हाSS
हूSS हाSS हूSS हाSS हू...
बनेश
धापा टाकत जंगलातून वेडावाकडा धावत होता...
त्याच्यामागे
ते भयंकर मोठं, केसाळ, विक्राळ अस्वल वेगाने धावत होतं... क्षणाक्षणाला दोघांमधलं
अंतर कमी होत होतं... कोणत्याही क्षणी ते जीव खाऊन धावणाऱ्या बन्याला गाठेल, अशी
शक्यता होती... अस्वलाच्या शरीराचा भयावह दुर्गंध बन्याला जाणवू लागला होता...
धावून धावून त्याची छाती फुलली होती... पायांमधली ताकद संपत आली होती...
अस्वलाचा
तीक्ष्ण नख्यांचा केसाळ पंजा बन्याच्या खांद्यावर पडला... असह्य वेदनांचा लोळ
त्याच्या मेंदूपर्यंत उसळला... तेवढ्यात अचानक उडी मारून बिकामामा समोर आला...
त्याने एका जाडजूड काठीचा एक तडाखा अस्वलाच्या तोंडावर हाणला... त्याची बनेशच्या
खांद्यावरची पकड ढिली झाली... ते विव्हळत मागे कोसळलं... बिकामामाने बन्याला
थांबवून त्याच्या पाठीवरून हात फिरवला आणि तो त्याच खांद्याला धरून त्याला हलवू
लागला... “आई गं, दुखतोय ना रे तो खांदा बिकामामा, अस्वलाने पंजा रोवला होता
तिथे,” बन्या विव्हळला...
तरीही
बिकामामा थांबला नाहीच... त्याने बन्याला खांद्याला धरून हलवणं सुरूच ठेवलं...
...
“बन्या, ऊठ. ही स्वप्नं पाहायची वेळ नाहीये, केस आलीये आपल्याकडे.”
“केस!”
पांघरूण भिरकावून बन्या ताडकन् उठून बसला बिछान्यात.
**********************
त्यानंतर
१५व्या मिनिटाला बन्या बिकामामाबरोबर उबरमध्ये होता आणि ती भाड्याने घेतलेली कार
मलबार हिलच्या दिशेने चालली होती...
**********************
बन्या
ऊर्फ बनेश बेणारे एट्थ स्टँडर्डमध्ये होता. बिपीन कारखानीस हा त्याचा मामा.
पंचविशीतल्या बिपीनला त्याचे मित्र नाव-आडनावाचा शॉर्टफॉर्म करून बिका म्हणायचे,
ते ऐकून बन्याने त्याला बिकामामा म्हणायला सुरुवात केली होती. त्यानेच आपल्या
भाच्याचं नामकरण केलं होतं. या मामाभाच्यांची नावं ऐकून तुम्हाला काही आठवलं का?
तुम्हाला बिपीन फारसा आठवणार नाही कदाचित, पण बनेश नक्कीच आठवला असणार... बनेश
फेणे, फुरसुंगीचा सुपुत्र, साहित्यिक भा. रा. भागवतांचा मानसपुत्र. त्याचं बनेश हे
नाव त्या काळातही अतिशय हट के होतं आणि आताही हे नाव सहज ऐकायला येत नाही. बिपीन
आणि बनेश ही दोन्ही भागवतांकडूनच आलेली नावं होती. बिकाच्या वडिलांनी त्याचं नाव
भा. रा. भागवतांच्याच बिपीन बुकलवार या मानसपुत्रावरून ठेवलेलं होतं. भागवतांचा
बुकलवार विशीतला तरुण होता आणि खूप पुस्तकं वाचायचा, म्हणून पुस्तकप्रेमी अर्थात
बुकलव्हर या अर्थानेच बुकलवार बनला होता. तो विजू आणि मोना या बालदुकलीच्या मदतीने
अनेक रहस्यं शोधून काढायचा. बिकाने आपल्या भाच्याचं नाव भागवतांच्याच फास्टर
फेणेवरून ठेवलेलं होतं आणि गंमत म्हणजे, हा बन्याही त्या बन्यासारखाच तसाच
शिडशिडीत, झिपरा आणि तुडतुड्या होता. नावाची कथा कळल्यावर त्याने दोन झिपऱ्या पुढे
ओढून फाफेप्रमाणे ‘ट्टॉक’ असा आवाज काढण्याचा प्रयत्न करून पाहिला होता. पण, ते
काही जमलं नाही.
बिकाला
वडिलांच्या ‘संस्कारां’मुळे लहानपणापासूनच रहस्यकथा वाचायची सवय लागली. आर्थर कॉनन
डॉयलचा शेरलॉक होम्स, अॅगाथा ख्रिस्तीचा अर्क्यूल प्वॉरो, त्यांचीच मिस मार्पल,
बाबुराव अर्नाळकरांचा झुंजार, काळा पहाड, गुरुनाथ नाईकांचे कॅप्टन दीप वगैरे
नायकांच्या साहसकथा त्याने झपाटल्यासारख्या वाचून काढल्या होत्या. त्याचबरोबर तो
गुगलच्या साह्याने फोरेन्सिक्सचा अभ्यास करायचा, जगभरातल्या गाजलेल्या रहस्यमय
प्रकरणांचा उलगडा कसा केला गेला, हे वाचून काढायचा, टीव्हीवरच्या गुन्हेगारी
मालिका पाहायचा, रहस्यमय सिनेमे पाहायचा आणि गुन्हेशोधाच्या सगळ्या शाखांमधलं
त्याचं सतत वाचन सुरू असायचं. म्हणूनच सोळाव्या वर्षापासून त्याच्या डोळ्यांवर
चष्मा चढलेला होता. वाचनाचं बाळकडू त्याने आपल्या लाडक्या भाच्याला, बन्यालाही
पाजलं होतं.
कुरळ्या
केसांचा, पाच फूट नऊ इंच उंचीचा, माफक व्यायामाने सुदृढ बनवलेल्या देहयष्टीचा
सावळा-स्मार्ट बिकामामा हा असाही बन्याचा हिरो होताच. आपला मामा शेरलॉक होम्ससारखा
हौशी का होईना डिटेक्टिव्ह आहे आणि मुंबईचे फेमस इन्स्पेक्टर प्रधान त्याला
कन्सल्ट करतात, याचं त्याला जाम कौतुक. प्रधानकाका म्हणजे इन्स्पेक्टर प्रधान हे
खरंतर बिपीनच्या मित्राचे काका. बिपीनशी झालेल्या पहिल्याच भेटीत ते बिपीनच्या
चौफेर माहितीने आणि विश्लेषणशक्तीने चकित झाले होते. त्यांच्या पुतण्यासोबत बिका
त्यांना पोलिस स्टेशनात भेटला, तेव्हा त्यांच्यासमोर काही लोकांनी बेदम चोपून एका
पाकीटमाराला आणलं होतं. तो मार खाऊन सुजलेला पोरगा निर्दोष असल्याचं रडून भेकून
सांगत होता. बिकाने त्याच्याकडे पाहून पाहून काहीएक अंदाज लावला आणि त्याला पकडून
आणणाऱ्या टोळक्यातल्या एकाचं बखोट धरून त्याला प्रधानांसमोर आणून उभा केला. त्याच्या
खिशांमधून पाच आयकार्ड, तीन रिकामी पाकिटं आणि तीन फोन काढून दाखवले, तेव्हा
सगळ्यांच्या लक्षात आलं की पाकीटमार गँगचा सदस्य खरंतर तो होता आणि त्यांनी या
कॉलेजात शिकणाऱ्या मुलावर बालंट आणलं होतं. ती गँग पकडली गेली आणि या मुलाची सगळी
करियर बरबाद होण्यापासून वाचली, तेव्हा प्रधानकाका इंप्रेस झाले. सगळ्यांचं लक्ष
पकडून आणलेल्या माणसाकडे असताना बिपीनने मात्र खऱ्या पाकीटमाराची मागे कुणाबरोबर
तरी सुरू असलेली नजरानजर अचूक हेरली होती.
तेव्हापासून
प्रधानकाकांना एखाद्या गुंतागुंतीच्या केसच्या सोडवणुकीत अडकायला झालं की ते सरळ
बिपीनला फोन लावायचे.
**********************
“प्रधानकाकांचा
फोन होता. श्रीमंत नानासाहेब सरंजाम्यांच्या बंगल्यावर बोलावलंय... माहितीयेत का
तुला? कोल्हापूरजवळच्या बागल नावाच्या संस्थानाचे संस्थानिक आहेत म्हणे. त्यांचा
मौल्यवान हिरा हरवलाय...” बिकामामाने बन्याला माहिती दिली. बिकामामाबरोबर अशाच
एखाद्या रोमांचक केसच्या तपासात सहभागी होता येईल, अशा कल्पनेने बन्या
उन्हाळ्याच्या सुटीत बिकामामाच्या ब्रह्मचाऱ्याच्या मठीत (बिकामामा नेहमी
‘अविवाहिताच्या मठीत’ म्हणा, असं म्हणायचा) म्हणजे बॅचलर पॉडवर राहायला आला होता.
गिरगावात मुगभाटात नाना चाळीशेजारच्या स्वस्तिक बिल्डिंगमध्ये दुसऱ्या मजल्यावर ९
नंबरचं दोन खोल्यांचं घर बिकामामाने मित्राच्या मामाकडून भाड्याने घेतलं होतं.
त्याच्याच शब्दांत सांगायचं तर ‘फावल्या वेळात’ तो सॉफ्टवेअर इंजीनियरिंग करायचा.
बन्याच्या दुर्दैवाने संपूर्ण सुटीत असलं काहीच रोमांचक, थ्रिलिंग घडलेलं नव्हतं.
बिकामामाने चौपाटी, गेटवे, अशी स्थळं त्याला फिरवून आणली होती, इराण्याच्या
हॉटेलातला पानी कम चहा पाजला होता, खिमा पॅटिस खायला घातले होते, घरी पारशी अकुरी,
सुरती घोटाळा असे अंड्याचे पदार्थ करून खायला घातले होते. ताजमहाल हॉटेलमागे बडे
मियाँचे कबाब आणि मार्टिनकडची रसरशीत सॉसेजेस एवढ्यातच सुटीचं सार्थक मानावं लागलं
होतं. रोमांचाची हौस त्याला रोज स्वप्नांतच पूर्ण करावी लागत होती. उद्याच तो
मुंबईहून पुण्याला परतणार होता. पहाटेचं इंद्रायणीचं तिकीट होतं आणि एका विलक्षण
योगायोगाने आता रात्री साडे बारा वाजता तो मामाबरोबर मलबार हिलची चढण चढत होता...
आज
बिकामामाचा काही खास मूड नाहीये, हे बन्याच्या लक्षात आलं होतं. कारण, बिकामामाचे
डोळे कोणत्याही केसबद्दल बोलताना लकलकायला लागायचे. आज मात्र त्याच्या डोळ्यांत ते
तेज नव्हतं. उलट चेहऱ्यावर राग दिसत होता. रात्रीच्या वेळी कोणी जागं केलं म्हणून
राग येणाऱ्यांपैकी तो नव्हता, त्याची एक शिफ्ट नाइट शिफ्ट असायची. मॉर्निंगला असला
तरी मध्यरात्रीपर्यंत त्याचं वाचनच सुरू असायचं. त्यात बुद्धीला चालना देणारं
रहस्यमय प्रकरण समोर आलं की त्याच्यात वाघ संचारायचा, उत्साहाला उधाण यायचं. आज
मात्र तो भलताच गप्प होता. बन्याने विचारलं तेव्हा तुटकपणे म्हणाला, “मला हिरे
अजिबात आवडत नाहीत. तू ब्लड डायमंड्स पाहिलायस की नाही? हिरे कुठून कसे खणून
काढतात आणि या चकचकीत दगडांसाठी माणसांच्या जिवाशी कसे खेळ केले जातात, ते दाखवलंय
या सिनेमात,” बिकामामा पेपरमिंटचं एक च्युइंगम बन्याच्या हातावर ठेवून स्वत:ही एक
चघळत बोलू लागला, “दगड रे साधा दगड आहे हा. सगळे म्हणतात तो किती कठीण आहे, हिरा
है सदा के लिए. अरे, हिरा ओव्हनमध्ये ७०० अंशांवर तापवून बघा. जागेवर कार्बन डाय
ऑक्साइड बनून हवेत विरघळून जातो, राखही मागे उरत नाही.”
“अरे
पण मामा, तो दुर्मीळ आहे ना कितीतरी,” बन्याने विचारलं.
“छ्या,
ते तर मोठं रॅकेट आहे रॅकेट. आज जगात प्रचंड प्रमाणावर हिरे आहेत. ते सगळे एकदम
बाजारात आले, तर हिऱ्याचं मोल काचेच्या खड्याइतकंही राहणार नाही.”, आता बिकामामाचे
डोळे आता हिऱ्यासारखेच लकाकू लागले. बन्याने विचारलं, “मग ते का नाही येत
बाजारात?” बिकामामा म्हणाला, “कारण, हिऱ्यांचा सगळा व्यापार डी बीअर्स या एकाच
कंपनीच्या हातात एकवटलाय आणि ती बाजारात कमीत कमी हिरे आणून त्यांची किंमत पडू देत
नाही. कधीतरी या डी बीअर्सच्या खजिन्यावर छापा मारून तो मोकळा केला पाहिजे. खूप
ताप वाचतील जगातले”, बिकामामामध्ये आता डी बीयर्सवर स्वत:च छापा मारण्याचा उत्साह
दिसायला लागला. ‘बेनझीरने (बिकामामाची गर्लफ्रेंड) त्याच्याकडे हिरा मागितलाय की
काय एंगेजमेंटसाठी,’ असा एक वाह्यात प्रश्न बन्याच्या डोक्यात तरळला. पण, मामा
भडकेल म्हणून स्वत:शीच खट्याळ हसून त्याने तो सोडून दिला आणि मामाला विचारलं, “इथे
कोणता हिरा हरवलाय?”
**********************
“ही
गोष्ट आहे रेड होपची”, प्रधानकाका सांगायला लागले. समुद्रकिनाऱ्यालगतच असलेल्या
‘जलमहाल’ या आलिशान बंगल्याच्या दाराशी त्यांनी बिका आणि बन्या यांना रिसीव्ह केलं
होतं आणि त्यांना घेऊन ते एका सुंदर प्रकाशमान वाटेने राजमहालासारख्याच दिसणाऱ्या
त्या बंगल्याकडे निघाले होते. “रेड होप? पण होप डायमंड तर ब्लू आहे. निळा हिरा”,
बिकामामाने आणखी एक चिकलेट तोंडात टाकलं. ‘ब्लू डायमंड, आमच्या पुण्यात फाइव्ह
स्टार हॉटेल आहे, या नावाचं,’ बन्या उत्साहाने म्हणाला. इन्स्पेक्टर प्रधान हसून
म्हणाले, “अरे वा, मामासारखाच हुशार आहेस तू. हिरा प्रेशियस असतोच, पण, ज्याच्यात
कोणत्याही रंगाची छटा असते, तो हिरा प्राइसलेस असतो, अनमोल.’
‘हा
रंग अशुद्धीतून येतो. माणसांना अशुद्धीची फार आवड,’ बिकामामा खवचटपणे म्हणाला.
“ही
हेट्स डायमंड्स”, बन्याने डोळे मिचकावून खुसफुसत प्रधानकाकांना सांगितलं.
ते
म्हणाले, “मग त्याचा हिऱ्यांचा अभ्यास अगदी पक्का असणार. तुला होप डायमंडची कहाणी
माहितीच आहे ना बिका?”
“येस
ऑफकोर्स. होप डायमंड १६४२ साली भारतात सापडला होता. तेव्हा तो १३२ कॅरटचा होता.
हिऱ्याचं वजन कॅरटमध्ये मोजतात बरं बन्या! फ्रेंच राज्यक्रांतीच्या सगळ्या गोंधळात
तो चोरीला गेला आणि जवळपास दोनशे वर्षं गायब राहिला. १८३०ला हेन्री होप नावाच्या
एका हिरेव्यापाऱ्याकडे ४५.५२ कॅरटचा निळा हिरा विक्रीला आला. हा त्या मूळ
डायमंडचाच भाग आहे, असं मानलं जातं. होपवरून त्याचं नाव होप डायमंड पडलं. त्याची
आजची किंमत २५ कोटी डॉलर आहे, म्हणजे जवळपास १८३१ कोटी रुपये आहे. राइट?”
“अॅब्सोल्यूटली.”
प्रधानकाका कौतुकाने म्हणाले. ते पुढे काही बोलणार इतक्यात बिका म्हणाला, “इफ आय
अॅम नॉट राँग, त्याच सुमाराला कदाचित त्याच खाणीतून लालसर छटेचा हिराही बाहेर आला
होता, पण तो योग्य मालकापर्यंत पोहोचायच्या आतच पळवला गेला असणार. तो इकडून तिकडून
फिरत फिरत, बहुधा नानासाहेबांच्या आजोबांच्या वगैरे काळात बागल संस्थानात आला
असणार. तो आणणाऱ्याला कदाचित त्याची किंमतही माहिती नसेल. हा हिरा होप
डायमंडपेक्षाही आकाराने मोठा असणार. तोच नानासाहेब सरंजाम्यांकडून हरवला आहे,
नेमका लंडनच्या प्रदर्शनात जाण्याआधी. अॅम आय राइट काका?”
“अमेझिंग,”
प्रधानकाका बिकामामाच्या पाठीवर थाप मारून म्हणाले, तेव्हा बन्याही मामाकडे
कौतुकाने पाहात होता, “ठगांकडून आला होता तो सरंजाम्यांकडे. तो मी तुला बोलावून
चूक केलेली नाही, हे पुन्हा एकदा स्पष्ट झालं.”
बिका
म्हणाला, “आय अॅम शुअर की आज पहाटे हा हिरा लंडनला घेऊन जाण्यासाठी एक खास
चार्टर्ड फ्लाइट आतापासूनच तयार असेल मुंबईच्या विमानतळावर. या प्रदर्शनात रेड होप
हा शो स्टॉपर ठरणार तर.”
आता
इन्स्पेक्टर प्रधानांच्या चेहऱ्यावर भलताच अचंबा दिसत होता. ते म्हणाले, “तू हेही
गेस केलंस? कसं?”
बिका
म्हणाला, “लंडनच्या एक्झिबिशनमध्ये डी बीअर्सचा नेहमीचा कचरा आहे सगळा. तेच ते
बोअरिंग हिरे. ज्याअर्थी तिथे या हिऱ्याचा उल्लेखही नाही, त्याअर्थी तो शो स्टॉपर
ठरणार, हे उघड आहे.”
बन्याच्या
चेहऱ्यावरचा गोंधळ पाहून तो म्हणाला, “बन्या, फॅशनच्या जगातली कल्पना आहे ही.
रॅम्पवर एखाद्या डिझायनरचे कपडे परिधान करून मॉडेल्स वॉक करतात, त्याचे फोटो तू
पाहिले असतीलच ना! की डायरेक्ट एफटीव्ही? त्या वॉकमध्ये अचानक एखादी सेलिब्रिटी
अवतरते आणि रॅम्पवॉक करते, सगळा फोकस तिच्यावरच जातो, तिला शो स्टॉपर म्हणतात.”
आपला
मामा कित्ती हुशार आहे, हे पाहून बन्या खूष झाला. आपली भाकड गेलेली सुटी आजच्या
एकाच दिवसात वसूल होणार आहे, याची त्याला कल्पना आली.
“पण
काका, इतका भारी हिरा चोरीला गेला कसा?”
********************************
“आय
अॅम शुअर मिस्टर प्रधान, तुमचा चमत्कारांवर विश्वास नसणार, बिपीन कारखानीसांचाही
नसणार आणि माझाही नाही. पण, रक्तमण्याच्या तिजोरीची चावी माझ्यापाशी असताना आणि मी
टक्क जागा असताना तो चोरीला गेला आहे. कॅन यू बिलीव्ह धिस?” नानासाहेब सरंजामे
सांगत होते. त्यांच्या दिवाणखान्याच्या भव्य दालनात ते एका उंच खुर्चीवर बसले
होते. समोर ही तिकडी बसली होती. आजकालच्या काळात हिस्टरी बुक्समधल्या
संस्थानिकांसारखे कपडे खरोखर कोणी घालत असेल, यावर एरवी बन्याचा विश्वास बसला
नसता. तो या जलमहाल नावाच्या, समुद्रासमोर असलेल्या महालात आल्यापासून बावरूनच
गेला होता. त्याने सिनेमातच पाहिले होते, असे भव्य दिवाणखाने, झुंबरं, अदबीने
ये-जा करणारे नोकर, संगमरवरी मूर्ती, मंद प्रकाशयोजना, श्रीमंती थाट हे सगळं पाहून
त्याला आपण चुकून मागच्या काळातच आलो आहोत असं वाटत होतं. त्यात पांढऱ्या
गलमिशांचे, तेजस्वी चेहऱ्याचे सत्तरीच्या घरातले श्रीमंत सरंजामे पाहिल्यावर तर
त्याने स्वत:ला चिमटाच घेतला होता.
“हिरा
गायब झाल्याचं कधी लक्षात आलं?” इन्स्पेक्टर प्रधानांनी विचारलं.
“साधारण
तासाभरापूर्वी.”
“त्याआधी
तो शेवटचा कधी पाहिला होता तुम्ही?”
“रात्री
आठ वाजता. मी माझ्या हातांनी तो पुन्हा तिजोरीत ठेवला. साठेआठला भोजन केलं. नऊ
वाजता हरीरामने डोक्याला तेल लावून मर्दन केलं. (“म्हणजे मालिश, हेड मसाज,”
बिकामामाने बन्याला सांगितलं.) त्यानंतर दहा वाजता मी पुन्हा तिजोरी उघडली, तेव्हा
रक्तमणी तिथे नव्हता. या सर्व काळात तिजोरीची चावी माझ्याकडेच होती. ही जर्मन
बनावटीची तिजोरी आहे. तिची डुप्लिकेट चावी बनवणं अशक्य आहे.”
“ओह,
ब्लू होपप्रमाणे रेड होपही शापित आहे वाटतं...” बिकामामाच्या कपाळावर आठ्यांचं
जाळं चढलं होतं.
“म्हणजे?”
प्रधानकाकांनी विचारलं.
“मी
सांगतो,” नानासाहेब सरंजामे हातातल्या काठीची मूठ कुरवाळत बोलू लागले, “ब्लू होप
हिरा धारण करणाऱ्याला लाभत नाही, त्याचा सत्यानाश होतो, अशी मान्यता आहे. तसा
इतिहासही आहे. कारखानीस म्हणतात ते खरं आहे. रेड होपलाही असाच शाप आहे. हा हिरा
ब्रिटिश राणीला नजर करून तिची मर्जी संपादन करण्याचा विचार माझ्या आजोबांनी,
मुधोजीराजेंनी केला होता. तो प्रत्यक्षात येण्याच्या आत त्यांचा खून झाला.
घराण्यातल्या वारसाहक्काच्या लढाईची ती परिणती होती. माझ्या वडिलांनी, श्रीमंत
श्रीधरराव सरंजाम्यांनी हा हिरा जागतिक बाजारात आणून त्याच्या विक्रीतून मोठी
इंडस्ट्री उभी करायचं ठरवलं होतं. त्यांचाही आकस्मिक मृत्यू झाला. तेव्हापासून हा
हिरा म्हणजे आमचा रक्तमणी अपशकुनी म्हणून कोंदणात धूळ खात पडलेला होता. आता आम्ही
तो वर्ल्ड डायमंड फोरमच्या प्रदर्शनात तो मांडणार होतो आणि नंतर लिलावात काढून टाकणार
होतो. तर आता तोच गायब झाला.”
“तुमचा
कुणावर संशय? प्रधानकाका, हा हरीराम, इतर सेवकांपैकी कोणाला बोलतं केलंत तुम्ही?”
प्रधानकाका
काही बोलण्याच्या आधीच नानासाहेब म्हणाले, “हा हिरा माझ्या नोकरचाकरांपैकी कोणीही,
हरीरामनेही चोरला असण्याची शक्यताच नाही. त्यांना त्याचं मोल माहिती नाही आणि ते
सगळे पिढ्यान्पिढ्यांचे इमानी सेवक आहेत आमच्या खानदानाचे. असला विचार त्यांच्या
डोक्यातही येणार नाही.”
अचानक
बिकामामा त्यांचं वाक्य तोडून म्हणाला, “तुमच्या हातातली काठी मिळेल मला पाहायला.”
“हो
हो, का नाही? हा आमच्या संस्थानाचा एक प्रकारचा राजदंडच होता म्हणा ना. माझ्या
आजोबांच्या काळापासून आहे ती आमच्या घराण्यात.” नानासाहेब सांगू लागले.
बिका
ती काठी बारकाईने पाहात होता. तोंडातल्या तोंडात काहीतरी पुटपुटत होता.
राजदंडासारखाच आकार असलेल्या त्या तुळतुळीत काळ्या काठीच्या डोक्यावर एक चकचकीत
गोळा बसवलेला होता. “रॉयल केन्स, ओह... बेल्जियम... युरोपातल्या सगळ्या
राजघराण्यांसाठीचे दंड यांच्याकडेच बनायचे,” असं पुटपुटता पुटपुटता त्याने एकदम
एका खटक्याने काठीचा गोळा बाजूला केला. त्याच्या आत एक पोकळी होती. ती रिकामी
होती.
“यू
आर ब्रिलियंट मिस्टर कारखानीस,” असं म्हणत एक सुटाबुटातले पंचेचाळिशीचे उंचेपुरे
गृहस्थ पुढे आले. त्यांच्याकडे पाहिल्यावर कोणीही हे ओळखलं असतं की ते नानासाहेब
सरंजाम्यांचे चिरंजीव आणि सरंजामे ग्रूप ऑफ इंडस्ट्रीजचे मॅनेजिंग डिरेक्टर
विक्रांत सरंजामे आहेत. हिंदी सिनेमातल्या एखाद्या जुन्या काळातल्या देखण्या
अभिनेत्यांसारखी पर्सनॅलिटी लाभलेल्या हसतमुख चेहऱ्याच्या विक्रांत सरंजाम्यांनी
सांगितलं, “माझ्या पणजोबांनी हा दंड बेल्जियममधूनच बनवून घेतला होता आणि त्यात हा
चोरकप्पा आहे. तो माहितगारांनाच सापडतो. तुमचा अभ्यास दांडगा आहे.” मग प्रधानांकडे
वळून ते म्हणाले, “तपास कुठवर आला इन्स्पेक्टर? आपल्यापाशी फार वेळ नाही. दोन
तासांमध्ये हिरा एअरपोर्टला पोहोचला नाही, तर सगळंच अवघड होऊन बसेल. फार शरमेची
गोष्ट असेल ती.”
“रेड
होप इन्शुअर्ड आहे?” बिकाने त्याच्या खास तुटक शैलीत मध्येच विचारलं.
“नव्हता
आधी. या प्रदर्शनात जाण्यासाठी आम्ही विमा उतरवला ब्लड डायमंडचा.” विक्रांत
सरंजामे म्हणाले.
“ब्लड
डायमंड?” बिकाने चमकून विचारलं.
विक्रांत
हसून म्हणाले, “डोन्ट गेट राँग आयडियाज. पपा त्याला रक्तमणी म्हणतात. मला ते ओल्ड
फॅशन्ड वाटतं. असाही त्याचा रंग लाल आहे. रक्तासारखा लाल. त्यामुळे मी त्याला ब्लड
डायमंड म्हणतो.”
“इन्शुरन्स
हिंदुस्तान कंपनीचा आहे? ओह... आय सी.”
हिंदुस्तान
कंपनीच्या सीईओंच्या हरवलेल्या मुलीला शोधण्यात बिकाने मोठी भूमिका बजावली होती.
तेव्हापासून त्यांचा बिकावर गाढ विश्वास बसला होता. इतक्या हाय प्रोफाइल केसमध्ये
आपण कसे आलो, या प्रश्नाचं उत्तर बिकाला मिळालं. त्याच्या कपाळावरच्या आठ्या आणखी
गडद झाल्या.
“आम्हाला
या प्रकरणाची वाच्यता नको आहे आणि त्यातून येणारी कुप्रसिद्धीही नको आहे, म्हणून
इन्स्पेक्टर प्रधानांच्या आणि इन्शुरन्स कंपनीच्या सूचनेनुसार तुम्हाला बोलावलं,”
नानासाहेब सरंजामे सांगत होते. “मिस्टर कारखानीस, रक्तमणी इथून बाहेर गेलेला नाही,
हे मी खात्रीने सांगू शकतो. इथला बंदोबस्त भेदताच येणार नाही कुणाला. तसा
प्रयत्नही झालेला नाही. शिवाय तुम्ही आमचा राजदंडही तपासून पाहिलेला आहे. म्हणजे
आम्ही विम्याच्या पैशांसाठी काही जादूचे प्रयोग करत नाही आहोत, याची तुम्हाला
कल्पना आलीच असेल.”
नानासाहेबांचा
टोला मनावर न घेता ती काठी त्यांना परत करत बिका म्हणाला, “मला तुमची बेडरूम आणि
तिजोरी पाहायची आहे. विक्रांतसाहेबही त्याच मजल्यावर राहतात ना?”
“हो
आणि रात्री मी शेजारच्याच बेडरूममध्ये होतो. पपांना हिप्नोटाइझ करून त्यांच्याकडून
चावी काढून ब्लड डायमंड काढून घेण्याचा पूर्ण चान्स मला होता. पण, तो लपवायला
माझ्याकडे जागा नाही मिस्टर कारखानीस. जे काही तपासण्यासारखं होतं, ते इन्स्पेक्टर
प्रधानांनी तपासून झालेलं आहे,” विक्रांत सरंजामे हसून म्हणाले, पण, बिकाने
नानासाहेबांवर संशय घेतलेला त्यांना फारसं आवडलेलं नाही, हे स्पष्ट होतं. त्यांनी
थकलेल्या नानासाहेबांना आधार देऊन उभं केलं आणि म्हणाले “पपा, आज तुमचं सगळं
शेड्यूल कोलमडलंय. आता उद्या पहाटे क्लबला गेला नाहीत, तरी चालेल. थकलाहात तुम्ही
खूप.”
“नो
वे. आकाश कोसळलं तरी व्यायाम चुकवायचा नाही.”
“या
वयात इतकं हट्टी असणं बरं नाही पपा.” वर पोहोचल्यावर विक्रांत म्हणाले, “इफ यू
डोन्ट माइंड, मी आल्यापासून याच कपड्यांमध्ये आहे. शॉवर घेऊन फ्रेश होऊन चेंज करतो
आणि तुमच्या स्वागताला सज्ज राहतो माझ्या बेडरूममध्ये.”
नानासाहेबांची
बेडरूम आणि ती मुलायम बेडशीटची मऊमऊ गादी पाहिल्यावर बन्याचे डोळेच मिटायला लागले.
बिकामामाने त्याला सर्वांच्या नकळत एक चिमटा काढून जागं केलं आणि तो त्या
बेडरूममध्ये फिरायला लागला. “मसाज किती वाजता घेतलात तुम्ही नानासाहेब”, त्याने
विचारलं. ते उत्तरले, “नऊ वाजता. नऊ पाचला हरीराम मसाज करून गेला. त्याच्या त्या
मर्दनाने डोकं हलकं झालं होतं. कष्टानेच मी डोळे उघडले आणि पुस्तक घेऊन वाचत
बसलो.”
“वेळ
तुम्ही समोरच्या घड्याळात पाहिली की...”,
“हो
हो, अर्थातच. मी जुन्या जमान्यातला माणूस आहे. नवी साधनं वापरत नाही,” नानासाहेब
हसण्याचा प्रयत्न करत म्हणाले. त्यांच्या चेहऱ्यावर आता तणाव आणि थकवा, दोन्ही
दिसत होतं.
बिका
म्हणाला, “आम्ही विक्रांतसाहेबांच्या बेडरूमला एक भेट देऊन खाली जातो. तुम्ही
विश्रांती करा. तुम्ही माझ्यावर खूप विश्वास ठेवून मला बोलावलंय. पण, तुम्ही जे
सांगताय त्यावरून तरी मला ही केस माझ्या आकलनापलीकडची वाटते आहे. तुमचा हिरा
अदृश्य झाला की काय, असंच वाटायला लागलंय मला. विक्रांतसाहेबांना भेटून मीही
निघेन. इन्स्पेक्टरसाहेबांनीही बंदोबस्त ठेवण्याची गरज आहे, असं मला वाटत नाही.
माझ्या मते, हिरा प्रधानसाहेब येण्याच्या आधीच इथून गायब झालेला आहे. कसा, ते
सांगणं कठीण आहे. पण, आज इथे भुई धोपटण्यात काहीच अर्थ नाही, एवढं खरं.”
बिकामामाचं
हे बोलणं ऐकून बन्याचा पुरता हिरमोड झाला होता. आतापर्यंत हिरो वाटत असलेला मामा
त्याला झिरो वाटायला लागला. “अर्थात तुमचं फारसं नुकसान होणार नाही,” बिका
चष्म्याशी चाळा करत म्हणाला, “इन्शुरन्समधून तुमचं नुकसान भरून मिळेल.”
“प्रश्न
पैशांचा नाही, इभ्रतीचा आहे मिस्टर कारखानीस, फक्त आमच्याच नाही, देशाच्या
इभ्रतीचा.”, नानासाहेबांच्या बोलण्यात विषादयुक्त धार होती, “कोहिनूर गमावलेल्या
या देशाकडे त्याच वकुबाचा एक हिरा आहे, हे दाखवण्याची संधी होती ती मिस्टर
कारखानीस. त्या धुळीला मिळाल्याचं दु:ख तुम्हाला कळणार नाही. एनीवे, गुडनाइट
जंटलमेन.”
हिऱ्याचा
शोधच लागणार नाही, हे बिकाने अशा घाईने जाहीर केल्यामुळे हबकलेल्या प्रधानांनी
त्याच्या मागोमाग विक्रांत सरंजामेंच्या बेडरूमकडे धाव घेतली. मखमली, सोनेरी रोब
घातलेले विक्रांत सरंजामे नक्षीच्या टेबलावर उंची मद्याचा चषक भरून त्यांची वाट
पाहात होते. त्यांच्या दुसऱ्या हातात राजदंड होता. तो पाहिल्यावर बिकाच्या
चेहऱ्यावर आश्चर्य उमटलं आणि ते टिपून विक्रांत सरंजामे हसत म्हणाले, “वुड यू केअर
टु जॉइन जंटलमेन... ओ नो, यू आर ऑन ड्यूटी. मिस्टर कारखानीस, असे चक्रावू नका. ही
माझी काठी आहे. आमच्या घराण्यात श्रीमंत आणि युवराज यांच्यासाठी हे दोन दंड
बनवण्यात आलेले आहेत. सेम टु सेम आणि त्या दंडाप्रमाणेच याची मूठही मोकळीच आहे बरं
का!”, विक्रांत सरंजामेंनी त्यांच्याकडच्या राजदंडाची मूठ उघडली होती. ती रिकामी
होती आणि ते मिष्कील हसत होते. “नाइस पीस,”, बिकामामाने काठी हातात घेतली. पण आता
त्याने ती काही फार तपासली नाही. त्याचा या तपासातला रसच उडाल्यासारखं झालं होतं.
तपास काही पुढे जाणं शक्य नाही, आम्ही इथेच थांबतो आहोत, उद्या सकाळी शांत
डोक्याने पुढचं काय ते पाहू या, असं इन्स्पेक्टर प्रधानांनी विक्रांतना सांगितलं.
“म्हणजे, मिस्टर कारखानीस, तुम्हीही हार मानलीत? मिस्टर मस्करेन्हास हॅड हाय होप्स
फ्रॉम यू. मला म्हणाले होते की बिका इज ब्रिलियंट. ऑफ कोर्स आमच्या ब्लड डायमंडची
केस फारच विचित्र होऊन बसली आहे, यात शंका नाही. एनीवे. उद्या सकाळी भेटू या.”
************************
इन्स्पेक्टर
प्रधानांची गाडी बाहेर पडत होती, तेव्हा तिकडे बंगला शांत होता, दिवे मालवले जात
होते, मात्र इकडे बन्या भलताच हिरमुसला होता. तोंड पाडून तो बिकामामाच्या शेजारी
अर्धवट झोपेत पेंगत बसला होता. आपल्या लाडक्या मामाची पहिली केस आपण पाहिली, तीही
अपयशी, या कल्पनेनेच तो कमालीचा खट्टू झाला होता. त्याच्या डोळ्यांवर पेंग येत
होती... अस्वलाने बिकामामाला फटका मारलाय आणि तो निश्चेष्ट पडलाय, असलं काहीतरी
चित्र त्याच्या डोळ्यांसमोर तरळायला लागलं... तो मलूल होऊन मामाच्या कुशीत
शिरला...
************************
पहाटे
पाच वाजता जलमहालाच्या पोर्चमधून निळी कॅडिलॅक झोकात निघाली. बरोब्बर साडे पाचच्या
ठोक्याला ती रॉयल बॉम्बे क्लबच्या दारातून आत शिरली. दरवानाने श्रीमंत नानासाहेब
सरंजाम्यांना सलाम ठोकला. ते गाडी व्हॅलेकडे सोपवून एका हातात एक छोटीशी बॅग घेऊन
दुसऱ्या हातात लगबगीने आत शिरले. तसेच प्रशस्त हॉलच्या पलीकडच्या दाराने ते
प्रसाधनगृहाकडे चालू लागले. दारात पोहोचण्याआधीच त्यांच्या पायात कुणीतरी
लुडबुडलं. अरेच्चा, हा मुलगा इथे कसा, हा विचार बन्याला पाहून त्यांच्या मनात आला
आणि त्याच्या “गुडमॉर्निंग आजोबा”ला ते उत्तर देणार तोच समोर पाहून ते थबकले.
प्रसाधनगृहाकडे जाणाऱ्या पॅसेजच्या दारात इन्स्पेक्टर प्रधान आणि बिपीन कारखानीस
उभे होते. त्यांनी झटकन् मागे नजर टाकली. मुख्य दारापाशीही भक्कम अंगकाठीची दोन
माणसं उभी होती. खांदे उडवून ते पलीकडच्या एका सोफ्याकडे गेले आणि त्यावर तोल
गेल्यासारखे बसले.
“तुम्हीच
हा सगळा खेळ रचला होतात ना नानासाहेब?” प्रधानांनी मान खाली घालून बसलेल्या करड्या
आवाजात विचारलं.
“नानासाहेब
नाहीत, हे विक्रांत काका आहेत,” बन्या उत्तेजित स्वरात म्हणाला, “त्यांच्या
तोंडाला त्या काल रात्रीच्या ड्रिंकचा वास येतोय अजून.”
प्रधानांनी
चमकून बिकाकडे पाहिलं. त्याच्या चेहऱ्यावर मिष्कील हसू होतं. त्याने पुढे होऊन
नानासाहेब ऊर्फ विक्रांत सरंजामेंच्या हातातली काठी काढून घेतली. तिची मूठ त्याने
उघडली आणि तिच्यातून गुलाबीसर प्रभा फाकवणारा छोट्या पेरूच्या आकाराचा रेड होप
त्याच्या तळहातावर विसावला.
**************************
“विक्रांतसाहेब
बिटकॉइनच्या व्यवहारात गुंतलेले आहेत, कर्जात बुडालेले आहेत, याची तुम्हाला
कल्पनाही येऊ दिली नव्हती त्यांनी,” आपल्या मुलाच्या प्रतापाच्या धक्क्याने
हादरलेल्या आणि त्यानेच दिलेल्या गुंगीच्या औषधाच्या प्रभावातून अजून पुरत्या
बाहेर न आलेल्या नानासाहेबांना बिका सांगत होता. काल मी तुमची काठी चेक केली,
तेव्हा त्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. त्यांच्याकडेही तसाच राजदंड आहे, हे
आपल्या बोलण्यातून मला कळणार आणि मी तोही तपासणार, याची त्यांना कल्पना आली.
म्हणूनच त्यांनी वर पोहोचल्यावर काठ्यांची अदलाबदल करून मला पुन्हा तुमचीच काठी
दाखवली. तिच्यावर मी तुमच्या नकळत एक छोटीशी खूण केली आहे, हे त्यांना माहिती
नव्हतं. हिरा लपवलेला दंड नेमका कुठे आहे, इथे आहे की बाहेर पाठवण्यात आला आहे, हे
माहिती नसल्याने मी तपासच बंद करण्याचा डाव खेळलो आणि विक्रांतसाहेब त्यात अलगद
अडकले. आम्ही महालावर नजर ठेवून असूच, हे त्यांना माहिती होतं. ते बाहेर पडलेले
दिसले असते, तर पकडले गेले असते. म्हणूनच त्यांनी सकाळी तुम्ही क्लबात जाणार
आहातच, असं तुमच्या तोंडून आमच्या उपस्थितीत वदवून घेतलं होतं. तुमचा पाठलाग आम्ही
करणार नाही आणि केला तरी तुम्ही क्लबात गेल्यावर तो थांबेल, अशी त्यांची कल्पना
होती. ते आत टॉयलेटमध्ये जाऊन सगळा गेट अप काढून मागच्या दाराने बाहेर पडून
दुसऱ्या गाडीतून निघून जाणार होते. रेड होप मग समुद्रमार्गाने पाकिस्तानात आणि
रस्तेमार्गाने अफगाणिस्तानमार्गे पुढे निघून जाणार होता.”
“पण
काही हजार कोटी रुपयांचा व्यवहार गुप्तपणे कसा करता आला असता विक्रांतसाहेबांना?”
इन्स्पेक्टर प्रधानांनी विचारलं.
“काका,
पनामामधल्या, मॉरिशसमधल्या, आफ्रिकेतल्या काही कंपन्यांनी सरंजामे ग्रूप ऑफ
इंडस्ट्रीजमध्ये भरभरून गुंतवणूक केली असती. शिवाय इन्शुरन्स कंपनीकडून भरपाई
मिळाली असतीच.”
“पण
मला अजूनही एका गोष्टीचा उलगडा झालेला नाही. तिजोरीच्या चाव्या सर्व वेळ माझ्याकडे
असताना त्याने हिरा काढला कधी?”
“हरीरामने
तुम्हाला मालिश केल्यानंतर. हरीरामने तुम्हाला मालिश केलं त्या तेलात
विक्रांतसाहेबांनी अगदी हलका डोस मिसळला होता गुंगीच्या औषधाचा. म्हणूनच तिथे आमचा
बन्याही झोपाळला आणि ढेपाळला. तुम्ही हलक्या गुंगीत असणार हे माहिती असल्यामुळे
विक्रांतसाहेब आत आले, त्यांनी तुमच्या नाकासमोर थोडा तीव्र डोस धरला. तुम्ही
झोपलात, त्यांनी चावी घेऊन हिरा काढला. चावी तुमच्याकडे होती तशी ठेवली आणि
घड्याळाचे काटे नऊवर आणून ते दार आपटून बाहेर पडले.”
“दार
आपटून? का?”
“त्या
आवाजाने तुम्ही हलक्या गुंगीतून जागे झालात. समोर नऊ वाजलेले दिसले. तुम्ही दाराचा
आवाज विसरला होतात. आपला वेळ गेलेलाच नाही, अशा समजुतीने तुम्ही वाचायला बसलात.”
“पण,
आपण पुन्हा वर आलो तेव्हा घड्याळ राइट टाइम होतं मामा,” बन्याने पॉइंट काढला.
“कारण
विक्रांतसाहेबांना काटे पुन्हा फिरवायला खूप वेळ होता आपण सगळे खाली होतो तेव्हा.
अब आयी बात समझ में.”
**************************
नानासाहेबांची
कॅडिलॅक मलबार हिल उतरत होती, तेव्हा सकाळची कोवळी उन्हं पसरली होती. मॉर्निंग
वॉक, व्यायाम करणारी मंडळी लगबगीने वर चालली होती. काल रात्री इथे काही हजार कोटी
रुपयांचं केवढं मोठं प्रकरण घडलं, याची त्यांना कल्पना नव्हती आणि ते त्यांना
कधीही माहिती होणार नव्हतं.
“बन्या,
तुझी गाडी तर चुकली की रे. आता जाऊन झोपशील ना डाराडूर?”, बिकामामाने विचारलं.
“छ्या!
आय अॅम सो एक्सायटेड. माझा विश्वासच बसत नाहीये मी एवढ्या मोठ्या केसमध्ये
तुझ्याबरोबर होतो. आता मला झोपच येणार नाही.”
“भाच्या,
मामावर गेलायस लेका,” बिकामामा म्हणाला आणि त्याने ड्रायव्हरला सांगितलं, “कयानीला
सोडा आम्हाला. भाच्या, काल रात्रीपासून आता पहिल्यांदा भूक लागलीये. मस्त खिमा
पॅटीस, आकुरी आणि कडक ब्रून खायला घालतो. वर एकेक पानी कम. आपल्या दोघांच्या
पहिल्या केसचं सेलिब्रेशन.”
अत्यानंदाने
बन्याची जीभ टाळूला चिकटली आणि त्याच्याही नकळत, त्याच्या आयुष्यात पहिल्यांदाच
भा. रा. भागवतांच्या बनेश फेणेप्रमाणे बनेश बेणारेच्या तोंडून ‘ट्टॉक्’ असा आवाज
निघाला!
No comments:
Post a Comment