Friday, February 11, 2011

आपला विश्वासू रॉकेटसिंग वांगडू

साहेबमजकुरांस,सादर विज्ञापना,
हा मायना वाचून स्थानिक कुरियरमार्फत कोणी पेशव्यांच्या दफ्तरातील कागद आणून दिला की काय, असा विचार आपल्या मनात आल्याचे मला स्पष्टपणे समजले. परंतु पत्राचा कागद पाहा. आपल्याच कंपनीचे लेटरहेड आहे. मी आपल्याच कंपनीतील कर्मचारी आहे आणि हे माझ्या राजीनाम्याचे पत्र आहे.
 
आजवर आपल्याला पत्र लिहिण्याचा प्रसंग कधी आला नव्हता. किंबहुना, कोणालाच कधी पत्र लिहिलेले नाही. त्यामुळे, पत्राच्या प्रारंभी काय लिहितात, हे ठाऊक नाही. कधीतरी कोठेतरी वाचलेला मायना आपल्या पत्रात लिहिला आहे. तो गोड मानून घ्यावा. गैरसमज नसावा, ही विनंती. मला पत्र लिहिण्याचा सराव नाही, हे एव्हाना आपल्या लक्षात आले असेलच. पत्रलेखनाची शिस्त म्हणतात, ती या लेखनात नाही. शिवाय राजीनाम्याचे पत्र म्हणजे मी, नाव अमुक, पद ढमुक आपल्या कंपनीत तमुक तारखेपासून कामाला आहे. काही व्यक्तिगत कारणामुळे/ आपल्याकडून अपेक्षाभंग झाल्यामुळे/ आजारपणामुळे/ अधिक चांगली संधी मिळत असल्यामुळे/ आपण छळत असल्यामुळे मी राजीनामा देत आहे. तो कृपया मंजूर व्हावा ही विनंती.यापलीकडे कधी कोणी काही लिहिलेले आपल्या वाचनात आले नसेल. त्या तुलनेत फारच अघळपघळ पसरलेले हे लेखन आहे. बहुधा माझ्या आयुष्यासारखेच.
अचूक आणि नेमके लिहायला सुचणे, ही जशी दैवी देणगी आहे तसेच आयुष्यात आपल्याला नेमके काय करायचे आहे, हे सापडणे आणि त्यानुसार वागायला जमणे, यासाठीही दैवाचे भक्कम पाठबळ असावे लागते, असे मला वाटते. मला ते पाठबळ लाभलेले नाही. त्यामुळेच की काय, आपल्या कंपनीत जवळपास १७ वर्षे सेवा बजावलेली असूनही आपण मला ओळखत नाही. अं हं! एकदम पाने उलटून तळाचे माझे नाव वाचू नका. ते वाचूनही मी कोण हे तुम्हाला कळेल असे वाटत नाही. कारण मी कोणहे मला तरी इतके दिवस कोठे कळले होते? चारचौघांसारखेच आयुष्य माझे. सरळसोट आणि रूक्ष. आई-वडिलांनी शाळा शिकवली, कॉलेज शिकवले. कारकुनाच्या पोटी जन्माला आल्याने कारकून होणेहेच जीवनध्येय होते. ते इतके मनात भिनले की १७ वर्षांपूर्वी आपल्या कंपनीत प्रशिक्षणार्थी कारकून म्हणून रुजू झालेला मी आजपर्यंत कारकूनच राहिलो. हेडक्लार्कसुद्धा झालो नाही. छे छे! आपल्याकडून काही अन्याय वगैरे झाला नाही. उलट चार वेळा प्रमोशन डय़ू होते. कशाला हवी नसती कटकट?’ म्हणून मीच ते नाकारले. महत्त्वाकांक्षेचा अभाव हाच माझा स्थायीभाव राहिला आहे.
 
सकाळी ११च्या ठोक्याला ऑफिसात हजर व्हायचे. दुपारी एकच्या ठोक्याला डबा उघडायचा आणि भाजी-पोळी खायची (भाजी कोबीची, दुधीची नाहीतर बटाटय़ाची). एक पंचवीसला जेवण संपते. मग खुर्चीतच मागे डोके टेकून बरोबर पाच मिनिटे डोळे मिटायचे. दीड वाजता पुन्हा कामाला लागायचे. फायलींमधले डोके चार वाजता बाहेर काढायचे. नाश्त्याच्या पुडीतला चिवडा किंवा शेव चघळत चहाचा कप रिचवायचा. (जाता-जाता एक कबुली द्यायला हवी. निम्मा चिवडा आणि निम्मी शेव वाचवून मी घरी न्यायचो डब्यातून. सुटीच्या दिवशी त्यात कांदा-टोमॅटो घालून संध्याकाळचे खाणे व्हायचे आमचे. फार छान लागतो आपला चिवडा तसा. ट्राय करून पाहा एकदा.) पुन्हा काम. साडेपाचच्या ठोक्याला ऑफिसमधून बाहेर. पाच बेचाळीसच्या लोकलमधला ना डबा कधी चुकला ना उलटी विंडो सीट.
 हे सगळे पुराण सांगण्याचे कारण इतकेच की इतके भंपक आयुष्य जगत असताना ते का भंपक आहे, याचा कधी विचारच केला नव्हता. पण, गेल्या दोन आठवडय़ांत चित्र पालटले. एका आठवडय़ात रॉकेटसिंग, सेल्समन ऑफ द इयरहा चित्रपट पाहिला आणि कालच थ्री इडियट्सपाहिला. अरे हो! एक महत्त्वाची गोष्ट सांगायची राहिलीच. माझ्या सगळय़ा ब्लॅक अ‍ॅँड व्हाइट आयुष्यात एकच गोष्ट कलरफुल आहे.. माझे चित्रपटवेड. बाकी हौसमौज काहीच नाही. नवा सिनेमा मी मात्र आवर्जून आणि थिएटरला जाऊन पाहतो. त्यातलं फार काही कळतबिळत नाही मला. पण, तीन तास जिवाला बरे वाटते.
असो, पुन्हा गाडी घसरली माझी. तर रॉकेटसिंगपाहिल्यानंतर मला जाणवले, अरे, सेल्समनसारखे इतके रद्दड वाटणारे कामही मन लावून केले, तर काय कमाल होऊ शकते. त्यातही किती थरार, किती आनंद आणि केवढे यश सामावलेले आहे. अर्थात, त्यासाठी मुळात तशी आवड असावी लागते. आपण कारकुनी करत राहिलो, पण त्यात आपल्याला कधीच रस नव्हता. या विचाराने मन कुरतडले जात असताना थ्री इडियट्सपाहिला आणि झोपच उडाली माझी. त्यातला तो फुनसुख वांगडू स्वप्नातही माझ्यासमोर येऊन बोट रोकून सांगू लागला, ‘शिकायचे तर ज्ञान मिळवण्यासाठी, मार्कासाठी नाही. जगायचे तर आनंदाने जगण्यासाठी, पैशांसाठी नाही. जे काम करायचे ते त्यात प्रभुत्व कमावण्यासाठी, नुसते यश मिळवण्यासाठी नाही. काबिल बनो, कामयाबी पीछे-पीछे आयेगी.
मी विचारात पडलो, आपण कशाच्याही काबिल आहोत का?
 
नसणारच. कारण, आपण काहीही मनापासून आवड आहे म्हणून कधी केलंच नाही. मुळात कशाची आवड आहे का, याचाही तपास कधी केला नाही. त्यामुळे, यशाच्या वाटेवर कधी गेलो नाही. ते मिळावे, असे कधी वाटलेच नाही.
 हा साक्षात्कार झाला आणि ठरवले, बस्स! यापुढे ही गधामजुरी करायची नाही. थांबायचं आणि विचार करायचा. आपल्याला काय हवे आहे, याचे उत्तर मिळेल, तेव्हाच कामाला लागायचे. म्हणूनच आता थांबतो.
माझ्या भावना समजून घेऊन आपण माझा राजीनामा मंजूर कराल, अशी अपेक्षा आहे.
कळावे,आपला नम्र,रॉकेटसिंग वांगडू
..
 ..राजीनाम्याचे पत्र वाचून संपले आणि साहेबांनी डोळय़ांवरचा चष्मा काढून त्याच्या काचांवर जमा झालेली वाफ रुमालाने पुसली. लाल पेनाने त्या पत्रावर मंजूरअसे लिहिणार इतक्यात धावत- धावत आलेल्या शिपायाने आणखी एक पत्र त्यांच्या पुढय़ात टाकले..
साहेब मजकुरांससादर विज्ञापना,आपण माझा राजीनामा अद्याप मंजूर केला नसेल, अशी आशा आहे.
आपल्याला पत्र लिहिल्यानंतर माझ्या मनात उत्साहाचे भरते येईल, अशी मला अपेक्षा होती. ओझे उतरल्यासारखे वाटेल, असेही वाटले होते. पण, तसे झाले नाही. हे काम सोडल्यानंतर मी काय करणार, याबद्दल कसलेच चित्र माझ्या डोळय़ांसमोर उभे राहिले नाही. मला कशाची आवड होती, याचा बालपण खोदून छडा लावण्याचा प्रयत्न केला, तेव्हा लक्षात आले, मी इतका सामान्य होतो की, मला कशाचीही खास आवड कधी नव्हतीच. माझ्या अंगात कधीच, काहीच वेगळे नव्हते. कशाहीसाठी माझा जीव कधी जळला नाही, कधी तुटला नाही. कशाचेही वेड वेड म्हणतात, ते मला कधी लागलेच नाही..
 ..मग, अशा माणसांनी जे करायचे असते, तेच मी केले पाहिजे..
..रोज सहा तासांची नोकरी.
ती मी सोडून देऊ इच्छित नाही.
तसदीबद्दल क्षमस्व.
 कळावे, 
आपला,
लंबोदर मोदके

(3/1/10)

No comments:

Post a Comment