Friday, February 11, 2011

स्वर्गातला संवाद

सुमा, अगं सुमा, चहा देशील का जरा फक्कडसा? तुझ्या हातचा चहा प्यायल्याला वर्ष उलटून गेलं,’’ विंदांची हाक गेली आणि लगोलग वाफाळत्या चहाचा कप घेऊन सुमाताई बाहेर आल्या.
‘‘अहो, आता स्वर्गात आलात. अमृत प्यायचं सोडून चहा कसला पिताय?’’ त्या हसून म्हणाल्या.
‘‘काय करायचंय अमृत आता इथे येऊन पोहोचल्यावर? चहा तो चहाच आणि तुझ्या हातच्या चहाची गोडी अमृताला कशी असेल?’’
‘‘इश्श!’’ झक्क लाजून सुमाताई म्हणाल्या, ‘‘आज भल्या सकाळी इतकं कौतुक सुरू केलंत म्हणजे आंघोळीला बुट्टी मारायचा विचार दिसतोय. आज रविवार नाही, सोमवार आहे, हे आहे ना लक्षात? पेपरांचा ढीग घेऊन बसलायत तो. ’’
‘‘अगं, जगाची माहिती ठेवावी आपण जग सोडलं असलं तरी!’’
‘‘तिकडे पृथ्वीवर तर म्हणायचात की रोज काय वाचायचं पेपरांत. सगळीकडे तेंच तें आणि तेंच तें. आजच्या पेपरांमध्ये तुमच्या निधनाची बातमी आहे. आपलं काय काय कौतुक छापून आलंय, ते वाचायचंय हे सांगा ना सरळ!’’
‘‘पकडलंसच तू मला! पाहात होतो कुणीकुणी काय काय छापलंय, कोणी काय आदरांजली वाहिलीये ते.’’
‘‘हो ना! आपण किती मोठे होतो, हे लोकांना कळलं होतं की नाही, हे तपासून पाहताय ना!’’
‘‘महाकवी म्हटलंय गं मला सगळय़ांनी. भरून येण्याचा स्वभाव नाही माझा, पण भरून आलं एकदम. पण, सर्वाच्या मते माझा सर्वात मोठा गुण कोणता माहितीये का?’’
‘‘कोणता?’’
‘‘चांगलं सुचेनासं झाल्यावर मी वेळेत लिहिणं थांबवलं आणि त्या निर्णयावर ठाम राहिलो, हा.’’
‘‘बरोबरच आहे ते. मराठीत हे भान ठेवणारे साहित्यिक आहेत किती? हात थरथरतायत, नीट ऐकू येत नाही, ऐकलेलं दुस-या मिनिटाला विसरायला होतंय, एक वाक्य सरळ सुचत नाही, तरी दिवाळी अंकांचा रतीब सुरूच. त्यात तुम्ही वेगळे आणि मोठे ठरणारच होतात.’’
‘‘आणखीही एका गुणाची फार तारीफ आहे बरं का सगळीकडे. माझ्या फाटके राहण्याची.’’
तो खास मराठी गुण. आपल्या लोकांना असे फकीर फार आवडतात. पैसे कमावणं आणि त्याचा छान विनियोग करणं, याची आपल्या मातीला सवय कुठे आहे? तिथे तुमच्यासारख्या उगाच फाटके सदरे घालणा-या चिंगूस माणसाचं कौतुक होणारच. फुल शर्टाचा हाफ शर्ट, हाफ शर्टाची बंडी..
आताही अंगात तीच बंडी आहे.. डोळे मिचकावून विंदा म्हणाले. तुम्ही म्हणजे असे आहात.. असं म्हणून लटक्या रागाने सुमाताई पुढे आल्या आणि वर्तमानपत्रांवर नजर गेल्यावर आश्चर्याने उद्गारल्या, अगंबाई हे तर पाडगावकर दिसतायत.
‘‘हो, आपला मंगुअण्णाच तो. सर्व पेपरांच्या पहिल्या पानावर झळकलाय बेटा. माझ्या दोस्तीचा एवढा फायदा झाला त्याला. पण, लेकाच्यानं माझ्या बदनामीची एकही संधी सोडलेली नाही. माझ्या कंजुषीचे, स्वत:ला मोठा कवी मानण्याचे, वेगळेपणा दाखवण्याचे किस्से सांगितलेयत रंगवून रंगवून.’’
‘‘तुमच्याबद्दल खरं लिहिलंय म्हणून उगा डाफरू नका. खऱ्या मित्रालाच ओळख असते मित्राची.’’
‘‘तूही त्याचीच बाजू घेणार.पण, आता एकटा पडला गं आपला मंगुअण्णा. फार मिस करेल तो मला. वश्या बापटही इकडे आणि आता मीही.’’
‘‘वसंत बापटांच्याही किती सुंदर ओळी छापल्यात हो तुमच्यावरच्या.’’
‘‘त्यात नवल काय? तो आधीपासून इकडे असल्यामुळे माझं उणंदुणं काढण्याचा त्याचा चान्स हुकला. तिकडे असता तर सोडला असता की काय त्यानं.’’
‘‘किती मोठमोठय़ा लोकांनी आदरांजली वाहिलीये नाही तुम्हाला! राज्याचे मोठे मंत्री, राज्यप्रमुख.. एवढय़ा धबडग्यात तुमच्या कविता वाचायला वेळ कसा काढला असेल हो या लोकांनी?’’
‘‘तूही भोळीच आहेस. त्यांना वाचनाची सवयही नसते आणि गरजही. कोणीही गेलं की त्यांची प्रतिक्रिया तयार असते. आदरांजलीला प्रतिक्रिया म्हणतात बरं का हे लोक. म्हणजे माणसाची क्रिया थांबल्यानंतर हे त्यावर प्रतिक्रिया देतात. हा हा हा! त्यांच्याकडे साचे तयार असतात अशा प्रतिक्रियांचे. अमुक यांच्या निधनाने तमुक क्षेत्रातील उज्वल तारा ढळला, ध्रुवताराच हरपला. माझ्यासारखा पिकलेला म्हातारा चचला असेल, तर तो एकदम तपस्वी किंवा ष्टद्धr(7०)षी. बेधडक लिहितात की त्यांच्या निधनाने मी व्यक्तिश: सुन्न झालो आहे आणि महाराष्ट्रालाच नव्हे, तर सगळय़ा जगाला धक्का बसला आहे. कधीही भरून न येणारी मोठ्ठी पोकळी तयार झाली आहे. सगळय़ात मोठी पोकळी यांच्या दोन कानांच्या मध्ये असते!’’
‘‘झालं. कुणी तुमच्याबद्दल चांगलं बोललेलंही खपत नाही का हो तुम्हाला?’’
‘‘असं नाही गं! कशातलं काही कळत नसताना उपचारात्मक काही बोललं, तर त्रास होतो आणि इतर काही लोक आदरांजली वाहताना इतके स्वत:बद्दलच बोलतात की वाचणाऱ्याला वारलंय नेमकं कोण, हे का ते, असा प्रश्ना पडावा.’’
सुमाताईंनी पदर तोंडावर घेतला आणि त्या हसू लागल्या.
‘‘गंमत नाही करत आहे. आता हेच बघ. या सद्गृहस्थाला माझ्या निधनाने आठवलं काय, तर त्याने गाजवलेली कविसंमेलनं! ही बाई बघ. तिला काय आठवलं, तर मी तिला म्हणालो होतो की सुमा माझ्या कवितांपेक्षा तुझ्याच कवितांची जास्त फॅन आहे. आता त्यात तुझी कवितेची समज बेतास बात आहे, हे सांगायचं होतं मला. ते तिला लक्षातच नाही आलं.’’
‘‘अहो, असतो एकेकाचा मनुष्यस्वभाव.’’
‘‘मान्य. माझ्यातही असतील असे स्वाभाविक दोष. पण, माणसं किती छोटय़ा पट्टय़ा घेऊन इतरांना मापतात, हे पाहताना गंमत वाटते. एका चित्रकाराला मी त्याच्या चित्राचं कौतुक करून कशी मिठी मारली, अशी स्वकौतुकाचीच आठवण झाली. एका कवीने माझ्या काठीने आधीच स्वर्गवासी झालेल्या दुस-या कवीला फटके हाणलेत. म्हणजे, विंदा मोठे होते, ते त्या तमक्या कवीसारखे कोते नव्हते. तो तमका का कोता? तर काव्यवाचनाला दुय्यम लेखत होता म्हणून. मी का मोठा, तर मी कवितावाचन करीत होतो म्हणून. अरे, पण, कवी म्हणून कोणाचं मोजमाप कवितावाचनावर कसं ठरेल? आमच्या एका सरकारी साहित्यिकाला माझं साहित्य वैश्विक महत्तेचं वाटलं. पण, त्याच्या मौजे खुडुक साहित्य परिषदेवर माझं किती प्रेम होतं, हेही त्याला जोडून तो मोकळा.’’
‘‘अहो, पण असा महाकवी पुन्हा मिळेल, असे वाटत नाही, असंही लिहिलंय त्यांनी.’’
तेही चूकच. काळ असा थांबत असतो की काय एकेका माणसापाशी? काळाला थबकायला लावण्यासाठी ज्ञानेश्वर, तुकारामाची प्रतिभा हवी. उगाच कोणालाही एवढय़ा मोठय़ा पदावर कशाला नेऊन बसवायचं?
हं सुमाताई कौतुकाने म्हणाल्या, उगाच नाही माझ्या नव-याला मोठा मानत माणसं.
सुमा, हीसुद्धा बंडलबाजीच आहे. एकदा एखाद्याला मोठा माणूसपदाच्या मखरात बसवलं ना की देवच झाला त्याचा. त्याच्या लिखाणाकडे संपूर्ण दुर्लक्ष करायला मोकळी होतात माणसं. या देशात कर्तबगार माणसाला सर्वात मोठा धोका मरणानंतर देवत्व प्राप्त होण्याचाच असतो. तेव्हा, तसली मखरबाजी माझ्या बाबतीत होणार नाही, अशी प्रार्थना करायला हवी देवबाप्पांकडे. नाहीतर वरून खाली पाहताना दरसाल माझ्या मना बन दगड असं बजावावं लागेल, स्वत:ला.’’
ते नंतर पाहू, सुमाताई दरडावल्या, आता थंडगार झालेला तो चहा ढोसा लवकर आणि ताबडतोब बाथरूममध्ये जा साबणाने अंग रगड असं बजावा स्वत:ला.

(प्रहार, २१/३/१०)

1 comment:

  1. Vindanitake khare bolaayala jivantapanich nawhe,mrutyunantarhi kunaala jamelase watat naahi!Tu agadi nemakyaa shabdaat pakadales tyanna!

    ReplyDelete