Friday, February 11, 2011

‘होली’च्या बैलाला ढोल!

उद्या संपूर्ण देशाला युद्धभूमीचे स्वरूप येणार आहे..
 
रस्त्यारस्त्यावर, गल्लोगल्ली, चाळोचाळी, बिल्डिंगोबिल्डिंगी, घरोघरी घनघोर लढाई खेळली जाईल..
 
सकाळी सात-साडेसात नंतर सुरू झालेले हे युद्ध दुपारच्या लंचटाइमपर्यंत चालेल.. लंच ब्रेकमध्ये दोन घास पोटात टाकून, डाव्या कुशीवर एक सुपरफास्ट वामकुक्षी उरकून सगळे सैनिक चारच्या आसपास पुन्हा बाहेर पडतील आणि मग उन्हे कलेपर्यंत हैदोस दुला बे धुल्ला!
 
युद्धाचे इतके आखीवरेखीव वेळापत्रक ऐकून कोणाला हे महाभारतकालीन परंपरेप्रमाणे नियमानुसार खेळले जाणारे धर्मयुद्ध वाटेल. पण तसे नाही. हे बहुसंख्यांनी किंवा शक्तिमानांनी अल्पसंख्यांचे किंवा दुबळय़ांचे रॅगिंग करण्याची आपली प्राचीन लोकशाही परंपरा जपणारे हे अधर्मयुद्ध असेल..
 
..उदाहरणार्थ, इराकवर अमेरिकेने केलेला हवाई बाँबहल्ला. तो काही फक्त लष्करी तळांवर झाला नाही, नागरी वसाहतींवर झाला, शाळांवर झाला, हॉस्पिटलांवर झाला, निरपराधांवर झाला..
 
..या युद्धातही असेच होणार.. कोणी वयोवृद्ध माणूस असेल, कोणी नवजात अर्भकाला घेऊन निघालेली माता असेल, एखादा शाळकरी विद्यार्थी असेल, कोणी ऑफिसकडे निघालेला नोकरदार असेल.. या युद्धात असेच काही निरपराध लक्ष्य होतील.. मनीध्यानी नसताना कोठूनतरी सुसाटत एखादा रंगभरला फुगा येईल आणि शरीराच्या कोणत्याही भागाचा वेध घेईल.. जखमी करेल.. तुम्ही वाहनावर असाल, तर तोल सुटून आणखी गंभीर अपघात होऊ शकेल.. एरवी अशा हल्लेखोराला पकडून देता येऊ शकते.. पण, उद्याचा हल्ला आपल्या सांस्कृतिक उत्सवाचा भाग असल्याने हल्लेखोर तुमच्यासमोर येऊन रंगलेल्या थोबाडातले दात विचकून, भांगेच्या किंवा दारूच्या नशेत होली है.. म्हणून किंचाळेल, त्याचे दात घशात घालण्याची ऊर्मी दाबून तुम्हालाही सुजऱ्या-दुखऱ्या अवयवाची वेदना दाबत होली है असा क्षीण प्रतिसाद द्यावा लागेल..
 
..शत्रू तुम्हाला असाच गाठेल, असे काही नाही. रशियातील बोल्शेविकांनी रस्तोरस्ती पेट्रोलबाँब फेकून जर्मन सैनिकांना पळता भुई थोडी केली, तसे तुमच्यावरही रस्त्याकडेच्या इमारतींमधून रंगाचे तांब्ये उपडे होऊ शकतात.. आडगल्लीतून किंवा एखाद्या बोळकांडातून एकदम तुमच्यासमोर आलेला गनीम बंदुकीच्या फैरींप्रमाणे तुमच्यावर पिचकारीच्या फैरी झाडू शकतो.. अनेक छोटय़ा गनीमांच्या हातात तर तुम्हाला पिचका-याही बंदुकींच्याच आकाराच्या (डोळय़ांत रंग जाऊन डोळे फुटले नसतील तर) दिसतील..
 
..सगळीकडे इतक्या आधुनिक शस्त्रसामुग्रीनिशी युद्ध सुरू नसेल.. काही ठिकाणी मोगलाई अवतरलेली असेल.. त्या काळात सैन्य जसे हर हर महादेव किंवा अल्ला हू अकबर किंवा हाणा-मारा-पकडो-काटोच्या गर्जना करीत एकमेकांवर तुटून पडायचे, तसे इथे एकटय़ादुकटय़ावर दहा-पंधरा-वीस जण तुटून पडतात, धरा-पकडा-फासाच्या आरोळय़ा ठोकल्या जातात आणि माणसासारख्या दिसणाऱ्या माणसाचे क्षणार्धात भूत होऊन जाते, या अत्याचाराविरुद्ध प्रतिकार न करण्यातच शहाणपणा असतो.. तो करायला जाल, तर वरच्या रंगाबरोबरच रंग धुतल्यानंतरही लाल झालेली गालफडे, पिळवटून काळेनिळे पडलेले हात, केस उपटून सोलवटलेली गुलाबीसर कातडी, अशी आतली रंगपंचमीही भोगावी लागते..
 
..तरी एवढय़ावरच भागले तर तुम्ही खरोखरीच नशीबवान.. हो हो, नशीबवान! कारण, आपण या (ना)पाककृतीमध्ये सगळे स्टँडर्ड साहित्य गृहीत धरलेले आहे. म्हणजे, मिसाईल-हल्ल्यात फुगा आणि त्यात चांगल्या दर्जाचे रंग असे गृहीत धरले आहे. हेच कॉम्बिनेशन बदलून प्लॅस्टिकची पातळ थैली आणि त्यात गटारातले पाणी असेही होऊ शकते. पिचकारीच्या आणि तुम्हाला फासल्या जाणाऱ्या रंगांमध्ये हानीकारक रसायने मिसळलेली असू शकतात. पर्मनंट कलरच्या नावाखाली तुमची त्वचा सोलवटून काढणारे किंवा पुरळांपासून काळय़ा डागांपर्यंत तऱ्हेतऱ्हेची अ‍ॅलर्जी आणणारे घातक रंग वापरले जाऊ शकतात, तुमच्या कळत-नकळत डोक्यात टाकलेले रंग केसांचे कायमस्वरूपी नुकसान करू शकतात.. बाकी सगळं सोडा, तुमच्यावरच्या हल्ल्याचे स्थळ बदलून लोकलच्या डब्याचा दरवाजा, असेही होऊ शकते.. दारात हवा खात उभे असताना रुळांलगतच्या वस्तीतून सूं सूं सुसाटत आलेल्या एखाद्या गदळभरल्या पाणीगोळय़ाने तुमचा वेध घेतला आणि तुमचा तोल गेला, हात निसटला तर या पवित्र सणादिवशी इहलोकातून डायरेक्ट मुक्तीच मिळण्याची गॅरंटी!
 
..इतका हिंस्त्र उच्छाद आपण उत्सव म्हणून कसा काय साजरा करतो?
 ..त्याचे परिणाम किती भयंकर होतात, हे सोडा. मुळात, ज्याच्याशी आपला काहीही संबंध नाही, ओळखदेख नाही, भांडणतंटा नाही, अशा कोणत्याही तिऱ्हाईत माणसावर एक दिवस रंगहल्ला चढवण्याचा सामाजिक परवाना कसा काय दिला जातो? असे कोणी कोणाला गृहीत कसे काय धरू शकते?
कृष्णकाळात गोकुळात खेळली जाणारी होळी हा प्रणयाचा, नर्म छेडछाडीचा आणि निसर्गाने दिलेले रंग एकमेकांवर उधळण्याचा मनोहारी सण असेलही. पण, ती एकमेकांशी काहीएक परिचय असलेल्या व्यक्तींच्या समूहांमध्ये खेळली जात होती. त्यात जुने हिशोब चुकते करीत असल्यासारखा पाशवी हल्लेखोरपणा असल्याचेही कोठे नमूद झालेले दिसत नाही. त्या सुरेख रंगपंचमीची ही अशी धुळवड कशी काय झाली?
 
प्राकृतातली धुळवडही एका अर्थी सुंदरच होती. कारण, तो सर्वानी एकत्र जमून सगळय़ा ग्राम्यपणाची अभिव्यक्ती करण्याचा अद्भुत सण होता. एकमेकांविषयीच्या वाईट भावनांचा चिखल-राडा-रोडा वाहवून देऊन सामाजिक नात्यांमधले पाणी निर्मळ-निकोप आणि वाहते ठेवण्याचा, सामूहिक विरेचनाचा तो प्रयोग होता. ज्या कोणाच्या बैलाला ढोल म्हणून जाहीर उद्धार करायचा, त्याच्याविषयी नंतर वर्षभर मनात कोणताही विकल्प न ठेवण्याचे पथ्य त्या काळचा दिलदार समाज पाळत असावा. तशी स्थिती आता आहे का? आता वर्षभर माणसे एकमेकांविषयी पराकोटीची दुर्भावना घेऊन वागत वावरत असतात, भयावह ग्राम्यपणा एरवीही करीत असतात, एकमेकांचे जाहीर वाभाडे काढत असतात, एकमेकांना पाण्यात पाहात असतात, ओचकारत-बोचकारत असतात. ही त्यांची बारमाही धुळवडच सुरू असते. त्यात एका दिवसाच्या शिमग्याचे कौतुक काय?
 
होलीचाच सण नव्हे, तर आपले बहुतेक सण आणि उत्सव हे असे रॅगिंगबाज झाले आहेत. वर्गणीच्या खंडणीपासून या रॅगिंगची सुरुवात होते आणि अत्यंत अप्रासंगिक बीभत्स नाचगाण्यात त्यांचा शेवट होतो..
 
..हे रॅगिंग बंद करण्याची ताकद आपल्या हातांत नाही..
 
..ते आपल्याला आयुष्यभर सहन करायचे आहे..
 
..कोठेतरी अज्ञातवासात जाऊन ते त्या त्या वेळी चुकवता आले, तरीही पुष्कळ, इतके आपण हतबल आहोत..
 
..आपण काहीही करू शकत नाही..
 
..आपण फक्त इतकेच करू शकतो.. 
..या सणानेच दिलेल्या सवलतीचा फायदा घेऊन ओठांच्या चंबूवर उलटी मूठ आदळत बेंबीच्या देठापासून बो बो बो बो बोंब ठोकून ओरडू शकतो, होलीच्या बैलाला ढोल!

(28/2/10)

No comments:

Post a Comment