिसत होतं.
‘ठीक. दिवसा एक केळेवाला बसेल तिथे. समोरच्या बंगल्याचा नाइट वॉचमन बदलू काही दिवसांसाठी.’
******************************
अशोकन चक्रावला होता.
मुंबई एक्स्प्रेससारख्या नामांकित पेज थ्री पेपरची रिपोर्टर आपल्याकडे येईल, असं त्याला कधीच वाटलं नसणार. वर्सोव्याच्या एका वन बीएचके फ्लॅटमध्ये वसलेल्या त्याच्या ऑफिसमध्ये तो सरसावून बसला होता. रिपोर्टर धनश्री त्याला प्रश्न विचारत होती. चष्मिस फोटोग्राफर फोटो काढत होता. धनश्रीने विचारलं, आप तमील होके भोजपुरी पिक्चर क्यूँ बनाते है?
‘इट इज लव्ह फॉर आर्ट... अँड ऑफ कोर्स बिझनेस. आय अॅम अ स्मॉल टैम प्रोड्यूसर... मेरेकू तामील में पिच्चर बनानेकू कौन देंगा?...’
‘आप के पिक्चर के गाने हिट होते है. लोकेशन बढिया होता है? आप बिहार में जाते है शूटिंग के लिए?’
‘बिहार जाते है, नेपाल जाते है... वुई लाइक टु शूट इन नेपाल... इट हॅज रिअली ब्युटिफुल अँड व्हर्जिन लोकेशन्स...’
चष्मिस फोटोग्राफर गाण्यांचे स्टिल्स बारकाईने पाहात होता... ‘बट धिस इज तामील टेम्पल आर्ट?’
‘युवर फोटोग्रॅफर इज व्हेरी आर्टिष्टिक... धिस इज माय सिग्नेचर, अन्ना, मैं सौथ का आर्ट कू नेपाल के बैकग्रौंड में ले के जाता... इट इज मैरेज ऑफ टु कल्चर्स...’
फोटोग्राफरने खूण केली. धनश्रीने मुलाखत गुंडाळली. दोघे बाहेर पडले.
‘हा हा...’ असं म्हणून उडी मारून फोटोग्राफरने पायावर पाय आपटले, तेव्हा बिकासरांना काहीतरी क्लू मिळालाय, हे धनश्रीच्या लक्षात आलं.
************************
दार खडखड वाजलं, तसा मुन्ना यादव ते उघडायला गेला. एक पाचवी-सहावीतला तुडतुडीत मुलगा केविलवाणा चेहरा करून दारात उभा होता.
‘बॉल नै मिलेगा... कितनी बार बोला है... इधर क्रिकेट खेलने का नै... कल को कोई काँचवाँच टूटा तो नुकसान कौन भरेगा, तेरा बाप?’ ही सगळी बडबड ऐकत बन्या तसाच केविलवाण्या चेहऱ्याने उभा राहिला... शेवटी मुन्नाने दार सोडलं... दुई मिनट मे मिला तो ले के आ, नहीं तो गया तेरा बॉल, असं तो बजावत असताना बन्या आत पळाला... पँटच्या मागच्या खिशात भरलेला बॉल त्याने झुडपात टाकला आणि उचलला, मागून आलेल्या मुन्नाला म्हणाला, प्यास लगी है, पानी मिलेगा...
‘अरे वा महाराज, तुम किरकेट खेलो, गेंदवा अंदर मारो, उपर से पानी पिओ...’
आतून मुन्नाच्या आईने बन्याला हाक मारली, ऐ बिटुआ, ई लो पानी. रे मुन्ना, पानी तो धर्म है... काहे मना कर रहा है... छोटा सा बच्चा ही तो है...
बन्या आउटहाऊसकडे धावला, पाणी पिता पिता त्याने घरात पाहून घेतलं.
***************
कलादिग्दर्शक नरेंद्र रॉयच्या स्टुडिओतून सेटचे सुटे भाग ट्रक्समध्ये कंटेनरवाइज लोड होत होते. नरेंद्रने ड्रायव्हरच्या हातात एक पाचशेची थप्पी दिली... वाटेत जिथे कुठे पोलिस अडवेल, तिथे एक नोट सरकवायची, असा सीधा हिसाब होता... नरेंद्रचा माणूस गाडीत होता... दोघे मिळून रोज तीन नोटा वेगळ्या काढायचे... एकेक दोघांना आणि एक रात्रीच्या दोघांत मिळून संपवण्याच्या खंब्यासाठी...
...नरेंद्रला हे माहिती होतं... पण, अशोकन सरांची स्ट्रिक्ट इन्स्ट्रक्शन होती... ट्रक मध्ये थांबला नाही पाहिजे, शूटिंगची खोटी झाली नाही पाहिजे... ड्रायव्हरकडे दिलेल्या दर थप्पीमागे एक थप्पी नरेंद्रच्या खिशात जात होती, याची अशोकनलाही कल्पना होतीच...
पण, वसई फाट्यालाच बंदोबस्त लागला आहे आणि आपला ट्रक बाजूला घेतला जाणार आहे, तिथे एकदोन नोटा नव्हे, थप्पीनेही काम चालणार नाही, याची मात्र त्यांच्यापैकी कोणालाच कल्पना नव्हती...
********************
अनंत चतुर्दशीच्या गणपती विसर्जनाचा दणदणाट मागे ऐकू येत होता...
प्रधानकाकांनी खिडक्या बंद करून घेतल्या आणि मोबाइलवरचे फोटो ते बिकाला दाखवू लागले. बिकाने ताबडतोब नोंदी केल्या, फोटो पुन्हा एकदा पाहिले आणि म्हणाला, आनंद नटराजाचं काय झालं?
तेवढ्यात प्रधानकाकांचा फोन वाजला, त्यांनी फोनवर ‘हो हो, ओके, निघा’ अशा सूचना दिल्या. फोन संपल्यावर म्हणाले, ‘तिकडे केळेवाले बनून बसलेले परब विचारत होते, आता निघू का? आज विसर्जन आहे... नथ्थु यादवच्या घरचाही गणपती विसर्जनाला निघालाय. मी निघू का? मी निघा म्हणून सांगितलं.’
बन्या एकदम चक्रावला. तो एक्साइट होऊन म्हणाला, ‘नथ्थु यादवच्या घरी गणपती बसलाच नव्हता पण.’
‘व्हॉट!’ प्रधानकाका आणि बिका एकदमच ओरडले.
‘आर यू शुअर?’ बिकामामाने विचारलं.
‘अरे म्हणजे काय? एक खोलीचं तर घर आहे त्यांचं. मागे छोटंसं स्वयंपाकघर आहे. तिथे कुणी गणपती बसवतो का?’
‘पण मग नथ्थु यादव कोणाचा गणपती विसर्जित करायला चाललाय?’
बिका भिंतीवर मुठी आपटायला लागला, हलके हलके डोकं आपटायला लागला, दोन्ही हातांची बोटं भरभर फिरवायला लागला, त्याचं चक्र जोरात चाललंय हे लक्षात आल्याने बन्या आणि प्रधानकाका दोघेही शांत उभे राहिले. अचानक बिका जोरजोराने हसू लागला, ‘ओह माय गॉड, शिट शिट शिट’ असं बडबडू लागला आणि तो जीव खाऊन ओरडला, ‘काका, परबांना फोन लावा. म्हणावं, नथ्थुचा गणपती रोखा. त्याचं विसर्जन होता कामा नये.’
प्रधानांना काही कळेना. पण, त्यांनी ताबडतोब परबांना फोन लावला, बिकाने सांगितलेली इन्स्ट्रक्शन दिली, चेहरा पाडून ते बिकाला म्हणाले, ‘अरे, परब म्हणतायत, नथ्थुने गणपती मिरवणुकीने नाही नेला, टेम्पोतून नेलाय. तो कधीच गेला. आता?’
‘आता काय? भागो.’ असं बोलून बिकाने धावायला सुरुवातही केली.
********************
प्रधानांच्या गाडीतून सगळ्यांनी उड्या टाकल्या, तेव्हा गुलालाने माखलेले परबच आधी दिसेनात. ते दिसले, तेव्हा त्यांचं बोट समुद्राकडे होतं... त्या दिशेला अनेक बोटी गणेशमूर्ती सोबत घेऊन विसर्जनासाठी चालल्या होत्या... त्यातल्या एकीत नथ्थु यादवचा गणपती असणार, हे उघड होतं... ‘शिट्’ असं म्हणून बिकाने उजव्या हाताची मूठ डाव्या हाताच्या पंजावर आदळली... तेवढ्यात प्रधानकाकांनी हसून पुन्हा समुद्राकडे बोट दाखवलं...
कोस्टगार्डच्या गस्ती नौकांनी नथ्थुच्या बोटीला घेरलं होतं...
बिका धापा टाकत स्वत:शीच हसून म्हणाला, येस शरद कपूर, चाइल्ड इज अ फादर ऑफ अ मॅन!
ब्रेकिंग न्यूज
तामीळनाडूचा आणि भारताचा गौरवशाली वारसा असलेल्या कोट्यवधी रुपये किंमतीच्या मूर्ती आणि कलावस्तूंच्या तस्करीचं प्रकरण मुंबई पोलिसांच्या कौशल्यामुळे उघड, सर्व मूर्ती आणि वस्तू मिळवण्यात यश
तामीळनाडू पोलिसांनी मानले महाराष्ट्र पोलिसांचे आभार
टीव्हीवरची ही हेडलाइन पाहून प्रधानकाकांनी टीव्ही स्विच ऑफ केला.
“थँक यू मिस्टर प्रधान, आय मस्ट थँक यू ऑन बिहाफ ऑफ माय स्टेट,” डीसीपी मणिकवेल यांच्या चेहऱ्यावर गेल्या महिन्याभरात पहिल्यांदा हास्य उमटलं होतं.
‘मणिकवेल सर, तुम्हाला आभार मानायचे तर ते बिकाचे आय मीन बिपीन कारखानीस यांचे मानले पाहिजेत. त्यांनी उलगडा केला या केसचा. अनेक गोष्टी तर माझ्याही लक्षात आलेल्या नाहीत. फॉर एक्झॅम्पल अशोकनची इन्व्हॉल्वमेंट.’
बिका कॉफीचा घुटका घेत म्हणाला, ‘अशोकन इज नॉट इन्व्हॉल्व्ड. जगदीशनने, त्याच्या मेव्हण्याने त्याला फायनॅन्स केलं होतं. हा आपला फिल्म प्रोड्यूसर म्हणून मिरवण्यात आणि सुंदर मुलींच्या सहवासातच खूष होता. तामीळ सिनेमांचं शूटिंग नेपाळला कसं करणार? म्हणून त्याने याला भोजपुरी सिनेमे काढायला लावले होते.’
‘कशासाठी?’ मणिकवेल यांनी विचारलं.
‘ऑफकोर्स तामीळनाडूचा वारसा परदेशात स्मगल करण्यासाठी.’
‘म्हणजे ते सेट...?’ प्रधानकाकांच्या लक्षात आलं.
‘त्या सेटचा काही भाग तामीळनाडूतून बनून यायचा. तो टेंपल सुब्बी बनवायचा. तो या टोळीचाच मेंबर. त्या भागांमध्ये ओरिजिनल कलावस्तू घुसवून दिलेली असायची. शूटिंगचं साहित्य, सेट म्हणून ते अडवलं जायचं नाही. अडवलं गेलं तर पाचशेची नोट कामी यायची. त्याचा फायदा घेऊन या वस्तू नेपाळच्या परिसरात पोहोचायच्या. नेपाळमधून त्या किती सहज जगभर जात असतील, याची कल्पना करा!’
‘मग आनंद नटराजा त्या मार्गाने का पाठवला गेला नाही?’
‘त्याची डिलिव्हरी अर्जंट असणार, रूट वेगळा असणार आणि ती एक प्रसिद्ध मूर्ती असल्यामुळे पोलीस त्याला शोधून काढतील, अशी भीती वाटली असणार जगदीशनला. त्यावर त्यांच्या बॉसने मंत्र दिला, अ चाइल्ड इज अ फादर ऑफ अ मॅन. मुलगाच बापाचा बाप असतो.’
‘यू मीन गणेशा?’ मणिकवेल चकित् होऊन म्हणाले.
‘येस सर, नटराज म्हणजे शंकर आणि शंकराचा मुलगा गणपती. त्याने वडिलांचा बाबा बनायचं, ही आयडिया. आनंद नटराजाची मूर्ती मुंबईत आली तीच गणेशरूपात. नथ्थु यादव ती समुद्रात विसर्जित करणार होता आणि जगदीशनचे पाणबुडे ती त्यांच्या बोटीवर घेऊन समुद्रमार्गे पुढे रवाना करणार होते.’
‘माय गुडनेस, यू आर ब्रिलियंट... जस्ट अॅज आय हॅड हर्ड अबाउट यू...’ मणिकवेल सर खूष होऊन बिकाला म्हणाले.
बिका म्हणाला, ‘क्रेडिट गोज टू माय नेफ्यू बनेश. नथ्थुच्या घरी गणपती बसलाच नव्हता, हे त्याने पाहिलं होतं, ते त्याने वेळेवर सांगितलं नसतं, तर हे कोडं कदाचित आनंद नटराजा कोणत्या तरी परदेशी कलेक्टरच्या दिवाणखान्यात पोहोचल्यावर उलगडलं असतं आणि त्याचा काहीच उपयोग झाला नसता.’
‘काँग्रॅच्युलेशन्स यंग मॅन अँड थँक यू!’ मणिकवेल बन्याच्या पाठीवर थोपटून म्हणाले, ‘आणि हे मी पर्सनली आभार नाही मानत आहे फक्त. अवर चीफ मिनिस्टर हॅज आस्क्ड मी टु थँक युअर टीम.’
‘बन्या, तू म्हणजे भाचा हा मामाचा मामा असतो, हेच प्रूव्ह केलंस की रे,’ असं म्हणून प्रधानकाकांनी त्याच्या डोक्यावरून हात फिरवला आणि बन्याच्या तोंडून त्या बन्याप्रमाणे आनंदोद्गार निघाला, ‘ट्टॉक!’
No comments:
Post a Comment