Friday, February 11, 2011

मेंढीकोट

माणसांनी मेंढरं बनायचं नेमकं कधी ठरवलं, ते अचूक सांगता येणं कठीण.
 
पण, हा प्रकार फार प्राचीन काळापासून सुरू आहे, असं खात्रीनं सांगता येईल.
 
त्यामुळेच तर ख्रिस्ती धर्मग्रंथांमध्ये मेंढरं आणि मेंढपाळांची रूपकं वारंवार येत असतात.. सामान्यजन म्हणजे मेंढरं आणि प्रेषित किंवा देवदूत म्हणजे मेंढपाळ.
 
मेंढपाळ नेईल तिकडे जायचं. तो चारील तिथे चरायचं. बदल्यात त्याला लोकर देत राहायचं. किती सुखाचं आयुष्य! कळपातलं मेंढरू बनण्यात फायदे फार. रोजच्या दोन घासांची निश्चिंती. उद्या काय करायचं, कुठे जायचं, आयुष्यात पुढे काय करायचं, वगैरे विचार करण्याचे कष्ट नाहीत. कळपात वावरल्यामुळे हिंस्र् जनावरांची भीती नाही. अधूनमधून आपल्यातलं एखादं मेंढरू दिसेनासं होतं. एखाद्या तिन्हीसांजेला त्याचं करुण स्वरातलं बें बेंकेकाटणं पुसटसं कानावर येतं. त्या दिवशी मेंढपाळाच्या चुलाणावर रस्सा रटरटतो.. तेवढं फक्त नजरेआड करायचं.. मग अगदी सुखाचं आयुष्य.
 
आपल्या महाराष्ट्रातही मेंढरांची परंपरा मोठी. कोणी आईची मेंढरं, कोणी बाईची, कोणी भाईची, कोणी बापूची, कोणी माईची. कोणी तिरंगी कळपातली, कोणी निळय़ा झेंड्याची, कोणी भगव्या जरीपटक्याखाली एकवटणारी.
 
ख-या मेंढरांना मेंढपाळ दिसावा लागतो. तो त्यांच्यात असावा लागतो. चॅक चॅक, फिर्र्र्रवगैरे आवाज काढून त्यांना हाकण्याची ड्युटी त्याला जातीनं बजावावी लागते. तो बारा महिने तेरा काळ मेंढरांच्या बरोबर राहतो.
 
माणसाची जात फार हुशार. त्यामुळे त्यांच्यातली मेंढरंही फारच हुशार. त्यांना हाकलं जायला मेंढपाळ समोर असायची गरज नाही. मेंढपाळ समोर नसला तरी ती स्वत:च स्वत:ला त्याच्या नावाने हाकून घेतात. कुणी दिल्लीतून हाकली जातात, कुणी वांद्रय़ाच्या नाही तर शिवाजी पार्काच्या गल्लीतून. काहींना तर परलोकातून अदृश्य परमेश्वरी शक्ती हाकत असतात म्हणे!
 
अशाच एका, ‘रिमोट कंट्रोलने हाकल्या जाणा-या कळपाची ही कहाणी.
 
हा कळप मुख्यत: मुंबईतला. आधी गोरा साहेब त्याला हाकत होता. मग काळा साहेब हाकू लागला.
 
या मेंढरांची जातच वेगळी. अंगावर लोकर कमी, अंगात मांस कमी, पण, डोक्यात ताठा जास्त. अतिशय घाबरट आणि त्यामुळेच अतिशय आक्रमक. एकमेकांशी टकरी घेऊन एकमेकांची टकुरी फोडण्यात आणि तंगड्यात तंगड्या घालून एकमेकांना पाडण्यात एक्स्पर्ट.
 
मुंबईच्या रानात चरायचं कुणी, यावरून इतर जातीच्या मेंढरांशी त्यांचा छत्तीसचा आकडा. अशात एका मेंढपाळाने हाक दिली आणि सगळी मेंढरं त्याच्या कळपात सामील झाली. कळपाची संख्या कमी होते आहे, मेंढपाळाने पोसलेली खास मेंढरं आपल्या वाटय़ाचा, आपल्या हक्काचा चारा इतर जातीच्या मेंढरांच्या घशात घालतायत. आपण गमजा मारतोय मुंबई आमचीच्या, पण, प्रत्यक्षात मेंढपाळाच्या मूक संमतीनेच तिचा कोवळा, लुसलुशीत, हिरवागार चारा परक्यामुखी पडतोय.. आपल्या तोंडी सुकलं गवत लागलं तर लागलं अशी परिस्थिती आहे.. कळपातलं कुणी ना कुणी गायब होतंय, मेंढपाळाच्या चुलाणावर रोज रस्सा रटरटतोय.. यातलं काही म्हणजे काही पाहायचंच नाही, असा पणच या मेंढरांनी जणू केला होता. ती मुकी बिचारी कुणी हाकाया आपल्या बाण्याशी इमान राखून मेंढपाळामागून फरपटत होती.
 
अनेक वर्ष गेली. मेंढपाळाच्या घरात भाऊबंदकी शिरली. घरातलेच दोन भाऊ मेंढरांच्यासारखे एकमेकांशी टकरी घेऊ लागले. धाकट्यानं अखेर कळप सोडला. काही मेंढरं लगेच नव्या कळपात सामील झाली. आतापर्यंत एकजुटीनं इतर जातीच्या मेंढरांशी झुंजणारे आता एकमेकांत झुंजू लागले.. धाकट्यानं थोरल्याचा कळप मातीत मिळवण्याचा विडाच उचलला.. इतर जातीची मेंढरं आता या मेंढरांना फिदीफिदी हसू लागली.. एकमेकांत लढून हे सगळे संपून जातील आणि सगळं कुरण आपल्याला मोकळं होईल, असा मनात चारा चघळू लागली.. चार वर्षात धाकट्यानं थोरल्याला जेरीला आणला.. आता सगळा कळप धाकट्याच्याच मागे चालणार, अशी हवा झाली.. अशात..
 
अशात एक दिवस थोरल्याने धाकटय़ाला प्रेमभराने टपली मारली आणि लाडाने हाक मारली, ‘‘माझ्या सोन्या, माझ्या राजा..’’
 
धाकटय़ाने थोरल्याचा गालगुच्चा घेऊन प्रेमभराने त्याला मिठी मारली आणि म्हणाला, ‘‘माझा दादुला, फोटुग्राफीत चांगला..’’
 
ही भरतभेट पाहून सगळी मेंढरं गपगार झाली..
 विठ्ठला, कोणता झेंडा घेऊ हातीम्हणून कळवळणा-यांवर त्याच झेंडय़ाची काठी मारून घेऊ माथीअसं म्हणण्याची पाळी आली..
कुणाला वाटेल की,
 
हेच व्हायचं होतं तर इतके दिवस एकमेकांशी टकरी घेऊन आमची टक्कुरी का सुजवलीत, असा प्रश्न मेंढरं करतील..
 
कुणाला वाटेल की,
 
दोन्ही भावांनी मिळून आपली डबल लोकर भादरली, हे मेंढरांच्या ध्यानात येईल..
 
यातलं काहीही होणार नाही..
 
सगळी मेंढरं मुकाट दोघांच्या मागून चालायला सुरुवात करतील..
 
माणसांनी मेंढरं बनण्याचं कधी ठरवलं, हे सांगता येणं कठीण असलं तरी माणसं मेंढरं बनणं कधी थांबवतील, हे सांगणं अगदीच सोपं आहे..
 
कधीच नाही.  

(चित्र : प्रदीप म्हापसेकर)
(23/5/10)

No comments:

Post a Comment