Friday, February 11, 2011

बळी

माणसाचा कृतघ्नपणा आणि दुटप्पीपणा पावसाइतका दुस-या कोणाला कळला असेल?..
दरवर्षी उन्हाच्या काहिलीत भाजून घामाच्या धारांमध्ये न्हाऊन निघणारा प्रत्येकजण मनोमन पर्जन्यराजाची करुणा भाकत असतो.. ये रे बाबा, ये! लवकर ये! जोरात ये!
मे च्या मध्याला तल्खलीने जीव मेटाकुटीला येतो, तेव्हा तर माणसं अधीर होऊन वळवाच्या चार शिंतोडय़ांनीही बेभान होऊ लागतात.. पाऊस पाऊस म्हणून नाचू लागतात.. या असल्या पावसाने उकाडा वाढतो, तेव्हा चक्क प्रियकराने फसवलेल्या प्रेयसीसारखे रुसतात..
मे च्या अखेरीला सगळे डोळे मॉन्सूनच्या वाटेकडे लागलेले.. पाऊस कधी येणार, तो किती पडणार, यंदा तरी सरासरी गाठणार की थोडक्यात आटोपते घेणार, हाच जिथे तिथे चर्चेचा एकमेव विषय.
दरवर्षी प्रत्येकाला त्या वर्षीचा उन्हाळाच आजवरचा सर्वात कडक उन्हाळा होता, असं वाटतं आणि दरवर्षी प्रत्येकाला त्या वर्षी पावसाचं आगमन नेहमीपेक्षा फारच लांबलं, असंही वाटतं..
आणि अखेर तो येणार येणार म्हणून गाजत असलेला पाऊस चक्रीवादळांना चकवत हुकवत रेंगाळत रेंगाळत एकदाचा येतो, तेव्हा काय होतं?
पहिल्या पावसाला कौतुकाचा मान. अगदी पहिल्या बाळाच्या कौतुकासारखा. नवा नवा. हवा हवा. छान छान.
कोणी जोडीनं भिजतं, कोणी एकटय़ानं. कोणी ग्रूपनं.
घामोळय़ा घालवायच्या या व्यावहारिक आणि आंबूस कारणासाठी का होईना, अनरोमँटिक माणसंही पहिल्या पावसात हमखास भिजून घेतात.
पहिल्या पावसाला वर्तमानपत्रांमध्ये, टीव्हीवर सगळीकडे हुश्श, आला एकदाचाचे आनंदी सुस्कारे आणि धो डालाचे उत्साही चित्कार त्यांना सुसंगत फोटो आणि दृश्यांसह उमटतात. पाऊस आल्याने सगळय़ा मानवजातीत काय विलक्षण आनंद दाटून आलाय आणि या धरेवरचं जीवन फुलवणाऱ्या पर्जन्यदेवाबद्दल किती कृतज्ञभाव मनामनांत साठलाय, असं वातावरण.
दुसरा पाऊस येतो.
तिसरा पाऊस येतो.
त्याला बिचाऱ्याला नव्याचे नऊ दिवसही लाभत नाहीत. दोन तीन बाऱ्यांमध्येच नवानवासा, हवाहवासा पाऊस जुना होतो.
चार महिने भाजून निघालेल्या भूमीवर त्याने सलग फक्त दोन तीन दिवस जरी संततधार धरली तरी एकदम ट्रान्स्फर सीन.
केवढं काळं करून ठेवलंय..
सलग दोन दिवस पिरपिर चाललीये पावसाची..
सब वे तुंबला..
रस्ते बुडाले..
लाइट गुल..
पाणी गायब..
भिंती पडल्या..
इमारती कोसळल्या..
वीज पडली..
माणसे मेली..
हळुहळू पावसाची बातमी गंभीर होऊ लागते. आनंदाने नाचणारी, होडय़ा सोडणारी मुलं फोटोंमधून गायब होतात. त्यांची जागा पाण्यात थबकलेल्या लोकल, पाण्याने भरलेले चौक घेतात.. आला रे आलाच्या उत्साही हेडलाइन्स हाहाकारचा पुकारा करू लागतात आणि मग एक दिवस सरकारी पत्रपरिषदेत जाहीर होते, पावसाचे ४६ बळी.. पावसाळा संपेपर्यंत मग पावसाच्या बळींचा तत्कालीन आकडा आणि एकूण आकडा बातम्यांचा पिच्छा सोडत नाही.
पावसाचे बळी?
हा काय प्रकार आहे?
एखाद्या माणसावर धार धरून पाऊस बदाबदा कोसळला, त्याचा श्वास पार घुसमटवून टाकला. पावसाच्या मुसळधारेने त्याला लोळवला आणि सरींच्या फटकाऱ्यांनी जायबंदी केला, असं तर कधीच घडताना दिसत नाही.
मग, पाऊस बळी घेतो म्हणजे काय करतो?
त्यातल्या त्यात विजेच्या तडाख्याने मरण पावणाराचा संबंध पावसाशी थेट जोडता येईल. पावसाळी ढगांच्या घुसळणीतून वीज तयार होते आणि ती एखाद्या अभागी जिवावर कोसळते.. पण, बाकीचे पावसाचे बळी कोण असतात?
कुणी धोकादायक किंवा बिनधोकादायक इमारत कोसळून मरतो..
कोणी भिंतीखाली चिणला जातो, कोणी दरडीखाली. एखाद्यावर झाड कोसळतं.
नदी-नाल्याच्या पुरात कोणी वाहून जातो, कोणी तुंबलेल्या गटारात पाय घसरून पडतो.
खवळलेला समुद्र काहींचा घास घेतो. काहींचा डोंगरदऱ्यांमधल्या निसरडय़ा वाटांवर कपाळमोक्ष होतो.
कोणी धबधब्यात, कुंडात अखेरचा श्वास घेतो. 
नीट विचार करून पाहा.
या सगळय़ाशी पावसाचा थेट संबंध काय?
धोकादायक इमारतीत राहण्याचा धोका ज्याचा त्याने पत्करलेला असतो. ती कधी ना कधी कोसळणारच असते. बिनधोकादायक वाटणारी इमारत धोकादायक असणे, भिंती कोसळणे, ही माणसाची हरामखोरी झाली आणि दरडीखाली निवारा शोधणे ही मजबुरी. प्लॅस्टिकच्या पिशव्या टाकून, बाटल्या फेकून नाले तुंबवणारे मानवरूपी मर्कट जलसमाधीच्या देहदंडाला पात्रच असतात.
निसरडय़ा वाटांच्या अनमोल साहसाला मृत्यूच्या शक्यतेचा टॅग लटकत असतोच आणि पाण्यात डुंबण्याआधी मद्यानंदी टाळी लागली की पुढे मोक्षप्राप्तीचे द्वार खुले होणार, ही तो श्रींची इच्छा.
खरेतर हे बळी असतात गुन्हेगारी स्वरूपाच्या अक्षम्य भ्रष्टाचाराचे, माणुसकीशून्य बेपर्वाईचे, हव्यासाचे, लालसेचे आणि निसर्गाला गुलामबिलाम बनवल्याच्या माणसाच्या मिजासखोर गुर्मीचे.
खापर मात्र निर्गुण, निराकार पावसावर फुटतं..
हीसुद्धा माणसाची नेहमीचीच खोड.. प्रत्येक गोष्टीचं सुलभीकरण करण्याची. मानवी अपयशांना अमानवी चेहरा देण्याची. पावसाचे बळी म्हटलं की बाकी सगळं दडून जातं.. जसं भोपाळच्या विषारी वायूचे बळी, मुंबईत लोकलचे बळी, वनभूमीत नक्षलवादाचे बळी.. आंतरराष्ट्रीय पातळीवर दहशतवादाचे बळी..
पैसा दाखवला की पाऊस येतो, असं मानणा-या आणि मोठ्ठा पाऊस आला की तो पैसाही खोटा करणाऱ्या माणसाची क्षुद्रवृत्ती पाऊस पुरेपूर ओळखून आहे..
..म्हणूनच तो सहसा माणसाचा दुटप्पीपणा मनावर घेत नाही..
..एखाददिवशी मात्र त्याच्याही सहनशक्तीचा ढग फुटतो..
..मग, २६ जुलैसारखी साधीशी तारीखही माणसांच्या स्मरणात पक्की बसते..

(चित्र : प्रदीप म्हापसेकर)

(20/6/10)

No comments:

Post a Comment