Tuesday, February 15, 2011

हॉस्पिटल थेरपी!


भयानक म्हणजे भयानक थकलायत?
एखाद्या आजाराने पछाडलायत?
असं फीलिंग येण्यासाठी माणसाला फार काही व्हावं नाही लागत.
साधा सर्दीखोकलातापही खूप काळ रेंगाळून सोबत राहिला की जीव नकोसा करून टाकतो.
ऍसिडिटी उसळली किंवा पोट नामे धरणाची दारं उघडली की कळांनी आणि अंग गळून गेल्याने माणूस पार निपचीत पडतो.
आपली पार दैना झालीये, असं वाटायला आजारी पडायलाही नाही लागत खरंतर. काहीही फुटकळ कारण पुरतं आणि ते कारण फार फार मोठंही वाटू लागतं... एकदम विश्वव्यापीच.
असं जेव्हा जेव्हा होईल, तेव्हा ताबडतोब 'हॉस्पिटल थेरपी' घ्या. एकदम रामबाण इलाज.
'हॉस्पिटल थेरपी' म्हणजे आपण उठून एखाद्या हॉस्पिटलला जायचं.
कुठल्या डॉक्टरकडे जायचं?
कोणत्याही नाही. फक्त डोळे उघडे ठेवून एक फेरी मारायची संपूर्ण हॉस्पिटलमधून. आणि हो! एकदम लिलावती, ब्रीच कॅण्डी असं फाइव्हस्टार हॉस्पिटल निवडू नका. तिकडचा फेरफटका ताज नाहीतर ओबेरॉयच्या लॉबीमधून मारलेल्या फेरीसारखा ठरेल... निर्जंतुक चकचकीत, पण (आपल्या कामाच्या संदर्भात) निरुपयोगी.
त्यासाठी निवडा केईएमसारखं महापालिकेचं सर्वसाधारण हॉस्पिटल.
या या, आत या. इतकी माणसं पाहून असे भांबावून जाऊ नका. कनिष्ठ मध्यमवर्गातला जन्म आपला. अशाच सरकारी इस्पितळातला. नशिबाचे फासे सुलटे पडत जाऊन पुढे उच्च मध्यमवर्गापर्यंत मजल मारलीत आणि गरीब माणसं कशी दिसतात, हेही जरा विसरल्यासारखं झालंय.
केसपेपर काढायच्या रांगा पाहिल्यात? कॅज्युअल्टीमधली तुडुंब गर्दी पाहिलीत? अवघ्या दहा रुपयांत अवघडातल्या अवघड रोगावर सुपर एक्स्पर्ट डॉक्टरचा सल्ला मिळतो का इतर कुठे?
लिफ्टसमोर उभे राहा जरा. पेशंट येत असेल, तर कसे शांतपणे वाट पाहतात आतले लोक. आतापर्यंत 17 ठिकाणी तुम्ही अमका वॉर्ड कुठाय आणि तमकी ओपीडी कुठंय, असं विचारलंत... एकानेतरी खेकसून उत्तर दिलं का? खांदे उडवले का? तुमच्यासारखे शेकडो लोक यांना दिवसभर असे 'पत्ते' विचारत असतील ना?
आसपासचे चेहरे पाहताय ना तुम्ही? अनवाणी पायांची, दीनवाण्या चेहऱ्यांची माणसं इथे नाना व्याधींवरच्या उपचारांसाठी येतात. ओपीडीबाहेर बाकडयावर नाहीतर जमिनीवर मुक्काम ठोकतात. आपला नंबर येतोय का, हे सेक्शनच्या दारातून टाचा उंचावून उंचावून पाहतात. त्यांच्याकडे पाहून काय वाटलं तुम्हाला? आपल्या सर्दीशिंकांचे चोचले पुरवायला 1500 पेनकिलर्स आणि 1700 टॉनिकं उपलब्ध आहेत. बिल कंपनीच्या खात्यावर. मेडिक्लेम आहे तो वेगळाच. त्यातलं काहीही नसलेली ही गरीब माणसं अशी हॉस्पिटल्स नसती, तर कुठे गेली असती?... इतकी अवाढव्य हॉस्पिटल्स, इतक्या प्रशस्त, हवेशीर इमारती, लांबरूंद सज्जे आणि पेशंटला मजबूत आधाराचं फीलिंग देणारा चिरेबंदी भक्कमपणा... शंभरदीडशे वर्षांपूर्वी हे उभारणाऱ्या ब्रिटिशांच्या दूरदृष्टीचं कौतुक आणि कृतज्ञता दाटून येते ना. (नंतरच्या वर्षांत या मुंबईत आणि तिच्याभोवती रोगट, कोंदट, गलिच्छ, अरुंद, असुंदर, कोडवस्त्या आणि तशीच खुरटी, किरकिरी विचारसरणी पोसणाऱ्या एतद्देशीय राजकारण्यांच्या आठवणीने दाटून येईल ती 'धन्यता' वेगळीच.)
वॉर्डाचा फेरफटका मारायचाय एखाद्या?
एकदम भाजलेल्यांच्या वॉर्डासारखा जहाल वॉर्ड नको, साध्याच वॉर्डात चला. उंच उघडया छताखाली, खाटेखाटेवर कशी माणसं निपचीत पडली आहेत पाहा. आजारानं खंगलेली, कुणी सदा कावलेली, कुणी शून्यात नजर लावलेली, ताकद गमावलेली.
यांना झाले आहेत खरे आजार. आतूनबाहेरून पोखरून काढणारे. इथल्या करडयाउदास भिंतींमध्ये बंदिस्त करणारे. यांच्याकडून दमडा सुटायची अपेक्षा नसताना, गोड बोलण्यावागण्याचं ट्रेनिंग आणि वेगळा भत्ता मिळत नसताना इथली माणसं त्यांच्या सेवेत राबत असतात. फार काही नसतील करत, निदान माणसांशी माणसांसारखी वागत असतात.
....
काय भाऊसाहेब, फेरी पूर्ण होता होता पोटातल्या कळा थांबल्या की काय?
नाक गळायचं तर थांबूनच गेलं पार! डोकंही उतरल्यासारखं वाटतंय ना जरा!
चला, इलाज लागू पडला म्हणायचा!

(थर्ड आय, महाराष्ट्र टाइम्स)

1 comment:

  1. सरं, खरंय. म्युन्शिपाल्टीच्या हॉस्पिटलची सर कुठल्याच हॉस्पिटलला येणार नाही. तिथल्या सिस्टर्स, वॉर्डबॉय मेट्रन सुरुवातीला खेकसतात. पण हीच मंडळी तिथल्या पेशंटसाठी जिवाचं रानही करतात. मी स्वतः २१ दिवस मुक्काम करून अनुभव घेतलाय.

    ReplyDelete