Friday, February 11, 2011

संमेलनातली पायी ‘चक्कर’

चल चल चल, लवकर पाय उचल, बा वाचका! आपल्याला पुण्याला जायचं आहे. कशाला, म्हणून विचारतोयस. अरे, पुण्याच्या साहित्य संमेलनात साहित्यिकांची तौबा गर्दी उसळल्याचं वृत्त आहे.नेहमीप्रमाणे ही गर्दी संमेलनाच्या मंडपात उसळलेली नाही.पण, नेहमीप्रमाणे ती जेवणावळीच्या ठिकाणीही उसळलेली नसल्याने जाणकार बुचकळ्यात पडले आहेत.अरेच्चा! मग कोठे बरे उसळली आहे ही गर्दी?आलंच हे पुणं आणि हे संमेलन स्थळ. आता बा वाचका, त्या जाणकारांना बुचकळय़ातच सोडून आपण मंडपापलीकडच्या मैदानात येऊयात. इथे ही जी भली मोठी रांग लागली आहे ना, तीच आहे आपल्या साहित्यिकांची रांग. महाराष्ट्रात एवढय़ा संख्येने साहित्यिक आहेत, हे आज पहिल्यांदाच कळलं ना तुला? उगाच नाहीत म्हणत, पुणे तिथे काय उणे!हे एवढे लोक साहित्यिक आहेत, यावर तुझा विश्वास बसत नाही का बा वाचका? मग आपण एखाद्या असाहित्यिक दिसणाऱ्या इसमाला गाठून खातरजमा करून घेऊयात. ‘‘नमस्कार! आपण काय करता?’’‘‘रांगेत उभा आहे..’’याला म्हणतात पुणेरी उत्तर.. ‘‘अहो काका, तसं नव्हे. तुम्ही एरवी काय करता?’’‘‘एरवी काय करता म्हणजे? ही लाइन कोणाची आहे?’’‘‘साहित्यिकांची.’’‘‘मग, या लाइनीत मी उभा आहे, याचा अर्थ काय?’’‘‘तुम्ही साहित्यिक आहात.’’‘‘हे तुम्हाला आपोआप कळायला पाहिजे होतं ना? बाहेरगावचे दिसताय तुम्ही?’’‘‘हो हो हो, अगदी बरोब्बर ओळखलंत. आपण साहित्यिक आहात म्हणजे काय लिहिता, कविता-कथा-कादंबरी?..’’‘‘काहीच नाही.’’‘‘ओहोहो! म्हणजे तुम्ही महामंडळाचे पदाधिकारी दिसताय..’’‘‘छय़ा बुवा!’’‘‘अहो, मग तुम्ही करता काय?’’‘‘अप्पा बळवंत चौकात पुस्तकं विकतो.’’‘‘मग तुम्ही साहित्यिक कसे?’’‘‘पेडगावचे का हो तुम्ही? अहो, पुस्तकं म्हणजे काय? साहित्य! बरोबर? ते मी विकतो. साहित्यला विकण्यातल्या इकप्रत्यय लागला की काय होतं? साहित्यिक!’’‘‘ओहोहोहोहो! असं आहे का? बरं मला सांगा. ही लाइन कशाकरता लागलीये?’’‘‘चक्कर मारण्याकरता.’’‘‘म्हणजे?’’‘‘तिकडे मैदानात ते सतीशकाका आहेत ना. ते सगळय़ा साहित्यिकांना एकेक राऊण्ड चक्कर मारतायत.. मर्सिडीझ गाडीतून.’’तर पाहिलंस बा वाचका!साहित्य संमेलनातला सर्वात साहित्यिकप्रिय उपक्रम आहे एक चक्कर मर्सिडीझमधून!चला, आता आपण एखाद्या साहित्यिकासारख्या दिसणा-या माणसाला गाठूया. ‘‘नमस्कार.’’‘‘रामराम.’’ ‘‘तुम्ही साहित्यविषयक उपक्रम सोडून, पुस्तक प्रदर्शने सोडून या रांगेत असाहित्यिक अशा कामासाठी कसे काय उभे आहात?’’‘‘यात मुळात असाहित्यिक काय आहे? साहित्य म्हणजे काय? जीवनानुभव. मर्सिडीझमधून फिरणे, हाही एक प्रकारचा जीवनानुभव आहेच. तो मराठी साहित्य लिहून मला मिळू शकेल का? तो आता सतीशजी देतायत, तर तो मी घेतला पाहिजे. त्यावरचा माझा विचारप्रवर्तक लेख लवकरच वाचाल तुम्ही.’’अरे बापरे, ही तर धमकीच झाली. बा वाचका, आता आपण पुढच्या ताईंकडे जाऊयात. ‘‘ताई, मला सांगा तुम्हाला मर्सिडीझमधून का फिरायचंय?’’‘‘एकतर मला ताई म्हणू नका. मृदुल म्हणा, मृदुल. तुम्ही विचारताय, मला मर्सिडीझमधून का फिरायचंय? अहो, मला काय काय करायचंय? मला चांदण्यामध्ये नाहायचंय, झ-यातून वाहायचंय, चंद्रासाठी झुरायचंय, मर्सिडीझमधून फिरायचंय..’’‘‘थँक यू ताई!’’ अरे पळ, पळ बा वाचका! ताबडतोब ताईंपासून शक्य तेवढय़ा दूर जाऊयात. नाहीतर आणखी एक कवितास्त्र आदळेल आपल्यावर. हुश्श! आता इथे हे काका काय वाद घालतायत, ते पाहूयात.‘‘एक्स्क्यूज मी, काका! तुमचं काय म्हणणं आहे या सगळ्या प्रकारावर.’’‘‘अगदी नॉन्सेन्स प्रकार आहे हा! अटरली रिडिक्युलस!’’काकांनी एका वाक्यात एक इंग्रजी शब्द वापरला आणि दुसरं पूर्ण वाक्यच इंग्रजी. म्हणजे काका मराठी साहित्यिक आहेत, यात शंका नाही. ‘‘काका, या मर्सिडीझ फेरीच्या आयडियेत काहीही दम नाही, असं म्हणताय तुम्ही. पण मग गेले दोन तास इथे नंबर लावून का उभे आहात?’’‘‘अहो, मी त्या सतीशला भेटून सांगणार आहे की युवर आयडिया इज अ वेस्ट. त्यापेक्षा हे साहित्य संमेलन जर्मनीत घेतलं असतं, तरी काम भागलं असतं.’’‘‘कसं काय?’’‘‘अहो, जर्मनीत एअरपोर्टवर उतरल्यावर संमेलनस्थळाकडे जाण्यासाठी सगळय़ा साहित्यिकांना टॅक्सी करावी लागली असती. तिथे टॅक्सीच मर्सिडीझ आहेत! सोपं काम होतं ना. यू सी, व्हेन आय वॉज इन व्हिएन्ना..’’बा वाचका, इथूनही पळ चटकन. काका आता लंडन, पॅरिस, व्हिएन्ना, बुडापेस्ट, रोम सगळं फिरवून आणतील. भुसारी ट्रॅव्हल्सच्या कटकटे म्हातारे स्पेशल टूरमधून साडेसात दिवसांत युरोप पाहून आलेत ते नुकतेच. अरे, इथे हा वेगळाच प्रकार दिसतोय. हे लेखक महोदय रांगेतल्या रांगेत स्वत:ची पुस्तकं खपवतायत? पाहूयात तरी हा काय प्रकार आहे. पुस्तकाचं नाव पाहा, ‘यशस्वी साहित्यिक कसे बनायचे? साडे तेरा दिवसांत प्रख्यात साहित्यिक बनला नाहीत, तर संपूर्ण पैसे साडेसात वर्षानी परत.‘‘नमस्कार, तुमचं काय मत आहे या उपक्रमाबद्दल.’’‘‘अतिशय उत्कृष्ट उपक्रम आहे. असेच उपक्रम व्हायला हवेत. त्याशिवाय मराठी साहित्य पुढे जाणार नाही. मी माझ्या मराठी साहित्यिकांनो, मर्सिडीझचे स्वप्न पाहाया पुस्तकात ही क्रांतिकारक थिअरीच मांडणार आहे.’’‘‘कशी?’’‘‘मराठी साहित्य का मागे आहे? कारण, साहित्यिक मागे आहेत. ते जर सायकलींवर, स्कूटरवरून, गेलाबाजार रिक्षातून किंवा अगदीच डोक्यावरून पाणी फियाट किंवा मारूतीमधून फिरले, तर मागेच राहणार. ते मर्सिडीझमध्ये बसले की पुढे जातील आणि ज्या भाषेतले साहित्यिक पुढे जातात, ती भाषा मागे कशी राहील!’’‘‘खरोखरच क्रांतिकारक विचार आहे हा. पण, मला सांगा, मराठी साहित्यिकांना मर्सिडीझमध्ये बसण्यासाठी हाच एक मार्ग उरला आहे का? सतीश काकांकडून आळीपाळीने चक्कर मारून घेण्याचा?’’‘‘माझ्या फ्रँक बोला, फ्रँक वागाया पुस्तकातल्या शिकवणीप्रमाणे फ्रँकली सांगतो, मराठी साहित्यिकांना दुसरा मार्ग नाही. मराठी साहित्यिकाची ऐपत आणखी शंभर वर्षे तरी सायकलच्या पलीकडे काहीही घेण्याची असणार नाही. त्यानंतर तो पायी फिरायला लागेल. कारण, त्याच्या घरात, त्याच्या राज्यात, त्याच्या स्वत:च्या मनात त्याच्या भाषेची किंमत काय? माझ्या मराठी माणसा, इंग्रजी बनया पुस्तकात मी लिहिलंय की यापुढे 50 वर्षात आपले सगळे व्यवहार इंग्रजीतून होणार आहेत. जी भाषा बोलली लिहिली जाणार नाही, तिच्यातलं साहित्य वाचणार कोण? पुस्तकं खपणार कशी आणि ती खपली नाहीत, तर मराठी साहित्यिकाला पैसे कुठून मिळणार? सगळय़ाच्या मुळाशी अर्थशास्त्र आहे. तुम्ही टीव्ही चॅनेलवाले दिसता. माझं मुलाखती घेण्याचे सोपे तंत्रवाचलंयत की नाही तुम्ही? नसेल तर आज घेऊन टाका. 50 टक्के सवलत आहे.’’ हे त्यांच्या पोतडीत पुस्तक शोधतायत, तोपर्यंत आपण पुढे सटकूयात. बा वाचका, समोरच्या मैदानात काहीतरी गलका दिसतोय. तिथेही एक छोटी रांग दिसते आहे आणि तो बोर्ड कसला? विद्रोही साहित्य संमेलन.. ओहोहोहो! आता आलं लक्षात. इकडे मर्सिडीझची फेरी आहे म्हटल्यावर तिकडच्यांनी बैलगाडीची चक्कर ठेवली आहे तर. असो. समोर घाम पुसत सतीशकाका उभे आहेत. काहीतरी स्वत:शीच पुटपुटताहेत. कोणी नाहीये तेवढय़ात त्यांना गाठूयात.‘‘सतीशकाका, सतीशकाका, तुम्ही काय पुटपुटताय?’’‘‘छय़ा, असं व्हायला नको होतं. असं व्हायला नको होतं. छया, असं व्हायला नको होतं..’’‘‘काका, काका, शांत व्हा. काय व्हायला नको होतं?’’‘‘या बैलांनी.. सॉरी, ठाकरेकाकांचा शब्द तोंडी आला.. या लोकांनी माणिकचंद काकांचं प्रायोजकत्व नाकारायला नको होतं.’’‘‘का हो?’’‘‘संमेलनाला उपस्थित राहणा-या प्रत्येक साहित्यिकाला वर्षभराचा स्टॉक भेट देणार होते ते.’’‘‘कसला?’’‘‘गुटख्याचा. आता बसा म्हणावं, सातारी जर्दा चोळत नि तोंडं पोळत.’’‘‘अरेरे, वाईट झालं.’’‘‘हे काहीच नाही. याच्याहीपेक्षा वाईट झालंय.’’‘‘काय?’’
‘‘आता 25 लाखाच्या मर्सिडीझमधल्या फेरीवर भागवावं लागतंय. माणिकचंद काका प्रायोजक असते, तर त्यांच्याकडून पाच कोटीची मेबॅक आणणार होतो मी एका दिवसापुरती. मराठी साहित्यिक मेबॅकमधून फिरले असते सगळे!’’
बा वाचका, मराठी साहित्यसृष्टीचे झालेले हे अपरिमित नुकसान पाहून आता आम्हाला माणिकचंदचा तोबरा न भरताच गरगरू लागलं आहे.. डोळे फिरू लागले आहेत.. बा वाचका.. बा वाचका.. तू कुठे आहेस?

(28/3/10)

No comments:

Post a Comment