Friday, February 11, 2011

जीजे १२१४ बी

‘जीजे १२१४ बी’ हा तुमचा भविष्यातला पत्ता असू शकतो.
 
काय सांगता काय? बोईसरला नवीन हाऊसिंग स्कीम निघाली की बदलापूरला? आणि हे असलं काय नाव ठेवलं?
 
या शंका तुम्हाला येताहेत. म्हणजे तुम्ही आधी मुंबईतून जवळच्या उपनगरात शिफ्ट झालेले आणि जवळच्या उपनगरातून आता दूरच्या उपनगरात शिफ्ट होण्याची पाळी आलेले अस्सल मराठी मुंबईकर दिसताय..
 
..‘जीजे १२१४ बी’ तुमच्यापासून दीड-दोन तासांच्या अंतरावर नाही. प्रकाशाच्या वेगाने जाणा-या यानात आज रात्री बसलात, तर २० डिसेंबर २०४९ रोजी तुम्ही तिथे उतरू शकाल.. ‘जीजे १२१४ बी’ हा पृथ्वीपासून ४० प्रकाशवर्षे अंतरावर असलेला एक ग्रह आहे, ज्याला ‘सुपरअर्थ’ असे म्हणतात, कारण त्या ग्रहावर पृथ्वीसारखं वातावरण आहे आणि मुख्य म्हणजे वाफेच्या स्वरूपात का होईना, भरपूर पाणी आहे.. ‘वॉटरवर्ल्ड’ हे त्याचे दुसरे नाव.
 
आता आठवली ना बातमी. नुकतीच वाचलेली.
 
या एका बातमीने सॉलिड खळबळ उडवून दिली आहे. अप्पर वैतरणा होईपर्यंत मुंबईत नव्या टॉवरांना परवानगी नाकारण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला होता. त्याच्या तिस-याच दिवशी ही बातमी यावी, हा योगायोग नव्हे. ही बिल्डर लॉबीने आखलेली योजना होती. अप्पर वैतरणा पूर्ण होण्याच्या आधी ‘जीजे १२१४ बी’वरून डायरेक्ट पाइपलाइन येईल. आपल्या बीएमसीच्या वॉटर डिपार्टमेंटमधल्या पित्तूंना हाताशी धरून त्या डायरेक्ट पाइपलाइनचे पाणी आपल्या टॉवरांकडे वळवता येईल, अशी खात्रीच आहे त्यांना. मुंबई आणि आसपासच्या पाणीमाफियांनी प्रकाशाच्या वेगाने जाणारे टँकर कुठे मिळतील, याची माहिती काढायला सुरुवात केली आहे.
 
तिकडे हॉलिवुडमध्ये स्टीवन स्पीलबर्गने ‘वॉटर वॉर्स’ हे टायटल बुक करून टाकले आहे. दक्षिणेत रजनीकांतला घेऊन ‘नीरम् वीरम्’ नावाचा अ‍ॅक्शनपट काढला जातोय. ज्यात म्हणे रजनीकांत मृत्युशय्येवरील त्याच्या आईसाठी प्रकाशाच्या कैकशेपट वेगाने उडून जाऊन ‘जीजे १२१४ बी’वरून पाणी घेऊन येतो. हिंदीत ‘२०५०’ या महान साय-फाय चित्रपटाचे दिग्दर्शक हॅरी बावेजा यांनी ‘चालीस साल बाद’ या नावाने चित्रपट काढायचा घाट घातला आहे. त्यात त्यांचा मुलगा हरमन हाच नायकाच्या भूमिकेत असल्याने त्याला फायनान्स आणि हिरोइन मिळेपर्यंतच ४० वर्षे निघून जातील, अशी चर्चा आहे. करण जोहर हा ‘केथ्रीजी’, ‘डीडीएलजे’च्या चालीवर ‘जीजे १२१४ बी’ ही आद्याक्षरे ठरतील, असे नाव बनवून मग त्या नावाचा सिनेमा बनवण्याच्या प्रयत्नात आहे. गुलजार यांनी ‘उबला उबला पानी’ अशी कविता लिहून टाकली असून विशाल भारद्वाज तिला संगीत देतो आहे. इकडे मराठीत संतोष पवारने ‘जलबिन मछली’ नावाचे नवे नृत्यप्रधान नाटक लिहायला घेतले असून ४० मुलींची कमरेवर पाण्याचा घडा घेऊन स्टेजभर नाचण्याची प्रॅक्टिसही सुरू झाल्याची खबर आहे.
 
कॉलेजांच्या कट्ट्यांवर अंमळ ‘पाणीदार’ मुलीकडे पाहून ‘आयला सॉलिड ‘जीजे १२१४ बी’ है भाय’ असे उसासेबाज उद्गार निघत आहेत. या ‘जीजे १२१४ बी’वर तापमान २०० अंश सेल्सिअस आहे आणि सगळे पाणी वाफेच्या स्वरूपात आहे, म्हटल्यावर भाई मंडळींची लँग्वेज पुरी बदलून गेली आहे. आता ते ‘टपकवू का?’, ‘नारळ फोडू का?’, ‘ढगात पाठवू का?’ या सर्व धमक्यांना समानार्थी एकच धमकी देताहेत, ‘जीजे १२१४ बी’वर पाठवू का?’ तिकडे कोपनहेगनमध्ये सर्वच देशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. विकसित देश आणि विकसनशील देश मिळून आता भरपूर कार्बन उत्सर्जन करू शकतात. इथल्या वातावरणाला भोक पडून पृथ्वीचा सर्वनाश झाला, तरी काही वांधा नाही. आणखी काही वर्षे फक्त प्रकाशाच्या वेगाने जाणारी महाप्रचंड याने बनवायची. ती करताना एवढे कार्बन उत्सर्जन होईल की पृथ्वीच्या वातावरणाला आपोआप भोक पडेल. सगळय़ा लोकसंख्येला यानांमध्ये बसवून त्या भोकातून सुळ्ळकन् ‘सुपरअर्थ’कडे रवाना व्हायचे. महाराष्ट्रासाठी हे यान बनविण्याचे कंत्राट कृष्णा खो-यातील कंत्राटदारांना दिले गेले असल्याचीही चर्चा आहे.
 
या सगळ्या धामधुमीत एक गोष्ट कोणाच्याच लक्षात आलेली नाही.
 
ती लक्षात आणून देण्यासाठी हा सारा लेखनप्रपंच आहे.
 
ती अतिगोपनीय आणि क्रांतिकारक माहिती अशी की, ‘सुपरअर्थ’ ऊर्फ ‘वॉटरवर्ल्ड’ अर्थात ‘जीजे १२१४ बी’ ही नव्याने सापडलेली पृथ्वी नसून ही ‘जुनी’ पृथ्वी आहे. म्हणजे असे की, मनुष्यप्राणी याआधी त्याच ग्रहावर वस्तीला होता आणि तेथे पृथ्वीसारखेच वातावरण होते. मूळ माकडाचीच जात असल्याने तेथेही माणसाने विकासाच्या नावावर भकासीकरण केले, कार्बन उत्सर्जन केले. त्यातून तिथे ग्लोबल वॉर्मिग होऊन तापमान २०० अंशांवर गेले. त्याआधीच तिथल्या मानवाला त्या वेळच्या ‘सुपरअर्थ’चा म्हणजे ‘आपल्या पृथ्वी’चा शोध लागला होता. त्याने तिकडून निघून ही पृथ्वी बळकावली. पुराणातली विमाने, आकाशातून अवतरणा-या देवांच्या कथा यांचा मनोमन मेळ घातला की ही सत्यकथा आहे, हे कोणालाही पटेल.
 
ता. क. : देशातील केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या कर्मचा-यांनी ‘जीजे १२१४ बी’वर जाण्याच्या योजनेला तीव्र विरोध दर्शवला आहे. तेथे दिवस ३८ तासांचा आहे, म्हटल्यावर तेथे अधिक काम (?) पडेल, हे लक्षात घेऊन सरकारने आतापासूनच पूर्वलक्ष्यी प्रभावाने वाढीव वेतन आणि भत्ते द्यायला सुरुवात करावी, अशी त्यांच्या संघटनांची मागणी आहे.

(प्रहार, २०/१२/०९)

No comments:

Post a Comment