Tuesday, February 15, 2011

लई न्हाई मागणं...


(रिक्षाटॅक्सीचालक संघटनेने सरकारबरोबर होणाऱ्या चर्चेसाठी आखलेला मागण्यांचा गुप्त मसुदा नुकताच आमच्या वार्ताहराच्या हाती लागला. या गरीबबिचाऱ्या कष्टाळूप्रामाणिकप्रेमळ वाहनचालकांच्या मागण्या किती साध्या आणि कशा न्याय्य आहेत, हे या मागणीपत्रकावरून दिसून येईल आणि रिक्षाटॅक्सीवाल्यांबद्दलचे प्रवाशांचे गैरसमज दूर होतील, अशी आशा आहे.)
मागणी क्र. 1 : सरकारने रोज सकाळी प्रत्येक रिक्षाटॅक्सीचालकाला तीन लिटर सीएनजी मोफत द्यावा. (गरीब शेतकऱ्यांना मोफत वीज देता तेव्हा! आम्हीपण गरीबच आहोत.) त्यानंतर तो जेवढा सीएनजी भरेल, तेवढा किमान 75 टक्के सबसिडाइझ्ड दराने देण्याची व्यवस्था करावी.
मागणी क्र. 2. : रिक्षाटॅक्सी सीएनजीवर चालत असली तरी भाडयाचे दर सीएनजीच्या किंमतीवर आधारलेले असू नयेत. ते विमानासाठी वापरल्या जाणाऱ्या 'व्हाइट पेट्रोल'च्या दरानुसार आकारावेत.
मागणी क्र. 3. : मुळात भाडयासाठी मीटर हीच फार मागासलेली कल्पना आहे. आम्ही संपूर्ण शहरभर रोज प्रवास करतो. कुठून कुठे किती अंतर होतं, ते आम्हाला नीट ठाऊक असतं. त्यानुसार आम्ही ताबडतोब भाडं किती झालं हे सांगू शकतो (प्रवासी 'पांडू' आहे असा संशय आला तर आम्ही तसं भाडं सांगतोच.) त्यामुळे, प्रवाशांचाही वेळ वाचतो. त्यामुळे मीटर काढूनच टाकावेत.
मागणी क्र. 4. : मीटर ठेवायचेच असतील, तर जुनेच मीटर ठेवावेत. त्यातून फार मोठं समाजहिताचं काम साधेल. हल्लीच्या काळात मुलं तर सोडाच, मोठया माणसांनाही साध्या आकडेमोडी जमत नाहीत. कॅल्क्युलेटर्सनी तोंडी हिशेबांची पध्दतच बंद पाडली आहे. नंतर मुलांना ऍबॅकसचे क्लासेस लावण्यापेक्षा आत्तापासूनच त्यांचं गणित ('हसतखेळत' असं म्हणणार होतो, पण आपण 'भांडततंडत' म्हणूयात) सुधारण्याचा रिक्षाटॅक्सीप्रवास हा सर्वात चांगला मार्ग आहे. मीटरवरचा एक रुपया म्हणजे कार्डावरचा किती, याचं गणित करता करता प्रवाशांचा मेंदू तल्लख होतो. त्यात रिक्षाटॅक्सीवाला सांगतो तो हिशेब किंवा तो दाखवतो ते कार्ड आणि आपल्याकडचं कार्ड यांच्यातल्या फरकाचा गुंता सोडवणं, हे तर उच्च गणितच आहे. भारतात भविष्यात आणखी एखादा रामानुजम पैदा होईल, तेव्हाच लोकांना रिक्षाटॅक्सीमीटरची महती कळेल.
मागणी क्र. 4 (अ) : रिक्षाटॅक्सीप्रवासामुळे प्रवाश्यांचे गणित आपसूक सुधारत असल्यामुळे त्यांच्या मूळ बिलामध्ये दोन टक्के शिक्षणकर जोडून तोही बिलात वसूल करण्याची परवानगी द्यावी.

No comments:

Post a Comment