Monday, February 21, 2011

होली इंटरव्हेन्शन

शेवटचा चेंडू, पिचवर शेवटचा खेळाडू, जिंकायला पाच रन हवे आहेत..
 
बोलर त्वेषाने धावत आला..
 
फलंदाजाच्या पायात टप्पा टाकून त्रिफळाच काढण्याच्या जिगरीने त्याने बॉल टाकला..
 
मध्येच काय झालं, कुणास ठाऊक.. कुणीतरी टपली मारल्यासारखा बॉलचा खेळपट्टीच्या मध्यावरच टप्पा पडला आणि समोरच्या निळय़ा संघवेशातल्या तळाच्या फलंदाजानं चेंडू तडकावून स्टेडियमच्या बाहेर भिरकावून दिला..
 
***
निळ्यांची फिल्डिंग सुरू..
 
शेवटचा चेंडू, जिंकायला फक्त एक रन हवाय आणि समोर तडाखेबंद शतकवीर, षटकार ठोकण्याच्या पवित्र्यात..
 
बोलरने बेकार बॉल टाकला, शतकवीराने तो उंच फटकावला.. निश्चितपणे सीमापार जाणारा फटका..
 हवेतल्या हवेत काय झालं देव जाणे! कुणीतरी वरच्या वर उचलल्यासारखा चेंडू आकाशात उसळला आणि हळुहळू मैदानात उतरू लागला, इतका हळुवारपणे की मैदानावरचे अकराच्या अकरा निळे त्याच्याखाली उभे राहिले आणि त्यातल्या एकाने आरामात चेंडू झेलला..
***
पुन्हा निळ्यांची फिल्डिंग..
समोरच्या संघाची शेवटची जोडी मैदानात.. जिंकायला चार रन आवश्यक.. मात्र, भरपूर चेंडू शिल्लक असल्याने फलंदाज निर्धास्त..
बोलरने बॉल टाकला.. फलंदाजाने सणसणीत प्रहार करून तो सीमारेषेकडे धाडला.. क्षेत्ररक्षक दूर असल्याने चौका पक्का..
..अचानक बॉलने मार्गच बदलला आणि तो आपणहून क्षेत्ररक्षकाकडे धावू लागला.. निष्टिश्चित चौकारामुळे निश्चित झालेल्या फलंदाजांनी हे दृश्य पाहून धावून धावा काढायला सुरुवात केली..
 क्षेत्ररक्षकानं बॉल उचलला आणि एक्साइटमेंटमध्ये भलत्याच दिशेला फेकला.. मात्र तो हवेतच वळून यष्टीरक्षकाच्या हातात पोहोचला आणि तिसरी धाव सुरू असतानाच फलंदाज बाद झाला..
***
स्वर्गात लंकाधीश रावणाच्या महालात धावपळ सुरू होती. अनेक दूत येत होते, रावणाच्या कानाशी लागून काही सांगत होते आणि रावणाच्या चेह-यावरची अस्वस्थता वाढत होती.. हळुहळु अस्वस्थतेची जागा संतापाने घेतली.. रावण तिरीमिरीत उठला आणि थेट रथात जाऊन बसला.. सारथ्याला पत्ता लागायच्या आत स्वत: रावणाने लगाम हाती घेतला आणि घोडे चौखूर उधळू लागले.. अवकाशातून रथाने दिशा धरली होती भारतवर्षाची..
 
***
वर्ल्ड कप क्रिकेटच्या सामन्याचं मैदान जवळ येऊ लागलं.. रावणाला मैदानाच्या वर अवकाशात विराजमान झालेल्या बुद्धिदात्या बाप्पांचं दर्शन झालं आणि तो गलमिश्यांमध्ये हसला.. त्याचा अंदाज खरा ठरला होता..
खाली निळ्यांचीच मॅच सुरू होती..
त्यांच्या एका फलंदाजानं चेंडू नुसताच तटवलेला एक चेंडू मरतुकडय़ा चालीनं क्षेत्ररक्षकाच्या हातात जाणार इतक्यात बाप्पांनी वरून आशीर्वादासारखा हात उंचावला आणि तो चेंडू सुसाट वेगाने सीमारेषेकडे धावू लागला..
..रावणाला पाहून बाप्पांनी हात वर केला आणि मिष्कील हसत विचारलं, ‘‘काय लंकाधीश, आज इकडे कुठे दौरा? तुम्हालाही लागला वाटतं क्रिकेटचा चस्का!’’
दोन्ही हात जोडून बाप्पांना वंदन करून रावण म्हणाला, ‘‘बाप्पा, आमची मैदाने वेगळी आणि आमच्या लढाया वेगळ्या. ही अशी फळकुटं आणि चर्मगोलांची शस्त्रं
आमच्या हातात शोभतील का?’’
‘‘मग, असेच आलात?’’
‘‘बाप्पा, तुम्ही सगळं जाणता, तरीही विचारता?’’
‘‘तुम्हीही तुमच्या देशाची तक्रार घेऊन आला असणार, मला कल्पना आहे. तुमच्या आधीच दोन धर्माच्या संतगणांची शिष्टमंडळंही येऊन गेलीत. सगळ्यांना तोच प्रश्न पडलाय जो तुम्हाला पडलाय.’’
‘‘समजत नाही बाप्पा, तुम्ही हे काय चालवलंयत आणि का चालवलंयत? खाली मैदानात सुरू असलेल्या खेळात तुम्ही वरून चक्क हस्तक्षेप करताय..’’
‘‘..काय करणार? मीही माझ्या इमेजला बांधला गेलोय. ती टिकवायची, तर हे ‘होली इंटरव्हेन्शन’ करावंच लागणार मला.’’
‘‘अहो पण बाप्पा तुम्ही तर बुद्धीचे प्रतीक. तीच तुमची खरी इमेज.’’
‘‘ती विसरा आता. माझ्या उत्सवाचं सध्याचं स्वरूप पाहिलंत तरी हा भ्रम दूर होईल. अहो, उत्सवासाठी पाण्यात विरघळणा-या मातीच्या मूर्ती बनवा आणि आपल्या
नद्या वाचवा, पुढच्या पिढय़ांना किमान पिण्याचं स्वच्छ पाणी मिळू द्यात, हे सुद्धा यांना कोर्टाने सांगावं लागतं आणि त्यालाही विरोध करणारे अधर्मवीर आहेत यांच्यात. यांना कशाला लागतोय बुद्धीचा देव. त्यामुळे हल्लीच्या काळात नवसाला पावणारा राजा-महाराजा, इच्छापूर्ती करणारा प्रसिद्धीविनायक अशी माझी इमेज होऊन बसली आहे. हल्ली माझ्याकडे कुणी साधी बुद्धीसुद्धा मागत नाही, सद्बुद्धी तर दूरच राहिली. आजकाल सगळय़ांना हवा असतो भरपूर पैसा, झटपट श्रीमंती, उत्तुंग यश.. तेही शॉर्टकटमध्ये. मग, माझ्याकडे नवस बोलतात, मला नारळांच्या माळांची, मोदकांची, सोन्याच्यी सिंहासनांची, मुकुटांची, कळसांची लालूच दाखवतात. आता हा वर्ल्ड कप आल्यापासून यज्ञयागांचं आणि नवसांचं पेवच फुटलंय. भले शहाणे लोकही खेळात त्यांचा संघ जिंकावा म्हणून माझ्याकडे साकडं घालताहेत. त्यांच्यासाठी हे करावं लागतं.’’
‘‘अहो पण यांच्याकडे इतकी चांगली टीम आहे, हिरीरीनं खेळणारे खेळाडू आहेत..’’
‘‘बाकी सोडा लंकाधीश, यांच्याकडे साक्षात क्रिकेटचा देव आहे. तरीही त्यांना नवस बोलायची इच्छा होतेच आणि आम्हाला हे असं आकाशात येऊन बसावं लागतं जादूचे प्रयोग करीत.. पण, काय करणार, सगळी माझीच लेकरं आहेत, त्यांची हिरमुसलेली तोंडंही बघवत नाहीत.’’
‘‘बाप्पा, इतकं प्रेम आहे तुमचं या देशावर. मग त्यांच्या असल्या थिल्लर नवसांना का पावता? त्याऐवजी त्या सर्वाना सबुद्धी का देत नाही?’’
‘‘लंकापती, तुम्हाला काय वाटतं.. मला ती द्यायला आवडणार नाही?.. अहो पण सबुद्धी दे असा नवस बोलण्याची तरी बुद्धी कुणाला तरी व्हायला नको का? ’’
‘‘काय सांगताय काय बाप्पा! अहो, पण तुम्ही गणनायक..’’
‘‘करेक्ट! तीच माझी मर्यादा. पृथ्वीवर पंतप्रधान मनमोहन सिंग आणि स्वर्गात मी, आम्हा दोघांची स्थिती सारखीच. ते सज्जन, मी तर साक्षात देव. पण, आपल्या गणात गणंगांची संख्या वाढली, तर कोणताही गणनायक कशाचं नेतृत्व करणार, सांगा लंकाधीश?’’
आता बाप्पांचा स्वर कापरा झाला होता आणि लंकाधीश निरुत्तर.

(चित्र : प्रदीप म्हापसेकर)
(प्रहार, २०/२/११)

No comments:

Post a Comment