Monday, September 19, 2011

महा रोबोट्रीक्स

आमचा ऊर अभिमानानं भरून आला आहे.. एक नव्हे तर दोन दोन महापालिकांबद्दलचा हा अभिमान असल्यानं आता छाती फुटून मरण ओढवते की काय अशी अवस्था झाली आहे, तरी आम्ही प्राण पणाला लावून खूष आहोत. मुंबई महापालिका आणि कल्याण डोंबिवली महापालिका या त्या आमच्या अत्यादरास पात्र आणि अत्यानंदास कारण ठरलेल्या दोन महापालिका आहेत.. यापूर्वी कल्याणच्या रस्त्यांसाठी महापालिकेला राष्ट्रीय सन्मान मिळाला होता, तेव्हाही आम्हाला असाच अत्यानंद झाला होता.. परंतु, दूधनाक्यावरच्या एका- महापालिकेच्या गुळगुळीत गालावरची तीटच जणू अशा- छोटुकल्या खड्डय़ात स-सायकल कोसळून हाडं मोडल्याने रुग्णालयात जीवनमरणाच्या सीमेवर अत्यवस्थ स्थितीत निपचीत पडलो असल्याने त्या आनंदाचं साग्रसंगीत प्रकटीकरण करायचं राहूनच गेलं.. ती कसर भरून काढण्याची संधी आता मिळाली आहे. महापालिकांचा नागरिकांतर्फे नागरी सत्कार करण्याची पद्धत असती, तर या दोन महापालिकांचा आम्ही शिवाजी पार्कात किंवा दिल्लीच्या रामलीला मैदानातच सत्कार केला असता.
 
असा या पालिकांनी काय पराक्रम गाजवला आहे?
 
या पालिकांनी काही कामांसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरण्याचा इरादा जाहीर केला आहे. मुंबई महापालिका मोबाइलचा वापर करून खड्डे बुजवणार आहे.. अं अं अं.. गैरसमज नको- भंगारात निघालेले मोबाइल खड्डय़ांत ओतून ते बुजवण्याचं तंत्रज्ञान नाहीये हे.. कोणाही पादचा-यानं, वाहनचालकानं मोबाइलवरून रस्त्यातल्या खड्डय़ाचा फोटो काढून पाठवला की महापालिकेचे लोक डांबर-खडी वगैरे घेऊन निघणार आणि लगेच खड्डा बुजवून मोकळे होणार, इतकं सोपं तंत्रज्ञान आहे. विचार करा, मोबाइलचा शोध जरा लवकर लागला असता, तर कदाचित मुंबईतल्या रस्त्यांवर खड्डे पडलेच नसते. पण कालगतीला काय इलाज!
 
आता महापालिकेतले लोक मोबाइलच्या कॅमे-यानं काढलेल्या फोटोवरून हा खड्डा कोणता, हे कसं ओळखतील, असा प्रश्न आहे. पण, फोटोवरून खड्डा ओळखण्याचं प्रशिक्षण घेण्यासाठी काही उच्चाधिका-यांना महापालिकेच्या खर्चानं मंगळावर किंवा गेलाबाजार चंद्रावर तरी जाऊन यायला हरकत नाही. शिवाय, कोणत्याही रस्त्यावर एकमेकांसारखे दिसणारे दोन खड्डे पडले, तर कंत्राटदाराला जबर दंड आकारण्याची व्यवस्थाही करता येईल. एकाच रस्त्यावर एकमेकांसारखे दोन खड्डे पडू नयेत, सगळे खड्डे वेगवेगळे दिसावेत, यासाठी खास तंत्रज्ञानाचा वापर करता येईल. एवढं करूनही चुकून एका खड्डय़ाचा फोटो आला असताना दुसरा खड्डा बुजवला गेलाच, तर पालिकेचे कर्मचारी जाऊन बुजवलेला खड्डा उकरून येतीलच.
 
खड्डे बुजवण्यासाठी कोटय़वधी रुपये खर्चून ही अत्याधुनिक साधनं विकत घेतल्यानंतर वापराविना ती भंगारात काढायला लागली आणि महागडं प्रशिक्षण दिलेले कर्मचारी बसून पगार घेऊ लागले, तर तो पालिकेवरचा केवढा मोठा कलंक ठरेल. असं होऊ नये, यासाठी मुंबईच्या रस्त्यांवर बारा महिने तेरा काळ खड्डे असतीलच, याची विशेष व्यवस्था केली जाईल. एकदा बुजवलेला खड्डा ७२ तासांच्या आत आपोआप पुन्हा उकरला गेला नाही, तर ते काम करणा-या कंत्राटदाराला काळय़ा यादीत टाकण्याची व्यवस्था करता येईल.
 
असंच दुसरं यंत्र अत्योपयोगी यंत्र नालेसफाई करणारा रोबो.
 लवकरच जेसीबी, पोर्कलेन आणि ड्रेजर या तिन्ही यंत्रांचं काम करणारा रोबो नालेसफाईच्या कामासाठी वापरण्यात येणार आहे. म्हणजे इतके दिवस या तीन यंत्रांवर काम सोपवून ती चालवण्याची जबाबदारी असलेली माणसं शिटय़ा मारत फिरायला मोकळी होत होती. आता रोबोवर काम सोपवून जेसीबी, पोर्कलेन आणि ड्रेजरही (आपापल्या मगदुरानुसार) शिटय़ा मारत फिरायला मोकळे होतील.
नालेसफाईचं एक बरं असतं. तिचं फक्त कंत्राट काढायचं असतं. कंत्राट घ्यायचं असतं. त्यानिमित्तानं जे काही द्यायचं-घ्यायचं असतं ते घ्यायचं-द्यायचं असतं. बास! प्रत्यक्ष नालेसफाई करण्याचं बंधन कोणावरही नाही. कारण समजा कोणी खरोखरीच गाळ काढलाच, तर महान मुंबईकर प्लॅस्टिक, निर्माल्य, कचरा वगैरे टाकून नवा गाळ निर्माण करतातच. त्यापेक्षा सगळा साचून मुंबई पुरती गाळात गेली, राजाबाई टॉवरचं टोकही गाळात दिसेनासं होतं की काय अशी परिस्थिती आलीच, तर उपसूयात की एकदमच गाळ. म्हणून तर दर वर्षी कोटय़वधी रुपये गाळात घातले जातात, गाळ आणखी वाढतो, मग पुढच्या वर्षी वाढीव रक्कम गाळात.
 
आता रोबो आल्यामुळं हे काम फारच सोपं होईल.
 
म्हणजे नालेसफाई होणार नाहीच; पण, यंदा नालेसफाई का झाली नाही, पावसाळय़ात पाणी साचून उपनगरी रेल्वेमार्गावर होडय़ा आणि लाँचेस चालवण्याची पाळी का आली, या दर वर्षी विचारल्या जाणा-या प्रश्नाचं उत्तर देणं एकदम सोपं होऊन जाईल.. नालेसफाईसाठी नेमलेल्या रोबोंनी रजनीकांतचा रोबो सिनेमा पाहून बंड केल्यामुळे हे काम वेळेत पूर्ण होऊ शकलं नाही. सगळे रोबो पालिका कार्यालयांसमोरच्या टप-यांवर चहापाणी करण्यात आणि विडय़ा-सिगारेटी फुंकण्यात मग्न असल्याने मानवी कर्मचारी कोणते आणि रोबो कोणते, हे कळेनासे झाले आहे..
 
अर्थात रोबोंनी पालिका कर्मचा-यांच्या संगतीत राहून आणि शरद रावांची भाषणं ऐकून ऐन कामाच्या वेळीच काम बंद आंदोलनपुकारलं, असंही कारण देता येऊ शकेलच.
 
तिकडे कडोंमपाने कचराकुंडय़ांवर सीसीटीव्ही लावण्याचा निर्णय घेतलाय. म्हणजे कचरा कुंडीवरून ओसंडून वाहू लागला रे लागला की नियंत्रणकक्षातून कंत्राटदाराला फर्मान जाणार. लगेच गाडी जाणार, कचराकुंडी रिकामी करणार. शिवाय, कुत्र्यांची अनसेन्सॉर्ड प्रणयदृश्यं, हाडकांच्या वाटणीवरून दबंगटाइप मारामा-या, निर्माल्याच्या पिशवीतून अंडय़ाची टरफलं टाकणा-या एंएं कांकू वगैरे मनोरंजक दृष्यंही टिपली जातील. परदेशांतले डोंबिवलीकर होमसीक झाले की यू टय़ूबवर आपल्या प्रिय शहरातल्या कचराकुंडय़ांचे व्हिडिओ पाहतील आणि डोळय़ांबरोबरच त्यांची नाकंही धन्य होतील.
 या दोन्ही पालिकांनी यांत्रिकीकरणाचं एवढं मनावरच घेतलं असेल, तर, टेबलाखाली नोटा मोजून त्या बरोबर असल्यास टेबलावरची फाइल पुढे सरकवणारे यंत्र, चहावाला-पानवाला यांच्याकडे नेऊन आणणारी चाकांची स्वयंचलित खुर्ची, घरच्या घरी बोट लावताच कार्यालयात हजेरी लावणारे यंत्र, अशी आणखी काही उपयुक्त यंत्रं ताबडतोब बसवावीत, अशी आमची शिफारस आहे.

(चित्र : प्रदीप म्हापसेकर)

(प्रहार, १८ सप्टेंबर, २०११)

No comments:

Post a Comment