Friday, February 11, 2011

भावी भंगार

आजचं वर्तमानपत्र ही उद्याची रद्दी असते..
 
..तद्वत, आज पोलिसांसाठी खरेदी केलेली सामुग्री हे उद्याचं भंगार असतं..
 
..त्यामुळेच काही महानुभाव पोलिसांसाठी खरेदी करतानाच मुळात भंगार खरेदी करून टाकतात. मग, दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख अंगावर बुलेटप्रूफ जॅकेट असताना दहशतवाद्यांच्या गोळ्यांना बळी पडतात आणि ते जॅकेटच गायब करून टाकावं लागतं.
 
असंच काही ‘भावी भंगार’ नुकतंच खरेदी केलं गेलं. त्याच्या बातम्या नुकत्याच वर्तमानपत्रांमध्ये सफोटो झळकल्या. या खरेदीला कारण होतं २६/११च्या हल्ल्यांचं. म्हणजे आम जनतेच्या जिव्हाळ्याचं आणि ‘नॉट सो आम’ जनतेच्या मेणबत्त्या उजळवणारं. त्यामुळे, राज्यात बंदुका, चिलखती वाहनं, स्कॅनर, बोटी, पाण्यातून जमिनीवर, जमिनीवरून पाण्यात जाणारी उभयचर वाहनं असा ‘खरेदी का सुहाना मौसम’ सुरू झाला. राज्य सरकार, महापालिका, पोलिस वगैरेंनी मिळून आता अख्ख्या मुंबईवर ‘टेररिस्टप्रूफ’ आच्छादनच घालायचं काय ते बाकी ठेवलं आहे (त्याचंही टेंडर निघालं असेल, काही भरवसा नाही), इतकी सज्जता. तिचं जंगी प्रदर्शन. टिक् टॉक् टिक् टॉक् संचलन. तेही २६/११च्याच मुहूर्तावर. आम्ही कोणाला डरत नाही, असं एकदम खडसावून सांगून टाकलं आपण.
 
कोणाला?
 
कोण जाणे?
 
पण, दम कसा जोरदार?
 
पाण्यातून टेररिस्ट पाठवता काय? आमच्या पोलिसांची गाडी तुम्हाला पाण्यातच पकडेल. तिकडे हाती नाही लागलात, तर तुमचा पाठलाग करत आमचं वाहन पाण्यातून थेट जमिनीवरपण येईल. आहात कुठे भाऊ?
 
एक्स्क्यूज मी! पण, समजा अतिरेक्यांनी या वेळी कराची-बधवार पार्क लाँचऐवजी फरीदकोट-फणसवाडी एसटी बस पकडली तर?
 
तर.. तर.. तर..
 
तर काय ठाऊक नाय ब्वॉ!
 
अ‍ॅक्चुअली, अतिरेक्यांना अडवण्याचं काम आमचं नाही. ते आमच्या हद्दीत येत नाही. समजा, ते इथपर्यंत येऊन पोहोचले, त्यांनी हल्ला केला, त्याची अधिकृत खबर आमच्यापर्यंत आली, आमच्या अधिका-यांना तिचा अर्थबोध झाला, घटना आमच्या हद्दीत घडते आहे, याची खातरजमा झाली, तर आम्ही त्यांचा मुकाबला करायला कुणाला ना कुणाला पाठवू. वरिष्ठांचा आदेश आलाच तर (एवढा एक हातातला बर्गर संपवून) स्वत:सुद्धा जाऊ.
 
नुकतेच आपण शहिदांच्या स्मृतिप्रीत्यर्थ चार अश्रू ढाळलेले असल्याने कंठ रुद्ध झालेला असेल, मन भरून आलेलं असेल आणि त्यामुळे, शूर पोलिसांवर हा ‘हल्ला’ का, असा प्रश्न पडला असेल. तर जरा आठवून पाहा. २६/११च्या हल्ल्यात शौर्य गाजवल्याबद्दल ज्यांना आपण सलाम केला, त्या पोलिसांची कामगिरी व्यक्तिगत स्वरूपाची होती. सुरक्षायंत्रणा म्हणून उघडय़ावर आला तो पोलिसांमधला बेबनाव आणि समन्वयाचा अभाव. राज्याचे तीन सर्वोच्च पोलिस अधिकारी तडफडत पडले असताना शेजारून पोलिसांच्या तीन गाड्या जातात आणि एकही त्यांना वाचवायला थांबत नाही, म्हणजे काय?
 
पोलिसांना अशी पळता भुई थोडी झाली, याचं कारण म्हणजे खरं तर तर शस्त्रसुसज्ज आणि ‘युद्ध’निपुण अतिरेक्यांशी लढणं, हे मुळात पोलिसांचं काम नाही. शहरातली कायदा आणि सुव्यवस्था राखणं हे त्यांचं काम. अतिरेक्यांशी लढणं हे लष्कराचं काम आहे. पण, हे अतिरेकी लेकाचे सीमेवर लढत नाहीत. ते शहरात, हॉटेलांत, स्टेशनांत, रस्त्यावर गोळीबार करतात आणि खालीपिली पोलिसांच्या डोक्याला ताप होतो.
 
आधी मुळात पोलिसांच्या कायदा सुव्यवस्थेच्या डय़ुटी अवर्सचाच कायमचा बो-या वाजलेला. सकाळी गेलेला माणूस आठ तास भरून वेळेवर घरी येईल, अशी शक्यताच नाही. तो कधी बारा तास डयुटीवर, कधी चोवीस तास, तर कधी छत्तीस तास. त्यात त्यांना कामं किती? दिवसाच्या कोणत्याही वेळी, कोणत्याही ठिकाणी अधिका-यांना, मंत्र्यांना सलाम ठोकायला उभं राहा. उपद्रवी स्थानिकांच्या उपक्रमांकडे काणाडोळा करण्याबद्दल दररोज, दरहप्ता किंवा दरमहा मिळणारा ‘जिव्हाळानिधी’ गोळा करा, त्याचं खालपासून वपर्यंत सुयोग्य वाटप करा, आपल्या हद्दीत दोन पार्ट्यामध्ये काही लफडं असेल, तर त्यांना कायद्याचा धाक दाखवून आपली ‘सुव्यवस्था’ करून घ्या. पासपोर्टचं चौकशीपत्र, चारित्र्याचं प्रमाणपत्र आदींचं योग्य दराने वाटप करा. नेत्यांचे, नगरसेवकांचे, मंत्र्यांचे फोन घ्या. त्यानुसार गुन्हेगारांचं शुद्धीकरण करून घ्या. नोंदी करा. नोंदी खोडा. नोंदींमध्ये फेरफार करा. सामान्य माणसाला पोलिस स्टेशनची पायरी चढायची वेळ येऊ नये (वाचा : हिंमत होऊ नये) असा बंदोबस्त ठेवा. पोलिसांना एवढी कामं असतात, याची कल्पना नसलेले गुन्हेगार बलात्कार, खून, लुटालूट वगैरे करतात, त्यांची विचारपूस करा. शिवाय, वाढलेली पोटं आत घेण्यासाठी योगसाधना करा, हद्दीतल्या म्हाता-या-कोता-यांची खबर ठेवा, त्यांच्या घरी जाऊन प्रेमाने बोला, वगैरे ‘व्याह्याने धाडलेली घोडी’ असतातच. एवढ्या सगळ्या गदारोळात- ज्याप्रमाणे अर्जुनाला फक्त पोपटाचा डोळाच दिसत होता, त्याप्रमाणे- एकाग्रचित्ताने प्रमोशन आणि पोस्टिंग यावर डोळा ठेवायचा असतो. त्यासाठी आवश्यक सज्जता ठेवायची असते.
 
आता या सगळ्यातून कितीही सुसज्ज सामुग्री मिळाली तरी अतिरेक्यांचा सामना कोण आणि कसा करणार?
 शिवाय आपली सगळी तयारी ‘हल्ला झाला तर’ची. हल्ला होणारच नाही, असं आपण काहीही करू शकत नाही, याची खालपासून वपर्यंत सगळ्यांना अलिखित खात्री आहे.. आपल्या सगळ्या यंत्रणा आपण स्वहस्ते भोकं पाडून इतक्या सच्छिद्र करून टाकलेल्या आहेत की मनात आणल्यास एखादा देशच्या देश त्यांतून आपल्या देशात स्थलांतरित होऊ शकेल. (बांगलादेशात अजून राहतं का कोणी?)
हल्ल्याच्या प्रतिकाराची आपली थियरीही एकदम ‘प्रॅक्टिकल.’ कालचा हल्ला समुद्रातून झाला की आज सगळ्या यंत्रणांचे डोळे समुद्राकडे. उद्या अतिरेकी हवाईमार्गे येऊन आधी ‘टुक् टुक्’ करतील आणि मग धडाम् धुम्.. धड् धड् धड् धड्.. थड् थड् थड् थड्..
 
की लगेच आपल्या सगळ्या बंदुका-तोफांची तोंडं आकाशाकडे आणि जमिनीबरोबर आकाशातही चालू शकणा-या वाहनांची खरेदी.
 
हा खेळ अनंत काळ चालू राहणार.. आजच्या हल्ल्यामुळे घेतलेली सामुग्री उद्याच्या हल्ल्यापर्यंत एकतर गंजून जाणार किंवा त्या हल्ल्याचं स्वरूपच बदलल्याने निरुपयोगी ठरणार.. मग त्या हल्ल्यानंतर जशा नव्या मेणबत्त्या, तशी नवी सामुग्री.
 
आणि बराच काळ हल्ला झालाच नाही तर.
 
मग तर फारच बरं. नोंदपुस्तकात फक्कडसा शेरा लिहायचा.
 
‘साहेब मजकुरांस येणेप्रमाणे कळविणेत येते की, अतिरेक्यांनी हमला केल्यास त्यांचा मुकाबला करण्यासाठी सगळी शस्त्रसामुग्री सुसज्ज करून ठेवण्यात आली होती. मात्र, शत्रुराष्ट्राच्या अतिरेक्यांनी योग्य वेळेत हल्लाच न केल्यामुळे तिचा वापर होऊ शकला नाही आणि ती गंजून भंगारात निघाली आहे.’ 


29/11/09

No comments:

Post a Comment