“बाबी,
बाबी, बाबी... आता तुला पुरता धक्क्याला लावतो बघ हा टीबी!,” असं खुनशीपणे बोलून
टीबीने डार्टबोर्डावर सप्पकन् बाण फेकून मारला, तो बरोब्बर लक्ष्याच्या जागी
लावलेल्या फोटोतल्या बाबी नाईकाच्या नाकावर जाऊन बसला आणि नेम पक्का लागल्याच्या
आनंदात टीबी गडगडाटी हसू लागला...
“अरे
बापरे, टीबी, हे रे काय?” टीबीच्या गिरगावातल्या त्या पेइंग गेस्टच्या दीड खणी
खोलीच्या दारातून आत आलेला संभू सोनगिरे चमकून विचारता झाला. त्याला धक्का बसणं
स्वाभाविक होतं. तुकाराम बालाजी ऊर्फ टीबी टिंगरे आणि जयवंत ऊर्फ बाबी नाईक हे
ऑफिसातले एकाच टेबलावर बसणारे सूर्य-चंद्र. टीबी भयंकर ऊग्रजहाल स्वभावाचा आणि
बाबी अगदी चंद्रासारखा शीतल, बोलायला, वागायला सौम्य, सर्वांच्या मदतीला तत्पर,
कोणाच्या अध्यात ना मध्यात... म्हणजे टीबीच्या भाषेत ‘बुळचट आणि बावळट.’
योगायोगाने जेपी साहेबांनी टीबी आणि बाबी या दोघांनाही एकाच सेक्शनला टाकलं होतं.
बाबीच्या उमद्या आणि गोड स्वभावाने टीबीसारख्या खरखरीत माणसाच्याही थोड्या कडा
घासल्या होत्या. बाबीचा द्वेष करावा, असं त्याच्यात काही नव्हतंच, तर टीबी तरी काय
करणार!
असं
असताना टीबीने बाबीचा फोटो लावून त्यावर नेम धरून बाण मारण्याइतकं काय घडलं असावं,
असा प्रश्न संभू सोनगिरेला पडणं स्वाभाविक होतं. तो या दोघांचा मित्र आणि सहकारी.
या प्रश्नाच्या उत्तराचा थोडासा उलगडा त्याला आणखी अर्ध्या तासाने झाला…
…‘न्यू
डिलाइट’ बारमध्ये कॅप्टन मॉर्गन रमचे दोन पेग पोटात गेल्यावर धुराची वलयं सोडत
टीबी म्हणाला, “संभ्या, तुझ्या त्या बाबीला सांग, बेबीच्या जवळपास फिरकलास ना, तग
गाठ टीबीशी आहे म्हणावं.”
ओहोहो,
असा प्रकार आहे तर!
आता
संभ्याच्या डोक्यात प्रकाश पडला आणि हा प्रकाश आधीच आपल्या डोक्यात का पडला नाही,
म्हणून त्याने एक टप्पूच मारून घेतला डोक्यात. बेबी म्हणजे बेबी बिवलकर. तिला
ऑफिसात सगळे तिच्यामागे बेबी डॉलच म्हणायचे आणि तेही तिला माहिती होतंच. ही
साहेबांची सेक्रेटरी. दिसायला छान, नीटस राहणीची, अतिशय चुरचुरीत. तीही
बाबीप्रमाणेच मदतीला तत्पर असायची. ऑफिसातल्या बहुतेक तरुण पोरांच्या मनात बेबीच्या
नावापुढे आपलं आडनाव लागावं, अशी इच्छा जागायची- “तिने तिचंच आडनाव लावायचं ठरवलं
तरी आपली काही हरकत नाही बरं का; हवंतर मी माझं आडनाव बदलून जगू जमदग्नी बिवलकर
करून घेतो,” असं एचआरचा जेजे नेहमी म्हणायचा दोन पेग पोटात गेल्यावर.
ही
सर्वच अविवाहित पोरांच्या मनात भरणारी बेबी टीबीच्या मनात भरली, याचं संभ्याला
आश्चर्य वाटत नव्हतं. त्याचं स्वत:चं लग्न झालं नसतं, तर त्यालाही बायको असावी तर
बेबीसारखी, असंच वाटलं असतं, हे त्याला माहिती होतं. टीबी छान पाच फूट आठ इंचाचा
छान तब्येतीचा दांडजवान गडी. गिरगावात खोली असल्यामुळे चर्नी रोड स्टेशन क्रॉस
करून रोज हँगिंग गार्डनपर्यंत जॉगिंग करणारा. घरची परिस्थिती बरी होती. पनवेलला
चांगला ब्लॉक घेण्याच्या तयारीत होता. तिशीच्या अंगणात पोहोचला होता. “अब लाइफ मे
सेटल होने को मांगताय” अशी भावना त्याच्या मनात बळावू लागली होती. तशात साहेबांनी
बाबी आणि टीबीचा सेक्शन त्यांच्या केबिनलगतच आणला होता. समोर सतत बेबी दिसणार, सतत
तिच्यापाशी घुटमळायला मिळणार, तिच्याशी बोलायला मिळणार म्हणून टीबी खूष झाला होता.
“लेका, बेबीच्या इतक्या जवळ गेलास, आता तर ती तुझीच झाली, चांदी आहे लेका तुझी,”
असं सांगून त्याला घोड्यावर बसवून सगळ्यांनी पार्टीही उकळली होती त्याच्याकडून.
आपल्या
सेक्शनमध्ये बाबीही आहे आणि तो आपला प्रतिस्पर्धी बनू शकतो, हा विचार कधी शिवलाही
नव्हता टीबीच्या मनाला. बाबी साडेपाच फुटाचा, थोडासा गब्बू शरीरयष्टीचा, डोळ्यांवर
चष्मा, नव्या फॅशनचा स्पर्शही न झालेलं टिपिकल बोअरिंग ऑफिसवेअर वापरणारा, ‘बुळचट
आणि बावळट’ इसम होता टीबीसाठी. सहकारी म्हणून चांगला होता इतकंच. पण, दोघांचा
सेक्शन साहेबासमोर गेल्यापासून टीबीच्या लक्षात आलं की बेबी त्याच्याशी अगदी
सौजन्याने आणि छान बोलते, मित्रासारख्या गप्पा मारते, पण, बाबीशी तिचा संवाद काही
वेगळा आहे... हे असलं काहीतरी जाणवायला, दिसायला माणूस प्रेमात पडलेला असावा
लागतो. जिच्यावर प्रेम आहे तिचा सतत विचार केला की तिच्या विभ्रमांचा अर्थ
तिच्याही आधी प्रेम करणाऱ्याला समजू लागतो. टीबीचा हा सिक्स्थ सेन्स जागा झाला
होता आणि त्याने आता डिवचून त्याच्या अहंकारालाही जागं केलं होतं. बाबी आणि बेबी
यांची जवळीक जर अशीच वाढत गेली, तर आपला पत्ता कट् होईल, अशी भीती त्याला वाटू
लागली होती. पण, बाबीशी उघडपणे पंगा घेता येत नव्हता. बाबी त्याच्या वाटणीचं काम
तर करायचाच, शिवाय टीबीचे सिगरेट ब्रेक, त्याचं संध्याकाळी लवकर कल्टी मारून
सिनेमाला किंवा बारमध्ये जाऊन बसणं सोपं व्हावं म्हणून त्याच्याही वाटणीचं काम
करायचा. तेही आनंदाने, विनातक्रार. टीबीने बाबीशी भांडण्याचा प्रयत्न करून पाहिला.
त्याला डिवचून पाहिलं. बेबीवरून छेडलं. पण, बाबी कशानेही संतापायचा नाही. उलट
टीबीचीच समजूत घालायचा. तुझा राग शांत झाला की बोलू, असं सांगून हवा काढायचा.
“तुला
सांगतो, एक नंबर ड्रामेबाज आहे तुझा दोस्त,” आता टीबीच्या पोटातला तिसरा पेग बोलू
लागला होता, “हा त्याचा मुखवटा आहे मुखवटा. बेबीसारख्या अश्राप पोरींना फसवून आपल्या
जाळ्यात ओढण्यासाठी लावलेला. पण, बेटा बाबी, हा तुझा बाप टीबी जिवंत असेपर्यंत तू
बेबीला टचपण करू शकणार नाहीस, हे लक्षात ठेव...”
…संभू
दीड पेगच्या संयमी जागरुकतेने टीबीच्या मनातली मळमळ समजून घेत होता...
आता
टीबीचा चौथा पेग बोलू लागला, “साल्या कोकण्या, सगळ्यांचा जीव कुठल्या ना कुठल्या
पोपटात असतोच. तुझाही जीव कुठेतरी असेलच. तेवढी एक कळ मला सापडू दे. मग तुला असा
नाचवेन की तुझं खरं रूप बाहेर येईल आणि माझ्या बेबीच्या डोक्यात प्रकाश पडेल.”
हे
बोलत असताना त्याचं लक्ष बारच्या गल्ल्यावर बसलेल्या अण्णाच्या डोक्याच्या वर एका
देव्हाऱ्यात विराजमान गणपतीबाप्पांकडे गेलं आणि त्याचे डोळे विस्फारले, चेहऱ्यावर
प्रचंड आनंद झळकू लागला, बारमध्ये बेबीच आली की काय, असं वाटून संभूने चरकून मागे
पाहिलं, त्याला काहीच कळेना, इकडे टीबीने उठून जागच्या जागेवरच गावठी डान्सच केला
हातात ग्लास घेऊन आणि बसल्यावर अतिशय प्रसन्न आवाजात त्याने वेटरला हाक मारली,
“राजू, दोनों का ऑर्डर रिपीट और एक तंदूरी चिकन लाना बटर मार के.”
समोरच्या
गणपतीबाप्पांना हात जोडून नमस्कार करून ‘बाप्पा मोरया’ असं म्हणून टीबी उत्साहाने
बोलू लागला, “बाप्पांनी डोळेच उघडले यार माझे.”
“अरे
वा, म्हणजे तू बाबीसाठी बेबी सोडणार?” संभ्याने चावी मारली.
“अबे
हट्, बेबी मेरी है और मेरीही रहेगी.”
“मग
बाप्पांनी काय शिकवण दिली तुला?”
“अरे
माठा, गणपती. त्या कोकण्याचा जीव कशात आहे, ते मला समजलं. गणपती, भावा, गणपती!”
*****
“मला
माहिती नव्हतं, तुमच्या घरीही गणपती असतो ते,” साहेब म्हणाले.
“माहिती
कसं असेल? आमच्या घरी गणपती नसतोच. ते प्रस्थ कोकणात जास्त. आमच्याकडे घाटावर
सार्वजनिक गणपती जास्त,” टीबी उत्तरला.
“घरी
गणपती नसताना तुम्ही गणपतीची रजा मागताय...”
“गणपतीची
रजा घ्यायला घरी गणपती बसला पाहिजे, असा काही रूल तर नाहीये ना साहेब?”
टीबीने
साहेबाला निरुत्तर केलं.
तो
केबिनमधून बाहेर पडल्यानंतर काही मिनिटांतच ही धक्कादायक बातमी सगळ्या ऑफिसात
पसरली. टीबीने गणेशोत्सवाच्या काळातच रजा मागितल्यामुळे बाबीची रजा धोक्यात आली
होती. बाबीच्या ऑफिसातल्या १० वर्षांच्या कारकीर्दीत आजवर असं कधी घडलं नव्हतं.
टीबीने ओळखलं होतं ते बरोबरच होतं. गणपतीत बाबी १० दिवसांची रजा घेणार, गावी
जाणार, गणपती, गौरी करून, भरपूर प्रसाद घेऊन, कोकणी मेवा घेऊन परतणार, हे त्या
ऑफिसात १० वर्षं विनाखंड आणि विनातक्रार सुरू होतं. म्हणजे, “बाबीलाच का दर
गणपतीला १२ दिवसांची रजा,” असा प्रश्न टीबीप्रमाणेच अनेकांना पडायचा. पण, बाबी
फक्त होळी आणि गणपतीलाच रजा घेतो. बाकी सगळे दिवस कामावर असतो. ऑफिसची सगळी कामं
नीट करतो, सगळ्यांना मदत करतो, इतरांच्या रजांच्या वेळेला डबल ड्यूटी करायलाही कधी
ना म्हणत नाही, हे माहिती असल्यामुळे आजवर कधी कोणी त्या रजेच्या आड आलं नव्हतं.
तो बाबीचा हक्कच आहे, असं जणू सगळ्यांनी मनोमन मान्य केलं होतं. टीबीने नेमका या
गृहितकालाच सुरुंग लावला होता. दोघे एकाच सेक्शनमध्ये होते. त्यांचं काम, अनेकांनी
तशी तयारी दर्शवूनही, दुसऱ्या कुणाला देण्यासारखं नव्हतं. कंपनीत कामाचा लोड होता.
टीबीची रजा नाकारली तर तो ऐनवेळी दांडी मारून आणखी पंचाईत करील, याची साहेबांना
कल्पना होती. बाबीला रजा नाकारण्याची ते कल्पनाही करू शकत नव्हते. पण, त्यापलीकडे
काही पर्याय नव्हता.
अपेक्षेप्रमाणे
टीबीला अनेकांनी सांगून पाहिलं, पण टीबी बधेना. बाबीने तर त्याच्या हातापाया पडून
सांगितलं, “तुकारामदादा (त्याच्या नावाने हाक मारणारा बहुदा जगात बाबी एकटाच
असावा, बाकी सगळे टीबीच म्हणत), आईबाबा थकलेत. गावच्या घरी गणपतीची सगळी तयारी,
अगदी घर उघडल्यावर झाडलोटीपासून सगळं मला करायला लागतं. देवाच्या प्रसादाचा थोडा
स्वयंपाक आई करते तेवढीच. बाकी एक गावची काकू आणि मी, आम्हा दोघांचीच जबाबदारी
आहे. तुम्हा सगळ्या मंडळींनी सहकार्य केलं, म्हणून मी गणपती बसवू शकतो घरी. तू
नंतर केव्हाही रजा घे. मी डबल ड्यूटी करीन, ओटीही क्लेम नाही करणार. पण, गणपतीत
थोडं सांभाळून घ्या देवा.”
टीबी
तुटकपणे म्हणाला, “अरे आम्ही इतकी वर्षं करतो ना अॅडजस्ट. आता तू कर की एक वर्ष.”
“बरा
धडा शिकवलात त्या बाब्याला. साधेपणाचं नाटक करत असतो, पण आतून पक्का डँबिस आहे,”
असं सांगणारा जगू जमदग्नी सोडला (त्याची अकाउंट्समधली लाखोंचा फटका देऊ शकणारी चूक
बाबीने साहेबांच्या निदर्शनाला आणून दिली होती, म्हणून त्याचा याच्यावर खार.
शिवाय, बेबीचं आडनाव नाईक बनतंय की काय, या धास्तीची जोड होतीच), तर बाकी कोणालाही
टीबीच्या रजेचं प्रकरण पटलेलं नव्हतं. त्यात टीबी मध्यस्थीला आलेल्या कोणालाही सांगायचा,
“हे पाहा, हक्काची रजा मागतोय. मी तंगड्या पसरून बसेन नाहीतर झोपेन सगळे दिवस? ते
विचारण्याचा तुम्हाला हक्क काय?”
****
“मला
तुमची अडचण समजू शकते नाईक, पण नियमानुसार टिंगरेंना रजा मागण्याचा हक्क आहे आणि
एकाच विभागातून दोन अर्ज आल्यानंतर मला काहीतरी मार्ग काढावाच लागणार. तुम्ही
दोघांनीही १२ दिवसांच्या रजेचा अर्ज दिलेला आहे. एवढी रजा मी मंजूर करूच शकणार
नाही दोघांना. सहा दिवसांची रजा मिळेल प्रत्येकाला.”
टीबी
म्हणाला, “त्याला १२ दिवस देत होतात ना? मलाही १२ दिवस पाहिजे.”
“टिंगरे,
तेव्हा त्यांच्या सेक्शनमधून त्यांचाच अर्ज यायचा आणि बाकीचे सहकारी काम खोळंबणार
नाही, याची हमी द्यायचे. आत्ताही इतर सेक्शन्समध्ये पूर्ण दिवसांची रजा दिलीच आहे
ना मी. तुमच्याकडे तिसरा माणूस नाही. तुम्हीच एकमेकांशी सहकार्य करावं लागणार.”
पाणावल्या
डोळ्यांनी बाबी म्हणाला, “माझी एकच रिक्वेस्ट आहे. गणपती बसवण्याची तयारी करायला
सुरुवातीचे दिवस मला रजा द्या. सहा दिवसांनी मी परत येतो.”
हे
साहेबांनी तात्काळ मंजूर केलं आणि त्याला टीबीचीही काही हरकत असायचं कारण नव्हतं.
त्याला निव्वळ सुडासाठीच तर रजा हवी होती!
टीबीचा
हा बाण मात्र अचूक लागला. दरवर्षीची एक शिस्त बसलेल्या बाबीला अनपेक्षितपणे रजा
कमी करावी लागल्याचा धक्का मोठा होता. त्याला गावी कराव्या लागणाऱ्या अॅडजस्टमेंटही
खूप होत्या. सगळ्यांकडेच गणपती असल्यामुळे ऐनवेळी मदत तरी कोण आणि कशी करणार?
त्याने बाबी मेटाकुटीला आला. शिवाय अनपेक्षित ठिकाणी घाव बसल्याने तो सैरभैर झाला.
त्याच्या कामावर त्याचा परिणाम दिसायला लागला. दोनतीन वेळा साहेबांनी समजून घेतलं,
पण एकदा केबिनीत बोलावून त्यांनी त्याला झापला, हे सगळ्या ऑफिसने पाहिलं.
सगळ्यांशी प्रेमाने वागणारा, मदत करणारा बाबी एकदम तुटक वागायला लागला. बाकी सगळे
सोडा, एकदा तर तो बेबीवरही क्षुल्लक कारणावरून डाफरला. तेव्हा तिनेही त्याला दोन
वाक्यं सुनावली आणि शेजारीच बसलेल्या टीबीने तिला समजावलं. तिचा राग शांत
करण्यासाठी तिला कॅन्टीनला कॉफी प्यायला नेलं आणि त्या संध्याकाळी त्याने संभ्याला
नेहमीच्या ब्लेंडर्स प्राइड रिझर्व्हच्या ऐवजी टीचर्स पाजली, “स्कॉच पी लेका आज
तू. आता बाबी आउट. टीबीकी एन्ट्री हो गयी,” हे बोलून त्याने ‘तूने मारी एन्ट्री और
दिल में बजी घंटी यार टुन टुन टुन’ हे गाणं भसाड्या आवाजात म्हणत जागेवर
बसल्याबसल्या नाचही केला.
दुसऱ्या
दिवशीपासून बाबीवर रुसलेली बेबी त्याच्याशी बोलेनाशी झाली. त्याच्या टेबलवर येऊन
ती टीबीशी बोलू लागली. पण, बाबी जणू कोषातच गेला होता. त्याला बेबीच दिसेनाशी झाली
होती, तर तिची टीबीशी वाढत चाललेली जवळीक कुठून दिसणार? टीबी आताशा वेळ साधून
बेबीबरोबर स्टेशनलाही एकत्र जायला लागला होता. त्याच्या सावळ्या चेहऱ्यावर आता एक
वेगळंच तेज चमकू लागलं होतं आणि मुळातच थोडा भरल्या अंगाचा बाबी आता विसविशीत
दिसायला लागला होता.
अखेर
गणेश चतुर्थीच्या आदला दिवस उजाडला. बाबीला संध्याकाळीच गाडीने गावाकडे निघायचं
होतं. बरोब्बर सहा वाजता आपलं काम संपवून तो बाहेर निघाला, तेव्हा सगळेच सहकारी
निघण्याच्या तयारीत होते. अख्ख्या ऑफिससमोर टीबी बाबीला म्हणाला, “ऑल दि बेस्ट
बाबी, आज १३ तारीख, तू १९ला परत येशील ना कामावर? मी तुझ्या स्वागताला, प्रसाद
खायला आणि कोकणचा खाऊ खायला येणार आहे. सुट्टी असली म्हणून काय झालं? मला कुठे
कुठल्या गणपतीला जायचंय. तुझा गणपती, तोच आमचा गणपती,” या विनोदावर कोणी हसलं नाही
आणि संभा किंवा जेजेनेही टाळीसाठी पुढे केलेल्या हातावर टाळी दिली नाही, हे
समजण्याच्या स्थितीत टीबी नव्हता. “लिफ्ट येणार नाही बहुतेक, मी चालतच जातो,” असं
म्हणून बाबी झर्रकन् निघून गेला.
****
१३
तारखेपासून १९ तारखेपर्यंत लोकांच्या घरी गणपती होता, टीबीकडे मात्र दिवाळी होती.
आता रोज तो आणि बेबी समोरासमोर होते. शेजारी बाबी नव्हता. बेबीचा चेहरा जरा
उतरलेला होता. त्यामुळे आधीच तिच्याशी बोलताना मृदूकोमल लागणारा टीबीचा सूर आणखी
समजूतदार आणि प्रेमळ झाला होता. तिच्या उदास मनाचं रंजन करण्यासाठी तो नाना
प्रकारचे फंडे वापरत होता. तिच्यापाशी जाऊन जोक करत होता, तिच्या आवडीचं चॉकलेट
आणून देत होता, स्टेशनची सोबत तर सुरूच होती. आता १९ तारखेच्या संध्याकाळीच तिच्या
लाडक्या रणबीरचा नवाकोरा सिनेमा तिला दाखवायचा, असा पण त्याने केला होता. गणपतीहून
परतलेल्या बाबीचा पुरता बाप्पा मोरया करायचाच, हे त्याने ठरवलंच होतं. त्यामुळे १९
तारखेला बाबीच्या स्वागतासाठी तो नऊच्या ऑफिससाठी दामू शिपायाबरोबर, ऑफिस
झाडण्याच्या वेळेलाच येऊन उभा राहिला होता. पावणेनऊपर्यंत एकेक सहकारी येत गेला.
बॅग टाकून प्रत्येकजण नकळतच बाबीच्या स्वागतासाठी येऊन उभा राहिला. बाबी वेळेचा
पक्का. आठ अठ्ठावन्नला तो ऑफिसात शिरला नाही, असं कधी झालं नव्हतं. आठ सत्तावन्नला
टीबी सज्ज झाला. छप्पन्नला आलेली बेबीही चटकन् फ्रेश होऊन येऊन उत्कंठेने दाराकडे
पाहात होती. सगळ्या ऑफिसचं लक्ष दारावर लागलं होतं... ५९ झाले, बाबीचा पत्ता
नव्हता.
नऊ
वाजले, तरी बाबी आला नाही.
आता
त्याला फोन करावा काय, असा विचार टीबीच्या मनात येत असतानाच घाईघाईने खुद्द जेपी
साहेबच दारातून आत आले. कानाला मोबाइल लावला होता. चेहरा गंभीर. त्यांनी हाताने
खूण करून टीबी आणि बेबी या दोघांनाही आत बोलावलं.
फोन
ठेवल्यावर साहेबांनी “डॅमिट,” असं म्हणून डाव्या हातावर उजवी मूठ आपटली- ते महेश
कोठारेचे फॅन होते- आणि ते संतापून म्हणाले, “साल्या कोकण्या, मला बनवतोस काय?
मीही काही कच्च्या गुरूचा चेला नाही. बेबी, मेलवर बाबीचा अर्ज आणि मेडिकल
सर्टिफिकेट आलंय. त्याचे प्रिंटआउट काढून आण.”
साहेबांचा
चेहराच असा लालबुंद झाला होता की काय झालं हे विचारण्याचं टीबीला धैर्य होईना. तो
अर्ज आणि सर्टिफिकेट पाहिल्यावर टीबीकडे सरकवत साहेब म्हणाले, “टिंगरे, पाहा
तुमच्या दोस्ताचे प्रताप. मी याला एक जबाबदार सहकारी समजत होतो. साधाभोळा समजत
होतो. पण, हा कसा बदमाश इसम निघाला पाहा.” टुंग टुंग असा मेसेज वाजला, तेव्हा
त्यांनी व्हॉट्सअॅप उघडलं, त्यावरचा फोटोही त्यांनी बेबी आणि टीबी यांच्यापुढे
नाचवला.
त्या
सगळ्या नाट्याचा मथितार्थ अगदी सोपा होता. बाबीने सकाळीच साहेबांकडे
रजा-विस्ताराचा अर्ज पाठवला होता. त्याची लीव्ह आता सिक लीव्हमध्ये कन्वर्ट होणार
होती. रात्रीच्या वेळी घराबाहेर कुठूनतरी कुठेतरी चालत जाताना तो पडला होता आणि
त्याचा पाय मुरगळला होता. फ्रॅक्चर होतं. पायाला प्लॅस्टर घातलं होतं. त्याचा
फोटो, डॉक्टरचं सर्टिफिकेट आणि रजाविस्ताराचा अर्ज त्याने तिकडून पाठवून दिला
होता. त्याचं घर डोंगरावर असल्याने तिथे रेंजचा मोठा इश्यू होता. त्याला बाहेर
पडून ऑफिसला किंवा साहेबांना फोन करणं शक्यच नव्हतं. थोडक्यात, बाबीने रजा वाढवून
स्वत:ला आउट ऑफ कव्हरेज करून घेतलं होतं. शिवाय रजेसाठीची आवश्यक कागदोपत्री
पूर्तताही केली होती.
बाबी
असा गेम पलटवेल, याची कल्पनाच नसल्याने विस्फारल्या डोळ्यांनी ते सर्टिफिकेट वगैरे
पाहत बसलेल्या टीबीवर साहेबांनी आणखी एक बाँब टाकला! ते म्हणाले, “टिंगरे,
बाबीच्या स्वागतासाठी का होईना, तुम्ही आलात ही माझ्यासाठी फार मोलाची मदत झाली
आहे. साक्षात् बाप्पाच धावले आहेत असं समजा ना माझ्या मदतीला. आता आलाच आहात तर
प्लीज कामाला लागा. तो हरामखोर परत आला की मी तुम्हाला १२च्या जागी २४ रजा मंजूर
करेन. फक्त यावेळी मला सांभाळून घ्या. ही घ्या टी अँड जीची फाइल आणि कामाला लागा,
प्लीज.”
“पण,
साहेब, म्हणजे मी तर रजेवरच आहे... त्याने बदमाशी केली म्हणून मला का शिक्षा?...”
टीबीने क्षीण विरोध नोंदवण्याचा प्रयत्न केला.
“शिक्षा
नाही हो टिंगरे, ही ऑपॉर्च्युनिटी समजा. आज तुम्ही आहात, बेबी आहे, तुमच्यासारख्या
सहकाऱ्यांच्या भरवशावर मी हा गाडा खेचतो आहे. शिवाय बाबीला कल्पना नाही की त्याची
गाठ माझ्याशी आहे. बेबी, तू एक काम करायचंस. आज दुपारीच थेट बाबीच्या गावाला
जायचंस. गाडीची व्यवस्था मी केली आहे. ऑफिसात कुणालाही कळता कामा नये. माझ्यासाठी
भरवशाचे तुम्ही दोघेच आहात. त्याच्या घरी पोहोचायचं. तब्येत पाहायला पाठवलंय
म्हणून सांगायचं आणि त्याला रेड हँड पकडायचं... खरंतर याला रेड फुट म्हणायला हवं,”
साहेबांनी त्यातल्या त्यात एक विनोद केला आणि “निघण्याआधी मला भेट. बाकी
इन्स्ट्रक्शन देतो सविस्तर,” असं बेबीला सांगून बाहेर पाठवलं. ती गेल्यावर ते
टीबीला म्हणाले, “आपण त्या कोकण्याला चांगला धडा शिकवू मिस्टर टिंगरे. बरं झालं
तुम्ही रजा मागितली. त्यामुळेच त्याचं हे रूप सगळ्यांसमोर आलं. माझेही डोळे
उघडले.”
तो
बाहेर पडला आणि साहेबांनी मोबाइल उचलला... त्यांनी फिरवलेला नंबर बाबीचा होता...
****
पुढे
काय घडलं हे तुम्ही चुकूनही टीबीला विचारू नका.
तो
काहीतरी अंगावर फेकून मारेल.
टीबी
इथे बाबीला साहेब धडा शिकवतायत, म्हणून त्यांना फुल सपोर्ट करत काम करत राहिला.
बेबीबरोबर पाहायचा सिनेमा त्याला संभूबरोबर पाहावा लागला आणि नंतर ओल्ड माँक
गोल्डच्या खंब्यात दु:ख बुडवावं लागलं. साहेबांनी दिल्या वचनाला जागून पितृपक्षात
त्याला मोठी रजा सँक्शन केली म्हणा. पण तिचा त्याला काहीच उपयोग नव्हता.
तिकडे
बाबीच्या गावी त्याचा पर्दाफाश करायला गेलेल्या बेबीने तिकडून साहेबांना कळवलं की
बाबीचा पाय खरोखरच प्लॅस्टरमध्ये आहे, तो खरोखरच घसरून पडला होता आणि सगळी कामं
त्याच्या म्हाताऱ्या आईवर येऊन पडली आहेत. त्यामुळे आता पाच दिवस तीच त्यांना मदत
करायला थांबणार आहे. त्या काळात बेबीचे आईवडील बाबीची तब्येत पाहायला गावी जाऊन
भेटून आले.
बाबीची
रजा ऑफिशियली एक्स्टेंड झाली. १२ दिवसांऐवजी २५ दिवस टीबीला मान मोडून दोन जणांचं
काम करावं लागलं. बाबीच्या गावी रेंज नसल्याने बेबीशी त्याचा संपर्क तुटला...
तशीही ती आता रेंजबाहेर गेली, हे त्याच्या लक्षात आलं आणि न्यू डिलाइट बारवाल्याचा
धंदा वाढला.
अखेर
एक दिवस पाय बरा झालेला बाबी, बरोब्बर आठ अठ्ठावन्नच्या ठोक्याला बेबीच्या
खांद्यावर हात ठेवून थोडासा लंगडत ऑफिसात आला आणि आपल्या टेबलावर जाऊन टीबीला
म्हणाला, थँक यू टीबी, थँक यू सो मच!
काळाठिक्कर
पडलेल्या टीबीने विचारलं, “मला थँक यू कशाबद्दल म्हणतोयस?”
“अरे,
तू रजा मागितलीस तेव्हा मला वाटत होतं की गणपतीबाप्पा कोपला माझ्यावर. खरंतर
तुझ्यामुळे गणपतीबाप्पा पावलाच मला.”
“कसं
काय?” कोरड्या तोंडाने टीबीने विचारलं.
“अरे,
तू रजा मागितल्यामुळे नेमका परतीच्या दिवशी तिकडे माझा पाय मोडलाय, याबद्दल
साहेबांना संशय आला नसता. त्यांनी बेबीला पाठवलं नसतं. आम्हाला एकमेकांबद्दलच्या
भावना कधी कळल्या नसत्या. बेबीचे आईबाबा आले नसते आणि पुढची बोलणी कधी झालीच
नसती.”
यावर
बेबी झक्क् लाजली.
“म्हणजे?”
“म्हणजे
आमच्या लग्नाच्या पत्रिकेवर लिहिणार आहे, टीबी टिंगरे प्रसन्न!”
****
तिकडे
साहेबांच्या केबिनमध्ये संभा सोनगिरे त्यांना सांगत होता, “तसा चांगला माणूस आहे
तुका. पण, प्रेमात पागल होऊन बसला आणि सुडाने पेटला तिथे घोटाळा झाला. साहेब,
तुम्ही नेमकी काय जादूची कांडी फिरवलीत?”
“सोनगिरे,
कर्ताकरविता तो बाप्पा असतो. बाबी खरोखरच पडला आणि त्याचा पाय मोडला ही सगळी
बाप्पाची करणी. पण, तोपर्यंत मला टीबी नेमकं काय करतोय, हे समजलं होतं. बाबी
मोडक्या पायाने ऑफिसात आठ अठ्ठावन्नच्या ठोक्याला आलाच असता, हे मला माहिती होतं.
मी त्याला माझ्या मित्राकडे पाठवलं. ऑर्थोपेडिक सर्जनकडे. मित्राला फोन केला.
त्याने त्याला अडकवून ठेवलं. तिथून पुढचं तुम्हाला माहितीच आहे. बेबीलाही मी
मुद्दाम पाठवलं. ती पोरगी गोड आहे. जोडा अगदी शोभणारा आहे. गावच्या गार हवेत,
हिरव्यागार वातावरणात दोन्हीकडची फुलं उमलून हिंदी सिनेमातल्यासारखी एकमेकांना
टक्कर देणार, याची मला कल्पना होतीच. शिवाय मी बेबीच्या आईबाबांनाही फोन करून
सांगितलं, जाऊन जरा भावी जावयाची तब्येत पाहून या, घर-गाव-माणसं पाहून या.
बिच्चारा टीबी, तो एक गोष्ट विसरला...”
“कोणती
साहेब?”
“बाबीला
माझ्यासमोर साला कोकण्या म्हणताना त्याच्या हे लक्षात आलं नाही की मीही जेपी साहेब
आहे, म्हणजे जयंत परब आहे. आमच्या कोकणात सगळेच बाबी नसतात, काही फुरशी आणि
नानेट्टीही असतात, याचा अंदाज नाही आला बिचाऱ्याला. आपल्याला डंख कुठून बसलाय, हे
कळणारही नाही त्याला आयुष्यभर.”
****
त्या
संध्याकाळी संभू ओल्ड माँक रिझर्व्हचा खंबा घेऊन टीबीच्या रूमवर पोहोचला, तेव्हा
रूम स्वच्छ होती, डार्टबोर्ड निघालेला होता. क्षणभर संभूच्या हातातल्या बाटलीकडे
पाहून टीबी म्हणाला, “ती ठेव तुझ्याकडेच. आज आपण पणशीकरांकडे मस्त मसाला दूध पिऊ
या आणि साहित्य संघात झकास नाटक पाहायला जाऊ या. संध्याकाळी क्षुधाशांतीला जेऊ या.
आता आपल्यासाठी हाच खरा न्यू डिलाइट!”
कितीतरी
दिवसांनी टीबी स्वच्छ मोकळा हसला.
सुंदर , शेवट एवढा गोड केल्याबद्दल परब साहेबांचे आभार
ReplyDeleteसुंदर!
ReplyDeleteबाबी, बेबी ही बाब 'खास बाब' म्हणुन जेपींनी लक्ष घातल्याने सुकर झाली!