Friday, February 11, 2011

उत्स्फूर्त प्रतिक्रिया!

महाराष्ट्रात हे चित्र तसं जुनंच आहे..
 
आजवर फोटोंमध्ये दिसायचं, आता लाइव्हकिंवा रेकॉर्डेड दृश्यांच्या स्वरूपात दिसतं..
 
काचांचा खच.. वायरी तोडलेले लोंबकळणारे फोन.. फोडलेले कम्प्युटर.. तोडलेले कॅमेरे.. उधळलेल्या कागदांचा खच.. बघताक्षणी पब्लिकला लक्षात येतं.. हे एखाद्या वर्तमानपत्राचं किंवा वृत्तवाहिनीचं कार्यालय असणार.. कोणत्या तरी पक्षाच्या-नेत्याचा या वर्तमानपत्रानं/वाहिनीनं घनघोर अपमान केलेला असणार. त्याने महाराष्ट्रातील तमाम जनता- जी या नेत्यावर/ पक्षावर निस्सीम प्रेम करते आणि जिला त्याचा अपमान कदापिही सहन होत नाही- ती जनता दुखावली गेली आहे. त्या जनतेची आणि त्या नेत्याच्या/ पक्षाच्या कार्यकर्त्यांची उत्स्फूर्त प्रतिक्रियाया कार्यालयात उमटली आहे..
 
..मग कॅमेरा गालावर पाच बोटे उमटलेल्या/ हात बँडेजमध्ये गुंडाळलेल्या/ डोके फुटलेल्या/ शर्ट फाटलेल्या/ तोंडाला काळे फासलेल्या/ रक्तबंबाळ झालेल्या/ स्ट्रेचरवरून हॉस्पिटलात ऑपरेशन थिएटरमध्ये नेले जात असलेल्या किंवा हे सगळेच झालेल्या एका इसमावर जातो.. पब्लिकला लगेच कळते की हाच या वृत्तपत्राचा किंवा वृत्तवाहिनीचा संपादक असणार.. याच उद्दाम इसमाने राज्याच्या मानबिंदूवर चिखल उडवण्याचा धंदा केला असणार आणि तो मानबिंदू उरापोटाशी बाळगणा-या कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रियेचा प्रसाद या गृहस्थालाही मिळाला असणार..
 
.. कोठेही रक्त निघाले की पाहणाऱ्यांना भयंकर आनंद होतो.
 
.. कोठेही नासधूस दिसली की प्रेक्षकांचे डोळे निवतात.
 
.. त्यात पत्रकार तर अतिशहाणे. ते सतत कोणाला ना कोणाला दुखावतच असतात. त्यांना चार फटके पडले की पब्लिकला- पाकीटमार म्हणून ४० जणांकडून बडवल्या जाणा-या एखाद्या अर्धमेल्या इसमावर गर्दीतून लत्ताप्रहार केल्यानंतर जो मिळतो, तसाच- आनंद मिळतो.
 
..गंभीर चेहरा करण्याची पराकाष्ठा करून राजकीय नेते कॅमे-यासमोर येतात आणि म्हणतात, ‘हा लोकशाहीवरचा हल्ला आहे. याचा तीव्र निषेध करायला हवा.तेव्हा, त्यांचे समर्थक मागे आमच्या सायबाबद्दल बोलून तर बघा,’ अशा आविर्भावात शर्टाच्या बाह्या वर सरकवत असतात.
 
.. आणखी एखादा नेता सांगतो, ‘लोकशाहीत मतभेदांवर चर्चा केली पाहिजे. मारहाण, मोडतोड हा काही मार्ग नव्हे.त्या वेळी मागे त्याच्या कार्यकर्त्यांनी भूतकाळात उमटवलेल्या उत्स्फूर्त प्रतिक्रियेची दृश्यं दिसत असतात..
 
..काचांचा खच.. वायरी तोडलेले लोंबकळणारे फोन.. फोडलेले कम्प्युटर.. तोडलेले कॅमेरे.. उधळलेल्या कागदांचा खच.. जखमी पत्रकार..
 
..परवाही हेच चित्र दिसलं.. पण, त्याबरोबरच एक अघटितही घडलं..
 
..हल्लेखोरांनी संपादकावर हात उगारताच त्यांचे काही सहकारी पुढे झाले.. त्यांनी हल्लेखोरांना अडवण्याचा प्रयत्न केला.. तो विफल ठरल्यानंतर मग पत्रकारांची उत्स्फूर्त प्रतिक्रियाउमटली.. हल्लेखोरांना आधी चक्क प्रतिकार झाला.. पत्रकारांसारख्या बुळ्या मंडळींकडून अशा प्रतिसादाची अपेक्षाच नसलेले उत्स्फूर्त कार्यकर्तेगडबडले आणि मग हल्ला अर्धवट सोडून सैरावैरा पळू लागले.. मग पत्रकारांची उत्स्फूर्त प्रतिक्रियाआणखी तीव्र झाली.. मराठी पत्रकारितेच्या इतिहासात बहुधा पहिल्यांदाच पत्रकारांवर हल्ले करायला गेलेल्यांना बेदम चोप मिळाला..
 
..तमाम उत्स्फूर्त कार्यकर्त्यांना हा इशारा आहे..
 
..स्वत: स्टेनगनधारी कमांडोंच्या गराड्यात सुरक्षित राहून तरुणांची डोकी फिरवणा-या, त्यांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रियांची कळसूत्रे पडद्याआडून हलवणा-या पगारी नेत्यांनाही हा इशारा आहे..
 
..जशी मराठी भाषा, मराठी अस्मिता, मुंबई महानगरी ही कुणाची मक्तेदारी नाही, तशीच उत्स्फूर्त प्रतिक्रियाही कोणा पक्षाची/ कार्यकर्त्यांची मक्तेदारी नाही..
 
..काही काळाने हे दृश्यही पाहण्याची तयारी ठेवा की, वर्तमानपत्रावर/ वाहिनीवर नुकताच हल्ला झाला आहे.. हल्लेखोरांचे नेते पत्रकारांसमोर मोठ्या त्वेषाने बाइटदेत आहेत.. आमच्या महानेत्याचा अपमान महाराष्ट्रातील जनता कदापि सहन करणार नाही. त्यांच्यावर जिवापाड प्रेम करणा-या कार्यकर्त्यांची ही उत्स्फूर्त प्रतिक्रियाआहे..
 
.. त्याच वेळी, त्याच पत्रकार परिषदेत कॅमे-याचे स्टँड उचलले जात असतील, चप्पल-बुटांचे नेम धरले गेले असतील, माइकची दांडकी सरसावली असतील..
 
उत्स्फूर्त प्रतिक्रियेची ती पूर्वतयारी असेल! 

(22/11/09)

1 comment:

  1. and those leaders and their fellow workers who got solid 'bites' from the journalists would probably express their protest by Dharana or fasting...

    ReplyDelete